मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एवढ्यात वैद्यकीय विषयाशी निगडीत अनेक पुस्तके वाचनात आली.
नुकतंच वाचून संपवलेलं डॉ अरुण लिमयेंचं १९७८ सालचं ग्रंथालीने प्रकाशित केलेलं क्लोरोफॉर्म पुस्तक या क्षेत्रातील गैरप्रकारांवर आहे. डाॅक्टर्स कशा प्रकारे लुटतात, रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ केला जातो वगैरे. लेखक कॅन्सरग्रस्त असतांना हेे लिखाण केलं आहे. प्रॅक्टीस सुरु असतांना सामाजिक जाणिवेतून युक्रांद, सेवादल वगैरे माध्यमांतून अनेक आंदोलनात भाग घेतला होता. या पुस्तकामुळे त्या काळी खळबळ उडाली होती. या पुस्तकामधे डाॅक्टरांवर केलेल्या आरोेपांचं खंडन करण्यासाठी प्रसिद्ध सर्जन डॉ वि ना श्रीखंडे यांनी वर्तमानपत्रातून दिर्घ लेख लिहिला होता. या डॉ श्रीखंडेंचं 'आणि दोन हात! हे पुस्तकही छान आहे. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मांवर शस्त्रक्रिया करणारे डॉ म्हणून श्रीखंडे प्रसिद्ध. श्रीखंडेंचा ताे लेखही या पुस्तकात आलेला आहे. वैद्यकक्षेत्रातील खटकलेल्या गोष्टींवर आणखी एक महत्त्वाचं व ग्रंथालीनेच ८०च्या दशकात प्रसिद्ध केलेलं पुस्तक म्हणजे डॉ आनंद नाडकर्णींचं वैद्यकसत्ता. हल्ली हे पुस्तक.. आरोग्याचा अर्थ या पुस्तकात एकत्रित केले आहे. याशिवाय वाचलेली पुस्तके म्हणजे डॉ संदेश मयेकरांच्या More than the mouthful या पुस्तकाचा एका सेलेब्रिटी डेंटीस्टची बत्तीशी हा अनुवाद, डॉ. अतुल गवांदेंच्या Complications या पुस्तकाचा 'जीव जिथे गुंतलेला' हा नीला चांदोरकरांनी केलेला अनुवाद, डाॅ गवांदे यांचेच Checklist Manifesto हे एक वेगळाच विचार देणारं पुस्तक, डॉ रवी बापट यांची पोस्टमॉर्टेम व अचूक निदान ही दोन पुस्तके.. ही सर्व पुस्तकं म्हणजे लेखक डाॅक्टरांचे स्वत:चे अनुभवबोल आहेत. ही पुस्तकं वाचतांना आपल्यालाही अनेक गोष्टी उलगडत जातात.. शेवटी डाॅक्टर हाही मानवच आहे. मानसिक ताण बाळगूनच त्याला मानवी शरीरावर काम करायचे असते ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी. बेजबाबदारपणा, गैरप्रकार, गैरव्यवहार करणा-या डाॅक्टरांमुळे चांगल्या डाॅक्टरांचीही त्यांत वेगळी भरडणूक होते. प्रत्येक डाॅक्टरांचं स्वत:चं एक वेगळं अनुुभवविश्व असतं, ते त्यांनी प्रत्येकांनी शब्दबद्ध करुन मांडायला हवं. आैषधनिर्माणशास्त्रातील ९०च्या दशकात द.आफ्रिकेत एडसचं थैमान सुरु असतांना लस बनवणा-या दादा कंपन्यांच्या अमानवीय पैसेखोरीचं विदारक चित्र दाखवणारं व त्याविरुद्ध दंड थोपटून स्वस्त दरात आफ्रिकेला लस पुरवणा-या भारतीय सिप्ला कंपनीचा लढा वाचकांसमोर ठेवणारं डॉ मृदुला बेळेंचं अशीही एक झुंज हेही पुस्तक खिळवून ठेवणारं आहे..
आता याशिवाय डाॅ बापटांचं वाॅर्ड नं ३०२, डॉ हिंमतराव बावस्करांचं बॅरिस्टरचं कार्टं, डॉ अरुण गद्रे यांची कैफियत,-हासपर्व यासारखी अनेक पुस्तकं अजूनही वाचायची राहिली आहेत.
-हेम

चांगली यादी.
डॉ. लहाने (डोळ्यांचे सर्जन)यांचंही पुस्तक आहे का.
----------
फार पूर्वी ('६८-'६९)एक होमिओपॅथी उपचाराचे पुस्तक वाचल्याचं आठवतंय. 'रुणाची अमुक तक्रार होती. ते सविस्तर वर्णन. त्याला होमिओपॅथीतलं xx हे औषध दिलं आणि बरा झाला.' या पद्धतीचे किस्से होते. ( नाव आठवत नाही पण लेखक बहुतेक अ.ल.भागवत.)

