मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, तुम्ही प्रत्येक धाग्यावर पर्यावरणाचं पिल्लू सोडत असता. तुमची कळकळ स्तुत्य आहे पण तुमचे पर्याय पटत नाहीत. >> यासाठी मनापासून सॉरी! दर धाग्यावर येऊन तेच तेच लिहावे आणि harbinger of doom बनावे अशी इच्छा नाही. यापुढे मी हे टाळायचा प्रयत्न करेन.

de-industrialize, decentralize आणि less automize करायचं म्हणजे नक्की कायकाय करायचं? यंत्रांनी शेती करणं बंद करायचं, फर्टिलायझर्स वापरणं सोडायचं, आणि लोकली प्रोड्युस्ड अन्नच खायचं, असं आहे का? > होय, या दिशेने जाणं अपेक्षित आहे पण यंत्रांचा वापर पूर्णपणे बंद किंवा अगदी आदिमानवाप्रमाणं राहणं असं अपेक्षित नाही. मुळात आपण जे विकासाचं मॉडेल चालवतो आहोत ते चुकीचं आहे. आपण एकरेषीय आणि अमर्यादित वाढीची अपेक्षा असणारं विकासाचं मॉडेल सर्वत्र राबवतो आहोत. कोणतीही कंपनी आपले उत्पन्न year on year कसे वाढेल याचाच विचार करते. अन्न उत्पादन क्षेत्र याला अपवाद नाही. सध्याच्या supply chain based अर्थव्यवस्थेत सर्वात मोठी त्रुटी ही आहे की या मॉडेलमध्ये पर्यावरणाचा होणारा विनाश हा जास्तीत जास्त externalize केला जातो. म्हणजे आपण जेव्हा कोणतेही उत्पादन विकत घेतो तेव्हा त्याची पर्यावरणीय किंमत मोजत नाही. रोजच्या दुधाच्या पिशवीचं पुढे काय होतं याचा खर्च वा जबाबदारी ना चितळे उचलतात ना मी. पण पृथ्वीची एक carrying capacity आहे. आपल्या ग्रहावर मर्यादित रिसोर्सेस आहेत आणि जे नैसर्गिक विकासाचं मॉडेल आहे ते एकरेषीय (linear) नसून चक्राकार (circular) आहे. त्यामुळे कधीतरी आपले विकासाचे मॉडेल काम करेनासे होणार हे उघड आहे. कारण अमर्यादित वाढ ही मर्यादित रिसोर्सेस वापरून होणे शक्य नाही.
यात सुदैवाची एक गोष्ट अशी की पृथ्वीवरचे काही रिसोर्सेस renewable आहेत - उदाहरणार्थ झाडे, प्राणी इत्यादी. बरेचसे अजैविक घटक नॉन-रिन्यूएबल आहेत किंवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत उदाहरणार्थ, जीवाष्म इंधन, खनिजसाठे इत्यादी.
मग काय शक्य आहे? तर आपली जीवनशैली अशा प्रकारे बदलणे ज्यात १. कमीत कमी रिसोर्सेस वापरले जातील. २. जे रिसोर्सेस वापरू त्यात जास्तीत जास्त रिसोर्स रिन्यूएबल असतील. ३. आपल्या विकासात निसर्गाची चक्रे पूर्ण होतील - circular lifestyle असेल.
आता आपण तुम्ही मांडलेला एक एक मुद्दा बघू.

१. यंत्रांनी शेती करणं बंद करायचं का? - संपूर्णपणे नाही. कारण यंत्र कशाला म्हणायचं यावर हे उत्तर अवलंबून आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर हजारो वर्षे होत आलेला आहे आणि त्यात काही गैर नाही. मात्र industrial scale agriculture जिथे हजारो एकरांवर monoculture केलं जातं ते सर्वथा अयोग्य आहे. ते प्रमाण कमी करून छोट्या तुकड्यात विभागलेली polyculture स्वरूपाची शेती ही अधिक शाश्वत असेल.
२. फर्टिलायझर्स वापरणं सोडायचं का? - नाही पण कोणती खतं आणि ती किती प्रमाणात वापरायची यावर प्रचंड नियंत्रण आणण्याची गरज आहे. शिवाय जर जमीन सकस असेल तर वरतून घातलेल्या खतांची आवश्यकता कमी होईल. Monoculture पेक्षा polyculture पद्धतीने शेती केली तर जमिनीची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. आज रासायनिक खतं वापरणं परवडतं कारण ती संपूर्ण industry शासनाकडून मिळणाऱ्या subsidies वर चालते. अर्थात या खतांच्या बेसुमार वापराने जे प्रदूषण होतं त्याची किंमत या खत उत्पादक कंपन्या कुठेही मोजत नाहीत.
३. लोकली प्रोड्युस्ड अन्नच खायचं, असं आहे का? - या विधानामधला “च” काढून टाका. शक्य तितक्या प्रमाणात प्रमाणात ऋतूनुसार आहार खावा. मग त्यात आपोआपच स्थानिक भाज्या आणि फळांना प्राधान्य दिलं जाईल. The staple food should have the shortest supply chain. यातून कमी प्रदूषण होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि विकेंद्रीकरण होईल. भारतात आजही हे सहज शक्य आहे.

