मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद वाचकहो Happy

भरत, Srd, पुस्तक ओळख आवडली.

मागच्या पानावर हेम यांनी वैद्यकीय पेशावर असलेल्या पुस्तकांविषयी लिहिलेला प्रतिसाद वाचून त्यातलं एक पुस्तक वाचनालयात दिसलं. छान आहे.

जीव जिथे गुंतलेला
डॉ अतुल गवांदे
अनु : नीला चांदोरकर

यशस्वी शल्यविशारद त्याच्या क्षेत्रातील शस्त्रक्रियेची सुरुवात कशी करतो, त्याचा पहिला रुग्ण, त्यावेळची त्याची मनोवस्था कशी असते आणि हळूहळू त्यात तो पारंगत कसा होतो ... त्याचबरोबर शस्त्रक्रिया करताना येणारी जोखीम, घ्यावे लागणारे निर्णय, कधीकधी होणाऱ्या चुका, त्यातून झालेला अभ्यास, नवीन उपकरणे किंवा तंत्रज्ञान येतं तेव्हा चित्रफिती बघून ते उपकरण योग्य रीतीने हाताळायला शिकणे हे सगळं वाचकांसमोर मांडलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ज्या ज्या रुग्णांना सेवा दिली त्या सगळ्या घटना (अर्थात नाव, आजार यांचे तपशील बदलून) लेखकाने लिहिलेल्या वाचनीय आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील दुष्कृत्य, त्याचबरोबरीने नाहक डॉ वर भरले जाणारे खटले , घडणाऱ्या दुर्घटना, त्याचबरोबर जेव्हा वेदनाग्रस्त पेशंट बरा होऊन परत घरी जातो तेव्हा वाटणारा आंनद, डॉ वर येणारे ताण असे बरेच तपशील पुस्तकात आहेत. शेवटी काय तर गुंतागुंत असणारं मानवी शरीर आणि त्यावर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचं अनुभवविश्व वाचताना वाचकही गुंतत जातो हे खरं.

आमच्या आयुष्यातील काही आठवणी
रमाबाई रानडे

या पुस्तकात रमाबाईंनी त्यांच्या आयुष्यातल्या आठवणींचा लेखाजोगा मांडला असला तरी हे आत्मचरित्र म्हणता येणार नाही. रमाबाईंनी वेळोवेळी घडलेल्या गोष्टी, काही आठवणी, प्रसंग जसेच्या तसे मांडले आहेत. पण ते मुख्यत्वे माधवराव रानडेंच्या संदर्भातीलच आहेत. स्वतःच्या आजारपणाविषयी ही तेवढंच लिहिलंय कारण माधवराव त्यावेळी हडबडले होते.

न्यायमूर्ती माधवराव रानडे यांचे पहिलं लग्न वयाच्या अकराव्या वर्षी झालं. काही वर्षातच प्रथम पत्नीचा मृत्यू झाला आणि मनाविरुद्धच केवळ वडिलांच्या हट्टापायी त्यांचं दुसरं लग्न परत एकदा वयाने लहान मुलीशी -रमाबाईंशी झालं. ज्यामुळे पुढे टीकाही सहन करावी लागली. नन्तर घरच्यांचा विरोध असतानाही रमाबाईंना लिहाय वाचायला शिकवलं. प्रसंगी परधर्मीय शिक्षक नेमूनही. त्या आठवणी ...

नवऱ्याचा शिकवण्याचा हट्ट आणि कुटुंबातील समस्त महिला मंडळाचा त्याला असलेला विरोध या कात्रीत सापडूनही रमाबाईंनी कोणालाही न दुखावता उत्तम मेळ साधला. फक्त लिहायवाचायला न शिकता सभेत भाषण करण्याचा सभाधिटपणा अंगी बाणवला. मराठी बरोबर इंग्रजी, बंगाली भाषा शिकण्याचा प्रवास ... त्या आठवणी...

रमाबाई - माधवराव हे नातं फक्त पती- पत्नी न होता गुरु - शिष्य, सखा/ मित्र, पेशन्ट - परिचारक/रीका, एकत्र केलेली भटकंती ... त्या आठवणी...

रानड्यांच्या पूर्वजांपासून पुस्तकाची सुरुवात करून स्वतःचं लहानपण, गाव, माधवरावांच्या नोकरीनिमित्ताने ठिकठिकाणी झालेलं वास्तव्य, ऐकलेली/ केलेली व्याख्याने, तिथं आलेले वेगवेगळे अनुभव ... आठवणी...

