तू....तूच ती!! S२ भाग ३

Submitted by किल्ली on 28 August, 2018 - 10:12

भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66880
-----------------------------------------------------------------------------------------------------------
हा भाग टाकण्यास बराच उशीर झाला. त्याबद्दल दिलगीर आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------

पार्टी अगदी रंगात आली होती. एकापेक्षा एक उत्तम असे performances लोक देत होते. नाच, गाणी, विविध गेम्स, गप्पा हे सगळं चालू होतं. श्रुती सगळं मनापासून एन्जॉय करत होती. पण तिने आज कुठलीही कला सादर केली नव्हती. कशी करणार म्हणा, तिचे छंद ह्या पार्टीमध्ये सादर करण्यासारखे नव्हतेच मुळी! सगळ्यांचे performances झाल्यानंतर spot awards ची घोषणा होणार होती. सगळे आतुरतेने त्या सेगमेंटची वाट पाहत होते. श्रुतीची नजर मात्र आदित्यला शोधत होती. तो कुठे दिसत नव्हता. "Event organizing committee मध्ये होता ना तो, असेल कामात. पण एकदातरी बोलायचं ना, जास्तच मान लागतो त्याला." श्रुती स्वतःशीच बोलत होती. तिच्याच नकळत तिच्या मनात आदित्य बद्दल एक खास कोपरा तयार झाला होता. पण आदित्य ह्या बाबतीत तिच्या जरा पुढेच होता. त्याने तिला आज propose करायचे ठरवले होते. पण तिला काय वाटेल? तिने नकार दिला तर? गैरसमज झाले तर काय करावे? असे विचार आणि प्रश्न डोक्यामध्ये सतत येत असल्यामुळे तो हैराण झाला होता. नर्व्हस का काय म्हणतात अगदी तसंच त्याला फील होत होतं. भरीस भर म्हणून त्याच्यावर पार्टीची जबाबदारी होतीच. awardsच्या कार्यक्रमाचं संचालन करायचं होतं. तूर्तास तिकडे लक्ष देऊया असं त्याने मनाला समजावलं आणि तो स्टेजवर येण्यास सज्ज झाला.
कार्यक्रम सुरु झाला, आदित्य छान सूत्रसंचालन करत होता. एक एक करून पुरस्काराचे वाटप झाले. आता शेवटचा पुरस्कार बाकी होता.
"Star Performer of the Year" असं नाव असलेला हा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जात असे. ज्यांच्या कामामुळे कंपनीला tangible and intangible benefits झाले त्यांना देण्यात येई. बहुतकरून ह्या पुरस्काराचे मानकरी मॅनेजर किंवा लीड पदावरची वरिष्ठ मंडळी असत. अखिलेश सर स्वतः पुरस्कारप्रदान आणि घोषणा करण्यास स्टेजवर आले होते. त्यांनी award winner चं नाव असलेलं पाकीट उघडलं. नाव वाचताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. माईक सावरत ते म्हणाले "and this year's Star Performer award goes to श्रुती and आदित्य both!!" आदित्यचं सत्यरूप माहित नसतं तर आपल्यासोबत त्याला हा पुरस्कार विभागून मिळाला ह्याच श्रुतीला दुःख झालं असतं. पण तो किती मेहनत घेतोय हे आता तिला माहित असल्यामुळे ती आनंदाने मंचावर गेली. एक बडे उद्योगपती प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या हातून पुरस्कार स्वीकारताना तिला धन्य झाल्यासारखे वाटत होते. आदित्य आणि श्रुती दोघांनी मिळून ती ट्रॉफी धरली होती. ट्रॉफी उंचावताना आदित्यच्या हाताचा झालेला स्पर्शाने श्रुती रोमांचित झाली. वेगळंच काहीतरी फील झालं, मनाच्या तारा छेडल्या गेल्या. चेहऱ्यावरचं हसू अधिक गुलाबी झालं. तिच्या गालावरच्या खळी मध्ये डोळ्यांच्या कोनातून पाहत असताना आदित्य पुन्हा एकदा मनोमन श्रुतीवर फिदा झाला.
छानपैकी कार्यक्रम उरकला, डिनर नंतर सगळे घरी जाण्यास निघाले. श्रुती आणि आदित्य कधी नव्हे ते गप्पा मारत थांबले होते. आदित्यने आग्रह केल्यामुळे एरवी लगोलग घरी जाणारी श्रुती थांबली होती. शेवटी त्यांच्या असे लक्षात आले की आता घरी गेलं पाहिजे, उशीर झालाय.
आदित्य: "तू गाडी इथेच लाव, मी सोडतो तुला घरी "
श्रुती: "नको रे, मी जाईन माझी माझी"