तुमच्या घरी येणारं दूध वारणाकाठच्या म्हशीने दिलं असतं. हे दूध संकलित होऊन, प्रकिया होऊन, पाश्चराईझ होऊन, शेकडो किमीचा प्रवास करून दोन दिवसांनी तुमच्या दारात पिशवीबंद होऊन अगदी रास्त दरात येऊन पडतं. हे इंडस्ट्रियलायझेशन शिवाय कसं शक्य होणार सांगा? ते दूध जोगेश्वरीमध्ये पहाटे म्हस पिळून भय्याने सायकल मारत तुमच्या घरी आणून द्यावं अशी अपेक्षा आहे का? आणि हो, ती म्हैस फ्री-रेंज पण हवी तुम्हा पर्यावरणवाद्यांना. म्हणजे अक्ख्या मुंबईला पुरतील एवढ्या म्हशींसाठी जवळपास रॅंचेस असायला हवेत नाही का? दुधाच्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे तुम्हाला बारा महिने रास्त दरात दूध मिळतं आणि वारणेच्या म्हशीचंही दूध वाया जात नाही. ते डॉ. वर्गिस कुरियन वगैरे येडे होते का? >>
Dairy industry चा फूटप्रिंट भयंकर आहे आणि त्याची पर्यावरणीय किंमत आपण लावतच नाही. शिवाय जे रास्त दरात दूध मिळतं ते त्यात शासनाने दिलेल्या सबसिडीचा मोठा वाटा आहे. या सबसिडीचा पैसा आपल्याच खिशातून करावाटे जातो. उद्या काही कारणांमुळे ही supply chain बंद पडली तर काही प्लॅन बी आहे का? वर्गीस कुरियन वेडे नव्हते. त्यांनी सहकाराचे उत्तम मॉडेल उभे केले. दुधासारख्या नाशिवंत पदार्थाचे शेल्फ लाइफ वाढवले. इथवर ठीक आहे पण त्याचे पर्यावरणीय तोटे त्यांनी लक्षात घेतले होते का?

ते दूध जोगेश्वरीमध्ये पहाटे म्हस पिळून भय्याने सायकल मारत तुमच्या घरी आणून द्यावं अशी अपेक्षा आहे का? >> हा सगळ्यात शाश्वत मार्ग आहे. आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण भारतात आजही केवळ २५% दूध पिशवीतून बांधून विकलं जातं. बाकी ७५% दूध हे थेट ग्राहकाला मिळतं. जर संपूर्ण दूध industrial पद्धतीने विकलं गेलं तर त्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि इतर रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध असतील का याचा विचार करा!

मी यातला कोणी तज्ञ नाही पण मला एवढं माहित आहे की पारंपारिक पद्धतीने शेती करणार्‍या आफ्रिकेत भूकबळी जात आहेत आणि इंडस्ट्रियलाईझ्ड पद्धतीने शेती करणार्‍या देशांत अन्नधान्य दुथडी वाहत आहे. >> अमेरिकेत अन्नधान्य दुथडी भरून वाहते यात काही नवल नाही. अमेरिकन डॉलरच्या मोहाने दक्षिण अमेरिकेतून तिथे सर्व शेतमालाचा पुरवठा होत असतो. शिवाय तेथील जमिनीचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर पहा. तरीही तिथली शेती आणि पशुपालन पद्धती अत्यंत अशाश्वत आहे. त्याचे दुष्परिणाम तिथेही जाणवू लागलेच आहेत. आफ्रिकेत गरिबी आणि दुष्काळाची बरीचशी कारणे ही मानवनिर्मित आहेत. अर्थात आफ्रिकेत सर्वत्र दुष्काळ नाही. तो एक महाप्रचंड खंड आहे ज्यात अनेक देश आणि भौगोलीक प्रदेश आहेत. त्यामुळे मी खूप सरसकट उत्तर देते आहे याची मला कल्पना आहे. सविस्तर उत्तर फारच मोठे आणि इथे अनावश्यक होईल. शिवाय मला आफ्रिकेची इतकी माहिती देखील नाही.

भारतात हरित क्रांती अशा गोंडस नावाखाली इंडस्ट्रियलायझेशन येण्यापूर्वी भारत कटोरा घेऊन फिरत असे आणि प्रगत देश गुरांना घालायच्या लायकीचं पीएल४८० वगैरे धान्य भारताला घालत असत. तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या आईवडिलांना विचारा. >> या हरित क्रांतीचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. या पिकांसाठी होणाऱ्या भूजलाच्या प्रचंड उपशामुळे भूजल पातळी शून्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे. खते, कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे आपले जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. तळी, नद्या मृत झाल्या आहेत. रसायनांच्या वापरामुळे जमिनी क्षारपड, नापीक होत चालल्या आहेत. यातील अनेक रसायने ही कर्करोगास कारक आहेत असे सिद्ध झाले आहे. अशी रसायने अन्नाच्या मार्फत दररोज आपल्या पोटात जात आहेत. रासायनिक शेती या अनेक कारणांनी शाश्वत नाही. एवढी मोठी हरितक्रांती झाली तरी शेतकरी का बरे आत्महत्या करतो आहे? तुम्हाला तुमच्या मुलाने शेतकरी बनावे असे वाटते का? हरित क्रांती या गोंडस नावाखाली झालेल्या प्रगतीने भुकेचा प्रश्न short-term सोडवला आणि जोडीला अनेक लॉन्ग-टर्म प्रश्न उभे केले असे वाटत नाही का? हे प्रश्न आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? आणि असेल तर सोडवण्याचा कोणता दुसरा उपाय तुम्हाला सुचतो आहे ते मला वाचायला आवडेल. जर खरोखर बदल करण्याची इच्छा असेल तर थेट शेतकऱ्यांना ग्राहकाशी कमीत कमी अंतरात जोडणारी व्यवस्था उभी केली तर भारतातला छोटा शेतकरी जगेल (decentralize). याशिवाय रासायनिक खते आणि कीटकनाशके यांना मिळणाऱ्या सबसिडीपैकी काही सबसिडी नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाली तर अशा शेतीला चालना मिळेल. आज सेंद्रिय भाज्यांचे दर इतके जास्त का आहेत कारण ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून काहीही सबसिडी मिळत नाही.

