मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आशुचँप, पुढच्या दोन भागांत अगदी हेच नाहीये. तुम्हाला जे वाटतंय... म्हणजे पहिला भाग वाचुन आपल्याला पुढे काय व्हायला हवं असं वाटतं ते होणार आहे. पण दुसरा आणि तिसरा भाग नाही वाचलेत तरी चालेल असेल आहेत. पहिला भाग मला आवडलेला. म्हणजे कथा, वातावरण निर्मिती आणि कॅरेक्टर डिटेलिंग फारच भारी वाटलेलं. पण दुसरा आणि तिसरा भाग आता आणलेच आहेत तर वाचू करत संपवले. ती मजा नाही.
चित्रपट तर एकही बघितला नाहीत तरी चालेल असे व्यक्तिशः मला वाटले.
मी सुद्धा ही पुस्तकं खूप उशीरा वाचली. टीन्स मध्ये वाचली असती तर जास्त आवडली असती कदाचित.

मीही घेतलाय दुसरा भाग वाचायला आणि खरं सांगायचं तर मला त्या अरिना आणि कॉम्पितिशन पेक्षा त्यांचे डिस्ट्रिक्ट मधले जगणे, संघर्ष हाच जास्त प्रामाणिक वाटलं आणि भावला
मला अशी आशा वाटलेलं की कुठंतरी ती उद्रेक व्हायला कारणीभूत ठरली आहे तर हाच धागा पुढे नेला जाईल पण लेखिका फारसा त्रास करून न घेता परत तिला गेम्स मध्ये पाठवते हे पाहिल्यावर वैतागलो

ढकलत ढकलत वाचू का मग?
कारण नायिका स्वतः च नारेशन करत आहे
सो ती जिवंत राहणारे हे काय उघड आहे
आता फक्त कसे एवढंच वाचायचं बाकी

तसं नाही. महाभारत ज्यांनी वाचलं आहे त्या वाचकांसाठी आहे पर्व. न वाचलेल्यांना काही कळणार नाही. पण मग जे संवाद दिले आहेत दोन दोन पात्रांमधले ते वाढवलेले वाटतात. उदाहरणार्थ सुरुवातीलाच शल्य राजा आणि सूनेचा संवाद. असेच पुढे आहेत बरेच. आता याची काय मालिका पटकथा करायची आहे?
आपल्याकडे कर्णाच्या मनातून महाभारत आहे. ठीक आहे. पण महाभारतातील प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून उभे केले तर ?
गीता सांगतानाही कृष्ण स्वत:च गोंधळलेला असतो की अठरा तत्त्वज्ञाने सांगतो. दुसरा कुणी असता तर म्हणाला असता "शत्रुपक्षांचे शंख वाद्ये वाजू लागलेत, पुढे जायचं का रथ मागे वळवू लवकर सांग. संध्याकाळी बोलत बसू."

पर्व महाभारतातल्या व्यक्तिरेखा मुख्यत्वे मानवी आहेत असे धरून लिहिलेले आहे. त्यांच्यातले देवत्व बाजूला काढून जे उरेल ते पर्व मधून उतरलय.

पर्व वाचायच्या यादीत आहे. नुकतंच भैरप्पा यांचं उत्तरकांड वाचलंय. ते आवडलं .
आतापर्यंत पुस्तकं नुसतीच वाचत होते. पण हे थोडक्यात लिहून ठेवायची संकल्पना आवडलेली आहे. 2,4 वर्षांपूर्वी वाचलेलं अर्धवट आठवतं , नीट आठवत नाही एखाद्यशी बोलताना आणि उगीच स्वतःवरच चिडचिड होते काय हे आठवत नाही आपल्याला म्हणून .
नुकतंच पुन्हा विस्मरणात गेलेलं ' द रोड' वाचलं.
ग्रे शेड असुनही आवडलेलं पुस्तक आहे हे.
पुस्तकाचे नाव -- द रोड
लेखक -- कॉरमॅक मकार्थी
अनुवाद -- अनिल किणीकर