वावे, अँडम परिचय आवडला.
चकवाचांदणं सुंदर पुस्तक आहे. जरूर वाच सामो.
वैदयकीय / डॉक्टर संबंधीत पुस्तकं यादी छान. खूप पूर्वी डॉ अरविंद संगमनेरकरांचं एक पुस्तक वाचलेलं आठवतंय. कथासंग्रह होता. नावं,ठिकाण बदलून पण सत्यकथा. गायनॅक संदर्भात कथा होत्या. लेखकाचं नाव लक्षात आहे कारण त्यांचा दिवाळी अंकात अजूनही लेख असतो. वैद्यकीय पेशातला.

शाईन ब्राईट
रश्मी बन्सल
अनुवाद - मुक्ता देशपांडे

नोकरीच्या कक्षेत राहूनही उद्योजक बनलेल्या/ असलेल्या सीईओंच्या या प्रेरणादायी कथा आहेत.

पवन गोएंका -
अमेरिकेत जनरल मोटर्स मध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम करत असलेले पवन गोएंका जुलै 1992 मध्ये नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असतात . 'इंडिया अब्रॉड' या वर्तमानपत्रात परदेशस्थ भारतीयांना स्वदेशी परतण्याचं आवाहन केलेलं असतं आणि काही नोकरीच्या जाहिराती असतात. भारतात आल्यावर कलकत्त्याजवळ मुंबईत 'महिंद्रा' मध्ये अर्ज केला आणि मुलाखतीसाठी पवन गोइंका गेले. ठराविक पद्धतीची मुलाखत झालीच नाही. भविष्यातल्या स्वप्नांबाबत चर्चा होऊन पवन गोइंका जॉइनिंग लेटर वर सही करूनच परतले. वर्षाला एक लाख वीस हजार डॉलर्स पगार देणारी जगातली अग्रगण्य कार कंपनीतील नोकरी सोडून भारतातल्या वर्षाला सात लाख रुपये देणारी नोकरी धरली. स्कॉर्पिओ, बोलेरो ची सुफळ संपूर्ण कहाणी इथून पुढे घडत गेली.

पवन गोएंका यांच्या पत्नी ममता गोएंका यांनी तीन वेळा उद्भवलेल्या कॅन्सरवर मात केली. ती करताना 90% लढाई ही मनात लढली जाते. त्यासाठी त्यांनी कॅन्सरशी दोन हात करणाऱ्यांना समुपदेशक म्हणून मदतीचा एक हात देऊ केलाय.

मनू जैन -
आयआयएम मधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर 'मॅकीन्सी' या कन्सल्टिंग कंपनीत चांगलं बस्तान बसत असताना 'शाओमी' या कंपनीबद्दल त्यांच्या वाचनात आलं. मोबाईलशी संबंधित स्वतःचं काहीतरी करावं ही त्यांची प्रबळ इच्छा होती. अनेक इंटरनेट उद्योजक, मोबाईल उद्योजकांना भेटून चिनी स्टार्टअप प्रणालीचा अभ्यास केला आणि मनू जैन यांना शाओमीने भुरळ पाडली. खरंतर मनू यांचा स्वप्न होतं मोबाईल जगतात एखादं ॲप बनवावं. प्रत्यक्षात शाओमीच्या फोन विक्रीचे काम स्वीकारून भारतातले व्यवसाय प्रमुख बनले. ज्या काळात MI फोन्स भारतात माहीतही नव्हते तेव्हा एम आय फोनची फ्लिपकार्ट वर धडाकेबाज विक्री केली. ते ही मार्केटिंग वर काहीही खर्च न करता केलेली विक्रमी विक्री. 'शाओमी' जागतिक स्तरावर पैसा उभारत असताना मनू रतन टाटांना भेटले आणि टाटांनी गुंतवणूक केली. आंध्र प्रदेशमधल्या श्री सिटीत 'फॉक्सकॉन' च्या भागीदारीत मेक इन इंडिया अंतर्गत हँडसेट बाजारात यायला सुरुवात झाली. मोठी ध्येयं डोळ्यासमोर ठेवून आणि वेगळा विचार करून हे त्यांनी कसं साध्य केलं हे वाचनीय आहे.

