तू....तूच ती!! S२ भाग १०

Submitted by किल्ली on 17 March, 2019 - 10:32

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रुती किचनमध्ये गेली. पाठोपाठ आदित्यही गेला.
“हे घे तुझ्यासाठी, आज कॉफी ह्यात पी.”
असं म्हणून आदित्यने तिच्यासाठी आणलेला नवीन कॉफी मग तिच्यासमोर धरला.
श्रुती: "हे काय, नवीन मग? छान आहे, पण नको मला"
आदित्य: "अगं वेडे गिफ्ट आहे ते. तुझ्यासाठी आणलाय. नीट बघ तरी"
श्रुती: "अरे व्वा, ह्यावर माझा फोटो आहे. हा फोटो तर माझ्याकडे सुद्धा नाही. तुला कुठे मिळाला?"
आदित्य: "मीच क्लिक केलाय, तुझ्या नकळत. :)"
श्रुती: "भलताच हुशार आहेस की. खरंच छान आहे. आवडलं मला तू दिलेलं पहिलं गिफ्ट!"
आदित्य मनात विचार करत होता, "चला, म्हणजे बाईसाहेबांनी काही आढेवेढे न घेता गिफ्ट स्वीकारले हे बरं झालं. आज सगळया सकारात्मक गोष्टी घडत आहेत. असंच चालू राहू दे देवा!"
इकडे श्रुतीच्या मनात काय बोलू आणि कसं सुरुवात करू ह्या विचारांनी थैमान घातलं होतं. पण तरीही प्रेमातलं पहिलं गिफ्ट स्वीकारत श्रुती मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सज्ज झाली होती!!

आल्हाददायक गारवा असलेलं वातावरण, सुट्टीचा दिवस, निवांत वेळ, इतर कुठेही जायचं नाही, फक्त आरामात बसून गप्पा मारायचा प्लॅन असे स्वप्नवत भासणारे क्षण श्रुती जगत होती.
इतके दिवस, नव्हे वर्ष दिवस ज्याची वाट पाहीली तो तिचा हृदयाचा राजा समोरच बसलेला असताना त्याला आज ती मीही तुझ्यावर तितकंच किंबहुना जास्त आणि जीवापाड प्रेम करते असं सांगण्यासाठी शब्द जुळवित होती.
पण असं नसतं ना, इतकं सोपं असतं तर ह्या दोघांमध्ये इतके दिवस दुरावा राहिलाच नसता. त्यामुळे थेट विषयाला हात घालण्याआधी दोघांमधील अवघडलेपण आणि ताण नाहीसा करणे आवश्यक होतं. त्यामुळे रिलॅक्स वाटतं आणि मनमोकळेपणाने बोलता येतं हे जाणून ते दोघे बोलणार होते. वरकरणी मात्र आपण फक्त सहज गप्पा मारायला बसलो आहोत असे दाखवत होते.
'
आदित्यचा मुळचा स्वभाव लाघवी आणि बोलका होता. कोणत्याही ग्रुपमध्ये एकमेकांशी बोलताना वातावरणात कोणत्या कारणाने कितीही अवघडलेपण असलं तरी त्याच्या बोलण्याने चुटकीसरशी दूर व्हायचं. पण आज परिस्थिती वेगळी होती. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.
आपणच आदित्यला आग्रह केला होता हे आठवून श्रुतीने सुरुवात केली.
"आपली बाग छान फुललीये ना."
आदित्य: "हो ना, माळीकाका रोज येतात. तरीही आईसुद्धा स्वतः बागेकडे आणि झाडांकडे लक्ष देते. कशी हिरवीकंच पानं आहेत बघ ना, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलांच्या सानिध्यात जीव रमतो. तिथे आपण झाडांजवळ निवांत बसता यावे लाकडी बाके लावून घेतली आहेत. छान वाटतं तिथे बसायला. म्हणून म्हणत होतो बाहेर बसू. पण तू नाही म्हणालीस."
श्रुती: "नको जाऊ दे, बरंय इथेच. पूर्ण कर ना, तू काहीतरी बोलत होतास”

