अभियांत्रिकीचे दिवस- भाग ९

Submitted by पाचपाटील on 9 March, 2021 - 22:50

हॉटेल 'जिव्हाळा' (मेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपये)

त्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच चांगली पडलेली...! आणि शिवाय बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फार अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.
अर्थात, त्यावेळी व्हाईट मिसचीफ व्होडका, साधं पाणी आणि उदाहरणार्थ चणा-डाळ वगैरे कांदा मिक्स करून, एवढंच परवडण्यासारखं होतं..! 
आणि व्होडकाही समजा स्वस्तातला आणि पिण्याची पद्धतही समजा रानटी, घपाघप आणि 'टॉप टू बॉटम' वगैरे...! 
कारण स्कॉच- सोडा-बर्फ आणि जोडीला उदाहरणार्थ उत्कृष्ट सुरमई फ्राय, तंदूरी किंवा चायनीज आयटम्स, तसेच बटर, खारे काजू, काकडी, गाजर, टोमॅटो वगैरे सॅलाड्स.. असला ऐसपैस खानदानी सरंजाम आम्हा दुष्काळी जनतेस, त्यावेळी कल्पनेतसुद्धा ठाऊक असण्याचं काही कारण होतं काय..? मग..?? काहीतरीच विचारता बुवा तुम्ही पण!!
तर समजा, थोड्याच वेळात मद्य मजबूत चढल्यानंतर आम्हाला एकमेकांची भाषाही समजेनाशी झाली आणि
संवादाची प्रक्रिया मुश्कील व्हायला लागली..! 
आणि त्यामुळेच समजा वॉशरूमला जातानासुद्धा झोकांड्या खात खात जायला लागणं वगैरे नॉर्मलच..

तर अशा टुन्न अवस्थेत गेल्यानंतर, आम्ही नियोजन केले की 'फक्त ६० रूपैमध्ये चिकन थाळी' देणाऱ्या आणि त्यामुळेच अतिआकर्षक वाटणाऱ्या, 'जिव्हाळा' ह्या झोपडीटाईप ठिकाणी जेवण्यासाठी जाऊ.
रस्सा, भाकरी, थोडंसं चिकन, कांदा, लिंबू आणि जोडीला पाणी पिण्यासाठी प्लॅस्टीकचा कळकट जग..! व्वा!! क्या बात है..!"चिकन समजा थोडंसं जुनाट रबरी वगैरे असलं तरी काय हरकत आहे ?? आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे रांडीच्या तुला??"
अशी आपापसांत व्यावहारिक चर्चा करत, आम्ही जेवायला सुरूवात केली.

इथपर्यंत सगळं नेहमीप्रमाणे आणि सुरळीत होतं...!
पण मग समजा अति मद्यप्राशनामुळे आमच्यापैकी काहीजणांना थट्टामस्करी वगैरे करण्याची लहर आली असेल.. 
आणि समजा त्यांनी ताटातल्या रश्शामध्ये लिंबू पिळून, 
उरलेला लिंबू एकमेकांना फेकून मारण्याचा एक्साइटींग गेम चालू केला असेल.. 
आणि पुढं जाऊन समजा, ते लिंबाचे चोथे फेकताना 
नेम चुकला आणि तिथं आजूबाजूला जेवायला बसलेल्या अनोळखी मनुष्यांस लागला, तर ह्यात त्यांनी एवढं मनाला लावून घेण्याचं काही कारण होतं काय ?? सांगा बरं तुम्हीच..!!त्यांनी समजून घ्यायला नको होतं काय की आम्ही निष्पाप निरागस मुलं थोडं रिलॅक्स होत आहोत ते..! पण नाही..!! त्या अनोळखी मनुष्यांनी आमच्यासोबत वाद
उकरून काढलाच..!