1897 साली आलेली प्लेगची साथ. तेव्हा केलेल्या स्थलांतराच्या आठवणी. लोणावळ्यास मुक्काम टाकल्यावर नोकर माणसांना साथीची लागण झाल्याचे कळल्यावर त्यांना योग्य ते उपचार मिळावेत याची व्यवस्था तसेच बरोबर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी सुरक्षित जागा बघून तिथे बिऱ्हाड हलवणे. या सगळ्यात साथीची लागण होऊ नये म्हणून माधवरावांना आणि मुलांना लोणावळ्यास ठेवून एकट्या रमाबाई धाडसाने ही सर्व कामे कशी पार पाडतात या आठवणी...

याचबरोबर माधवरावांचे सार्वजनिक कार्य... त्यांचा शांत, संयमी, कठोर न्यायप्रिय स्वभाव ,रोजची दैनंदिनी ... नवऱ्याबरोबर स्वतःलाही सार्वजनिक कार्यात वाहून घेतलं. माधवरावांची नाजूक प्रकृती , त्यावर वेळोवेळी केलेले इलाज. शेवटी वाढत गेलेले आजारपण आणि त्यात माधवरावांचा झालेला दुःखद अंत. माधवरावांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यू पर्यंतच्या घटना पुस्तकातुन आठवणींच्या रुपात वाचायला मिळतात.
त्या काळात स्त्रीचं समाजात, कुटुंबात असलेलं स्थान , समाजसुधारकच घरात असल्याने एकाच कुटुंबात निर्माण झालेले भिन्न मतप्रवाह, काळानुसार आपापल्या जागी ते बरोबरच वाटणे, त्यातून अडचणींवर मात करत साधता आलेली प्रगती , कधी न्या. रानडेंच्या छायेत राहणे तर कधी स्वतः त्यांची छाया बनून राहणे , रमाबाईंनी न्या. रानडेंविषयी अपार भक्ती, प्रेम या भावनांनी लिहिलेल्या या आठवणींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.

वैद्यकीय विश्व विषयावर वाचनालयात बरीच पुस्तके ( जीव जिथे गुंतलेला आहे) आहेत. पण माझा ओढा अलोपथीकडे नसल्याने मी ती कधी घेत नाही. आयुर्वेद, होमिओपॅथी यावर फारच केविलवाणी आहेत. दोन तीन चांगली मी विकतच घेतली आहेत.

रमाबाई रानडेंचं हल्लीच वाचलं आहे. चांगलं आहे.

पण माझा ओढा अलोपथीकडे नसल्याने मी ती कधी घेत नाही >> हे पुस्तक अलोपॅथीशी निगडित आहे हे खरं पण मला ही पुस्तकं त्यातल्या सुरस, रोचक गोष्टी वाचायला म्हणून आवडतात. खऱ्या घडलेल्या , अनुभवलेल्या गोष्टी . आणि फारशा किचकट वैद्यकीय संज्ञा वगैरे त्यात नसतात अशी पुस्तकं.

डॉ.मांडके यांचं पुस्तक मात्र वाचल्याचं आठवतंय.
डॉ.अभय बंग यांचंही मला ह़्रदयरोग कसा झाला तसेच सुरुवातीचा त्यांचा प्रवास खूप वर्षांनी सकाळच्या (किंवा कालनिर्णय?) दिवाळी अंकात वाचलेला. ते आता पुस्तक रूपात आहे. डॉ.कोटणीस यांच्यावरचं पुस्तकही वाचून बरीच वर्षं झालीत आणि आता काही आठवत नाही. डॉ आमटे सिनियर आणि जुनिअर यांचेही वाचले आहे. एकेक आठवू लागलो तसे ही पुस्तके वैद्यकीय सेवा देण्याबाबतीत नसून चरित्रात्मक आहेत. विंचवाच्या विषावर औषध शोधणारे डॉ. (!?)यांचंही पुस्तक आलंय. पण त्या अगोदर ती माहिती इतरत्र वाचून झालेली. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे डॉ.लहाने यांचीही कथा वाचली आहे. मग पुढे राजकीय हालचालींतून त्रास झालेला.
कोमा नावाचा सिनेमा वैद्यकीय क्षेत्रातील वाईट गोष्टींवर उजेड पाडतो. परदेशी रुग्णांना मिरज मध्ये रुग्णांना किडनी मिळवून देणे यावरही बरीच चर्चा पेप्रांतच येत असे. तर म.प्र.मधील कुणी एक माणूस वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र विकत असे. त्यावर दवाखाना चालवणारे बरेच डॉक्टरस(?) मुंबईत सापडलेले ('८५) त्यांचं इतर शिक्षण मेडिकल सेल्समनच करत. मग त्या सर्वांना पोलीसांनी भेट घेऊन दवाखाने बंद करायला लावले.
(असो. अवांतर झाले. डॉ.कुमार, प्रतिसाद गंभीरपणे घेऊ नका.)

