कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, मी बरेच दृष्टिकोन वाचते ऐकते आहे. त्यातल्या मला पटलेल्या दृष्टिकोनाबद्दल माबोवर लिहायला आवडेल. प्रताधिकारासाठी कशी परवानगी मिळवता येईल हे बघते आहे. संक्षिप्त भाषांतरासाठी द्यावा लागणारा वेळ हाही एक मुद्दा आहे.
अर्थात one size fits all solution नसेल हे उघड आहे पण किमान समान मुद्दे आणि मग scaling up च्या ऐवजी scaling out solutions असा विचार मांडला जातोय.
एक कटू quote असं आहे की currently it is easy to imagine end of humans than it is to imagine end of capitalism! That's where we stand today Sad

मग विकासाचे आदर्श मॉडेल कसे असायला हवे ते सुद्धा कोणीतरी लिहा.. >>
एकच मॉडेल सगळी कडे फिट होणार नाही.

ऑफिस/औद्यीगीक भागातच/ लगतच शक्य तितक्या जवळ तिथे काम करणाऱ्यांची वस्ती (काही ध्वनी/वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यात हे अंतर जास्त असेल), मार्केट जेणे करुन कमी वेळात आणि वाहनांचा कमीत कमी वापर करून लोक कामावर पोचतील.

मोठमोठ्या शहरांपेक्षा छोटी सेल्फ सफिशिएन्ट शहरे, गावे.

तू ही यावर विचार, कल्पना मांडू शकतोस.

ज्यांना यात रस आहे त्यांनी ब्रिटिश पत्रकार/
स्तंभलेखक George Monbiot यांचे या विषयावरचे लेख जरूर वाचावेत.
https://www.theguardian.com/commentisfree/video/2012/aug/23/after-capita...

चर्चा फारच छान आणि उच्च (योग्य) पातळीवर चालली आहे. त्याला खीळ पडू नये किंवा ती भरकटू नये, पण भारतीय समाजाच्या एका बेसिक गरजेविषयी किंवा आवश्यकतेविषयी एक कदाचित दुय्यम वाटेल असा मुद्दा मांडावासा वाटतो. :
सरासरी भारतीय मनावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून एका कुंठित जुनाट संस्कृतीचा गंज चढला आहे. तो खसखसून घासून काढून टाकला गेला पाहिजे आणि संस्कृतीचा जो मूळ गाभा, सतत नव उन्मेषशाली असणे, सृजनशील असणे, जगण्याच्या सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या बदलांची दखल घेऊन त्यानुसार स्वत:ला बदलणे, inertia जडत्व टाकून देऊन सभोवतालाला सामोरे जाणे आणि फ्रेंडली टेक ओवर करणे, बदलांचे अन्वयार्थ समजून घेणे, विज्ञाननिष्ठता(सुद्धा) राखणे; तो लख्खपणे उजळवून समोर आणला गेला पाहिजे.
ह्यासाठी अर्थात लोकशिक्षणाचे प्रयत्न नेटाने व्हायला हवेत. होऊ नक्कीच शकतात, पण होताना दिसत नाहीत. उलट आत्मगौरव आणि भूतगौरव नको तितका वाढीस लावला जाताना दिसतो आहे. त्यामुळे सरासरी बौद्धिक गुंगी वाढताना दिसत आहे.

@ मानवमामा, म्हणजेच थोडक्यात विकासाचे विकेंद्रीकरण हा एक ऊपाय आहे. याने फक्त पर्यावरणाच्या र्‍हासाचेही विकेंद्रीकरण होईल की एकूण पर्यावरणाचा विचार करता कमी जास्त फरक पडेल..

..
एक कटू quote असं आहे की currently it is easy to imagine end of humans than it is to imagine end of capitalism! That's where we stand today Sad >>> हो, यातल्या शेवटच्या पिढीचे हाल आहेत Sad तो शेवट किती भयानक असेल कदाचित आपण कल्पनाही करू शकत नाही..

