मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आस्चिगचं पुस्तक वाचनालयात शोधलं.>>> वाचनालयात यायला वेळ लागेल बहुदा. नुकतेच प्रसिद्ध झाले आहे (३-४ महिन्यांपूर्वी)

(वाचू दुःखाने)
फ्रान्समध्ये एका मुलाला ट्राफिक पोलीसांनी ठार केल्यावर चार दिवस निदर्शनं,जाळपोळ सुरू आहे. दहा लाख पुस्तके असलेली लाईब्री काल आंदोलकांनी जाळली आहे.

आस्चिगचं पुस्तक वाचनालयात शोधलं <<<<<>>>>> kindle unlimited वर आहे.

सध्या अमेझॉन वर prime day सुरू आहे. आज आणि उद्या. कोणी kindle वर पुस्तकं घेतलीत का ?
असतील तर कोणती ?

सध्या 'सिलेक्टीव मेमरी' हे शोभा डे हिचं पुस्तक( आत्मकथन कसं सोडणार? ६००पानं, मराठी अनुवाद) वाचून संपवलं आहे. हिची काही पुस्तकं वाचली आहेत आणि सर्वच आवडतात. हे मराठी पुस्तक kindle unlimited वर दिसत आहे. खुशवंत सिंगचा महिला अवतार म्हणतो.
वाचावंच असं पुस्तक. शेवटची पन्नास पाने भावूक करतात.
--------
-------
अमेझोन सेलवर मोबाईल पाहिले. सॅमसंगचा आहेत. पण त्यांच्या Exynos prosessor वर चालणारे खात्री न देणारे. (गूगल पिक्सेल ७अ त्यावरच टाकला आहे. )

" न्या लोयांचा खून कोणी केला" : निरंजन टकले. अनुवाद: मुग्धा धनंजय
जरूर जरूर वाचा.
आपापले राजकीय विचार, तत्व सगळी एका बाजूला ठेवून वाचा. एखादा पत्रकार (कोणतीही व्यक्ती) एखाद्या कामासाठी किती झोकून देऊन काम करू शकते हे अनुभवण्यासाठी तरी.
खूप वर्षांनी एखाद्या पुस्तकाने ताबा घेतला माझा. सलग 3 तासात वाचलं. ठेववतच नव्हतं खाली.
शेवटी तर पाणी आलं डोळ्यात.
लिहिलेलं माना, न माना. पण तो सगळा थरार, धडपड, जिद्द, कष्ट, पुरावे, जगाचा अनुभव, यश अन हताशता,.... सगळं अनुभवण्याचं.
प्लिज वाचा पुस्तक__/\__

पूर्वी फार जाहिरातबाजी झालेले डोंगरी ते दुबई हे जाडजूड पुस्तक मिळाले. दावुदची मुलाखत कशी मिळाली ती पहिली दिली आहे. ती वाचूनच कंटाळा आला. भायखळ्याच्या पश्चिममेला असलेल्या डोंगरी भागातून दावूद आणि इतर डॉन कसे झाले,पुढे दुबईतून सूत्रं कशी हलवू लागले हे दिलं आहे. खरं म्हणजे या बातम्या त्या वेळी पेपरांतून येतच होत्या. नवीन रंजक काही नाही. मुलाखतीनंतरच्या प्रकरणांची शीर्षकं वाचून ,चाळून पुस्तकं परत केले.
(काल्पनिक घटना आणि माणसे पेरून अमेरिका,इटलीतील 'अंडरवर्ल्ड ' सांगणारे 'गॉडफादर' फारच वरची पातळी गाठते. )

कोणी kindle वर पुस्तकं घेतलीत का ?
असतील तर कोणती ?
>>>>
प्राईम डेला नाही पण अलीकडेच पोन्नीयीन सेल्वनचे भाग १ व २ घेतले आहेत. पूर्वीही काही पुस्तके किंडलवर घेऊन वाचली आहेत.

सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून इतिहासाकडे बघतानाही ठळक घटनांचाच आणि थोरामोठ्यांच्या राजकारणाचाच इतिहास मांडायचा आहे, तर मग 'राजे गर्रकन वळले' वाल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची थट्टा का करावी? इतिहासातल्या ठळक घटनांच्याच आजूबाजूला जर कल्पनाशक्तीने प्रसंग उभे करायचेच आहेत, तर तोही एक मार्ग आहे असं म्हणता येईलच की. तोच एक मार्ग नाही, आपला वेगळा मार्ग आहे हेही दाखवून द्यावं. त्यासाठी त्यांना कमी लेखण्याचं काय कारण?>>>>तो सर्वसामान्यांच्या नजरेतून थोरामोठ्यांचा सांगितलेला इतिहास यापेक्षाही एका विचक्षण माणसाच्या नजरेतून सांगितलेला त्या काळाचा इतिहास आहे. इंग्रज इथे का विजयी ठरले याचे कारण त्याकाळातील महाराष्ट्र व उत्तर भारत यातल अराजक, अनागोंदी, राज्य यंत्रणेचा 'मुद्रा भद्राय' शी तुटलेला धागा, असं आहे ते

लिहायचा विचार आहे. जरा मोठी आहेत. विषय बंगालकडचे आहेत.

विठ्ठलराव घाटे यांचे 'दिवस असे होते' वाचलं. त्या काळच्या घटना,व्यक्तींवर बराच उजेड पाडला आहे. वाचनीय. जातीयवादाशी सामना कोणी कसा केला हे मुख्य. स्पष्ट मतं मांडली आहेत.

ब्रेनवेव्ह्ज- लेखिका माधुरी शानभाग

एक प्रतिभावान पण सरळसाधा शास्त्रज्ञ आणि त्याने लावलेला जगावेगळा शोध, त्याचा बुद्धिमान पण लंपट, पाताळयंत्री सहकारी अशी मुख्य पात्रं असणाऱ्या विज्ञान कादंबरीत काय असेल असा प्रश्न पडणंही चूक आहे.
तरीही, कसं रंगवलं आहे ते पहावं म्हणून पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पुढे पुढे चाळत पूर्ण केलं. ठराविक अपेक्षित वळणांनी कथा पुढे सरकते आणि संपते!
याहून जास्त लिहिण्यासारखं काहीही नाही.

काळे करडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)

गेल्या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक.
डिग्री कॉलेज शिक्षणाच्या वयोगटातल्या मुंबईतल्या मराठी मुला-मुलींच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी आहे.
त्यांची आपसांतली मैत्री जुळणे, टिकणे, मोडणे. एकमेकांशी शेअरिंग. प्रेमप्रकरणं, सेक्सचा अनुभव. हे सगळं तर आहेच. त्यापलिकडेही व्यक्ती म्हणून त्यांची अन्डर कन्स्ट्रक्शन असणारी जडणघडण, त्यांच्यातली ऊर्जा, हे सगळंही आहे.

मुद्दाम सांगण्याचा आव न आणता कथानकात या गोष्टी सहज येत जातात. वातावरणनिर्मिती छान आहे. पुस्तकाची भाषा, पात्रांच्या तोंडचे संवादही अगदी सहज, सोपे आहेत.
द यंग अ‍ॅण्ड द रेस्टलेस अशी एक प्रचिती येते.
कथानकाचा नायक फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतो. म्हणजे वर्तमानकाळात तो चाळीशीला पोचलेला वगैरे नाही. कॉलेजविश्वातून बाहेर पडून त्याला काहीच वर्षं झाली आहेत. ही सिच्युएशन मला आवडली, त्यामुळे जे घडून गेलं त्याबद्दल सांगताना वेगळा दृष्टीकोन बघायला मिळाला. (या टाइपच्या पुस्तकांच्या नरेशनच्या दृष्टीने)
कॉलेजजीवनाचा अनुभव घेतलेल्या प्रत्येकाला यातली कोणती ना कोणती गोष्ट रिलेट होतेच.

काही प्रसंग, दृश्य, संवाद लांबलेले वाटले. पण एकूण वाचायला मजा आली.

ललिता-प्रीति, परिचय आवडला.

