कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना आणि उदय, आभार. Bw

" गते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिंतयेत्
वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते ||"

मूळ धाग्याबद्दल : फोलपणा वगैरे म्हणणार नाही. पण स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. चिमूटभर का होईना स्वतःच काही ना काही करत राहायचं हे परत मनाशी ठसवल.

आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय हे कळलं पाहिजे! एकाच घरातील सहा-सहा लोक कोरोनाने गेले... माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचं होतं का?
एकेकाळी चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठे सापडत नाही आणि सापडलीच तर त्यावर फुल व्हायला माणूस सापडत नाही! कालचक्र खूप मोठं आहे, एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढे एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे. कोरोनाने दाखवून दिलं की, कोणीही सहज मरू शकतो! श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण, पुरूष, स्त्री, वयस्क, मूल, आई, वडील, भाऊ बहीण... जिवंत असलेला प्रत्येकजण अवेळी मरू शकतो हा संदेश या आजाराने दिला!
या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे, या लाटेची दाहकता आपण पाहिली आहे.‌ प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली. पुढील तिसरी, चौथी आणि अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच, तरीही आपण 'मीच मोठा' या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय. शंभर एकर जमीनीचा मालक दहा वीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जळून गेला, शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी गेली एकाकी गेली. ज्याच्या हाकेवर गाव‌ गोळा व्हायचा तो अॅम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्र्वास मिळावा म्हणून तडफडून मेला. असं बोललं जायचं की, याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पुर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच गेला!
जर हे लोक एखाद्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने गेले असते तर विषय वेगळा असता, मनाने स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला, चालता-बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही. बरं जी व्यक्ती गेली ती सहजासहजी नाही तर, ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या अॉक्सिजन अभावी गेली हे किती दु:खद आहे!
मी बघितलंय या सर्वांना शेवटचा श्वास घेताना, शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल? आपली संपत्ती? नातेसंबंध? घर? जमीन? शरीर, कमाई, भविष्य, स्वप्नं... नाव, जात, धर्म? काय आठवलं असेल सर्वात शेवटी? 'फक्त एक... एकच संधी मिळावी, मी माणूस म्हणून जगेल!' असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना?
हे सर्व लिहीताना मी आणि हे वाचताना तुम्ही जिवंत आहात, आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण माणूस म्हणून जगत आहोत का? निसर्ग अधूनमधून माणसाला माणूसपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आतातरी माणुसपण शिकायला काय हरकत आहे की अजून एखाद्या संकटाची वाट बघायचीय?
प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. या काळात वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाचं प्राधान्य माणूस वाचवणं हे होतं आणि राहिल, कदाचित ते आमचं प्रोफेशन आहे म्हणून असेल. ज्यांना माणूस वाचवता येत नाही त्यांना माणूसकी जपता तर नक्कीच येईल! एकदा का ही जाणीव झाली की मग आयुष्यात काय कमवायचं हा प्रश्र्न शिल्लक राहात नाही आणि शेवटचा दीर्घ श्वास घेताना दुसऱ्या संधीची आस लागून राहात नाही...

आज कुठेतरी हे वाचायला मिळाले आणि सर्वप्रथम हा धागा आठवला.

इथे पण पर्यावरण बघून अंमळ वैताग आला . एक वेगळा गृप काढून पयावरण विशयक धागे व चर्चा तिथे हलवा कृपया.

काल एक केस अशी कळली २५ मे ला लग्न झाले तिथेच नवर्‍या मुला सकट सर्व लोकांना लागण झाली व क्वारंटाइन व्हावे लागले पाच तारखेला नवरदेव वारला. वैवाहिक जीवन धड सुरू ही झाले नसेल तर वैधव्याचा शिक्का कपाळी बसला मुलीच्या. हे दु:खद आहे. लग्न थोडे पोस्ट पोन करता आले असते.

हे व्हायलाच पाहिजे ते असायलाच पाहिजे असे घट्ट पूर्वग्रह, धार्मिक तेढ, क्लास डिफरन्सेस ह्या सर्वांंना करोना ने धाब्यावर बस वले आहे. नव्या
पद्धतीने विचार करायची गरज आहे. जन कल्याण, पुरेश्या आरोग्य सेवा व इन्फ्राची गरज जास्त आहे. त्यामुळे युद्ध खोरी व धार्मिक तेढ वाढवणारी वक्त व्ये फोल आहेत हे तथाकथित नेत्यांच्या कधी लक्षात येइल तो सुदिन .

