विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.
नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.
कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥
कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.
दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!
चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.
असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||
असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.
(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)
अपूर्वाई
अपूर्वाई
कस्टम ऑफिसरने 'गरीब बिचारा माधुकरी' म्हणून केलेली बोळवण मी कधीही विसरणार नाही.
शाळेत एका वर्षी ही कविता होती. - गरीब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी
मुंबईहून उड्डाण केल्यावर विमानात रात्र जाते आणि उजाडल्यावर 'बेहरीन' बेटावर विमान उतरण्याच्या आधी जपानी एअरहोस्टेस सर्वांना 'प्रफुल्ल होओनी सुपुष्प ठेल्या'सारखी लोकांना 'शय्या पेय' आणून देते.
'प्रफुल्ल होओनी सुपुष्प ठेले' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्ये पण आहे.
रडक्या सुरात कविता शिकवणारे व
रडक्या सुरात कविता शिकवणारे व जांभया देत शिकवणारे दोन्ही मास्तर वेगळे "खबरदार..." शिकवणार्या मास्तरांच्या तासाला मागचा फळाही हात मागे घेउन डुलक्या मारत असे, असे त्यात आहे
फारएंड तुम्ही म्हणता तसेच
फारएंड तुम्ही म्हणता तसेच असेल. मला टीव्हीवर पुल देशपांडेंनी जांभई द्यायचा अभिनय वगैरे करून बोललेलं आठवतंय.
रच्याकने "प्रफुल्ल होऊनि सुपुष्प ठेले" हे पुलंनी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं दिसतं. मैत्र (?) पुस्तकातल्या एका लेखाचं नाव "माझ्याच साठी फुललो न मी" आहे. त्यात ते (काहीसे) असे म्हणतात की लहानपणी पंतोजींच्या धाकाने शिकलेल्या कवितेच्या ओळी कुणासाठी तरी इतक्या चपखल लागू होतील असा कधी विचार सुद्धा केला नव्हता. "प्रफुल्ल होऊनि सुपुष्प ठेले ..... माझ्याच साठी फुललो न मी हे ऐका समस्तांप्रती सांगताहे" अशी काहीशी ती कविता आहे.
हरचंद पालव हा धागा
हरचंद पालव हा धागा काढल्याबद्दल तुम्हाला मटार उसळ आणि केळीचं शिकरण !
चैनीची परमावधी
चैनीची परमावधी
प्रफुल्ल होओनी सुपुष्प ठेले'
प्रफुल्ल होओनी सुपुष्प ठेले' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्ये पण आहे.>>>
ठेले म्हणजे काय ठाकले
हे अशा आवेशात म्हणत की जणू ते सुपुष्प नावाचे प्रकरण हातात फरशी घेऊन रामोश्या सारखे रस्त्यावर उभे असल्यासारखे वाटत असे
बिगरी ते मॅट्रिक तर खाण आहे वाक्यांची
प्रेमपत्र कितीही सुंदर असले तरी त्याचे जाहीर वाचन हशा पिकवते
किती चपखल
हे सगळ्यांना माहितीच असेल.
ती फुलराणी
हे सगळ्यांना माहितीच असेल. लिहायचं राहिलं होतं म्हणून लिहिलं.
माझा रुमाल. गाळीव इतिहास
माझा रुमाल. गाळीव इतिहास मध्ये अक्षरशः वाक्यावाक्याला असे संदर्भ आहेत. पुस्तक सापडवून लिहिते.
धन्यवाद वरदा. नक्की लिहा.
धन्यवाद वरदा. नक्की लिहा. धाग्याचं शीर्षक तिथूनच प्रेरित आहे.
खुप छान. आता परत पुल वाचताना
खुप छान. आता परत पुल वाचताना हे सगळे संदर्भ कळल्यामुळ वाचायला जास्त मजा येईल.
मी विचार करतच होते, की हा
मी विचार करतच होते, की हा धागा इतक्यात दमला की काय!