नजर जाईल तिकडे राखेचं, धुळीचं साम्राज्य, जळालेली झाडे व ओसाड परिसर. नद्या-नाले एक तर प्रचंड थंडीने गोठलेली नाहीतर राख मिश्रित काळं पाणी. महिनोन् महिने प्रवास केला तरी या परिस्थितीत सुधारणा दिसत नाही. अशा बिकट परिस्थितीत 'ते दोघे' प्रवास करतात चालत आणि आपण मूकपणे त्यांच्याबरोबर.
हे जीवसृष्टीवर आलेलं संकट नैसर्गिक की मानवनिर्मित कुठेही समजत नाही. असंख्य माणसं, प्राणी मृत झालेले आहेत. तुरळक मानवजात जगली आहे. त्यातले 'ते दोघे' .जी मानवजात जगली आहे तिला जिवंत तर राहायचंय पण त्यासाठी त्यातलेच 'काहीजण' जिवंत असलेल्यांच्या जीवावर उठलेत. कारण पोटाची भूक. पण सगळेच तसे नाहीत. 'काहीजण' चांगलेही आहेत. आहे त्यात भागवणारे. प्रसंगी उपाशी राहणारे पण मनाच्या गाभ्यात मानवता, चांगुलपणा नैतिकता, सत्व जपणारे. त्यातले 'ते दोघे' या चांगुलपणाला अंतरीची ज्वाला म्हणतात.
"मी तुम्हाला काही विचारू का ?"
" हो विचार ना"
" आपण मरणार आहोत का?"
" पुढे कधीतरी , आता इतक्यात नाही"
"आपण दक्षिणेकडे चाललो आहोत का?" "हो, तिकडे सगळं ठीक असेल"
"सगळं ठीक होईल ना पपा ?"
"हो सगळं ठीक होईल"
" काही वाईट घडणार नाही ना?"
" नाही काही वाईट होणार नाही"
"तुझा माझ्यावर विश्वास नाही का"
"आहे, कारण आपण अंतरीची ज्वाला जपत आहोत"
"होय, आपण अंतरीची ज्वाला जपत आहोत "

हे संवाद थोडाफार बदल होऊन अधून-मधून वारंवार येतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात.
'ते दोघे' म्हणजे आठ-दहा वर्षाचा एक मुलगा आणि त्याचे वडील. त्यांच्याजवळ पुरेसे कपडे नाहीत. बर्फाळ, थंड गार वातावरणात पायात धड पादत्राणे नाहीत. प्रसंगी फाटके कपडे पायाला गुंडाळून ते मार्गक्रमण करतात एक फाटका नकाशा जवळ बाळगत. थंडीच्या जोडीला सतत असलेली अन्नाची वानवा. ते कुपोषित होऊन अतिशय दुबळे झालेले आहेत. वाटत पडझड झालेल्या इमारतींमध्ये, बंकर मध्ये घुसून ते थोडेफार हवाबंद डब्यातील अन्न मिळवतात. एक दोनदा त्यांना सुस्थितीत अन्नपाणी, कपडे मिळतात. मिळालेलं सामान एका कार्ट मध्ये भरून ते पुढे दक्षिणेकडे सरकत राहतात. याबरोबरच एक बंदूक त्यांच्याकडे सतत असते. जिच्यात दोनच गोळ्या आहेत. दुसऱ्या वर झाडण्यासाठी नाही तर नरभक्षकांच्या तावडीत सापडण्यापेक्षा स्वतःला संपवण्यासाठी. मुलालाही ती बंदूक कशी वापरायची हे शिकवलेलं आहे.
वाटेत त्यांना त्यांच्यासारखेच लोक भेटतात. एक 90 वर्षाचा म्हातारा , एक चोर जो त्यांचे गोळा केलेलं फाटकंतुटकं सामान चोरून चाललेला असतो पण हे दोघे त्यांना आपल्या घासातला घास देऊन पुढे जातात. चोराला जीवदान देतात. पुढे मात्र जेव्हा भेटलेला इसम नरभक्षक असावा अशी शंका येते तेव्हा शिताफीने एक गोळी त्या इसमावर झाडतात आणि निसटतात. इथून पुढे एकच गोळी असलेली बंदुक सतत मुलाकडे दिली आहे. या भयानक परिस्थितीत मुलाचं रक्षण आणि दक्षिणेकडे सुरक्षित जरा बऱ्याच ठिकाणी पोहोचणे एवढेच वडिलांचे लक्ष्य आहे. पण विषारी हवेमुळे खोकून खोकून वडिलांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यांना जिथे पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्याआधीच वडिलांचा मृत्यू होतो.
आता मुलगा सैरभैर होतो. काय करावं हे न उमगुन दोन-तीन दिवस तसाच तिथेच राहतो. त्यांच्यासारखं एक भटकणारं कुटुंब तिथे येतं जिथं वडील गेल्यामुळे याचा प्रवास थांबलेला असतो. ते कुटुंबही दक्षिणेला निघालेलं आहे. या कुटुंबातील स्त्रीला या मुलाची काळजी वाटते. पण हे कुटुंब चांगले असेल का? आपण जावं की न जावे या द्विधेत पडलेला मुलगा त्यांना एक प्रश्न विचारतो "तुम्ही अंतरीची ज्वाला जपता का?" अगोदर त्या कुटुंब प्रमुखाला हा छोटा काय प्रश्न विचारतोय ते कळत नाही पण त्याची मनस्थिती ओळखून तो कुटुंबप्रमुख त्याला विश्वास देतो व" होय" म्हणून उत्तर देतो आणि मग हा मुलगा त्या कुटुंबाबरोबर दक्षिणेकडे मार्गस्थ होतो. तिथे पुस्तक संपतं. शेवट ओपन-एंडेड आहे. पुढे काय होतं हे वाचकांवर सोडलय.
तसं बघायला गेलं तर हे ग्रे शेड पुस्तक आहे. वाचक अस्वस्थ होतो. बेचिराख सृष्टी होईल इतकं संकट मानवनिर्मित की नैसर्गिक हे जरी सांगितलं नसलं तरी एक मानवी क्रौर्य समोर येतं. अणूयुद्ध , युद्ध, मानवी संहार झाला किंवा निसर्गाचा समतोल मानवामुळे बिघडून जर अशी परिस्थिती ओढवली तर किती भयावह - भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल याचा विचार अस्वस्थ करतो . त्याचबरोबर पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही माणुसकी, मदतीची भावना , चांगुलपणावरील श्रद्धा, भविष्याविषयी दुर्दम्य आशावाद माणसाला माणूस म्हणून पुढे नेतो. हे पुस्तक वाचून जाणवतं.

