तू....तूच ती!! S२ भाग ११

Submitted by किल्ली on 8 June, 2019 - 05:52

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
भाग १०: https://www.maayboli.com/node/69316
------------------------------------------------------------------------------------------------
श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता. श्रुती जागेवरून उभी राहिली. हातातला मग बाजूला ठेवला. आदित्य बसला होता तिथून थोडंसं दूर गेली आणि खिडकीकडे पाहत उभी राहिली.
असं तिने आयुष्यात कधी कोणाला म्हटलं नव्हतं ते तिला आता बोलायचं होतं. अशीच शांततेत काही मिनिटं गेली. मनाचा हिय्या करून श्रुती मागे वळली आणि म्हणाली, " हे म्हणायला मी पात्र आहे की नाही ते माहिती नाही. पण, मोठ्या मनाने माफ कर मला.
मी मान्य करते की असं तुला सोडून जायला नको होतं. माझ्या अशा वागण्याने तुझा, तुझ्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि मैत्रीचाही अपमान झाला. तरीही तू माझ्यावर विश्वास दाखवलास. प्रेम करत राहिलास. तुझ्या डोळ्यांत स्पष्ट दिसतं ते. पण म्हणून तू माझ्यावर रागावू नये असं मात्र नाही हा. तुझा हक्क आहे तो. किंबहुना तू माझ्यावर चिडायला हवंस आणि जाब विचारायला हवास की का अशी सगळं अर्धवट टाकून सोडून गेलीस ?
--------------------
"बोल ना रे आदित्य. तुझी ह्या बाबींवरील शांतताच छळते मला. इतका समजूतदारपणा काय कामाचा? ठीके, एवढं छान छान वागत आला आहेस तर तसंच माफ पण करशील ना रे? I am really very sorry"."
सॉरी म्हणताना श्रुतीचा आवाज जड झाला असला तरी मन हलकं झालं होतं. इतके दिवस बाळगलेलं मनावरचं अपराधीपणाचं मणभर ओझं दूर झालं ह्याचं नक्कीच तिला समाधान लाभलं होतं.
आदित्यला मात्र तिचं सॉरी अपेक्षित नव्हतं. तिने माफी मागावी अशी त्याची इच्छाही कधीच नव्हती. त्यामुळे तो थोडासा गडबडला. पण आज तिच्या मनातल्या भावना व्यक्त होताहेत, तिची बाजू ऐकली गेलीये आणि ती जरी अचानक गेली असली तरी श्रुती वाईट, गर्विष्ठ नाहीये ह्यावर त्याच्या मनात शिक्कामोर्तब झालं. आदित्य जेवढा तिला ओळखत होता त्यानुसार ती घडाघडा बोलणारी नाहीये हे त्याला माहित होतं. आज ती एवढं मनमोकळं बोलत आहे म्हणजे ती खरंच मनापासून बोलतेय, जे घडलं त्याबद्दल तिलाही वाईट वाटत आहे, हे जाणून आदित्यला एवढे तरी कळले की मुलगी प्रेमाच्या जवळ येत आहे. आता हे माणुसकी व मैत्रीखातर बोलतेय की खरंच प्रेमात आहे हे काही अजून स्पष्ट झालं नव्हतं. एक मात्र नक्की की, श्रुती आणि आदित्य ह्या उभयतांमध्ये मैत्रीचा बंध जरूर होता. असा विचार करत असताना काहीही न बोलता शांतपणे आदित्य जागेवरून उठला. दोघांचे मग घेऊन त्याने ते सिंकमध्ये नेऊन ठेवले.