<<<विंचवाच्या विषावर औषध शोधणारे डॉ. (!?)यांचंही पुस्तक आलंय >>>
"बॅरिस्टरचं कार्ट " - डाॅ. हिम्मतराव बावस्कर

खूप कष्टप्रद आयुष्यातून पुढे आलेत हे.

इथल्या 'नेहमीच्या यशस्वी कलाकारांकडून' सादर केलेले वरील सर्वच पुस्तक परिचय माहितीपूर्ण आणि रंजक आहेत. आवडले.
धन्यवाद !

वर उल्लेख झालेली Zumpa Lahiri हिची पुस्तकं १९९९/२००४ मध्ये प्रकाशित झाली असल्याने कॉपीराइट फ्री नाहीत. परंतू विकत न घेताही वाचण्याची सोय (borrow for one hour) archive.org करून देते. या पद्धतीने मी काही पुस्तके अधिकृतरीत्या मोबाईलवर हळूहळू वाचून काढली आहेत. प्रवासात शक्य आहे. ब्राउजर मध्येच पुस्तक उघडत असल्याने ओएस platformची चिंता नाही.

(Adobe Digital Edition app वर मिळू शकते लिहिले आहे परंतू ते app "Not compatible with your Android 12" तसेच "Not available in your region" notification येत असल्याने नाद सोडून दिला. यूएसवाल्यांनी प्रयत्न करून पाहावा.)

लिंका -
1) The Namesake
https://archive.org/details/namesake0000lahi/mode/1up

2)The Interpreter of Maladies

https://archive.org/details/interpreterofmal00lahi/mode/1up

रेलचक्र

व्यंकटेश बोर्गीकर (देसाई)
मॅजेस्टिक प्रकाशन, पहिली आवृत्ती २०१२
पाने २२०

खूप छान किस्से आणि माहिती लिहिणारे लेखक व्यंकटेश बोर्गीकर (देसाई) हे मध्य रेल्वेच्या सोलापूर आणि मुंबई परिमंडळात ३९ वर्षे नोकरीला होते.
वाचनीय पुस्तक.

डॉ नीतू मांडके यांच्याविषयीचे 'हृदयस्थ' हे त्यांच्या पत्नीने लिहिलेलं पुस्तक आवडलेलं. नन्तर त्यांच्याविषयी माबोवर इतरत्र लिहिलेले अनुभवजन्य प्रतिसाद वाचून विषाद वाटलेला.
'माझा साक्षात्कारी हृदयरोग' आणि 'कोमा' दोन्ही वाचलीत. डॉ लहानेंविषयी लेख बरेच वाचलेत. अजून पुस्तक वाचलं नाही कुठलं.

अँडॉल्फ हिटलर - द ग्रेट डीक्टेटर!
अतुल कहाते

हिटलर एक अस्वस्थ करणारे नाव. जो जिवंत असताना एक वादळी व्यक्तिमत्व होताच पण मृत्यूनंतरही गूढतेचं वादळ निर्माण करून गेला. 'माईन काम्फ' हे त्याचं आत्मचरित्र. हिटलरने साधारण वयाच्या 35 व्या वर्षी लिहिलेलं. ज्यामुळे आधी कफल्लक असलेला हिटलर प्रचंड श्रीमंत झाला. अजून वाचलं नाहीये. या पुस्तकात त्यातल्या (माईन काम्फ) हिटलरच्या लिखाणाविषयी आणि असणाऱ्या वास्तवाविषयी/ सत्यतेविषयी परिस्थितीनुसार विस्तृत लिखाण आहे. हिटलरच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटनांचा आढावा वाचायला मिळतो. हे पुस्तक लिहिताना घेतलेल्या वेगवेगळ्या सुमारे पंधरा पुस्तकांची संदर्भसूची शेवटी दिली आहे. ज्यात हिटलरचा बॉडीगार्ड, सेक्रेटरी, फोटोग्राफर यांसारख्या हिटलरच्या सानिध्यात आलेल्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.