संप्रति - लेखक नंदा खरे

विदर्भातलं कुंडलपूर नावाचं शहर आणि जिल्ह्याचं ठिकाण. त्या शहराचं गोदानगर नावाचं उपनगर आणि या दोन्हीच्या मध्ये एक 'रिज' (ridge). या रिजवर राहणारे ते 'रिजवाले'. हळूहळू बदलत्या परिस्थितीने त्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांमधेही एक 'रिज' निर्माण झालेली.
सुधाकर पानसे हा रिजवरच्या एका बंगल्यात लहानाचा मोठा झालेला, अर्थशास्त्रात एम ए झालेला, सुरुवातीला उत्साहात दुकान सुरू करून मोठी स्वप्नं पाहिलेला, सावकाशीने पण निश्चितपणे परिस्थिती बदलत जात जात आता मात्र जेमतेम महिन्याची टोकं जुळवणारा.

सुधाकरच्या अनुषंगाने येणारी पात्रं म्हणजे पत्नी शोभा, मुलं, आई-वडील-काका, मित्र शिंदे आणि अन्या, अन्याची पत्नी रश्मी, देशमुख-कासलीकर-काझी असे इतर 'रिजवाले' इत्यादी.

या सर्व पात्रांबरोबर महत्त्वाचं अजून एक पात्र म्हणजे अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचा ऊहापोह. कधी कम्युनिस्ट असलेले काका आणि सुधाकर यांच्यातला संवाद, कधी अन्या-सुधाकर, शिंदे-सुधाकर, ललित-सुधाकर तर कधी सुधाकरच्या मनात स्वतःशीच चाललेला संवाद.
अर्थकारणातली नैतिकता, न्याय-अन्यायाचं विश्लेषण, काय बरोबर-काय चूक हा न संपणारा वाद.
दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या कष्टकरी माणसांना पोटापुरतं मिळवताना नाकीनऊ येतात आणि शेअर्सच्या रूपातले कागदाचे तुकडे इकडून तिकडे करणारे चिकार पैसा कमावतात, यातला विरोधाभास.
सुरुवातीपासून आर्थिक बाबतीत खाली खाली जात असलेला सुधाकर, अंदाज बरोबर ठरून वर वर येऊ लागतो, यशाची सवय नसल्यामुळे बावचळतो आणि 'बदल हाच शाश्वत असतो' अशा अर्थाचं भाष्य करत कादंबरी संपते.

सुधाकरचा स्वतःशी सुरू असलेला संवाद हा या पुस्तकाचा आत्मा आहे. स्वतःचं मूल्यमापन सुधाकर सतत करत असतो, स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत असतो, प्रस्तावनेत लेखकाने म्हटल्याप्रमाणे तो सतत 'न्यायाधीश' असतो!
सुधाकर-शोभा-मुलं यांच्यातलं नातं, अन्या आणि शिंदेशी असलेली सुधाकरची मैत्री, एकंदरीतच सगळ्यांशी वर्षानुवर्षे असलेले संबंध उत्तम उभे केलेले आहेत.
कादंबरी मला अतिशय आवडली. फार मोठ्या, हादरवून टाकणाऱ्या घडामोडी न घडताही माणसाचं आयुष्य 'इंटरेस्टिंग' असतंच, पण ते तशा प्रकारे कादंबरीत उभं करणं सोपं नाही. अर्थशास्त्र हा काही माझ्या आवडीचा विषय अजिबात नाही, पण कादंबरीत तो ज्या प्रकारे चर्चिला गेला आहे, ते आवडलं.

Submitted by अनिह on 7 August, 2023 - 16:16 >>

अनिह, तुमचा प्रतिसाद वाचला. 'अंताजीची बखर' ची प्रस्तावना वाचल्यावर लेखकाची भूमिका स्पष्ट होते. त्यावरूनच मी ते लिहिलं आहे Happy लेखकाने जॉर्ज मॅकडोनल्ड फ्रेजर या लेखकाच्या 'फ्लॅशमन' या काल्पनिक नायकावरून प्रेरणा घेऊन अंताजी हे पात्र उभं केलं आहे असं प्रस्तावनेत लिहिलं आहे.
माझा 'प्रॉब्लेम' हा झाला की संपूर्णपणे काल्पनिक वाटावा एवढा अंताजी अविश्वसनीय वाटत नाही आणि खरा मानावा तर तेवढा खराही वाटत नाही. ( मी मूळ प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तो प्रत्येक महत्त्वाच्या माणसाला भेटतो हे पटत नाही, तो जेवढा हुशार आहे, त्या मानाने तो वरवर जात नाही वगैरे वगैरे)

