अभियांत्रिकीचे दिवस - भाग ५

Submitted by पाचपाटील on 27 May, 2020 - 02:55

भाग १
https://www.maayboli.com/node/74581
भाग २
https://www.maayboli.com/node/74585
भाग ३
https://www.maayboli.com/node/74605
भाग ४
https://www.maayboli.com/node/74799

ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा.
ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं 'गोंडस बाळ' दिसण्याचा प्रयत्न करणे आणि सकाळी- सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या....
बाकी देवाक काळजी..!

काळ : आणीबाणीचा
वेळ : ओढवलेली
प्रसंग : ठासलेला
पात्रे : फेस आलेली

डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली.
वाचता वाचता भीतीनं पोटात उठणारे सूक्ष्म खड्डे आणि सशासारखं पिटपिटणारं काळीज एकमेकांना कळू न देण्याचा प्रयत्न.

डिपार्टमेंच्या पुढच्या मोकळ्या जागेत प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचे सेट-अप लावून ठेवलेले.
आधी प्रॅक्टिकल करायचे आणि मग ओरल द्यायची अशी सिस्टीम.

निअँडरथल मानव ज्या मेंदुहीन आणि दगडी चेहऱ्यानं iPhone कडे बघेल, डिट्टो तसाच बथ्थड भाव रीडिंग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर.
कशाचा कशाला संबंध नाय !

मग उगाच आपलं ट्रायपॉड हलवून बघा.
इंस्ट्रुमेन्टचा एखादा स्क्रू फिरवून बघा.
टेलीस्कोपशी खुटपूट करत, काय दिसतंय का ते बघा.
असले येडे चाळे करत टाईम किल करणारी जनता.

एखादा खाटीक कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आला की कोंबड्यांमध्ये प्राणभयानं हलकल्लोळ माजतो.
एक्सटर्नल एक्झॅमिनरची डिपार्टमेंटला एन्ट्री झाली की पॅसेजमधल्या पोरांमध्ये सेम तशीच भयग्रस्त चुळबुळीची लाट पसरत जायची.

तिकडे इंटर्नलच्या केबिनमध्ये सामुदायिक कत्तलीची पूर्वतयारी पूर्णत्वास.
चहा ब्रेकफास्ट आटपून दोन्ही एक्झॅमिनर्स हत्यारांना तेल लावून भूमिकेत ऐसपैस शिरलेले.

"चला sss पयले चार नंबर आत चलाsss" प्यूनची उद्ग्घोषणा.

त्या पहिल्या चार कोंबडा/कोंबडींच्या डोळ्यांत साक्षात काळाशार आणि थंडगार मृत्यू गोठलेला !!
त्यांना बाहेर यायला जसजसा उशीर होईल तसतशी बाहेरच्या कोंबड्यांची वाढती फडफड.
आणि भीतीने तुटेपर्यंत ताणलेल्या नाजूक धाग्यावर भावनांचे वर-खाली हेलकावे...

आतले बाहेर आले की त्यांच्याभोवती गराडा घालून प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न.
पण त्यांचे रंग उडालेले चेहरे आणि नुकत्याच बसलेल्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरत सावरत तोंडातून कसेनुसे ओघळणारे शब्द, मॅच व्हायचे नाहीत बऱ्याचदा.
मग ते नुसतेच आक्षेपार्ह हातवारे करत भावना पोचवायचे.

उरलेल्या कोंबड्याही खाटकांच्या तावडीत सापडत राहतात.
चार-चार जण जात राहतात...
आणि आयुष्यातून ऊठल्यासारखे बाहेर येत राहतात.

अशीच एक ओरल.
असाच आमचा नंबर.
नुकताच बाथरूममधून एकाशी युनिफॉर्म एक्सचेंज करून आलेला मी,
केबीनच्या दाराशी उसनं हासू आणत केविलवाणा उभा.

"काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे एकदाचं!"
अशा निराश खच्ची अवस्थेत शरीर आपोआप आत ढकललं जातं.
पण मन मात्र कसल्यातरी चमत्काराच्या आशेत.

आत चार स्टूल्स... बसलो.
डाव्या बाजूला मुलगी...क्लास टॉपर वगैरे कॅटेगरी..!!
तिचा काही प्रश्नच नाही..!
प्रश्न आमचाच होता..!
कारण उजव्या बाजूचे दोघेजण माझ्याहून दळींदर आणि ओवाळून टाकलेले.

इंटर्नलशी दीदार-ए-यार !!
"तुझं सरलं गड्या !!" असा खुनशी भाव त्यांच्या डोळ्यांत.

थरथरत्या मांड्यांवर फाईल घट्ट धरून बसलेला मी.

