अभियांत्रिकीचे दिवस भाग- ८

Submitted by पाचपाटील on 18 November, 2020 - 05:14

दिवसेंदिवस आमची शैक्षणिक गुणवत्ता वेगाने ढासळत
गेल्यामुळे आम्हास अधिकृतरित्या होस्टेल मिळणे मुश्कील होऊ लागले... त्यामुळे शेवटच्या वर्षात आम्ही काही जणांनी भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन रहायचा प्रस्ताव मांडला.

श्री. गोसावी आणि श्री. स्वामी, ह्यांचा ह्या कल्पनेला कडाडून विरोध होता, कारण होस्टेलवर पॅरासाईट म्हणून राहिल्यामुळेच, अधिक चांगल्या पद्धतीचे बाँडींग तयार होते, असा त्यांचा दावा होता..!

आणि शिवाय त्यातून जे पैसे वाचतात, त्यातून समजा एसटी महामंडळाचा चार दिवसांचा पास काढला, तर दिवसरात्र फिरून त्या पासचा पुरेपूर उपभोग घेता येतो, हा मुद्दा श्री. स्वामी ह्यांस परमसंतोषाचा..!

अर्थात, अशा प्रकारे ते दोघंही फुकट राहिलेले असल्यामुळे, श्री. संदीप पाटील, हे अधिकृत रूममेट त्यांना येता-जाता
विनाकारण सणसणीत लाथा हाणण्याचा हक्क बजावत..!
आणि त्या लाथा खाऊन प्रचंड आनंद झाल्याचे चेहऱ्यावर दाखवणेही त्या दोघांना बंधनकारक होते..

कारण तसे न केल्यास त्यांच्यावर तिखट शाब्दिक हल्ले चढवण्यासाठी श्री. बारवकर ह्या बहुगुणी मनुष्याची नेमणूक करण्यात आलेली होती..
आणि त्या कामात श्री. बारवकर अतिशय इफिशियंट होते, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेले होते.

श्री. संदीप पाटील ह्यांचे आडनाव 'पाटील' असल्यामुळे ते स्वत:स अतिशय उच्च कुळीचे आणि खानदानी वगैरे समजत...
कदाचित त्यामुळेच त्यांना विनाकारण छाती काढून
चालण्याची सवय होती... शिवाय जातायेता सर्वांनी त्यांना लवून मुजरा करावा, अशीही त्यांची अपेक्षा असायची.

पण असे असले तरी, श्री. संदीप पाटील माझ्या नादाला
फारसे लागले नाहीत, कारण पळ काढण्याच्या बाबतीतली माझी विशेष ख्याती त्यांस माहिती असावी...!

शिवाय, धोक्याची जाणीवही मला सगळ्यांच्या आधी व्हायची, हे एक कारण आहेच..
पण असू द्या.. स्वत:बद्दल किती सांगणार माणूस..!
कारण शेवटी मी एक अत्यंत विनम्र मनुष्य असल्यामुळे, स्वत:चेच कौतुक ऐकताना मला नेहमीच अवघडल्यासारखे वाटते.

पण तरीही समजा सांगायचेच झाले तर उदाहरणार्थ, माझे वैशिष्ट्यपूर्ण 'आडनाव' अतिशय गोंधळात टाकणारे होते, की त्यामुळे सगळ्याच जातीधर्मांच्या मनुष्यांस, माझ्याविषयी आपुलकी जागृत होणे, साहजिकच होते..!
आणि त्यांस आक्षेप घेण्याचे मला काहीच कारण दिसत नव्हते..
पण तेही असो.

तर एखाद्याने समजा कोणत्याही विशिष्ट अँगलने बघितले तरी 'चैत्रबन' मधला तो फ्लॅट, ही राहण्यासाठी उत्तम अशी जागा आम्हास सापडली... त्यामुळे आम्ही चंबूगबाळ आणि बूड तिथे हलवले..

पण लवकरच त्या जागेचे एका सार्वजनिक जागेत रूपांतर झाले..
तसे रूपांतर घडवून आणण्यात अर्थातच श्री. औरंगाबादकर ह्यांचा मोलाचा वाटा होता.

म्हणजे समजा, लैंगिकदृष्ट्या वेगवान सुखकारक हालचाली करण्यासाठी, नुसत्या फरशीवर पसरलेली गादी ही त्यांना फारच अडचणीची होत असणार..!

आणि म्हणूनच त्यांनी एक मजबूत चौसोपी डबलबेड पलंग आणि त्यावर एक गुबगुबीत फोमची गादी आणून व्यवस्थित नियोजन केले असता, आम्हास फार आश्र्चर्य वाटले नाही.

पण समजा असंच पहिल्यांदा एका दुपारी श्री. औरंगाबादकर हे कुमारी विटावाली हिला घेऊन फ्लॅटवर आले, तेव्हा आम्ही सवयीप्रमाणेच सुखाने गादीवर लोळत पडलो होतो.

ते पाहून श्री. औरंगाबादकर आम्हास म्हणाले की ''तुम्ही जरा वेळ बाहेर जा कुठंतरी.''
ह्यावर आम्ही कुरकुरत म्हणालो की 'आम्ही कुठे जावे अशा उन्हात?'
ह्यावर श्री. औरंगाबादकर माफक क्रोधाने म्हणाले की
''कुठं बी जाऊन घाला तुमची... पण इथून टळा''

श्री. औरंगाबादकरांची तातडीची विनंती लक्षात घेता, आम्ही सूचनेप्रमाणे दरवाजाला 'बाहेरून' कुलूप वगैरे घालून
निघालो आणि डीपीवर बराच वेळ रेंगाळत राहीलो.