विनीत गौतम -
इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना गंमत म्हणून दिलेल्या दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रवेश परीक्षेत निवड होते. त्या काळात हॉटेल उद्योगाला वाव आहे असा विचार करून घरच्या मंडळींचे न ऐकता विनीत गौतम हॉटेल मॅनेजमेंट मध्ये दाखवला होतात. तिथली शिक्षण पद्धती, करावं लागणार काम, मिळणारे शिक्षण, रेस्टॉरंट मध्ये मिळणारे जॉब, डॉमिनोज पिझ्झामध्ये, दिल्लीत सीसीडी (कॅफे कॉफी डे) स्टोअर्स उघडणे हा प्रवास इंटरेस्टिंग आहे. सगळं सुरळीत चाललेलं असताना एकदमच त्यांनी 'विल्स लाइफस्टाइल' या कापड क्षेत्रातील विक्री सेवा देण्याची नोकरी स्वीकारली. दोन वर्षातच बस्तान छान बसत असताना ते सोडून 'आयडिया सेल्युलर' मध्ये प्रवेश केला . दोनेक वर्षात पुन्हा त्याचा कंटाळा आला आणि बेस्टसेलर या डेन्मार्क मधल्या कपडे बनवण्याच्या कंपनीच्या 'व्हेरोमोडा' ब्रँड हेड म्हणून पदभार स्वीकारला. 'बेस्टसेलर इंडिया' ने भारतात कपडे बनवायला सुरुवात केली. मागणीनुसार आणि भारतीय आवडीनिवडी लक्षात घेऊन. किरकोळ विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या ऑनलाइन डिस्काउंटच्या छायेत बेस्ट सेलर ने भारतात बनवलेला ब्रँड टिकवून वाढवत नेण्याचा केलेला प्रवास रोचक आहे.

नितीन परांजपे -
कधीही कुठल्याही परीक्षेत नंबरात येणार नाही पण नापासही होणार नाही असा कोणत्याही शर्यतीत शेवटी येणारा पण ती पूर्ण करणारा एक चांगला माणूस. कुठल्याही हव्या त्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन एमबीए मध्ये मात्र पहिले आले आणि HUL मध्ये उन्हाळी प्रशिक्षणा दरम्यान निर्णय झाला आणि HUL मध्ये जॉब स्वीकारला. काही महिन्यातच मंदीची जगभर लाट आली. त्यावेळी या मंदीला तोंड देण्यासाठी व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी कसा मार्ग शोधला, तळागाळातली खेडी जिथपर्यंत उत्पादन पोहोचवण्याचाच खर्च जास्त होता तेव्हा शक्कल लढवून 'टाटा डोकोमो'शी भागीदारी केली. जेणेकरून ग्रामीण भारतात वितरण सुकर झालं. पुढेही आव्हानात्मक पद स्वीकारत लक्षणीय कामगिरी केली. खरंतर कंपनी जितकी जुनी तितकी तिची काम करण्याची पद्धत ठरवून गेलेली असते. एखादाच त्यात बदल करायचं धाडस करून नेतृत्व करतो आणि लक्षणीय कामगिरी करतो त्याची ही गोष्ट वाचनीय.

आर् मुकुंदन -
आयआयटी रूरकी मधून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना तीन ठिकाणाहून नोकरीचे प्रस्ताव आले. टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि वोल्टास . त्यांनी मात्र एमबीए करायचं ठरवलं. ते पूर्ण झाल्यावर टाटा एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस कडे मुलाखत दिली आणि त्यांची निवड होऊन त्यांना टी ए एस च्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यात हॉटेल, पादत्राणे बनवणारी कंपनी, पेप्सीसाठी बाटल्या तयार करणारी कंपनी, इंडिका गाडी बनवणारी कंपनी अशा विविध क्षेत्रात काम करून नंतर टाटा केमिकल्स मध्ये बढती स्वीकारली. ज्यावेळी टाटा कंपन्यांचे बहुतेक सीईओ हे त्यांच्या पन्नाशीत किंवा साठीत होते तेव्हा अवघ्या 42 व्या वर्षी आपल्या कामगिरीने आर मुकुंदन यांनी हे यश कसं खेचून आणलं हे वाचण्याजोगे. सोडा, अँश, खतं, शेतकी रसायनं आणि मीठ या ठराविक क्षेत्रात टाटा केमिकल्स फिरत असताना मुकुंदन यांनी वेगळ्या वाटाही धुंडाळल्या. टाटा स्वच्छ - ज्यात विजेचा वापर न करता पाणी शुद्ध करता येतं ही त्यातलीच एक वाट. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं. चार राज्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांशी करार करून चणाडाळ, भेसळमुक्त बेसन बाजारात आणलं. त्याचवेळी नुकसानी चाललेला खत उद्योग विकून टाकण्याचं ठरवलं. असा हा टाटा केमिकल्स च्या सीईओचा आव्हानात्मक प्रवास वाचनीय.