आपल्या श्वास घेण्याने पर्यावरणाची हानी होत नाही. >> हे लाक्षणिक अर्थाने म्हटले होते.
मी जे कपडे वापरतो ते बांग्लादेश, कंबोडिआ, चीन, भारत, मेक्सिको मध्ये बनलेले असतात. घराचं लाकूड ब्रिटिश कोलंबिआ मधुन येते, वाहन तयार करायला वापरलेले भाग अमेरिका, मेक्सिको, कॅनडा यात अनंतवेळा फिरुन शेवटी वाहन तयार होते, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठी उपकरणे मलेशिआ, तैवान, चीन मधुन येतात, त्याची जुळणी होताना परत अमेरिका, मेक्सिको, कॅनडा यात अनंत चकरा होतात, खाण्यापिण्याच्या भारतीय गोष्टी परत सातासमुद्रापार भारतातुन आणि त्यावर प्रोसेस ब्रिटिश कोलंबिआ, न्यूजर्सी, टोरांटो मध्ये होउन येतात, इंधन असंच चार राज्ये किंवा तीन समुद्र ओलांडून येते, अन्नाच्या पाकिटांवर अनेकदा लिहिलेही नसते ते कुठे बनले आहे फक्त इंपोर्टेड बाय ... त्यामुळे मला माहितही नाही हे माझ्या पर्यंत यायला किती कार्बन खर्ची पडलेला आहे, जमलं तर वर्षातुन एकदा भारतात विमानाचं इंधन खर्च करुन येतो. वर्षभर जवळपास गाडीने/ विमानाने फिरायचा प्रयत्न करतो, बाहेर राहिलं की तर आपल्या हातात आणखी कमी गोष्टी असतात.
काम करुन पैसे जमवतो, मग रहायला घर घेतो, आणखी पैसे जमले की काय करतो? तर आणखी एक घर भाड्याने देतो, काम तर करतोच आहे सो काही वर्षांनी आणखी पैसे जमतात मग एक अ‍ॅग्रिकल्चरल झोनिंग मधली जमीन घेऊन हॉबी फार्म करतो, आणि शेखी अशी मिरवतो की वा रे कित्ती निसर्गाच्या जवळ गेलो.

मग मी काय करतो? रिड्युस, रियुज, रीपर्पज, रिसायकल करतो, लोकली तयार झालेली फळं भाज्या घ्यायचा उन्हाळ्यात प्रयत्न करतो. अ‍ॅमेझॉन वरुन खरेदी करणे टाळून जवळच्या दुकानातुन आणतो, गरज नसताना काहीही घेत/ वापरत नाही. मारे सगळं कंपोस्ट करतो. याने काय होणार आहे? तर माझं कार्बन फुट प्रिंट आधी १०० असेल तर ते कदचित ९८ होईल, ह्यातही रियुज रिपर्पज तारतम्य वापरुन केलं नाही तर ते कदचित १०२ च होईल.

ग्लोबल वॉर्मिंग साठी काही करायचं असेल तर ताबडतोब अखिल मानव जातीने तो १०० चा आकडा ५० वर नेला पाहिजे. ते असं कमीत कमी तोशिष पडता कसं होणारे? त्यापेक्षा अपवर्ड मोबिलिटीतून जोडोनिआ धन ठेवले तर प्रिव्हलेज क्लास मध्ये राहुन अडचणीला वापरता येईल.
काही सेंट्सला मिळणारी पेन्सिल मेक्सिको आणि चीन वरुन येते!

जिज्ञासा यांच्या सर्व प्रतिसादात भांडवलशाही येते आहे. काही अंशी ते खरे आहे.
पोट भरल्यावर पण खात राहणे ही विकृती आहे. माणसाच्या मुलभूत गरजा भागेल इतकाच विकास असायला हवा. विकासामुळे निसर्ग ओरबाडला जातो. ती हानी पुन्हा कशानेही भरून निघणारी नाही हे ठाऊक असेल तर असा विकास नाकारणे हे सुद्धा मानवाच्या बुद्धीची साक्ष देणारं आहे. बुद्धी आहे म्हणून विज्ञानाचे शोध लावले आणि त्याचा उपयोग मानवी विकासासाठी आम्ही करतो हा बौद्धीक इगो कुरवाळण्यात अर्थ नाही. बुद्धीमान त्याला म्हणायला हवे की आम्ही विज्ञानाचे एव्हढे शोध लावतो पण आमची बुद्धी एव्हढी विकसित आहे की यातले अनेक शोध हे पुढे घातक ठरतील म्हणून ते व्यवहारात उतरवत नाही असे सांगता येणे. हायड्रोजन बाँबचं तत्त्व शिकवा पण तो निर्माण करू नका.

