बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?

मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.

हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...

https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) मुलांना एक, दोन, तीन, चार असे बेसिक अंक आणि दहा, वीस, तीस, चाळीस असे युनिट अंक पटकन कळतात. त्यापुढं पुन्हा एक, दोन, तीन जोडून आकड्यांची रचना समजणं खरंच खूप सोपं जातं.
>>
मुळ कठिण गोष्ट शिकवण्यासाठी या व इतर अनेक सोप्या पद्धती वापरल्या पाहिजेत यावर कुणाचेच दुमत नाही व विरोधही नाही.

२) दुसरीच्या पुस्तकात, एकवीसच्या 'ऐवजी' वीस एक, बावीसच्या 'ऐवजी' वीस दोन, असं दिलेलं नाही. उलट, वीस एक 'म्हणजे' एकवीस आणि वीस दोन 'म्हणजे' बावीस असं स्पष्ट करुन मांडलेलं आहे. यामुळं मुलांना एकवीस म्हणजे नक्की किती आणि बावीस म्हणजे नक्की किती हे चांगलं कळेल. तिसरीच्या पुढं वीस एक, वीस दोन नसेल. हे फक्त सुरुवातीला समजावून देण्यासाठी आहे.
>>
बावीस म्हणजे नक्की किती हे , याच्यापुर्वीच्या पिढ्यांना समजावुन सांगितले नव्हते का? आक्षेप नवा पर्याय देण्याला आहे. भाषातज्ञांना विश्वासात न घेता.

३) दुसरीच्या मुलांना 'जोडाक्षरांचा खूप त्रास नको' असं एक कारण या बदलासाठी दिलेलं आहे. पण जोडाक्षरं नको 'म्हणूनच' आकडे लिहायची पद्धत बदलली असा विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे. त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं
>>
असा नक्की किती जास्तीचा त्रास होत या जोडाक्षरांनी त्याचए काही सर्वेक्षण वगैरे? भाषातज्ञांचे मत वगैरे? पालक? शिक्षक ?त्यांचे मत? काहीच नाही? मग हे कशाच्या आधारवर?

नवीन पद्धतीनं 'मराठीचा गळा आवळला' वगैरे म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न - एकोणसाठ आणि एकोणसत्तर हे आकड्यात लिहिताना तुमचा स्वतःचा गोंधळ व्हायचा की नाही. अनेकांचा आजही होतो. त्यापेक्षा पन्नास नऊ आणि साठ नऊ जास्त लॉजिकल नाही का ?
>>
नाही. कधीच नाही. उलट एखाद्या psychological trick प्रमाणे हे वाक्य वाचल्यानंतरच अधिक गोंधळ झाला. तुमच्या लॉजिकप्रमाणे चार अंकी संख्या कशी म्हणायची? १९४७ वगैरे?

आधीच्या पिढीला शाळेत पावकी, दिडकीचे पाढे शिकवले जायचे. ती पद्धत बंद झाल्यावर तेव्हाच्या लोकांनी असेच गळे काढले होते. आपण शाळेत पावकी, दिडकी शिकलो नाही, मग काय नुकसान झालं ? किंवा शिकून काय फायदा झाला असता कुणी सांगू शकेल काय ?
>>
ती पद्धत व्यवहारात चालू आहे का? माझ्या अंदाजाप्रमाणे शाळेत बंद होऊन मग व्यवहारात बंद झालेली नाही. व्यवहारात तीची गरज कमी झाली मग शाळेतून बंद झाली असे असण्याशी शक्यता जास्त आहे.

६) मोबाईलमुळं फोन नंबर लक्षात ठेवायची शक्ती नष्ट झाली, कॅल्क्युलेटरमुळं आकडेमोड करायची ताकद संपली, कॉम्प्युटरमुळं हातानं लिहायची सवय मोडली, अशा तक्रारी करणाऱ्यांनी मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर बहिष्कार का नाही टाकला ? ही दांभिकता मुलांच्या फायद्याच्या आड का आणतोय आपण ?
>>
या सगळ्या तक्रारी नाहीयेत. खरेच असे होत आहे. त्याचा अर्थ थेट यावर बहिष्कारच टाकला पाहिजे असे कुठेय. ही काही दांभीकता नाही. बाकी सगळे फोन नंबर विसरु शकतो, पण एखाद दुसरा महत्वाचा नंबर पाठ असलाच पाहिजे.
आज एवढ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही विमान व जहाज कर्मचा-यांना तंत्रज्ञानाशिवाय दिशा शोधण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागतेच की.

८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?
>>
काहीही हं श्री...

छान चर्चा!

प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य असते. मूल मातृभाषेतून शिकणार असेल तर भाषा बोलायला आधीच शिकलेले असते, हळूहळू लेखनही शिकते आणि संकल्पनाही. पुढे पुस्तकामधे एक्काहत्तर साली असा उल्लेख येतो तेव्हा १९७१ डोळ्यासमोर येणे हे लहानपणी जो सराव होतो त्यातूनच होते. तिथी बाबत चतुर्थी, एकादशी असे होते मात्र तारीख चार, अकरा अशी सांगितली जाते, हे मूल भाषेच्या रोजच्या वापरातून, सरावने शिकते. बत्तीस म्हणजे ३ वेळा १० + २ असे शिकवणे किंवा ३०+२ असे शिकवणे वेगळे आणि ३२ ला तीस दोन असे म्हणायला शिकवणे वेगळे. इंग्रजीमधे 22 हा अंक twenty one असा म्हटला जातो पण 12 हा अंक twelve असा म्हटला जाते, ten two नाही तसेच मराठी भाषेचे देखील स्वतःचे असे भाषारूप आहे. जपानी भाषेमधे नुसते वस्तू कुठली त्यानुसार मोजणी करताना भाषानाम बदलते. तो त्या भाषेचा विशेष आहे.
पर्याय दिले आहेत, रद्द केलेले नाही वगैरे बाबी गोंधळ अजूनच वाढवणार्‍या आहेत. वर्गात १५ मुलं असतील तर प्रत्येकाला वेगळी पद्धत वगैरे झेपते आणि तरीही एका शिक्षकाला मदतीला एक पालक स्वयंसेवक असतो. मराठी शाळांमधून असे शक्य आहे का?
गणिताची गोडी लावायला भाषा बदल गरजेचा नाही. भाषा आणि गणित या दोन्ही विषयांची गोडी लावायची तर दुसरी पर्यंत फक्त लेखन, वाचन, गणित एवढेच असावे. इतिहास, भूगोल, शास्त्र हे विषय स्वतंत्र न ठेवता, भाषा आणि गणिताच्या लेसन प्लॅन मधूनच शिकवावेत. त्याने खूप फरक पडतो. शिक्षण रंजक होते. साधे रोजचे तपमान सेल्सिअस मधे मोजणे, पावसाळ्यात पाऊस सेंटिमिटर मधे मोजणे , महिन्याभरातला पाऊस वगैरे, क्रिकेट फिवर असतो तेव्हा त्यासंबधीत नोंदी असे करुन अंक आणि त्याचे भाषानाम याचा रोज सराव केला तरी मूल सहज शिकते.
ग्रामीण भाषेत ४ विसा वगैरे म्हटले जाते ते अडाणी लोकं नोटांचा/पैशांचा हिशोब करतात तेव्हा. ज्या प्रकारच्या नोटा, नाणी आहेत त्याच्यात हिशोब करताना हे होते किंवा वस्तू मोजताना दहाचे गट करुन मोजणे चालते. आमच्याकडे बेणायला माणूस यायचा तो दिलेले पैसे मोजताना हे असे करायचा मात्र तारखेबाबत एकोणीस म्हटलेले कळायचे, वेळ सांगताना दोन वाजून पस्तीस म्हटलेले कळायचे.
नव्या बदलाने संख्यावाचन खरोखर सोपे होणार आहे की गोंधळ वाढणार आहे? लहान मूल हे खरेतर जितके रंजक पद्धतीने शिकवू तेवढ्या चांगल्या प्रकारे कठीण संकल्पनाही आत्मसात करते. लहान मुलांच्या मेंदूला जेवढे आव्हान जास्त तितका विकास चांगला होतो. सोपे करण्याच्या नादात आपण मुलांना पांगळे तर करत नाही ना याचाही विचार होणे फार गरजेचे आहे.
उच्च पदस्थांची मुले पहिली पासून इंग्रजी व्यतिरिक्त अजून एक परदेशी भाषाही शिकणार आणि सामान्य मराठी शाळेतील मुलांना ' सोपे करुन दिले' या सबबीवर चांगल्या दर्जाची मराठी भाषा, गणित याचेही शिक्षणही नाकारले जाणार असे होणार असेल तर 'सोप्या' ची किंमत किती?