हर्ष भानवाला -
अतिशय हुशार, उत्तम नोकरी मिळवण्याची महत्त्वकांक्षा. त्यादृष्टीने IIM मध्ये प्रवेश मिळवला. शिक्षण पूर्ण होताच नाबार्डमधील नोकरी स्वीकारली कारण तेव्हा ती नवीन संस्था /कंपनी होती. प्रगतीच्या संधी आणि ग्रामीण भागासाठी काम करण्याची इच्छा या दोन गोष्टींसाठी. पाहणीसाठी खेडेगावात केल्यावर तिथले भीषण दारिद्र्य आणि संस्थेत बसून कर्जावर किती व्याज आकारावं याचा ताळमेळ घालणं त्यांना अवघड जायचं. गरज पडली तेव्हा विशेष धोरण राबवून आजारी बँकेला सशक्त केले. हर्ष भानवालांच्या कारकिर्दीत नाबार्ड फक्त कर्ज देण्यापुरतं मर्यादित राहिलं नसून भारतातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचेही काम करत आहे.

अमिताभ कांत -
शिक्षण सुरू असतानाच ठरवलेलं की आयएएस व्हायचं. त्या दृष्टीने अभ्यासक्रम पूर्ण करून ८० साली निवड झाली. केरळ मधल्या जनशक्तीने बरंच काही शिकवलं. नंतर 'मत्स्यफेड' च्या व्यवस्थापकीय संचालकपदी असताना स्थानिक मल्याळम भाषा उत्तम शिकून त्यातून त्यांनी मच्छीमारांना आपलंसं केलं. त्यांच्यासाठी अनेक सुविधा राबवल्या. निरनिराळ्या ठिकाणी बदल्या, वेगवेगळे सरकार .. पण जातील तिथे 'चांगला बदल घडवणे' हे एकच स्वतःपुरतं ब्रीदवाक्य ठेवलं. 'इनक्रेडिबल इंडिया' , 'मेक इन इंडिया'चं पडद्यामागचं कठीण काम हा प्रवास वाचनीय.

चित्रा गुप्ता -
शाळेत हुशार असल्या तरी त्यावेळी काही ध्येय ठरवलं नव्हतं. शाळेतली शिक्षिका होण्यात तर मुळीच इंटरेस्ट नव्हता. नोकरी लागल्यावर मात्र 'शिकवणं' आवडायला लागलं. इथून एका शिक्षिकेचा प्रवास सुरू झाला तो फक्त आहे ते शिकवण्यापुरता मर्यादित न राहता दुर्लक्षित शाळात जिथे दहावी बारावीचा निकाल 50 टक्के लागत होता तो 100% लावण्यापर्यंत विस्तारला. ज्या शाळेत बदली झाली तर काळा पाण्याची शिक्षा म्हणलं जायचं त्याच शाळेत जेव्हा चित्रा यांची बदली झाली तेव्हा कसा कायापालट केला तिथल्या मुलींचा हा प्रवास वाचनीय.

ही सगळी प्रसिद्ध नावं आपण बातम्यात, वर्तमानपत्रात वाचत /पहात असतो. गुगल केलं की शॉर्ट मध्ये त्यांची माहितीही येते. पण त्यांचं बालपण, शिक्षण, या पदापर्यंत यायचा त्यांचा प्रवास, शिक्षण संपल्यावर कारकीर्दीच्या सुरुवातीला बऱ्याच जणांचं कारखान्यातच नाहीतर व्हॅनमध्ये झोपणं, कामाप्रतीची निष्ठा, स्वतःला रुचेल त्या क्षेत्रात धडपड करून वेगवेगळी क्षेत्र अनुभवून बघणे हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रवास पण कामाप्रती समर्पण हा एक कॉमन फॅक्टर या सगळ्यात जाणवला. प्रत्येकाच्या गोष्टी शेवटी त्यांची दैनंदिनी , व्यायाम , छंद , कुटुंब याविषयी अगदी थोडक्यात सांगितलेय. दर दोन-तीन पानांमागे ग्रे कलरच्या चौकटीतली टिप्पणीही चांगली आहे. आणि एक आवडलं या पुस्तकातलं ते म्हणजे अधून मधून लिहिलेले छोटे पण मनावर ठसणारे प्रसंग. उदा: 26/ 11 च्या बॉम्बस्फोटावेळी ताज मध्ये मीटिंग चालू आहे. बाहेर अतिरेकी फिरतायत. त्यावेळी रात्रभर तिथे काय काय घडलं. एका छोट्याशा आपल्याला माहितही नसलेल्या खेड्यातल्या राबरी जमातीच्या बायका - ज्या गोंदण पद्धतीसाठी , हाताने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भरतकाम आणि अँप्लीक वर्क साठी ओळखल्या जातात... त्यांची कला सगळे अडथळे पार करून जगासमोर आणणे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला देणे... वगैरे.