जरासं हसून आदित्य म्हणाला, “कसं असतं बघ ना, कोणत्याही गोष्टीवर माया लावली, प्रेमाने काळजी घेतली की ती आपली होऊन जाते. मग ती झाडं असोत, पाळीव प्राणी असोत किंवा माणसं असोत. जिव्हाळा असेल तरच नाती जोपासली जातात. एकमेकांना सुखदुःखात साथ द्यायला हवी. मिळून मिसळून राहायला हवं. ह्या बागेकडून आणि निसर्गाकडून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. जाऊ दे सोड, तुला नाही कळणार ह्या गोष्टी”
श्रुती: “अरे असं का म्हणतोस, मला नाही समजणार म्हणून? असंही तुझं बरोबर आहे म्हणा, तुला मी फटकळ, चिडकी, लाडावलेली मुलगी वाटत असेल ना? पण तुला सांगू? गेल्या काही वर्षांत खूप काही शिकले रे मी ह्या बाबतीत. एकटं राहावं लागलं की माणसांची, नात्यांची, मित्रांची किंमत कळते. काही दिवस तर असे होते की मी भारताला, इथल्या माझ्या मित्रांना, नातेवाईकांना खूप मिस केलं. मी बडबड करत नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी माणूसघाणी आहे. एव्हढंच की कुछ पाने के लिये कुछ खोंना पडता है बॉस!!”
आदित्य: “अत्यंत चुकीची समजून आहे ही !!
ह्या तुझ्या खुळचट समजुतीपायी माझ्याशी एक अक्षरही न बोलता तू निघून गेलीस. निदान मैत्रीच्या नात्याला जागली असतीस तर बरं झालं असतं. बरं माझं जाऊ दे, असं समजूया की तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं. अज्ञात कारणाने माझ्यावर रागावली होतीस वगैरे, समजू शकतो मी, मुली ज्या मुलाने प्रपोझ केलं आहे त्याच्याविषयी विचित्र गैरसमज करून घेतात. पण इतर मित्रमंडळींचं काय? कोणाच्याही संपर्कात नव्हतीस तू! तू काय करते आहेस, कुठे गेलीयेस, तुझं सगळं व्यवस्थित आहे ना, ह्याबद्दल कुणालाच अवाक्षरही ठाऊक नाही. असं का वागलीस श्रुती? “
श्रुती: “मी खूप गोंधळात पडले होते आदित्य. मनाची अवस्था फारच बिकट होती. मला असं वाटत होतं की मी जर रिलेशनशिपमध्ये राहिले तर माझं उच्च शिक्षण, संशोधन, करिअर सगळंच अर्धवट राहील. प्रेम किंवा करिअर ह्यांपैकी काहीतरी एक निवडायचं होतं मला.
आदित्य: मी तुझ्या करिअर मध्ये अडथळा थोडीच बनणार होतो! उलट तुला मदत केली असती. माझे बरेच कॉन्टॅक्टस आहेत तिकडे. “
श्रुती: “पण मुद्दा मदतीचा किंवा अडथळा बनण्याचा नाहीये आदित्य. प्रॉब्लेम माझ्या घोळ घालणाऱ्या स्वभावाचा आहे. मला तेव्हा एका वेळी दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या नसत्या. मला माझा स्वभाव माहित आहे रे.”

आदित्य: “नाही माहिती तुला तुझा स्वभाव श्रुती, तू म्हणतीयेस तो तुझा न्यूनगंड असेल. असं नसतं. उलट मित्रांच्या सान्निध्यात कठीण गोष्टी सोप्या होतात. आणि रिलेशनशिप बद्दल म्हणशील तर माझ्या प्रेमाचा स्वीकार कर असा आग्रह मी कधीच केला नव्हता.”
श्रुती: ” तेच तर चुकलं माझं!!
काही गोष्टी वेळेवर समजल्याच नाहीत मला! खूप एकटे पडले रे मी. सोबत माझं कुटुंब होत पण मित्रमैत्रिणी नव्हत्या. मी परिस्थितीला सामोरं न जाता, पळून गेले ह्याची आयुष्यभर खंत वाटत राहील. मला अजूनही कल्पना नाही, की या एका चुकीच्या निर्णयामुळे मी काय काय गमावलंय. खरं तर ह्या प्रश्नाला आता किती अर्थ आहे माहिती नाही तरीही विचारते, ‘कसा आहेस आदित्य? तुला खूप राग आला असेल ना माझा तेव्हा. कशी हाताळलीस तू परिस्थिती?’ ”

