©अज्ञातवासी - भाग ९!

Submitted by अज्ञातवासी on 7 November, 2020 - 12:20

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग - ८
https://www.maayboli.com/node/77188

भाग - ७
https://www.maayboli.com/node/77171

भाग - ६
https://www.maayboli.com/node/77161

भाग - ५
https://www.maayboli.com/node/77156

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

"अण्णा, मागून वार केलात तुम्ही," इब्राहिम क्षीणपणे म्हणाला.
"आणि माझी माणसं तू समोरासमोर मारलीत?"
इब्राहिम निरुत्तर...
"माझी आयुष्यभराची जोडलेली जिवाभावाची माणसं तू हिरावून घेतली इब्राहिम. तू जिथे पडलेला आहे ना, तिथेच माझ्या माणसांचा प्रेताचा खच पडला होता."
"मग अण्णा, आता मारणार की हालहाल करून?"
"तू काय केलं असतं?"
"मी," इब्राहिम हसला. "मी तर सगळ्यात आधी तुझी कातडी सोलली असती. मग त्यावर मस्त मिर्ची मसाला लावून तुला उन्हात उभं केलं असतं. मग एक हात आणि एक पाय तोडला असता. मग एक डोळा फोडून नाक कापलं असतं. अजूनही जिवंत असता तर..."
...बंदुकीचे दोन बार निघाले...
इब्राहिम वेदनेने किंचाळला...
त्याचे दोन्हीही तळवे फुटून निघाले.
"दादा!!!"
"अण्णा नाही. मला जे करायचं ते करू द्या. डिसुझा, रॉकेलचा कॅन आण."
डीसुझाने निमूटपणे रॉकेलचा कॅन आणला.
इब्राहिमला रॉकेलने अंघोळ घातली गेली...
काडी पेटली...
जिथे प्रेतांच्या राशी पडल्या होत्या, तिथे इब्राहिम जिवंत जाळला गेला...
★★★★
हॉटेल इराणी कॅफे, नाशिक.
सात जण हॉटेलमध्ये बसले होते. हॉटेलच्या मालकाने या सातजणांना बघूनच बाहेर बंदचा बोर्ड लावला होता, व नेहमीचे पडीक कलाकार हुसकले होते.
"दादा, इब्राहिमचं हे प्रकरण कळलंच कसं तुम्हाला?"
"हो ना दादा, म्हणजे तुम्ही अंडरग्राउंड झालात. आम्हालासुद्धा माहिती नसायचं, की दादा कुठे आहेत, आणि अचानक सरळ हवेलीत हल्ला? अजूनही विश्वास बसत नाही, इब्राहिम इतक्या सहज संपला ते."
"तो सहज संपला नाही," दादासाहेब थंडपणे म्हणाले.
"म्हणजे?"
"इतके दिवस मी अंडरग्राउंड कुठे होतो माहितीये? दूधबाजारात! आंधळ्या हमीदाची कोठी मी भाड्याने घेतली होती. दररोज बटरवाला बनून मी बटर विकलेत."
सगळ्यांच्या अंगावर शहारे उमटले!
"आणि कुणाला कळलं असतं तर?"
"तर मला हालहाल करून मारलं असतं. पण तसंही आपण सगळे मेल्यातच जमा होतो. त्यामुळे रिस्क न घेण्यात काहीही अर्थ नव्हता.
दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी, इब्राहिम कोणत्यातरी मौलवीला भेटायला जातो, ही खबर मला उडत उडत लागली. खबर खरी होती, पण तो मौलवी नाही, तर जुलैला निघाली."
"दादा अवघड होतं प्रकरण."
"अवघड नसतं तर तुम्हाला मध्ये घेतलंच नसतं. तसंही, अवघड गोष्ट मिळवण्यातच मजा असते."
यावर सगळे मनमुराद हसले.
◆◆◆◆◆
त्यादिवशी वाड्यात प्रचंड गडबड चालू होती. उत्सवच म्हणा ना. भलीमोठी मीटिंग भरली होती. जगनरावांचे सगळे सोबती, साथीदार आणि कुटुंबीय झाडून हजर होते.