तुम्ही बर्‍याच ठिकाणी स्वतःला काँट्रॅडिक्ट करताय असं मला वाटतं किंवा मला तुमचं म्हणणं समजत नसावं. कारण Submitted by जिज्ञासा on 4 June, 2021 - 00:31 इथे तुम्ही जो मुद्दा मांडताय
>>>तुमच्यामते पन्नास वर्षांपूर्वी जी लोकसंख्या होती ती तेवढीच आहे का? जर लोकसंख्या वाढली तर त्याच बरोबरीने गुरांची संख्या देखील वाढली असणारच ना? ती वाढलेली गुरं आधी उपलब्ध असलेल्या जमिनीवरच चरताहेत का? नाही, त्यांच्यासाठी आपण जास्तीची जमीन चराऊ कुरणे म्हणून तयार केली? ही जास्तीची जमीन आकाशातून पडली नाही. या जमिनीवर आधी जंगलं होती, इतर प्राणी रहात होते ती तोडली, इतर प्राणी नष्ट केले आणि मग तिथे गुरांना चारायला गवत लावलं. यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही असं म्हणायचं का?<<<
एकॲक्टली तोच मी मांडला होता, तेव्हा तुम्ही साडेसात अब्ज लोकांना पोसण्याइतकी जमीन, पाणी, आपल्याकडे सहज उपलब्ध आहे आणि निसर्गावर कोणताही अन्याय करता आपण सगळे सुखाने राहू असं म्हणत होतात. तुम्ही मांसाचे फार्मिंग करा नाहीतर धान्याचे, वन्यजमिनीचा र्‍हास तर होणारच आहे. ॲनिमल फार्मिंग करायला तुमच्या मते कदाचित जास्त पाणी लागत असेल, तर मांसाहारच बंद करायचा? >> हेमंत यांचं म्हणणं होतं की गायीगुरांना अतिरिक्त जमीन लागत नाही. त्यासंदर्भात मी फक्त वस्तुस्थिती मांडली जिला मी contradict करू इच्छित नाही. कारण this is the situation we have inherited. पण याचा अर्थ असा नाही की मी या गोष्टी endorse करते आणि या साऱ्या गोष्टी ओके आहेत. आपल्याकडे आजही सर्वांची अन्नाची “गरज” भागवायला नक्कीच पुरेसे रिसोर्सेस आहेत. पण प्रत्येकाला कोणत्याही मौसमात तिन्ही त्रिकाळ हवे ते अन्न उपलब्ध व्हावं ही अपेक्षा पूर्ण करायला आपल्याकडे रिसोर्सेस नाहीत. आपलं विकासाचं मॉडेल मात्र अशी दिवास्वप्नं दाखवतं जी आपल्या १३५ कोटी लोकांना कधीही प्राप्त होऊ शकणार नाहीत.
आपल्याला ही भीती दाखवली जाते की रसायनांपासून दूर गेलो तर आपण भुकेले राहू. तुम्ही हा विचार करायला सुद्धा घाबरता! पण शेजारच्या भूतानने हे करून दाखवले आहे. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे कितीतरी पट सुपीक जमीन आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे.
जर ५० वर्षांत संपूर्ण जमीन नापीक होणे आणि रासायनिक शेतीपेक्षा ७०% (हा arbitarary आकडा आहे) कमी उत्पन्न असा चॉईस असेल तर तुम्ही काय स्विकाराल? जर आपण decentralized, self-sufficient food system असावी असा विचार करायला लागलो आणि आपली धोरणं जर तशी आखली गेली तर हे अशक्य नाहीये. जगासाठी तर एकूण उपलब्ध जमीन बघता सहज शक्य आहे. अर्थात मोदींनी नोटबंदी केली तसं आपण एका रात्रीत सगळी रासायनिक शेती बंद करून सेंद्रिय शेती सुरु करणे हा शुद्ध वेडेपणा ठरेल आणि ते अशक्यच आहे. पण हळूहळू transition करून त्याच्या जोडीला विकेंद्रीकरण करत जिल्हा पातळीवर food self-sufficient सिस्टिम दहा ते पंधरा वर्षांमध्ये साध्य करता येईल. आज आपली जी रेशनिंग व्यवस्था आहे ती centralized आहे आणि केंद्र सरकारच्या हातात आहे. यात खूप ऊर्जा धान्य साठवून ठेवण्यात आणि इकडून तिकडे वाहतूक करण्यात खर्च होते. या मोठ्या गोदामांमध्ये बरेचदा धान्य वाया जाते. त्या ऐवजी प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर ही योजना राबवली गेली तर? यात मोठा अडसर हा भांडवलशाही अर्थव्यवस्था हाच असेल. कारण यात कदाचित GDP न वाढता happiness index वाढेल.

गुरांना खायला प्यायला वावरायला भरपूर जमीन लागते. मी तरी अजून टोलेजंग इमारतींमध्ये गुरांना माणसांप्रमाणे फ्लॅटमध्ये राहताना पाहिलेले नाही.>>> माझाही आधी असाच गोड गैरसमज होता. आपण पितो ते दूध दिवसा हिरव्यागार कुरणात चरणार्‍या, रात्री आकाशातले तारे मोजत झोपी जाणार्‍या गायीकडून येतं असं मला वाटायचं. प्रत्यक्षात आजची बहुतांश गुरं टोलेजंग इमारतींमध्ये नाही पण इनडोअर industrialized गोठ्यामध्ये राहतात आणि समोर आलेलं अन्न खातात. फ्री-रेंज गुरांचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे.
>> जरी गायी गुरं दावणीला बांधलेली असली तरी त्यांचे अन्न पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेती होते. आपली ७० ते ७५% शेतजमीन ही आज गुरांचे खाद्य पिकवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पशुपालनासाठी भरपूर जमीन लागतेच!