ह्या पुस्तकाला 'पुलित्झर' पुरस्कार मिळालेला आहे.

जी मानवजात जगली आहे तिला जिवंत तर राहायचंय पण त्यासाठी त्यातलेच 'काहीजण' जिवंत असलेल्यांच्या जीवावर उठलेत आणि यांच्याकडे एकच गोळी असलेली बंदूक आहे.
पुस्तकाचे हे सार आहे.

EMPRESS : QUEEN VICTORIA AND INDIA by MILES TAYLOR First Published in Marathi by Mehta Publishing House © Miles Taylor 2018

Translated into Marathi Language by Varsha Welankar सम्राज्ञी : महाराणी व्हिक्टोरिया आणि भारत । इतिहासपर अनुवाद : वर्षा वेलणकर

प्रथमावृत्ती : जानेवारी, २०२२ किंमत : ₹६५० P Book ISBN 9789392482434 EBook ISBN 9789392482441 E Books available on: play.google.com/store/books 2

हे ४७० पानांचे पुस्तक,त्यापैकी शेवटची १३० पाने संदर्भाची आहेत.

वाचनालयात मिळालं. पुस्तकात विक्टोरिया राणीबद्दल आणि ब्रिटिश लोकांचे बरेच ऐतिहासिक किस्से दिले आहेत.
वाचत आहे. खूप मनोरंजक आहे. आपल्याला आवडो न आवडो त्या वेळी ( १८५८ -१९०१) काय घडत होते हे वाचता येते

धन्यवाद अस्मिता.
उत्तरकांड वर पण लिहिलंय खरं फार मोठं झालं. म्हणून नाही पोस्टत.
एक विरोधाभास जाणवला मला. आपण जनरली गणपतीच्या देवळात गणपती पूजतो, देवीच्या देवळात देवी वगैरे पण राम मंदिर म्हणलं तर राम ,सीता, लक्ष्मण, मारुती हे सगळे एकत्र येतात. पण प्रत्यक्ष जीवनात राम, सीता, लक्ष्मण एकत्र फार कमी राहिलेत. सीता अपहरण व्हायच्या आधी जे काही वर्षे एकत्र राहिले तेवढाच काळ. नन्तर पुन्हा राजवाडयात परतल्यावर थोड्याच काळात सीता आश्रमात, राम कोसल देशात आणि लक्ष्मण (रामाशी मतभेद होत असल्याने ) शरयू नदीच्या काठी 'सानंद' गावी असे वेगवेगळे च राहिलेत. ना फार नन्तर एकमेकांशी संवाद झाला. पण मूर्तीरूपात मात्र कायम एकत्र ते ही कैक वर्षे.

सीता अपहरण व्हायच्या आधी जे काही वर्षे एकत्र राहिले तेवढाच काळ.
म्हणजे सीतेचा शोध होईपर्यंत आणि युद्ध होईपर्यंत अशोकवनातच.