अर्थात, मी जेवणात गुंग असल्याने, ह्या सगळ्याची सुरूवात नेमकी कधी झाली, हे माझ्या लक्षात आले नाही.
पण एका क्षणी मला दिसले की माझ्यासमोर बसलेले श्री. लातूरकर अत्यंत चपळाईने दरवाजातून बाहेर पळत गेले आहेत.. ते पाहताच मला शंका आली की काहीतरी गडबड झालेली आहे..!!
म्हणून मी मागे वळून पाहिले.तर मला दिसले की आमचा एक जोडीदार, त्या अनोळखी मनुष्यांस
ओरडून ओरडून विचारत आहे की,"तुला लय मस्ती आलीय का आणि तुला म्हाईत नाय का मी कोन हाय ते, वगैरे वगैरे "
 नंतर मला दिसले की श्री.औरंगाबादकर आणि तो अनोळखी मनुष्य ह्यांच्यामध्ये थोडीशी झोंबाझोंबी सुरू आहे..!!
पण श्री. औरंगाबादकर ह्यांनी नंतर मला पटवून दिले की, त्यांनी स्वत:च्या पायांत जे ब्रँडेड टोकदार शूज घातले होते, त्यांचा वापर करून, त्यांनी त्या अनोळखी मनुष्यास जोरदार फाईट मारली...!! 
हे सांगणारे औरंगाबादकर !
त्यामुळे खरे खोटे ईश्वरच जाणे..!!
मग ह्यानंतर त्या मनुष्याने त्याच्या साथीदारांना फोन लावला आणि त्यांना अर्जंट घटनास्थळी येण्यासाठी पटवू लागला..!आणि त्याने आम्हांस इशारा दिला की "हितंच थांबा... आता मी तुमाला सगळ्यांना चांगलेच ** लावनार आहे."
हे ऐकताच माझ्यावरचा मद्याचा अंमल झटक्यात अर्ध्याने कमी झाला..!!  पण माझ्या शेजारी श्री. गारूडी बसले होते, ते अजूनही धुंद अवस्थेतच आहेत, हे माझ्या लक्षात आले.श्री. गारूडी निवांतपणे रस्सा भुरकत होते, चिकनची हाडं चापत होते.. त्यांस मी म्हणालो की " हे ब्राह्मणदेवा, आता उशीर करण्यात काहीच अर्थ नाही..उरका लवकर"
मग आम्ही सगळे जेवण सोडून बाहेर आलो,
तेव्हा श्री. औरंगाबादकरही फोनवर बोलत होते आणि कुणालातरी तिथं येण्यासाठी कळकळीचं आमंत्रण देत होते..

संकटाची चाहूल लागल्यावर माझे हातपाय लगेच गार पडतात...
त्यामुळे मी श्री.औरंगाबादकरांना सल्ला दिला की "समजा त्यांची टोळी लगेच इथं आली, तर त्यांच्याशी लढणार कोण?? आणि आता कुठं मारामारीच्या गोष्टी करता?? आता पळा..!!!"
खरं तर मला वाटले होते, की आमचे सेनापती श्री. औरंगाबादकर चिडून बाह्या सरसावून,
माझा 'पळण्याचा प्रस्ताव' ताबडतोब ठोकरून लावतील 
आणि शिवाय माझ्या घाबरटपणाबद्दल मला शेलक्या शिव्या वगैरे देतील..!!
पण आश्चर्य..!!
आमच्या त्या युद्धकुशल सेनापतींनी लगेच ओरडून सर्वांना आदेश दिला की "पळाss..!!!"
आणि खुद्द सेनापतीच पळण्याच्या दृष्टीने अतिजलद हालचाली करू लागल्यानंतर आमच्या सर्वांमध्ये खळबळ माजणे, स्वाभाविकच म्हणावे लागेल.

"पळा!" हा शब्द ऐकताच, श्री. खटावकर ह्यांनी तातडीने बाईक स्टार्ट केली.. फक्त अर्ध्याच सेकंदात, त्या बाईकवर मी आणि श्री. गारूडी उड्या मारून बसलो.. आणि तिथून निघालो.
थोडे पुढे जाताच आम्हास दिसले की श्री.‌ गडहिंग्लजकर एका वाळूच्या ढीगापाठीमागं लपून बसण्याचा अति विनोदी प्रयत्न करत आहेत..!
आम्ही ओरडून त्यांस म्हणालो की "इथं लपून बसण्याची वेळ निघून गेलेली आहे.. सेनापतीही ऑलरेडी पळालेले आहेत.. त्यामुळे सगळ्यांनीच ढुंगणाला पाय लावून पळणं, हेच सद्यपरिस्थितीत योग्य आहे."
एवढं बोलून आम्ही ट्रिपलसीट होस्टेलच्या दिशेने निघालो..वाटेत श्री. गारूडी, मला म्हणाले की, "मागे राहिलेले आपले वर्गबंधू आता मार खातील काय रे?"
ह्यावर मी त्यांस धीर दिला की,"तुम्ही मुळीच चिंता करू नका देवा...बेवड्यांना कधीच काही होत नसते..!!"
श्री. गारूडी ह्यांनाही ते लगेच पटले.

