©अज्ञातवासी - भाग ५ - सहा भुते!

Submitted by अज्ञातवासी on 31 October, 2020 - 08:29

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

मनोगत - खरं सांगायला गेलं, तर पहिला भाग लिहिण्याच्या आधीच हे टाकायला हवं होतं, पण जाऊदेत Lol
माझ्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक कादंबऱ्यांपैकी ही शेवटची कादंबरी (हो अर्धवट राहिलेल्याही पूर्ण करणारच आहे.) मायबोलीवर येण्याआधीसुद्धा या कादंबरीचा प्लॉट माझ्या डोक्यात होता, आणि एकदा लिहावीशी वाटली,म्हणून अज्ञातवासी नाव घेतलं. पण बाकी सगळं लिहिलं गेलं, ही कादंबरी नाही.
मधल्या घेतलेल्या गॅपमध्ये मात्र ही कादंबरी खूपदा डोक्यात घोळत राहिली. या कालावधीत माझं आयुष्यसुद्धा अलमोस्ट पूर्णपणे बदललं. आता खरं सांगायला गेलं, तर वाचायला, लिहायला खूप आहे, पण वेळच मिळत नाही. मायबोलीवरच्या अनेक चांगल्या धाग्यांवर मनात असूनही रिप्लाय देत नाही. असो.
तर, या कादंबरीचा आवाका प्रचंड मोठा आहे. खूप मोठा प्लॉट, खूप जास्त कॅरेक्टर आणि त्याबरोबर अनेक सबप्लॉट. ५० काय १०० सुद्धा भाग होतील. त्याबद्दल मी आधीच सगळ्यांची माफी मागतो. रेग्युलर भाग टाकण्याचा प्रयत्न करतच राहीन.
धन्यवाद Happy
अज्ञातवासी.

