Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान परिचय, संप्रति
छान परिचय, संप्रति
संप्रति, सुरेख लिहीलंय.
संप्रति, सुरेख लिहीलंय.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/86626
पुस्तक परिचय - बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)
‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हे
‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हे शांता शेळके यांचं पुस्तक नुकतंच वाचलं. मी त्यांचं वाचलेलं हे पहिलंच पुस्तक. पण ते वाचल्यावर एक सखेद आश्चर्य वाटलं की ह्या आधी आपण ह्यांचं काहीचं कसं वाचलं नाही.
माझ्या अल्पमती किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे शांता शेळके आणि चित्रपटगीते/ कविता हेच एक समीकरण डोक्यात पक्क होतं. परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने कळले की त्या फक्त एक उत्तम कवयत्रीच नव्हे तर प्राध्यापिका, वृत्तपत्र लेखिका, साहित्यिक, गीतकार, संगीतकार, अनुवादक, बालसाहित्यिकही होत्या.
आता ‘सांगावेसे वाटले म्हणून’ या पुस्तकाकडे वळूया. तो एकंदर 29 ललित लेखांचा संग्रह आहे. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे, माणसाच्या वेगवेगळ्या भावनांना, स्वभावांना आरसा दाखवणारे, तर काही अगदी तरल अनुभव देणारे असे हे लेख खूप आवडले.
‘ शब्द शब्द ‘ मध्ये (प्रामुख्याने न वापरलेल्या ) शब्दांचं महत्व समजावून देताना त्यांनी दर्शन घडवलेली शब्दावाचून अनेक अर्थ/ भावना पोहोचवणारी निसर्गाची भाषा, ‘मोनालिसा: न भेटलेली, भेटलेली’ मध्ये त्यांनी चितारलेल मोनालिसाचे सिम्बॉलिक रूप, ‘पुन्हा पुन्हा जून इलाइझ’ मध्ये आपल्या नेहमीच्या रहाटगाड्यात अगदी अल्पकाळासाठी भेटलेली आणि तरीही आपल्या मनात छाप सोडून गेलेली किंवा ठसा उमटवून गेलेली माणसं, ‘ एकांत: नकोसा - हवासा ‘ मधून वयापरत्वे बदलत जाणारे अनेक संदर्भ, ‘हेमाला मुलगी झाली’ मध्ये माणसाला नैसर्गिकरित्या आपला आनंद वाटण्याची आणि तो पसरण्याविषयीची उत्कटता, ‘थबकलेली वये’ मध्ये काळाबरोबर पुढे न जाता त्या काळाला मुठीत घट्ट पकडून ठेव बघणारी माणसं.. ह्या काही ठळकपणे छाप पाडून सोडून गेलेल्या गोष्टी!
कधी त्या हलक्याफुलक्या पद्धतीने आणि अतिशय तरलतेने- ‘मांजर आणि मी’, मोनालिसा, सलगी देणे किंवा ज्यून इलाइझ, हेमा ला मुलगी झाली ह्या सारख्या लेखांमधून - आनंददायी, सकारात्मक ऊर्जा देणारे असे विषय हाताळतात. तर कधी - ययातिचा वारसा, संतुष्ट, सावल्या, थबकलेली वये किंवा शब्द शब्द शब्द ह्या सारख्या लेखांमधून - परखड पणे व्यक्त होतात.
प्रत्येक लेख वाचताना आपणही अंतर्मुख होतो, विचारमग्न होतो. त्यातील, उदार - कृपण, व्यासंगी - आत्मसंतुष्ट, भाबड्या - कपटी, भल्या बऱ्या लोकांचे अनुभव, चांगल्या-वाईट घटनांची प्रचिती आपल्या आयुष्यातही आल्याचे किंवा आपलेही मन त्या भावनांच्या आंदोलनातून गेल्याचे जाणवत राहते.
हे पुस्तक वाचत असताना प्रामुख्याने जाणवतं ते म्हणजे त्यांचं भाषा प्रभुत्व, विपुल वाचन, उत्कृष्ट कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आतुर असलेलं मन, बुद्धिमत्ता आणि तरलता!