Stay hungry stay foolish ' आणि इतर पुस्तकांची लेखिका आहे रश्मी बन्सल. वाचणार शाईनिंग ब्राईट.
असं का होतं? लहानपणीचे संस्कार,शिकवण, निरीक्षण आणि जिद्द तसेच असमाधानी असण्याची वृत्ती (मोठी आकांक्षा ) यामुळेच प्रगती होते.
सढळ सविस्तर ओळख आवडली.
____________
चकवा चांदण वाचून संपवले. नेहमी पाने ढकलून भराभर वाचन करतो पण हे तसे करता येत नाही.
१) नातेवाईक, सहकारी,प्रतिष्ठीत लोक मारुती चितमपल्ली यांना धार्जिणे आहेत.
२) वाचनाची आवड, नवीन गोष्टी जाणून घ्यायची सवय, बरेच तास काम करण्याची आवड आणि शक्ती आहे.
३)नम्रपणा आणि स्वतःची चूक ओळखून बदल करणे.
४) संस्कृत ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास पक्षी निरीक्षण छंदासाठी केला. कोणत्या ग्रंथात काय आहे ती यादी दिली आहे. इंग्रजी ग्रंथही वाचूनही टिपणं काढली. ते सर्व दिले आहेत. केवळ शास्त्रीय नव्हे तर ललित पद्धतीने प्राणी पक्षी जगताचे ग्रंथही आवडीने वाचले आहेत त्यांचा उपयोग करून पक्षी, रान यांची पुस्तकं लिहिली.
लहानपासून विविध नातेवाईक, पुढे वनखात्याची व कर्मचारी वर्ग,पक्षी निरीक्षण छंदासाठी मदत करणारे गोंड,माडिया आदिवासी , मराठीत लेखन करणारे लेखक यांची चांगली व्यक्तिचित्रणं केली आहेत.
सच्चा हाडाचा पक्षी आणि व्यक्ती निरीक्षक - मारुती चितमपल्ली.
असे पुस्तक दुसरे होणे नाही.

बरं इथे अमेरिकेत मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे का कुणा मंडळाची? दिवाळी अंक आहेत जुने, हवे असतील तर पोस्टानं पाठवू शकेन. लोकल लायब्ररीला नको आहेत.

सय - माझा कलाप्रवास (सई परांजपे)

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीतल्या लेखमालिकेचं पुस्तक.
तेव्हा सगळेच्या सगळे लेख वाचले गेले नव्हते. पुस्तकात एकसलग वाचता आले.
नाटक/सिनेमाची निर्मिताप्रक्रिया हा माझा अत्यंत आवडीचा विषय. त्यामुळे वाचायला मजा आली.
त्यांच्या बहुतेक नाटकांची नावं ऐकलेली आहेत, पण मी त्यातलं एकही पाहिलेलं नाही.
त्यांनी सिनेमाचा बिझिनेस दृष्टीकोनातून कधीच विचार केला नाही, तो त्यांना कधी जमलाही नाही. त्यामुळे त्यांचं वेळोवेळी बरंच आर्थिक नुकसान झालं. ते त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे.
आई शकुंतलाबाई परांजपे यांच्या ऑरात गेलेलं बालपण, खेळायला कुणी नसणं, लोकांचे भोचक प्रश्न ऐकून आलेलं भांबावलेपण, त्याचा आयुष्यभर राहिलेला मानसिक परिणाम - हा सगळा भागही मला नवीन होता.