वर भलामोठा मंडप, खाली खुर्च्यांची लांब रांग. मात्र ती रांगही कमी पडली असती.
अण्णांच्या शेजारीही एक खुर्ची मांडली होती. त्यावर कुणी बसायचं हे नक्की नव्हतं.
अप्पाने संधी साधून ती खुर्ची पटकावली...
ते बघून बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या...
दादासाहेब मागून आले, व खुर्चीच्या मागे उभे राहिले. त्यांनी अप्पाच्या खुर्चीवर सहज हात ठेवला.
अप्पा शहारलाच...
"बरोबर खुर्ची पटकावली अप्पा तू," जगनअण्णा आतून बाहेर येत म्हणाले. त्यांच्यामागोमाग काही मंडळीसुद्धा बाहेर आली.
अप्पा सुखावला...
"जाधव, अप्पा?" सायखेडकर जाधवच्या कानात कुजबुजला.
"तसं झालं, तर मी शेलारांबरोबर राहणार नाही."
जाधव करारीपणे म्हणाला.
अण्णा खुर्चीवर बसले. मात्र पुन्हा काहीतरी विचार करून ते उभे राहिले.
त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"माननीय खासदारसाहेब, आमदारसाहेब, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीचे सदस्य. एवढी सगळी नावे घेण्याचं कारण म्हणजे, एवढे लोक राजकारण करतात, पण शेवटी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हा तुमच्या प्रेमाचा पुरावा...
...कमिशनरसाहेब, आणि तुमचे सर्व सहकारी. आभार. आणि सर्व अधिकारीगण. आभार.
मी राजकारणी नाही, पण आभार मानताना कुणी राहून गेलं, की लोकांना पटकन राग येतो, याची मला जाणीव आहे. म्हणून एवढं सगळं लक्षात ठेवलं, पण तरीही चुकलो असेल, तर मला माफ करा." आणि ते हसले..
...हे बघून सर्वजणांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"गेले काही दिवस आमच्यावर हल्ले झाले. प्रेतांच्या राशी आमच्या वाड्यावर रचल्या गेल्या. लाकडं कमी पडलीत, तितकी जास्त माणसे आहुतीत पडलीत.
आमचे अनेक जुने साथीदार आमच्यासोबत नाहीत. नवीन घडी बसवावी लागेल. तुम्ही सोबत असालच, पण आमचंही नाशिकप्रती कर्तव्य म्हणून उद्यापासूनच आम्ही नाशिकची 'स्वच्छता' करायला सुरुवात करणार आहोत."
ज्यांना स्वच्छतेचा अर्थ समजला, त्यांच्या अंगावर एक शिरशिरी उमटली...
"शेलार कमजोर होते, पराजितही झाले असते, पण आता आमच्याविरुद्ध कुणी नाही. कुणाला येऊसुद्धा देणार नाही. धडा शिकलोय आम्ही..."
त्यांच्या आवाजातली धार आता वाढली...
"पण याचं श्रेय मला नाही. त्यादिवशी ऐनवेळी ती मोटार आली आणि आम्ही वाचलो.
त्यादिवशी आमचा भ्रमनिरास झाला. आमचा सगळ्यात मोठा समज तुटला की...
...आमच्यापेक्षा चांगल्यारित्या खुर्ची कुणी सांभाळूच शकत नाही...
पण नाही, राखेतून भरारी घेता येते हे त्यांनी मला शिकवलं. माणसं जोडून काम कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं. लोकांच्या आकांक्षा कशा सांभाळायच्या हे त्यांनी मला शिकवलं...
...खुर्ची त्यालाच लाभते, जो खुर्चीचा मान ठेवतो. खुर्चीसाठी आपला प्राण पणाला लावतो आणि आपल्या माणसांसाठी सुद्धा! ज्याला माणसांची किंमत कळते, तोच खुर्ची नीट सांभाळू शकतो.