त्यांच्या लेखनातील मुबलक प्रमाणात आलेले
कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांया वांग्मयातील दाखले इथपासून ते पाश्चात्य साहित्यातील संदर्भ त्यांच्या वाचनसमृद्धीचे आणि कलोपासकतेचे दर्शन घडवितात.
मनाला आणि बुद्धीला आनंद देणारे काही सकस वाचन करायचे असेल तर शांता बाईंचे ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ जरूर वाचा.
खरंय.
खरंय.
<त्यांचं भाषा प्रभुत्व, विपुल
<त्यांचं भाषा प्रभुत्व, विपुल वाचन, उत्कृष्ट कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आतुर असलेलं मन, बुद्धिमत्ता आणि तरलता!> - शान्ताबाईंची ही वैशिष्ट्ये माझ्या मनावर अगदी ठसलेली आहेत. वाचनाच्या जोडीला अफाट स्मरणशक्ती.
मी हे पुस्तक वाचल्याला बरीच वर्षे झाली. त्यांचा पावसाआधीचा पाऊस हाही एक ललितलेख संग्रह आहे.
परिचय आवडला.
छन्दिफन्दि किंडालवरती घेतले
छन्दिफन्दि किंडालवरती घेतले पुस्तक.
योगायोगाने शांता शेळक्यांचं
योगायोगाने शांता शेळक्यांचं हेच पुस्तक परवा लायब्ररीतून आणलं आहे.
वाचल्यावर इथे लिहीन.
भित्ति - एस. एल. भैरप्पा
भित्ति - एस. एल. भैरप्पा (आत्मचरित्र)
इंग्रजी अनुवाद- एस. रामस्वामी आणि एल. व्ही. शांताकुमारी
(या पुस्तकाचा मराठी अनुवादही बहुतेक आहेच, पण हा इंग्रजी अनुवाद सहज हातात पडला म्हणून वाचला.)
सगळीच आत्मचरित्रं वाचनीय नसतात. भैरप्पा माझे आवडते लेखक असले तरी त्यांचं आत्मचरित्र मला आवडेलच अशी खात्री नव्हती, त्यामुळे काहीशा साशंकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. पण खूपच आवडत गेलं हे पुस्तक. एक विद्वान लेखक कसा घडत गेला आणि फुलत गेला, याची कल्पना आली.
भैरप्पांचा जन्म एका खेडेगावात झाला. त्यांचं घराणं 'शानभोग' पद असलेलं, (म्हणजे आपल्याकडे 'कुलकर्णी' हे हिशेब ठेवणारं पद असायचं, तसं) होतं. पण त्यांचे वडील हे निष्क्रिय आणि स्वार्थी होते. आई कष्ट करून मुलांना वाढवण्याची, शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होती. पण दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या कुटुंबाच्या मागे लागले होते. वारंवार येणाऱ्या प्लेगच्या साथीत भैरप्पांची दोन मोठी भावंडं एकाच दिवशी मृत्युमुखी पडली. ते स्वतः जेमतेम वाचले. काही काळाने आईचाही मृत्यू झाला, धाकट्या भावाचाही मृत्यू झाला. शेवटी एक धाकटी बहीण आणि स्वतः भैरप्पा, ही दोन भावंडं शिल्लक राहिली. हा बराचसा भाग त्यांनी 'गृहभंग' नावाच्या कादंबरीत लिहिला आहे.( मी ती वाचलेली नाही. ) आईकडून त्यांना वारसा मिळाला तो प्रामाणिकपणाचा आणि जातिभेद न मानण्याचा. ती एक अत्यंत परोपकारी स्त्री होती. घरात अठराविश्वे दारिद्रय. ज्या मामाकडे ते शिकण्यासाठी म्हणून रहात होते, तो मामा आणि मामी दुष्ट. क्रूरच म्हणायला पाहिजे. तिथून मग दुसऱ्या एका गावात पुढच्या शिक्षणासाठी गेल्यावर मात्र काही चांगली माणसं, चांगले शिक्षक मिळाले. वारावर जेवून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. पुढे म्हैसूरला शारदा विलास नावाच्या एका उत्कृष्ट शाळेत आले आणि तिथे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास वेगाने सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. तरीही पोट भरण्याची भ्रांत होतीच. वारावर जेवणं चालूच होतं. विविध प्रकारचे बरेवाईट अनुभव घेत त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवलं. शाळा सोडून मधलं एक वर्ष दिशाहीन म्हणावं असंही घालवलं. या काळात त्यांनी मुंबईत हमालाचं काम केलंय. नंतर परत म्हैसूरच्या शाळेत गेले आणि मग मात्र परत शिक्षणापासून फारकत घेतली नाही. तत्त्वज्ञान विषय घेऊन एम. ए. झाल्यावर हुबळीला लेक्चररची नोकरी धरली. काही काळाने ती सोडून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल विद्यापिठात नोकरीसाठी गेले. तिथे नोकरी करत असताना तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली. कादंबरी लेखनाला सुरुवात त्यांनी यापूर्वीच केली होती, पण या सुमारास 'वंशवृक्ष' लिहिल्यानंतर त्यांना जाणीव झाली की हेच आपलं खरं आवडीचं क्षेत्र आहे आणि यापुढे कादंबरीलेखन हेच आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवायचं. अन्यथा तोपर्यंत तत्वज्ञान विषयातच पुढे पुढे संशोधन करून अधिकाधिक पुढे जाणं, हा त्यांचा मार्ग होता.