वरदा, नक्की लिही.
पूर्वरंग - जपानमध्ये भेटलेले व्यापारी रोशनलाल - त्यांच्याबद्दल लिहिताना वासुदेवशास्त्री खरे यांच्या एका मराठी श्लोकाचा उल्लेख आहे.
खरे मूळचे कोकणातले, मिरजेत स्थायिक झाले होते, त्यांनी लिहिलंय - खाड्या त्या तव जन्मभूमी ! नयनी पाहीन केव्हा तरी?
हा संपूर्ण मराठी श्लोक कुणाला माहिती आहे का?
(पुस्तकं चाळत चाळत असे उल्लेख/संदर्भ शोधायला मजा येतेय.)
khare.pdf (177.95 KB)
khare.pdf (177.95 KB)
ती कविता आहे.
वरदा - नक्की लिही! तुझ्या
वरदा - नक्की लिही! तुझ्या माबोवरच्या काही लेखांची नावेही अशीच काही वाक्यांचे संदर्भ घेउन आली आहेत हे लक्षात आहे
"कालप्रवाही वाहून गेला..." या लेखाचे नाव त्या पुलंच्या वाक्यावरूनच घेतले आहे, की त्याचा आणखी मूळ संदर्भ कालिदासाच्या एखाद्या वाक्याचा आहे?
पुलंच्या संगीतिकेवरूनच घेतले
पुलंच्या संगीतिकेवरूनच घेतले आहे ते शीर्षक, फा.
उद्या लिहिते. आज पुस्तक हाताशी लागलेले आहे.
@वावे
@वावे
धन्यवाद.! हो मायबोली हे मराठी आंतरजालावरचे पहिले प्रेम आहे. वाचनमात्र म्हणून अधूनमधून भेट असते इथे.
@ललिता-प्रीति
नाही.
@srd
खूप धन्यवाद.
Deepak, तुमचा ब्लॉग अनेकदा
Deepak, तुमचा ब्लॉग अनेकदा वाचनात येतो. छान संकलन केलं आहे. तुम्ही इथे आहात हे माहीत नव्हते.
लोकसत्तेतला हा लेख वाचनीय आहे
लोकसत्तेतला हा लेख वाचनीय आहे: https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-languages-phrase-language-m...
त्यातला हा उतारा -
"
‘‘सदा वक्र:, सदा रुष्ट:, सदा पूजामपेक्षते कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशमो ग्रह:’’ म्हणजे नेहमी वाकडा, नेहमी रुसलेला, नेहमी मानपानाची अपेक्षा असणारा जावई हा सतत कन्या राशीला लागलेला दहावा ग्रह आहे! यात थट्टेने आलेला ‘दशमग्रह’ हा शब्द मराठीत कसा रूढ झाला आहे, ते पाहा : पु. ल. देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ त्यांना म्हणतो: ‘जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो!’ (व्यक्ति आणि वल्ली).
"
हपा, मस्त आहे लेख. थोडा
हपा, मस्त आहे लेख. थोडा त्रोटक वाटला, अजून वाचायला आवडलं असतं.
लोकसत्तालं ते एक सदर आहे.
लोकसत्तालं ते एक नियमित सदर आहे. तेवढीच जागा असते. रोज असतं आणि वारागणिक लेखक व विषय ठरलेले आहेत.
मला वरच्या 'कन्याराशिस्थितो
मला वरच्या 'कन्याराशिस्थितो नित्यं' चा लोकसत्तेत दिलेल्यापेक्षा थोडा वेगळा अर्थ वाटतो. म्हणजे उलट पुलंनी लावलेला अर्थ जास्त चपखल आहे. 'रुसलेला, मानपानाची अपेक्षा करणारा असा तो कन्या राशीला लागलेला दहावा ग्रह' - असं नसून, 'रुसलेला, मानपानाची अपेक्षा करणारा आणि कन्येच्या घरात (राशीत) कायम राहणारा असा जावई हा दशमग्रह होतो' - असं पाहिजे.
