मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, 'एम्पायर्स...' मस्त पुस्तक आहे. माझं अजून वाचून पूर्ण व्हायचंय.
ती प्रवासात वाटेत ज्या बारीकसारीक गावांमध्ये राहिली, तिथल्या लोकांशी बोलली ते जसजसं डोक्यात एकत्र होत जातं त्यातून तिच्या प्रवासाचा खरा आवाका लक्षात येत जातो.
यातून दिसणारा पाकिस्तान आपल्या (किमान माझ्या तरी) माहितीपलीकडचा आहे. गिलगिट-बाल्टीस्तानमधलं वर्णन मला खूप आवडलं. केवढा अज्ञात प्रदेश आहे तो अजूनही... पुरातत्वाच्या दृष्टीने तिथे भांडार असावं, पण त्याला तितकी प्रसिद्धी मिळत नाही.

ऋषिकेश गुप्तेचे 'घनगर्द' स्टोरी टेलवर ऐकले. याआधी त्याचेच भयकथाही ऐकले होते. 'भयकथा' आवडले होते, 'घनगर्द' नाही आवडले.

एका गार्गी नावाच्या तेराचौदा वर्ष वय असलेल्या मुलीच्या मनोव्यापाराने कथा फुलत जाते. जी मला फुलली अशी वाटली नाही, ही भयकथा नाही. ती कुठेतरी खूप एकटी आहे, आईबाबांची भांडणं बघत मोठी होत आहे. बाबांचे अफेअर आणि बाबाच्या गर्लफ्रेंडने पाठवलेले फोटो बघून विचित्र वाटावे इतपत वयात आली आहे. मधेच शेजारी एक स्नेक चार्मर ज्याला स्नेक ओनर म्हटलं आहे, तो येतो. मधेच मैत्रिणींसोबत पाहिलेली ब्लू फिल्म, शाळेतील पोहण्याच्या शिक्षकाकडून झालेले लैंगिक शोषण - त्याला जमेल तसा प्रतिकार - नंतर तो आपोआपच निलंबित होणं, युवी नावाचा काल्पनिक बॉयफ्रेंड, त्याच्यासोबत काल्पनिक सलगी, पिरियडची प्रतिक्षा - कुतूहल, अचानक कौटुंबिक ट्रिप व तेथे माकडाने केलेला हल्ला व दरीत कोसळून बाबाला आलेला मृत्यू.

कोणतेच उपकथानक तडीस नेले आहे असे वाटले नाही, नुसते लूज एन्ड्स सोडून दिले आहेत. कथेला क्लायमॅक्स नाही. वर्णन भरपूर, बरेचदा रेपेटेटिव्ह, आशय कमी. त्या वर्णनालाही अंत -आधार नाही. भरपूर इंग्रजी शब्द वापरले आहेत, अगदी साध्या साध्या शब्दाला सुद्धा इंग्रजीचा वापर केला आहे. शिवाय ते उच्चारही सफाईदार वाटले नाहीत. आवडली नाही कादंबरी. पण नेटाने ऐकली.

'दंशकाल' आणि 'कानविंदे हरवले' या दोन कादंबऱ्या वाचून बघाव्यात त्यांच्या. Highly recommended.! (त्यांचं इतर लिखाण या कादंबऱ्यांच्या तोडीचं नाही.)
कथांमध्ये 'परफेक्टची बाई फोल्डींगचा पुरूष' आणि'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या दीर्घकथा उत्कृष्ट आहेत.

आवडली नाही कादंबरी. >>
'घनगर्द' कथासंग्रह आहे ना?

Happy बरं, संप्रति. 'दंशकाल' यादीत टाकून ठेवली होतीच , आता 'कानविंदे हरवले'ही टाकेन. त्या कथांचीही नोंद घेतली.
'घनगर्द' कादंबरीच आहे. एवढी एकच कथा आहे त्यात.