पुढे मग चारपाच वर्षे दिल्लीत राहून नंतर ते म्हैसूरला आले आणि तिथेच स्थायिक झाले. आपण कन्नड भाषेत लिहितो, पण आपण कर्नाटकात रहात नाही, आपल्या कानावर रोज आपली भाषा पडत नाही, याचा त्रास त्यांना होत होता. त्यामुळे त्यांनी खटपट करून म्हैसूरला येणं जमवून आणलं.
भैरप्पांनी या आत्मचरित्रात अनेक माणसांचे भलेबुरे अनुभव सविस्तर लिहिले आहेत. त्यात नातेवाईक, परिचित तर आहेतच, पण नंतरच्या काळातल्या अनुभवांमध्ये कन्नड साहित्यविश्वातली काही प्रसिद्ध नावंही आहेत.
शास्त्रीय संगीताची आवड त्यांना होतीच, ती हुबळीला, गुजरातमध्ये आणि दिल्लीत असताना जोपासण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. अनेक गायक-गायिका, वादकांबद्दलची स्वतःची मतंही त्यांनी स्पष्टपणे मांडली आहेत.
आपल्या काही कादंबऱ्यांमधल्या काही पात्रांची प्रेरणा कुठून मिळाली, हेही त्यांनी काही ठिकाणी लिहिलं आहे.
जात, धर्म अशा विषयांवर स्पष्ट लिहायला भैरप्पा मागेपुढे पहात नाहीत, हे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना जाणवतंच, पण आत्मचरित्र वाचतानाही जाणवलं. Politically correct राहण्याची फारशी काळजी ते घेत नाहीत, मात्र 'तारतम्य' हा त्यांच्या विचारपद्धतीचाच अंगभूत गुण असावा, असं जाणवतं. याला कारणीभूत मूळ स्वभाव, आयुष्यात आलेले अनुभव, तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास हे सगळं असावं.
शेवटच्या साठ-सत्तर पानांमध्ये त्यांनी केलेल्या परदेशप्रवासांचं वर्णन आहे. ते वाचताना जरा कंटाळा आला.
एका गृहकृत्यदक्ष गृहिणीची (त्यांचे प्रकाशक गोविंद राव यांची पत्नी) आदरयुक्त स्तुती करताना त्यांनी इतर 'आधुनिक' गृहिणींना नावं ठेवली आहेत, हे आवडलं नाही. रात्री सगळं आवरून झोपल्यावर अपरात्री येणाऱ्या पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करून त्यांना जेवायला वाढणाऱ्या गृहिणी असायच्या, अजूनही असतील. पण हे असं असलं पाहिजे ही अपेक्षा चूक आहे. बऱ्याच जणांच्या या बाबतीतल्या (गृहस्थ आणि गृहिणीची कर्तव्यं) कल्पना या कदाचित संस्कारांवर अवलंबून असाव्यात.