खूपच माहितीपूर्ण लेख आणि
खूपच माहितीपूर्ण लेख आणि कंमेंट्स हि
https://youtu.be/uNhDjSRoQQ8
https://youtu.be/uNhDjSRoQQ8
आधी बघितली नसेल तर जरूर बघा... पुलंच्या स्वतः च्या आवाजात त्यांचाच जीवनपट. या मध्ये पुलंनी अनेक पात्र, व्यक्तिचित्र त्यांना
कशी सुचली ह्याचा उल्लेख केला आहे
धन्यवाद छंदीफंदी. तुम्ही
धन्यवाद छन्दिफन्दि. तुम्ही दिलेल्या (पुलंच्या साठाव्या वाढदिवसाच्या वेळी केलेल्या) फिल्मप्रमाणेच जब्बार पटेलांनी पुलंच्या ऐंशीव्या वाढदिवशी एक रंगीत फिल्म केली होती. एकदाच दूरदर्शनवर पाहिली होती मी. पण पुन्हा कुठे पाहायला मिळाली नाही. ती कुठे मिळाल्यास कृपया नक्की कळवा.
फेफ, तुमचेही आभार आणि तुमच्या सूचनेचंही स्वागत. जितके सुचले तेवढेच संदर्भ देऊ शकलो. पण पुढच्या वेळी नक्की तुमची सूचना अमलात आणेन आणि जास्त सविस्तर लिहायचा प्रयत्न करेन.
हे अतिशय सुरेख, ओघवतं व स्वतः
हे अतिशय सुरेख, ओघवतं व स्वतः आनंद घेत- मन लावून लिहिलंय हर्पा. मी बाजूला काढून ठेवले ते राहूनच गेले होते. तुम्ही अधिकाधिक स्वतंत्र लेख लिहावेत ही विनंती. लेखातील मराठी भाषा वाचून जीव थंड झाला.
प्रतिसाद नीट वाचेन. मैत्र, आपुलकी, रेडिओ वरील भाषणे व श्रुतिका आणि हसवणूक ही पुस्तके घरी आहेत. ती पुन्हा वाचेन व भर घालता आली तर घालेन.
अस्मिता, धन्यवाद. नक्की लिहा,
अस्मिता, धन्यवाद. नक्की लिहा, वाचायला आवडेल. अणि हो, हे खरं आहे की मी स्वतंत्र लेख फारसे लिहीत नाही. मला फारच वेळ लागतो ते करायला. पण प्रयत्न करत राहीन.
मी काल चुकून फे फ ह्यांचा प्रतिसाद माझ्याच लिखाणाबद्दल आहे असं समजून प्रतिसाद दिला. आत्ता पुन्हा पाहिलं तर लक्षात आलं की ते लोकसत्तामधल्या लेखाबद्दल बोलत होते.
“ मी काल चुकून फे फ ह्यांचा
“ मी काल चुकून फे फ ह्यांचा प्रतिसाद माझ्याच लिखाणाबद्दल आहे असं समजून प्रतिसाद दिला.” तुम्हीही लिहीत रहा. छान लिहीता.
हा हा. धन्यवाद
हा हा. धन्यवाद
फेफचा मजकूर लोकसत्ता
फेफचा मजकूर लोकसत्ता क्वालिटीचा वाटतो ही तारीफ आहे की टीका असा प्रश्न पडेलमाझ्या समजण्यातील गोंधळामुळे आधी लिहीलेले वाक्य खोडत आहे. पण नुसतेच खोडले तर काय होते म्हणून पुन्हा प्रश्न पडू नये म्हणून पूर्ण काढत नाही
माझा कालचा मजकूर मायबोली
माझा कालचा मजकूर मायबोली क्वालिटीचा वाटतो. गैरसमज होता की स्वतःची तारीफ करून घेण्याची चुकार क्लृप्ती असा प्रश्न पडेल.हपा
हपा
Pages