बीबीसी मराठीवरची मुलाखत बघा -

१. स्वयंनिर्णय.
२. दोनापैकी एकाची निवड.

बाई भाषाबदल करतायेत हे अजुनी त्यांना कळत नाहीये किंवा कळूनही त्यांना ते मान्य करायचं नाहीये.
आपण भाषातज्ज्ञ नाही, निर्णय घेताना तज्ज्ञांची समिती नव्हती, चाचण्या घेतल्या नाहीत, हेही मुलाखतीतून स्पष्ट होतं.

माझ्या १९-०६ (३-१५) या प्रतिसादात एक उणे ऐंशी असे लिहिले आहे ते एक कमी ऐंशी असे हवे. ऐंशीमध्ये एक कमी असा अर्थ. कारण उणे म्हणजे कमी, कमतरता. तेच एकोणसत्तरसाठी.

"अरे जा रे.. तू स्वतःला लै शहाणा समजतो का? मी पन्नास-सहा बघितलेत तुझ्यासारखे..."

"....पन्नास-सहा ?"

"छप्पन म्हणायचंय त्याला.....नवीन सिलॅबसवाला आहे तो..... !!"

आणखी एक प्रश्न. मुलं मोठी झाली की हिंदी शिकणार. म्हणजे बहुतेक शाळांमध्ये असतंच. आता हिंदीतले आकडे तर तुम्ही बदलू शकणार नाहीयात. तिथे इक्कीस बाईस आणि इकडे वीस एक आणि वीस दोन? मग हिंदी शिकताना अडचण होणार नाहीये का? तिथे काय करायचं? इंग्लिश आकडेही बारापर्यंत आर्बिट्ररीच संख्यानामाचे आहेत.

बाकी बीबीसी आणि इतर ठिकाणच्या नारळीकर बाईंच्या मुलाखती विधाने वाचून चिनूक्सशी एकदम सहमत. मुळात त्यांची गणितशिक्षणतज्ज्ञ म्हणून काय पात्रता आहे नक्कि हेच मला कळलेलं नाहीये अजून. असो.
नीलेश निमकर (जे एकेकाळी रमेश पानसे यांचे सहायक होते) त्यांनी याची आवश्यकता आहे असे लिहिले आहे. वंचित समाजातील विद्यार्थी वर्गासाठी. त्यांची कळकळ कळू शकते आहे. पण मुळात यासाठी किती विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत, त्यांचे औपचारिक (शाळेतले, शाळेबाहेरचे) शिक्षक यावर काय म्हणतात, त्यांची मते काय आहेत याचे पद्धतशीर व्यापक सर्वेक्षण करण्याची गरज आहे. ती गणितज्ञांना कळू नये हे एक आश्चर्यच आहे. आपल्या अनुभवविश्वाची व्याप्ती हे 'सॅम्पलिंग युनिवर्स' कधीपासून झालं? घरातली मोलकरीण, गरीब- शाळेबाहेरची वंचित मुले- आपापले शालेय अनुभव (यात मी आणि आपण सगळे शहरी शाळांत शिकलेलेही आलोच) - जुने म्हातारेकोतारे काय वाक्प्रचार म्हणायचे इ.इ. च्या हकीकतींच्या आधारावर मते/ सरसकटीकरण धोरणपातळीवर करणे अत्यंत अयोग्य आहे. सर्वेक्षण, आकडेवारी, पायलट प्रोजेक्ट, राज्यातील शिक्षणतज्ज्ञ-भाषातज्ज्ञ यांच्याशी सखोल चर्चा, गणितशिक्षकांशी सखोल चर्चा असं काहीही न करता थेट एका इयत्तेसाठी नियम राबवलेला बघून तुघलक सुद्धा लाजेल..

गणित कळण्यात अडचणी नाहीत असं कुणी म्हणत नाहीये, पण त्याचे उत्तर हे अशा प्रकारे निश्चित नव्हे. आणि हे एका गणितअभ्यासकाला कळू नये याचे सखेद आश्चर्य वाटत आहे!

माझी काही हा बदल चूक की बरोबर असे स्पष्ट मत नाही पण जरा विचार करून पाहिला तर हा ऊपाय अगदीच टाकाऊ आहे असे वाटले नाही.