अमिताव घोषच्या पुस्तकांपैकी एक Sea of Poppies. वाचून संपवलं. काळ १८३० च्या आसपासचा. ब्रिटिश अमलातला कोलकाता,बिहार,बंगालमधला भारत. गरीबी, जमिनदारी, जातपातीवर आधारलेला समाज, ब्रिटिशांची दंडेली, व्यापार(कोणताही) वाढवून पैसे मिळवणे, अफूची शेती लादलेले शेतकरी, ब्रिटिशांचे नौकानयन, बोटीतून अफू नेऊन चीनला विकणे, गुलाम -मजूर गोळा करून ब्रिटिशांच्या इतर वसाहतींवर नेणे, ब्रिटिशांचे फ्रेंचांशी संबंध हे सर्व विषय एकत्र करून एक कथानक लेखकाने लिहिले आहे.(१८१८ नंतर भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला होता. संस्थानंही अंकित झाली होती आणि १८५७ चा उठाव व्हायचा होता तो काळ.) एकाच वेळी पाच सहा प्रकरणे पुढे सरकवत नेली आहेत. विविध लोकांचे निरीक्षण,वर्णनं आणि भाषा बरोबर घेतल्या आहेत. पण शेवट अनिर्णित, सुटलेला वाटतो. कथानकात खूप प्रकरणं आणून रेटल्यासारखे वाटले. पात्रांची भाषणबाजीही आहे. अफू (Poppies) आणि समुद्र संबंध यामुळे पुस्तकाचे नाव घेतले आहे पण अफूचे बी (खसखस) हातातून निसटल्यासारखी वाटली.
बोटींसंबंधी खूप शब्द येतात. शब्दकोश घेऊनही फारसं समजत नाही कारण आपण बोट आणि सागरी वाहतूकीविषयी अगदीच नवखे असतो. शिवाय बोटींचे खलाशी विवक्षित देशांचेच असतात ते त्यांची भाषा बोलतात ती कळत नाही. त्यांचे दिनमान ही समजत नाही. एकूण कंटाळवाणे पुस्तक. पण त्या काळात भारताच्या एका कोपऱ्यात काय चालले होते हे कळण्यासाठी , समजण्यासाठी उपयुक्त.

अपडेट.
Sea of Poppies चा शेवट अर्धवट वाटण्याचं कारण म्हणजे ते
Ibis Triology या पुस्तकत्रयीचा एक पहिला भाग आहे. Sea of Poppies (2008), दुसरं River of Smoke (2011) आणि तिसरं Flood of Fire (2015) .
पहिल्या भागातील गुलाम कामगारांना बंगालमधून मारिशस बेटावर नेण्यासाठी असलेल्या ब्रिटिश जहाजाचे नाव Ibis आहे. त्या नावाने आहे पुस्तक मालिका.
आता चवथं नवं पुस्तक आलं आहे - Smoke and Ashes. त्यास चौथा भाग म्हणायला हरकत नाही. विषय तोच पण व्याप मोठा आणि मोठ्या अवतारात.
अफूचं एक छोटंसं झाड समाज आणि अर्थव्यवस्थेत काय उलथापालथ करू शकतं हे पहिल्या तीन भागांत आहे. त्या काळात युअरोपीय वसाहतवाद होता. पण आता पैसे मिळवण्यासाठी त्या लाभार्थी देशांना लाभ मिळणाऱ्या देशात न जाताही अफू व्यापाराचा फायदा अजूनही कसा उठवता येतो हे नवीन पुस्तकात आहे. मुख्य म्हणजे यामध्ये एक नवीन देश घुसला आहे. तो म्हणजे अमेरिका! (पुस्तक परीक्षण परिचय leisure, India Today ,31 July.)

. मागे उल्लेख आलेलं 'सय' वाचलं. अचानकपणे मिळालेली आकाशवाणीवरची निवेदिका ही संधी ते बालनाट्यलेखन, सादरीकरण ते NSD मधला प्रवेश- अल्काझी ... हा सगळा प्रवास वाचायला आवडलं.

