©अज्ञातवासी - भाग ४ - वेताळ!

Submitted by अज्ञातवासी on 30 October, 2020 - 11:29

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

मडकं फुटलं... संपला खेळ.
रडारड चालू.
स्मशानात बसायला खुर्ची नसते. तिथे खालीच बसावं लागतं.
"वेळेवर उगवला अप्पा."
"वेळेवर जायलाही हवा."
"नाही गेला तर घालवून देईन."
"सोपं नाहीये. जर डाव उलटला, तर आपल्यालाच घालवून देतील."
दोघेही एकमेकांशी शांतपणे बोलत होते.
आता शोकप्रदर्शनाचा ओघ बदलला होता. लोकांना अश्रू ढाळण्यासाठी नवीन खांदा मिळाला होता...
--------------------
मंद संगीत, मंद दिवे, मंद रात्र.
काही खेळ रात्रीच चालू होतात.
एक टेबल, सहा खुर्च्या, समोर काही बाटल्या...
"सिंगसाहेब, गणिते बदललीत आता."
एक उंचपुरा, कृश माणूस, मात्र डोळ्यांतील भेदकता सगळ्यांवर मात करणारी.
"आमचं मनमाड आमच्या हातात राहिलं, बस. बाकी कितीही गणिते बदलू दे."
उंच आणि धिप्पाड. लांब दाढी त्यात मध्येमध्ये डोकावणारे पांढरे केस.
"मोक्ष राजशेखर शेलार... आजपर्यंत कधीही मी याच्याविषयी ऐकलं नव्हतं."
तुळतुळीत टक्कल. भरदार शरीरयष्टी. गोल चेहरा.
"संग्राम आणि अप्पा गार झालेले दिसले."
हा मात्र टिपिकल गुंठामंत्री. काळ्या रंगाशी स्पर्धा करणारा रंग, मात्र त्यावर बगळ्यासारखे पांढरे कपडे. कपाळावर काळा गॉगल, गळ्यात सोन्याच्या साखळ्या.
सुन्न शांतता.
"खेळ बदलणार आहे. ध्यानात ठेवा. खुर्ची आता फक्त शेलारांकडेच राहील असं नाही."
धीरगंभीर आवाज. घारे डोळे, गोरा वर्ण.
"आयला, मग तुम्ही कंपन्या सांभाळणार की खुर्ची."
छद्मी हसू, सफारी कोट. तोंडात तोबरा.
यावर मात्र हास्यकल्लोळ उडाला.
नाशिक जिल्हा ज्यांच्या ताब्यात होता, असे हे सहाजण...
...आणि हे ज्याच्या ताबेदारीत होते, तो म्हणजे राजशेखर शेलार!
--------------
"अप्पा, खेळ झालाय हा आता. संपवायला हवा. उद्याच त्याला भेटून तिकीट बुक करतो."
"शांत बस. आता गंधमुक्तीपर्यंत तो हलणार नाही."
"काकूंनी डाव टाकला अप्पा. लोक तर गांडूळतोंडीच निघालीत. आपण साईडलाईन झालो."
"संग्राम, शांत व्हा. लंगडा घोडा आहे तो. काहीही करू शकत नाही. आणि तूच मोठा आहेस आता घरात. मोठी माणसे समजूतदार असतात."
मंजुळ आवाज किणकिणला.
"मी तेच सांगतोय. शांत व्हा. तर यांना कुठे अक्कल येतेय."
"तुम्ही त्यांना अक्कल शिकवू नका. जरा खंबीर असते, तर तीस वर्षांपूर्वीच खुर्ची हातात असती. संग्राम, दहा दिवस वाट बघ. अकराव्या दिवशी सरळ खुर्चीवर बसा...
...यावेळी कुणीही आडवं येऊ दे. आडवाच होईल."
मंजुळ आवाज आता भेसूर झाला होता.
-----------------
रात्रीची वेळ. वाड्यातीलच एक खोली. आणि खोलीत चार माणसे.
"काकू भारी दणका दिलात तुम्ही आज! अप्पांचं तोंड तर मारल्यासारखं झालं."
"ये फिंद्रे. तुझे वडील आहेत ना ते, मग असं कशाला बोलते."
"खरं तेच बोलतेय. आणि ते वडील आहेत सांगादादा आणि जागूताईचे. मला उचलून आणलंय कुठूनतरी."
"जास्तच शेफरलीये तू."
"ते जाऊ द्या हो काकू. पण हा मोक्ष कुठून उगवतो काय, आणि सगळ्यांना घाबरवून सोडतो काय. सगळंच एकदम भारी!"
"रुपाली, बघितलेल्या भीतीपेक्षा न बघितलेली भीती जास्त भयंकर असते. पण त्यापेक्षाही भयंकर असतं ते आपलं स्वप्न दुसऱ्याचं होणं! मोक्ष कधीही खुर्चीवर बसणार नाही, पण लक्षात ठेव, संग्रामलाही आयुष्यभर कुणीतरी वाड्यात परत येऊ शकतं, आणि खुर्ची हिसकावू शकतं ही जाणीवच जमिनीवर ठेवेन."
"अहो, आमच्या कादंबरीसाठी चांगली वाक्ये मिळालीत बरका."
मध्येच एक बारका आवाज!
"काका, तुम्ही मध्ये बोलू नका बरं. आज काकूंना बोलू द्या."
"बरं."
"तर पोरींनो चला झोपा आता."
"काकू, पण सांगादादाशिवाय कुणी का खुर्चीवर बसणार नाही?"
काकू स्वतःशीच हसल्या.
"...कारण त्याला तुझा दादा जिवंत सोडणार नाही..."
------------
मंद दिवे विझले, मंद संगीत थांबलं. मंद रात्रीची मध्यरात्र झाली.
सहाजण बाहेर निघाले.
त्यापैकी एक काहीतरी आठवल्यासारखं म्हणाला.
"नाशिकवर राज्य सहा भुतांचं, आणि त्यांच्यावर राज्य करणार एक वेताळ! आठवतंय?"
"चढलीय तुला सायखेडकर! चल निघू पटकन."
"वेताळ गेला, भुते मुक्त! भुते मुक्त झाली...भूते मुक्त झाली..."
...आणि त्यामागे काही हसण्याचे आवाज आसमंतात घुमले....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग पण मस्तच. पडद्यामागचे एक एक कलाकार एन्ट्री घेताहेत. सगळी पात्र नीट समजली नाहीत, अजून एकदा पहिल्यापासून वाचावं लागेल Happy

खतरनाक लिहत आहात... खरतर ऑफिस मध्ये वाचलं की प्रतिक्रिया देता येत नाही. मागील 2 भाग ऑफिस मध्ये वाचले... पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय...

@मृणाली - ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तर कारस्थाने शिजयची आहेत. धन्यवाद!
@आबासाहेब - धन्यवाद! माझ्यामते भाग ७ ८ पर्यंत सगळे कलाकार व्यवस्थित सेटल होतील.
@रुपालीजी - धन्यवाद!
@जेम्स बॉण्ड - धन्यवाद!
@वाचिका - धन्यवाद! हो दररोज एक तरी भाग टाकण्याचा मानस आहे.
@प्रविणजी - धन्यवाद!
@शब्दसखी - धन्यवाद! नक्की प्रयत्न करतो.
@वर्णीता - धन्यवाद!