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकरांचं व्हाया वस्त्रहरण पुस्तक या नाटकाच्या गंमतींवर असेल या आशेने वाचायला घेतलं. पहिली ९६ पानं वस्त्रहरणाच्या लंडन दौ-यावर आहेत. नंतर मात्र लेखकाचा लहानपणापासून ते यशस्वी नाटककार होईपर्यंतचा प्रवास लिहिलाय तो अत्यंत शहारा आणतो. मुंबईत गरीबांचं जीवन कांय थराचं आहे याचं चित्रण आहे. गरीबीला कुठलीही जात धर्म नसतो. लेखकाने वाईट्ट दिवसांतही भेटलेल्या चांगल्या व्यक्ती, अनुभवांंवर भर दिलाय हे भावतं. कुठेही तक्रारीचा सूर जाणवत नाही की रडगाणं जाणवत नाही तरी गरिबीची भीषणता जाणवते..
एकदा तरी नक्की वाचायला हवं.

व्हाया वस्त्रहरण >>> हो, काही वर्षांपूर्वी वाचलंय. तेव्हा सेम फीलिंग आलं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही सर्जनशीलता आणि विनोदबुद्धी टिकवून ठेवणे याची फार कमाल वाटते. आणि त्या पार्श्वभूमीवर लंडन दौरा म्हणजे खूप मोठी गोष्ट बनते.

अजित गोगटे यांनी लिहिलेले पाळण्यात न दिसलेले पाय' हे आत्मकथन वाचले.
(मनोविकास प्रकाशन,२०२२. पाने २३०)
लेखक नोकरी शोधता शोधता लोकसत्तामध्ये पत्रकार झाले. तिथेच न्यायालयीन वृत्त देणारे म्हणून नावाजले गेले. (म.टा. ने बोलावले होते. पण पगार वाढवून द्यायला तयार नव्हते म्हणून गेले नाहीत.) रिटायरमेंट अगोदर तीन वर्षे लोकमतमध्ये कसे गेले तो किस्सा मजेशीर. लोकसत्तातील मिळणाऱ्या पगाराच्या अडीचपट मिळाला (कसा ते गंमत.)
१.न्यायालयात घडलेले विशेष खटले, काही न्यायाधीश आणि वकीलांची वर्णने आहेत. २.लोकसत्तातील पत्रकार आणि संपादक यांवरही स्पष्ट मते दिली आहेत. ३. स्वतः वकील नव्हते परंतू न्यायालयाविषयी सर्व माहिती मिळवून अभ्यास केला. शेवटच्या पानांवर ती आहे.
पुस्तक आवडले.
अधुनमधून लेख लिहितात.

हिमालयाण्यक
आश्लेषा गोरे
मेहता पब्लिशिंग हाऊस, एप्रिल २०२२.
पाने ५००
( Wild Himalaya by Stephen Alter या पुस्तकाचा अनुवाद.)

हिमालयाची भौगोलिक घडण, नकाशे तयार करणे,वन्यजीव,वर राहणाऱ्या जमाती,त्यांचे जीवन, लोककथा, शिखरांवर चढाई करणारे गिर्यारोहक,शेर्पा, त्यांनी लिहिलेली पुस्तके एवढी विस्तृत माहिती या जाडजुड पुस्तकात लिहिलेली आहे. रंगीत चित्रे थोडी आहेत पण विशेष नाहीत. खास हिमालयात सापडणाऱ्या वन्यजीवांची काळी पांढरी लहान रेखाटणे प्रत्येक प्रकरणावर टाकली आहेत. रंगीत नाहीत. वन्यजीवांचे आणि प्रदेशाचे वर्णन मात्र सविस्तर लिहिले आहे.

मोठ्या माहितीपर पुस्तकांत विविध नोंद झालेल्या नावांची अनुक्रमणिका शेवटी देतात तशी दिलेली नाही. ती सोय हवी.
एकूण चांगले पुस्तक मराठीत आणल्याबद्दल प्रकाशक,अनुवादकांना धन्यवाद. पक्षी आणि फुलपाखरांची मराठीतली नावेही आहेत.

लव्हिंग नॅटली
बेथ हॉलोवे
अनुवाद : पूर्णिमा कुंडेटकर

ही सत्यकथा आहे बेथ हॉलोवेची - एका आईची - जिने एका बेटावर ट्रीपला म्हणून गेलेल्या आणि अचानक नाहीशा झालेल्या आपल्या मुलीला शोधण्याची पराकाष्ठा केली.

नॅटली - तिची मुलगी. फक्त 17 वर्षांची. त्यांच्या शाळेच्या क्लासची ट्रीप अरुबाच्या कॅरीबियन बेटावर दरवर्षी जायची. तिचे सीनियर मित्र - मैत्रिणी, चुलतभाऊ वगैरे पण जाऊन आले होते. साहजिकच नॅटलीलाही जायचं होतं. तिची शैक्षणिक प्रगती उत्तम होती. शाळेत हुशार नृत्यूनिपुण आणि भरपूर मित्र-मैत्रिणी असलेली अशी ती होती.