अमा, पियू
आताच्या दोन्ही प्रतिसादांशी वाक्य न वाक्य सहमत.

इथे पण पर्यावरण बघून अंमळ वैताग आला >+१
माझ्या हयातीततरी स्वच्छ आणि कुशल कारभार कधी पाहायला मिळणार नाही हा धडा मिळाला. चार-दोन टाळक्यांनी उड्या मारून काही होत नाही आणि फक्त मनस्ताप येतो वाटयाला. तळापासून अगदी सर्वोच्च पातळीवर व्यवस्थीत लोणी ओरपायचे काम सुरु आहे. पी साईनाथ याना जसे Everybody Loves a Good Drought ह्या पुस्तकाने मॅगेसेसे पुरस्कार मिळवून दिला तसे उद्या कोणी everybody loves a big pandemic असे पुस्तक छापल्यास असा पुरस्कार नक्की मिळेल. या काळात जशी 'थोडीफार' माणुसकी दिसून आली तसे विकृततेचेही बरेच नमुने पाहायला मिळाले. घराजवळ फक्त दूध आणायला गेलेल्या तरुणाला पोलिसाने एवढी मारहाण केली की त्याच्या कानाला मोठी इजा झाली अन त्याचे ऑपरेशन करावे लागले. दुसरीकडे तोच कर्मचारी त्या भागातील अवैध व्यवसायाचे हप्ते गोळा करून वर पाठवत होता. सध्याचे आमचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक हे तसे राज्यसेवेतून प्रमोटी असल्याने त्यांच्याकडून अशीही फार अपेक्षा नव्हतीच पण त्यांनी पूर्णच निराशा केली. पालकमंत्री येड## आहे आणि महसूल मंत्र्याचे नातलग स्वतः वाळू तस्करीत आहेत. ही घुसमट अशीच साचत साचत काही वर्षांनी लोकांच्या विद्रोहाचा वाईट आविष्कार झाल्यास ही सर्वपक्षीय दळभद्री मंडळीच कारणीभूत असणार. जेवढे कोविड योद्धे पाहिले तेवढेच किंवा थोडे जास्त कोविड लुटारू आहेत आजूबाजूला.
बाकी बुद्धांनी जी चार आर्यसत्य मांडली त्यांची प्रचिती आली. आयुष्याची क्षणभंगुरता कायम ध्यानात असायला हवी. जवळच्या लोकांना आपण अनवधानाने गृहीत धरून चालतो पण जेव्हा ते अचानक जातात तेव्हाच हे लक्षात येते. बरेच काही आहे लिहण्यासारखे

बापरे.
कुठला संताप लोकांवर काढत असतील हे लोक?

अमा तुम्ही सांगितलेली लग्नासारखी केस आमच्या एका नात्यात झाली. कोणी मेले नाही पण कोरोनाचा प्रसाद मिळाला सर्वाना.

मी आणि माझा नवरा नात्यातील लग्नाला गेलो नाही त्यामूळे खूप ऐकून घ्यावे लागले. पण काही दिवसांनी लग्नातील उपस्थित लोकांना कोरोना ची लागण झाली तेव्हा हेच लोक आम्हाला फोन करुन नाही आलात ते बरे झाले असे म्हणाले.

