मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.>>++++++१११११११ अगदी बम्मवाक्य..!!

छान

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.>> बरोबर आहे.
चीनी लोकांचा आहार पाहिल्यावर आपल्याही पोटात ढवळुन येऊ शकते.

दुसर्‍यांच्या घरातील आवाज येऊ नये म्हणुन स्वत:च्या घरात साऊंड प्रुफ ग्लास बसवून घेता तसेच इतरांच्या घरातील वास येऊ नये म्हणुन चांगल्या क्वालिटीच्या उदबत्त्या लावाव्यात... मन प्रसन्न रहाते अन इतरांच्या खाण्याबद्दल वाएट-साईट विचार करण्याची सवय सुटते..!!

चांगल्या क्वालिटीच्या उदबत्त्या लावाव्यात...>> आणि उदबत्यांचा खर्च शेजाऱ्याकडे मागावा.

पण वास तर पूर्ण सोसायटी भर फिरतो ना
>>
नाही फिरत. या भ्रामक कल्पना आहेत.
ईतक्या सहज फिरायला लागला असता तर शेजारच्यांच्या शौचालयाचा वास आपल्या घरात नसता का आला?

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही
सेम हियर. बीफ किंवा पोर्क खाणारा कोणी सोसायटी मध्ये रहात असेल तर वरील मता मध्ये काही बदल होणार नाही ही भाबडी अपेक्षा.
मटार-उसळ, बीफ स्टर्ड इन ब्लॅक बीन्स, पोर्क विंदालू - हे सगळं आवडीने खाणार झम्पू.

सेम हियर. बीफ किंवा पोर्क खाणारा कोणी सोसायटी मध्ये रहात असेल तर वरील मता मध्ये काही बदल होणार नाही ही भाबडी अपेक्षा.
>>>>
हो, नक्कीच तरीही मला त्यांच्याशी काही घेणे देणे नसेल.
ईतका हावरट नाहीये मी.
अर्थात स्वतःहून आग्रहाने बोलावले तर मात्र आनंदाने जाईल

वटवाघूळ corona घेवून आला.जरा सांभाळून.
सर्व प्राणी आपले पोट भरण्यासाठी च आहेत हा गैरसमज कोणता तरी विषाणू येवून दूर करेल.

मग शोधा लस, शोधा औषध, शोधा बेड , शोधा ऑक्सिजन .
सर्व शोधाशोध सुरू येईल.
आणि पाव खावून वर्ष भर घरात बसावे लागेल..भाज्या मिळणे पण मुश्किल होईल.

कोण कोणता प्राणी शिजवून खातो ह्याच्या शी कोणाला आक्षेप घेण्याची गरज नाही.
टाळ्या घेणारे वाक्य आहे.
चिनी लोक रानटी जनावर खातात त्या मुळे corona आला ना.
पूर्ण जगाला त्याचा त्रास झाला खाणार चिनी आणि भोगणार जग कोण सहन करेल.
कोणते प्राणी खाण्यासाठी वापरावे ह्या विषयी कडक नियम च बनला पाहिजे .
चिंपाझी नी एडस् आणला आणि लोक स्वर्गीय सुखाला मुकली.

वटवाघूळ corona घेवून आला.जरा सांभाळून.
सर्व प्राणी आपले पोट भरण्यासाठी च आहेत हा गैरसमज कोणता तरी विषाणू येवून दूर करेल.
>>>>
एकतर या सत्यतेची १०० टक्के कोणाला खात्री नाहीये.
दुसरे म्हणजे मी वटवाघूळ खात नाही.
तिसरे म्हणजे मी सर्वच प्राणी ऊठसूठ खात नाही.
चौथे म्हणजे ते छान शिजवूनच खातो. कचाकचा कच्चेच खात नाही.
पाचवे म्हणजे एखादा प्राणी खाल्याने आजार पसरू शकतो हा निकष लावला तर बर्ड फ्ल्यू सुद्धा त्यातलाच आजार झाला. कोंबड्याही खाणे बाद करायला हवे.
सहावे म्हणजे दूध सुद्धा प्राण्यांपासून मिळते ते सुद्धा पिणे बंद करायला हवे.

कोण कोणता प्राणी शिजवून खातो ह्याच्या शी कोणाला आक्षेप घेण्याची गरज नाही.
टाळ्या घेणारे वाक्य आहे.
चिनी लोक रानटी जनावर खातात त्या मुळे corona आला ना.
पूर्ण जगाला त्याचा त्रास झाला खाणार चिनी आणि भोगणार जग कोण सहन करेल.
कोणते प्राणी खाण्यासाठी वापरावे ह्या विषयी कडक नियम च बनला पाहिजे .
चिंपाझी नी एडस् आणला आणि लोक स्वर्गीय सुखाला मुकली.