अणुभट्ट्यांची वीज मानवाच्या विकासासाठी आहे हे चुकीचे आहे. अणुभट्ट्यांचा धोका हा सतत मानेवर टांगत्या तलवारीसारखा असतो. शहरांचा विकास झाला तरी त्यासाठी भारतात झारखंड, मध्यप्रदेशातली जंगले उद्ध्वस्त करणे चालू आहे. हिरे, सोने आणि युरेनियमचे शोध लागले आहेत. याची पैशात होणारी किंमत म्हणजे राष्ट्राचा विकास अशी मांडणी होते. पण जे जंगल उद्धस्त होणार आहे ते त्याहीपेक्षा कित्येक पटीने मोलाचे आहे हे कळत असून सांगितलं जात नाही.

विकास एकवटलेला नसावा.
गावागावात प्रत्येकाला काम मिळेल असं विकासाचं विकेंद्रीकरण झालं तर समतोल साधला जाईल.

वैद्यक शास्त्राच्या प्रगतीने सरासरी आयुमान वाढले हे जितके खरे तितकेच त्यामुळे लोकसंख्येचा ताणही वाढला आणि पर्यावरणाचा -हासही होऊ लागला आहे. इतर कोणत्याही प्राण्यांमधे असे झालेले नाही. जितके जीव जन्माला येतील त्या प्रमाणात मृत्यूही होत राहीले तर ताण वाढत नाही. पण जीव जन्माला येतात आणि मृत्यूदरही कमी. विज्ञानाने ही ढवळाढवळ केली आहे. ही थांबवता येणार नाही. कारण कोण म्हणेल मला नाही मरायचं ? त्यामुळे साथीचे रोग येत राहणार.

प्रत्येक गोष्टीची दुसरी, तिसरी बाजू पाहून समतोल साधला गेला पाहीजे. ताण वाढवत सतत धावाधाव करणारी जी लाईफस्टाईल आहे त्यासाठी मनुष्यप्राणी बनलेला आहे का याचंही संशोधन व्हायला हवं. निसर्गाची हानी टाळण्यासाठी आदर्श लोकसंख्या किती हवी याचाही अभ्यास असायला हवा. आपला अभ्यास स्वार्थी आहे. तोकडा आहे.

एका माणसाला ४ घनमीटर हवा तासाला लागते. या डेटावरून मानवजातीच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याला मोकळा आणि स्वच्छ श्वास घेता यावा यासाठी किती दाटी अलाऊड आहे याचा अभ्यास असायला हवा. लोकसंख्येची घनता कितपत सहनेबल आहे हे माहीत असायला हवे. ४० / ५० मजली टॉवर्स एकमेकांपासून किती अंतरावर असायला हवेत, तिथे रस्ते किती रूंद असायला हवेत म्हणजे प्रत्येक घरात किमान माणशी ४ घनमीटर हवा प्रतितास खेळती राहील याचा अभ्यास असायला हवा. आपले नररचनाशास्त्र, वास्तुशास्त्र तसे असायला हवे.

आज वायफायच्या आणि वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात तर शहरात दाटी करून रहायची काहीही गरज नाही हे लक्षात आलेले आहे. तर गावी राहून करता येण्यासारख्या कामांची यादी बनवायला हवी. शहरांवरचा ताण कमी करण्याची ही सुसंधी आहे.

शहरांवरचा ताण हेच डिजास्टर आहे. त्यामुळे ती हलकी होत नाहीत तोवर डिझास्टर मॅनेजमेंट टीम कामाला लागली पाहीजे. म्हणजे भविष्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अघोरी उपाय योजावे लागणार नाहीत.

