©अज्ञातवासी - भाग ३ - शेवटची भेट!

Submitted by अज्ञातवासी on 28 October, 2020 - 23:46

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

संध्याकाळचा मावळतीचा सूर्य, कातरवेळ...
आणि त्यानंतर न संपणारी रात्र.
त्या बागेतल्या सुशोभनिय झाडांच्या कमानीतून अस्ताला जाणारा सूर्य, स्वतःचीच शोभा वाढवून घेत होता.
लहान चिमुकली आजूबाजूला खेळत होती. आणि त्यांचे आईबाबा त्यांना बघत होते.
मुक्त आयुष्य, आनंदी, चौफेर...
तो मात्र बाकावर बसून सगळ्यांना न्याहाळत होता.
तेवढ्यात एक चिमुकली त्याच्याकडे आली. ते बघून त्याच्यामागे असलेले चार जण सावध झाले...
"माझ्याबरोबर बॉल खेळाल?"
तो हसला. त्याने तिथेच गवतावर ठाण मांडलं...
आणि दोघेही खेळू लागले.
बराच वेळ झाला. सूर्यही दिसेनासा झाला. ती चिमुकलीही तिच्या परिवाराबरोबर निघून गेली.
हा असाच बसून होता.
त्याच्याबरोबर असलेल्या चौघेजणांच्या चेहऱ्यावर कंटाळा स्पष्ट दिसत होता.
"खानसाहेब." त्याने आवाज दिला.
त्यापैकी एक जण लगबगीने पुढे आला.
"हॉटेलवर निघा तुम्ही मंडळी. किती वेळ थांबणार? मुंबई फार मोठी आहे, आम्हाला धोका नाही इथे."
"नाही दादासाहेब. थांबतो आम्ही."
तेवढ्यात एक टॅक्सी दूरवर थांबली. तिच्यामधून एक तरुण लंगडत उतरला.
तो हळूहळू बागेच्या दिशेने येऊ लागला.
"दादासाहेब आम्ही थोडं दूरवर थांबतो." खानाने उत्तराची वाट बघितली नाही. तो सरळ तिथून निघून दूरवर थांबला.
तो तरुण एव्हाना बाकावर येऊन बसला.
"अजूनही पाय दुखतोय?"
"आज दुखतोय परत."
"अमेरिकेत दाखवा ना कुणाला. चांगले डॉक्टर आहेत म्हणतात तिकडे."
"सगळी आपलीच माणसे आहेत बाबा तिकडेही."
"बरं. पण दाखवा."
"चालेल."
"अजून, सगळं ठीक?"
"हो बाबा."
"बरं."
सुन्न शांतता...
"अमेरिकेला कधी निघणार परत?
"उद्याच."
"आणि मग पुन्हा कधी परत येणार?"
"कंपनीच काही काम निघालं, तर येईल."
पुन्हा सुन्न शांतता...
एक सांगू?
"बोला ना."
"आम्ही हळूहळू आता उतारवयाकडे निघालोय. तुम्ही जवळ असावं, असं वाटतं. पण एक कायम लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या जवळ असो वा नसो, तुमच्या कायम पाठीशी असू."
पुन्हा एकदा सुन्न शांतता पसरली.
"कधीही वाड्यात परतू नका. कधीही नाही. आम्हाला तुमच्याशिवाय या जगात कुणीही नाही. कुणीही. पण तुम्ही, लांब तिकडे आपलं वेगळं जग बनवा. तुम्हाला हवं ते करा. कशाचीही चिंता करू नका."
"बाबा..."
"नाही हो, म्हातारपणात बोललं जातं अस कधीकधी. बरं, आता लग्नाचा काही विचार? कुणी शोधलीये का?"
"नाही बाबा. नाही..."
"मग शोधा. आणि धुमधडाक्यात लग्न करा. काहीही चिंता करायची नाही."
"बाबा..."
"बोला ना."
"तुम्ही याल ना लग्नाला?"
दादासाहेबांच्या चेहऱ्यावर एक विषण्ण हसू...
"इतक्या शुभ कार्यात, आमच्यासारखा राक्षस नको. आम्हांला कायम दूर ठेवा तुमच्या आयुष्यातून. कधी कुणाला कळूही देऊ नका, की आपलं नातं काय आहे."
दादासाहेबांचा आवाज कंप पावत होता.
"तुमचं आयुष्य विधात्याने लिहून लेखणी तोडली असेल. आणि आमचही. पण तुम्हाला आम्ही शापित आयुष्य जगू देणार नाही. कधीही नाही."
"बाबा, एक सांगू?"
"बोला ना."
"तुम्ही शापित नाही, आणि मीही नाही. राजशेखर शेलार हे नाव शापित असूच शकत नाही, आणि असा बाप असलेला मुलगाही."
दादासाहेबांच्या चेहऱ्यावर त्याही परिस्थितीत समाधान पसरलं.