तो काय बोलतो ह्याच्या विचाराने श्रुतीला इकडे धडधडू लागलं होतं. त्याने आपल्याला माफ केलं नाही तर काय होईल अशी वेडी शंकाही तिच्या मनात डोकावून गेली ती अधीरतेने त्याच्याकडे पाहत होती. तो काही मिनिटांचा पॉझ तिला असह्य होत होता. तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
आदित्य पाण्याचे ग्लास भरत होता. ते ग्लास ट्रे वर ठेऊन त्याने तो ट्रे श्रुतीसमोर धरला. "हे घे पाणी पी श्रु, कॉफी घेऊन बराच वेळ झालाय ना. तहान लागली असेल. किती बोलतेस तू, पाणी प्यायला सुद्धा वेळ दिला नाहीस."
श्रुती: "आदित्य, सांग ना माफ केलं की नाही ते "
छानशी आश्वासक स्माईल देत आदित्य म्हणाला, "माफी काय मागतेस श्रुती गुन्हेगार असल्यासारखी. खरं सांगायचं तर मी रागावलो नव्हतो तुझ्यावर. पण तुला खूप मिस केलं, मनातल्या भावना न सांगता गेलीस, जे आहे ते स्पष्ट बोललीस तरी चाललं असतं असं सारखं वाटायचं. पण तू काळजी करू नकोस. त्यावेळी तुझी मनस्थिती कशी होती, तू काय विचार केलास आणि का तशी वागलीस ह्याचं पुरेसं स्पष्टीकरण दिलंय तू. मनमोकळं बोललीस ह्याचा आनंद झालाय मला. तुझ्या आजच्या बोलण्यामुळे मला एवढं समजलं आहे की माझं तुझ्या मनात काहीतरी स्थान आहे."
श्रुती: "हम्म"
आदित्य: "आणि मॅडम, तुमच्या माहितीसाठी मैत्रीच्या नात्यात माफी, धन्यवाद वगैरे औपचारिकतेला स्थान नसते. त्यामुळे तू माझी माफी मागण्याचा आणि मी तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही."
रुती: "सरळसरळ सांग ना, सॉरीने काही फरक पडत नाही. जे व्हायचं होतं ते झालं आता सुधारता येणार नाही म्हणून" रडवेली होऊन श्रुती म्हणाली.
आदित्य: "बरं बाई, मी चुकलो माफ कर मला"
श्रुती: "तुझा सॉरी म्हणायचा काय संबंध?"
आदित्य: "एवढ्या सुंदर मुलीला रडवल ना मी"
श्रुती: "मी रडत नाहीये"
आदित्य: "चेहऱ्यावर दिसतंय, बादली घेऊन येतो अश्रू भरून ठेवायला लागतील ना, ऐतिहासिक आहेत ते"
श्रुती: "चेष्टा पुरे ना आदित्य, खरं सांग, माफ केलं का नाही"
आदित्य: "तू तर पिच्छा पुरवत आहेस माझा"
श्रुती आता चिडायला लागली होती. तिचा मूड बिघडायला नको म्हणून आदित्य म्हणाला, "जा मुली, माफ केलं तुला. तू भी क्या याद करेगी"
श्रुती: ” खरंच ना?”
आदित्य: “हो गं , आता लिहून द्यावं लागेल का मला?
असंही तुझा documentation वर फारच विश्वास आहे म्हणा, आठवतंय का? ऑफिस मध्ये तुझं रोज कसलंतरी document तयार असायचं. आज काय नोट्स उद्या काय मीटिंग चे मुद्दे , उद्या काय कोड कसा लिहावा ह्याच्या guidelines असायच्या juniors साठी! तू पाठवलेल्या documents च्या मेल्स बघून पकलो होतो मी. तुला माहितेय का, तू सोडून गेल्यांनतर अशी शिस्त कुणीच पाळलीच नाही. करायची प्रोसेस म्हणून लोक काहीतरी करायचे बास! पण तुझं कामाप्रती असलेलं dedication जबरदस्त होतं. मानलं यार!”
श्रुती: “थँक्स. खूप बोर करते का रे मी ? पण सवयीचा भाग होता तो! गोष्टींची नोंद करायला, त्या डायरीत लिहून ठेवायला मला फार आवडतं. माझी डायरी माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.”
आदित्य: "I know, you are an introvert! त्यामुळे तुझ्याबद्दल 'तू खडूस आहेस' असा लोकांचा ग्रह होतो.”
श्रुती: “काय सांगतोस, हो का?”
आदित्य: “मग काय, सुरुवातीला किती फटकून वागायचीस तू. नंतर मात्र छान रूळलीस ऑफिस मध्ये. विशेषतः त्या पार्टी नंतर. खूप सुंदर दिसत होतीस तू. त्या दिवशीच तुला मनातलं सांगणार होतो. सगळे मला किती आग्रह करत होते माहितीये का, आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून मुद्दाम सोडून जात होते.”
आदित्यचं हे वाक्य ऐकून श्रुती आश्चर्याने जागेवरून उठली. हातातल्या ग्लासशी उगाचच चाळा करत जराशी लाजून आणि त्याला ते समजू नये म्हणून चेहरा जरासा वळवून म्हणाली, "म्हणजे सगळयांना माहिती होतं? मला वाटलं हे माझंच गुपित आहे आणि मला एकटीलाच माहितीये."
आदित्य: "तू तुझ्याच जगात हरवलेली असायचीस ना, आमच्याकडे लक्ष नव्हतंच तुझं. मी तुला मनातलं सांगण्याआधी त्याबद्दल तुला हिंट द्यायचा सगळ्यांनी प्रयत्न केला होता. तरी तुला हिंट नाही समजल्या".

