अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अय्यो... मी ही एकच serial काही चांगल बघायला मिळेल या आशेवर बघायला घेतली... अजुनही बघतेच आहे..hotstar वर.. इतकं काही trp कमी असेल असं वाटत नाही.. बरेच लोक hotstar वर बघत आहेत..trp काढायची पद्धत बदलली पाहिजे... अगदीच काही सुमार नाही आहे serial..लोक का ती मानबा आणि बाकिच्या zee च्या serial बघत आहेत... सगळेच मुद्दे अर्धवट राहिले.. सप्त मातृका तर आल्याच नाहीत...

ही शिरेल आमच्या घरी बघितली जायची, पण बंद केले हेच बरे. श्री गुरूंविषयी जे दाखवत होते ते पटत नव्हते, बरे झाले बंद केली शिरेल >>>>>>> होय. श्रीगुरुंविषयी ते कोणी अतिसामान्य रजोतमोगुणी व्यक्ती आहेत असे दाखवत होते. अनसूयामातेची व्यक्तिरेखाही ढिसाळ दाखवली.
त्यांचे श्रेष्ठ ज्ञान, स्थितप्रज्ञता इत्यादी दाखवले नाही. पण काहीजणांचा अभिनय चांगला होता. पुढे दत्तसंप्रदायातल्या सत्पुरुषांची चरित्रे दाखवतील असे वाटले होते.

हो, त्यात मिहीर राजदा आणि समीर खांडेकर आहे. चाळ आणि त्यातील वेगवेगळ्या प्रांतातील बिऱ्हाडं असं कथानक असावं, प्रोमोजवरून वाटतंय.

क्रमशः ची पाटी येऊन अग्निहोत्र 2 संपवले.. शेवटच्या भागात महादेव काका दाखवलेच नाहीत..नशीब एवढं तरी सांगितल की सात जणी आहेत.त्या एकत्र आल्या तरच बॉस शी सामना करु शकाल.. संगीता कोण आहे ते काही दाखवलच नाही.. समिहा मुळची अग्निहोत्री आहे असं सांगितल..तिच्या आजोबानी आडनाव बदललं नाशिक वरून पळून गेल्यावर... खूप प्रश्न अनुत्तरित सोडून क्रमशः ठेवून हा सीजन संपवला

खूप प्रश्न अनुत्तरित सोडून क्रमशः ठेवून हा सीजन संपवला>>
या चॅनलशी परत सल्लामसलत
नवीन चॅनलशी बोलणी
नवीन भांडवलदार शोधणे
असे काही करत असावेत.

जाऊदे आता बघण्यात इंटरेस्ट नाही. एक महिन्याआधी जर channel ने सांगितलं असते तर त्यांनी वेगाने पूर्ण केलं असतं कदाचित, किंवा channel ने अजून थोडा वेळ द्यायला हवा होता. मधे मधे बोअर होत असून tv वर त्यांना trp देणाऱ्या आमच्यासारख्या प्रेक्षकांचा आणि नेटवर वेळ काढून बघणाऱ्याही प्रेक्षकांचा हा अपमान आहे खरंतर.

शेवटीही रश्मी आणि प्रतीक्षा सीनमधे प्रतीक्षा सरस ठरली आणि रश्मी पुचाट. समीहा म्हणजे प्रतीक्षाने तिचा रोल उत्तम निभावला आणि पल्लवीने पण अर्थात हे माझं वैयक्तिक मत. रश्मी फक्त बाबांबद्दल हळवी होते तो अभिनय प्रत्येक वेळी छान केला, बाकी काहीही जमलं नाही तिला, तोच तोच पणा.

माझा नवरा मागेच म्हणाला की अर्धवट संपवतील आणि परत काही आणणार नाहीत. तसंच होईल असं वाटतं, पुढे काही आणणार नाहीत. एनीवे PNG ची add दाखवायचे, त्यात भाचीच्या मुलाला काही सेकंद बघता यायचं हे एक समाधान मानून घेतलं.

* अग्निहोत्र २ : माझ्या नजरेतून (भाग १/३) *

शनिवारी 'अग्निहोत्र २' मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवला गेला, आणि काहीच दिवसांपूर्वी "टीआरपी नसल्यामुळे 'अग्निहोत्र २' मालिका बंद होणार" अशी वाचलेली बातमी सत्यात उतरली. ह्या गोष्टीलाही 'क्रमशः' चा स्टिकर लागला आणि प्रेक्षकांपूढे अनेक प्रश्नचिन्ह ठेवत मालिका पुन्हा एकदा पडद्यावरून निघून गेली. मालिका अशी मधेच का संपली? खरंच टीआरपी मुळे संपवली गेली का? परत कधी सुरु करणार? वगैरे प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळतील असं काही वाटत नाही. पण मालिका थांबवली गेली ह्याचं दुःख मात्र निश्चित आहे.