मग हळूहळू ती नेहमीचीच व्यवस्था होऊन गेली..!
म्हणजे कुमारी विटावाली किंवा तिच्यासारखीच कुणीतरी आली की आम्ही उठून लगेच शर्ट, चप्पल आणि कुलूप शोधू लागायचो.. कारण तसा ठरावच झालेला होता.

आणि दारांना बाहेरून कुलूपं घालणे, हा आमच्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे की काय, अशा पद्धतीचं चिंतन करत, आम्ही सावकाश इकडं तिकडं निरूद्देश भटकत रहायचो..
श्री. औरंगाबादकर स्वभावाने तसे चांगले..!
कारण ठरल्याप्रमाणे नंतर ते आम्हास मिस कॉल द्यायचे
आणि आम्हास परत येण्याची परवानगी द्यायचे..!

इथपर्यंत तसं सगळं ठीकच होतं..

पण असा 'सुरक्षित एकांत' पाहिजे असणारी बरीच गरजू मित्रपरिवारातली जोडपी त्या कँपसमध्ये होती..
आणि त्यांना चैत्रबनसारखा 'सुरक्षित एकांत' दुसरा कुठं मिळणार ???
आणि मग माणुसकीच्या नात्याने त्यांस सहकार्य करणे, हे त्यावेळी आमचे कर्तव्यच नव्हते काय???

परीणामी, वेळी अवेळी आमचं डीपीवर रेंगाळत राहणं
वाढतच गेलं..
आणि आमच्याकडे बघून लोकांचं खवट हसणंही वाढत गेलं.

'त्यांच्या फ्लॅटमध्ये अशी अशी समाजसेवा चाललेली असते', अशी खबर लागल्यानंतर,
त्या फ्लॅटचे मालक थोडे चिंताग्रस्त झाले...

अर्थात, ते एक सभ्य गृहस्थ असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आमच्याकडे अप्रत्यक्ष शब्दांत चौकशी केली की ''असं असं कानावर आलं आहे ते खरं आहे काय??''

ह्यावर आम्ही आश्र्चर्यचकीत झाल्याचे भाव चेहऱ्यावर आणून त्यांस विचारले की ''तुम्ही कशाबद्दल बोलता आहात?? आमच्या काहीच लक्षात येत नाहीये.. आणि आमच्यावर असले आरोप करताना तुमच्या जीवाला काहीच कसे वाटत नाही?'' असेही आम्ही तोंड वर करून बोललो.

मग थोडीशी शाब्दिक देवाणघेवाण झाल्यानंतर
श्री. घरमालक ह्यांनी कळकळीने एक तोडगा सुचवला की
"जे काही करायचे ते करा, पण तो पलंग तेवढा
तुम्ही माझ्या फ्लॅटमधून बाहेर काढला तर फार बरं होईल."
मग त्यांस आम्ही तत्वतः मान्यता दिली आणि समाजसेवेवर कठोर निर्बंध आणले.

निवांत बसून आसपासच्या गोष्टींचं, माणसांचं निरीक्षण करणं, हासुद्धा आमच्या अत्यंत आवडीचा भाग.

तर असेच एकदा रूममध्ये भिंतीला टेकून निवांत बसलो असताना, आम्हास शंका आली की समोर बसलेले आमचे रूममेट श्री. बिराजदार ह्यांनी
नकळत चड्डीमध्येच मूत्रविसर्जन केले आहे..!

ती असभ्य कृती पाहून आम्हास लहानसा धक्का बसला..!

पण आम्ही लगेच सावरलो आणि तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना बोलावून ती असभ्य कृती सर्वांच्या निदर्शनास आणून दिली..!
तसेच, जे दुर्देवी लोक त्यावेळी तिथं उपस्थित नव्हते, त्यांनाही तातडीने फोन करून करून आम्ही ही खळबळजनक बातमी दिली..!

श्री. बिराजदार ह्यांनी ताबडतोब सगळे आरोप फेटाळून लावले...!

खरं तर, श्री. बिराजदार ह्यांनी, प्रगल्भपणे स्वत:ची चूक कबूल करायला हवी होती आणि तिथेच विषय संपवून
टाकायला पाहिजे होता..!
पण दुर्दैवाने श्री. बिराजदार हे होते एक बाणेदार मनुष्य..!
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही."
असा त्यांचा ठाम करारी बाणा..!

त्यामुळे दुर्दैवाने श्री. बिराजदार ह्यांना त्यावेळी त्या घटनेचं गांभीर्य समजलं नाही..
त्यामुळेच किंचित डिवचलं जातंय हे लक्षात न घेता,
ते किंचाळून सगळे आरोप पुन्हा पुन्हा फेटाळून लावत राहीले..!
पण त्यामुळे मॅटर अजूनच एस्कलेट होतोय, हे त्यांच्या लक्षातच आले नाही..!
आणि त्यामुळेच तो आरोप त्यांना आता आयुष्यभरासाठी चिकटून बसलेला आहे, असा आमचा अभिप्राय आहे.

आणि म्हणूनच आमच्या मोबाईलमध्ये 'मुत्रा' ह्या नावाने सेव्ह असलेला नंबर, कुणाचा असेल हे तुम्हास सांगण्याची गरज नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा... चैत्रबन का. आमच्या एका मित्राचा प्रेमभंग इथेच साग्रसंगित पार पडला होता आणि तो पार पाडण्यात त्याला स्वतःलाच जरूरी साहित्य आणून देण्याची जबाबदारी पार पाडावी लागली होती.

तुमच पासआऊट कधी हो? Happy