तू....तूच ती!! S२ भाग ५

Submitted by किल्ली on 25 November, 2018 - 07:10

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
---------------------------------------------------------------------------------------------------------
हा भाग टाकण्यास बराच उशीर झाला. त्याबद्दल दिलगीर आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे श्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठरलं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे कठीण गेले असते. खूप विचार करून आणि वेगवेगळे पर्याय पाहून श्रुती नेहमीप्रमाणे गोंधळली. अशा वेळेस काय करायचं ते तिला माहित होतं. तिने सरळ आईला विचारायचं ठरवलं. आता आई म्हणेल तेच फायनल करूया असं फायनली ठरवून श्रुती निश्चित झाली. तिने रात्री आईला फोन केला आणि सगळं सांगितलं. आई अर्थातच तिचा स्वभाव आणि तिच्या प्रायॉरिटीज जाणून होती.
आईला सांगितलं असलं तरीही एकीकडे श्रुतीचं जागेचा शोध घेणं चालू होतं. २-३ दिवस असेच फ्लॅट शोधण्यात गेले. तिला कोणताही फ्लॅट अजून तरी पसंतीस उतरला नव्हता. त्यामुळे तीचा मूड जरा नाराजिचा झाला होता.

लवकर परतता यावे आणि श्रुतीबरोबर फ्लॅट पाहण्यासाठी जाता यावे म्हणून हर्षदा ऑफिसला आज लवकर गेली होती. नेमकं हर्षदाच्या घरी कोणीच नव्हतं. ती गेल्यावर अस्थिर वाटून श्रुतीला करमेनासे झाले होते. तिने एकटीनेच नाश्ता केला आणि स्वतःला चीअरअप करण्यासाठी गरमागरम जायफळयुक्त कॉफी तयार केली. कॉफीचा मग घेऊन श्रुती हॉलमध्ये येऊन बसली. इतक्यात तिचा फोन वाजला. फोनवर आई होती. आईचा फोन आला म्हणून श्रुती एकदम खुश झाली.
आई: "काय करतेस बाळा? झाला का नाश्ता?"
श्रुती: "हो आई, झाला नाश्ता. पण तू एवढ्या उशीरापर्यंत जागी कशी, का नाही झोपलीस ?"
आई: "अगं, झोप येत नव्हती मला. मघाशी एक डुलकी काढून झालीये, तू नको काळजी करू माझी. तुझं काय चालूये सांग. मिळाली का राहण्यासाठी योग्य जागा? काही कळवलं नाहीस नंतर काय ठरवलंस त्याबद्दल."
श्रुती: "आई, ऐक ना, चांगला फ्लॅट मिळतच नाहीये गं. शोधते आहे अजून. त्यातल्या त्यात एक बरा वाटलाय. अजून बघते २-३ दिवस. नाहीच कुठे काही झालं तर तिकडे शिफ्ट होईन. तिथे मुली राहतात त्या जॉब करणाऱ्या आहेत. त्यामुळे मला दिवसा तरी हवी ती शांतता मिळेल.
बाकी स्वभावाने रूममेट्स कशा असतील काय माहिती? बाहेर राहायचं म्हणजे थोडीफार adjustment करावी लागतेच म्हणा! पण आता ना, डोकं पुरतं भंजाळून गेलंय. काय करू काही समजत नाहीये बघ. मी तुला सगळं सांगितलंय, तूच काय ते ठरव. तू म्हणशील ते मी करेन."
आई: "अगं हो हो. आज किनई एक गंमतच झाली. तुला माझी मैत्रीण सुनंदा आठवते का? ती भेटली होती."
श्रुती: "अय्या, सुनंदा मावशी! कशीये ती? किती वर्षे झाली ना, काय सुरुये तिचं?. तुला तिकडे कुठे भेटली ती?"
आई: "भेटली म्हणजे, आपलं ते हे, विडीओ कॉलवर गं. आधी मला ती फेसबुकवर सापडली. मध्यंतरी तिच्याशी संपर्कच नव्हता काही. मागे एकदा असंच कधीतरी फोन वर बोलणं झालं होतं तितकंच. मग एके दिवशी people u may know मध्ये दिसली. मग काय, केलं तिला friend list मध्ये add! नुकतंच फेसबुकवर अकाउंट काढलंय तिने. खूप गप्पा झाल्या. मग विडीओ कॉलवर बोललो. तिचा मुलगा IT तच आहे. कसला handsome दिसतोय आता, लहानपणी एवढासा होता गं, तुझ्यापेक्षा ३-४ वर्ष मोठा असेल. नेमका किती ते आठवत नाही. खुप हुशार आहे तो. तुम्ही दोघे लहानपणी एकत्र खेळलात. तेव्हा तू बालवाडीत होतीस."
जेव्हा आपली आई एखाद्या मुलाचं आपल्यासमोर कौतुक करते तेव्हा काय समजायला हवं ते समजून आईच बोलणं मध्येच तोडत श्रुती म्हणाली.