या शेवटच्या एकदोन गोष्टी सोडल्यास अतिशय आवडलं पुस्तक. माणूस गुणी असला आणि त्याला पैलू पाडणारे शिक्षक लाभले तर त्या गुणांचं चीज होतं, हे परत एकदा पटलं.
"Be as you are"
"Be as you are"
रमण महर्षी हे अलीकडच्या काळातील एक एनलाईटन्ड मनुष्य होते. हे या पुस्तकातून झळकतंच म्हणजे. यामध्ये प्रश्नोत्तरे आहेत. त्यांच्याकडे लोक यायचे, प्रश्न विचारायचे, समस्या सांगायचे. त्याअनुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरं आहेत. समोरच्या मनुष्यानं ज्या पातळीवरून प्रश्न विचारला आहे, त्या पातळीवर पोहचून उत्तरं दिलेली आहेत. म्हटलं तर खूप डीप फिलॉसॉफीकल डिस्कशन्स आहेत, म्हटलं तर अगदी साधे सरळ सोपे संवाद आहेत.
त्यांची ही उत्तरं/चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकाळी लिहून ठेवलेली, त्यांचं कलेक्शन नंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झालं. (मराठीत नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं 'रमण महर्षी', तसेच प्रज्ञा सुखटणकर यांनी मराठीत भाषांतरित केलेली काही पुस्तकं आहेत.) पण हे "बी ॲज यू आर" हे इंग्रजी पुस्तक फारच चांगलं आहे. डेव्हिड गॉडमन या त्यांच्या शिष्याचे प्रचंड कष्ट यापाठीमागे आहेत. या पुस्तकाबाबत असं म्हणायचा मोह होतो की हे वाचलं तर स्पिरीच्युॲलिटीसंबंधी इतर कुठल्या पुस्तकाची आवश्यकताच वाटत नाही.
विचारले गेलेले प्रश्न क्वालिटीचे आहेत. त्यावर महर्षींची उत्तरं 'हटके' आहेत. ही उत्तरं अवाक् करतात. मौन करतात. म्हणजे शब्दांची अर्थवहनातील मर्यादा लक्षात घेता, जे शब्दांच्या सहाय्याने जे सांगणं अशक्य आहे, तेही पोचवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात.
ते उपदेश मोड टाळून मनाचं जंजाळ नेमकं कसं काम करतं, हे उलगडून दाखवण्यावर भर देतात. काही वेळा ते प्रश्नकर्त्यालाच एखादा मार्मिक (रामबाण) प्रश्न विचारतात आणि त्याला जोडून हळूहळू उपप्रश्नांची लड लावतात. त्या प्रश्नांचा मागोवा घेत जाण्यातून प्रश्नकर्त्याला स्वतःलाच उत्तरापर्यंत जाण्याचं सुचवतात. 'मी कुणीतरी गुरू बसलोय इथे, आणि आता तुम्ही माझं मुकाट ऐका' असला आविर्भाव त्यांच्याठायी कणभरही जाणवत नाही.
त्यांचा असा कुठलाही ध्यानविधी वगैरे नाही. त्यांच्या एकूण शिकवणुकीचा गाभा म्हटला तर 'सेल्फ एन्क्वायरी' किंवा 'आत्म-विचारणा' हा आहे. म्हणजे मनाला सतत प्रश्न विचारा. धांडोळा घ्या. प्रश्न, त्यामागे आणखी एक प्रश्न, त्यापाठीमागे पुन्हा आणखी एक प्रश्न असं करत करत मागे मागे इन्फिनिटी पर्यंत.! या प्रक्रियेत मन संभ्रमात पडतं. अवचित गळून पडतं. विलीन होतं.
हे म्हणजे मनाचा वापर करून मनाला निर्विचार करणं. मनाचा वापर करून मनाचा अंत घडवून आणणं. आणि हे सगळं तर्काच्या आधारे.! कुठंही 'हे माना' 'ते माना' 'यावर विश्वास ठेवा', 'त्यावर श्रद्धा ठेवा', 'अमुक शास्त्र असं असं सांगतं', 'तमुक ज्ञानी असं असं म्हणतो' वगैरे काही नाही. किंवा उगीच उदाहरणं/कथा-किस्से सांगून पाल्हाळ लावणं नाही. ते थेट मुद्द्यालाच हात घालतात आणि शेवटपर्यंत धरून ठेवतात. तर असा हा शुद्ध ज्ञानमार्ग. स्वतःच स्वतःला विचारून बघा आणि जाणा.