'गणित शिकण्यात सध्याची गणिताची भाषा अडसर आहे आणि हा दूर झाल्यास गणितात मागे पडणार्‍या मुलांची स्थिती लक्षणीय रित्या बदलू शकते' असा सबंधित तज्ञांनी (भाषा, गणित आणि प्रार्थमिक शिक्षण तज्ञांनी) अभ्यासाअंती निष्कर्ष काढला असेल तर मला नवीन संज्ञा स्वीकारण्यात काही वावगं वाटत नाही.
ध्येय गणित शिकणे आहे की गणिताची भाषा जगवणे आहे? गणिताच्या पुस्तकाच्या मागे लॉग टेबलसारखा
४२ = ४०+२ = १०*४+२ = बेचाळीस = चाळीस दोन = फोर्टी टू
असा तक्ता देणे ही शक्य आहे आणि त्यावर परिक्षेत एखादा प्रश्न विचारणे सुद्धा शक्य आहे.
किंवा मराठीच्या पुस्तकात गणिताच्या भाषेमधल्या शब्दांबद्द्लचा एक मजेशीर धडा घालणेसुद्धा शक्य आहे.
पुढे जाऊन गणित ईंग्लिशमध्ये शिकायचे असल्याने चाळीस दोन = फोर्टी टू हे मला सुलभीकरण वाटते.

जसे द्विभार्या, सप्तस्थान, चतूर्थ श्रेणी, अष्टावक्र, अष्टमांश, दशांगुळे, नवमी ईत्यादी शब्द आपण गणितात न शिकून सुद्धा आपल्याला ते माहित आहेत आणि आपण ते बोलीभाषेत वापरतो सुद्धा तसेच बेचाळीस, त्र्याऐंशी वगैरेंचे हा बदल अंमलात आणला तर होईल असे वाटते.

ईंग्लिश मिडियम मध्ये शिकलेल्या माझ्या बायकोला मी क्रिकेट मॅचचा स्कोर सांगतो, 'अडूसष्ट वर तीन विकेट्स' तेव्हा ती मला विचारते अडूसष्ट म्हणजे? वेगळ्या ऊचारामुळे तो शब्द तिच्या लक्षात राहतो आणि ती पुढच्यावेळी सिक्स्टी फोर सांगतांना अडूसष्ट मायनस फोर सांगते...मी चौसष्ट म्हंटले की अजून एक शब्द तिच्या मराठी 'वोकॅबलरीमध्ये' वाढतो. पण सदूसष्ट म्हणजे सिक्स्टी सेवन ह्याचा तिला अडूसष्ट आणि चौसष्ट वरून अंदाज बांधता येत नाही, तेच जर साठ सात म्हंटले तर तिला सोपे वाटले. मला वाटते मूळ अडचण त्रेचाळीस वरून सत्तेचाळीस आणि त्र्याहत्तर वरून सत्त्याहत्तर असे ट्रान्सिटिव लॉजिकने डीड्यूस करता न येणे हा आहे.
तो प्रॉब्लेम चाळीस तीन आणि चाळीस सात म्हणतांना येत नाही.

हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे आधीच वाटतही होते व वरील चर्चा वाचून आपले मत बरोबर होते असेही वाटत आहे

फक्त यात राजकारण येऊ नये असे वाटले

काय आहे, सवयीने सगळे चालवून घेता येते.
तसेहि जोडाक्षरे, काना मात्रा, र्‍हस्व दीर्घ इ. अनेक अडचणी मराठी भाषेत येतात - त्यामानाने इंग्रजी भाषा फार सोप्पी - निदान भारतात तरी. भारतात अ‍ॅक्सेंट, व्या़करण, उच्चार, स्पेलिंग याचे नियमच वेगळे. काय वाट्टेल तसे बोलले तरी समजून घेतात लोक. उलट व्वा, इंग्लिशमधून बोलतो, हुषार आहे हं असे म्हणतात लोक.
वाईफच्या डिलिव्हरीला ८:५७ ची फास्ट घेऊन सायन हॉस्पिटलला पोचलो. असे म्हंटले तर मराठी, म्हंटले तर इंग्रजी बोलावे.
विशेषतः भारतातून नुकतेच अमेरिकेत आलेले लोक आपआपसात जसे इंग्रजी बोलतात, ते आजकाल सगळ्यांना समजते.
तर एव्हढा बाऊ करू नका. हेहि चालते.

*संख्यानामे कायमच, पण संकल्पना आकलनासाठी नवी मांडणी*

गणिताच्या पुस्तकातील बदलांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर डॉ. मंगला नारळीकर यांचे स्पष्टीकरण
लोकसत्ता टीम | June 19, 2019

बावीस, बेचाळीस या संख्यानामांऐवजी आता वीस दोन, चाळीस दोन अशा बालभारतीच्या पुस्तकात सुचवण्यात आलेल्या नव्या पर्यायामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर पडदा टाकत ‘कोणतीही संख्यानामे हद्दपार झालेली नाहीत. बावीस, बेचाळीस अशी जुनी संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. विद्यार्थ्यांना सांख्यिकी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अजून एक पर्याय सुचवण्यात आला आहे,’ असे स्पष्टीकरणे बालभारतीच्या गणित समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी केले आहे.
दुसरीची पाठय़पुस्तके यंदापासून बदलली आहेत. त्यातील गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनासाठी संख्येची फोड करून देण्यात आली आहे. म्हणजेच २२ या संख्येसाठी ‘वीस दोन’ असा पर्याय सुचवण्यात आला आहे. पुस्तकात ‘वीस दोन’ – ‘बावीस’ असे नमूद करण्यात आले आहे. २१ ते ९९ मधील शून्य एकक संख्या म्हणजे १०, २०, ३०.. या वगळून इतर संख्यांसाठी नवा पर्याय सुचवण्यात आला आहे. संख्यानामातील बदलामुळे संभ्रम निर्माण झाला.
त्यानुसार एकवीस, बत्तीस, सेहेचाळीस, पंचावन्न ही आतापर्यंत प्रचलित संख्यानामे भाषेतून हद्दपार होणार का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. समाज माध्यमांवरही आता १९४७ हे वर्ष एक हजार नऊशे चाळीस सात असे वाचायचे का अशा प्रकारच्या चर्चा आणि विनोदही रंगले.
मात्र, कोणतीही संख्यानामे किंवा जुन्या पद्धतीचे संख्यावाचन हे हद्दपार करण्यात आलेले नाही. आता प्रचलित असणारी संख्यावाचनाची पद्धत कायमच राहणार आहे, असे स्पष्टीकरण बालभारतीच्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी दिले आहे.
शिक्षक, तज्ज्ञांमध्ये चर्चा
संख्यानामातील बदलांवरून शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांच्यामध्ये मंगळवारी चर्चा रंगल्या होत्या. वीस दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे. मूळ संख्यानामात कायम स्वरूपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी, संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे, अशी मते शिक्षकांनी व्यक्त केली. त्याचवेळी वीस दोन म्हटल्यावर विद्यार्थी बावीस ऐवजी दोनशे दोन लिहिण्याचा धोका आहे असाही एक मतप्रवाह आहे. केवळ भाषा किंवा जोडाक्षरे कठीण वाटतात म्हणून संख्यानामे बदलणे चुकीचे असल्याचा आक्षेपही अनेकांनी घेतला.
गोंधळ यंदाच का?
गेल्यावर्षी पहिलीसाठी नवी पाठय़पुस्तके आली. त्यामध्ये दशक ही संकल्पना वापरण्यात आली होती. त्यानुसार बावीस या संख्येसाठी वीस दशक दोन असा पर्याय देण्यात आला. त्यावेळी काहीच गोंधळ कसा निर्माण झाला नाही? ही संकल्पना स्विकारली गेली, त्यावेळी भाषेवर आक्रमण किंवा तत्सम काहीच वाटले नाही, तर ते यंदाच का असा प्रश्न अभ्यास मंडळातील सदस्यांनी उपस्थित केला आहे.
संख्या वाचनासाठी हा केवळ पर्याय.
*‘संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. जुन्या पद्धतीने बावीस, बत्तीस, सत्त्याऐंशी ही नामे कायमच राहणार आहेत. विद्यार्थ्यांना ब्याऐंशी म्हटल्यावर ऐंशी आणि दोन हे कळले पाहिजे. त्यासाठी आठ दशक दोन, ऐंशी दोन असे पर्याय देण्यात आले आहेत. याचा अर्थ जुनी संख्यानामे रद्द केली अथवा बदलली असे होत नाही. ज्या मुलांना जी संख्यानामे कळू शकतील ती शिकवावीत जेणेकरून गणिती संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. पुढील इयत्तांमध्ये मुलांची भाषिक जाण वाढेल तेव्हा ती प्रचलित संख्या नामे वापरू शकतील. मात्र, संख्यानाम कळले नाही म्हणून गणित कळत नाही असे होऊ नये यासाठी हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १९४७ ही संख्या एकोणीसशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते आणि एक हजार नऊशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते. या संख्येच्या वाचनासाठी हे पर्याय आहेत तसाच पर्याय दोन अंकी संख्येसाठी सुचवण्यात आला आहे.’*
*– डॉ. मंगला नारळीकर*