"ट्रसची bending moment किती असते?? तू सांग रेsss"
पहिला बाण सणसणत माझ्या दिशेनं.
माझ्या कानशिलांमधून गरमागरम लाव्हारस ओघळायला सुरुवात.
त्याचवेळी घशाला कोरड आणि पाठीच्या मणक्यातून थंड शिरशिरी.

"क्.. क्.. कमी असते सर" माझा बचावात्मक पवित्रा..!

ऊजवीकडच्या दोन्ही दळींदरांच्या खरखरत्या घशांमधूनही माझ्याच गंडलेल्या उत्तराचा हुबेहूब प्रतिध्वनी.
मग एकतर्फी प्रश्न येत राहिले आणि आम्हा तिघांच्या ठार मठ्ठ चेहऱ्यांवर आदळून बाउन्स होत राहिले.

"एवढं साधं साधं आणि बेसिक विचारतोय...ते पण तुम्हाला सांगता येत नाय."
"काय उपयोग आहे तुमचा ?"
असं म्हणत म्हणत मध्येच आमच्या फायली बघायला सुरुवात.

"बाप रे..! हे काय लिहिलंय !! कसं लिहिलंय !!
अरे राजाsss...हा रिडींग्जचा टेबल आहे ...
And this reading should be '0.1'
But you have written 'oil'.
एखादं रिडींग 'oil' कसं काय असू शकतं?? एवढी पण अक्कल लावता येत नाय का कॉप्या करताना ?"

आश्चर्याचा धक्का बसल्याचं एक्सप्रेशन आणायचा माझा प्रयत्न होता, पण ते काय जमलं नाही.
चेहऱ्यानं ऐनवेळी दगा दिला.
तो कंट्रोलच्या बाहेर जाऊन आपोआपच छिन्नविछिन्न आणि खिन्नमनस्क व्हायला लागला.

आमची घेता घेताच, दोन्ही एक्झामिनर्सची एकमेकांच्या कानांत अधूनमधून फुसफुस आणि नंतर फिदीफिदी... नंतर गडगडाट...!

आता आमची शेजारीणसुध्दा रिलॅक्स होऊन त्या कुजकट हसण्यात सामील व्हायला लागली.

तेव्हा उरली सुरली आब्रू वाचवणं आवश्यक होतं.
म्हणून मी समोरच्या रफ वर्कसाठीच्या चिठोरीवर, विचारलेल्या प्रश्नाचं calculation करण्यात गुंग झाल्याचं ढोंग चालू केलं.

शेजारच्या येड्याला वाटलं की त्याला चिठोरी दिलीय ती अटेंडन्स मार्क करण्यासाठीच.

'आला कोरा कागद की भरा त्याच्यावर अटेंडन्स', अशी त्याची आयुष्यभराची तपश्र्चर्या..!

त्यानं लगेच त्यावर इज्जतीत नाव, सीट नंबर आणि सही करून त्याच्या शेजाऱ्याला पास केली.
त्यानं पण तेच केलं.
मग अजून बेअब्रू...बेअब्रू स्क्वेअर...बेअब्रू क्यूब.!

शेवटी शेवटी आमच्यासारख्या निगरगठ्ठयांकडून काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे ते स्वतःच कुठलातरी कन्सेप्ट समजावून सांगायला लागले.

"बेडूक कशा झिगझॅग उड्या मारतो ते बघितलंय का तुम्ही कधी ? एक उडी मारतो.. मग थोडा वेळ थांबतो.. इकडं तिकडं बघतो.. मग पुन्हा उडी मारतो.. थोडा वेळ थांबतो.. मग पुन्हा उडी मारतो...अगदी तसंच ह्या प्रोसेसमधला इलेक्ट्रॉनपण करतो.. आता तरी कळलं का तुला ?"

"........"

"हं... मग सांग बघू आताss"

"........"

"बोल कीsss''

"गुडबुडबुडगुडफुसफडुस"

"मोठ्यानं बोल sss...काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय ?"

आमचा शेजारी म्हणजे आधीच फ्यूज्ड बल्ब !
पण प्रकरण अगदीच हातघाईवर आल्यावर त्याला 'शरम' या‌ भावनेचा स्पर्श झाला.
आणि तो लाजत मुरकत कबूल करत बोलला.

"सर... ते बेडकाचं कळलं... पण हे इलेक्ट्रॉनचं काय नाय कळलं वो !!"

आणि ह्या उत्तरासोबतच एक्सटर्नलचा पेशन्स संपला आणि तिथं एक मोठा स्फोट होऊन तातडीनं आमची बाहेरच्या दिशेनं रवानगी करण्यात आली.

" सबमिशन जपून ठेवा sss.... पुढच्या वेळी लागेलच !!"