[रमण महर्षींसंबंधी थोडी अधिकची माहिती :
देहावसान (१९५०) होईपर्यंत ते तमिळनाडूमधील अरूणाचल पर्वत परिसरात राहत होते. ते स्थळ रमणाश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची राहणी अतिशय साधी सहज होती. आणि चेहऱ्यावर निर्मळ हासू. चांगलेपणाची बरसात करणारं.!
आयुष्यभर सर्ववेळ ते तिथे आश्रमात एका हॉलमध्ये बसून राहत. देशविदेशातून अध्यात्मिक जिज्ञासूंचा ओघ चालू असे. कुणीही यावं, बसावं. बोलायचं असेल तर बोलावं, काही विचारायचं असेल तर विचारावं. बोलायचं नसेल तर मौन बसावं. त्यांच्यापुढं सगळ्यांना मुक्त प्रवेश असे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना ॲक्सेसिबल राहिले. सगळ्यांशी सारख्याच आत्मीयतेने बोलत राहिले. व्हीआयपी/ सर्वसामान्य/गरीब/पैसेवाला/ प्रापंचिक/ साधक/ लहान मुलं/ जात-धर्म असला काही भेदभाव नाही.
त्यांनी आजकालच्या काहीजणांसारखा स्पिरीच्युॲलिटीचा बाजार केला नाही. कर्मकांड, धार्मिक अवडंबर, चमकोगिरी, हारतुरे, बुवाबाजी, चमत्कार वगैरे काही नाही. ]
किरण गुरव यांचं पाच कथासंग्रह
किरण गुरव यांचं पाच कथासंग्रह असलेलं पुस्तक (श्रीलिपी) आणून वाचलं. "उपजिविकेसाठी वणवण करणाऱ्या तरुणांना" समर्पित आणि त्यांच्या कथा कोल्हापूर भागातील आहेत. कथा फार लांबल्या आहेत. ठीक.
संप्रति, परिचय आवडला. मी हे
संप्रति, परिचय आवडला. मी हे पुस्तक वाचलं होतं बहुतेक. मी रमण महर्षींची/ त्यांच्यावरची बरीच पुस्तकं वाचली होती. बरेच माहितीपटही बघून झालेत. मी मधे काही वर्षं त्यांच्या मागेच लागले होते.
तुम्ही लिहिलेय त्याबद्दल अनुमोदन. ते फार क्वचितच बोलत, त्यामुळे जंजाळ/ शब्दच्छल/ भ्रम/ दिशाहीनता यांना वावच नव्हता. ह्या शीर्षकातच सगळ्या फिलॉसॉफीचे सार आहे. आपापली ऑथेन्टिसिटी म्हणजेच परमसत्याशी समांतर होणं. देव/ धर्म वगैरे फारफार मर्यादित संकल्पना होऊन जातात त्यापुढे. त्यांच्यावरचे पॉल ब्रंटनने लिहिलेले पुस्तकही मी वाचले होते पण त्याचा अनुवाद तितका भावला नव्हता. असेच एक पुस्तक प्रश्न उत्तरे स्वरूपातले निसर्गदत्त महाराज यांचेही आहे तेही सहज आठवले म्हणून येथे लिहितेय. एन्ड ऑफ नासमाया - झाले असे समजू का मग ? 
संप्रति परिचय आवडला. आणखी
संप्रति परिचय आवडला. आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. बघतो.
>>>>असेच एक पुस्तक प्रश्न
>>>>असेच एक पुस्तक प्रश्न उत्तरे स्वरूपातले निसर्गदत्त महाराज यांचेही आहे तेही सहज आठवले म्हणून येथे लिहितेय.
होय मी वाचते ते. पण मला ओ की ठो कळत नाही. भयानक वेगळच आहे.
अस्मिता,
अस्मिता,
मी मधे काही वर्षं त्यांच्या मागेच लागले होते>>
माझी सध्या ती फेज आली आहे बहुतेक
निसर्गदत्त महाराज हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. त्यांच्याबद्दल काही माहिती नाही. बघायला पाहिजे.!