चूक / बरोबर शिकणारी मुलेच ठरवतील. ती अधिक चांगल्या तर्‍हेने शिकतायत की अजून संभ्रमात पडून नवीन चुका करतायत यावरून कळेल.

मात्र हे अनावश्यक व घातकही आहे हे नक्की.

सोपे सोपे करून आपण मुलांच्या क्षमता दुबळ्या करतोय. लहान मुले प्रचंड ग्रहणशील असतात. शाळेत न जाणारे मूलही स्वतःच्या आजूबाजूला रोज म्हटले जाणारे, सहज खेळताना कानावर पडणारे, मुद्दाम समोर बसवून न शिकवलेले संस्कृत श्लोक / स्तोत्रे देखील काही काळाने सुरात सूर मिसळून म्हणू शकते. ही मानवी मेंदूची किमया आहे. जोडाक्षरे किस झाड की पत्ती.

जितकी कठीण / आव्हानात्मक गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न होतो तितका मेंदू सक्षम व पुढच्या काठिण्य पातळ्या समजून घेण्यासाठी पारंगत होतो. ही निसर्गदत्त क्षमता आहे. त्या क्षमतेला जाणीवपूर्वक वापरात येऊ न देता ती झडून जावी असे निर्णय घेणारे नेमके कुठले तज्ज्ञ आहेत?

इतक्या छोट्या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा शिक्षकांना शिकवण्याचा पोत समोर असलेल्या मुलांच्या क्षमतेप्रमाणे बदलण्याचे कसब शिकवा. अशिक्षित घरातील शिकणारी पहिली पिढी, वीटभट्टी / उसतोडणी कामगार मुले, दुर्गम भागातील प्रमाण भाषा न येणारी मुले इत्यादिंचे प्रश्न / समस्या जरूर महत्त्वाचे आहेत आणि त्या फक्त गणित कठीण वाटणे इथवर मर्यादित नाहीत. पण त्यासाठी त्या तर्‍हेच्या मुलांना शिकवणार्‍यांचे ट्रेनिंग घ्या. पुस्तके बदलून घोळ घालायची गरज नाही.

निर्णय घेऊन पुस्तके छापेपर्यंत हे प्रकरण जाहीर केले नव्हते? आधी वाचनात आले नाही की असा काही निर्णय घेण्याचे घाटत आहे. त्या वयोगटातील हजारेक (एक तीन शून्य / एक हजार शून्य शतक शून्य दशक शून्य एकक) मुलांवर अशा संख्यावाचनाचे प्रयोग करून त्यांचा कल / प्रतिसाद / संकल्पना समजण्यातील फरक आजमवण्यात आलाय का? त्या प्रयोगाचे / ते यशस्वी-अयशस्वी ठरल्याचे / त्यातून काही नवीन सुधारणा तज्ज्ञांच्या लक्षात आल्याचे काही संख्याशास्त्रीय तपशील संबंधित तज्ज्ञ देऊ शकतील का?

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डमधील ----
८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ? >>>>>>>
या प्रश्नाला --- ज्यांची स्वतःची मुले मराठी माध्यमात शिकली नाहीत अशा तज्ज्ञांनी मराठी माध्यमातील मुलांचे संख्यावाचन याविषयी उठाठेव का करावी असा प्रतिप्रश्न विचारला तर चालेल का?

This is dumbing down of education for lazy teachers and students are going to suffer. या साऱ्या प्रकारात मंगला नारळीकर यांचे नाव वाचून सखेद आश्चर्य वाटले. पाठ्यपुस्तकात बदल कोणत्या संशोधनाच्या आधारे केला? या निर्णयाच्या पुष्टीसाठी काही विदा आहे का? देव मराठी भाषेत गणित शिकणाऱ्यांचे भले करो!