मी 'मांसाहार केला तर दहापट अन्न कमी खावे लागेल' असा दावा केला असं आपल्याला का वाटलं? प्रत्येक प्रकारच्या फूड सोर्समधून वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रमाणात मिळतात. मांसातनं मिळणारी प्रथिनं भातात मिळत नाहीत. भाज्यांतनं मिळणारे पोषक घटक मांसात मिळत नाहीत. म्हणूनच फूड पिरॅमिडमध्ये प्रत्येक घटकाला स्थान दिलं आहे. >> बरोबर आहे. मी यापुढे जाऊन असं म्हणेन की पोषणतत्वांबरोबरच अन्नातली विविधता देखील पाहीली गेली पाहिजे. आज संपूर्ण जगात मका, गहू, आणि तांदूळ ही तीनच धान्ये staple food झाली आहेत. त्यांच्या बरोबरीने भारतात millets आणि जगात इतरत्र जी स्थानिक धान्य आहेत ती आहारात यावीत असा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरं म्हणजे मांसामध्ये केमिकल्सचे दहापट मॅग्निफिकेशन होते हे मला पटत नाही. >>
पेस्टिसाईडस सर्वात जास्त वापरली जातात ती मानवाच्या आहारातल्या भाज्या, फळांवर. गुरांच्या चार्‍यावर मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड मारली जात नसावीत. कुठलीही गाय 'हे गवताचं पातं जरा किडलेलं वाटतंय' म्हणून खायचं टाळणार नाही. गुरांच्या शरीरातून मानवी शरीरात जाणार्‍या उदा. rBST इत्यादी केमिकल्सचा कुठलाही तोटा मानवाच्या आरोग्याला होत असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. या थापा जनरली SJW प्राणीप्रेमी, पर्यावरणवादी वगैरे पसरवत असतात.
>> तुमच्या free-range गायीगुरांसारखाच हाही एक गोड गैरसमज आहे की गुरांचा चारा पिकवण्यासाठी कीटकनाशकं किंवा खतं वापरली जात नाहीत. गोठ्यात बांधलेल्या गायीला हा चॉईसच नसतो की तिने काय खावं! या प्राण्यांना खाद्य म्हणून मका, सोयाबीन अशी धान्य उगवली जातात ज्यावर ही सारी रसायनं फवारली जातात. या लिंकवर जाऊन बघा किती मॅग्निफिकेशन होते ते - https://en.wikipedia.org/wiki/Biomagnification. या रसायनांचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. या साऱ्या रसायनांचा परिणाम होत असतो. Many of them are known carcinogens.
यात वाईट गोष्ट अशी की या शेतीसाठी दररोज ऍमेझॉनचे काही लाख वर्षे जुने जंगल तोडले जात आहे. ज्या जंगलांना जगाची फुफुसं म्हणतात अशी वर्षावने नष्ट केल्याचे भयानक दुष्परिणाम आपली पुढची पिढी भोगणार आहे. कदाचित आपणही भोगू.

जगाची लोकसंख्या वाढत जाऊन ११ की १२ अब्जांवर स्थिर होणार असं कुठेतरी वाचलं होतं. पारंपारिक शेतीचे मार्ग एवढ्या लोकसंख्येचं पोट भरायला पुरतील असं वाटत नाही. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राचं आधुनिकीकरण झालं आहे मग शेतीने काय घोडं मारलंय. >> पारंपरिक पद्धतीनेच शेती व्हावी असा दुराग्रह आजिबात नाहीये. रासायनिक आणि अति ऑटोमेटेड large scale monoculture शेती नको असं म्हणणं आहे. आजची आधुनिक हवामान अंदाजाची यंत्रणा, मातीची, पिकाची गुणवत्ता जोखणारी यंत्रणा हे सगळं जरूर वापरलं जावं. शेतकऱ्याला एका app वर आपला माल थेट ग्राहकाला विकता येईल अशी आधुनिक यंत्रणा करा की तयार.

मी अन्नाचे वेगवेगळे सोर्सेस एक्सप्लोअर करावेत म्हणालो ते तुम्हाला हास्यास्पद वाटलं. म्हणजे हजारो वर्षं चालत आलेली आणि हेवी मांसाहारावर आधारलेली आदिवासी, इंडियन्स, एस्किमो (हे बायदवे १००% मांसाहारी होते) यांची जीवनशैली हास्यास्पद! प्रत्यक्षात मांसापलिकडेही जाऊन किटकांचा आहारात समावेश करण्याचे प्रयत्न चालले आहेत. किटकांमध्ये तुफान प्रोटीन्स असतात. रातकिडे, सिकाडाज यांचं पीठ कमर्शियली बनू लागलं आहे, गुगलून पहा. >> हे अन्न ज्यांचे पारंपरिक अन्न आहे त्यांना किंवा त्यांच्या जीवनशैलीला मी हास्यास्पद म्हटलेलं नाही. पण या अन्नाला superfood किंवा असलेच काहीतरी विशेषण देऊन त्याला mainstream capitalist economy मध्ये आणण्याचा प्रयत्न हा हास्यास्पदच नाही तर भयकारी आहे. निसर्गामध्ये असलेलं cicada किंवा इतर रानकिड्यांचं स्थान आणि महत्व न ओळखता त्यांचे उत्पादन करणे ही भयंकर कल्पना आहे. जरी काही लोकांचे ते नैसर्गिक अन्न असले तरी ते कधीही staple food नसणार. त्याचा स्थानिक लोकांनी त्या छोट्या पातळीवर आहारात समावेश करणे वेगळे आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास करणे वेगळे. आज अशा चुकीच्या पैदाशीमधून invasive झालेल्या माशांच्या जातींची उदाहरणं आहेत (ही बातमी पहा: https://www.esakal.com/amp/paschim-maharashtra-news/solapur/catfish-are-...). माओने चिमण्या मारायला सांगितल्यावर काय झालं हे तर माहिती असेलच. तेव्हा निसर्गातल्या गोष्टीत आंधळेपणाने ढवळाढवळ करण्यापेक्षा आपण हजारो वर्षे घालवून ज्या जाती अन्नासाठी आधीच विकसित केल्या आहेत - वनस्पती आणि प्राणी दोन्हीच्या त्याच उत्तम, शाश्वत पद्धतीने अन्न स्रोत म्हणून वापरणं मला अधिक सुरक्षित वाटतं.
I hope I have provided at least some clarity. या पुढची चर्चा माझ्या विपू मध्ये किंवा माझ्या कुठल्यातरी धाग्यावर करूया. धन्यवाद मला माझे मुद्दे मांडण्याची संधी दिल्याबद्दल.

आहे.
>> जरी गायी गुरं दावणीला बांधलेली असली तरी त्यांचे अन्न पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेती होते. आपली ७० ते ७५% शेतजमीन ही आज गुरांचे खाद्य पिकवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पशुपालनासाठी भरपूर जमीन लागतेच!

हा पॉइंट तुम्हाला सोडवाच लागेल.भारतात असे घडतं नाही.भारतात तुम्ही बस नी प्रवास करताना खिडकी मधून शेती बघितली तरी तुम्ही चुकीचे बोलत आहात हे तुमच्या सहज लक्षात येईल .प्राण्यांसाठी ६०ते ७० टक्के जमीन वापरली जाते हे हास्यास्पद आहे.
ऑस्ट्रेलिया,अमेरिका ह्या देशात तसे घडत असेल त्यांच्या कडे जमीन खूप आहे .पण भारतात तसे घडतं नाही.