"मी नाही कधी वाड्यात परतणार. बाबा. आणि तुमचं आयुष्य मलाही नकोय. पण थांबा कायम माझ्यासोबत."
दोघेही डोळ्यातलं पाणी रोखून धरण्याचा प्रयत्न करत होते.
"चला. तुम्हालाही उशीर होईल. आम्हालाही बरीच कामे आहेत. आणि हो, हे राहू द्या."
दादासाहेबांनी हातातलं ब्रेसलेट काढून त्याच्या हातात घातलं.
"बाबा, हे काय."
"असू द्या. हे तरुणपणापासून आमची सोबत करतंय, आता तुमची करेल. सुखी राहा."
मोठ्या मुश्किलीने थांबवलेलं डोळ्यातलं पाणी आता वाहू लागलं.
दोघांनीही स्वतःला सावरलं.
"आपल्या माणसांसाठी जगता जगता, कधी पोटच्या पोरासाठी जगता आलंच नाही. पण तुम्हीसुद्धा तुमच्या माणसांसाठी जगा. कारण आयुष्यात चांगली माणसे मिळणं म्हणजे मृगजळ मिळण्यासारखं आहे. त्यांना कधीही तोडू नका...
...आणि नियतीशी आणि जीवाशी, कधीही खेळू नका. कारण सगळा सारीपाट आधीच मांडलेला असतो!"
तो चक्रावला.
दादासाहेबांनी त्याचा हात हातात घेतला.
"निघतो आम्ही. काळजी घ्या."
तोही लंगडत चालू लागला. विरुद्ध दिशेने...
काळरात्र सुरू झाली होती...
------
"खुर्ची आणा रे दुसरी."
दणदणाटी आवाज टिपेला पोहोचला. बघे क्षणभर थबकले, पण लगेच काहींचा छद्मीपणा उफाळला.
"अहो, एवढ्या लांबून आलाय तो, बसू द्या की!"
एक होतकरू म्हातारा!
अप्पाने संग्रामच्या खांद्यावर हात ठेवला. संग्राम जागीच खाक झाला.
त्याच्या डोळ्यातलं पाणी संपलं होतं. किंबहुना त्याच्यासाठी सगळंच संपल होतं.
पोरका, अनाथ, ही बिरुदे आता त्याला चिकटली होती.
बऱ्याच कुतूहलपूर्वक नजरा त्याची चाळण करत होत्या, आणि काही सहानुभूतीच्याही.
मात्र कुणालाही त्याच्याशी कसं वागावं हे समजत नव्हतं. त्याला आपलंसं करावं, की त्रयस्थ म्हणून घालवून द्यावं हे अजूनही कुणाला समजत नव्हतं.
...कारण अनेकांसाठी तो आपला होता मात्र आपलेपणा जाणवावा असं काहीही नव्हता आणि अनेकांसाठी तो परका असूनही, बापामुळे आपला होता.
एक विचित्र अस्वस्थता पसरली होती.
"मोक्षा, आलास? अरे किती वेळ लावलास? वाट बघण्याचं सार्थक झालं."
शेवटी काकू स्वयंपाकघरातून बाहेर आल्या, कोंडी फोडण्यासाठी.
"मन भरून दर्शन घे. शेवटचं दर्शन. एक दिवस असा गेला नाही की दादासाहेबानी तुझी आठवण काढली नाही. आता फक्त त्यांना निरोप दे. तुझ्याच हातून त्यांना मोक्ष मिळू दे."
तो काहीही बोलला नाही...
...आणि अचानक उभ्या असलेल्या काकूंना बिलगून तो रडू लागला.
...आता मात्र बरेच जण मुळापासून भावनिक झाले.
"शांत हो." काकूंच्याही डोळ्यात अश्रू होते.
"संग्राम. घ्या आता पार्थिव खांद्यावर. ज्याला कुणाला खांदेकरी व्हायचंय, त्याने व्हा.
खानसाहेब. मोक्षाला गाडीतून सरळ घाटावर न्या. त्याला चालता येणार नाही एवढं.
...आणि लक्षात ठेवा, दादासाहेबांनंतर तोच आहे आता आपल्याला..."
कानात कुणीतरी उकळतं शिसं ओतावं, तसे काकूंचे हे शब्द काहींच्या कानात घुसले...
...आणि काहींच्या डोळ्यासमोर नवी गणिते आकाराला आली.

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे हा भाग पण...

"आयुष्यात चांगली माणसे मिळणं म्हणजे मृगजळ मिळण्यासारखं आहे. त्यांना कधीही तोडू नका..."

हे आवडले..

@श्रद्धा - धन्यवाद!
@म्हाळसा - धन्यवाद
@रुपाली - धन्यवाद
@मृणाली - - धन्यवाद
@ क्रांती - - धन्यवाद
@वाचिका - धन्यवाद
@राव पाटील - - धन्यवाद
@आबासाहेब - धन्यवाद

नवीन भाग टाकला आहे.