अमा, जिद्दु, पॉईंट नोटेड. तुम्हाला वैताग वाटला यासाठी मनापासून सॉरी!
कोरोना काळात ज्या विकासाच्या प्रारूपाने दगा दिला. ज्या विकासाच्या प्रारुपामुळे पर्यावरणाचा विनाश होत आहे आणि या आणि याहून भयंकर आपत्ती आपल्यावर येऊन कोसळण्याची शक्यता आहे त्या महत्त्वाच्या मूळ प्रश्नावर काही लिहिले तर तेच तेच वाचून वैताग येतो याचे थोडे वैषम्य वाटले.
पण या भावनेमागची मानसिकता मी समजू शकते. आणि केवळ मी जिथे तिथे हा विषय आणल्यामुळे या विषयाबद्दल लोकांच्या मनात तिटकारा उत्पन्न होत असेल तर माझे काहीतरी चुकते आहे. जसे ऋन्मेषने सतत शाखा चा उल्लेख करून माझ्यासारख्या कधीकाळी शाखा आवडणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा उबग वाटावा अशी वेळ आणली तशी वेळ मी पर्यावरण या विषयाबद्दल आणू इच्छित नाही. This will be the last thing I would ever want.
पण जसे “सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत. आणि ही जाणीव जोवर आपल्याला होत नाही तोवर ती करून देणे आवश्यक आहे. मीच असे नाही तर इतर कुणीही.
यावर मी विचार करते आहे आणि मला एक उपाय सापडला आहे. यापुढे जर धाग्याच्या शब्दखुणांमध्ये “निसर्ग” “पर्यावरण” “शाश्वत विकास” असे काही शब्द नसतील आणि जर मला त्या विषयातील पर्यावरणाचा मुद्दा मांडायचा असेल तर मी तिथे न लिहिता माझ्या एका स्वतंत्र धाग्यावर लिहीत जाईन आणि त्या धाग्यावरच्या प्रतिसादात केवळ माझ्या धाग्याची लिंक देईन. याने मूळ धाग्यावर diversion होणार नाही आणि त्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने जी चर्चा होईल ती एका ठिकाणी राहील. त्यामुळे हा उपाय मला विन विन वाटतो. असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.
या आधी झालेल्या चर्चा मी एक दोन दिवसांत धागा काढून हलवते. यापुढे माझ्याकडून हे पर्यावरण अवांतर होणार नाही याची काळजी मी घेईनच. जर चुकूनमाकून माझी एखादी अवांतर पोस्ट दिसली तर मला ताबडतोब सांगा. मला वाईट वाटणार नाही.
I don’t care about my own reputation but I do care about what Maayboli members and readers feel about the environment. उजाडले पाहिजे - कोणाच्या आरवण्याने उजाडते आहे याला महत्त्व नाही फारसे!

जिज्ञासा,
तुझी आणि इथे लिहिणाऱ्या 2-3 जणांची पर्यावरण विषयक कळकळ पटते आणि समजतेय.
पण सध्या प्रत्येक धाग्यावर पर्यावरण विषयक प्रतिसाद वाचायला खूप मोठे आहेत.असे 3 प्रतिसाद स्क्रोल केले की मानसिक थकवा येतो आणि तो धागा स्कीप मारला जातो.म्हणजे ज्या अज्ञ/याबाबत जाण आणि कळकळ नसलेल्या लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवायचा आहे, that purpose is defeated.
लोकांना 'या विषयाचा' वैताग येत नाहीये.कोणत्याही धाग्यावर तेच मोठेमोठे प्रतिसाद आहेत याचा वैताग येतोय.
त्यापेक्षा एका डेडिकेटेड धाग्यावर हे विचार आले तर अधिक चांगले.

मी अनु, आपल्या वरच्या प्रतिसादाशी असहमत. अमा, जिद्दू आणि जिज्ञासा यांना जिथे जे वाटते त्यांनी ते लिहले पण कुणी काय कुठे लिहावे हे सरसकट सांगणे मलातरी योग्य वाटत नाही. पटलं तर वाचा अन्यथा स्कीप करा.

जिज्ञासा/बाकी कोणाला दुखावण्याचा किंवा जलवायु परिवर्तन विषयाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता/नसेल इतकेच म्हणेल Happy

फिल्मी, लोकं स्किप मारणार असतील तरी माझा उद्देश साध्य होणारच नाही. आता काय होईल की माझ्याकडून अवांतर न झाल्याने मूळ धाग्यात रसभंग होणार नाही, पर्यावरण या विषयाबद्दल तिटकारा निर्माण होणार नाही, आणि ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांना माझ्या पोस्ट्स वाचता येतील आणि त्यावर चर्चा ही करता येईल.
यात माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेही धोक्यात येत नाहीये. हा पर्याय मी माझ्यापुरता स्वीकारला आहे. मायबोलीवर लोक चार घटका मनोरंजनासाठी येतात याची मला जाणीव आहे आणि यात काही गैर नाही. मी देखील याच उद्देशाने येते. मला पर्यावरणाचा अजेंडा पुश करायचा आहे म्हणून नाही. ती माझी passion आहे आणि मला त्याची जेवढी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी असे वाटते म्हणून मी लिहिते.
जिद्दु, (आणि अमा), no hard feelings! All is well Happy

Oxygen plants, ventilators चे कारखाने, मोठ मोठ्या hospitals मधील ICU units पर्यावरणाला किती हानी पोचवतात हे जाणून घ्यायला आवडेल. पर्यावरणपूरक पद्धतीने Oxygen plants, ventilators चे कारखाने सुरू करता येत नसतील तर ते बंद करावे का? ह्याबद्दल पर्यावरणरक्षकांची मते जाणून घ्यायला आवडतील.
तसच लस निर्मीती करणार्‍या कारखान्यांमधून किती प्रदूषण होते हे ही तपासून घेतलेले बरे.