बाकी तुमचे इतर पॉइंट हे बरोबर च आहेत.
रासायनिक खते ह्याचा जास्त वापर आणि त्यामुळे अन्नधान्य मध्ये विषारी द्रव्य मिळत आहेत ते मानवी शरीराला धोकादायक आहेत.
सतत वर्षभर शेती मधून पीक घेणे आणि पाणी आणि खत ह्यांचा बेसुमार वापर करणे ह्या मुळे जमिनी नापीक होवून उत्पादन घटण्याचीच शक्यता जास्त आहे.
हरित क्रांती नी उत्पादन वाढले पण नक्की कोणत्या घटका मुळे वाढले.
तर महत्वाचा घटक आहे सिंचनाची व्यवस्था .
रासायनिक खत वापरण्या मुळे उत्पादन वाढले असा अर्थ घेणेच चुकीचे आहे उलट जमिनी नापीक झाल्या होत आहेत.
सिंचनासाठी धरण बांधली गेली त्या मुळे त्या भागातील ecosystem चे नुकसान झाले पण दुसऱ्या ठिकाणी जंगल वाढवून आपण ते भरून काढणे आवश्यक होते पण तसे केले गेले नाही.
जमिनीत असलेले पाणी तुम्ही उपसा अगर उपसू नका ते त्याची पातळी कमी जास्त होत असते.
पण उपसा केल्या मुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असेल तर त्याला जबाबदार जलभरणी करणारी यंत्रणा आपण नष्ट केली. हे कारण आहे.
झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात पाणी वाहून देत नाहीत .ते पाणी जमिनीत मुरले की जल पातळी वाढते.
लहान खड्डे घेतले डोंगर दऱ्या मध्ये तर पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होवून जलस्तर वाढतो.
हा प्रयोग महाराष्ट्रात केला गेला आहे आणि तो यशस्वी पण झाला आहे.
पण शेती ला पाणी वापरूच नका असे सांगणे चुकीचे आहे.शेती साठी पाणी गरजेचे च आहे..
जलस्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

सॉरीबिरी म्हणण्याची काही गरज नाही. या पोरकटाने वाद उडवून देऊन मजा बघण्यासाठी नेहमीचीच दारू जरा वेगळ्या बाटलीत भरून धागा काढला होता. काही लोक त्याला बळीही पडले. तुमच्या पोस्टस मुळे उलट धाग्याला जरा बरं वळण मिळालं. असं पॉसिटिव्ह डायव्हर्जन कधीही वेलकम.
बाकीचं नंतर.

त्या मुलीचं काहीच चुकलं नाही. तिला वासाचा त्रास आधीपासूनच होत होता, पण भिडस्तपणा, लहान वयानुसार असलेला बुजरेपणा / मॅनर्सची जाण याखातर ती काही बोलत नव्हती. जेव्हा हा वास माशांचा आहे हे तिला कळलं तेव्हा तिला बोलून दाखवण्याइतकं बळ आलं.
चूक घरच्यांचीच आहे. बर्‍याच लोकांना माशाच्या वासाचा त्रास होतो हे लक्षात घेता 'आम्ही आता मासे तळणार आहोत. तुला चालत नसेल तर तू घरी जा' असं आधीच पोलाईटली सांगायला हवं होतं. >> मोरोबा >> +११११११११११११

अगदी.सहमत
लहानपणी मला आजूबाजूला कोणी एक विशिष्ट पदार्थ केला की वासाने मळमळ होत असे.. आणि नुकतेच काही खाल्ले की उलटी पण होत असे.
तेंव्हा फक्त एवढेच कळायचे की नॉन वेज बनवले आहे कोणीतरी.
नंतर बऱ्याच वर्षांनी ऑफिस च्या cafeteria मध्ये तो वास येऊन मळमळ झाली तेंव्हा लक्षात आले हे ऑमलेट मुळे होते.

टाईमपास धाग्यावर पर्यावरणाची छान चर्चा चालू आहे. जिज्ञासाताई अगदी संयतपणे पर्यावरणाचा मुद्दा मांडत आहेत त्याबद्दल विशेष कौतुक.

भारतात हरित क्रांती झाली शेती उत्पादन वाढले ते फक्त सिंचनाची व्यवस्था झाली म्हणून ,ट्रॅक्टर आले म्हणून नाही.
फक्त विहिरी च सिंचनासाठी वापरल्या जायच्या पण विविध धरण त्या वर कालवे निर्माण झाले आणि शेतीला ल हमखास पाणी मिळू लागले.
दुसरे महत्वाचे कारण उत्पादन वाढण्याचे ते infrastructure .
रस्ते,वीजपुरवठा. ही आहेत.
बाकी हायब्रीड बीज,रासायनिक खत ह्यांना जे कोणी उत्पादन वाढीचे कारण सांगत असेल तर ते अर्धवट माहिती वर आहे.
हायब्रीड बी येण्या अगोदर जे देशी बी बियाणे होते सर्व कड धान्य,ज्वारी,बाजरी,भात ह्याचे बीज अतिशय उत्तम दर्जाचे होते.
ते आता अस्तित्वात नाही.
आणि आताचे संकरित निकृष्ट बीज आणि पाहिले देशी कसदार पीक देणारे बीज दोन्ही मी माझ्या शेतात घेतले आहे.
ह्या वर आरामात चर्चा करू शकतो.
ऐकीव,वाचून मिळालेली ,कोणी तरी सांगितलेली माहिती पेक्षा स्व अनुभव किती तरी पटिने श्रेष्ठ असतो.

तेच देशी बी आणि सिंचन व्यवस्था असा संयोग निर्माण झाला असता तर आज भारत अतिशय दर्जेदार ( फक्त जास्त उत्पादन करणारा नाही ) अन्नधान्य उत्पादन करणारा देश म्हणून जगात अग्रेसर असता
.