उदाहरणादाखल ह्या फेसबुक ग्रुपचाच जर आढावा घेतला तर केवळ ह्या मालिकेसाठी स्टार प्रवाह बघायला लागलेले अनेक प्रेक्षक सापडतील, त्यातलाच मी एक. 'अग्निहोत्र' (भाग १) च्या पुण्याईवर उभ्या राहिलेल्या 'अग्निहोत्र २' बद्दल दररोज एपिसोड बघून सोशल मीडियावर चर्चा करणारा प्रेक्षकवर्ग बघून आपल्याकडे चांगल्या मराठी मालिका बघणारा सूज्ञ प्रेक्षक अजूनही आहे ह्याची जाणीव झाली आणि खूप बरं वाटलं. त्याच 'सूज्ञ' प्रेक्षकांपैकी एक मी स्वतःला समजतो, आणि त्याच अधिकाराने आणि 'अग्निहोत्र' वरच्या प्रेमापोटी माझा 'अग्निहोत्र २' बद्दलचा आढावा मला शेअर करावासा वाटतोय. लेख थोडा मोठा झाल्यामुळे ३ भागात शेअर करणार आहे. त्यातले मुद्दे आवडल्यास आणि पटल्यास जरूर कळवावे.

# 'अग्निहोत्र १' कडून 'अग्निहोत्र २' कडे जाताना...

वर्ष २०१०, "आता फक्त शेवटचे १० आठवडे" ची जाहिरात लागली (https://www.youtube.com/watch?v=TEZLlnnD6Ro) आणि 'अग्निहोत्र' शेवटाला येणार ह्याची चाहूल लागली. शेवटचा भाग १ तासाचा दाखवला गेला. आठ गणपतींचं रहस्य उलगडलं, मोरेश्वर कोण हे स्पष्ट झालं, आणि नीलच्या प्रयत्नांती अग्निहोत्री कुटुंब एकत्र आलं. 'अन्वय सतेज अग्निहोत्री'च्या पत्रानी 'अग्निहोत्र भाग-१' चा शेवट झाला. 'क्रमशः' चा टॅग लागला आणि पुढचा भाग कधी येणार ह्याची वाट बघणं सुरु झालं.

खूप काळ वाट बघणं सुरूच होतं. काही काळानी पहिल्या भागाचे पटकथाकार अभय परांजपे यांच्या blog वर 'पुन्हा अग्निहोत्र' नावाची एक पोस्ट वाचली. त्यात लिहिल्यानुसार 'अग्निहोत्र २' ची गोष्ट सुद्धा तयार केली गेली होती. पण स्टार प्रवाह चॅनेलला सासू-सुनांमध्ये गुरफटून राहण्यात जास्त रस होता त्यामुळे 'अग्निहोत्र २' सरळ सरळ नाकारली गेली. पुढे काही काळातच अभय परांजपेंचं निधन झालं आणि उरली सुरली आशा सुद्धा मरून गेली.

का कोण जाणे (स्टार प्रवाह चा कमी होणार प्रेक्षकवर्ग असेल की अजून काही कारण), 'राजा शिवछत्रपती' आणि 'अग्निहोत्र' ह्या मुळातच चॅनेल ला ओळख मिळवून देणाऱ्या मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात येऊ लागल्या. थोडा थोडका का होईना, आनंद झाला. दुपारच्या विचित्र वेळी कधीतरी पुन्हा एकदा 'अग्निहोत्र' बघायची संधी मिळत होती. त्याच काळात (साधारण २०१३-२०१४ साली) YouTube वर अग्निहोत्र चे सगळे एपिसोडस स्टार प्रवाहनी अपलोड केले. केव्हाही आणि कुठूनही अग्निहोत्र बघायला मिळू लागलं. जुन्या प्रेक्षकाला आनंद मिळतोय हे खुपलं की काय म्हणून, थोड्याच अवधीत हे सगळे YouTube वरील व्हिडिओज private करण्यात आले. (आजही भाग १ चे सगळे व्हिडिओज स्टार प्रवाहच्या YouTube चॅनेल वर आहेत, पण ते private असल्यामुळे ते कोणालाच बघता येत नाहीत). पुन्हा एकदा सगळं संपलं.