असा एक्सटर्नलचा दाट खर्जातला आवाज लगेचच मागून आला आणि त्याचबरोबर निकालसुध्दा समजला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर : मी नवीनच लेक्चरर् असताना एकदा टॉपिक शिकवून झाला म्हणून पंधरा मिनिटे लवकर लेक्चर बंद करून स्टाफ रूम मध्ये जाऊन बसले. झालं, इकडे सगळी पोरं पळून गेली. Hod ला समजल्यावर ती इतकी भडकली, स्टाफ समोरच खूप ओरडली. बेकार इन्सल्ट झाला. तेव्हापासून कानाला खडा लावला. जास्त तयारी करून जायचे आणि वेळ पूर्ण झाल्याशिवाय वर्ग सोडायचे नाही. Happy

मस्त लिहीलंय Lol मजा आली वाचायला.. आता उरलेले भागही वाचून काढतो..

पण मला ॲक्चुअली ओरल आवडायच्या. लेखी परीक्षेत रट्टा मारून जाण्यापेक्षा कन्सेप्ट समजून ओरल देणे बरे वाटायच्या.

फक्त प्रॉब्लेम व्हायचा की त्या मूळ परीक्षेच्या खूप आधी असायच्या आणि तेव्हा अभ्यास काहीच झालेला नसायचा. म्हणून मी एक ट्रिक वापरयचो की मोजकेच महत्वाचे करायचो आणि ऑप्शनला टाकलेल्यापैकी प्रश्न आला तरी ते केले नाही सर म्हणून जे केलेय त्यावरचे विचारायला लावायचो. आणि एखाददुसरा अपवाद वगळता एक्स्टर्नल काही आढेवेढे न घेता मला त्यातले विचारायचा. आणि त्यातला प्रश्न विचारताच मी त्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात न देता सगळे कन्सेप्ट खोलात जाऊन सांगायचो की तो इम्प्रेस झालाच पाहिजे.

पण यामुळे सोबतचे मात्र मला जाम शिव्या घालायचे. कारण त्याचीच लिंक पकडून त्यांना पुढे प्रश्न विचारले जायचे आणि त्यांची भंबेरी उडायची Happy

बाई दवे
पाचपाटील
सिविल का तुम्ही पण? कुठले कॉलेज युनिवर्सिटी?

पण यामुळे सोबतचे मात्र मला जाम शिव्या घालायचे. कारण त्याचीच लिंक पकडून त्यांना पुढे प्रश्न विचारले जायचे आणि त्यांची भंबेरी उडायची >>>>
हा शुद्ध अन्याय होता ऋन्मेSSषजी....तुमच्या सोबत्यांच्या वतीने आज या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो... Happy

परत एकदा वाचला लेख. Rofl
ऑफिसमधे वाचण्याच्या 'लायकीचा' नाही हो ! दिवे घ्या Light 1 डिस्क्लेमर लिव्हा वरती!
खुर्चीवरुन पडायची बाकी होते फक्त!

<<इंटर्नलशी दीदार-ए-यार !!
"तुझं सरलं गड्या !!" असा खुनशी भाव त्यांच्या डोळ्यांत.<< हे अगदी खरे आहे. या लोकांचे म्हण्जे इन्टर्नल्स्चे एक्स्टर्नलशी काय साटेलोटे असते कुणास ठाउक. आपल्या कॉलेजची पोरे आहेत निट सांभाळुन घ्यावे की नाही. पण या लोकांनाही वर्षभराचा वचपा काढायची हीच संधी असते.
एम एस्सी ओरलच्या वेळी अनुभवलय हे. आणखी या सगळ्यात वट असते ती लॅब असिस्टंटला. ओरलच्या दिवशी तो सातवे आसमानपर असतो.

पाचपाटील, अशक्य भारी लिहिलंय हे. आताच 5 ही भाग वाचले. हा भाग भयंकर आहे. हापिसात मोठ्हयाने हसु शकत नाही म्हणुन जीव कोंडला माझा. Rofl
लिहित रहा.

तुफान लिहिलंय! Lol

ओरलच्या दिवशी वाढदिवस आलेल्या आमच्या एका गड्यानं स्टीलच्या बारक्या डब्यातनं पेढे आणले होते आणि ओरलची बारी लागल्यावर आत टेबलाजवळ पोचल्यावर सरळ डब्याचं झाकण उघडून एक्स्टर्नल आणि इंटर्नलच्या तोंडापुढं डबा धरून "सर, टुडे.. माय बड्डे..." म्हणून टेबलाखाली हात घालून त्यांना चक्क पायलागू करून सहानुभूती मिळवली होती.

Pages