©अज्ञातवासी - भाग १० - द बर्निंग चेयर!

Submitted by अज्ञातवासी on 8 November, 2020 - 06:17

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

अज्ञातवासी या प्रदीर्घ कथेचा हा एक टप्पा इथे पूर्ण होतोय. असे अनेक टप्पे अजून बाकी आहेत. पण वाचकांना (आणि मलाही) थोडीशी उसंत मिळावी, म्हणून इथे खंड घेतोय. मात्र इतर धाग्यांवर भेटेनच.
यानंतरचा भाग एका आठवड्यानंतर प्रकाशित होईल.

थोडावेळ दोघेही सुन्न बसून होते.
"इतकं सगळं घडलंय? म्हणजे मला माहिती होतं थोडंफार. पण इतकं?"
"दादा, तुम्हाला अजून खूप.."
"खानसाहेब?" मोक्षने त्यांच्याकडे चमकून बघितले.
"नाही, माफ करा मोक्षसाहेब. तुम्हाला अजून खूप जाणून घ्यायचंय."
"इच्छा नाही माझी खानसाहेब. बरं, पण इब्राहिमच्या परिवारातून कुणी पलटवार केला नाही?"
"मोक्षसाहेब!" खानाचा चेहरा अक्षरशः पिळवटून निघाला.
"कृपा करून एवढं विचारू नका."
"ठीक आहे. नाही विचारत."
"मी येऊ?"
"हो. धन्यवाद खानसाहेब."
खान निघून गेला. मोक्ष विचारात गढला.
◆◆◆◆◆
रात्र झाली, आणि खोल्यांमधील खलबतेसुद्धा सुरू झाली.
"अप्पा, गोंधळ झालाय हा नुसता. भुतंही त्याच्या बाजूने उभी राहिलीत ना, तर सगळा खेळ संपेन. वेताळ तर गेला, आता भुतंही संपवायची वेळ आलीये."
"संग्राम, मूर्ख आहात तुम्ही. एका भुताला हात लावून दाखवा, मग मी मानलं तुम्हाला. शांत राहा." मंजुळ आवाज...
"आई पण..."
"भूतं खुर्चीशी कधीही एकनिष्ठ नव्हती. ती एकनिष्ठ होती दादासाहेबांशी. आता प्रत्येकजण स्वतंत्र व्हायला बघेल. त्याआधी खुर्चीवर बसा, आणि मग भुतांना संपवा. तुमच्याबरोबर किती माणसे असतील सध्या?"
"पाचशे..."
"पाचशे? उद्या पांडेनी हाक दिली ना, लाखभर माणसे जमा करून तुमचा खिमा करेल तो. खुर्ची आधी, मग बाकीचे उद्योग."
"आई करू तरी काय करू मग?"
"वाट बघा. तेराव्यापर्यंत. जर त्यानंतर त्याने थांबायचा निर्णय घेतलाच...
... तर अपघात होण्याचे फार मार्ग असतात."
◆◆◆◆◆
"सत्यभामा"
"हं."
'हं काय? घरात काय घडलंय, आणि शांत झोपली आहेस."
"मग काय करू? तुमच्या हातात आहे काही करण्यासारखं?"
"नाहीये. पण मुलांचं काय? दादा होता, तेव्हा अक्षरशः मुलं राजासारखी जगलीयेत. आता अप्पा येईल, तेव्हा त्यांना असं राहता येईल?"
"याचा विचार आधी करायला हवा होता काकासाहेब."
"मी का विचार करू? ही मुलं लहान होती, तेव्हाच दादा म्हणाले, ही पुण्याला शिकतील आणि दोघांच्या नावावर फ्लॅट घेऊन ठेवला. आज कुणाच्या नावावर शिकताना महिना एक लाख रुपये जातात? या दोघांच्या नावावर जातात. मग मी का विचार करू?'
"मग आता का करताहेत?"
"कारण आता अप्पा येईल, नाहीतर संग्राम. दोघेही एकजात कावेबाज. एक लाख तर सोड, एक छदाम देणार नाही तो."
"ही सत्यभामा जिवंत आहे अजून, समजलं? माझ्या पोरांच्या हक्काला कुणी हात लावला ना, जीव घेईन."
"म्हणून मी तुला काही सांगत नाही. जाऊदे. झोप तू. मी जरा बाहेर जाऊन येतो."
काकूंच्या उत्तराची वाटही न बघता ते बाहेर पडले!
"बाहेर मोक्षच्या खोलीचा दिवा जळत असलेला बघून त्यांची पावले त्या खोलीकडे वळली."
◆◆◆◆◆
"बाळा, झोपला नाहीस अजून?"