जोसेफ मॅझिनी चरित्र
लेखक : स्वा. वि. दा. सावरकर
संपादन : बाळ सावरकर

' *जगातल्या सर्व राष्ट्रांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याचा ईश्वरदत्त हक्क आहे'* या तत्त्वावर प्रखरनिष्ठा ठेवणारा हा एक क्रांतिकारक - जोसेफ मॅझिनी - थोर इटालियन देशभक्त. लोकशाही राष्ट्रवादाचा जनक. हिंदुस्थानात १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध भडकले होते त्याचवेळी मॅझिनी आणि जनरल गॅरिबाल्डी यांच्या नेतृत्वाखाली इटलीच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक उठवण्या चालू होत्या (इटलीचे राष्ट्रनिर्माते - मॅझिनी, गॅरिबाल्डी, काउंट, राजा व्हिक्टर एमेन्युअल) नाहीतर तात्या टोपेंसारख्या शूर क्रांतीकारकाबरोबर ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी यायची इच्छा जनरल गॅरिबाल्डीनी व्यक्त केली होती.

स्वा. सावरकरांनी लंडन येथील वास्तव्यात 'मॅझिनीचे आत्मवृत्त आणि समग्र लेखसंग्रह' याचे इंग्रजी भाषांतर असलेली सहा भागांची पुस्तक मालिका वाचून काढली. लाला लजपतरायांनी १८८४ मध्ये मॅझिनीवर एक भाषण ऐकले आणि त्याने प्रभावित होऊन नंतर मॅझिनीचे चरित्र स्वतंत्रपणे अभ्यासून उर्दू भाषेत मॅझिनीचे एक स्फूर्तीदायक चरित्र लिहिले होते. मराठीत मात्र फार काही उपलब्ध नव्हते. १९०० च्या आसपास घाणेकरांनी मराठीतून पहिले मॅझिनीचे चरित्र लिहिले होते. सावरकरांवरही मॅझिनीचा फारच प्रभाव होता. १९०४ मध्ये भाऊ गणेश सावरकर बरोबर स्वा. सावरकरांनी 'अभिनव भारत क्रांतिकारक संघटना' ही गुप्त संघटना स्थापन केली होती. या गुप्त बैठकीत लंडनमध्ये येण्यापूर्वी जे मार्गदर्शन स्वा. सावरकर त्यांच्या सहकाऱ्यांना करत होते त्यात आणि मॅझिनीच्या लेखात बरेचसे साम्य होते. १९०६ मध्ये वीस-बावीस वर्षांच्या या सावरकरांसह क्रांतिकारकांना अनेकदा पोरकट म्हणून हिणवले जात होते. हे समग्र चरित्र वाचून सावरकरांना विश्वास आला की आपण जात आहोत त्याच मार्गाने क्रांतिकारक चळवळीच्या बळावर इटलीचे राज्यक्रांती यशस्वी झाली. आपण योग्य मार्गावर आहोत. सावरकरांनी जो पुढचा लढा दिला त्याचा पाया हे वाचून पक्का झाला. त्या विचारधारेतून संघटनेच्या माध्यमातून कार्य कसं करायचं, मॅझिनीने कशा पद्धतीने मांडणी केली हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला कळावे /वाचायला मिळावे म्हणून १९०६ मध्ये सावरकरांनी याचं मराठीत भाषांतर करून छापून आणायचं ठरवलं. भाषांतरित ग्रंथ हिंदुस्थानात पाठवून, सावरकरांच्या बंधूंनी तो अनेक आघाड्या सांभाळत छापून आणला. जनतेने त्याचे भरभरून स्वागत केले.