तिच्या अशा मनमोकळ्या मनाने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे आदित्यला कळेना. एवढं मात्र त्याला नक्की कळलं होतं की. श्रुतीला आपली चूक झालीये हे समजलंय. त्याचा तिला पश्चात्तापही झालाय. ती आपणहून हे सगळं बोलतीये. तिच्या शेवटच्या प्रश्नाचा अर्थ म्हणजे she cares for Aditya! म्हणजे तिचंही त्याच्यावर प्रेम होतंच. ते आता आहे की फक्त मैत्री जपण्यासाठी ती हे बोलतीये ह्या गोष्टीची मात्र खातरजमा करावी लागेल हे आदित्यने ताडले. जरासा पॉझ घेऊन तो म्हणाला, "मी खूप अस्वस्थ झालो होतो. सुरुवातीचे एक - दोन दिवस असं वाटलं की काही emergency असेल, तू करशील संपर्क आणि सांगशील काय ते! पण असं झालं नाही. मी वाट पाहत राहिलो. तू काही आलीच नाहीस, तुझ्याबद्दल कोणाला काही माहित नसल्यामुळे माहिती मिळत नव्हती. तू अमेरिकेला आहेस हे मला काही महिन्यांनी कळलं. तिथून तुझी माहिती काढणं मला कठीण नव्हतं. पण मी तसं केलं नाही. खूपदा वाटलं, तडक यावं तिकडे, भेटावं तुला आणि जाब विचारावा. पण ... "

श्रुती: “पण तू असं केलं नाहीस, का ?”
आदित्य: “कारण मला खात्री नव्हती की मला जाब विचारायचा हक्क आहे की नाही ते! सगळंच अर्ध्यावर सोडून दूरदेशी गेलीस तू. म्हणून मी मनाला समजावलं की वाट पाहायची. तुला तिळमात्र जरी काळजी असेल तरी तू परत येशील. मला तेवढा विश्वास होता तुझ्यावर.”
श्रुती: ”माझ्या जाण्याने तुला फरक पडला, तुला त्रास झाला, तू मला मिस केलंस ह्या बाबींचा अंदाज होताच मला, पण खात्री नव्हती. कारण एकच! Communication gap!! जो माझ्यामुळेच तयार झाला होता. पण खरं खरं सांगते आदि, तुला सोडून जाण्याने मला मात्र खूप त्रास झाला. माझं मन सतत मला खात होतं. सहजासहजी मिळालेल्या गोष्टींची किंमत करता आली नाही ह्याचंच सतत वैषम्य वाटत राहिलं. माझ्या एकांगी विचारामुळे सगळीच गणितं चुकली का रे?”
आदित्य: “सगळ्याच गोष्टीना गणितासारखं calculate करता येत नाही श्रुती! प्रत्येक गोष्टीला, भावनेला विविध कंगोरे असतात. पैलू असतात. अमुक असं झालं तर तमुक होईल ह्या गोष्टीचा अर्थ व्यक्ती आणि प्रसंगानुरूप बदलतो. तुला हे सगळं समजतं पण मांडता येत नसेल. कारण तुझा स्वभाव वेगळा आहे, अगदी साधासरळ! त्यामुळे ह्या गोष्टी आज मला तुला सांगाव्या लागत आहेत.”