२८ वीस आठ = अठ्ठावीस
२९ वीस नऊ = एकोणतीस ... असं पेपरातील बालभारतीच्या स्क्रीन शॉट मध्ये दिसतंय.
यात नक्की डंबिंग डाऊन नक्की कुठे आहे? २८ ची फोड वीस + आठ अशी आहे. त्यातल्या २ म्हणजे २ नसून त्याची स्थानिय किंमत २० आहे. तुम्हाला आम्हाला त्यात २ न दिसता वीसच दिसतो (मला तरी दिसतो). दुसरीतील मुलांना स्थानिय किंम्मत सुटी करून दाखवली त्यात नक्की काय चुकलंय? मंगला नारळीकरांच्या स्पष्टीकरणात त्या लाऊड आणि क्लिअर सांगत आहेत की नामे बदलली नाहीयेत की बदलायची सुतराम शक्यता नाहीये. तरी त्यांच्या/ त्यांच्या नवर्‍याच्या राजकीय मतमतांतरांना रिंगणात आणून त्यावरूनच हे झालंय असा रंग देऊन यथेच्च धुळवड उडवणे क्लेषकारक आहे.
मुलांना गणित कठिण वाटतं त्याचं हे एक कारण आहे असं भरत ही वर म्हणताहेत (भरत तसं नसेल तर मी ही लाईन बदलतो, सॉरी तुमचं नाव घेतलं, पण मुद्दा समजण्यासाठी आहे) , माझ्या माहिती प्रमाणे ते आवड म्हणून गणितात मार्गदर्शनाची गरज असलेल्या मुलांना मदत/ समाजाप्रती कर्तव्य भावनेतून गणित/ भाषा शिकवतात आणि त्यांना आलेल्या (अ‍ॅनेकडॉटल) अनुभवातुन ते हे म्हणत असावेत. एकदा दोन अंकी संख्येत दुसरा अंक हा दशम स्थान आहे हे मुलांना दिसायला लागलं की तीन अंकी संख्येत शतम स्थान... रादर दशमान पद्धती म्हणजे काय... आणि नवानंतर बेरजेत हातचा घेतो म्हणजे पुढच्या दहा च्या पॉवर मध्ये एक वाढतो... हे समजायला जादूईरित्या मदत होईल. हे लिहिताना ही, मला माझ्या मुलाला शिकवताना त्याने स्वतः तीन आकड्यांत शतम स्थान म्हणजे काय? हे स्वतःचं स्वत: डिस्कव्हर केल्यावर त्याच्या डोळ्यात जी चमक आलेली ती आठवुन शहारायला झालं.
प्लीज, याकडे भाषेवर आघात, डंब डाऊन म्हणून बघू नका. जे स्ट्रगल करताहेत त्यांना मदतीचा हात आहे हा. ज्यांना गरज नाही वाटणार त्यांनी एकदम अठ्ठावीस वाचा. पण तुमच्या प्युरीटी साठी मुलांना त्रास नका देऊ.

वर त्यांनी १९४७ चं उदाहरण दिलं आहे. तो आकडा वाचताना जसं एकोणिसशे सत्तेचाळीस किंवा एक हजार नऊशे सत्तेचाळीस म्हणतो. तसंच दोन आकडी संख्यांना समजायला एक सोपं रूप आहे हे. व्यवहारात याचा शून्य वापर होईल. फक्त समजायला एक क्लुप्ती आहे.

चूक.

निमकर यांचा लेख, नारळीकरांची मुलाखत यावरून नक्की काय झालं आहे ते कळेल.

पुस्तकात असे लिहीणे हे dumbing down च आहे. पुस्तकात लिहिलेले नसताना देखील तू, मी आणि इतर असंख्य विद्यार्थी बत्तीस म्हणजे तीस अधिक दोन हे शिकलेच ना? कोणामुळे तर शिक्षकांमुळे. शिक्षकांना अधिक चांगले कसे शिकवता येईल याकडे लक्ष न देता तीस दोन छापून टाकणे हे पाट्या टाकणे आहे. उद्या इंग्रजी सोपी जावी म्हणून उच्चारांसारखी स्पेलिंग्स योग्य स्पेलिंगच्या बाजूला लिहीली तर चालतील का?

२८ वीस आठ = अठ्ठावीस
२९ वीस नऊ = एकोणतीस ... असं पेपरातील बालभारतीच्या स्क्रीन शॉट मध्ये दिसतंय.
>>२८ वीस + आठ = अठ्ठावीस असे योग्य नाही का होणार. मी पाढे शिकले तेव्हा वीसा पाचा शंभर असे शिकले. आता २५ वीस पाच = पंचवीस आणि वीसा पाचा शंभर असे असेल तर मुलांचा गोंधळ वाढणार नाही का? चिन्ह का गाळले आहे?

इथे सगळेच जण इंग्रजी भाषेत शिक्षण घेतात. बर्‍याच जणांची तिच मातृभाषाही आहे. माझ्या गावात तर अगदी ९९% लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे. २० आणि त्या पुढले अंक twenty, twenty -one, ....., twenty-nine असे लॉजिकल पॅटर्नने येतात. मात्र असे असले तरी गणिताची गोडी, त्यातली प्रगती हे सहज साध्य आहे का? तर उत्तर नकारात्मक येते. भाषा, गणित या विषयाची गोडी लावताना पूर्व प्राथमिक शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो. ३-५ या वयात लेखनावर अवाजवी भर न देता चित्रं, रोजच्या वापरातल्या वस्तू यांचा वापर केला, गाणी म्हणणे, गोष्टी वाचून दाखवणे केले तर मूल छान शिकते. त्याच जोडीला मूल जे काही शाळेत शिकते ते शाळेपुरते मर्यादित न ठेवता त्याचा रोजच्या वावरात जेवढा जास्त वापर होतो तेवढे कौशल्य वाढते. यासाठी महागडे विशेष साहित्यही लागत नाही. पालकांना आणि शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर मुलांच्या प्रगतीत लक्षणीय बदल होतो. केजी ते तिसरी ही शिकण्याच्या संधीची, आवड निर्माण करण्याची खूप महत्वाची खिडकी. त्यानंतर भाषा काय किंवा गणित/शास्त्र काय आवड निर्माण करणे, भीती घालवणे हे कठीण होत जाते. मुलांचे शिकणे सोपे व्हावे, हसत खेळत व्हावे, परीक्षा-मार्क याच्या पलिकडेही सतत सुरु रहावे, मात्र यासाठी आवड निर्माण करणे जाणीवपूर्वक, कष्ट घेवून करावे लागते तिथे शॉर्ट कट नाही.

>>पुस्तकात लिहिलेले नसताना देखील तू, मी आणि इतर असंख्य विद्यार्थी बत्तीस म्हणजे तीस अधिक दोन हे शिकलेच ना? >> हो तू/ मी शिकलो. कारण शिक्षक/ घरातील वातावरण इ. इ. पण माझ्या शाळेत/ वर्गात तरी स्ट्रगल करणारी मुलं होती, आणि माझ्या शिक्षकांनी त्यांची जाहिर टर उडवलेली मी बघितली आहे. कोणाला काही येत नसेल तर त्याचा अपमान आणि टर उडवणारे शिक्षक माझ्या शाळेत अनेक होते, अर्थात त्याच बरोबर काही मदत करणारे हे शिक्षक होते. पण शाळेबद्दल प्रेम वाटावे अशी परिस्थिती न्हवती. (शाळा: टिळक नगर विद्या मंदिर, डोंबिवली) आज माझ्या मुलाचे शिक्षक बघितले की मागे वळून बघताना मला ते खूप जाणवते आणि खूप खुपते ही. (सौ. सरोज खरे सारखी परिस्थिती होते :फिदी:)

शिक्षकांना चांगले कसे शिकवता येईल याकडे बघितलं पाहिजे यात काहीच मतभेद नाही. पण हे पाट्या टाकणे आहे हे वाटत नाही.
इंग्रजी उच्चारासारखी स्पेलिंग (याला स्पेलिंग नाही म्हणत... पण उच्चार कसा करावा यासाठी मदत म्हणून जे लिहितो ते) शब्दकोशात असतात की! हे बर्‍या पैकी चपखल उदाहरण झालं बहुतेक.