दंशकाल मागे वाचलं होतं. पुस्तकातलं 'स्टोरी टेलिंग' खूप भारी आहे. शृंगार, शौर्य, क्रौर्य, बिभत्स, गुढ, रहस्य, भिती असे अनेक रस कथेत येतात. कथेतला नायक जसा मोठा होत जातो तशी पुस्तकातली भाषाही बदलत जाते, त्या वयाला साजेशी होत जाते. लेखकाने उभ्या केलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा एकदम जोरदार आहेत. गावातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथली भाषा ह्याचं बरोबर नंतर शहरातलं वातावरण हे सगळं लेखकाने एकदम बारकाव्यांनिशी उभं केलं आहे. गोष्ट सांगताना, मधेच पुडी सोडून दिल्यासारखा एखादा मुद्दा येतो आणि नंतर त्याबद्दलचा सविस्तर तपशिल येतो. त्यामुळे असा कुठला नवीन उल्लेख दिसला की पुढे काय असेल ह्याबद्दल उत्सुकता वाटत रहाते. काही ठिकाणी मधली मधली विवेचनं जरा रेंगाळतात. तर काही ठिकाणी बिभत्स आणि अतिवास्तववादी वर्णन खूप अंगावर येतात, काही ठिकाणी ती वास्तव सोडून फार जास्त नाट्यमयही होतात. एकंदरीत चांगलं आहे पुस्तक. पण मला त्या काळात वाचललेली बाकी पुस्तकं जास्त आवडली होती. गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी, शोध, झुंड वगैरे.

'घनगर्द'मध्ये बहुदा स्टोरीटेलवर ही एकच कथा असावी..
एरव्ही 'घनगर्द' या छापील कथासंग्रहात इतरही कथा वाचलेल्या आठवतात..

गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी>>
हे चांगलंच आहे‌. मला पण आवडलेलं.

दंशकाल मलाही आवडलेलं. मी लिहिलं आहे याच धाग्याच्या पहिल्या पानावर.
मी हृषीकेश गुप्तेचं 'मृत्योपनिषद' स्टोरीटेलवर ऐकलं होतं किशोर कदमच्या आवाजात. ते शेवटी मला अधांतरी सोडून दिल्यासारखं वाटलं होतं. कदाचित पुढचा भाग येणार असेल असं वाटलं. त्याची 'हाकामारी' ही कथा (जी आधी एका दिवाळी अंकात एक अनाथ, एक डिटेक्टिव्ह अशा काही तरी नावाने आली होती) तीही मस्त आहे. स्टोरीटेलवर आहे/होती. सीनियर सोनाली कुलकर्णीने वाचली आहे बहुतेक.

घनगर्द'मध्ये बहुदा स्टोरीटेलवर ही एकच कथा असावी..
एरव्ही 'घनगर्द' या छापील कथासंग्रहात इतरही कथा वाचलेल्या आठवतात..
>>>>>
शक्य आहे. गुप्तेचे इतर कथासंग्रह संपूर्ण असताना ह्यालाच का असे केले काय माहित.

हाकामारी चांगली आहे का! मी चालू केली पण सोनाली कुलकर्णीचा आवाज आणि वाचन न आवडल्याने बंद केली.
घनगर्द मध्ये खूप इंग्रजी शब्द आले आहेत कारण ते त्या मुलीच्या प्रथमपुरुषी (प्रथमस्त्री Wink ) मनातले आहेत असं असावं. हृषिकेश गुप्त्यांची रंगांची विशेषणं मात्र गंडलेली का असतात? लाल जर्द, काळा चुटुक ... संदर्भात त्यांना दुसरं काही म्हणायचं असावं असं ही वाटत नाही. दोन तीन संग्रहांत असं वाचलं आहे.

'डेट विथ देवदास'- योजना यादव (वॉल्डन प्रकाशन)

या कथासंग्रहात, एकाच रंगात न्हाऊन निघालेल्या एकूण सात कथा आहेत, ज्यांमधून महानगरी अल्ट्रा-मॉडर्न पैस, आणि त्यात वावरणाऱ्या एकेकट्या फारतर दुकट्या व्यक्तींचा सॉलिट्यूड अतिशय नजाकतदार रितीने चितारलेला आहे.