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

सकाळ झाली, तो उठला. त्याला या वातावरणात झोप लागणं शक्यच नव्हतं, पण शेवटी थकव्याने आणि मेंदूच्या विचारांनी त्याच्यावर मात केलीच.
कंपनीतून मेलला रिप्लाय आलं होता. पंधरा दिवसांची रजा मंजूर झाली होती.
त्याने खाली पाय टेकवला. आज दुखणं जास्तच जाणवायला लागलं होतं. तो तसाच लंगडत बाहेर आला.
अजस्त्र, भलामोठा वाडा, आणि त्याच्या मधोमध ती खुर्ची.
अनावधानाने का होईना, थोडावेळ तिच्यावर तो बसला होता.
"काय मालक, उठलात?"
समोरच त्याची नजर गेली. संग्राम तिकडून येत होता.
"मी? मालक?" तो हसला.
"मग काय राव, आल्या आल्या खुर्चीवरच बसलात ना तुम्ही. मग मालकच."
"ते चुकून झालं." त्याचा आवाज अजूनही निश्चल आणि तटस्थ होता.
"पुन्हा असं करू नका. लोकांच्या सेंटिमेंट जोडल्या गेलेल्या असतात."
"हो." हा अजूनही शांतच!
थोड्यावेळ एक अस्वस्थ शांतता.
"बाकी लहानपणी तुम्ही चौथीनंतर जे गायब झालात, ते आता दिसलात आम्हाला. आय मिन फोटो वगैरे बघायचो दादासाहेबांकडे, पण प्रत्यक्षात आताच बघितलं."
"हो मी कधी आलो नाही."
"आता काय करणार तुम्हीपण म्हणा. ती अमेरिका सोडून या गावात काय ठेवलंय. बरं तिकिटं वगैरे बुक ना, नाहीतर आम्ही करतो. आमचे ओळखीचे एजंट आहेत. तुमच्याबी जबाबदाऱ्या आहेत, कंपनी वगैरे."
"नाही, पंधरा दिवसांची सुट्टी टाकलीय. पंधरा दिवसानंतरच्या बुकिंग आहेत."
खाडकन कुणी कानाखाली मारावी असा संग्रामचा चेहरा झाला!
-----------
आदल्या रात्री!
"येऊ का आत?"
"काकू, तुम्ही? या ना."
"नाही म्हटलं, काही खाजगी काम चालू असेल तर व्यत्यय यायला नको."
"नाही काकू, बोला ना."
"फक्त काही प्रथा असतात, रूढी असतात, त्या समजवायला आले होते. आज तू अग्निडाग दिलास, आता प्रथेप्रमाणे तू दहा दिवस गावाबाहेर जाऊ शकणार नाही."
"काय? काकू, माझी तिकिटे बुक झालीत परवाची!" तो जवळजवळ ओरडलाच.
"मग कॅन्सल कर. त्या बापाने आयुष्यभर तुझा विचार केलाय ना? मग आता त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी थांब. कुठलाही विधी अपूर्ण ठेवू नकोस, ज्याने त्यांचा आत्मा अतृप्त राहील." काकू शांतपणे म्हणाल्या.
"काकू, माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये."
"माझाही नाहीये. पण कराव्या लागतील..." काकूंच्या बोलण्यात आता जरब आली होती..
"काकू जाऊ द्या ना मला." तो असहायपणे उद्गारला.
खोलीत एक असह्य शांतता पसरली.
"मोक्षा, जितका जास्त लांब पळशील ना, तितकं जास्त तुला दुःख कुरतडत येईल. इथेच सगळा निचरा करून जा, आणि पुन्हा दुःखाची कास धरू नकोस."
काकूंच्या डोळ्यात पाणी आलं.
आणि त्याच्या डोळ्यातून आधीच पाणी वाहू लागलं होतं
--------------
दुपारची वेळ. वाडा जरा सुस्तवलेला. येणाऱ्या जाणाऱ्यांची रीघ चालू.
"अप्पा, लोक आधी त्याच्याकडे जाऊन आपल्याकडे येतायेत." संग्राम वैतागाने म्हणाला.
"कारण बाप त्याचा गेलाय, तुझा नाही!"
अप्पा शांतपणे म्हणाले
तो शांतपणे उभा राहून सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत होता.
तेवढ्यात वाड्याचा मोठा गेट उघडला गेला.
दोन साध्या स्कॉर्पिओ, त्यामागे एक फॉर्च्युनर असा लवाजमा आत आला.
"मोक्ष, शेखावत!" मोक्षच्या मागे असलेला खान कुजबुजला.
"अप्पा, शेखावत!" संग्रामही कुजबुजला.
स्कॉर्पिओमधून काही बंदूकधारी बाहेर पडले. आणि, जरा लांबवर उभे राहिले.