हिटलरच्या आयुष्याच्या मध्यापर्यंत - वयाच्या 30 पर्यंत तो कोण आहे हे कोणाच्या खिजणतीतही नव्हतं इतकं त्याचं आयुष्य सर्वसामान्य होतं. ना तो अभ्यासात हुशार ना कुठल्या खेळात प्राविण्य. अभ्यासक्रम निवडून काहीतरी बनायचं हे ठरवेपर्यंतचाच उत्साह. ऐन परीक्षेवेळी त्याचं अपात्र ठरणं. एक चित्रकलेची थोडी जाण सोडता त्याला पोटापाण्यासाठी सुद्धा फार काही कमावता येत नव्हतं. वाचनाची आवड होती पण ती चौफेर नव्हती. ठराविक प्रकारचंच वाचन. काही वर्णद्वेशी नियतकालिकं आणि तत्सम. सुरुवातीला लष्करी सेवेपासून पळ काढणाऱ्या आळशी हिटलरला 1914 साली पहिलं महायुद्ध पेटल्यावर राष्ट्रप्रेम उफाळून येऊन युद्धात जर्मनीची सेवा करायचं डोक्यात आलं. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त नसला तरी तो भित्रा नव्हता. त्यामुळे निरोप्याचं काम त्याला लष्करात देण्यात आलं. हे काम अत्यंत चोखपणे त्यांनं केलं. 1919 मध्ये दोन भिन्न राजकीय पक्षांच्या संयुक्त आघाडीचं सरकार आणि त्यातले टोकाचे मतभेद अशी अशांत परिस्थिती, जोडीला सर्वसामान्य जनतेला भेडसावणारा अन्नधान्य - कपडे यांच्या तुटवण्याचा प्रश्न अशा परिस्थितीत लष्करात भरती झालेल्या जवानांसमोर ज्यूंच्या विरोधात जनमत करण्यासाठी पत्रके तयार करण्याची ,भाषणे करण्याची जबाबदारी (?) हिटलरवर आली आणि इथूनच नकारात्मक इतिहास रचणाऱ्या हिटलरचा जन्म झाला.

आक्रमक भाषणे देणे, समोरच्याची दिशाभूल करणे यात तो मास्टरब्लास्टर झाला आणि पुढची 26 वर्षे त्यांनं सगळं जग दणाणून सोडलं. त्याचा हट्टी, रागीट, दुराग्रही स्वभाव , बदला घेण्याची वृत्ती, कृरतेची परिसीमा, संशयी स्वभाव, विकृत महत्त्वाकांक्षा यातून उदयाला आलं नाझीपर्व. मुळात अशा स्वभावाचा माणूस नेता झालाच कसा? काही काळ तर तो लोकप्रियही होता. तो उदयाला येत असतानाच त्याला नेस्तनाबूत का केलं गेलं नाही? अशा मनात उमटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तक वाचता वाचता आपोआप मिळत जातात. यापुढचा इतिहास आत्तापर्यंत तुकड्या तुकड्याने वाचलेला होता तो एकसंधपणे या पुस्तकातून समोर येतो.

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची झालेली अवस्था, नाझी पक्षाची स्थापना, प्रस्थापित सरकार उलथवून मिळवलेले वर्चस्व, ज्यूधर्मीयांचा क्रूर संहार, जग जिंकण्याची हिटलरची लालसा, दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात आणि त्यात शेवटी हिटलरचा परिणामी जर्मनीचा झालेला पराभव या सगळ्या घडामोडी वाचताना विक्षिप्त स्वभावाचा हिटलर समोर येतो.

याच्या जोडीला त्याचं खाजगी आयुष्य कसं होतं ,त्यांने उभारलेले असंख्य बंकर्स, त्यातलं त्याचं राहणीमान, काटकसरी वृत्ती, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, नसलेलं मित्रसौख्य, त्याची पोटदुखी आणि प्रकृती, मानवतेला काळीमा फासणारी त्याची शिक्षा देण्याची कृर पद्धत , आंतरराष्ट्रीय संकेत धुडकावून युद्धकैद्यांशी केलेली वर्तणूक, अर्थशास्त्र- कूटनीती- राज्यशास्त्र या कशाचंही त्याला नसलेलं ज्ञान अशा बऱ्याच गोष्टींना पुस्तक स्पर्शून जातं.

