तू....तूच ती!! S२ भाग ६

Submitted by किल्ली on 2 December, 2018 - 15:09

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
---------------------------------------------------------------------------------------------------------
बाजूच्या व्हरांड्यात जॅकेटवाली व्यक्ती पाठमोरी उभी होती.
आदित्य: "कोण आहेस तू? माझ्या बाईकला माझ्या परवानगी शिवाय हात का लावलास?"
आदित्यने रागात बोललेलं हे वाक्य ऐकून दचकून ती व्यक्ती मागे वळली.
एकमेकांचा चेहरा पाहताच दोघे आश्चर्याने बघतच राहिले. जणू ते शॉक झाले होते. काय बोलावे, कोणाला काही सुचेना.

इतक्यात सुनंदा मावशी तिथे आली आणि हसून म्हणाली, "अरे वेद, आज लवकर कसा काय आलास आणि काय रे, असा आश्चर्याने काय पाहतोस? मी जस्ट घरी आलेय. आज मला बाहेर बरीच कामं होती. थोड्या वेळापूर्वी मेसेज आला की कुक दादा येणार नाहीयेत. असंही माझा मस्त पिझ्झा खाण्याचा मूड झाला होता म्हणून मीच बाईक घेऊन जायला परवानगी दिली. मी पण किती वेंधळी आहे. तुमची दोघांची ओळख करून दयायची राहिलीच की."

सुनंदा मावशी मघासच्या जॅकेटधारी व्यक्तीला उद्देशून म्हणाल्या, "हा माझा मुलगा वेद, म्हणजे ह्याच खरं/official नाव आदित्य. पण आम्ही घरी वेद ह्या नावाने हाक मारतो. तू त्याला ह्यापैकी हवं त्या नावाने हाक मार आणि बरं का वेद, ही आहे श्रुती. आपल्याकडे राहायला आलीये. IT मध्ये आहे, computational algorithms च्या क्षेत्रात संशोधन करतेय. नुकतीच अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आलीये. हिची आई माझी बालमैत्रीण आहे. तुला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल, तीच ही. श्रुतीला बाईक चालवण्याची आवड आहे. म्हणूनच तुझी बाईक चटकन घेऊन गेली आणि पिझ्झा घेऊन आली. चला आपण पटापट खाऊन घेऊ. गार झाल्यावर पिझ्झा खायला मजा येत नाही."
वेद हे आदित्यचं दुसरं नाव आहे, आपण त्याच्याच घरात राहतोय, त्याला अजून भेटलो नव्हतो आणि तो आता अचानक समोर आलाय, ह्या धक्क्यातून श्रुतीला सावरायला वेळ लागणार होताच. मुख्य म्हणजे कसं रिऍक्ट व्हावं हे दोघांनाही समजत नव्हतं. आदित्य तर आश्चर्य आणि आनंद अशा दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवत होता. अर्थात श्रुतीलाही आनंद झाला होताच. पण तिला भयंकर अपराधी वाटत होतं. विचित्र परिस्थिती उद्भवली होती.

श्रुतीने स्पोर्ट्स जॅकेट, ग्लोव्हस उतरवून ठेवले व ती हात धुवायला गेली. आदित्यही फ्रेश होण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी म्हणून रूममध्ये पळाला. त्याला आनंदाने उडी मारण्याची इच्छा होत होती. त्याने बाथरूममध्ये जाऊन श्रुती भेटलीये हे स्वप्न की सत्य ह्याची पडताळणी करण्यासाठी चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. स्वप्न नव्हतेच ते! श्रुती आज त्याच्यासमोर त्याच्याच घरात होती. त्याच पहिलं आणि एकमेव प्रेम! इतक्या वर्षांच्या विरहानंतर आज अत्यंत आनंदाचा दिवस उजाडला होता. इकडे सुनंदा मावशीने पिझ्झे टेबलावर मांडून घेतले.
एकमेकांकडे हळूच पाहत दोघेही खात होते. सुनंदा मावशी आज खुश होती. तिचा आजचा दिवस छान गेला होता. शिवाय तिचा लाडका मुलगा वेद आज लवकर घरी आल्यामुळे विशेष आनंदी होती. तिचे अनुभव सांगत होती. एरवी श्रुतीने विशेष रस दाखवून हे सगळं ऐकलं असतं आणि गप्पा सुद्धा मारल्या असत्या. पण आज परिस्थिती वेगळी होती. श्रुती सुनंदा मावशी काय बोलतेय हे वरवर ऐकत होती. तीच लक्ष चांगलंच विचलित झालं होतं.
आदित्य आणि श्रुतीला एकमेकांशी बरंच काही बोलायचं होतं. एकाच घरात समोरासमोर असूनही ते दोघे एकमेकांना मोकळेपणाने बोलण्यासाठी चाचपडत होते. बोलण्याची सुरुवात कोणीतरी करायलाच हवी होती. त्याशिवाय हे अवघडलेपण दूर होणार नव्हते. खरे तर दोघेही शॉक मधून बाहेर आले नव्हते. पण एकमेकांना पाहून त्यांना खुप आनंद झाला होता. श्रुती मोबाईलवर उगीचच काहीतरी स्क्रोल करत होती. तिच्या मनात आदित्यला काय बोलावे, तो काय काय विचारेल, तो रागावला असेल का असे त्याच्याविषयीचे विचार सुरु झाले होते. इकडे आदित्यची परिस्थती सुद्धा वेगळी नव्हती. त्यामुळे सुनंदा मावशी काय सांगत होती ते दोघांनाही नीटसं कळत नव्हतं.
हा पिझ्झा सगळेजण मनापासून एन्जॉय करत होते, हे मात्र नक्की!