असं काय आहे मॅझिनीच्या चरित्रात? उत्कट देशभक्ती, समर्पण, त्याग, मानवतेची उपासना, फक्त आणि फक्त मातृभूमीची सेवा. लहानपणी स्वदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची उर्मी कशी निर्माण झाली, खडतर तुरुंगवास, बंदीवासातील अतोनात शारीरिक- मानसिक छळ, सांकेतिक पद्धतीचा पत्रव्यवहार. 'तरुण इटली' या सहकारी संस्थेची उभारणी. गादीवर स्थानापन्न झालेल्या राजपुत्राला उद्देशून लिहिलेलं पत्र सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केलं ज्यात प्रखरपणे स्वदेश, स्वराज्य, स्वातंत्र्य एकराष्ट्रीयत्वाची मागणी केली होती. लोकशिक्षणावर भर दिला. आत्मनिष्ठा वाढवणे, एकराष्ट्रीयत्व (unity) आणि ऐक्य(union) यामध्ये एकराष्ट्रीयत्वाला लक्ष्य मानलं.

वेळोवेळी बंड पुकारले गेले. उठाव झाले. पण ते अपयशीही झाले. त्यातल्या त्रुटी- चुका शोधून सुधारल्या गेल्या. सावरकरांच्या मते 'तरुण इटली' मधलं प्रत्येक वाक्य हे एक स्वतंत्र व्याख्यान आहे. मेलेल्या राष्ट्रांचा संजीवनी मंत्र आहे. पहिला केलेला उठाव- त्यात आलेले पूर्ण अपयश- हद्दपारची शिक्षा- त्यानंतर लपतछपत काढलेले दिवस- जनमानसातील राष्ट्रीय संवेदना जागृत करण्यासाठी छोट्या पत्रिका छापणे, हस्त पत्रके, जाहीर पत्रके यांचं अविरत चाललेलं काम - ज्यामुळे जनमानसामध्ये क्रांतीची ट्रेनिंग सतत पेटत राहिली.

काही ठिकाणी मॅझिनीने स्वतःची हतबल अवस्था ही सांगितली आहे. हद्दपार झाल्याने अनोळखी देशात , अनोळखी लोकांच्यात अत्यंत दारिद्र्य अवस्था, वाट्याला आलेला एकलकोंडेपणा, मानसिक अस्वास्थ , पोटात उसळलेला भुकेचा डोंब याही परिस्थितीशी दोन हात केले होते. हे अशा प्रकारचे वर्णन यासाठी केले जेणेकरून जेव्हा एखाद्या देशभक्तावर 'असह्य होतय आता' अशी वेळ येईल तेव्हा ही उदाहरणे पाहून त्यांनी धीर सोडू नये. स्वतःच्या मार्गावरून ढळू नये.

'तरुण इटली/यंग इटली'या संस्थेच्या धर्तीवर 'यंग पोलंड' ,'यंग जर्मनी', 'यंग युरोप' या संस्थांची उभारणी केली. या इतक्या संस्थांच्या मागे मूळ उद्देश असा होता की प्रत्येक राष्ट्रात या लोकसत्ताक चळवळी असाव्यात आणि जेव्हा एखादे राष्ट्र आपल्या स्वातंत्र्याकरता लढेल तेव्हा या बाकीच्या संस्थांनी त्याला मदत करावी. समजा प्रत्यक्ष लढण्यासाठी मदत नाही केली तरी त्या त्या राष्ट्रांच्या राजसत्ताधाऱ्यांवर लोकमताचा दबाव द्यावा जेणेकरून लढणाऱ्या राष्ट्राला कोणत्याही स्वरूपाचा विरोध तरी किमान त्या राष्ट्रांनी करू नये.

पुस्तकात शेवटच्या सुमारे शंभर पानांमध्ये मॅझिनीने लिहिलेले काही महत्त्वाचे लेख आहेत. मॅझिनीने आपल्या गनिमी टोळ्यांकरता केलेले काही नियम आहेत. युद्ध कलेमध्ये तरुण कसे तयार करावे , स्वातंत्र्यासाठी उपलब्ध प्रत्येक साधनाचा सूक्ष्म रीतीने उपयोग कसा करून घ्यावा. इटलीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी देहत्याग केला ते देशवीर (बंडीएरा बंधू व कोसेंझा) नक्की कसे होते त्याची खरी माहिती दिली आहे. (यातल्या बंडीएरा बंधूंबद्दल इटलीत पोलिसांनी अनेक कंड्या पसरवलेल्या होत्या.)

पुस्तकातली भाषा थोडी जड आहे समजायला. काही भाग दोन तीनदा वाचवा लागतो.