म्हणून आजपासून ही खुर्ची दादासाहेबांची!!!"
लोक अवाक होऊन बघत राहिले, आणि नंतर एकच टाळ्यांचा गजर झाला.
"दादा, बस..."
"नाही अण्णा, तुम्ही असताना???"
"आम्ही कायम असू. बसा तुम्ही."
दादासाहेब भारावून खुर्चीवर बसले. अण्णा त्यांच्या मागे उभे राहिले.
सगळ्यांनी एकच जल्लोष केला.
●●●●●
खलील पकडला गेला, व त्याचबरोबर मशीनगनचा कारखानाही.
खलील त्याच्याच मशीनगनने मारला गेला. मशीनगनचा कारखाना शेखावतकडे आला. शेलरांच्या प्रत्येक माणसाकडे मशीनगन दिसू लागली.
इब्राहिम गेल्यावर त्याचे बरेच साथीदार अंडरग्राउंड झाले. काही शेलारांना येऊन मिळाले,तर काही मारले गेले.
हळूहळू नाशिकमधलं गँगवार थांबलं, आणि शेलारांची निर्विवाद सत्ता स्थापन झाली.
...किंबहुना दादासाहेबांची निर्विवाद सत्ता स्थापन झाली..
◆◆◆◆◆
खान बोलता बोलता शांत झाला. मोक्षही विचारांच्या तंद्रीतून खडबडून जागा झाला.
"खानसाहेब?"
"इथून सुरू झालं दादासाहेबांचं साम्राज्य. त्यांनी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला सन्मान मिळवून दिला. प्रत्येकाला विभाग वाटून दिले. कामाच्या वाटण्या करून दिल्या. लोकांना कामाचं स्वातंत्र्य दिलं...
...आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांनी शेलरांच्या सहा मुख्य कामांची संपूर्ण जबाबदारी या सहाजणांवर टाकली, आणि या सहाजणांनी हे धंदे यापद्धतीने वाढवले, की दुबईची नजर सुद्धा नाशिककडे वळले.
सहा भुतं... मृत्यूही त्यांना हात लावू शकला नाही.
विजयसिंग शेखावत. भारतातला सगळ्यात मोठा शस्त्रनिर्माता. एकवेळ सैन्याकडे कमी शस्त्र असतील, पण विजयसिंगकडे जास्त.
समशेर सिंग. पेट्रोल, डिझेल आणि धान्य माफिया व कुख्यात ट्रान्सपोर्टर. याचे कनेक्शन दुबईपर्यंत आहेत, पण हेडक्वार्टर मनमाडच.
गजानन पांडे. याच्या एका शब्दावर कंपन्या बंद पडतात, आणि एका शब्दावर लाखो कामगार जमा होतात.
निलेश सायखेडकर. नाशिकमधला ऑफिशियली सगळ्यात श्रीमंत माणूस. अनेक कंपन्या, अनेक बंद, मात्र सगळ्या नफ्यात.
लिओनेल डिसुझा. अनेक वायनऱ्या याच्या मालकीच्या आहेत, पण वाईनबरोबर सगळ्या नशा हा बनवतो.
देवराज जाधव. गोल्डन मॅन. एकवेळ दुबईत सोनं कमी असेल, पण देवराजकडे कमी असणार नाही.
...आणि या सगळ्याचा मालक...
...राजशेखर जगन शेलार..."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या भागापासून सर्व भाग अगदी सरस आहेत. कुठेही लय सुटली नाही की, वेग कमी नाही किंवा पकड सुटली नाही. एवढ्या मोठ्या प्लॅटफाॅर्मची एवढी छान कादंबरी खूप दिवसांनी वाचतेय.

नाव नाही का या भागाला .
मस्त चालू आहे .. मधे मधे अण्णा, अप्पा,दादा यांच्यात गोंधळ होतोय, पण पात्र परिचय है ना Happy

पुढचा भाग कधी येईल ते याच भागात सांगून ठेवा
परत परत मायबोली उघडावी लागते.... फक्त या कथेच्या पुढच्या भागासाठी।

कथा फार छान सुरू आहे।

मस्त