या सगळ्याची अखेर म्हणजे त्याला आलेले डिप्रेशन. ते त्याला इतकं पोखरत गेलं की खचून जाऊन त्यांनं स्वतःची अखेर केली. पुस्तकात ठिकठिकाणी समायोचीत चित्रे आहेत. हे 363 पानी पुस्तक वाचल्यानंतर हिटलरचा एकंदर स्वभाव बघता तो एकीकडे पळपुटा वाटत नाही पण या अगोदर अतिआत्मविश्वासा पोटी घेतलेले मूर्ख निर्णय बघता पुन्हा मी माझं साम्राज्य उभं करीन हा आशावाद घेऊन तो बंकर मधून निसटला असावा अशीही पुसटशी शंका मनात येते. पुस्तकात मात्र त्यांने आत्महत्याच केली असं लिहिलं आहे. ती कशी, कुठे, केव्हा, त्यावेळचं तासा तासाचं वर्णन केलेलं आहे - पुराव्या दाखल काही फोटो देऊन.

अशी ही लोकशाहीला गुंडाळून एकाधिकारशाही, हुकूमशाहीचं थैमान घालणाऱ्या खलनायकाची कहाणी.

<< डॉ नीतू मांडके यांच्याविषयीचे 'हृदयस्थ' हे त्यांच्या पत्नीने लिहिलेलं पुस्तक आवडलेलं >>

आश्चर्य वाटले. त्यांच्या बायकोने स्वतः त्यांना हेकेखोर, दुराग्रही म्हटले आहे आणि त्या स्वतः एक डॉक्टर असूनही त्यांना कसे नेहमी दुय्यम स्थान मिळाले, कशी तडजोड केली ते लिहिले आहे.
To quote Chicago Mayor Harold Washington "I'm not glad he's dead, but I'm glad he's gone".

मुळात मोठे हॉस्पिटल हा खूप भांडवल लागणारा धंदा आहे. छोटे नर्सिंग होम हे एक डॉक्टर कुटुंब सहज चालवू शकते. साठ वय झाल्यावर वाटल्यास विकून टाकू शकते. लिमिटेड जबाबदारी आणि आटोपशीर आणि इच्छापूर्ती. मला वाटतं पुण्यातले डॉ. केळकरांचे डोळ्यांचे हॉस्पिटल असे म्हणता येईल.
तर दादरमधले शुश्रुषा चार डॉक्टरांनी चालवले आहे. किंवा डोंबिवलीत आइकॉन.

मांडके यांचं स्वप्नं मोठं असेल. पण जागा,इमारत,स्टाफचे पगार हे सर्व एका माणसाच्या हाताबाहेर आहे.
मीही ती पुस्तके वाचली.
--------------
रश्मी बन्सल ची तीन पुस्तके ओनलाइन वाचता येत आहेत https://archive.org/search?query=rashmi+bansal
पण त्यात शाईन ब्राईट नाही. त्यासारखी इतर तीन आहेत. ती वाचणार.

आश्चर्य वाटले. त्यांच्या बायकोने स्वतः त्यांना हेकेखोर, दुराग्रही म्हटले आहे आणि त्या स्वतः एक डॉक्टर असूनही त्यांना कसे नेहमी दुय्यम स्थान मिळाले, कशी तडजोड केली ते लिहिले आहे.
To quote Chicago Mayor Harold Washington "I'm not glad he's dead, but I'm glad he's gone". >>>