अमितव,

अनेक लिन्का वर दिला आहेत, तरी पुन्हा चुकीचंच आकलन झाल्यामुळे सविस्तर लुहितो.

१. आता संख्यावाचनाचे दोन पर्याय आहेत. अठ्ठावीस ही संख्या, उदाहरणार्थ, वीस आठ किंवा अठ्ठावीस अशी वाचता येईल. या दोन पर्यायांपैकी कुठला पर्याय शिकवायचा, हे शिक्षकानं ठरवायचं.

२. नारळीकरांच्या म्हणण्यानुसार ही मुलं मोठी झाली की त्यांना अठ्ठावीस अक्षरांत लिहिता येईल. मग त्यांनी स्वयंनिर्णय घेऊन ठरवावं की आपल्याला वीस आठ म्हणायचं आहे की अठ्ठावीस.

३. आता या विचारसरणीत अनेक धोके आहेत -

अ. मुलं स्वयंनिर्णय कशाच्या आधारावर घेणार?
आ. एकाच वर्गातली किंवा घरातली मुलं वेगवेगळ्या प्रकारे संख्यावाचन करणार. त्यातून त्यांच्या डोक्यात नवे गोंधळ तयार होतील.

४. निमकर या प्रस्तावाचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं आहे की या निर्णयाचे परिणाम दूरगामी आहेत आणि आपल्याला त्यासाठी अनेक व्यवस्था बदलाव्या लागतील. उदाहरणार्थ, चेक लिहिताना बॅन्केने नवी पद्धतही स्वीकारणे.

५. नारळीकरबाई या परिणामांचा उल्लेख तर करत नाहीतच, पण हे केवळ पुढच्या दोन यत्तांपर्यंत आहे, असं सांगतात. त्यापुढे आपण संख्या अक्षरांत लिहीत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

६. निमकर हे बदल रुजवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, हे सांगतात. गीता महाशब्दे यांनीही सरकार - पालक - शिक्षक यांच्यात समन्वय हवा, हे सांगितलं आहे. याचा अर्थ असा की या निर्णयाला राजकीय बाजूही आहेच. हा सरळसरळ भाषाबदलाचा निर्णय आहे.

७. नारळीकरबाई मात्र आम्ही भाषाबदल केलेला नाही, हे सांगतात.

८. हे निर्णय अंमलात आणताना पायलट प्रोजेक्ट राबवलेले नाहीत. नारळीकरबाईंकडे आकडेवारीही नाही. त्या आपल्या मदतनीस स्त्रीचा आणि ;कॉमन सेन्स'चा दाखला देतात. हे सर्वथा अशास्त्रीय आहे.

९. पहिलीत जोडाक्षरं नाहीत, हा त्यांचा दावाही चूक आहे.

निमकर जे मोकळेपणे कबूल करतात ते नारळीकरबाई का लपवतात?
भाषाबदलासारखे मोठे निर्णय राबवण्यात राजकीय विचारसरणी एक असणं सोयीचंच असतं. ते नसेल कळत / पटत तर असो, पण निदान मुद्दा समजून आणि पूर्ण माहिती घेऊन पोस्टी पाडाव्या, ही अपेक्षा आहे.

*

एक मुद्दा राहिला - नारळीकरबाई म्हणतात, हा बदल पहिल्या शंभर आकड्यांपर्यंतच आहे. म्हणजे १९४७ ही संख्या एकोणीसशे चाळीस सात अशी वाचता येईल किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस अशी. मग ३५०० ही संख्या कशी वाचायची? इथे पुन्हा 'पस्तीस' हा नारळीकरबाईंच्या मते गोंधळ घालणारा आकडा आलाच.

मुळात ही सोय गणनाची आहे, गणिताची नाही. वीस दशक आठ म्हणजे अठ्ठावीस हे मुलांना शिकवता येतं. क्वेस्टने तसं केलं आहे.
गणन उत्तम येण्यासाठी मणी, दोरे इत्यादी शैक्षणिक साधनं वापरता येतात.

दुसरा मुद्दा असा की, नारळीकरबाई फ्रेंच व दाक्षिणात्य भाषांचा दाखला देतात. या भाषांमध्ये दशम स्थान आधी व एकम स्थान नंतर असल्याने मराठीतही तसं असावं, असं त्यांना वाटतं. हे सपाटीकरण त्यांच्या विचारसरणीशी जुळत असलं, तरी त्याचा शिरकाव व्यवहारात होता कामा नये.

हे दुसरीच्या नव्या पुस्तकातून -

दुसरीच्या गणिताचा पुस्तकात काही बदल केलेले दिसतील. महत्त्वाचा बदल २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व शब्दांत लेखन यांत आहे. या संख्यांचे वाचन सत्तावीस ऐवजी वीस सात, अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, सत्त्याण्णाव ऐवजी नव्वद सात असे शिकवावे. कारण या पद्धतीने बरीचशी जोदाक्षरे गळतात आणि बोलणे व लिहिणे यांचा क्रम सारखा राहतो. उदाहरणार्थ पंचेचाळीसमध्ये आधी पाच व नंतर चाळीस येतात परंतु ही संख्या ४५ अशी लिहिताना आधी चाळीसचा चार, नंतर पाच लिहिला जातो. शिवाय जोडाक्षरे असणारे शब्द, (जसे अठ्ठ्याण्णव, त्र्याण्णव, त्र्याहत्तर, सत्त्याऐंशी, त्रेसष्ठ इत्यादी) पाठ करावे लागत नाहीत; लिहावेही लागत नाहीत. म्हणून शिक्षकांनी शिकवताना वीस सात, चाळीस तीन अशा प्रकारचे वाचन व लेखन शिकवावे. काही विद्यार्थी आधीच परंपरागत पद्धतीने सत्तावीस, अठ्ठावीस, त्रेसष्ठ हे शब्द शिकले असतील. म्हणून दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरले जातील. शब्दांत संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवी पद्धत सोपी आहे हे अनुभवता येईल. इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगु, मल्याळी व तमीळ या दक्षिण भारतीय भाषांमधे देखील संख्यावाचन याप्रकारे केले जाते व ते विद्यार्थ्यांना सोपे जाते. जोडाक्षरे असणारे अनेक शब्द हे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण होण्याचे एक कारण आहे. ते काढून टाकू.