तरल लिखाण आहे. कथांमधील ओळींची गुंफण विलोभनीय आहे. एकेक ओळ रचताना तिच्यात भाषेचे अनोखे प्रयोग केलेले दिसतात, त्यामुळे एकेका इंडिव्हिज्युअल ओळीबद्दल मनापासून दाद उमटते. परंतु एकेक कथा वाचून संपल्यावर कथेचा म्हणून जो एक ओव्हरऑल इंपॅक्ट मनावर पडायला पाहिजे, तो काही पडत नाही. अधूरा वाटतो. (बहुदा संग्रहाची थीमच तशी असावी.)
अपवाद फक्त 'अक्का ना बक्का हुनू' या कथेचा.‌ ही एकच कथा अशी जाणवली की जी स्वतःच स्वतःचा माग काढत काढत शेवटी अचूकपणे स्वतःपर्यंत पोचते, रूतून बसते. या कथेत लक्ष्मीप्रसाद देवकोटा या नेपाळी भाषेतल्या कवीची 'पागल' म्हणून एक विलक्षण कविता आहे, ती यूट्यूबवर तात्काळ शोधून 'ऐकण्यासारखी' आहे. हा कवी अवगत करून दिल्याबद्दल लेखिकेचे आभार. एरव्ही हे नाव माहित झालं नसतं. [कवितेची लिंक: https://m.youtube.com/watch?v=xr6cKJ5XN_g&pp=ygUkbGF4bWkgcHJhc2FkIGRldmt... ]

या सर्व कथांचा सिग्निफिकन्स म्हणजे, त्या स्त्री-पुरूष नात्यासंबंधी मूल्यनिर्णय करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, जे की चांगलंच आहे.

फेमिनिस्ट बेअरिंग आहे, पण सॉफ्ट/सटल आहे, समकालीन आहे. गेल्या पिढीतल्या लेखिकेंसारखं तारस्वरातलं/चळवळखोर नाहीये. लेखिकेची पुरूषांबद्दलची निरीक्षणं रोचक आहेत. फक्त या कथांमध्ये सेक्स जरा जास्तच फ्रिक्वेंटली येतो, काही वेळा अनावश्यकही वाटतो. या पात्रांना सेक्सशिवाय आणि ड्रिंक्सशिवाय जमतच नाही की काय असा संशय यायला लागतो.
बाकी रचनेच्या अंगानं जाणवलेली छोटीशी त्रुटी म्हणजे यातले संवाद काही ठिकाणी जरा जास्तच साहित्यिक झाले आहेत. एवढ्या उच्च साहित्यिक भाषेत सलगच्या सलग एकमेकांशी बोलू शकणाऱ्या व्यक्ती कथा-कादंबऱ्यांबाहेर कुठे अस्तित्वात असतील असं वाटतं वाटत नाही, (किमान मराठी प्रदेशात तरी नाहीच नाही.!) तेवढं वगळता एकंदरीत पुस्तक एकदा वाचण्यासारखं आहे. काहीतरी वेगळं वाचल्याचा फील देणारं वगैरे.

Screenshot_20250616_220750~2.jpg

ऋषिकेश गुप्तेचे नाव ऐकून दोन तीन. पुस्तकं वाचली आणि नाद सोडला. कथा फार लांबवतो.
----------
डेट विथ देवदास पुस्तकाचं चित्र आवडलं/समर्पक वाटलं. बाटलीवर एक पक्षी बसलेला दाखवला आहे त्याला {मराठीत तरी}वेडा राघू म्हणतात. डेटसाठी हा पक्षी बरोबर शोधलाय.
-------------------
आता इजरायल- पलिस्तीन संघर्ष चालू आहे त्यानिमित्ताने जुनंच पण न वाचलेलं { आणि गाजलेले} O Jerusalem वाचलं. खरी माहिती योग्य व्यक्तिंकडून जमवून पुस्तक लिहिलं आहे पण फारच लांबवले आहे. खूपच व्यक्ती आणि घटना आहेत आणि त्या थोड्या गाळल्या असत्या तरी चालले असते.

Happy मस्त परिचय संप्रति. तुम्ही पुस्तकाचा फोटो टाकता ते आवडतं. मधल्या परिच्छेदामुळे पुस्तकांनाही ओटीटीचं वारं लागलं असं वाटतंय. सॉफ्ट/ सटल फेमिनिझम हा सामान्यांपर्यंत चांगला पोचतो, कुठलीही गोष्ट सतत तलवार घेऊन सांगितली की ऐकणाराही बंड करतो आणि उलट दिशेने चालू लागतो. सगळंच वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. 'पागल' कविता नोंदवून घेतली.