हे पुस्तक वाचून आता 10+ वर्षे झालीत मला. पण तेव्हा आवडलेलं हे नक्की. आणि बरचसं अजुनही लक्षात आहे पुस्तक. तेव्हा थोडक्यात नोंद वगैरे करत नव्हते. लेखिकेने/पत्नीने डॉ नीतूंबद्दल त्यांच्या कोलेजजीवनापासून सगळ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात त्यांचं शिक्षण, हुशारी, प्रचंड अभ्यास, मेहनती स्वभाव याबरोबर फटकळ स्वभावाबद्दलही लिहिलं आहे. पुस्तकाची सुरवातच चप्पल घातली काय आणि आवश्यक ड्रेसकोडनुसार बूट घातले काय त्याचा शिक्षण घेण्याशी काय सम्बन्ध अशा अर्थाचं काहीतरी शिक्षकांशीच बोलणं आहे. मला नक्की वाक्य आठवत नाहीयेत.
बाकी त्यांचा प्रेमविवाह, सहजीवन, मोठ्ठ हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न , त्या भूलतज्ञ आहेत बहुतेक आणि त्यांनी हे शिक्षण घ्यावं म्हणून नीतुनीच त्याना सुचवलं असं काहीतरी आठवतंय. तुम्ही कोट केलय त्या आशयाबरोबरच त्याना जेव्हा हार्टअटेक आला तेव्हा त्याना वाचवायला सगळ्यात निष्णात ते स्वतःच होते( डॉ नीतू मांडके) अशा अर्थाचं ही वाक्य होतं. ज्या प्रकारच्या अटेकने ते गेले त्याचा सखोल अभ्यास त्यांनीच केलेला त्या काळापर्यंत. म्हणजे माणूस मूळ हुशार , कष्टाळू, जिद्दी होता त्याबरोबर फटकळही,
थोडा वर्चस्व गाजवणारा स्वभाव असं सगळंच आहे त्यात. त्यामुळं एकंदरीत पुस्तक आवडलंच. आणि कसं असतं खूप हुशार, यशस्वी माणसाची अशीही काही बाजू असतेच. हे मत माझं काही पुस्तकं वाचून झालंय.
इथंच माबोवर, डॉ सुरेश शिंदेंच्या लेखमालेत त्यांच्याविषयी चांगलं ही वाचलंय तत्पर मदतीबद्दल आणि अन्यत्र कुठंतरी त्यांनी पैशांसाठी अडवून धरले असा अनुभवही वाचलाय.

प्रतिसाद मोठा असला तरी उडवू नका.
--------
सामाजिक कार्य म्हणूनही डॉक्टरी व्यवसायाकडे पाहणारेही मी पाहिले आहेत. तर काही एक धंदा म्हणून करतात.
(जागा एकाची,त्यावर **** हॉस्पिटल असे नावही नाही, रिसेप्शन खोलीत कोणते डॉ. ही पाटीही नाही, कन्सल्टिंग रुमच्या दारावरही नाव नाही तरीही पेशंट जातात, फी संपूर्ण रोखीने, ठेवून ओपरेशन केले तर तेही रोखीने असा धंदाही पाहिला आहे.) कृ डिटेल्स मागू नये. कारण आपण नातेवाईक म्हणून थर्ड पार्टी पडतो. कशाला लक्ष घालायचे.)

द डे आॅफ द जॅकल'.
फ्रेडरिक फोरसिथची पहिली कादंबरी. १९७१ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी प्रचंड गाजली. फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष द गाॅल यांच्या हत्येचा हाणून पाडलेला प्रयत्न यावर आधारीत असलेलं कथानक आहे. १९७३ मधे या कादंबरीवर चित्रपटही निघाला. मराठीत याचा पावणेपाचशे पानी अनुवाद स्वाती देशपांडेंनी केलाय (मेहता पब्लि.) पण मधेमधे अतिमराठीपणामुळे वाचतांना ठेचकळायला होतं पण २५० पानांनंतर कथानक थरारकी पकड घेतं व सुुसाटी दमात संपतं.
चित्रपटाला मर्यादा असल्या तरी (एके ठिकाणी प्रसंग बदलवलाय) ब-यापैकी डिटेलिंंग देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पुस्तक वाचून नंतर चित्रपट पहायला मजा येते.
मूळ पुस्तकाचा स्वैर अनुवाद वि स वाळींबेंनी पण केलाय. बहुतेक 'विलक्षण सत्य' या नांवाने. मी वाचलेला नाही पण अगदी ८८ पानांत संपवलंय पुस्तक. हे पुस्तक वाचनालयात दिसलं पण गुगलवर कां दिसत नाहीये हे कळत नाही..
काहीही असो.. डे आॅफ द जॅकल पुस्तक थरारक पाठलाग, शह प्रतिशह वगैरेंचं सुुरेख मिश्रण आहे व मस्त अनुभव देतं.

'द डे ऑफ द जॅकल' अफाट आहे. मूवीमध्ये पिअर्स ब्रॉस्नन जॅकल आहे ना? शोभतो तो.

फ्रेडरिक फोरसिथची बहुतांश पुस्तके वाचनीय आहेत. सुरुवातीला थांगपत्ता लागत नाही काय चाललंय. पण नंतर एकेक धागे दोरे जुळायला लागतात. द नेगोशिएटर, द ओडेसा फाइल्स, आयकॉन पण जरूर वाचा.

वीणा च पात्र फारच गंडलय. शिवाय तिच्या निमित्ताने इतके दिवस अधुन मधुन दिसणारा अनिरुद्ध आता सारखाच दिसणार. हे दोघे मिळून फार पकवतील आपल्याला, थोडे दिवस बघणं बंद करणे हाच एकमेव उपाय.