जिज्ञासा, तुमचा प्रतिसाद सर्वांगसुंदर आहे. कृपया वेगळा धागा उघडून तिथे तो लिहा म्हणजे त्या अनुषंगाने चर्चा होईल. एका क्लिकवर सर्वकाही मिळते ती स्वर्गनगरी मुंबई सोडून जिथे काहीही मिळवायला कमीतकमी एक तास घाटाचा प्रवास करावा लागतो अशा खेड्यात मी वर्षभर राहतेय, तुम्ही लिहिलेले बरेच मुद्दे एकतर जवळून पाहिलेत किंवा ते प्रश्न आहेत हे जाणवलेय. आपण आपली सध्याची शैली बदलली नाही तर भविष्य भयाण आहे.

हरित क्रांती या गोंडस नावाखाली झालेल्या प्रगतीने भुकेचा प्रश्न short-term सोडवला आणि जोडीला अनेक लॉन्ग-टर्म प्रश्न उभे केले असे वाटत नाही का?>>>
नक्कीच.. म्हणूनच 'हरित क्रांती या गोंडस नावाखाली' हा शब्दप्रयोग मीच वापरला होता. पंजाबातल्या गावांमध्ये फर्टिलायझर्स च्या वापारामुळे कर्करोगाचं प्रमाण भयावह वाढलं हे मीही वाचलं आहे. पण पाल्हाळ टाळण्यासाठी मी त्याचा उल्लेख केला नाही. विकासाची किंमत कुठे ना कुठे तरी चुकवावी लागणारच. आता उपाशी मरायचं की विकासाच्या अनुषंगाने येणारे तोटे झेलायचे याचं उत्तर सोपं आहे आणि हरित क्रांती, तिच्या सर्व दोषांसकट अंगिकारून आपण दिलं. हेही लक्षात घ्या की त्यावेळी भारताची लोकसंख्या चाळीसपन्नास कोटी होती आणि आता अडीच पट झालेली आहे.
आज सेंद्रिय भाज्यांचे दर इतके जास्त का आहेत कारण ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून काहीही सबसिडी मिळत नाही.>>>हे फारच सरधोपट वाटतं. सेंद्रिय भाज्यांचे दर जास्त असण्याला फक्त सबसिडी हेच कारण आहे का? की मुळातच लो एफिशंसी आणि जास्त उत्पादन खर्च याचा त्यात भाग आहे?
जर ५० वर्षांत संपूर्ण जमीन नापीक होणे आणि रासायनिक शेतीपेक्षा ७०% (हा arbitarary आकडा आहे) कमी उत्पन्न असा चॉईस असेल तर तुम्ही काय स्विकाराल?>>>कुठलंही एक टोक न पकडता मध्यममार्ग स्वीकारावा लागेल. २५% दूध पिशवीतून आणि शक्य असेल तिथे म्हणजे ७५% थेट ग्राहकाला (हे मला वाटतं शहरी मार्केट आणि निमशहरी/ग्रामीण मार्केट यांच्यातलं विभाजन असावं) इथे साधला आहे तसा.
आज आपली जी रेशनिंग व्यवस्था आहे ती centralized आहे आणि केंद्र सरकारच्या हातात आहे. यात खूप ऊर्जा धान्य साठवून ठेवण्यात आणि इकडून तिकडे वाहतूक करण्यात खर्च होते. या मोठ्या गोदामांमध्ये बरेचदा धान्य वाया जाते. त्या ऐवजी प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर ही योजना राबवली गेली तर? यात मोठा अडसर हा भांडवलशाही अर्थव्यवस्था हाच असेल. कारण यात कदाचित GDP न वाढता happiness index वाढेल.>>>याबद्दल मला काहीच माहिती नाही म्हणून मी काही बोलू शकत नाही. फक्त काही शंका आल्या. सेन्ट्रलाईझ्ड व्यावस्था याचा अर्थ प्रत्यक्ष गोदामे सेन्ट्रलाईझ्ड असा नसावा ना? आणि हॅप्पिनेस इंडेक्स वगैरे फार गुळमुळीत विधानं वाटतात. असो.
शक्य तितक्या प्रमाणात प्रमाणात ऋतूनुसार आहार खावा. मग त्यात आपोआपच स्थानिक भाज्या आणि फळांना प्राधान्य दिलं जाईल.>>> मान्य आहे.
अमेरिकेत अन्नधान्य दुथडी भरून वाहते यात काही नवल नाही. अमेरिकन डॉलरच्या मोहाने दक्षिण अमेरिकेतून तिथे सर्व शेतमालाचा पुरवठा होत असतो.>>>अमेरिकेतलं सर्व अन्नधान्य दक्षिण अमेरिकेतून येतं ही माहिती साफ चुकीची आहे. बर्‍याच गोष्टी ज्या अमेरिकेत बनत नाहीत उदा. काही फळे आणि भाज्या द. अमेरिकेतून येतात हे खरं आहे. बाकी नॉर्थ अमेरिकेतला शेतीउद्योग चांगलाच स्वयंपूर्ण आहे. कॅनडासारखा फ्रिजिड देश सुजलाम सुफलाम भारताला मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात करतो. अमेरिकेत केळी उगवत नाहीत. कोस्टारिकाकडे फक्त केळी आहेत आणि अमेरिकेकडे डॉलर. 'डॉलरच्या मोहाने' कोस्टारिकाने अमेरिकेला केळी पाठवली नाहीत तर कोस्टारिकाच्या लोकांनी खायचं काय? भुतानसारख्या नखाएवढ्या देशाचं उदाहरण उर्वरित जगाला लागू होत नाही. कारण प्रत्येक देशाचं हवामान, भूगोल, सामाजिक परिस्थिती, लिविंग स्टॅंडर्ड सारखं नाही. भुतानची पॉप्युलेशन डेन्सिटी आहे वीस! भारताची आहे ४५५!!... भुतानचे पर कॅपिटा इन्कम आहे अवघे अडीच हजार डॉलर्स. विचार करा.
मी यापुढे जाऊन असं म्हणेन की पोषणतत्वांबरोबरच अन्नातली विविधता देखील पाहीली गेली पाहिजे. आज संपूर्ण जगात मका, गहू, आणि तांदूळ ही तीनच धान्ये staple food झाली आहेत. त्यांच्या बरोबरीने भारतात millets आणि जगात इतरत्र जी स्थानिक धान्य आहेत ती आहारात यावीत असा प्रयत्न केला पाहिजे.>>>हे मान्य आहे आणि हे व्हायला लागलं आहे. किन्वा, ओट्स यासारखी धान्य आपण आहारात आणू लागलो आहोत. हाच फंडा मांसाहाराला सुद्धा अप्लाय व्हावा.
यात वाईट गोष्ट अशी की या शेतीसाठी दररोज ऍमेझॉनचे काही लाख वर्षे जुने जंगल तोडले जात आहे. ज्या जंगलांना जगाची फुफुसं म्हणतात अशी वर्षावने नष्ट केल्याचे भयानक दुष्परिणाम आपली पुढची पिढी भोगणार आहे. कदाचित आपणही भोगू.>>मान्य आहे. फक्त जंगलतोडीचं सर्व पाप पशुखाद्याच्या माथी मारू नका. पाम ऑईलच्या निर्मितीसाठी आणि इमारती लाकडासाठी बोर्निओच्या जंगलाचा कसा विध्वंस होत आहे पहा.
निसर्गातल्या गोष्टीत आंधळेपणाने ढवळाढवळ करण्यापेक्षा आपण हजारो वर्षे घालवून ज्या जाती अन्नासाठी आधीच विकसित केल्या आहेत - वनस्पती आणि प्राणी दोन्हीच्या त्याच उत्तम, शाश्वत पद्धतीने अन्न स्रोत म्हणून वापरणं मला अधिक सुरक्षित वाटतं.>>>ठीक. फक्त गेल्या हजार वर्षांतली लोकसंख्यावाढ आणि गेल्या एकदोन शतकांतली लोकसंख्यावाढ यांचा हिशोब लावून पहा. खालचा तक्ता वर्ल्डोमीटर्स वरून घेतला आहे.