पुन्हा तेच चक्र. २०१७ साली पुन्हा त्याच २ मालिकांचं पुनर्प्रक्षेपण. ह्यावेळी मात्र हॉटस्टार हा प्लॅटफॉर्म उदयास आला होता. जसजसे एपिसोडस दाखवले जात होते, तसतसे ते अपलोड होत होते, आणि केव्हाही कुठूनही बघण्यासाठी उपलब्ध होत होते. जुलै २०१७, अग्निहोत्र पुन्हा अचानक बंद! दुपारच्या वेळेचा slot सुद्धा राखता येईना. ६६ एपिसोडस दाखवून पुन्हा एकदा अग्निहोत्र पडद्याआड. हो, आज पहिल्या भागाचे जे ६६ एपिसोडस तुम्हाला हॉटस्टार वर दिसतात ते हेच!. अनेक प्रकारे स्टार प्रवाहला संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, कधीच कशालाच उत्तर मिळालं नाही. स्टार प्रवाहचा मूळ स्वभाव लक्षात घेता ह्यात काही आता नवल उरलेलं नाही हे लक्षात आलं आणि पुन्हा एकदा मनात अग्निहोत्र चा विषय बंद केला.

ऑक्टोबर २०१९. अचानक (अगदी out of the blue) 'अग्निहोत्र २' चा प्रोमो फेसबुकवर दिसला आणि खूप वेळ विश्वासच बसत नव्हता! इतकी वर्ष हे केव्हा घडेल? ह्याचा नुसता विचारच केला होता आणि ते घडेल ह्याची आशा जवळ जवळ सोडून दिली होती तीच गोष्ट काही आठवड्यांतच सत्यात उतरणार आहे हे पचनीच पडत नव्हतं. प्रचंड आनंद आणि उत्सुकता! जुनी पात्रं दिसणार का? कलाकार कोण? जुनी गोष्टच पुढे नेणार की वेगळीच गोष्ट असणार? वगैरे असंख्य प्रश्न. आणि भाग-१ च्या दर्जामुळे भाग-२ कडून डोंगराएवढी अपेक्षा! हळू हळू बातम्या, कलाकारांच्या मुलाखती वगैरे बघून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. सतीश राजवाडे हे स्टार प्रवाहाचे चॅनेल हेड झाले आहेत हे समजताच, मुळातच 'अग्निहोत्र २' घडायला पोषक वातावरण कसं निर्मल झालं? ह्या प्रश्नाचं उत्तर चटकन मिळालं. पुढे टायटल सॉंग आलं, मुंबई-ठाण्यात परिसंवादाचे कार्यक्रम झाले आणि अखेर २ डिसेंबर उजाडला. 'अग्निहोत्र २' चा 'श्री गणेशा' झाला आणि १० वर्षांनंतरची अग्निहोत्री कुटुंबाची गोष्ट उलगडू लागली.

एवढा मोठा प्रवास करून सुरु झालेला भाग २ बघता बघता अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक मतं तयार झाली. काही गोष्टी कौतुकास्पद वाटल्या तर काही तक्रारी सुद्धा कराव्याश्या वाटल्या. सगळ्याचा कुठेतरी एकत्र आढावा घ्यावासा वाटतोय. 'अग्निहोत्र २' चा चाहता म्हणून सर्वांगाने विचार केला असता ज्या ज्या गोष्टी आवडल्या, खुपल्या त्या सगळ्या मांडायचा प्रयत्न करत आहे.

१. कथा

ही मालिका सुद्धा काहीतरी रहस्य घेऊन येणार हे निश्चित होतं. मालिकेच्या प्रोमो मधेच "सप्तमातृकांचे उलगडणार रहस्य" असं स्पष्ट सांगितलं होतं. पौराणिक गोष्टीवर आधारित आताच्या काळातली कथा तयार करायची ही कल्पनाच किती छान आहे! सप्तमातृका म्हणजे आताच्या कथेत सात नायिका असणार हे हळू हळू समोर आलं. प्रोमोमध्येच रहस्य कशाबद्दल आहे हे सांगून टाकलं असलं तरी नक्की रहस्य काय हे सांगितलं नाही, किंवा सहज ओळखता येऊ शकेल अशीही काही माहिती दिली नाही (नाहीतर इतर सर्वसाधारण मालिकांच्या प्रोमोमध्येच त्यांची अख्खी गोष्ट समजते!). त्यामुळे त्याबद्दल कौतुक!