एण्ड ऑफ नासमाया झालंय की नाही माहित नाही, पण डोकं मात्र मस्त भंजाळून गेलेलं आहे.
वरील सर्व पुस्तक परिचय आवडले.
वरील सर्व पुस्तक परिचय आवडले. सगळेजण उत्तम लिहीत आहेत.
रोहन प्रकाशनाने प्रकाशित
रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं "ओफबिट भटकंती ३, हटके स्थळांची हॅटट्रिक" (२०१६)हे पुस्तक जयप्रकाश प्रधान यांनी लिहिलं आहे. हे चांगलं वाटलं. या अगोदर २०१४,२०१५ मध्ये पहिला आणि दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. माहिती देण्याची पद्धत आवडली. वाचावे असे पुस्तक. isbn 9788193233603
७० देशांत लेखकाने प्रवास केला आहे.बराचसा प्रवास आयोजित सहलींमधून आहे तरीही विशेष स्थाने, खाणे यांची नोंद आवडली. त्या ठिकाणांना गेलो नाही किंवा जाणार नसलो तरीही लेखन वाचनीय वाटले.
शेवटी भारतीय आणि परदेशी सहल आयोजकांच्या तसेच पर्यटकांच्या वागण्यातले निरीक्षण दिले आहे.
( लेखकाने फोन नंबर, मोबाईल नंबर,पत्ता आणि इमेल पत्ता दिला आहे.)
"सिंधुतील साम्राज्ये"- ॲलिस
"सिंधुतील साम्राज्ये"- ॲलिस अल्बिनिया
सिंधू नदीची एक अद्भुत बायोग्राफी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. सिंधुकाठी बहरलेल्या अनेकानेक लोकसंस्कृत्यांचा मनोज्ञ धांडोळा या पुस्तकात आहे. कराचीतील सिंधूच्या मुखापासून ते तिबेटमधील उगमापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास (आणि घनघोर रिसर्च) करून या लेखिकेनं हे पुस्तक लिहिलं आहे. सिंधूच्या काठाकाठानं, तसेच अंतर्भागातून आडवातिडवा प्रवास करत लेखिकेनं आपल्यासमोर स्थलकालाचा एक भव्य भरजरी पट उलगडलेला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, चीन आणि तिबेट अशा देशांमध्ये पसरलेल्या सिंधू नदीची ही चित्तवेधक कहाणी आहे. या महाकाव्यामध्ये हरवून जायला होतं.
या लेखिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती चांगलं लिहिते. हिची कथनाची शैली अनोखी आहे. भाषेवर हिची घनघोर पकड आहे. या पुस्तकात काही ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांची न रूचणारी सत्यं सांगताना लेखिकेची खुसखुशीत विनोदबुद्धी चांगलीच उपयोगी पडते.
या प्रवासात लेखिकेनं लोकसंस्कृत्या, त्यांचे गुणावगुण, इतिहास, पुरातत्व, वारसा स्थळे, भूगोल, वास्तुकला, पर्यावरण, राजकीय परिस्थिती, अशा विविध अंगांना खोलवर स्पर्श केल्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचनाचा महामूर आनंद मिळतो. प्रत्येक ठिकाणच्या लोकजीवनांचं, त्यांच्या चालीरीतींचं रोचक तपशीलवार वर्णन यात आढळतं. सिंधूच्या काठावर वसलेल्या हडप्पा- मोहेंजोदारो, बौद्ध स्तूप, लेणी, मंदिरे, दर्गे, गुरूद्वारे हे सर्व यात अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलं आहे की त्यामुळे लगेहात यूट्यूबवर त्या स्थळांचे व्हिडीओ शोधून बघण्याचा मोह आवरता येत नाही. शिवाय सिंधुकाठावर हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि शीख ह्या धर्मांचं संश्लेषण आणि त्यांनी एकमेकांवर टाकलेले प्रभाव.! हे वाचताना आपण कधी वेदकाळात, कधी बौध्द काळात, कधी सूफी फकीरांच्या बहराच्या काळात, कधी सिकंदराच्या तर कधी ब्रिटिशांच्या काळात, तर कधी गुरू नानकांच्या काळात जाऊन पोचतो. आपला पतंग असा इतिहासावकाशात उडवता उडवता लेखिका मध्ये मध्ये अचानक दोराला हलका झटका देऊन वर्तमानात परत आणते. स्थलकालात असं विनायास मागे-पुढे विहरण्याची तिची पद्धत भलतीच रोचक आहे.