Autopsy Room Four
ही स्टीफन किंग ह्यांची एक भयकथा. Everything is Eventual किंवा Six Stories ह्या कथा संग्रहात आहे. भयकथा रसिकांनी बहुतेक वाचली असणारच.
कथेचा नायक आहे Howard Cottrell. हा गोल्फ खेळत असताना चेंडू शोधण्यासाठी म्हणून झाडीत घुसतो. आणि जागा होतो तो हॉस्पिटलच्या स्ट्रेचर वर. त्याला विचित्र प्रकारचा अर्धांगवायू झाला आहे. त्याला आजूबाजूला काय चालले आहे त्याची पूर्ण जाणीव आहे. पण तो आपला एकही स्नायू हलवू शकत नाहीये. त्याला स्वतःला आपण जिवंत आहोत की नाही ह्याची पण खात्री नाही. तो ओरडत असतो
पण केवळ त्याची किंकाळी त्याच्या डोक्यात असते. बाहेर पडत नाही. त्याला शवविच्छेदनासाठी Autopsy Room Four मध्ये आणण्यात येते. नायक स्वतःचे शव विच्छेदन स्वतः याच देही याच डोळा बघणार आहे.
पुढे काय होते? मला वाटतं की आपण ही कथा मुळात वाचून काढावी. ही छोटेखानी कथा आहे त्यामुळे जास्त वेळ घालावा लागणार नाहीये, वेळ वाया गेला तर फक्त अर्धा तासच वाया जाईल.
ह्या कथेत अनेक विषय आहेत. अनेकांनी ह्या कथेचे विश्लेषण केले आहे. पण माझ्या मते Loss Of Communication हा मुख्य थीम असावा.
ही कथा आपण नेट वर वाचू शकता.

आज ॲन्टॉन चेकॉव्हची 'पैज' ही कथा ऐकली. मूळ नाव 'द बेट' आहे. मला फार आवडल्या आहेत चेकॉव्हच्या काही कथा. ही मात्र खूप आवडली असे म्हणता येणार नाही. कायद्याची चर्चा करत असताना - नैतिकदृष्ट्या एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणं अधिक योग्य की जन्मठेप अधिक योग्य अशी चर्चा चाललेली असताना एका बॅन्करमधे व एका तरुण वकीलामधे पैज लागते. वकीलाचे म्हणणे असते की माणूस जिवंत राहणं कधीही चांगलं आणि जी गोष्ट कायदा परत देऊ शकत नाही ती त्याने हिरावून घेणंही माणुसकीला सोडून आहे. बॅंकरचे म्हणणे असते की तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडण्यापेक्षा मृत्यू कधीही चांगला.

यानंतर तो तरुण वकील पैजेखातर जन्मठेपेवत वीस वर्षे तुरुंगात रहायचे व त्याबदल्यात त्या वकीलाने त्याला वीस लाख द्यायचे ठरते. नंतर त्या तरुणाचा एकांतवासातील माणूस म्हणून एक आगळावेगळा प्रवास सुरू होतो. वेगवेगळी पुस्तके वाचत तो जगापासून दूर एक वेगळ्याच विश्वात जातो. जेथे तो कल्पनेने भौतिक सुखं भोगतो, निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. तो संपूर्णपणे विलग होतो. इकडे वीस वर्षे पूर्ण होत येतात तसे बॅंकरला आपण पैजेची रक्कम देऊन देशोधडीला लागणार याची भीती वाटायला लागते व तो त्याच्या खुनाचे मनसुबे आखतो. पण या एकांतवासाने तो तरुण तिकडे जीवन्मुक्त होऊन पैजेच्या रकमेलाही नाही म्हणतो. मुद्दाम पैजेची अट मोडून पैसे द्यावे लागू नयेत म्हणून वीस वर्षे पूर्ण होण्याच्या पाच मिनिटे आधी तेथून बाहेर पडतो व हवेत विरून जातो किंवा अदृष्य होतो.