अग्निहोत्र १ ची गोष्ट ८ गणपतींच्या रहस्यावर आधारित होती. पण ते गणपती फक्त रूपक होते. खरी गोष्ट कुटुंबाची होती. हरवलेले नातेवाईक कुठे आहेत ह्या नीलच्या कुतुहलापासून सुरु झालेल्या शोधाला, गणपतींच्या मूर्ती बसून उघडणाऱ्या बंद दरवाज्यामुळे वेग मिळाला. दोन वेगळे शोध होते, एक नातेवाईकांचा आणि एक गणपतींचा. पण ते एकत्र गुंफलेले होते. नुसतेच नातेवाईक शोधण्यासाठी धडपडणारा नील दाखवला असता तर ते कृत्रिम वाटलं असतं. पण गणपतीच्या शोधांमुळे ते नैसर्गिक वाटलं. शेवटपर्यंत बंद दरवाज्यामागे काय? हे कोड समोर होतं, ते कोडं सोडवण्याचा मार्ग सुद्धा पहिल्या काही एपिसोडस मधेच समजला होता पण तो शोध आणि त्याचा प्रवास तरीही बघावासा वाटावा आसा होता.

अग्निहोत्र २ ची गोष्ट अश्याच धर्तीवर रचली आहे असं वाटतं. मूळ कथेचं स्वरूप असं की - बाबांवरचा कलंक मिटवण्यासाठी धडपडणारी अक्षरा, तिला दिसायला लागलेल्या साधूबाबामुळे तिचं ७ मातृका आणि ७ मोहोराच्या शोधाने झपाटलं जाणं, आणि अंधकासूर कोण हे शोधून त्याला हरवणं. मग कथा उलगडताना ओघाने काही रहस्य, काही नातेसंबंध उलगडत जातीलच. आताची कथा 'अग्निहोत्र १' प्रमाणेच अनेकपदरी आहे. आणि अशी कथा तयार करण्याबद्दल लेखकाचं खूप कौतुक.

अग्निहोत्र २ चा कथाविस्तार बघताना मात्र काही ठिकाणी काही गोष्टी रुचत नाहीत. आधीच्या भागात नातेवाईक आणि ८ गणपतींचं शोध होता, आताच्या गोष्टीत ७ मातृका आणि ७ मोहोरांचा शोध आहे. फरक इतकाच की मोहोरा आणि मातृका एकमेकांत गुंफलेल्या नाहीत. त्यांचा तसं पाहता एकमेकींशी काहीही संबंध नाही. पण तरीही कथेत ३ मातृका आल्यानंतर बरोबर ३च मोहोरा सापडलेल्या का दाखवल्या? हा योगायोग दैवी वाटतो, किंवा त्या साधूबाबाने घडवून आणलेला वाटतो. नैसर्गिक वाटत नाही, आणि त्यामुळे हे काहीसं पटत नाही.

गणपतींच्या बंद दरवाज्यासारखं एक ठोस कोडं ह्या वेळीही दाखवणं शक्य होतं, ते म्हणजे भुयारी मार्गाचं दुसरं टोक कुठे उघडतं? हे गूढ कायम ठेवणं. किंवा हळू हळू एक एक कोडं सुटून थोडं थोडं भुयार पुढे explore केलं जाणं. ह्यामुळे भुयारात पुन्हा पुन्हा जाण्याचं अक्षराचं motivation जास्त खरं वाटत गेलं असतं. पण दुसऱ्या महिन्यातच फक्त २ कोडी सोडवून समिहा आणि अक्षरा भुयारातून बाहेर पडताना दाखवल्या. वाड्याच्या मागच्या बाजूस कुठेतरी बाहेर पडून परत वाड्यात यायचा मार्ग सापडत नाही असं दाखवता दाखवता अचानक वाड्यात सही सलामत आलेल्या दाखवल्या. इथे शेवटपर्यंत टिकणारं रहस्य दाखवण्याची शक्यता होती, पण तिचा वापर झालेला दिसला नाही.