मोक्ष तंद्रीतून जागा झाला.
"अरे काका, नाही... या ना... तुम्ही जागे कसे?
असंच, कथा लिहिताना काही सुचलं नाही, तर असाच फेरफटका मारतो. आजूबाजूला बघून काहीना काही सुचतच. म्हणतात ना, सत्य ही कल्पनेपेक्षा विचित्र असतं."
"हो," मोक्ष म्हणाला, "कारण कल्पना शक्यतेच्या चौकटीत बांधील असते, सत्य नाही."
"अरे वा, वाचन फार असेल तुझं."
"हो. मला कधीही मित्रांमध्ये जायला मिळालं नाही. कायम सुरक्षेत. मग पुस्तके आपलीशी केलीत."
"बरं झालं, चष्मा लागला नाही."
"लागला होता, ऑपरेशन करून काढला."
"कधी?"
"मागच्याच वर्षी."
"अच्छा. तुझ्याविषयी तर फक्त तू आहेस, एवढंच आम्हा सगळ्यांना माहिती. कुठे असतोस, काय करतोस, काहीही नाही. पांडवांचा अज्ञातवास तरी वर्षभरात संपला, तू मात्र खूप वर्षे लावलीत."
"थोडे दिवस आलोय काका परत. तुम्हाला सगळ्यांना भेटून बरं वाटलं."
"अरे सगळ्याना कुठे भेटलाय तू? अजून तर कुणालाच भेटला नाहीस तू."
"अजून कोण आहे?"
अरे बाळा, खूप आहेत. आपला परिवार छोटा नाही. थांबून जा. सगळ्यांना भेट. बघ इथेच काहीतरी."
"काका हे माझ्यासाठी नव्हतं, आणि नाहीये. मी परत आलोय, हे कृपा करून समजू नका. मला परत जावं लागेल. मला जायचंय."
"जाशील रे. कुणी थांबवत नाहीये तुला. तसंही दादाला कधीही तू ईथे थांबावं असं वाटत नव्हतं. पण एक सांगू?"
"बोला ना काका."
"सावध राहा बाळा वाड्यात. इथे सरळ माणसाचा टिकाव लागत नाही."
मोक्ष क्षणभर हादरलाच...
"काळजी घे. जमलं तर थांबून जा थोडे दिवस. दादांनाही बरं वाटेल. येतो मी."
काकांनी मोक्षच्या उत्तराची वाट बघितली नाही, व ते तिथून निघून गेले.
◆◆◆◆◆
त्या विस्तीर्ण पटांगणात तो एकटाच उभा होता...
प्रचंड कल्लोळ, आक्रोश...
सभोवतालच्या वाड्याला पूर्ण आग लागलेली होती.
वाड्याचे खांब कडकडा कोसळत होते. भेसूर आगीच्या ज्वाळा आसमंत लपेटत होत्या.
आता तो लंगडत नव्हता, पळत होता. मात्र पळून पळून तो फक्त वाड्यासमोर येत होता.
समोरची खुर्चीही धगधगत होती... प्रचंड ज्वालानी वेढलेली.
त्या खुर्चीवर एक माणूस बसलेला होता, आणि तो माणूस खदाखदा हसत होता...
बीभत्स, भेसूर!!!
ज्वाळानी लपेटलेला...
"मोक्षा, वेताळ आहे मी वेताळ... वेताळ कधी मरत नसतो!!"

क्रमशः

पात्र परिचय -
https://www.maayboli.com/node/77179

भाग ९
https://www.maayboli.com/node/77201

भाग - ८
https://www.maayboli.com/node/77188

भाग - ७
https://www.maayboli.com/node/77171

भाग - ६
https://www.maayboli.com/node/77161

भाग - ५
https://www.maayboli.com/node/77156

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक आठवडा?

ही कथा वाचायला उत्सुकतेची किंमत वारंवार मोजावी लागेल असं वाटतंय।

छान कथा आहे.
मी लेखकांना सांगू इच्छितो की, मी बाकी कथा वाचणं सोडलंय... केवळ हीच कथा वाचतोय. कृपा करा...

मस्तच...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत................

मस्त, थरारक, प्रत्येक भागावर प्रतिसाद देणं नाही होत मात्र प्रत्येक भाग तितकाच उत्सकता वाढवणारा, पकड कायम ठेवणारा