किरण गुरव - क्षुधाशांति भुवन वाचलं. पाचपाटील यांनी अनेकदा या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. वावे यांनी याच धाग्यावर त्याबद्दल लिहिलं आहे.

मी कथासंग्रह फार वाचत नाही. पण ग्रामीण कथा म्हटलं की शेतीची पार्श्वभूमी असं माझ्या मनात एक समीकरण आहे. या कथा बदलत्या गावांच्या आहेत. क्षुधाशांति भुवन मध्ये वर्णन केलेले व्यवसाय शहरीकरणाच्या वाटेवरच्या गावातले - गावाच्या वेशीवरचे आहेत. शोध या कथेत गावातला माणूस कोल्हापूर शहरात इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कामाला येतो. गावात शिक्षक हा एक करियर ऑप्शन कसा असतो त्याचं वर्णन आहे. क्षुधाशांति भुवनमध्ये वापरलेल्या या बदलत्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या उपमा भन्नाट आहेत. शोधमधलं गावातल्या दुचाकी वाहनांचं वर्णन हे पुन्हा बदलत्या ग्रामीण जीवनाचा मागोवा घेतं. तिन्ही कथांवर गावातल्या राजकारणाचा ठसा आहे. भिंत कथेत गवंडीकामाचं आणि त्या अनुषंगाने इतर व्यवसायांचं वर्णन आलं आहे.

पहिल्या दोन कथा अपरिहार्यपणे दु:खान्त किंवा दु:खात्मक आहे. त्यातल्या मुख्य पात्रांच्या आयुष्याची अक्षरशः फरफट होते. तरीही पहिल्या कथेतला माणूस पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात करतो.
हे पुस्तक लायब्ररीत अचानक दिसलं तेव्हा लॉटरी लागल्यासारखं वाटलं. पण किरण गुरवांची अन्य दोन पुस्तकं तिथे नाहीत.

मीही वाचतोय सध्या हे. वरचे वर्णन चपखल आहे. दुसरी त्या गुरूजींची कथा सुरू झाल्यावर जरा रेंगाळले हे पुस्तक. आता बर्‍याच दिवसांत पुन्हा तेथून पुढे वाचलेले नाही. वाचायचे आहे.

याच लेखकाचे "बाळूच्या अवस्थांतराची डायरी" हे ही यादीत आहे नेक्स्ट.

खूप वर्ष झाली म्हणून ' मुंबई दिनांक ' (अरुण साधू) आणलं पण आता आवडलं नाही.
सावरकरांचं ' १८५७ चे समर' वाचलं. पण विशेष आवडलं नाही. काळाचा फरक दुसरं काय.

रंगीत टीव्ही नव्हता, टीव्हीसुद्धा नव्हता मग थेटरात इंग्रजी सिनेमा सवा तास आणि अगोदर जाहिराती/उंदिर मांजर कार्टून सवा तास पाहण्यात धमाल वाटे. मग फक्त सवा तासाचा सिनेमा मॅटिनीला पाहू वाटू लागले. शिवाय वयाचा फरक झालाच. थेटरात चार तासांचं महाभारत आवडले पण टिवीवरची मालिका रटाळ झाली. शामची आई त्यावेळी बुळबुळीत कथानक वाटले,आता त्यात समाजाचे तत्कालीन चित्रण म्हणून आवडले. तेच गारंबीचा बापूचे. त्यावेळचा कोकण नोंदवला हे मुख्य. खाडी देशातील स्त्रियांची दु:खे यावर एक दोन पुस्तक उत्सुकतेने वाचली. आता कंटाळा आला. तेच तेच झाले. सुधारणा सोडा,मागे जाण्याची स्पर्धा लागली आहे. कोण वाचणार? स्वातंत्र्य आणि ब्रिटिश मागे पडलेत. घराघरांतून मुलं विलायतेला नव्हे युकेला शिकायला चालली आहेत. उरल्या लाल किल्ल्यावरच्या आरोळ्या.
हे थोडक्यात प्रतिसादात उरकले.