ट्रीप ला जायच्या आधी मनासारखी खरेदी आईबरोबर करून जायला उत्सुक होती. आईनेही जायच्या आधी सगळ्या सूचना केल्या. कुटुंबाशिवाय एकटीच जाते म्हटल्यावर संभाव्य धोके, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दलही आवश्यक ते सगळं बजावलं होतं. ती आनंदाने ट्रीप ला गेली. तिला बाय करून जोडून सुट्ट्या आल्याने नॅटलीचा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर आणि बेथ - नॅटलीची आई तिच्या मैत्रिणींबरोबर छोटी ट्रिप करायला जातात.

तीन दिवस सगळं छान चाललेलं असतं. आणि नॅटलीच्या परतीच्या दिवशी जेव्हा सगळेच सुट्टी संपवून घरी परतायच्या मार्गावर असतात तेव्हा अरुबाच्या सहलीच्या ट्रॅव्हल एजंट चा फोन बेथला येतो की परतीच्या विमानात नॅटली चढली नाही. आदल्या रात्रीपासून ती गायब आहे.

काय झालं नेमकं तिचं ? अपहरण? खून ? अमली पदार्थ अतिसेवन? ह्युमन ट्रॅफीकींगची बळी ?

बेथच्या पायाखालची जमीन सरकते. आणि ती ताबडतोब अरुबाला जायला निघते. तिथे गेल्यावर नॅटलीला शोधताना तिला आलेले सरकारी अधिकाऱ्यांचे, गुप्तहेरांचे, पोलिसांचे , नागरिकांचे, स्वयंसेवकांचे अनुभव म्हणजे हे पुस्तक. एकीकडे भ्रष्ट राजकारण जेरीस आणतं तर दुसरीकडे तिथले काही नागरिक तिच्या स्वतःच्या देशातले तिचे परिचित ते अनेक देशवासीय तिला इतकी मदत करतात की त्या प्रेमाने तिचा हरवत चाललेला आशावाद जिवंत राहतो.

नॅटली कधीही सापडत नाही जिवंत अथवा मृत. तिचं नक्की काय झालं हे कायदेशीर सिद्धच होत नाही. पण ज्यांच्यावर संशयाची सुई फिरत असते त्यांचे उलट सुलट नोंद झालेले जबाब, तिथल्या स्थानिक पोलिसांची या शोध कार्यातली दिरंगाई, भाषा वेगळी असल्याने वेगळाच जबाब नोंदवून त्यावर सही घेणे यासारख्या गोष्टी आपल्यालाही चीड, संताप आणायला, हताश व्हायला भाग पाडतात.

प्रसारमाध्यमाधमं नॅटली बेपत्ता झाल्यावर एक बेजबाबदार मौजमजा करणारी मुलगी असं तिचं चित्र उभं करतात. त्याबद्दल नाराज होऊन बेथ नॅटली नक्की कशी होती , अरुबा बेटावर काय राजकारण खेळलं गेलं, एफबीआयला कसं लांब ठेवलं, बेटावर काय काय प्रकार चालतात आणि सगळ्यात शेवटी स्व सुरक्षिततेबद्दल जागृती यासाठी नॅटली बेपत्ता झाल्यावर चार वर्षांनी हे पुस्तक लिहिते.

सध्या लेखिका अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करते तर उरलेल्या वेळात ट्रॅव्हल एड कार्यशाळा म्हणजेच प्रवासाला निघण्याच्या पूर्वतयारीची कार्यशाळा, वैयक्तिक सुरक्षा संबंधीत मार्गदर्शन करते.

अच्छा सामो. तिकडे असणार ही बातमी. मला माहित नव्हतं हे वाचेपर्यंत.

पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस.
एडी जाकु.
अनुवाद : मुकुंद वझे.