श्रुतीने सांगुनही आदित्य ऐकेचना! शेवटी श्रुतीने त्याचे म्हणने मान्य केले आणि ते दोघे घरी जाण्यास निघाले. इतका वेळ गप्पा मारणारे दोघेही आता प्रवासात मात्र शांत बसले होते. कुणीच काहीही बोलत नव्हतं. दोघेही एकमेकांचा सहवास अनुभवत होते. इतके ठरवूनही आदित्य आपल्या मनातील गोष्ट तिला सांगू शकला नाही. आता २ दिवस शनिवार - रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. हे दोन दिवस आदित्यने श्रुतीला खूप मिस केलं. तिच्या आठवणीत रममाण होऊन कसाबसा वेळ घालवत होता. इकडे श्रुतीची अवस्था ही वेगळी नव्हती. फरक एव्हढाच की, श्रुतीच्या मनाला हेच आपलं आदित्यवर असलेलं प्रेम आहे ह्या भावनेचा उलगडा झाला नव्हता. एक मात्र खरं होतं की दोघांनाही एकमेकांची ओढ वाटू लागली होती. सोमवारचा दिवस कामात आणि घाईगडबडीत गेला. मात्र ऑफिस संपल्यानंतर आदित्यने श्रुतीला कॉफीसाठी विचारले. अगदी सहज विचारतोय असं दाखवत असला तरी त्याच्या मनात तिला propose करणे हा हेतू होता. कॉफी शॉप मध्ये कॉफी पिता पिता गप्पा सुरु झाल्या. बराच वेळ झाला तरी हव्या त्या मुद्यावर चर्चा येत नव्हती. आदित्य बोलघेवडा असल्यामुळे नवीन विषय तोच सुरु करत होता पण श्रुती विषयाला वळण देत नव्हती. मग त्याने वैयक्तिक आवडी निवडी विषयी बोलायला सुरुवात केली. त्यावरून तो तुला मुलगा कसा हवा इथपर्यंत येऊन पोचला. एव्हाना श्रुतीला काय चालले आहे हे लक्षात येऊ लागले होते. पण ती तसे दाखवत नव्हती कारण ती आदित्य बद्दलच्या स्वतःच्या नेमक्या भावना काय आहेत ह्याबद्दल sure नव्हती. थोड्या वेळाने तो क्षण आलाच!
आदित्य: "तू खरंच विचार नाही केलास ह्या विषयावर? मला वाटलं होत की सगळ्या गोष्टीबद्दल तुझे विचार आणि views clear असतात तसे ह्याबद्दलही असतील "
श्रुती : "तसं नाही रे, मी एक सरळ, साधी, टिपीकल प्रकारात मोडणारे मुलगी आहे. आता माझ्यासाठी माझं करिअर जास्त महत्वाचं आहे. मला relationship आणि करिअर दोन्ही एकावेळेस सांभाळणं जमणार नाही हे माहितेय. म्हणून त्या वाटेल जायचं नाही असं मी ठरवलंय. एखादा दुसरा क्रश असणे वेगळे आणि प्रेमात पडणे वेगळे! प्रेमात पूर्ण dedication असावं आणि सध्या ती माझी प्रायोरिटी नाहीये. हे माझं clearly ठरलंय"
आदित्य: "आणि समजा, एखादा तुला आवडणाऱ्या मुलाने आता लग्नासाठी विचारलं, तर तुझी काय प्रतिक्रिया असेल?"
श्रुती: "मुलगा कोण आहे त्यावर ते अवलंबून असेल, पण शक्यतो माझे उत्तर "आता नाही, नंतर बघू" असेच असेल. सोड ना, दुसऱ्या विषयावर बोलू आपण"
आदित्य: "ऐक ना, जर समजा तो मुलगा मी असलो तर ?"
श्रुती: "म्हणजे? what do you mean exactly?"
आदित्य: "मला exactly हेच म्हणायचे आहे की, "
असे म्हणून गुलाबाची फुले समोर धरत अगदी फिल्मी पद्धतीने आदित्यने श्रुतीला थेट विचारले
"मला तू खूप आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करशील माझ्याशी?"
श्रुती: "मस्करी नको हा आदित्य "
आदित्य: "हे बघ, हि बिलकुल मस्करी नाही. माझ्या खऱ्याखुऱ्या भावना आहेत ह्या. तुझ्या priorities माहित असूनही हे विचारतोय कारण माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. विचार कर, कदाचित तुलाही मी आवडत असेल. हवा तेवढा वेळ घे श्रु, पण नक्कीच तुझ्या माझ्याप्रती खऱ्या भावना काय आहेत ह्याचा शोध घे. तुझ्या डोळ्यात मला दिसलंय ते प्रेम ! पण तुला अजून जाणीव नाहीये त्याची. आणखी एक गोष्ट, तू स्वतःहून मला माझ्या proposal च उत्तर देशील तेव्हाच हा विषय निघेल. तोपर्यंत तुला मी हा विषय काढून त्रास देणार नाही. पण तू मात्र seriously विचार कर. येतो मी. आता तुझ्यासमोर असं थांबणं मला शक्य नाही"
आपल्या मनातलं भडाभडा बोलून आदित्यला हायसे वाटले होते. आपण तिला propose केले हे एक आव्हान साध्य केल्यासारखे वाटले त्याला !
पण इकडे विचारमग्न अवस्थेत श्रुतीला कॉफीशॉपमध्ये सोडून गेल्यांनतर तिच्या मनात उठलेल्या वादळाचा त्याला थांगपत्ता नव्हता!!
(क्रमशः )
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय ....
थोडे मोठे भाग येऊ द्याना किल्ली ..... पु. भा . प्र .

छान...
जरा मोठे भाग टाका कि...

Khup aawadla. Pudhil bhag those lawkar taka na plz .. aawadtya gostinche bhaag lawkar Ani mothe aalet tar majach yete