मग आम्ही तिघं कँपसमध्ये पोचलो तेव्हा थोडासा आडोसा बघून, आम्ही झालेल्या घटनेचं विश्लेषण करत होतो,
तेवढ्यात माझा फोन वाजला.. फोन उचलला असता
सुरूवातीला लक्षात आले नाही की नक्की कोण बोलत आहे.. कारण पलीकडचा मनुष्य अतिशय घाबऱ्याघुबऱ्या आणि
उत्तेजित स्वरात बोलत होता.
मग मी जेव्हा काळजीपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की ते श्री. लातूरकर होते, जे धोक्याची जाणीव होताच सगळ्यांत पहिल्यांदा तिथून सटकले होते. पण प्रॉब्लेम असा झाला होता की ते चपळाईने 'जिव्हाळा'मधून बाहेर पडले आणि घाई गडबडीत एका शेअर्ड रिक्षामध्ये घुसून भलत्याच ठिकाणी जाऊन पोचले होते.
आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की "अरेच्चा हे आपण नेमकं कुठं आलो?? इथं तर काहीच ओळखीचं वाटत नाहीये"
त्यामुळे आता ते मला फोन करून विनवत होते की, "असं असं मी चुकून इथं इथं पोहचलो आहे आणि रात्रीचे बारा वाजल्यामुळे मला होस्टेलवर माघारी यायला वाहन भेटत नाहीये.. आणि तूच माझा एकमेव भाऊ असल्यामुळे मला घेऊन जाणं हे तुझं कर्तव्यच आहे."

तर अशा ह्या श्री. लातूरकर ह्यांचा अतिचंचल स्वभाव पाहता, मला तिकडे जाणे भागच होते. म्हणून मी तिकडं गेलो.. पण त्यांस घेऊन परत येत असता वाटेतच नेमकं त्या रिक्षावाल्या टोळक्याच्या तावडीत सापडलो..!!
ह्याला शुद्ध दुर्दैवच म्हणावे लागेल..!!
मी अर्थातच सवयीप्रमाणे "दादा दादा" वगैरे म्हणून त्या टोळक्याशी कौटुंबिक नातं जोडण्याचा प्रयत्न करू लागलो.पण माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून त्यांनी सरळ आम्हांस फटकवण्यास सुरूवात केली.

"थांबा थांबा.. चष्मा तरी काढू द्या की ओss" "अहहहहहहहहहहहहsss..!"( हे त्यावेळी आम्ही काढलेले विव्हळ उद्गार..! )
शेवटी बऱ्यापैकी समाधान झाल्यावर त्या आक्रमक मनुष्यांनी, आम्हास तिथून हुसकावून लावले.
पण त्या भानगडीत माझा मोबाईल तिथं कुठंतरी पडला.
पण तशातच पाऊस चांगलाच चालू झालेला.. त्यामुळे मला मोबाईलची काळजी होती.. पण मोबाईल आणायची हिंमत होत नव्हती. पण मग मला वाटले, की श्री. पाटील ह्यांची ह्या कामात मदत घेता येईल.

म्हणून मी होस्टेलवर श्री. पाटील यांच्या रूमच्या खाली जाऊन त्यांना जोरजोरात हाका मारू लागलो, कारण त्यांस ऐकावयास थोडे कमीच येत होते..!! 
आणि शिवाय मला हुडहुडी भरलेली... त्यामुळे समजा माझा आवाजही पूर्णपणे फाटत होता..
रस्त्यावर पावसात भिजून लगदा झालेलं एखादं बेवारस कुत्र्याचं पिल्लू जसं ओरडतं, सेम तसाच माझा आवाज निघत होता, असं काही प्रत्यक्षदर्शींनी मला नंतर सांगितलं..!! पण असो..
तर माझ्या आवाजातली घाई लक्षात घेऊन श्री. पाटील तातडीने खाली आले
आणि मी त्यांस थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली.
श्री. बहिरे पाटील हे एक अत्यंत उमदे मनुष्य आहेत, हे मला मान्यच करावे लागेल...!!
ते बोलले की "चल बस म्हागं. .मी येतो तुझ्याबरोबर.. कोण आडवं येतंय ते बघूss..!!!"असे वीरश्रीयुक्त उद्गगार काढले त्यांनी..!!
पण ह्यावर मी लगेच 'सावध' झालो आणि त्यांस बोललो की "आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी हौस पूर्णत: भागलेली आहे.. त्यामुळं आता कुणीच आडवं येऊ नये अशी माझी इच्छा आहे "
पण तेही एक असोच.. कारण मोबाईल गेला तो गेलाच.