***

नारळीकरबाई जे म्हणतात की शिकवण्याचा पर्याय दिला आहे, हेही खोटं आहे, हे यावरून लक्षात येईल. नवी पद्धतच शिकवायची आहे.

अमितव, इंग्रजी भाषेचा शब्दकोश म्हणजे इंग्रजीचे पाठ्यपुस्तक असू शकत नाही. हे उदाहरण चपखल कसे काय ते मला समजावून सांग.

>>इंग्रजी उच्चारासारखी स्पेलिंग (याला स्पेलिंग नाही म्हणत... पण उच्चार कसा करावा यासाठी मदत म्हणून जे लिहितो ते) शब्दकोशात असतात की! हे बर्‍या पैकी चपखल उदाहरण झालं बहुतेक.>>
अमितव,
इंग्रजी शब्दकोशात उच्चार कसा करावा म्हणून जे कंसात असते त्याचीही नियमावली आहे.
https://www.merriam-webster.com/assets/mw/static/pdf/help/guide-to-pronu...
ही नियमावली वापरुन नव्या शब्दाचा उच्चार कळतो. मात्र असे असले तरी हे प्राथमिक शाळेच्या लेवलला मुले हे शिकत नाहीत. मुलं कशाला किती मोठी माणसे नियमावलीच्या कागदाशिवाय दुसर्‍या व्यक्तीसाठी उच्चार लिहून देवू शकतील किंवा नवा शब्द वाचू शकतील?
फोनिक्स कोडिंगचा चार्ट देखील सरसकट सर्व शाळांमधून शिकवत नाहीत. लेकाच्या प्रायवेट शाळेत कोडिंग चार्ट, त्यावरुन होमवर्क असे मात्र पब्लिक स्कूलला नव्हते.

मुलांना गणितातली संकल्पना कळावी म्हणून लिहायचे तर
२७ = ७ +२० = सत्तावीस
२८ = ८ + २० = अठ्ठावीस
२९ = ९+२० = ३०-१ = एक उणे तीस = एकोणतीस
असे शिकवावे.
इंग्रजी किंवा इतर कुठल्या दुसर्‍या भाषेच्या संदर्भाने न बघता, निव्वळ मराठी म्हणून बघितले तर हे लॉजिकल होत नाही का?
कोकणचे चांगले कोकण करण्या ऐवजी कॅलिफोर्निया, मुंबईचे चांगले मुंबई करण्या ऐवजी शांघाय करायची हौस तसे इतर भाषांकडे बघून मराठीतच बदल तोही गणित सोप्पे करण्यासाठी?

चिनुक्सच्या म्हणण्यानुसार हे बदल न विचारता , टेस्ट न करता झालेत तर त्यावरचा आक्षेप समजतोय.
पण त्यामुळे काही लोक इथे म्हणत आहे असे गणित सोपे करुन मुलांच्या विकासाची गती खुंटणार, त्यांचे नुकसान होणार याचे खुप नवल वाटत आहे. आपण सर्वजण डिग्रीपर्यंत गणित शिकलोय ना? मग फक्त वीस एक, वीस दोन म्हणजे संपुर्ण गणित झाले? नाही. गणित त्याहुन भयानक अवघड आहे हे आपल्याला माहिती आहे. केवळ तीस एक, चाळीस दोन हेच गणित नव्हे. हे केवळ अगदी सुरुवातीच्या वयात शिकवण्यासाठी सोपे करुन शिकवणे आहे. दुसरीत असे किती गणित शिकतात मुल? ३०, १७, ३२ चे पाढे शिकतात? नाही. (जर ते शिकावे लागत असेल मुलांना तर ते टॉर्चर आहे, वीस दोन अथवा बावीस शिकण्यापेक्षा, ते आधी बदलायचे पहा). उलट पर्याय व प्रचलित शब्द हे आव्हानात्मक आहे जे मुलं शिकतील. काही त्यांच्या मेंदुचा खुराक काढुन घेतला जाणार नाहिये. पोरं घरातली, शाळेतली, पालकांच्या वेगळ्या भाषा असतील तर त्या, पाळणाघरातली अजुन एक अशा सर्व भाषा कानावर पडुनपडुन गोंधळली तरी शिकतात, नव्हे शाळेत आवर्जुन सांगतात की मुलांशी घरच्या भाषेतच बोला, इंग्लीश ती शाळेत शिकतीलच. मग आता नवीन व जुनी , दोन्ही का शिकु शकणार नाहीत? शिक्षकांना पण सांगावे लागेल की सोपे शिकवाच पण प्रचलीत पण शिकवा.
आपण शिकलो , आपल्याला कळले म्हणुन ‘त्याच’ पद्धतीने शिकवायला हवे हा आग्रह का आणि म्हणुन भाषेवर, गणितावर घाला येणार आणि ती मुले दुर्दैवी???? फारच नवल वाटते आहे अशा विचाराचे.
बदल हे होतातच. स्पुन फिडिंग हे होतेच. पण वीसएक , वीसदोन शिवाय अजुन प्रचंड काही आयुष्यात शिकावे लागते व ते अवघडच असते. हे सोपे झाले म्हणुन मुलांना ‘ते’ शिकणे भयंकर अवघड वा अशक्य होणार आहे असे काहीही नाही.

निमकर कुठल्या शासकीय पदावर नाहीत असं वाचल्यावर समजलं. वर्क्ड अ‍ॅज ट्रेनिंग कनसल्टंट फॉर District Primary Education Program, Government of Maharashtra. इ. माहिती शिक्षक.ओआरजी वर आहे. त्यांचा ह्या निर्णयात डायरेक्ट सहभाग होता का? २००२ ची वर्धा शिक्षक सभा आणि इतर सांगोवांगींच्या कथा नको, आणि कोण हिंदूराष्ट्राचे स्वप्न बघते असले जावईशोध ही नको. टिपिकल राईट विंग कॉन्झर्वेटिव्ह फिअर माँगरिंग अजिबात नको.
त्यांची इथली मते रॅडीकल आणि सर्वंकश बदलाची आहेत ज्याला माझा जराही पाठिंबा नाही. त्यांच्या मते सध्या आहे त्यात काही तरी चूक आहे आणि ते बरोबर करायच्या अविर्भावात त्यांना यच्चयावत सगळं बदलायचं आहे. जे मला बिलकुल योग्य वाटत नाही.