"आई, तू सुनंदा मावशीच्या मुलाचं स्थळ आणलं आहेस का माझ्यासाठी? त्याच्याविषयी काय सांगत बसलीयेस. गंमत काय ते सांग ना. का हीच गंमत होती?"
जरा गंभीर होऊन आई म्हणाली:
"आता मी काय सांगते ते नीट ऐक. सुनंदा पुण्यात राहते. तिचा तिथे बंगला आहे. मी तिला आधीच गप्पा मारताना सांगितलं होतं की तू पुण्यात आली आहेस आणि राहण्यासाठी फ्लॅट शोधत आहेस. मी तिला ओळखीचा कुणाचा फ्लॅट असेल तर सांग म्हणून विचारलं होतं. पण झालं काय की, 4-5 महिन्यापूर्वी तिचे यजमान वारले. त्यांच्या पश्चात एवढ्या मोठ्या घरात अगदी एकटी पडलीये ती. नाही म्हणजे तिचा मुलगा वेद असतो तिच्याबरोबर, पण तो दिवसभर कामात बुडालेला असतो. स्वतःला त्याने कामाच्या व्यापात बुडवून घेतलं आहे. त्यामुळे सोबत व्हावी म्हणून सुनंदा पेइंग गेस्ट ठेवण्याच्या विचारात आहे. पण त्याबाबतीत काही अडचणी आहेत. तिला अजून मनासारखं कोणी भेटलं नाही की जो तिच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहू शकेल. तुला तर माहीतच आहे की सुनंदा प्राध्यापक असून तिचं संशोधन, लिखाण वगैरे चालू असतं. आता नौकरी करत नाही पण अधून मधून व्याख्याने द्यायला जात असते. तू तिच्या घरी राहायला जावंस अशी तिची इच्छा आहे."
श्रुती: "मग तुझं काय म्हणणं आहे आई, तुला तर माहित आहे मला कोणा नातेवाईकाच्या घरी राहायला आवडत नाही. विचित्र वाटतं ते. "
आई: "एक तर सुनंदा तुझी नातेवाईक नाही. ती माझी मैत्रीण आहे. तू तिला भेटून खूप वर्षं झाली आहेत त्यामुळे तुझी फक्त ऐकून ओळख आहे. तिथे तुला राहायला काही हरकत नाही. माझं मत विचारशील तर ते असं आहे की, तू तिथे जा. घरी जाऊन सुनंदा मावशीला भेटून ये. घर बघ. तिच्याशी बोल आणि ठरव काय ते. एक मात्र जरूर सांगेन की, ती माणसं मनाने खुप साधी आणि चांगली आहेत. तुला आवडेल तिथे राहायला. बाकी विचार करून निर्णय तू घेशीलच याची मला खात्री आहे.
महत्वाची बाब म्हणजे आता हे जागेचं भिजत घोंगडं फार वेळ ठेवू नकोस. लवकरात लवकर राहायला जागा शोध आणि तुझं संशोधनाचं काम सुरु कर "
श्रुती: "ठीक आहे माते. हर्षदा आज लवकर येणारे. ती आली की जातो आम्ही घर बघायला. मावशीचा नंबर पाठवून ठेव आणि तिला सांग की मी आज येणार आहे. मग तर झालं?"
आई: "that’s like my good girl, चल ठेवते आता फोन. झोपायचं आहे. बाय."
श्रुती: "बाय, गुड नाईट. मिस यू आई."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरल्याप्रमाणे श्रुती आणि हर्षदा सुनंदा मावशीला भेटून आल्या. पहिल्यांदाच दोघींचं एकमत होऊन त्यांना पाहताक्षणी घर आवडलं. श्रुतीला तिला देण्यात आलेली खोली खुपच आवडली होती. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असूनही हवा तसा एकांत, शांतता आणि निसर्गरम्य वातावरण असलेला, मोकळा हवेशीर, प्रसन्न असा तो बंगला पाहून श्रुतीच्या मनात कुठल्याही शंका आल्या नाहीत. अगदी उद्याच राहायला येते असं सुनंदा मावशीला सांगून श्रुती हर्षदासोबत बाहेर पडली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
नव्या घरात श्रुतीला राहायला येऊन ५-६ दिवस झाले होते. इकडे ती छान रुळली होती. मावशीचा मुलगा गावाला गेला होता. तो मध्ये एकदा येऊन गेला तेव्हा श्रुती घरी नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. श्रुती फारशी बंगल्यात इकडे तिकडे फिरकत नसे. तिची खोली, जेवणाचं टेबल आणि बगीचा एवढ्याच ठिकाणी तिचा वावर असे. इथले कुक दादा एकदम चवदार स्वयंपाक बनवत असत. त्यामुळे तर ती भलतीच खुश होती. तिचं संशोधनाचं कामही मस्त सुरु झालं होतं.