हे आत्मचरित्र आहे 2020 साली वयाची शंभरी पूर्ण झालेल्या एडी जाकुचे. वयाच्या 20 - 22 व्या वर्षी जेव्हा खूप सारी स्वप्न डोळ्यासमोर असतात तेव्हा तारुण्यात प्रवेश केलेल्या एडीपुढे काळोख दाटत होता. डोळ्यासमोर कुटुंब उध्वस्त होत होतं. आणि एडीला काहीही करता येत नव्हतं. आज जिवंत आहे उद्या असणार की नाही माहित नाही अशा परिस्थितीत तब्बल सात वर्षे त्यांनी काढली. का? तर तो जर्मनीत स्थायिक झालेला, जर्मन नागरिकत्वाचा अभिमान बाळगणारा देशभक्त होता. पण त्याचबरोबर एक ज्यू ही होता. अपरिहार्य होतं छळ छावणीचा बुखेनवाल्डमध्ये आणि नंतर आउश्वित्झ छळछावणीत झालेला मरणप्राय छळ... छळ छावणीत तंत्रज्ञान हाताळायला कोणीतरी हवा म्हणून आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं. एडी एक हुशार मेकॅनिकल इंजिनियर होता. मनाच्याच नाही तर शरीराच्या क्षमतेचीही कसोटी असायची... शरीर सतत उपाशी, जखमी , जोडीला गोठवणारी थंडी, साथीचे आजार ... पण या विलक्षण यंत्राने( शरीरानं) त्याला तारलं.

सात वर्षांनी युद्ध संपल्यावर या सर्वातून जिवंत राहिल्यावर एडीला प्रश्न पडला. आता एकटं राहून करायचं काय. छळ छावणीतून मुक्तता मिळाली खरी पण प्रचंड एकाकीपणा दाटून आला. दीर्घकाळ झालेली उपासमार, फक्त 28 किलो झालेलं वजन, जोडीला टायफॉईड आणि कॉलरा. एडी 35% जिवंत राहण्याची शक्यता आहे असं डॉ नी सांगितलं असताना एडी परमेश्वराला वचन देतो 'जर जगलो तर एक नवा जीव म्हणून जगेन.' पृथ्वीतलावरील भरपूर दुःख अनुभवलेला एडी आता पृथ्वीतलावरील सर्वात आनंदी माणूस व्हायचं ठरवतो आणि फक्त आनंद निवडून जगतो. (मनात आलं इतकं दुःख भोगल्यावर साध्या साध्या गोष्टीतही आनंदच सापडणार. भीतीची सावली नाही, रोज पोटभर जेवण, मूलभूत गरजा भागवता येतायत, काम करायची इच्छा आणि संधी दोन्ही आहे.)

अर्थात हे चुटकीसरशी घडत नाही. सुरुवातीला कोणतीही करमणूक, माणसांची गर्दी, संगीत नकोस वाटायचं. मनाच्या तळाशी दडलेली भीती वर यायची. पण हळूहळू नव्याने कुटुंबाचा विस्तार होऊ लागला आणि एडीला या सगळ्यात रस वाटू लागला.

वयाची शंभरी पूर्ण होत असताना एडी सगळ्यांना ही कहाणी समजावी, हत्याकांडाला बळी पडलेल्या लाखो निरपराध ज्यूंसाठी आणि या हत्याकांडातून जिवंत राहून पुढे 75 वर्षात त्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांसाठी लिहायचं ठरवतो. 'काळोखातही आनंद शोधता आणि मिळवता येतो' हा संदेश देतो.

पूर्ण पुस्तकभर बालपण, शिक्षण, तेव्हाची राजकीय स्थिती, लपून-छपून कुटुंबाबरोबर केलेली स्थलांतरं, छळ छावणीतलं मृत्यूसत्र, यातून बाहेर पडल्यावर घेतलेल्या शिक्षणाचा केलेला उपयोग , नव्याने उभं केलेलं आयुष्य हे सगळं सहजरीत्या पुस्तकात मांडलं आहे. लेखक झाल्या गोष्टींबद्दल कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाला माफही करत नाही. छळ छावणीत लेखकाची सख्खी बहिण जिवंत असल्याचं दिसतं आणि एक कॉलेज जीवनातला मित्रही. ज्यूंच्या मुक्ततेनंतरही ती बहिण जिवंत असल्याचा एक उल्लेख आहे पण लेखकाच्या नव्याने सुरू केलेल्या आयुष्यात या बहिणीचा कुठेही उल्लेख नाही. मित्र मात्र अधून मधून दिसतो. आयुष्य म्हणलं की सुखदुःख दोन्ही क्रमप्राप्त. जे वाट्याला आले ते त्रागा न करता जसच्या तसं स्वीकारून त्यातला आनंद वेचत राहायचं हे मला वाचक म्हणून कळलेलं सार. वळतय किती बघायचं. इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक आहे. वाचावं असं.

इथली चर्चा वाचून सई परांजपे यांचे ' सय ' आणले आहे . छान आहे पुस्तक . मुख्य म्हणजे सोपी , गप्पा मारल्यासारखी भाषा आहे . ' मी ' पणाचा अतिरेक नाही . आवडते आहे वाचायला.

Pages