लोकसंख्येचा शब्दशः स्फोट होतो आहे. हजारो वर्षं चालत आलेली व्यवस्था पुढेही पुरी पडेल असं कोणाला वाटत असेल तर आय ॲप्लॉड देअर ऑप्टिमिझम.

हे अन्न ज्यांचे पारंपरिक अन्न आहे त्यांना किंवा त्यांच्या जीवनशैलीला मी हास्यास्पद म्हटलेलं नाही. पण या अन्नाला superfood किंवा असलेच काहीतरी विशेषण देऊन त्याला mainstream capitalist economy मध्ये आणण्याचा प्रयत्न हा हास्यास्पदच नाही तर भयकारी आहे. निसर्गामध्ये असलेलं cicada किंवा इतर रानकिड्यांचं स्थान आणि महत्व न ओळखता त्यांचे उत्पादन करणे ही भयंकर कल्पना आहे. जरी काही लोकांचे ते नैसर्गिक अन्न असले तरी ते कधीही staple food नसणार. त्याचा स्थानिक लोकांनी त्या छोट्या पातळीवर आहारात समावेश करणे वेगळे आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास करणे वेगळे. आज अशा चुकीच्या पैदाशीमधून invasive झालेल्या माशांच्या जातींची उदाहरणं आहेत (ही बातमी पहा: https://www.esakal.com/amp/paschim-maharashtra-news/solapur/catfish-are-...). माओने चिमण्या मारायला सांगितल्यावर काय झालं हे तर माहिती असेलच. तेव्हा निसर्गातल्या गोष्टीत आंधळेपणाने ढवळाढवळ करण्यापेक्षा आपण हजारो वर्षे घालवून ज्या जाती अन्नासाठी आधीच विकसित केल्या आहेत - वनस्पती आणि प्राणी दोन्हीच्या त्याच उत्तम, शाश्वत पद्धतीने अन्न स्रोत म्हणून वापरणं मला अधिक सुरक्षित वाटतं.>>>

हे मात्र अजिबात पटलेलं नाही. कारण याचा इंडस्ट्रियल फार्मिंगशी काही संबंध नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमध्येच हा इन्वेझिव मासा आपल्याकडे कसा आला ते दिलं आहे (खाजगी व्यक्तींनी फिशटॅंकमध्ये शोभिवंत मासा म्हणून ठेवायला आणलेला नंतर जलाशयात सोडून दिला) हे असले उपदव्याप जगभरात बर्‍याच लोकांनी केलेले आहे. उदा. फ्लोरिडामध्ये पाळीव अजगर लोकांनी जंगलात सोडून दिले आणि आता त्यांचा उपद्रव होतो आहे. ऑस्ट्रेलियात ब्रिटिशांनी उंट आणून सोडले त्यांची आता कत्तल करावी लागत आहे. इंडस्ट्रियल फार्मिंग अशा बेजबाबदार पद्धतीने होत नसावं असा माझा अंदाज आहे. इंडस्ट्रियल म्हटल्यावर 'कंट्रोल' देखिल आलाच. त्या माशांसाठी राखीव असलेल्या कृत्रिम तळ्यांमध्येच त्यांचं संवर्धन होतं, नाही का? किटकांचे फार्मिंग ही काही नवी कल्पना नाही. मधासाठी मधमाशांची पोळी औद्योगिक तत्वावर पाळली जातात ना? कोलंबी, मासे, क्रॉफिशसारखे जलचर यांची मोठ्या प्रमाणावर कृत्रिम पैदास होते. कोलंबी आणि क्रॉफिश हे तर पाण्यातले कीटकच आहे. मी कोलंबीला 'समुद्री झुरळ' म्हणतो! काय तोटा झाला आहे मधमाशांमुळे आणि कोलंबीमुळे? किड्यांचे फार्मिंग प्राचीन काळापासून केले जात आहे. रेशिम कुठून येत होतं? 'किरमिजी' हा शब्द 'कृमीज' या संस्कृत शब्दापासून आला आहे. कारण लाल रंग हा एका किड्यापासून प्राचीन काळापासून बनवला जात असे. वनस्पती आणि प्राणी यांची देवाणघेवाण जगभरात हजारो वर्षांपासून होते आहे. कोलंबियन एक्सचेंजमुळे बटाटा, मिरची, अननस यासारखे कित्येक अन्नपदार्थ जगभरच्या लोकांच्या ओळखीचे झाले. घोडा, डुक्कर यांसारखे प्राणी युरोपियनांनी अमेरिकेत नेले. या सर्वाचा फायदाच झाला. तेव्हा तुमची भीती अनाठायी आहे असं मला वाटतं.