शिवाय सतेजचा शोध त्याच भुयाराशी निगडित सुरु होता हे थोडं स्पष्टपणे दाखवलं गेलं असतं तर अक्षराचं नाशिक ला वारंवार येणं, इतके दिवस राहणं, आणि भुयारात जाण्याचा सारखा प्रयत्न हे सुद्धा justify झालं असतं. पण ह्या सगळ्याबाबत clarity न दाखवल्यामुळे ही मुलगी केवळ तिला (भास होऊन) एक साधूबाबा दिसतो आणि तो काहीतरी करायला सांगतो म्हणून इकडे राहते? असं आश्चर्य सतत वाटत राहतं. बरं महादेव गायब होता तोवर अग्निहोत्रासाठी एखादी भावुक मुलगी थांबली हे समजून घेतलं जाऊ शकतं. पण नंतरही शिक्षण सोडून ही मुलगी इथेच. केवळ साधूबाबाचं बोलणं हे त्यामागचं motivation असं न दाखवता बाबाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला ती थांबली आहे (आणि बाबाचं काम भुयाराशी / मोहोरांशी संबंधित होतं) हे स्पष्ट दाखवलं असतं तर जास्त पटलं असतं. जसं नील शिक्षण संपवून खरोखरच रिकामा होता, त्यामुळे तो उंडारू शकायचा आणि काकांशी हितगुज करायला, गोष्टी ऐकायला अधूनमधून नाशिकला यायचा, राहायचा. ते जास्त पटण्यासारखं होतं.

गोष्टीत पुढे अक्षरासमोर येणारी २-३ कोडी (२ दगडांचं कोडं, भुयारातलं ३ चित्रांचं कोडं) ही नव्याने येत गेली, कोणीतरी मुद्दाम रचल्यासारखी. त्या साधूबाबांनीच ठरवून, परीक्षेचे एक एक पेपर पुढे ठेवावेत तशी मांडलेली. कोणीतरी खूप वर्षांपूर्वीच रचून ठेवलेली अनेक कोडी दाखवली असती (जी जादू प्रमाणे अचानक येत नाहीत आणि अचानक गायब होत नाहीत) तर ते जास्त खरं वाटलं असतं. रहस्याचा उलगडा जेव्हा शोध घेता घेता आपोआप होत जातो तेव्हा त्याचा आनंद जास्त मिळतो. पण इथे त्या साधूबाबाला सगळंच माहित आहे असं दिसतं. बरं तो सोयीस्कररित्या तीनही मातृकांना दिसतो. अक्षराशी तर मोठे संवाद साधतो (जवळ जवळ गप्पाच मारतो), कोडी घालतो. तो खरा आहे की भास / आत्मा हे गूढ आहेच, पण हे गूढ राखण्यासाठी काही अतर्क्य गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत ते पटत नाही. अक्षराच्या हाती आलेल्या 'अनुदिनी अग्निहोत्र' हा ग्रंथ ती तिच्या संस्कृतच्या अभ्यासासाठी वाचणं आणि त्यात तिला कोडी सापडणं, ती कोडी तिच्या बाबांच्या कामाशी निगडित असणं आणि त्यामुळे ती एक एक कोडं सोडवत जाणं, हे असं जास्त चपखल वाटलं असतं.

कथेतला साधूबाबा अक्षराला बऱ्याच गोष्टी सहज सांगून टाकतो. सप्तमातृका असणं, अंधकासूर असणं, सप्तमातृकांनी त्याला हरवलं पाहिजे, अमुक अमुक व्यक्ती ही एक सप्तमातृका आहे, ही सगळी माहिती सगळी तोंडी देऊन टाकली जाते. हे फारच सहज वाटतं. त्याऐवजी हीच माहिती तिला एखाद्या पुस्तकातून / ग्रंथातून समजणं, आणि त्याचं तिनी असं interpretation स्वतः करणं, हे जास्त वास्तववादी वाटू शकलं असतं. माझा त्या साधूबाबाच्या असण्याला विरोध नाही. कथेत कल्पनाविलास जरूर रंगावेत, पण ते खरे वाटावेत किंवा किमान योगायोग वाटावेत असे असावेत. उदा. - मोरूकाकांनी नीलला सांगणं की "झाडं वाईट नसतात, माणसं वाईट असतात", ह्यात मोरूकाकाला भविष्याची लागणारी चाहूल हे गूढ आहे, पण ते खोटं किंवा कृत्रिम वाटत नाही.

ह्या सगळ्या तक्रारी म्हणजे खऱ्या तक्रारी नसून इतक्या उत्तम कथानकात जाणवणाऱ्या थोड्या थोडक्या त्रुटी आहेत. हुशार विद्यार्थ्याला १०० पैकी ९८ मार्क मिळाले कि २ मार्क गेल्याचं वाईट वाटतं तसंच काहीसं.

-- अद्वैत इनामदार (०८ मार्च २०२०)
* भाग (२/३) पुढील post मध्ये...

Pages