मंगला नारळीकरांची मुलाखत ऐकली आणि पेपर मधल्या बातम्याही परत वाचल्या आणि त्यात त्या परत परत हेच सांगत आहेत की मुलांना शिकवायला एक स्टेपिंग स्टोन आहे. हा बदल वाचिक आणि वाचिकच
आहे. लेखनात बदल नाही. तो ही दुसरी/ तिसरीतच मुलांना आकडे शब्दांत वाचण्यापुरताच आहे.

आता लिंका आणि शिक्षण तज्ज्ञांची मतं: (बीबीसी मराठी वर लोकांचा विश्वास आहे म्हणून तिथूनच)
गणित शिकण्यासाठी मुलांना ही नवी पद्धत उपयोगी ठरेल, असं मत बहुतांश शिक्षणतज्ज्ञांनी आणि भाषा अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. मात्र अचानक ही पद्धत वापरात आल्यामुळं गणित शिकवणारे शिक्षक आणि मुलं यांना थोडंसं जड जाईल अशी काळजीही त्यांनी व्यक्त केली. रूढ पद्धतींमुळे जर गणित, आकडे शिकण्यासाठी अडथळे येत असतील तर नव्या पद्धतींचा आणि इतर भाषांनी उपयोगात आणलेल्या पद्धतींचाही विचार केला पाहिजे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

२. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत काळपांडे यांना ही बदललेली पद्धत योग्य वाटते. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रूढ पद्धतीनं जे संख्यावाचन होतं, ती पद्धत विद्यार्थ्यांना समजायला अवघड जाते. त्यामुळे प्राथमिक वर्गांमध्ये गणित शिकत असताना नवीन अवलंबलेली पद्धत उपयोगी पडेल. कारण गणितात शंभरच्या पुढे संख्या गेली की संख्यावाचन सोपं होतं, पण दोन अंकी संख्या आणि त्यांची एकेक किंमत समजायला विद्यार्थ्यांना कठीण जाते. पण ही नवीन पद्धत अतिशय उपयुक्त आहे, कारण विद्यार्थ्यांचा प्राथमिक पाया जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत गणित समजत नाही."

"गणितातल्या ज्या मूलभूत प्रक्रिया आहेत, म्हणजेच वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार या विद्यार्थ्यांना व्यवस्थित जमत नाहीत. त्यामुळे आकडे समजून घेण्याची ही पद्धत खूप उपयुक्त आहे," असं काळपांडे यांना वाटतं. शिक्षकांना हा बदल एकदम अनपेक्षित होता, पण त्यांना हा सुखद धक्का बसला आहे, असंही ते सांगतात.

३. " या पद्धतीने गणित समजायला सोपं होईल अशी प्रतिक्रिया मला अनेक शिक्षकांनी दिली आहे. पण हा बदल फक्त प्राथमिक शिक्षणापुरताच मर्यादित आहे. हा बदल सार्वत्रिक होणे फार कठीण आहे. बालभारतीचा तसा बदल करण्याचा विचार नाही. संख्यावाचन करताना 'वीस पाच' म्हणजे पंचवीस अशा पद्धतीने शिकवले जाईल. त्यामुळे मुलांचा कोणताही गोंधळ होणार नसून त्यांना गणित समजायला सोपं जाईल," असं काळपांडे यांनी म्हटलं.

४.लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या मते हा फक्त भाषेचा प्रश्न नाही तर गणिताचा आहे. त्या म्हणतात, "मुलांना या पद्धतीनं शिकणं सोपं जात असेल आणि गणितज्ज्ञांनी विचार करून ठरवलं असेल तर या पद्धतीचे बदल केले पाहिजेत.

शाळेत शिकत असताना वेगवेगळया सामाजिक आणि बौद्धिक स्तरातील विद्यार्थी येतात. या पद्धतीने समजत असेल तर भाषेत तसे बदल केले पाहिजेत. हे बदल स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण मग मुलांना विषय समजणं जास्त महत्त्वाचं आहे."

"रूढ असलेली पद्धत आपण सगळे स्वीकारत जातो. पण सोपं काय, अवघड काय याचा विचार तज्ज्ञांनी केला पाहिजे आणि भाषेत बदल केले पाहिजे," असंही त्यांनी सांगितलं.

५. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील कन्या विद्यामंदिरचे कृष्णा कोरे सांगतात," शिक्षक म्हणून मला हा निर्णय योग्य आणि सकारात्मक वाटतो. गणिताची एकूण आकडेवारी मुलांना अवघड वाटत असते. त्यात त्यांना जोडाक्षरं समजायला कठीण जातात. त्यामुळे जोडाक्षरांची अशी फोड विद्यार्थ्यांना सोपी जाईल.
"पण हा निर्णय असा अचानक राबवणे योग्य नाही. यासाठी शिक्षकांची काही पूर्वतयारी होणं गरजेचं होतं. कारण हा बदल शिक्षकांनी स्वीकारणं, त्यांच्या अंगवळणी पडणं जास्त गरजेचं आहे. इतक्या वर्षांच्या शिकवण्याच्या पद्धतीत असा अचानक बदल केला तर शिक्षक कसे शिकवतील? त्यामुळे हा निर्णय जरी योग्य आणि सकारात्मक असला तरी शिक्षक गणित शिकविण्यात हा बदल कशाप्रकारे करतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. "

६. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या नवीन पद्धतीचं स्वागत केलं आहे. "विद्यार्थ्यांना वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना जर संख्यावाचन येत नसेल तर या क्रिया करताना त्यांना अडचणी येतात," असं त्यांनी सांगितलं.

"महाराष्ट्रातील 200 शाळांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं, की विद्यार्थ्यांना दशक आणि एकक या संकल्पनाच समजत नाहीत. इंग्रजी भाषेत जसे अंक उच्चारले जातात 'फिफ्टी फोर' वगैरे त्यातून दशक-एकक स्पष्ट होतात. मराठीत मात्र चोवीस, पंच्चावन्न अशा उच्चारांमुळे एकक दशक स्पष्ट होत नाहीत. तर अठ्यात्तर की अस्ठ्यांत्तर, एकोणीस की एकोणावीस अशा उच्चारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. त्यामुळे गणिताचा तणाव कमी करण्यासाठी आकडे सोपे करण्याची गरज आहे."

७. बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्यानुसार, "हा बदल अचानक केला नाही. मागच्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात हा बदल केला होता. आता दुसरीच्या वर्गात केला गेला आहे आणि गणित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावरूनच हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात अशा बदललेल्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. "

सगळं बीबीसी मराठी वरुन साभार.

Pages