आपण हे जे काही थोडेफार जीवनशैलीतले बदल करतोय ते का करतोय याची योग्य क्लॅरिटी आली की मग एक सकारात्मक प्रतिसाद (positive feedback loop) दिला जातो. समजा, तुम्हाला असा वर मिळाला की तुझ्या कोणत्याही कृतीने कार्बन फूटप्रिंट वाढणार नाही तर? Will you still pursue this effort? आपले सर्व आयुष्य हे मानवकेंद्रित (anthropocentric) झाले आहे. त्यामुळे आपलं आणि निसर्गाचं काय नातं आहे हे आपण जवळपास विसरलो आहोत. या आपल्या सगळ्या फूटप्रिंट कमी करण्याच्या प्रयत्नाला जर निसर्गप्रेमाची जोड दिली तर त्या गोष्टी कर्तव्य न राहता आनंदाचा भाग बनतील.
आपण दिवसातला काही काळ तरी निसर्गाशी जोडून घेण्यात, संवाद साधण्यात घालवला पाहिजे. आणि त्यासाठी कुठेही दूर जायची गरज नाही. तुम्ही शोधायला लागलात की आजूबाजूला निसर्ग भरून राहिला आहे याची जाणीव होईल. त्याची भाषा कळते का, बोलता येते का? जसे घरी जर कुत्रा किंवा मांजर असेल तर त्याची भाषा आपल्याला सवयीने कळायला लागते तशी निसर्गाची पण कळायला लागते. Once you fall in love with nature, life becomes much more meaningful. जेव्हा समोरचे फुलपाखरू किंवा गवताचे रोपटे आणि आपण समान आहोत याची जाणीव होते तेव्हा मग आपल्या जगण्याची मूल्य आपोआप बदलतात.
मला वाटतं की आपण आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये हे निसर्गकेंद्रित जगणे रूजवू शकलो तर अनेक प्रश्न आपोआप सुटायला लागतील. माझा असा अनुभव आहे की हे निसर्गाशी कनेक्शन एकदा जोडले गेले की मग फार सुंदर प्रवास सुरू होतो!

हे असं काही काळ निसर्गाशी जोडून, त्याची भाषा वगैरे समजून वगैरे घायचं असेल तर मग एकदम सोपं आहे. असे आपोआप प्रश्न सुटणार असतील, सुंदर प्रवास वगैरे सुरू होणार असेल तर मग होऊन जाऊ द्या खर्च. भरल्या पोटीच निसर्ग प्रेम ऑनलाईन बक्कळ मिळेल.
त्याने ढिम्म फरक पडणार नाही ते एक राहू दे, सेल्फी काढून काही तरी केलं हे समाधान महत्त्वाचं.

इकॉलॉजीकल फूटप्रिंट आणि बायोकॅपासीटी बघता आपल्याला आताच १.६ पट पृथ्वी हवी आहे पृथ्वीवरील पर्यावरण वाचवायला.

विकसित देशांना अजून विकास करायचा तर विकसनशील, गरीब देशांना विकसित व्हायचे आहे.
भारतात सुखवस्तू लोक आहेत त्यापेक्षा दारिद्य्र रेषे जवळ (वर आणि खाली) खूप जास्त लोक आहेत ज्यांना बेसिक सुविधाही मिळत नाहीत. गरीब देशात अन्नाचीही मारामार आहे.
यामुळे तेथील लोकांचा इकॉलॉजीकल फुटप्रिंट फार कमी आहे.
यामुळे जगाचा इकॉलॉजीकल फुटप्रिंट कमी आहे. काही वर्षांपूर्वीच्या डेटा नुसार तो २.७५ gha/person आहे. पृथ्वीची बायोकॅपासीटी १.६३ gha/person आहे.

अमेरिकेचा इकॉलॉजीकल फूटप्रिंट 8.22 आहे. (2016)

म्हणजे इतर ठिकाणी लोक दारिद्रय रेषेजवळ आहेत, त्यांना बेसिक सुविधा (अन्न वस्त्र निवारा, आरोग्यदायी वातावरण, आरोग्यसेवा) धड मिळत नाहीय म्हणुन अमेरिका सारख्या देशांना हा मोठा इकॉलॉजीकल फुटप्रिंट परवडू शकतो असे म्हणता येईल का? की माझे काही चुकत आहे?