आता आदित्य आणि श्रुती खरंच मनातलं बोलायला लागले होते. श्रुतीने प्रांजळपणे सगळं कबूल करून टाकलं होतं. दुसरं कोणी असतं तर तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नसता. पण अशा कोणाही माणसाला ती एवढं मनातलं बोलेल ही गोष्टच मुळात अशक्य होती. ती हे सगळं बोलली कारण तिला माहित होत की आदित्य तिला समजून घेईल. तिला वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की, हा त्याचा समजूतदारपणा माहिती असतानाही ती त्याच्याशी कठोर वागली. वागण्यातली प्रगल्भतेचा अभाव, दुसरं काय! पण आता तिने ठरवलंच होतं की, त्याची माफी मागायची आणि त्याची पूर्ण बाजू ऐकून घ्यायची. त्याला काय वाटतं, त्याला अजूनही आपल्याबद्दल फीलिंग्स आहेत का हे जाणून घेऊन त्यानुसार वागायचं, पळून जायचं नाही. बोलायचं आणि जिथल्या तिथे क्लिअर करायचं असं तिने ठरवलं. शेवटी अनुभवातून आलेलं शहाणपण म्हणतात ते हेच!
श्रुती: “खरंय तुझं आदि. एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे सांगते, मला तुझी ओढ वाटत होती. आपली शेवटची भेट कॅफेमध्ये झाली होती, तो प्रसंग सतत माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारख्या येत होता. पण स्वतःच्या वागणुकीमुळे शरम व भीतीसुद्धा वाटत होती. असं वाटलं की मी स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि आयुष्यातलं पहिलं प्रेम गमावलं. मग ठरवलं, पुण्यात यायचं. तुला भेटायचंच. त्यानुसार माझं शिक्षण संपवून मी पुण्यात आले देखील.
येथे आल्यावर मी जमेल तशी तुझी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. योगायोगाने तुला शोधण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत मला. दैवाने आपल्याला पुन्हा एकदा भेटवले. सुनंदा मावशी आईची मैत्रीण आहे एवढंच मला माहित होत. पण ह्यापलीकडे कुठलेच डीटेल्स नव्हते. ती तुझी आई आहे हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.

तुझ्या माझ्यावर असलेल्या विश्वासात किती ताकद आहे बघ. आलेच मी परत. नुसतीच परत नाही तर थेट तुझ्या घरात. तुला भेटले आणि असं वाटलं की झालेल्या चुका सुधारता येतील. ........मी काहीही बोलतेय आता. कॉफी थंड झालीये. दोघांनीही घेतली नाही. दुसरी करून आणू का?”
आदित्य: “कॉफीचं राहू दे, तू जे काही बोलत होतीस ते बोल श्रुती, तुझ्या मनात काय आहे ते कळू देत मला. लक्षात ठेव, ह्याबाबतीत आता नाही तर कधीच नाही!”
श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता. श्रुती जागेवरून उभी राहिली. हातातला मग बाजूला ठेवला. आदित्य बसला होता तिथून थोडंसं दूर गेली आणि खिडकीकडे पाहत उभी राहिली.
असं तिने आयुष्यात कधी कोणाला म्हटलं नव्हतं ते तिला आता बोलायचं होतं. अशीच शांततेत काही मिनिटं गेली. मनाचा हिय्या करून श्रुती मागे वळली आणि म्हणाली, " हे म्हणायला मी पात्र आहे की नाही ते माहिती नाही. पण......................
(क्रमशः )
-------------------------------------------------------------
ही कथा आता पुर्णत्वास आली आहे, पुढचा भाग शेवटचा असेल. खरेतर येथेच मोठा भाग करून शेवट करायचा होता पण लिखाणाची बैठक कमी पडतेय बहुतेक. त्यामुळे अजुन एक भाग होईल.
कथेला, पर्यायाने मला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि तुम्ही बाळगलेल्या संयमाबद्दल अत्यन्त आभारी आहे.
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान....
वाट बघतोय पुढील भागाची....

किती ताणाल कथा,
पुढे काय झाल, जम्ल की नाही ते सन्गुन टका एकदाच

पाप वर काढतोय-------- कर्माची फळं आहेत, दुसरं काय.. माझं घर काचेचं आहे हे पटतंय Proud
लवकर लिहून पोस्टायचा प्रयत्न करीन Happy

पुढचा भाग ब्लोगवर (https://killicorner.in/) प्रकाशित केला आहे, काही सुधारणा करावयाच्या आहेत. मला वाचुन पाहायचं आहे, कसा झालय ते Proud
भाग अजुन थोडा मोठा करुन , गोष्ट सम्पवुन इकडे प्रकाशित करीन म्हणते.. Happy
उशीर होतो आहे, मान्य आहे.. त्याबद्दल दिलगीर आहे Happy

आभार : @ abhijat , prakrut ,Meghana sahasrabudhe,डिम्पल Happy Happy

Pages