पर्व - एस. एल. भैरप्पा >>> सध्या वाचतो आहे. पहिल्या १०० पानांत त्या सर्व व्यक्तिरेखा मानवी असणे, चमत्कार नसून काही बुद्धीला पटतील अशी मांडणी असणे इत्यादि गोष्टींमुळे पुस्तक आवडलं होतं. पण काहीकाही वेळा त्यांनी हे प्रकार करताना स्वतःला पटणारे संदर्भ आणि इतिहासातील काही वादग्रस्त सिद्धांत यांची सांगड घातली आहे. तिथे जरा कथेचा पाया डळमळीत होतो. उदा. देव हे उत्तरेकडून आलेले आर्य वगैरे सारखी मांडणी ह्यात आहे. पण जर आर्य त्या भागात राहतच नव्हते, शिवाय आर्य आक्रमणाचा सिद्धांतच चुकीचा असेल तर सगळीच कथा कोसळते. ती कथा वाचताना माझ्या डोक्यात कायम हे विचार होत राहतात आणि त्यामुळे ती एका मर्यादेपुढे पकड घेत नाही. यापेक्षा इरावती कर्व्यांची युगांत जास्त आवडली होती.

कधीतरी भांडारकर प्रा वि सं कृत महाभारताची संशोधित आवृती वाचायची इच्छा आहे. इरावती बाईंनी त्याबद्दल खूप छान माहिती दिली आहे, ती वाचल्यापासून हे डोक्यात आहे.

कमला सुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या कथारूप महाभारताचा मंगेश पाडगावकरांनी केलेला अनुवाद मी वाचला. पण काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. अगदी प्रसिद्ध असे काही प्रसंग त्यात आलेच नाहीत.
सुब्रमण्यम यांचं इंग्रजी पुस्तक नेटवर आहे. प्रस्तावने च्या शेवटी त्या म्हणतात - हे पुस्तक वाचून काहींनी तरी महाभारत मूळ रूपात वाचलं तर हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश सफल होईल.
म्हणजे महाभारताची किती रूपं वाचत राहायची?

तीच तर मजा आहे! केवळ कथा म्हणून वाचायला गेलं तरी कित्येक वेगवेगळी व्हर्जन्स . शिवाय त्या कथांमधून वेगवेगळी इंटरप्रिटेशनस्. प्रत्येक लेखक लेखिकेचा दृष्टिकोन, शिवाय कथेत न आलेला, पण अमुक असं झालं असेल हा कल्पनाविस्तार, व्यक्तींच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे, नवनवीन निघणारे अर्थ इतका मोठा लवाजमा येतो महाभारत म्हणलं की. ते काही एक पुस्तक नाही. यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित्!

हो. पण तुम्ही म्हणता तसं मलाही मूळ महाभारत वाचायचं होतं. भांडारकर संशोधित आवृत्ती. अन्य कोणाची इंटरप्रिटेशन्स नसलेलं.
पण ते वाचता येतं कठीण वाटत़ंय.
महाभारताच्या व्यक्तिरेखांवर आधारित पुस्तकंही क्वचित वाचलीत. उदा: शिरवाडकरांचं कौंतेय. अगदीच निराश केलं.

युगान्त अपवाद.

महाभारताची कथा आपण थोडक्यात आपल्याला समजेल अशी दहा वयाच्या आसपास ऐकलेली असते. मग वीस वयाला थोडी खोलात वाचतो. नंतर त्यावर विचार करायचा असतो. तसंच गीतेचं आहे. लहानपणी काही निवडक सोपे प्रसिद्ध श्लोक आपण ऐकतो. नंतर जरा खोलात वाचतो.
मग पुढे आयुष्यात इतर लेखकांचं / विचारवंतांचं "मला समजलेलं महाभारत /गीता" हे उगाचंच विरंगुळा असतं. पुन्हा हे ग्रंथ वाचायची गरज नसते. तथ्य चार पाच ओळींचंच आपल्या डोक्यात बसलेलं असतं. -
- सामायिक आलेल्या मिळकतीच्या मालकीवरून वारसांतली भांडणं. मिळकतीसाठी मारामाऱ्या कराव्यात का त्यावर पाणी सोडावं.

पर्व'मध्ये सुरवातीला लेखक म्हणतो की तो दक्षिणेतला. उत्तर भागात गेल्यावर तिथे अजूनही बहुपतित्वाची पद्धत मानणारा/असणारा समाज आहे का हे शोधताना उदाहरणं सापडतात. तर अशाच काही विविध महाभारतकालीन गोष्टी आहेत का असा उजेड पाडत शोध थोडक्यात लिहिला असता तर मजा आली असती. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे काही भव्य दिव्य पुराण अवशेष काही विशेष सापडलेले नाहीत. मग समाजातील रूढींचा शोध योग्य वेगळा ठरतो. लग्नाआधी झालेल्या संतानाची सोय कशी करतात (हे मोझेसच्या चरित्रातही येतं. )
महाभारत नव्याने वाचणे उपयोगाचे नाहीच.

Pages