रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> तुम्ही परदेशात आहात तर हा उपक्रम तुम्हाला स्वगृही (भारतात) असल्यासारखे भासवण्यास मदत करेल.>>> होय!

>>>>>>>ओममध्ये मात्र खरेच वेगळेपण आहे. आणि ओम ओम जपताना आपण काहीतरी धार्मिक शब्द जपतोय असेही वाटत नाही. त्यामुळे नास्तिक असूनही त्याचा फायदा होतो.>>>>>> मला वाटतं 'ॐ' ही निर्गुण साधना आहे व त्यामुळे ती अवघड आहे. याउलट रामनामात जर मूर्तीचे ध्यान केले तर ती रिलेटिव्हली सोपी सगुण साधना होइल. नाम जरी निर्गुण असले तरी ज्याचे नाम घेतो तो सगुण असेल.

शब्दाने नाम स्थुल असेल,परिणामाने सुक्ष्म आहे. नामस्मरण जसजसं वाढत जाईल,तसतसं ते मनाच्या सांदीकोप-यात,तळागाळात झिरपत जातं. याचा परिणाम शरीरावरही होतो. वाणीच्या तिस-या प्रकारात म्हणजे परा वाणीत नाम गेलं की साधक त्याचा रहातच नाही. तो परमेश्वराचाच होवुन जातो. त्याला ही जाणीव मात्र होत असते. हे सगळं कशामुळे होतं,तर एका नामामुळे होतं. नामस्मरण हे practical आहे. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पाहिलं तर ते सुक्ष्म आहे!

नामाचे परिणाम इंद्रियांकडुन प्रकट होतातच. ते आनंद स्वरुपात असतात. इंद्रियांना सतत आनंदाची अनुभुती येत असते. उदा. जिभेला सतत गोडपणा जाणवणे,कानांत अनाहत ध्वनी ऐकु येणे, नाकांना मंद सुवास जाणवणे या सगळ्या इंद्रियजन्य अनुभुती आहेत. त्या फक्त आणि फक्त नामानेच होवु शकतात. म्हणजेच नाम अतिसुक्ष्म आहे.

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराज यांचे प्रवचने ::
१ जानेवारी

नाम हे परमात्मस्वरूप आहे .

नाम म्हणजे भगवंताचे नांव.
साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळया नांवांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे.
नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे.

नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे.
आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे.

नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे.

लग्न झाल्यावर स्त्री जशी नवर्‍याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तिचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे.
नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तिसुध्दा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळयांचा भावार्थ एकच आहे.

अन्नाला स्वत:ची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल.

पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते.

आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे.

जसे आपले आपलेपण आपल्या नांवात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे.

आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुध्दी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो.

पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.

१. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही .

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

मी सुंदरा - हे आपले अनुभव आहेत की थिअरी? कारण वाचलय बरच पण असा अनुभव आलेले कोणी माझ्या प्रत्यक्ष पहाण्यात नाही.

एकंदर
नामाचे डोही
आनंद तरंग !

लोकहो नाम घ्या, 'आनंद' भेटेल ! Proud

सामो, येथे अनुभव असणारे लिहिणार नाहीत असं वाटतं कारण हेटाळणी पदरात पडते आणि आनंद हिरावला जातो.

छान,
सुरू करा अन पूर्ण करा,
सुरू करून शंका घेत बसले तर जास्त त्रास होईल

मी पहिल्याच पानावर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. ह्यात हिंदू विरोधी काही नाही

येथे अनुभव असणारे लिहिणार नाहीत असं वाटतं कारण हेटाळणी पदरात पडते आणि आनंद हिरावला जातो. >> + 1
Just wud like to say येथे अनुभव (asala tari)लिहिणार नाहीत

या उपायांचे परिणाम आणि महत्त्व 'तिथे' पोहोचल्यावरच जाणवत असावेत.
डोंगर चढताना किंवा शरीर थकल्यावर काठीचे महत्त्व इतरांना इतर वेळी कसे कळणार.