सुनंदा मावशी: "आज बऱ्याच दिवसांनी आपण असे एकत्र पिझ्झा खातोय, हो ना. अलीकडे असं अबरचबर खाणं बंदच झालं होतं आपलं. पण श्रुतीमुळे योग आला. पटकन बाईकवर जाऊन घेऊन आली. वेद, अरे लक्ष कुठेय तुझं? काय म्हणतेय मी?"
आदित्य: "काय म्हणालीस गं? मी वेगळ्या विचारात होतो. "
सुनंदा मावशी: "अरे, मी म्हटलं, कसा गेला तुझा आजचा दिवस?"
आदित्य: "मस्त गेला. आज काम भराभर उरकलं. बऱ्याच गोष्टींची उकल होईल असं वाटत आहे. काही गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या त्या पूर्ण होतील. काही प्रश्न पडले होते. मी जवळपास आशा सोडून दिली होती पण अचानक आज त्यांची उत्तरे मिळण्याची आज शक्यता निर्माण झालीये."
ही वाक्य बोलताना आदित्यने श्रुतीकडे एक कटाक्ष टाकला होताच. तो तिच्याबद्दलच्या बोलतोय हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते. आपण त्याला दुखावले आहे, खरंच मोठी चूक करून बसलोय ही जाणीव तिच्या मनात अधिकाधिक प्रखर होत होती.
श्रुती मनात म्हणाली "मला तुला खुप काही सांगायचंय आदित्य, तुझी मनापासून क्षमा मागायची आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या प्रामाणिक आणि सुंदर भावनेची कबुली द्यायची आहे. प्लीज रागावू नकोस असा. तुझं सगळं ऐकायला मी तयार आहे. पण हे काय, शब्दच फुटत नाहीयेत. कधी बोलू मी तुझ्याशी? एकांत आणि योग्य वेळ बघून नक्कीच बोलेन. हो, ह्यावेळेस नक्की! आता तू असा समोर असताना धीर धरवणार नाहीच मुळी मला!
सुनंदा मावशी: "अरे वा, छान. लवकर मिळव उत्तरे. पण एक सांगू तुला, उत्तर मिळत नसेल तर जास्त वाट पाहू नये. काही गोष्टी अनुत्तरित राहतात. त्या पूर्ण करण्याची जिद्द असेल तर मात्र तुला त्यांच्या मागे लागून त्या पूर्ण कराव्या लागतील. तुला नक्कीच यश मिळेल. प्रयत्न सोडू नकोस."
आदित्य: "हो, प्रयत्न करून झालेत आई. आता फक्त वाट पाहतोय"
सुनंदा मावशी: "मग होईल तुझं काम. प्रामाणिक प्रयत्न नेहमीच फळाला येतात.श्रुती तू काही बोलत नाहीयेस, आज एकदम शांत आहेस."
"पिझ्झा कसा आहे मावशी, आवडला का तुला?" श्रुतीने चालाखीने विषय बदलला
सुनंदा मावशी: "हो गं, मस्त आहे. पण तू app वरून ऑर्डर का नाही केलास? स्वतः गेलीस आणायला? आजकाल आणून देतात ना ते घरी?"
श्रुती: "हो, पण मला बाईक वर एक चक्कर मारायची होती. म्हणून पिझ्झा आणायचा बहाणा केला. शिवाय ते पिझ्झा आउटलेट माझ्यासाठी नवीन होतं. म्हटलं बघावं कसं आहे ते, म्हणून गेले स्वतः बाहेर. येताना तुझ्यासाठी हे पुस्तक आणलंय ग्रंथालयातून, तुला हवं होतं ना? "
"बरं झालं आणलंस पुस्तक, पुढच्या लेक्चरसाठी नोट्स काढायच्या आहेत. आता मी तेच करत बसणार आहे. तुम्ही दोघं बोलत बसा.
एव्हाना सगळ्यांचं खाणं झालं होतं.
काय रे वेद, काम आहे म्हणू नकोस, बोल तिच्याशी जरा. आपल्याकडे आलीये ना ती. तुमचं फील्ड सुद्धा सारखं आहे. भरपूर विषय मिळतील. IT, कॉम्पुटर, सॉफ्टवेअरच्या गप्पा मारत बसा. बाय. गुड नाईट"