वेद गावावरून परत आला होता. त्याला मुळात आपल्या घरी कोणीतरी मुलगी येऊन राहतेय ही कल्पना फारशी पटली नव्हती. त्याने श्रुतीसमोर जाणे टाळले होते. तिच्याबद्दल काही बोललेलं त्याला आवडत नसे. एवढंच नाही तर तिच्याविषयी सुनंदा मावशी बोलत असेल तर तो दुर्लक्ष करत असे.
आईने पेयिंग गेस्टला हाकलून द्यावे असे त्याला वाटत होते. अर्थात तो हे सुनंदा मावशीला बोलला नव्हता. तिला बरं वाटतंय ना, मग राहू दे त्या मुलीला इथे! काय फरक पडतोय असे म्हणून त्याने तो विषय सोडून दिला होता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
आज आदित्यला सौम्याकडून श्रुती पुण्यात आलीये असं ओझरतं समजलं होतं. त्यामुळे श्रुतीची खूप आठवण येत होती. तिला भेटावंसं वाटत होतंच शिवाय अर्धवट राहिलेल्या गोष्टींचा जाब विचारायचा होता. पण तिला पाहिल्यावर जाब वगैरे विचारणं जमणार का हाही प्रश्नच होता. संध्याकाळच्या कातर वेळी तो तिच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. ऑफिसचं काम संपवून घरी जाण्याऐवजी आदित्य त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये गेला. हा तोच कॅफे होता जिथे त्याने श्रुतीला प्रपोझ केलं होतं. कॉफी मागवण्याची गरज नव्हतीच. तिथला काम करणारा मुलगा ओळखीचा होता. तो आदित्यला आवडणारी स्पेशल फिल्टर कॉफी घेऊन थोड्याच वेळात हजर झाला. शांतपणे कॉफीचे घुटके घेत श्रुतीच्या आठवणीत रममाण झालेला आदित्य कॅफेच्या काचेच्या बाहेर पाहताच आश्चर्याने थबकला. कारण त्याची बाईक कॅफे समोरच्या पिझ्झा हाऊस समोर लावली होती.
"माझी बाइक घेऊन इथे कोण आलं असेल? चावी तर घरी आहे, मी कार घेऊन आलोय. चोरीला तर गेली नसेल. एकदा नंबर तोच आहे ना ह्याची खात्री करूया" असे म्हणून आदित्य बाहेर येत होता तोच हेल्मेट, bikers जॅकेट, ग्लोव्हस , स्पोर्ट्स शूज असा पेहेराव केलेली एक व्यक्ती पिझ्झा हाऊस मधून येऊन त्याच्या डोळ्यासमोर गाडी घेऊन निघून गेली.
आदित्य : "नंबर तर तोच आहे, माझीच गाडी आहे ही"
पळत कॅफेमधून बाहेर येऊन आदित्यने कार काढली आणि तो बाईक गेली त्या दिशेने गेला. कार वेगाने पळवत तो बाईकचा पाठलाग करत होता. शेवटी ती बाईक एका बंगल्यासमोर थांबली.
आदित्य: "इथे घरी नक्की कोण आलंय माझी बाईक घेऊन? असं म्हणून तो घरात घुसला."
पाहतो तर काय, घरात डायनींग टेबलवर पिझ्झाचे बॉक्स ठेवले होते. तिथे कोणीच नव्हतं. तो आत गेला. बाजूच्या व्हरांड्यात जॅकेटवाली व्यक्ती पाठमोरी उभी होती.
आदित्य: "कोण आहेस तू? माझ्या बाईकला माझ्या परवानगी शिवाय हात का लावलास?"
आदित्यने रागात बोललेलं हे वाक्य ऐकून दचकून ती व्यक्ती मागे वळली.
एकमेकांचा चेहरा पाहताच दोघे आश्चर्याने बघतच राहिले. जणू ते शॉक झाले होते. काय बोलावे, कोणाला काही सुचेना.
इतक्यात सुनंदा मावशी तिथे आली आणि हसून म्हणाली. "अरे वेद, आज लवकर कसा काय आलास?...........................................................................................................................”

(क्रमशः )
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान ...

धन्यवाद डूडायडू , Namokar, Vchi Preeti, दत्तात्रय साळुंके , हिम्सकूल, कोदंडपाणी , mr.pandit, akki320 Happy
डब्बल रोल की काय?>>> पुढच्या भागात उत्तर मिळेल Happy

मी काही दिवस मायबोलीवर नव्हतो. पण दिवसांनी आलो तेव्हा मला आपले हे सदर दिसले मला खूप आवडले. संवादशैली, प्रसंग, वातावरणनिर्मिती, सोबतच पुढच्या भाग वाचण्यासाठी योग्य अशी केलेली कसरत मला भावली. लिहीत रहा तुम्ही आम्ही वाचत राहू.