मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुटी कढी आणि टॉमेटो सार एकच पदार्थ ना>> हो दोन्ही एकच.. पण काही जण चिंच घालून बनवतात..मला कोकम जास्त आणि चिंच नावासाठी घातलेलं आणि एक दिवस शिळं असलेलंच आवडतं.

लेखाचा ५०% विषयच मांसाहार हा आहे.. मांस + आहार म्हणजे मांसाहाराच्या रेसिपीज ओघाने येणारच.. धाग्याचा कोणा ना कोणाला उपयोग व्हायलाच पाहिजे

पण काही जण चिंच घालून बनवतात..मला कोकम जास्त आणि चिंच नावासाठी घातलेलं आणि एक दिवस शिळं असलेलंच आवडतं.
>>>
अच्छा, मला आतल्या गोष्टी कळत नाही पण आमच्याकडे माश्यासोबत कोकमच असते. नाहीतर मग कोकमाचे आगूळ. मॅरीनेट करायला तेच वापरतो बहुधा.

फलक से जुदा - तुम्ही शेअर केलेली लिंक
Whether Human Beings Are Vegetarian or Non Vegetarian.
हा वादच व्यर्थ आहे
कारण प्राणी मांस कच्चे खातात
आणि आपण शिजवून खातो
त्यामुळे देवाने आपले आतडे फेफडे दात वगैरे कच्चे मांस खायला बनवलेले नसतील तरी काही हरकत नाही. कारण ते शिजवून खाण्यासाठी नक्कीच पुरेसे असतील.

आणि हो, आपण शाकाहार सुद्धा शिजवूनच खातो. शेतात जाऊन भाज्या चरून आलो असे कोणीही करत नाही Happy

Whether Human Beings Are Vegetarian or Non Vegetarian.
हा वादच व्यर्थ आहे>>+१११
बरेच शाकाहारी प्राणी रवंथ करतात पण मानव करत नाही. आदिमानव आधी शिकार करायचा नंतर शेतीकडे वळला म्हणजे माणसाने कालपरवाच मांसाहार सुरु केला असेही नाही. असे बरेच मुद्दे आहेत.
थोडक्यात काय, तर ज्याला जे पटेल रुचेल त्याने ते खावे.

करतात ना.
गाजर, काकडी,iceberg, आणि बाकी सलाड चरतोच की फक्त घरात

करतात ना.
गाजर, काकडी,iceberg, आणि बाकी सलाड चरतोच की फक्त घरात

आणि हो, आपण शाकाहार सुद्धा शिजवूनच खातो. शेतात जाऊन भाज्या चरून आलो असे कोणीही करत नाही... हो बरोबर मुद्दा पकडला. चिकन आणि मटण पेक्षा मासे माझेही खुप प्रिय आहेत.

प्रत्येकाच्या डोक्यात एक मानसिक टेकडी असते. ती चढून जाताना त्रास होतो. एखाद्या पट्टीच्या मांसाहाऱ्याला बीफ रिब चा पहिला घास घशाखाली जात नाही. किंवा पोर्क/ हॅम वास सहन होत नाही. फार काय तर शाकाहाऱ्याला कोरियन जेवणातल्या फरमेंटेड सावरक्राऊट चा वास देखील सहन होत नाही. घायपाताच्या कोवळ्या फुलांची भाजी चवीने खाणारे लोक आहेत. मधाच्या पोळ्यामधल्या अळ्या किंवा अंडी देखील खातात. कोकणातले उंदीर वा बेडूक खाणारे कातकरी, पाखरे भाजून खाणारे ठाकर व खाचरातल्या उकडलेल्या गोगलगायी अस्सल कोल्हापूरी माणूस पण खाऊ शकणार नाही. सुकी मासळी न आवडणारे लोक आहेत. शेम्बडी बोरे किंवा भोकरे न आवडणारे लोक देखील पाहिलेत. त्यामुळे कोणाला काय आवडतंय आणि काय नाही याची यादी फार मोठी होऊ शकते. नवीन अनुभवाला नाही म्हणणे (आपल्यात असा करत नाही) एक प्रकारचा कन्फॉरमीझम किंवा ठोकळेबाज पणा आहे. हा बऱ्याचदा रूढी परंपरामधून आलेला असतो. बऱ्याचदा तो योग्य पण असू शकतो. उदा. इनुईट पोलर बेअर चा काळीज खात नाही. त्याने अ जीवनसत्वाचा हायपरडोस होऊन मरू शकतो. म्हणून त्यातला कुठला नॉर्म मोडायचा याचा अंदाज घेता आला तर मग नवीन अनुभवांचे एक मोठे जग खुले होते. लहान मुलांना शिकवताना आयुष्यातल्या नवीन अनुभवांना नाही म्हणू नका इतके जरी शिकवले तरी त्यांचे आयुष्य जास्त आनंदात जाईल. किंवा अति तेथे माती. जास्त मांसाहार का वाईट ते शिकवा. पोषणमूल्ये असलेले अन्न कसे बनवायचे ते शिकवा.

काकडी, गाजर , iceberg, आणि बाकी सलाड चरतोच की फक्त घरात >> एवढंच खाऊन कोणी जिवंत राहू शकत नाही... मग गहु, तांदूळ, ज्वारी, बाजरी पण कच्चेच खावेत शाकाहार्‍यांनी.

चिडकू छान पोस्ट

लहान मुलांना शिकवताना आयुष्यातल्या नवीन अनुभवांना नाही म्हणू नका इतके जरी शिकवले तरी त्यांचे आयुष्य जास्त आनंदात जाईल.
>>>>>>>>
एक्झॅक्टली !