असं हसत म्हणून सुनंदा मावशीने त्यांना हवा असलेला एकांत देऊ केला होता आणि ती तिच्या कामासाठी तिच्या खोलीत निघून गेली होती.
सुनंदा मावशी तिथून जाताच एक विचित्र शांतता तिथे पसरली. ती असल्यामुळे एव्हढा वेळ काहीतरी बोलणं होत होतं. पण आता ह्या दोघांपैकी काही वेळ कोणीच काही बोललं नाही. एकमेकांना निरखत राहिले फक्त ते अभागी जीव! थोड्या वेळाने शांततेचा ताण असह्य होऊन श्रुती तिथून उठली. आदित्य चुपचाप तिच्या हालचाली पाहत होता. तिची अस्वस्थता त्याला समजली होती. पण तो आज बोलणार नव्हता. त्याचा निश्चल चेहरा पाहून श्रुती पुन्हा तिथे आदित्यच्या समोर सोफ्यावर बसली. कुठून सुरुवात करावी हे तिला कळेना. शेवटी ती अबोल शांतता तिनेच भंग केली.
श्रुती: "कसा आहेस आदित्य?, तुझं नाव वेद आहे हे माहित नव्हतं. नाहीतर..".
आदित्य: "नाहीतर काय? हे माझं घर आहे हे समजलं असतं तर तू इथे राहायला आलीच नसतीस. हो ना?"
श्रुती: "तुझे माझ्याविषयी बरेच गैरसमज झाले असतील. मला मान्य आहे, मी असं न कळवता जायला नको होतं. पण... "
आदित्य: "मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. ते जाऊ दे, तू सांग कशी आहेस? अमेरिकेला असतेस ना आता. भारीच. मला ऐकायला आवडतील तुझे तिथले अनुभव. तिकडे सॉफ्टवेअरमध्ये काय ट्रेंडिंग आहे आणि त्यांची कामाची पद्धत वगैरे. बोलू आपण डीटेलमध्ये. पण ऐक ना, आता नको, नंतर कधीतरी. तू इथेच आहेस ना, सुट्टीच्या दिवशी निवांत बोलूया आपण. काय आहे ना, सगळ्या भूमिका मलाच वठवाव्या लागतात. सगळं सांभाळता सांभाळता आणि मनाला समजावून मी थकलोय. मला विश्रांती हवीये. कामही आहेच. ते थांबणार नाहीच ना, काही झालं तरी. तुही आराम कर. will you excuse me, ms Shruti?"
श्रुती: "ya sure"
आदित्य: "थँक्स, बाय, गुड नाईट."
श्रुती: "गुड नाईट."
आदित्य खोलीत जाताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून श्रुतीला रडू कोसळण्याच्या बेतात होतं.
आदित्य त्याच्या खोलीत लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत असला तरी कामाकडे अजिबातच लक्ष नव्हतं. कारण खिडकीतून इतक्या दिवसांनी भेटलेल्या प्रिय श्रुतीचा चेहरा पाहून भावनांचा वेग अनावर झाल्यामुळे त्याच्याही डोळ्यात पाणी आलं आलं होतं.
ह्या वैरीण भासणाऱ्या रात्रीचा वेळ जाता जात नव्हता. घड्याळाचे काटे आळसावल्यासारखे पुढे सरकत होते. दोन एकमेकांच्या प्रेमात असलेले जीव कुशीवर तळमळत रात्र जागून काढत होते आणि काही केल्या आज लवकर पहाट उजाडत नव्हती.
नकळत सुट्टीच्या दिवशी बोलूया असे बोलून गेल्यामुळे आदित्यला अजून २ दिवस श्रुतीबरोबर मनातलं बोलण्यासाठी, ती काय म्हणते, तिला त्याच्याबद्दल काय वाटतं, इतक्या वर्षात काय झालं, हे जाणून घेण्यासाठी वाट पाहावी लागणार होती.
श्रुती मात्र हे २ दिवस कसे काढणार होती, ते तिला आणि परमेश्वरालाच माहित!
(क्रमशः )

भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेडाच आहे वेद Uhoh
खरे तर दोघेही वेडे ... बोलून मोकळे व्हायला हवे पटकन.
जिंदगी गलतियां सुधारने के मौके बारबार नही देती।
एवढं ह्यां दोघांना लवकर कळेल तेवढे बरे !

हाही भाग एकदम मस्त
पुभाप्र Happy

वाचतेय गं !

Namokar Happy Happy >> चुकून निमकर च वाचलं Biggrin