अनिल अवचट यांचं ' धार्मिक ' हे पुस्तक वाचलं . सुरेख कसं म्हणायचं कारण भयंकर परिस्थितीचं सगळं चित्रण आहे .. पण पुस्तक म्हणून ग्रेट . बुकगंगा वर काही पानं वाचता येतील , सहजयोगाच्या निर्मलामाता यांच्यावरील प्रकरणातील .. एकाच वेळी हसूही येतं वाचून आणि लोकांचा विश्वास पाहून वाईटही वाटतं पराकोटीच्या अंधश्रद्धेबद्दल .. तेही सुशिक्षित , उच्चशिक्षित लोकांमधील ..

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=56368889064385...

धार्मिक पुस्तक मी लहानपणी वाचलेले. भयानक आहे खरच. मीरा दातारचा दर्गा व वर्णन वगैरे वाचून अंगावरती काटा आलेला.तेव्हाच धागे-उभे आडवे हे वेश्यांच्या विदारक जीवनावरचे पुस्तक सुद्धा वाचलेले होते. तेसुद्धा डिस्टर्बिंगच आहे

धार्मिक ' अनिल अवचटांच पुस्तक दोन तीन महिनापूर्वीच वाचलं.. सगळी प्रकरण वाचून खूपच धक्का बसला होता.. बुवा वाघमारेचं प्रकरण वाचून वाटलं की उच्च शिक्षित, सुसंस्कृत, घरंदाज स्त्रियाही अंधश्रद्धेच्या विळख्यात एवढ्या वाईट रितीने कश्या काय अडकू शकतात.. खूपच भयंकर प्रकरण वाटलं मला ते..!

' काळे करडे स्ट्रोक ' वाचलं.. लेखनशैली आवडली लेखकाची... मध्याला थोडं संथ वाटते वाचायला..

रविवार, १६ जुलै च्या लोकरंग पुरवणीतले आदले - आत्ताचे ह्या सदराखाली अरुणा सबाने यांनी लेखक समीर गायकवाड यांच्या ' खुलूस' या पुस्तकावर लिहले ला लेख वाचला आणि त्याच दिवशी पुस्तक online मागवले.

समीर गायकवाड म्हणजे मायबोलीवर अजात शत्रू या नावाने लिहणारे लेखक असावेत असं मला वाटलं. त्याच दिवशी मायबोलीवर त्यांनी लिहिलेले काही लेख वाचले आणि मग खात्री पटली.

पुस्तक २० तारखेला मिळालं आणि वाचायला सुरुवात केली. अरुणा सबाने यांनी या पुस्तकाविषयी लिहिलेल्या लेखातला शब्द न् शब्द सत्य होता.

' खुलूस' हे पुस्तक रेड लाइट एरीयात शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. वेश्येचे आयुष्य जगताना त्या अभागी स्त्रियांना येणारे अनुभव वाचून आपलं मन सुन्न, अंतर्मुख होऊन जातं. आपल्या पांढरपेशा जगापलीकडे असंही हे एक अंधारमय जग पसरलेलं आहे .. मनाविरुद्ध हे जीवन जगण्यास भाग पडलेल्या त्या जगातल्या एक एका दुर्दैवी स्त्रीच्या कहाण्या वाचताना आपल्या मनात कल्लोळ उभा राहतो.

रेडलाइट एरिया म्हटलं की पांढरपेशा जगातली माणसं तिथल्या स्त्रियांना वेश्या, कुलटा म्हणूनच हिणवतात. त्यांचा तिरस्कार करतात. मात्र लेखकाने माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्या स्त्रियांचे आयुष्य जवळून पाहिलयं. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या भावभावना , त्यांचं दुर्दैवी आयुष्य संवेदनशील मनाने टिपलंय हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं.

लेखकाने त्या स्त्रियांच्या आयुष्यातील दुःख, व्यथा, त्यांचा आयुष्याची झालेली परवड, त्यांची मजबूरी वाचकांच्या काळजाला हात घालणाऱ्या दाहक शब्दांत मांडली आहे. त्यांची लेखनशैली गुंतवून ठेवणारी आहे.

प्रतिसाद लिहून ठेवला होता कधीच पण आज पोस्ट केला.. पुस्तकावर जरा मोठा लेख लिहणार होते .. पण थोडक्यातच आवरतं घेतलं..

Pages