नेगल- विलास मनोहर

खूप वर्षांपासून वाचण्याच्या यादीत असलेलं पुस्तक.
हेमलकसा प्रकल्पावर रहात असताना डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी सांभाळ केलेल्या प्राण्यांबद्दलचं हे पुस्तक आहे. विलास मनोहर यांनी पूर्वी पुण्यात रहात असताना शिकारी केलेल्या आहेत, अर्थात बेकायदेशीरपणे. अशी व्यक्ती नंतर प्राण्यांच्या सहवासात राहून त्यांच्यावर किती प्रेम करू शकते, याचं हे उदाहरण आहे.

नेगल म्हणजे माडिया भाषेत बिबट्या.
'प्रकाशवाटा' वाचताना काही अनुभव वाचले होतेच.
प्राण्यांच्या सहजीवनाचे अद्भुतरम्य अनुभव (यात मनुष्यप्राणीही आलाच) वाचताना थक्क व्हायला झालं.
माकडं, कुत्रे, ओटर, हरणं, नीलगायी, अस्वल, मगरी, बिबटे, सिंह असे किती तरी प्राणी त्यांनी प्रेमाने आणि निष्ठेने सांभाळले. शिकार केल्यानंतर जर लहान पिल्लं सापडली तर आदिवासी ती पिल्लं प्रकल्पावर आणून देत असत.
विरंगुळा म्हणून सुरू केलेल्या या छंदापोटी या दोघांनी आणि यात सहभागी असणाऱ्या इतरांनीही भरपूर कष्ट केले आहेत, धोके पत्करले आहेत. पण त्याचबरोबर प्राण्यांचं भरपूर प्रेमही त्यांना मिळालं आहे.
एक प्रश्न मात्र 'प्रकाशवाटा' वाचताना पडला होता, तो 'नेगल' वाचतानाही पडला. अजगराला खायला घालण्यासाठी साप पकडून आणणे, सापांना आणि मगरीला खायला घालण्यासाठी बेडूक पकडून आणणे, बिबट्याला खायला घालण्यासाठी डुकरं पाळणे, प्रसंगी रेडा विकत घेऊन तो कापणे यात काही विसंगती नाही का? कदाचित माझं आकलन कमी पडत असेल.
ग्रंथाली प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं हे अकरावं पुनर्मुद्रण आहे. छपाईच्या अक्षरशः असंख्य चुका आहेत! त्या सुधारल्या तर खूपच बरं होईल.

एक प्रश्न मात्र 'प्रकाशवाटा' वाचताना पडला होता
बरोबर.
'झू' बद्दल काही डॉक्युमेंटरी पाहिल्या त्यात अशा गोष्टी सांगितल्या आहेत. प्राण्यांना जोडीदारही लागतात त्यातल्या अडचणी. दोन तीन वर्षांपूर्वी चीनमधील पांडाची पिल्ले पाहण्यासाठी खूप गर्दी होत होती. नंतर ती मेली ते लपवून ठेवावं लागलं होतं. प्राणी पाळणे सोपं नसतं.

मूवीमध्ये पिअर्स ब्रॉस्नन जॅकल आहे ना? नाही. जॅकलच्या भूमिकेत एडवर्ड फॉक्स आहे. सिनेमा 1973 चा आहे.
फोरसिथची फिस्ट आॅफ गाॅड, किल लिस्ट,ओडीसी फाईल्स वाचलेयत. अफगाण वाचायचंय..

अमर गीत
अनुवाद लीना सोहोनी,२००८.
पाने २४०.
बाबा आमटे यांचे जीवनचरित्र.
( Wisdom Song by Nisha Mirchandani, 2006 .The life of Baba Amte.)
लेखिका निशा मिरचंदानी यांनी बाबा (मुरलीधर)आमटे यांच्याशी जवळून संबंध आलेल्या बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. फोटो जमवले आहेत. एकूण चांगलं पुस्तक आहे. वाचनीय पुस्तक.
__________________
पर्यटन सम्राट
राजाभाऊ पाटील यांची स्फूर्तिदायक जीवनगाथा
डॉ. विजय ढवळे
२०१० प्रथम प्रकाशन.
पाने२१०

कारकीर्द आणि किस्से दिले आहेत. फोटो आहेत. राजाभाऊंच्या स्वभाव व शिस्त आणि दिलेला शब्द पाळणे यावर विशेष भर दिला आहे. वाचनीय पुस्तक.