प्रत्येक वेळी मोठे मोठे वैज्ञानिक प्रतिसाद वाचायच्या मनःस्थितीत वाचक नसू शकतो. मी त्यांना काय व कोठे लिहावे सांगितलेले नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाची व्याप्ती व अर्जन्सी मला माहीत आहे. पण भल्या मोठ्या जागतिक कंपन्या जितके डॅमेज करत आहत तितके सर्व मायबोलीकर मिळून करू शकत नाहीत. त्यांना थोडे अकाउंटॅब ल धरा पेटिशन करा. आम्ही पब्लिक जबाब दा रीनेच वागत आहोत. भाबडेपनाचे वाइट वाट्ते. इतकेच. लिहा हो तुम्ही मला स्क्रॉल डाउन करता येते.

मायबोलीवरच्या भांडणातील फोलपणा कुणाला समजला नाही हे एक नशीब आहे. तसच तिरके बोलण्यातील फोलपणा ही कधी कोणा समजू नये. Wink Light 1 Proud हवं ते घ्या.

सोहा, तुम्ही मला ओळखता का? तुमचं काही नुकसान केलं आहे का मी? इतका विखार कशासाठी? मीही एक सामान्य माणूस आहे. मी व्हिलन नाहीये की या काळात oxygen plants, ventilators, ICU supplies याने पोल्यूशन होतं म्हणून ते बंद करा असं म्हणायला. हा काळ माझ्यासाठीही कठीणच गेला आहे. माझ्याही ओळखीची माणसं कोरोनाला बळी पडली आहेत. माझ्या ओळखीच्या पर्यावरणासाठी उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. मी खूप वेळ रडले तुमचा प्रतिसाद वाचून.
इतक्या घाण पद्धतीने पर्यावरणवाद्यांना portray करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? उपरोधाने लिहिताना देखील काही मर्यादा पाळाव्यात. तुमच्या अत्यंत असभ्य आणि माणुसकीला सोडून विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही. सॉरी.

उदय यांनी असहमतीला दर्शविलेल्या सहमतीला माझी सहमती.

असो, अशा कठीण काळातही साग्रसंगीत लग्न करून सगळ्यांनाच धोक्यात घालणे मूर्खपणाचे आहे.

जिज्ञासा, पर्यावरणाबद्दल जिथेजिथे लिहिले आहेस ते उत्तम लिहिले आहेस. पण हो, ही माहिती विखुरली गेली तर सापडणार नाही पुन्हा. त्यामुळे तु वर लिहिल्याप्रमाणे मुळ धागा व तिथल्या कोणत्या चर्चेमुळे तुला मुद्दा सुचला हे सांगून एकाच धाग्यात लिहिले गेले तर सर्व माहिती एकत्रीत एकाच धाग्यात मिळेल.
ऋन्मेषच्या मांसाहार धाग्यावर पण मस्त मुद्दे मांडले गेलेत. ते पण तिकडे सरकवता आले तर मस्त होईल.

वरच्या ‘आयसीयु कारखाने’ वगैरे प्रतिसादाकडे दुर्लक्ष कर. सोहा यांनी तो प्रश्न का विचारला माहिती नाही पण तुला काय जगात कोणालाच ते व्हावेसे वाटणार नाहीये. सर्वांना तुझी कळकळ माहिती आहे. तु खूप अभ्यास करतेस व इथे लिहितेस त्यामुळे इतरही लोक छान मुद्दे घेऊन येतात, तुझ्याबाजुचे वा दुसर्‍या बाजुचे... सगळेच. त्यात खंड नको पडायला. त्यामुळे तु वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी माहिती आमच्यापर्यंत पोचवत रहा. आम्ही खूपजण सगळेच बाहेरचं सगळं वाचत नसतो त्यामुळे लिहीत रहा.