आदित्यचं बोलणं मध्येच तोडत श्रुती म्हणाली, "क्काय, काहीही बोलतोयस आता तू. बरं एक सांग ना…”
आदित्य: “दोन सांगतो, पण काय?”
श्रुती: “गप रे, मला बोलू तर दे. आणि अजून एक लक्षात ठेव, मी जास्त कुणाशी बोलत नसले तरी मला माझं बारीक लक्ष असायचं बरं का तुमच्या सगळ्यांकडे. तुमच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी माहिती आहेत मला.”
श्रुतीच्या या विधानावर आदित्य हसू लागला. “काही माहिती नाहीये तुला. किती काम करायचो आम्ही सगळे.“
श्रुती: “हो काम तर करावंच लागतं ऑफिसमध्ये. बरं ऐक ना, सगळे कसे आहेत? तुझ्या संपर्कात असतील ना. रोजच कंपनीत भेटत असशील सगळ्यांना. आणि काय म्हणते आपली कंपनी? काम भरपूर असतं का रे हल्ली? ”
आदित्य: " सगळ्या आपल्या तेव्हाच्या ऑफिस कलिग्सबद्दल बोलत असशिल तर ते आता माझ्यासोबत कंपनीत काम करत नाहीत. सोडून गेले सगळे. सौम्या वगळता तू ओळखतेस अशी एकही व्यक्ती आता कंपनीत नाही. कामाचं म्हणशील तर सध्या प्रचंड लोड आहे . गेल्या काही दिवसात तू पाहत आहेसच न. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्यावरच सगळी जबाबदारी पडलीये. मला काही वैयक्तिक आयुष्य राहिलंच नाही असं वाटतंय. दिवस आणि रात्र कंपनीतच आणि कंपनीचा विचार करण्यातच जातात."
श्रुती: “ नक्की काय प्रॉब्लेम्स आलेत ? लोड असेल तर resource hire कर ना. बजेट issues आहेत का? अखिलेश काकांना बोललास का त्याबद्दल? तुझे बाबा कंपनीचे MD आहेत ना, त्यांना genuine प्रॉब्लेम असेल तर तू सांगूच शकतोस. त्यांना ह्या क्षेत्रात खूप चांगला अनुभव आहे. ते नक्कीच मार्ग सुचवतील. ते गावावरून आले की विचार त्यांना”

"नाही गं श्रुती. ते अशा गावाला गेलेत, की जिथून परत येणं शक्य नाही. कधीच शक्य नाही"
हे बोलताना आदित्यचा आवाज रडवेला झाला होता. कंठ दाटून आला होता. डोळ्यातलं पाणी मोठ्या मुश्किलीने परतून लावत तो उठला आणि म्हणाला , "जाऊ देत, आता नको तो विषय. उशीर झालाय बाकीचं नंतर बोलू आपण. इतक्यात आई येईल. आपण जेवलो नाही हे पाहून ती रागवेल आणि मलाही खूप भूक लागलीये. खूप वेळ झाला ना, जेवून घेऊ. स्वयंपाक केलेला आहे बहुतेक."

"हो , कुक दादा येऊन गेले मघाशीच, आपण बोलत होतो म्हणून काही न बोलता गेले ते. मी पानं वाढून घेते." असं म्हणून श्रुती किचनमध्ये ताटे, वाट्या घेऊन जेवण वाढून घेऊ लागली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. "एवढी मोठी घटना घडली आणि मला काहीच माहित नाही. आदित्य, सुनंदा मावशी दोघेही त्याबद्दल बोलले नाहीत. आईने सुद्धा काही सांगितलं नाही. तिला माहित नसेल का? मला कसं समजेल? आदित्यला विचारावं का? मी जर आता हा विषय काढला तर जखमेवरची खपली निघेल आणि वेदनेचं रक्त भळाभळा वाहायला लागेल. नकोच त्याला त्रास द्यायला. त्यानी स्वतःहून सांगितलं तर सांगू देत. बोलल्याने दुःख हलकं होईल कदाचित. नाही बोलला तर नको विचारायला"

इकडे आदित्यला त्याच्या बाबांची आठवण आली होती. त्यांचं अचानक जग सोडून जाण्याने तो पुरता खचला होता. कसंबसं त्याने स्वतःला, कंपनी business ला आणि आईला सावरलं होतं. आता पुन्हा दुखरा विषय निघाल्यामुळे तो हळवा झाला होता. जेवायला वाढ असं तो श्रुतीला म्हणाला कारण त्याला चेहऱ्यावर दुःख दिसू द्यायचं नव्हतं आणि काही क्षण एकटे हवे होते. पुन्हा एकदा सावरून बसण्यासाठी! भूक तर त्याला नव्हतीच आता, पण श्रुतीसाठी आणि आईला वाईट वाटू नये म्हणून तो अश्रुंचे कढ लपवत दोन घास खाणार होता.

कसं असतं ना, मुलांना सहजतेनं दुःख व्यक्त करायला, मनमोकळं रडायला मिळत नाही. बिचारे आतल्या आत कुढत, दुःख सहन करत राहतात. जबाबदारी असते ना आणि मुळूमुळू रडून चालत नाही. मनस्थिती अशावेळी कठीण होते. जवळचं कुणी असेल समजून घेणारं तर त्याच्याजवळ बोलून मन शांत करून घेता येतं. आदित्यचं तसं झालं नव्हतं. समजूतदार असण्याचे दुष्परिणाम असतात ते असे.

(क्रमशः )
भाग १२ : https://www.maayboli.com/node/70194
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users