सामो, कुठलेही नाम घेतल्यामुळे काही काळ का होईना मन शांत होते..
आळंदी- पंढरपुरात किंवा इतर देवस्थानाला भेट दिल्यावर इतर भक्तांच्या सोबतीने कळत नकळत आपल्या मुखी नाम येते तो आनंद काही काळापुरता असला तरी विलक्षण भासतो.. Happy

नकारात्मक लिहण्याचा दोष पत्करून - सामान्य व्यक्तीला काही वर्षे चिकाटीने शक्य तेवढे नियम पाळून विना अपेक्षा नामस्मरण किंवा सोहं साधना यांना देता आले तरच काही “खरे” अनुभव येतात. तोपर्यंत जे अनुभव येतात ते भ्रमच असतात. हि प्लॅन बेअर फॅक्ट आहे. अशी लोकं माझ्या तरी पाहण्यात नाहीत आणि जी दोन-चार आहेत ती सामान्य नाहीत. आतून ह्या गोष्टी करण्याचा उमाळा असेल तरच या फंदात पडावं नाहीतर उगा मनस्ताप हाती येईल. कोणत्याही प्रकारच्या उपासनेत पुढे पुढे आपल्या नको त्या वृत्ती उफाळून यायला सुरुवात होते आणि सर्व खड्यात जाते. सर्व संतांनी जे सांगितले ते बरोबरच आहे पण प्रॅक्टिकल अध्यात्म अवघडच असतंय माझ्या अनुभवात तरी. सामान्य व्यक्ती तिच्या सर्व गुण-अवगुणांसकट केवळ शुद्ध तांत्रिक उपासनेतूनच थोडी फार प्रगती करू शकते पण ती मिळायला नशीबच लागते.
तरी ज्यांना या विषयाची आवड आहे त्यांनी इस्लामपूरच्या डॉ. वैद्यांनी लिहलेली प्रणवोपासना, सोहं साधना आणि साधुसंतांचा देवयान पंथ हि तीन पुस्तके आणि प्रज्ञानंद सरस्वती यांचे गायत्री उपासनेवरचे प्रॅक्टिकल ज्ञान देणारे एक पुस्तक आहे हि पुस्तके वाचावीत. ज्यांना असल्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी कृष्णमूर्ती, निसर्गदत्त आणि रमण महर्षी यांचा आधार घ्यावा. ज्यांचा त्यांच्यावरबी विश्वास नाही त्यांनी चार्वाक तत्वज्ञानाचा अभ्यास करून मौजमजेत जगावं.
नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा Happy

माझे वडील लिहतात, त्यांना जे मोकळा पान दिसेल, वही, वर्तमान पत्राचा समास, लग्न पत्रिका व त्याचा लिफाफा. काहीही मोकळा असेल त्यावर.
मी माझ्या लहानपणापासून पाहत आहे लिहीत असल्याचे.

>>>> शुद्ध तांत्रिक उपासनेतूनच थोडी फार प्रगती करू शकते>>>> कुंडलिनी मार्गाचे म्हणताय का? त्यात सर्वांना रस असेलच असे नाही. किंबहुना तो मार्ग गुरुच्या देखरेखीखालीच चोखाळावा असे ऐकले आहे.
______
>>>>>>पुढे पुढे आपल्या नको त्या वृत्ती उफाळून यायला सुरुवात होते >>>>>> गोंदवलेकर महाराजांच्या मते, या मार्गात सर्वात प्रथम स्वतःचे असलेले दुर्गुण दिसू लागतात, बाहेर येउ लागतात. जे की चांगलेच आहे.

>>>> शुद्ध तांत्रिक उपासनेतूनच थोडी फार प्रगती करू शकते>>>> कुंडलिनी मार्गाचे म्हणताय का? त्यात सर्वांना रस असेलच असे नाही. किंबहुना तो मार्ग गुरुच्या देखरेखीखालीच चोखाळावा असे ऐकले आहे.
______
>>>>>>पुढे पुढे आपल्या नको त्या वृत्ती उफाळून यायला सुरुवात होते >>>>>> गोंदवलेकर महाराजांच्या मते, या मार्गात सर्वात प्रथम स्वतःचे असलेले दुर्गुण दिसू लागतात, बाहेर येउ लागतात. जे की चांगलेच आहे.