** काही ठळक परिणाम:
१. धो धो पावसातून, शेतांतून, पिकांतून आणि गुडघाभर
चिखलातून पळत येताना श्री. औरंगाबादकर सेनापती ह्यांचे ब्रँडेड टोकदार शूज निसटून गेले..
पण त्यांनी हार मानली नाही.. ते तसेच एका जिद्दीनं, एका अविचल निष्ठेनं, अनवाणी पायांनी पळत आले...!!
२. ह्या घटनेमुळे श्री. गडहिंग्लजकर ह्यांच्यात आमूलाग्र स्वरूपाचे परिवर्तन झाले आणि त्यांनी आयुष्यभर मद्याचा त्याग करण्याचा फुसका संकल्प सोडला.
३. पुढचे दोन-तीन दिवस श्री.लातूरकर ह्यांची मनस्थिती नाजूक झाली..!! ते रात्री झोपले असता त्यांस स्वप्न पडायचे की रिक्षावाले त्यांस आणखी मारण्यासाठी येतायत..!! मग त्यांस दचकून उठावे लागायचे आणि त्यामुळं दिवसाही रिक्षाचा आवाज ऐकताच घाबरंघुबरं होणं वगैरे..!! पण झाले बिचारे हळूहळू ठीक..!!

तर आम्ही जिला 'जिव्हाळा'च्या रणांगणातली ऐतिहासिक धुमश्चक्री वगैरे म्हणतो, ती एवढीच..!!

**अवांतरः

बऱ्याच वर्षांनी असंच एकदा पुणे मुक्कामी एका बारमध्ये बसलो असताना, 'पानिपत' आणि मराठ्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र ह्याबद्दलचे माझे विश्लेषण मी औरंगाबादकरांना सांगितले..
(श्री. औरंगाबादकरांचा 'इतिहास' ह्या विषयाशी संबंध इयत्ता दहावीतच संपुष्टात आला होता.. त्यामुळे मी काहीही फेकले तरी चालणार होते..)

पण माझे भाषण ऐकून श्री. औरंगाबादकर उत्कटतेने मला म्हणाले की,
"श्री.सोलापूरकर, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोललात हो! मी गनिमी काव्याचंच युद्धतंत्र 'जिव्हाळ्याच्या लढाईत' वापरलं होतं.. पण थोडंसं नियोजन फसलं..!!
त्यामुळे इतिहासानं मला खलनायक ठरवलं..
कदाचित भावी पिढ्यातले इतिहासकर तरी मला योग्य न्याय देतील, अशी मी आशा लावून बसलो आहे... तर माझ्यासाठी तुम्ही एवढं काम कराल काय??"

आणि अर्थातच, श्री. औरंगाबादकरांच्या कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग पुसणं, हे माझं कर्तव्यच नाही काय??
नाहीतरी मग एवढे पुरातन मैत्र जोपासून काय उपेग??

इत्यलम.

भाग १ https://www.maayboli.com/node/74581
भाग २ https://www.maayboli.com/node/74585
भाग ३ https://www.maayboli.com/node/74605
भाग ४ https://www.maayboli.com/node/74799
भाग ५ https://www.maayboli.com/node/74833
भाग ६ https://www.maayboli.com/node/76712
भाग ७ https://www.maayboli.com/node/77260
भाग ८ https://www.maayboli.com/node/77272

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या त्या युद्धकुशल सेनापतींनी लगेच ओरडून सर्वांना आदेश दिला की "पळाss..!!!"
बेवड्यांना कधीच काही होत नसते..!!"
ह्याला शुद्ध दुर्दैवच म्हणावे लागेल..!!
चष्मा तरी काढू द्या की>>>>>
Lol

धमाल लिहिलयं. खूप दिवसानंतर नवीन भाग आला.

धन्यवाद अस्मिता... Happy .. !! <<खूप दिवसानंतर नवीन भाग आला>> हो.. पोस्ट च होत नव्हता धागा .. एरर येत होता बरेच दिवस .. आत्ता होऊन गेला.. Happy

आवर्जून दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद .. @ वावे, @मैत्रेयी आणि @ रूपाली विशे- पाटील Happy

मस्त लिहिलंय. अशा वेळी बाकीच्या सैन्याचा विचार न करता यशस्वी पलायन करुन गायब होने महत्वाचे असते. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी साळसुदपणे मार पडलेल्या सैनिकांचं सान्त्वन करता येते.

शेकडा 99 इंजिनीअरींग विद्यार्थी असेच आत्मचरित्र लिहू शकतात. .. खूप धमाल लिहिले आहे. .

धो धो पावसातून, शेतांतून, पिकांतून आणि गुडघाभर
चिखलातून पळत येताना श्री. औरंगाबादकर सेनापती ह्यांचे ब्रँडेड टोकदार शूज निसटून गेले..<<

आता वाचल! भन्नाट आहे हे, सगळ चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! Rofl