जर सगळ्या जगाला आजच्या विकासाच्या, अर्थशास्त्राच्या मॉडेल नुसार विकसित व्हायचे आहे तर जगाचा इकॉलॉजीकल फुटप्रिंट 8.22 होईल. आणि बायोकॅपॅसिटी फक्त 1.63. हे कसे शक्य होईल?

जगातील प्रत्येकजण सुखी व्हावा
प्रत्येकाला भरपूर, आवडीचे खायला प्यायला
हवे तेव्हा हवे ते आणि हवे तेवढे कपडे घालायला
रहायला हवेशीर मोकळे घर
प्रत्येक प्रौढव्यक्तीकडे (किमान एक) कार, एखादी अर्धा लिटर इंजिन असणारी बाईक, त्याला लागणारे इंधन/बॅटरीज,
दोन स्मार्टफोन, दोन स्मार्टवॉच, एक लॅपटॉप, एक टॅब्लेट, एक प्रिंटर, येणारे नवनवीन गॅजेट्स, घरात सर्व सुविधा, त्यांच्या वापरला हवी तेवढी वीज, हवे तेवढे पाणी, डीनर सोबत फोडायला एक वाईन बॉटल
असा विकास होणार असेल तर कोणाला नको आहे?
पण त्याने इकॉलॉजीकल फूट प्रिंट दहाच्या वर जाईल आणि आपल्याकडे 1.63 क्षमता असणारी एकच पृथ्वी आहे.
कसं शक्य आहे हे?
असाच (आजच्या व्याख्येनुसार) विकास सुरू ठेवून इकॉलॉजीकल फुटप्रिंट 10 करून लोकसंख्या एक दशांश करायची? ते तर शक्य नाही. जगाचा लोकसंख्या वाढीचा दर आता कुठे १.१% वर आला आहे.

यामुळे चालतय ते चालू द्या, शास्त्रज्ञ आज ना उद्या काहीतरी मार्ग, उपाय शोधतीलच असे म्हणुन चालणार नाही हे लक्षात येतंय.

इकॉलॉजीकल फूट प्रिंट कमी करायला पाहिजे.
नक्की कोणी, कशी, कुठून सुरवात करावी आणि काय काय करावे याचे मार्गदर्शन हवे आहे. पहिली स्टेप जनजागृती एवढं मात्र खरं.
हे प्रचंड मोठ्या स्केलवर व्हायला हवं. भूतान सारख्या छोट्याशा देशाने बरेच काही केले तसे आपापल्या देशातील भौगोलिक स्थिती, रिसोर्सेस, हवामान, लोकसंख्या इत्यादी जे काय असेल पाहून प्रचंड मोठ्या स्केलवर व्हायला हवं.

आकडे सहज गुगलुन मीळवलेले आहेत, तफावत असू शकते, लक्षात आल्यास निदर्शनास आणुन द्या.

व्यत्यय, DJ मान्य आहे, थांबतो.

मला फक्त समस्या कळलीय (असे मला वाटते), उपायांबद्दल काही माहीत नाही. वेगळा धागा काढण्यास जिज्ञासा यांना विनंती करून थांबतो.

अमितव, मानवकेंद्रित मानसिकता ही आपल्या सर्व प्रश्नांच्या मुळाशी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला माणसाने आखलेल्या चौकटीत बसवून हवी आहेत. ही धारणा बदलणं अत्यावश्यक आहे. जोपर्यंत आपण निसर्गकेंद्रित विचार करायला शिकत नाही तोवर उपायांची अंमलबजावणी करणं हे कठीण असणार आहे.

सेल्फी काढून काही तरी केलं हे समाधान महत्त्वाचं.>> निसर्गकेंद्रित विचार करणारा माणूस सेल्फी काढून समाधान मिळवेल ही कल्पनाच हास्यास्पद आहे! सुंदरलाल बहुगुणा सेल्फी काढत बसले होते का? Ecologically aware person thinks and behaves differently.