आपण ईथे चर्चा करून कदाचित जगभरातले चित्र बदलू शकत नाही. कदाचित सर्व समाजाचे विचार बदलू शकत नाही. पण तरीही जो आपला पिंड आहे, जी गोष्ट आपल्याला समाधान देते ती तशीच कायम करत राहावे असे मला वाटते. तुम्ही सर्वांनाच सदासर्वदा खुश ठेऊ शकत नाही Happy

पर्यावरण बदल होऊन पृथ्वीवरून माणूस नष्ट झाला तर मला अजिबात वाईट वाटणार नाही. अगदी हे माझ्या काळात घडलं तरी. माणूस नष्ट होणे पर्यावरणासाठी उत्तमच ठरेल.

फक्त पर्यावरणच नाही, तर इतर अनेक बाबतींत माणसाने माणूसपण कधीच सोडलं आहे. आणि यात सकारात्मक काही होण्याची शक्यता फार धूसर आहे.

माणूस नष्ट झाल्यावर करायचं काय पण त्या उत्तम पर्यावरणाचं? माणूस आहे म्हणून पर्यावरण आहे. तोच नसेल तर पृथ्वी असली काय आणि नसली काय! माणूसपण सोडण्याने सर्वायवल ऑफ फिटेस्ट होणार असेल तर अशी माणूसपण सोडलेलीच माणसं च टिकतील आणि माणूसपण जतन करणारी जातील लयाला.
मला स्वतःला इतकं टोकाचं माझ्या हयातीत काही होईल असं वाटत नाही, पण झालंच तर सर्वायवल महत्त्वाचं का माणूसपण? जगायचं असेल आणि हा असा टोकाचा आर्टिफिशियल बायनरी चॉईस असेल उत्तर सोपं असेल मला वाटतं.
जिज्ञासा ह्याला मानव केंद्रित विचार म्हणेल, पण मला निसर्ग केंद्रित विचार जमत नाही आणि तो आर्टिफिशियल वाटतो. अर्थात निसर्ग आणि मानव हे दोन ध्रुव नाहीत आणि हातात हात घालून चालतात यावर विश्वास आहे.
बाकी कुणाची मनस्थिती नसेल ही पोस्ट वाचयची तर खुशाल तुम्हाला वाटेल ते करा.

रच्याकने: मध्यंतरीच बातमी वाचली की चीन ने सूर्यमध्ये जी फिशन अभिक्रिया होते...दोन हायड्रोजन चे अणू एकत्र येऊन दोघांच्या बेरजेच्या पेक्षा कमी वजनाचा हीलियम अणू तयार होतो आणि वजनातील फरकाची ऊर्जा उत्सर्जित होते... ती प्रयोगशाळेत करून सूर्याच्या तापमानाच्या ८ पट तापमान (120 मिलियन डिग्री सेलशिअस) 101 सेकंदांकराता निर्माण केलं. हे स्वच्छ आणि अपरिमित ऊर्जास्त्रोत तयार होण्याच्या मार्गावरच मोठं पाऊल आहे.
सूर्य १५ मिलियन डिग्रीला आहे तर आठपट कशाला? तर सूर्याला गुरुत्वाकर्षणाचा फायदा होतो, पृथ्वीवरच्या प्रयोगशाळेत तो होणार नाही म्हणून.
आठवलं म्हणून लिहिलं, या धाग्याशी तसा संबंध नाही.

पर्यावरण हा शब्द, ही संकल्पना, ते बदलू नये म्हणून प्रयत्न, त्यात होणारे बदल रिव्हर्स करायची इच्छा आणि प्रयत्न, हे ज्ञान एक पिढीकडून पुढे देणे... इ. इ. फक्त मानव करतो.

माणूस नष्ट झाल्यावर करायचं काय पण त्या उत्तम पर्यावरणाचं? Lol हो अ‍ॅक्चुअली, हे वाचून पटकन हसायला आले. पण माणूसच नसला तर उरले काय मग. मनुष्य जात नष्ट करणे ही उत्तम पर्यावरणाची किंमत असू शकत नाही. गरज पडली तर शे दोनशे हजारेक प्रजातींना संपवू पण मनुष्यजात टिकवणे हेच आपले ध्येय हवे ना, न की पर्यावरण टिकवणे. भले हा स्वार्थी विचार असेल, पण ते सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट नुसार हाच विचार नैसर्गिक आहे ना...

Pages