Submitted by Hemant 33 on 31 May, 2021 - 10:15
वटवाघूळ corona घेवून आला.जरा सांभाळून.
सर्व प्राणी आपले पोट भरण्यासाठी च आहेत हा गैरसमज कोणता तरी विषाणू येवून दूर करेल.
>>>>
एकतर या सत्यतेची १०० टक्के कोणाला खात्री नाहीये.
दुसरे म्हणजे मी वटवाघूळ खात नाही.
तिसरे म्हणजे मी सर्वच प्राणी ऊठसूठ खात नाही.
चौथे म्हणजे ते छान शिजवूनच खातो. कचाकचा कच्चेच खात नाही.
पाचवे म्हणजे एखादा प्राणी खाल्याने आजार पसरू शकतो हा निकष लावला तर बर्ड फ्ल्यू सुद्धा त्यातलाच आजार झाला. कोंबड्याही खाणे बाद करायला हवे.
सहावे म्हणजे दूध सुद्धा प्राण्यांपासून मिळते ते सुद्धा पिणे बंद करायला हवे.

रांगोळी पॅटर्न सेमच आहे. एडीटर बदला.

घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो.
>> माश्यांवर असला प्रेम
फक्त कोकण्येच करतंत
जगात खयं पण गेलं तरी
पापलेटसाठी जीव टाकतंत Proud
मी कोकणी नसले तरी डावीकडे पारकर आणि उजवीकडे शिरवाडकर असे शेजारी आणि ॲाफिसला जाणारी माझी आई ..म्हणजे शाळेतून घरी आले की ह्यांच्यकडेच पडीक असायचे म्हणून मासे खायचे संस्कार माझ्यावर शेजारपाजार्याकडूनच झालेत.. आईला कधी मासे बनवता आले नाहीत आणि जेवण बनवायची फार काही आवड नसल्याने ती शिकलीही नाही.. पण शेजारी रोज मासे बनायचे आणि एक तरी तुकडा माझ्यासाठी बाजूला ठेवायचे.. माश्यासोबत जेव्हा फुटी कडी असायची तेव्हा मी वरपून जेवायचे.. पण नुसतं माश्याचंच जेवण नाही तर मला शेजारच्यांची काळ्या वाटाण्याची आमटी, कैरीचं रायतं , पिठी, खवलेला नारळ घालून बनवलेली डाळ असं सगळंच आवडायचं.. आणि मग मी आईला नेहमीच म्हणायचे आपण कोकणी का नाही ..
पण तिसरीत असताना मी ४-५ वर्षांसाठी नॅनवेज खायचं बंद केलं होतं..कारणही अगदी फाल्तू..एक दादा होता..त्या काळात माझा आयडल होता.. त्याने नॅानवेज सोडलं म्हणून मीही सोडलं होतं.. आता विचार करून हसू येतं पण वाईट नाही वाटत कारण त्या ४-५ वर्षात जितकं नॅानवेज खायचं राहिलं होतं ते पुढच्या १ वर्षातच खाल्लही होतं

गांडूळ,उंदीर, माकड,साप,कोंबडी,बकरी ,बकरा,शेरडी,बोकड,डुक्कर,झुरळ,म्हैस,रेडा, गाई,बैल, उंट,हरीण,रान डुक्कर,गावठी डुक्कर,साळिंदर,वटवाघूळ,कबुतर,रान कोंबडी, ससा,खेकडे,विविध मासे,अजुन विविध पक्षी माणूस खातो सर्वांची नाव पण माहीत नाही.
एवढी variation तर मांसाहारी प्राण्यांच्या आहारात पण नसते.
ह्या वर कहर म्हणजे अर्धवट वाढलेले भूर्ण पण कोणत्या तरी देशात खात असल्याचं बातम्या वाचल्या होत्या.

माश्यासोबत जेव्हा फुटी कडी असायची तेव्हा मी वरपून जेवायचे..
>>>>
फुटी कढी आणि टॉमेटो सार एकच पदार्थ ना, की काही हलकासा फरक वगैरे असतो. कारण आमच्या घरी टोमेटो सार म्हणतात.
आणि अगदी अगदी.. म्हणजे आमच्याकडे माश्याचे वा कोलंबीचेही सार करतात. बरेचदा सारात माश्यांची डोकी टाकतात चव उतरायला.
पण दुसर्‍या दिवशी आईला वा कोणालाही शाकाहार करायचा असेल तर हे टोमेटो सार बेस्ट.
टोमेटो सार भात सोबत बटाट्याच्या भाजीही छान लागते, किंवा अंड्याचे ऑमलेटही मस्त..

मला तर अ‍ॅक्चुअली तो अमली पदार्थच वाटतो. कारण अशी चटक लागते की थांबावे कुठे कळतच नाही. म्हणजे मी अक्षरशा बारा ते चौदा वेळा थोडा अजून थोडा अजून करत भात घेतच राहतो. वर लेखात जे लिहिलेले की मला आवरावे लागते, ते सारभाताबाबतच..

मी आयुष्यात बावीस वर्षे नॉन व्हेज खाल्ले नाही... कधी खावेसे वाटलेच नाही... अमेरिकेत आल्यानंतर एकदा घरात कढई पनीर समजून चिकन करी खाल्ली चुकून रूममेट ने बनवलेली.. एकच घास फक्त... अहाहा... ब्रह्मानंदी टाळी...तो दिवस आहे आणि आजचा दिवस... बावीस वर्षा चे कोंपेनसेशन करून टाकले इतक्या दिवसात.. हजारो किलो कोंबड्या चा फडशा पाडलाय...

Pages