<< तर माझं कार्बन फुट प्रिंट आधी १०० असेल तर ते कदचित ९८ होईल, ह्यातही रियुज रिपर्पज तारतम्य वापरुन केलं नाही तर ते कदचित १०२ च होईल. >>

----- मागचे काही दशके आपण ऑईल/ नॅचरल गॅस चा भरमसाठ वापर केला आहे आणि त्याने कार्बन फुट प्रिंट कमालीचा वाढला आहे. सर्वात प्रथम तो कमी व्हायला हवा या मधे एकवाक्यता आहे का ? कार्बनचे प्रमाण वाढत आहे पण त्या वाढलेल्या प्रमाणाला मानवजात कारणीभूत नाही, तो बदल (वाढणे/ कमी होणे) नैसर्गिक आहे आणि असे चढ उतार येतच असतात असे मानणारा पण गट आहे.

पुढच्या दोन दशकांत तेला चा वापर आज आहे त्याच्या २० % पर्यंत कमी करायचा आहे (असे मी नाही पॅरिसला ठरले :स्मित:) आणि पर्यायी उपलब्द ऊर्जेच्या स्त्रोतांचा वापर वाढवायचा आहे. या पर्यायांत प्रामुख्याने wind, solar हेच अग्रेसर आहेत. हायड्रोजन fuel cell कडे जग आशेने पहात आहे. चेर्नोंबिल, फुकुशिमा मुळे nuclear energy बद्दल भिती आहे.

आता wind, solar energy तयार होतांनाही काही प्रमाणांत कार्बन फुट प्रिंट येणार आहेतच. या प्रकारच्या ऊर्जा उद्योगाला (प्रामुख्याने बॅटरीज, स्टोरेज) लागणारे धातू तसेच प्लॅस्टिक mining उद्योगातूनच मिळणार आहेत जे प्रदुषणांत तसेच कार्बन फुट प्रिंट मधे भर घालणार आहे (म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या.... ). त्या उद्योगांतही fossil fuel चा वापर कमी करण्याकडे कल वाढतो आहे.

आपण fossil fuel to renewable energy अशा प्रवासाचे / बदलाचे साक्षिदार ठरणार आहोत. आज आपल्याला जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्या ( plastic pollution) पडलेल्या दिसतात. पुढच्या काळांत रस्त्याच्या दुतर्फा wind turbine चे तुटलेले तुकडे, आणि मोडकळलेले solar panels पडलेली दिसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. Happy

उदय, तुमचं लक्ष कार्बन फुटप्रिंटवर केंद्रीत होतंय. मला वाटतंय जिज्ञासा यांचा मुद्दा अधिक व्यापक आहे.

>समजा, तुम्हाला असा वर मिळाला की तुझ्या कोणत्याही कृतीने कार्बन फूटप्रिंट वाढणार नाही तर? Will you still pursue this effort?

मी समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय पण त्यांच्या अलंकारीक प्रतिसादांमध्ये काही ठोस हाताला लागत नाहिये. नक्कीच माझ्या बुद्धीचा दोष आहे.
खुप चांगली चर्चा आहे, पण प्लिज कोणी वेगळा धागा काढेल का?

व्यत्यय, बरोबर आहे. ग्रीन हाऊस गॅसेस मुळे होणारी तपमानवाढ हा संपूर्ण समस्येचा एक दृश्य भाग आहे.
मी आधी लिहिलेल्या लेखात जे planetary boundaries च्या सद्यस्थितीचं चित्र आहे त्यात पाहीले तर लक्षात येईल की हा प्रश्न किती पातळ्यांवर गंभीर आहे हे. केवळ कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर भर दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही. खाली लेखाची लिंक देते आहे. तिथे याची चर्चा करता येईल.
शाश्वत विकास म्हणजे काय? भाग १
https://www.maayboli.com/node/75247

भरल्या पोटीच निसर्ग प्रेम ऑनलाईन बक्कळ मिळेल. >>> आजवर गरीबांसाठी केलेल्या कामांची यादी द्यावी प्लीज. १९९१ च्या आर्तिक सुधारांनंतर गरीबी आणि श्रीमंती यातली दरी वाढत चालली आहे. आपल्याला गरीबांची कणव आली म्हणून आपण या सर्वांना विरोध केला असेलच. त्या प्रयत्नांची माहिती द्या प्लीज. सर्वांनाच ऑनलाईन चर्चा न करता प्रात्यक्षिकं करून भरल्या पोटी निसर्ग प्रेम कसं मिळवणे चुकीचे आहे याचा बोध होईल.