लेखिका सिंधू खोऱ्यातील अशा अशा अनघड ठिकाणी पाय तुडवत गेलेली आहे की आपण तिथे जाण्याची फक्त कल्पनाच करू शकतो.! विशेषतः आदिवासी दुर्गम पहाडी प्रदेशांमधले प्रवास, (आणि तेथली दिलखुलास आदरातिथ्यं), अफगाणिस्तान- तालिबान-स्वात खोऱ्यांतून बेकायदेशीर सीमा ओलांडून केलेले जीवावर बेततील असे प्रवास हिने कुठल्या अतूट विश्वासाने केले असतील, कळत नाही.!
हे साधारण साडेतीनशे पानांचं पुस्तक असून यात बारा प्रकरणं आहेत. 'सिंधुकाठचे संत' आणि 'रेशीम मार्गावरचा बुद्ध' ही प्रकरणं फारच जास्त भावली.
'विलुप्त होत चाललेली नदी' या शेवटच्या प्रकरणातून सांगितलेला, लाखो वर्षांपासून करोडो लोकांना जीवन देत वाहत आलेल्या सिंधू नदीचा अलीकडे होत असलेला पर्यावरणीय नाश मात्र प्रचंड अस्वस्थ करत राहतो. कोण कुठली ॲलिस अल्बिनिया लंडनवरून येऊन एवढं आपलेपणानं लिहिते सिंधुबद्दल आणि आपण असे की.. असो.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
इतिहासावकाशात उडणारा पतंग - हा परिच्छेद खास आवडला.
सिंधुतील साम्राज्ये परिचय
'सिंधुतील साम्राज्ये' परिचय आवडला. माझ्या लिस्टीत ऍड झाले हे पुस्तक.
वाह, परिचय आवडला संप्रति.
वाह, परिचय आवडला संप्रति. वाचायला पाहिजे हे पुस्तक.
सिंधूतील साम्राज्ये परिचय
सिंधूतील साम्राज्ये परिचय आवडला. यादीत टाकून ठेवले आहे.
सिडने शेल्डनचे आत्मचरित्र
सिडने शेल्डनचे आत्मचरित्र वाचले. The Other side of Me. मराठी अनुवाद सापडला. आवडला.
सिडने शेल्डनचे आत्मचरित्र
सिडने शेल्डनचे आत्मचरित्र वाचले. The Other side of Me. मराठी अनुवाद सापडला. आवडला.>> must read. I started my English reading with his books
परिचय आवडला.
परिचय आवडला.
इतिहासावकाशात उडणारा पतंग - हा परिच्छेद खास आवडला...... +१.
सिंधुतील साम्राज्ये- परिचय
सिंधुतील साम्राज्ये- परिचय आवडला
नक्की वाचणार
सिंधुतील साम्राज्ये- परिचय
सिंधुतील साम्राज्ये- परिचय आवडला
नक्की वाचणार +1
संप्रति,
संप्रति,
सिंधूतील साम्राज्ये - अनुवाद कसा आहे?
मूळ पुस्तक घ्यावं की अनुवादित? मला प्रश्न पडला आहे.
सिंधूतील साम्राज्ये - अनुवाद
सिंधूतील साम्राज्ये - अनुवाद कसा आहे?
मूळ पुस्तक घ्यावं की अनुवादित? >>
मी अनुवादित वाचलं. 'स्मूथ' आहे अनुवाद.
मूळ पुस्तक घ्यावं की अनुवादित
मूळ पुस्तक घ्यावं की अनुवादित? मला प्रश्न पडला आहे.
>>>>
@ललिता-प्रीति
मी आत्ताच इंग्रजी पुस्तक घेतलं कारण मराठी किंडल व्हर्जन नव्हतं. इंग्रजी पुस्तकही छान वाटतंय. हवं तर किंडलवर सँपल वाचून ठरवा.
Pages