राम नाम कधीही व्यर्थ जाणार नाही... तुमच्या लिखाणावरुन तुम्ही सात्विक आहात असे वाटते.. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लहानपणी मी रामावर खूप प्रेम करायचे... मग कृष्ण भक्ति केली... रामाच्या जपाने जेवढे शांत वाटते तेवढे कशानेही वाटत नाही...
मला जप मोठ्याने करणे आणि मोजून करणे पटत नाही... पण हा उपाय stress buster असेल असे वाटते... तुम्हाला सदिच्छा...
मी मंत्रजप सुरु केला तेव्हा तो जिभेवर जाणवायचा..अगदी झोपेतून ऊठल्यावर तो आपोआप continue व्हायला लागायचा...काही दिवसांनी तो घशात जाणवत असे मग चक्क ह्रदयात जाणवू लागला मग आता कुठे च जाणवत नाही...कुठे गेला काय माहिती... पण मनात करते आता..... साधनेत खूप फायदा होतो...द्रुष्टांतही होतात...

आदिश्री प्रतिसाद फार आवडला. Happy धन्यवाद.
जप मोजून करणे मलाही पटत नाही. वाणीज्य वृत्ती वाटते.
___________
गोंदवलेकर महाराज जर रामनाम घ्या सांगत असतील तर ते चूकीचे अथवा निरर्थक असूच शकत नाही अशी माझी दृढ श्रद्धा आहे. डोळे मिटून मी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे.

तुमचा विश्वास असाच असावा. श्रीमहाराजांची कृपा आपल्यावर सदैव असो. श्रीराम जय राम जय जय राम!!

धन्यवाद मी सुंदरा. दुसर्‍याकरता मुखात आशीर्वाद यायलाही मन चांगले असावे लागते व ईश्वराची कृपा लागते. पुनश्च धन्यवाद. विश यु द सेम. तुम्ही अन्य लोकांकरता जी इच्छा करता तीच आपल्यालाही लखलाभ होवो :), लाखंनी भरुन पावो.

आदीश्री चा प्रतिसाद आवडला.. पूर्ण सहमत.. राम नामात अपार शक्ती आहे Happy
श्रीराम जय राम जय जय राम
नाम जप करणे महत्वाचे, ते कसे करतो ते माध्यम महत्वाचे नाही असे मला वाटते (फक्त त्याचा इतर कोणाला त्रास होऊ नये, no speaker and all)

रच्चाकने, सध्याचे सगळे स्वयंघोषित संत, सदगुरू (यांत बलात्काराच्या आरोपांखाली तुरूंगात गेलेले, देश सोडून पळालेलेही आलेच) यांच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं प्रेम, बोलण्यातला गोडवा आणि आनंदी वृत्ती बघितली तर गहिवर दाटून येतो.>>>>>>>

वाघाचे कातडे पांघरलेले कोल्हे सगळ्या क्षेत्रात आढळतात. क्षेत्रपरत्वे त्यांची संख्या कमीजास्त आढळते. जसे अध्यात्म क्षेत्रात जास्त आढळतील कारण या क्षेत्रात येण्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम नाही, कोणीही येऊ शकतो. याउलट डॉक्टरकीच्या क्षेत्रात कमी आढळतील कारण पैसे व वेळ खर्चून डॉक्टरकीची पदवी आधी गळ्यात पाडून घ्यावी लागते. पण आढळतील मात्र दोन्हीकडे. फसवणा-या डॉक्टरवरून इतर सर्व डॉक्टरांची लायकी कोणी ठरवत नाही.