हेच तर सार आहे लेखाचे, हेच तर ते मांसाहाराचे वा कुठल्याही आहाराचे संस्कार आहेत Happy

क्रांतीवीरमध्ये नाना बोलतो, ये खून हिंदू का ये खून मुसलमानोंका ये भेद ईन बच्चों के दिमाग मे किसने घुसाया ईस्माईल.. बनाने वालेने भेद नही किया तो तू कौन होता है भेद करने वाला..

निसर्गाने एका सजीवाला दुसर्‍या सजीवाचे अन्न बनवले आहे. जो सजीव हालचाल करतो त्याला खाणे मांसाहार, आणि जो सजीव हालचाल करत नाही त्याला खाणे म्हणजे शाकाहार हे आपणच ठरवले आहे. ठरवायला काहीच नाही, पण यात पापपुण्य, सात्विक-असात्विक कुठेच नाही आले. हे सारे भेद आपणच बनवले आहे.
त्या मुलीच्या डोक्यात घरूनच भरवण्यात आले होते की माश्यांचा वास याक्क असतो, ते आपण खात नाही, खायचेही नसते. म्हणून तो वास माश्यांचा आहे हे कळताच तिला अगदी शिवंशिवं झाले. अन्यथा आपण सारी एकसारखीच माणसे असताना आणि मिळून मिसळून राहत असताना प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असणे समजू शकतो. पण समाजातील एका अख्या समूहाला एखादा वास आवडतो आणि एका समूहाला त्या वासाने मळमळते हे तसेच डोक्यात ठसवल्याशिवाय नैसर्गिकरीत्या शक्य नाही.

आज आपल्या ज्या आहाराच्या सवयी आहेत त्यामागे बरेच आपल्यावर आहाराचे कसे संस्कार झालेत याचा भाग आहे. आज आपण ते सारे सहज बदलू शकत नाही. पण आपल्या मुलांना मात्र त्याच विचारांच्या चौकटीत न बांधता मात्र वर चिडकू म्हणाले तसे नवनवीन अनुभव घेऊ द्यावेत ईतकेच सांगणे आहे.

आम्ही सारे खवय्ये!
छान शाकाहार की मांसाहार छान मीमांसा केली आपण!
खरतर हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे की त्याने काय खावे
अन् काय नाही! मांसाहार करणारे असंयमी,क्रोधी आणि शाकाहार करणारे शांत,सज्जन असा फरक आपणच निर्माण केलेला आहे.आणि हे सर्व तुमच्या DNA वर अवलंबून असते जर तुमचे पूर्वज मांसाहार करत असतील तर तुम्ही आपोआप त्याकडे आकृष्ट होतात,आणि जरी नसतील तर तुम्ही स्वत: नविन गुणसुत्रांची सुरवात करायला काही हरकत नाही जेणेकरून ते तुमच्या पुढील पिढीमध्ये येतील.
एवढच म्हणणेआहे फक्त अति मांसाहार नको! जे खायचं ते आटोपशीर!"अती सर्वत्र व्यर्जतेम्!" आता लेखकाने सांगितले आहे ते पोटाच्या वर खातात! तर मी आधीच बोललो आहे हा ज्याचा- त्याचा प्रश्न! पण आरोग्याची आता हेळसांड कराल तर भविष्यात
त्याचे परीणाम आपल्याला भोगावे लागतील!म्हणून जरा खा जपून!

एवढच म्हणणेआहे फक्त अति मांसाहार नको
हे कुणाचं म्हणणं आहे? ह्याला काय आधार आहे? रशिया आणि जर्मनीचे लोक जेनेटिकली सर्वात स्ट्रॉंग मानले जातात. त्यांचा दैनंदिनी आहार काय आहे? सालमन मासा रोज आहारात समाविष्ट असल्याने ते लोक निरोगी जीवन जगताना अशी एक थियरी आहे.
मांसाहार म्हणजे नुसता तिखट तर्रीदार रस्सा नोहे.

झम्पू दामलू अगदी हेच म्हणायला आलेलो. रोज तर्रीदार मिसळ खाल्लीत तरीही तुमची बँड वाजेल. प्रॉब्लेम आपल्याकडे मांसाहारात नाही तर मसाल्यात असतो. लोकांना मांसाहार म्हटले की तिखट झणझणीत मसालेदार हवे असते. मग अतिचा त्रास होणारच.

लेखातील उल्लेख नुसार ती मुलगी फक्त मासे आहेत हे ऐकल्या बरोबर अस्वस्थ झाली ,ओकर्या काढू लागली .
ती प्रत्येकाची एकाध्या पदार्थ विषयी असलेली तीव्र ना आवड दर्शवते आणि ती सर्वात कोणत्या ना कोणत्या पदार्थ विषयी असते.
माझे म्हणाल तर फुल कोबी ची भाजी समोर दिसली तरी माझी जेवणाची इच्छा मरून जाते.
बिलकुल आवडत नाही मला .एक घास पण मी फुल कोबी खावू शकत नाही.

गोडा सण असला की कुणी आमंत्रण देऊनही जेवायला यायला उत्सुक नसतं तेच तिखट्या सणाला चौघांना आमंत्रण द्या, चाळीस येतात Wink

शाहरूखखान मांसाहारी आहे. तो रोज कोबी आणि कार्ल्याची भाजी भाकरीसोबत खातो. स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर पैकी सई शाकाहारी आहे. ती नुसतं चिकन खाते.
मिथुन चक्रवर्ती शाकाहारी असल्याने तो मासे खातो म्हणून त्याची अ‍ॅक्टींग शाहरूखखानपेक्षा भारी आहे.

Pages