आपण जीवनशैलीमध्ये बदल करायचा असं नेहमीच नसतं. बरेच वेळा आपल्या नकळत आणि अनेक वेळा मनाविरुद्धही आपल्यात (देहात-मनात ) बदल घडत असतात. आपण निसर्गाचा, सभोवतालचा भाग आहोत. तिथे जे जे घडतं त्यानुसार मेंदूकडून संदेश जातात आणि वर्तन/वृत्ती/भाव/वागणूक यात बदल घडतात. असं सतत होत राहिलं तर तसेच बदल घडवण्याची शिकवण मिळते.
मानवाने मंचावरची भूमिका घेऊ नये. जसा निसर्गनाशाचा मक्ता मानवाकडे नाही तसाच निसर्गसंवर्धनाचाही नाही. निसर्ग अतिविशाल आणि अतिसूक्ष्म आहे. त्याच्यापुढे मानव स्वतः: आणि त्याचे चिंतन अगदी खुजे, थिटे, तोकडे आहे. वरती कोणीतरी मांडले आहे तसे गरजेपुरते घ्यावे निसर्गाकडून. आणि गरजा वाढल्या तर अधिकाधिक घेत राहावे लागणार. कालवे काढावे लागणार, नद्यांचे पाणी वळवावे लागणार, पूल बांधावे लागणार. फॉसिल फ्युएल नाहीतर chemical fuel वापरावे लागणार.
सगळ्याच बाबींचे विकेंद्रीकरण शक्य नाही. उलट समूहासाठी एकत्रितपणे कमी स्रोत संसाधने वापरता येतात. सोयीसुविधा, संरक्षण, दळण वळण इत्यादि पुरवणे सोपे जाते.
म्हणून फार पुढच्या भविष्याचा विचार किंवा प्लॅनिंग करून उपयोग नाही. बदल वेगाने घडतात आणि आपले चिंतन त्या वेगाबरोबर धावू शकत नाही. बदल सूक्ष्मतेने आणि मंदगतीनेसुद्धा घडतात. निसर्गाचा हा अतिखर्जातला आवाज टिपण्यासाठीही मानवी मेंदू सक्षम नाही. जरी तोही निसर्गाचाच भाग असला तरीही. कारण एका मानवी आयुष्यात हे बदल दृष्टोत्पत्तीस येत नाहीत.
.

जिज्ञासा यांनी लिंक दिल्यानंतरचे दोन प्रतिसाद त्या लिंकवर चिकटवले आहेत. कृपया पर्यावरणाची पुढची चर्चा तिथे करा.

कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

>> एरवी कोणी अचानक वारल्याची बातमी ऐकून काही दिवसांपुरता 'सगळं क्षणभंगूर आहे' हा झालेला साक्षात्कार हल्ली रोज एक कोणीतरी गेल्याचा फोन येतो तेव्हा कायमचाच झालेला आहे. धाग्याच्या सुरुवातीलाच रश्मी यांनी 'चढता सूरज धीरे धीरे..' ची लिंक दिली आहे. पूर्वी लोकांना हे कव्वाली गाऊन सांगावे लागायचे. लोक तेवढ्यापुरते ऐकून विसरून जायचे. आज कोरोनाने मानगुटीवर बसून एकदाच 'नीट' समज दिली आहे. Sad

आज कोरोनाने मानगुटीवर बसून एकदाच 'नीट' समज दिली आहे. >> अगदी खर आहे पीयु.

मला अजुन एक फोलपणा कळाला.. जिंदगी मे कई लम्हे गुजारे जिम मे जाकर बॉडी बनाने में... लेकिन पता तोह अब चला के अ‍ॅंटीबॉडी बनानी थी...!!

Pages