फॉर्च्युनरमधून एक उंच पण कृश व्यक्ती उतरली. पांढरा शर्ट त्याखाली पांढरी पॅन्ट आणि निळ्या रंगाचं जोधपुरी बंद गळ्याचं जॅकेट!
त्या माणसाने गाडीतून उतरल्याबरोबर आजूबाजूच्या काही लोकांना हात जोडले, व तो सरळ संग्रामच्या दिशेने निघाला!
हे बघून संग्राम आणि अप्पा, दोघांचा अहं जरा सुखावला.
"शेवटी जुन्यांना चांगली पारख असते अप्पा!"
तो त्यांच्याजवळ पोहोचला.
"नमस्कार आप्पासाहेब!"
"नमस्कार शेखावतसाहेब!"
"काही नाही, म्हटलं, मोक्ष शेलारांना भेटून यावं. ते खानसाहेबांच्या पुढे उभे आहेत तेच ना?"
कुणीतरी सणसणीत कानशिलात लगवावी असा दोघांचा चेहरा झाला.
-----------------
"खानसाहेब, आता नव्या शेलारसाहेबांबरोबर का?"
खान नुसता हसला.
"शेलारसाहेब! मी विजयसिंह शेखावत! एक साधा उद्योजक, मात्र माझी सर्वात मोठी ओळख म्हणजे दादासाहेबांचा सेवक!" शेखावत हसत हात जोडून म्हणाला, आणि अचानक गंभीर झाला.
"दादासाहेब आम्हाला कधी एकटं सोडून जातील, असं वाटलं नव्हतं. तुम्ही मात्र आता सोबत असा."
"शेखावतसाहेब, अजून पाच भुतं आली नाहीत." खानाने मध्येच विचारले.
"येतील तेही. अजून दुःखात असतील. आम्ही दुःखात असूनही आलो."
मोक्षला कशाचीही संगती लागत नव्हती.
"तर शेलारसाहेब, निघतो आम्ही. खानसाहेब, कधी फॅक्टरीकडे घेऊन या साहेबांना!" शेखावतने हात जोडले, व तो गाडीकडे निघाला.
तेवढ्यात संग्राम त्याच्याजवळ गेला.
"शेखावतसाहेब. दुःख आम्हालाही झालंय. आम्हीही आहोत."
शेखावत हसला.
"संग्राम तुमचं दुःख पेलण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. आमच्यासारख्या क्षुल्लक माणसाने म्हणून दुसरा खांदा बघायचा असतो."
"कळलं आम्हाला. काल रात्री तरंगमध्ये फार दुःख हलकं झालं वाटतं?"
शेखावत चरकला, मात्र त्याच कावेबाज हसू पुन्हा परतलं.
"काय करणार संग्राम, आम्हा भुतांचा वेताळ गेला. शेवटी भुतंच भुतांची सोबत करणार. चला निघतो आम्ही..."
संग्रामच्या उत्तराची वाटही न बघता तो गाडीत बसला, आणि भरधाव वेगाने गाडी निघूनही गेली.
-------------
रात्रीची वेळ.
वाड्यातले अनेक दिवे विझलेले, अनेक दिवे अजूनही लागलेले.
एका खोलीत एक मंद दिवा लागलेला होता. फिकट पिवळसर प्रकाशाचा...
तो शांतपणे काहीतरी वाचत बसला होता. या खोलीत दादासाहेबांच्या मृत्यूनंतर कुणीही यायला धजावत नव्हतं.
हा मात्र शांततेच्या शोधात इथे येऊन बसला होता...
दारावर टकटक झाली.
कोण आहे?
"रझा अब्दुल खान!"
"खानसाहेब आत या ना."
खान आत आला व मोक्षसमोर उभा राहिला.
"अरे उभे का, बसा ना!"
खान शांतपणे मोक्षसमोर बसला.
"मला जास्त अवांतर बोलता येत नाही, म्हणून सरळ मुद्याकडे वळतो. ही पाच भूते कोणती?"
"पाच नाही, सहा. एका भूताला तुम्ही सकाळी भेटलात."
"पण हा काय प्रकार आहे, मला समजावून सांगाल?"
"हा प्रकार नाही, इतिहास आहे, सहा भुतं आणि एका वेताळाचा!"
खानाने सांगायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. आता हळूहळू उलगडा व्हायला सुरुवात झालीए..
वेळेवर भाग येताएत त्याबद्दल धन्यवाद..

छान!
सध्या फक्त हीच कथा वाचतोय... अपूर्ण सोडू नका।

मस्त चालू आहे कथा.. उत्कंठावर्धक.....
सध्या फक्त हीच कथा वाचतेय... अपूर्ण सोडू नका..>>>>१११

@मृणाली - धन्यवाद
@प्रवीण - धन्यवाद
@रुपाली - धन्यवाद
@वाचिका - धन्यवाद
@पद्म - धन्यवाद
@लावण्या - धन्यवाद
@चष्मीश - धन्यवाद

पुढील भाग टाकला आहे!

Nice