कुंडलिनी मार्गाचे म्हणताय का? त्यात सर्वांना रस असेलच असे नाही. किंबहुना तो मार्ग गुरुच्या देखरेखीखालीच चोखाळावा असे ऐकले आहे.>>> तो फार पुढचा टप्पा झाला. तांत्रिक उपासनेत बरेच मार्ग असतात. त्यात कॉमन फॅक्टर म्हणजे अधिकारी व्यक्तीकडुन ( हा गुरूच असेल असे काही नाही) इष्टदेवतेचा जागृत बीजयुक्त मंत्र आणि त्याबरोबर ध्यान, न्यास, स्तोत्र, कवच, स्तुती या गोष्टी ठराविक पद्धतीने दिल्या जातात. पुढे आपले प्रयत्न आणि प्रारब्ध. त्या आधी गायत्रीचा लाखभर जप करून घेतात. कुंडलीसाधन शेवटचा टप्पा असतो. कारण सर्व चक्रे शुद्ध केल्याशिवाय आणि इष्टदेवतेची कृपा प्राप्त नसेल तर कुंडलीसाधन धोकादायक ठरू शकते. कुंडली जागृती फार अवघड नसते पण ती सर्व चक्रातून सहस्रारापर्यंत नेऊन पुन्हा मूळ जागी आणावी लागते. ह्या गोष्टीला मोठा अधिकार पाहिजे जवळ तरच ते शक्य होतं. लाखात एखादाच त्या लेव्हलला पोहोचत असेल. हीच गोष्ट भक्तीमार्ग आणि नामस्मरण, सोहंसाधन यानेही शक्य होते पण त्याला फार वेळ लागतो आणि एवढ्या मोठ्या प्रवासात नाना विघ्नांना तोंड देऊन टिकून राहणे सदगुरूकृपेशिवाय अशक्य आहे. आणि सध्याच्या काळात असे कोणी खरे गुरु माझ्या पाहण्यात नाही आले कधी. तांत्रिक उपासनेत उपास्यदेवता आपली सर्व काळजी घेते आणि प्रपंच- परमार्थ दोन्ही साधला जातो. अगदी मोठी पातळी जरी गाठता नाही आली तरी जे काही साधता येईल त्यात माणूस समाधानी राहतो. शेवटी गडगंज संपत्ती जशी काहींना जन्मजात मिळते तशीच अध्यात्मिक संपत्ती सुद्धा जन्मजातच मिळते. ज्यांना ती नाही मिळत त्यांना मोठा संघर्ष करूनच ती थोड्याफार प्रमाणात मिळू शकते. साधना उपासना एवढ्या सोप्या असत्या तर गल्लोगल्ली चान्गले साधक पाहायला मिळाले असते. मी काही नामस्मरणाला नावं नाही ठेवत पण बरेच लोक थोडा प्रयत्न करून काही अनुभव नाही आला तर निराश झालेली पाहिली आहेत मग त्यांना प्रश्न पडतो कि महाराज तर अमुक अमुक म्हणतात मग मला का नाही तसा काही अनुभव येत ? त्यांना उद्देशून मी लिहलं होतं. ज्यांची यात काही प्रगती आहे त्यांच्याबद्दल आदरच आहे. धाग्याचा विषय रामनाम वहीचा होता त्यामुळे अवांतराबद्दल क्षमस्व. रामनाम सर्वश्रेष्ठच आहे पण त्यासाठी आपली तेवढी पात्रता हवी आणि हि पात्रता मिळवणे हाच सर्वांत मोठा मुद्दा आहे यात. रामनाम किंवा इतर कोणतंही नाम सर्वानाच महाराज सांगतात त्याप्रमाणे सारखं लागु होत असेल तर माझा काहीही आक्षेप नाही. पण भरपूर निराश लोक पाहतो त्यामुळे लिह्ण्याचं मोह नाही आवरता आला. माझ्याकडून इथेच थांबतो आता.

नाम जप करणे महत्वाचे, ते कसे करतो ते माध्यम महत्वाचे नाही असे मला वाटते (फक्त त्याचा इतर कोणाला त्रास होऊ नये, no speaker and all)>>अनुमोदन किल्ली.

नामस्मरण म्हणजे निष्क्रियता नव्हे - हे वाक्य सत्य आहे की असत्य? असल्यास का , नसल्यास का नाही? Can there be such thing as 'TOO MUCH' नामस्मरण?
किंतु/परंतु जेव्हा मिटतील तेव्हा मनाचा निश्चय होइल. हे असे किंतु, या शंकाकुशंका त्रास देतात.

Pages