माझं या विषयात शून्य ज्ञान आहे आणि मी जे काही लिहिलं ते ॲज अ लेपर्सन माझ्या तुटपुंज्या वाचनातून आलेलं मांडलं आहे. माझ्याकडे याहून जास्त सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे मी आता या धाग्यावरून रजा घेत आहे. सर्वांना पर्यावरण दिनाच्या बिलेटेड शुभेच्छा!

छान चर्चा चालू आहे. मुळात निसर्ग म्हणजे काय ह्याचाच पुनर्विचार करायची गरज वाटते. माणूस निसर्गाचाच भाग आहे आणि मानव-निर्मित सर्वच गोष्टी निसर्गाच्याच भाग झाल्या ना? मानवाला बुद्धी आणि त्याद्वारे उपकरणे, शेती, वृक्षतोड वगैरे करायची क्षमता ही निसर्गानेच दिली आहे. त्यामुळे माणसाचा र्‍हास होत असेल तर तोही नैसर्गिकच म्हणावा लागेल. अत्याधुनिक उपकरणे नसताना माणसं छोट्या छोट्या रोगांनी मरत होती. त्या उलट आता निसर्गाचा अतिप्रचंड (तथाकथित) र्‍हास होताना मानवसंख्या मात्र प्रचंड वेगाने वाढते आहे. त्यामुळे नक्की कुणाला दोष द्यावा कळत नाही. ह्या सर्वामुळे 'निसर्गावर ताण पडतोय' म्हणजे नक्की कुनावर काय होतंय? असे कित्येक प्राणी आले आणि गेले. पृथ्वीवर होणारी वादळे वगैरे जेवढी वाढली आहेत, त्याने कदाचित मानवासकट बर्‍याच प्राण्यांचा र्‍हास होईल. पण ते होऊ नये ह्याची जबाबदारी मानवाची आहे का?

आधुनिकतेची कास न धरू शकलेल्या प्राण्यांच्या विविध जाती नामशेष होत आहेत. त्याचा त्रास इतर प्राण्यांना आणि मानवालाही होईल, पण त्यावर मानव तोडगा शोधून काढेल की! गरज पडली की मानव आपोआप तोडगा काढण्यासाठी शक्कल लढवतो कारण त्यालाही अस्तित्वाची लढाई लढायचीच आहे. आता प्रश्न हा आहे, की 'आम्ही म्हणतो ती पद्धत अनुसरली तरच ही लढाई जिंकू शकू' हे म्हणणार्‍यांचा. ह्या प्रश्नाचं उत्तर काळच देऊ शकेल.

गरज पडली की मानव आपोआप तोडगा काढण्यासाठी शक्कल लढवतो कारण त्यालाही अस्तित्वाची लढाई लढायचीच आहे. आता प्रश्न हा आहे, की 'आम्ही म्हणतो ती पद्धत अनुसरली तरच ही लढाई जिंकू शकू' हे म्हणणार्‍यांचा >>

त्यांनी एक पद्धत सांगितली आहे. दुसरी पद्धत कुठली आहे? किती लोकांना येणाऱ्या समस्येची जाणीव आहे आणि त्यावर काय उपाय आहे त्यांच्या मते, 'शास्त्रज्ञ काहीतरी शोधून काढतीलच की' या व्यतिरिक्त? अशा दुसऱ्या पद्धती असतील, तर आता एक उपाय सांगणारे त्या पद्धती का स्वीकारणार नाहीत?

"निसर्ग/पर्यावरण वाचवा" असे म्हणणे चूकीचे आहे खरे तर, निसर्गाला काहीही फरक पडणार नाही, तो काहीतरी संतुलन करेल पण त्यात आपण टिकूनच राहू असे नाही. जगात कित्येक जीव नामशेष झाले आहेत.
तेव्हा आपल्याला आणि आपल्या अगदी नजीकच्या पिढ्या वाचवण्याची ही खटपट आहे.

दुसरा मार्ग असेलही, पण तो शोधून पुढे येई पर्यँत सध्या दिसणारा मार्ग तर अवलंबायला हवा.
भारताचे इकॉलॉजिकल फूट प्रिंट सध्या खूप कमी आहे, अमेरिकेच्या तुलनेत. पण आपल्याकडे दारिद्य्र सुद्धा आहे, भूकबळी सुद्धा आहेत, तेव्हा त्यांची सोय करताना हा फूटप्रिंट वाढेलच. पण आपण जागरूक होऊन, आपली अर्थव्यवस्था वाढवताना तो शक्य तेवढा कमी वाढेल हे बघायला पाहिजे.

मोरोबा, झम्पू दामलु, हीरा, साधना, धन्यवाद!
साधना, होय, एक धागा काढला पाहिजे खरा!
मोरोबा, we can keep arguing to no end. कारण आपण दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे बघतो आहोत. तुमचा दृष्टिकोन मानवकेंद्रित (anthropocentric) आहे आणि माझा निसर्गकेंद्रित. You want to continue the business as usual by putting humans first and I want to change that course and put nature first. According to me, when we put nature first, we take care of humans by default. Because what is bad for nature is ultimately bad for humans. Capitalism which runs our lifestyle is human centric. However, many people are looking for alternatives because they have realized that capitalism is not good enough to fight the impending ecological collapse. Rita Hayworth चा हा टेड टॉक नक्की ऐका. यात तिने विकासाची एक वेगळी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=Rhcrbcg8HBw

गरज पडली की मानव आपोआप तोडगा काढण्यासाठी शक्कल लढवतो कारण त्यालाही अस्तित्वाची लढाई लढायचीच आहे. >> हरचंद पालव, दुर्दैवाने तसं होताना दिसत नाहीये. कारण हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे लढाईचा! आपल्याकडे आता फक्त साडेनऊ वर्षं उरली आहेत! मॉडेल्स प्रमाणे २०३० पर्यंत आपल्याला एकूण कार्बन उत्सर्जन शून्यावर आणलंच पाहिजे.
मानव पृथ्वीकर >> +१

Pages