ISBN 978-81-957450-1-2
सैनिक हिमालयाचा. लेखक कर्नल शरदचंद्र पाटील. अनुकेशर प्रकाशन पुणे.

लई भारी पुस्तक आहे. पण फक्त लेखकाकडेच मिळते. दुकानांत विक्रीला ठेवलेलेच नाही. लेखक / प्रकाशकाचा नंबर आहे ९४२०४३५८२१. चौकशी केल्यास मिळेल.

वाचनाची गोडी लागण्यासाठी अतिशय छान उपक्रम.
असाच १ उपक्रम ज्याचा मी सदस्य आहे, तो म्हणजे नाशिकच्या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'चा उपक्रम 'ग्रंथ तुमच्या दारी'. यात तुम्हाला साधारण २५ पुस्तकांची १ पेटी देण्यात येते. साधारण ३ महिन्यांनी ती दुसऱ्या सदस्याबरोबर बदलायची. मराठी वाचनाची गोडी लागावी आणि ती टिकावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: विनायक रानडे
Voice call +919922225777
WhatsApp +919423972394

बाळूच्या अवस्थांतराची डायरी - किरण गुरव

तीन कथांचा हा संग्रह मला अतिशय आवडला. किरण गुरवांच्या 'क्षुधाशांती भुवन' मधल्या कथांसारखं याही कथांमध्ये महत्त्वाचं आहे ते माणसांचं, प्रसंगांचं, ठिकाणांचं, मनोवस्थांचं नेमकं वर्णन. छोट्या छोट्या बाबी सर्वात जास्त महत्त्वाच्या असणं हे काही फक्त शेरलॉक होम्सलाच लागू होत नाही. Happy उदा. वाऱ्याने उलटी होऊन निकामी झालेली छत्री वटवाघळासारखी दिसते, हे अचूक वर्णन आहे. 'खाऊच्या पानांची सर्पिलाकार चळत' म्हटल्यावर ती पानं नजरेसमोर दिसायला लागतात. होस्टेलवर पहिल्यांदा रहायला जाताना जी एक विशिष्ट हुरहुर वाटते, तेव्हाच्या एका क्षणाचं वर्णन ' चार पायांच्या प्राणीसृष्टीतून उठून दोन पायांच्या मानवसृष्टीत अवस्थांतरित होताना माणसाचं जे कायमचं मागं काही तरी हरवून गेलं तसंं भरपूर काय तरी कायमचं आपण मागे टाकलेलं आहे' या वाक्यात लेखक करतो. अशी दाद देण्यासारखी असंख्य वाक्यं या कथांमधे आहेत. पण नुसत्या चमकदार वाक्यांनी चांगली कथा बनत नाही.
'उच्चकपडेविभूषित'सारखे शब्द अधेमधे पेरूनही चांगली कथा बनत नाही. हे शब्द आणि अशी वाक्यं ही मुळातल्या सशक्त कथेला अधिक परिणामकारक बनवतात.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावातला मुलगा दहावी पास होऊन डिप्लोमा करायला कोल्हापूरला येतो या एका वाक्यातलं 'अवस्थांतर' म्हणजे बाळूच्या अवस्थांतराची डायरी ही कथा. पण काय सुंदर फुलवली आहे! बाळू, त्याचे आईवडील, भावंडं, गावकरी, शहरातली माणसं, होस्टेल, झालंच तर पाऊस, हे सगळं डोळ्यासमोर तंतोतंत उभं राहतं, इतकंच नाही, तर माणसांचे गुंतागुंतीचे मनोव्यापारही समोर स्पष्ट दिसतात!
इंदुलकरांची गोष्टही अशीच, इंदुलकरांचे गुंतागुंतीचे मनोव्यापार उलगडून दाखवते. इंदुलकरांना जसे काचेत दस्तुरखुद्द इंदुलकर दिसतात, तसे आपल्यालाही दस्तुरखुद्द आपण दिसून जातो.
'बाजार' कथेतलं बाजाराचं वर्णन आवडलं, पण त्यातला वेडा माणूस मला तरी जरासा उपरा वाटला. त्याच्या बडबडीतला 'पॉईंट' मात्र लक्षात आला आणि आवडला.

एकंदरीत नक्की वाचावं असं पुस्तक. वाचायला मजा आली!!
(या पुस्तकासाठी किरण गुरवांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.)

Pages