त्या तरुणाचा एकांतवासातील प्रवास ऐकायला आवडला. कधीकधी पुस्तकांची सोबत खूप काही देऊन जाते, नव्या जाणिवा विकसित करते, तुम्हाला तुमचीच सोबत आवडायला लागते. या सगळ्याची मेंदू व मनावर एक नशा चढते- ते छान लिहिले आहे. कथेचा जीव मात्र एवढाच आहे. Happy

अस्मिता, दूरदर्शनवरच्या कथासागर मालिकेत या कथेवर एक भाग पाहिल्याचं आठवतं. एकांतवासात राहिलेल्याचं काम सचिनने केलं होतं. आणि चांगलं केलं होतं.
पैज लावणारी दुसरी व्यक्तीरेखा त्यात पुरुषच दाखवली होती बहुदा. कलाकार नक्की आठवत नाही.

आय मिस कथासागर!

मला कथासागर आठवत नाही पण 'चेकॉव्ह की दुनिया' मी आवडीने पाहिले होते. लहान होते किती कळाले कल्पना नाही पण चेकॉव्ह आपला वाटला होता. Happy कदाचित हे यूट्यूबर असेल, शोधून पाहेन. या कथेतही दोघेही पुरूषच आहेत.

'मायबोलीकर काय काय छान वाचत असतात' आणि 'आय मिस कथासागर' हे दोन्ही पटलं. पुस्तकाचा परिचयही अगदी नेमक्या शब्दात लिहीलेला असतो. इथल्या रेकमेंडेशनमुळे मी पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत आणि वाचतेही.

मायबोलीकर काय काय छान वाचत असतात' आणि पुस्तकाचा परिचयही अगदी नेमक्या शब्दात लिहीलेला असतो. इथल्या रेकमेंडेशनमुळे मी पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत आणि वाचतेही. <<<>>>>> + १११११

मला हा धागा खूप आवडतो. खूप वेगळी पुस्तकं समजतात. तुम्ही अशी छान छान पुस्तक कशी शोधता?
मी सध्या लायब्ररी + किंडल असे वाचत असते.

क्राईम जाॅनर मधे विश धमिजा आणी हुसेन झैदी यांची पुस्तक मस्त आहेत.
मराठी मध्ये एक पुस्तक आहे त्यात लेखकाने सर्व पर्वतरांगांच्या माथ्यावरून प्रवास केलाय. नाशिक बागलाण तिथून मावळ कोकण असा.
नाव आठवत नाहीये पण पुस्तक फार interesting आहे

प्राजक्ता, मी वाचलंय ते पुस्तक. इथल्याच एका मैत्रिणीने दिलं होतं. असं भटकायची कल्पनाच ग्रेट आहे. पण भिती वाटेल, अशीही आहे. कुठे राहणार, खाणार काहीही नक्की नसताना एकट्याने असं चालायचं म्हणजे अवघड काम आहे.

चार -पाच दिवस भटकत गडमाथे पाहण्यासाठी सहली /आराखडे आनंद पाळंदे यांच्या पहिल्या पुस्तकात आहेत. सुरुवातीची माहिती तर खूप उपयोगाची आहे. तंबू लावून राहण्याची सवय करून घ्यायला हवी.

मी वर Autopsy Room Four बद्दल लिहिले आहे.
आत्ताच मला त्याची शॉर्ट film दिसली.
https://www.youtube.com/watch?v=-RA6ydbA6BQ
इंग्लिश सबटायटल्स आहेत.
आणि film बघायची नसेल तर इथे ऑडिओ बुक आहे.
https://www.youtube.com/watch?v=crOvAtaDCuo

>>>>>>>>>मी वर Autopsy Room Four बद्दल लिहिले आहे.
आत्ताच मला त्याची शॉर्ट film दिसली.
https://www.youtube.com/watch?v=-RA6ydbA6BQ
इंग्लिश सबटायटल्स आहेत.
आणि film बघायची नसेल तर इथे ऑडिओ बुक आहे.
https://www.youtube.com/watch?v=crOvAtaDCuo

धन्यवाद.

Pages