तू....तूच ती!! S२ भाग ९

Submitted by किल्ली on 22 February, 2019 - 03:30

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत!! कानात एअरफोन्सचे बोळे कोंबून गुणगुणत आपल्याच तंद्रीत श्रुती पार्कमध्ये जॉगिंग करत होती. गुलाबी रंगाचा स्पोर्ट्स टी शर्ट,काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, केसांचा हाय पोनी, स्पोर्ट्स शूज ह्या तिला सर्वात आरामदायी वाटणाऱ्या पोशाखात एकदम हलकं हलकं वाटत होतं. सकाळच्या गार हवेत फिरताना तिचं मन उल्हसित झालं होतं. स्पोर्ट्स तिचा आवडता प्रांत होता. त्यामुळे व्यायाम करायला ती कधी चुकायची नाही. चांगला, वाईट कसाही मूड असला तरी व्यायाम तिला त्यातनं बाहेर पडायला मदत करत असे. जॉगिंग ट्रॅकवर चकरा मारता मारता आदित्यचे विचार श्रुतीच्या मनात रुंजी घालत होते. त्याच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता.

कालचा दिवस स्वप्नवत पार पडला होता. आदित्यबरोबर पूर्ण दिवस वेळ व्यतीत केला असल्यामुळे तिला एकसुरी आयुष्यात आनंदाचे विविध रंग भरल्यासारखं वाटत होतं. पहिलं प्रेम खुप कमी जणांना दुसरी संधी देतं. तिला सुदैवाने ती संधी मिळाली होती. आदित्य तिच्या प्रेमात आहे हे तो आतासुद्धा उघडपणे बोलला होता. शिवाय त्याच्या नजरेत तर ते केव्हापासून दिसत होतंच. श्रुतीलाही आता त्याच्याजवळ मन मोकळं करावंसं वाटत होतं. पण आदित्यने तिला अजून बोलूच दिलं नव्हतं. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज काहीही करून त्याच्याशी बोलायचं, व्यक्त व्हायचं असा ती विचार करत होती. त्याच्याशी आज बोलायचंय या जाणिवेने ती स्वतःशीच खुदकन हसली. पुढच्याच क्षणी नेमकं काय बोलू, कसं बोलू, कोणत्या शब्दात मी माझ्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करू अशा विचारांनी तिला घेरले.

"कुठे लक्ष आहे श्रु, केव्हापासून हाक मारतोय. एवढा कसला विचार करते आहेस?"
"तुझा"
अचानक समोर आलेल्या आदित्यला पाहून श्रुती भांबावली आणि खरं बोलून गेली.
"काय?"
"तुझा विचार म्हणजे, तू इकडे कसा असं विचारत आहे मी"
श्रुती मघासचा गोंधळ सावरून घेत म्हणाली असली तरी आदित्यला तिची गडबड झालेली बघून थट्टा करायची लहर आली. तो म्हणाला,
"अगं, काय झालं माहितेय का, सकाळी एकदम जमीन हादरण्याचे आवाज येत होते. मी घाबरून उठलो. पाहतो तर काय! भूकंप झाल्यासारखी जमीन हादरत होती. हादऱ्याचा केंद्रबिंदू शोधत शोधत निघालो तर तुझ्यापर्यंत येऊन पोचलो. बघ आता, तूच सांग काय उपाय करावा. तुझ्या अशा जोरजोरात पळण्यामुळे घरापर्यंतच्या रस्त्याला तडे गेलेत. घरी चल माझ्याबरोबर, दाखवतो."
श्रुती: "झाली का सकाळ तुझी? मला असं म्हणायचं होतं की आज तू एवढ्या लवकर कसा काय उठलास? तुला असं कधी व्यायाम करताना इतक्या सकाळी पार्कमध्ये पाहिलं नाही ना म्हणून माझा गोंधळ झाला. आज काय विशेष?"
आदित्य: "विशेष काही नाही, तुझ्यामुळे मलासुद्धा इथे यावं लागलं. तुला एवढी काय गरज असते दररोज लवकर उठून व्यायाम करण्याची? आई ओरडली मला, म्हणाली, जा जाऊन श्रुतीबरोबर रनिंग कर. इथे येऊन बघतो तर तुझं लक्ष भलतीकडेच आहे. बरी आहेस ना?"
श्रुती: "हो रे, मी काय म्हणते ते ऐक ना. मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. निवांत गप्पा मारायच्या आहेत. कधी भेटशील?"
आदित्य: "गप्पा मारायला तर मी आता पण तयार आहे, पण तू मुद्द्याचं बोलणार आहेस का?"
श्रुती: "आदित्य प्लीज टाळू नकोस. मी आल्यापासून तुला म्हणतेय काहीतरी बोलायचं आहे, तू भावच देत नाहीयेस मला.असं कसं चालेल."
आदित्य: "आधी घरी चल. बोलणं काय होतच राहील. मला हार्डडिस्क देणार होतीस ना, ती दे लगेच. कामं खोळंबली आहेत."
श्रुती: “हार्डडिस्क सुनंदा मावशीकडे दिली होती. तिने कालच तुझ्या टेबलवर ठेवली.”
आदित्य: “आईपण ना, सांगायचं राहून जातं तिच्याकडून. ठीक आहे, बघतो. थँक्स यार.”
घरी आल्यावर श्रुती आणि आदित्य आपापल्या रूम मध्ये गेले. आदित्यने हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. पण पासवर्ड टाकल्याशिवाय वापरता येणं शक्य नव्हतं. त्याने श्रुतीला हाक मारली आणि पासवर्ड विचारला.
श्रुतीने काहीही न बोलता लॅपटॉप पुढ्यात ओढला आणि पासवर्ड टाकून हार्डडिस्क ओपन करून दिली. श्रुतीने पासवर्ड सांगितला नाही. पण पुन्हा कधी गरज पडली तर लिहिलेला असावा म्हणून आदित्यने तिला पासवर्ड सांगण्याचा आग्रह केला. आढेवेढे घेतच तिने तो एका कागदाच्या चिटोऱ्यावर खरडला आणि तिथून निघून गेली. हिचा काय असा सीक्रेट पासवर्ड आहे ते तरी बघावं म्हणून आदित्य तो कागद हातात धरून वाचू लागला. थोडा वेळ त्याला काही संगती लागली नाही. तिने स्वतःच नाव लिहिलं होतं.
पण स्पेलिंग चुकल्यासारखं वाटत होतं. स्वतःच नाव पासवर्ड म्हणून कोणी ठेवत नाही. हा खरंच पासवर्ड आहे ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी आदित्य श्रुतीला हाक मारणार इतक्यात त्याची ट्यूब पेटली. स्पेलिंग चुकलं नव्हतं तर ते तसं तिने मुद्दाम लिहिलं होतं. पासवर्ड होता "ShruTya" ह्यातला Shrut हे श्रुतीच्या नावातली पहिली काही अक्षरं आणि Tya हे आदित्यच्या नावातली शेवटची अक्षरं होती. तिने स्वतःच पासवर्ड म्हणून दोघांचं कपल पेटनेम तयार केलं होतं.

श्रुतीच्या ह्या कृतीने आदित्यला खुप बरं वाटलं. आपण आता खरंच तिच्याशी बोलायला हवे, उगाचच तिला त्रास दिला असंही त्याला वाटलं. ह्या गोष्टीला जास्त फाटे फुटू नयेत आणि एकदाच काय ते बोलून टाकावं म्हणून त्याने सरळ तिला टेक्स्ट मेसेज केला.
"आज संध्याकाळी ५ वाजता भेटू, त्याच कॉफीशॉपमध्ये"
"सॉरी, पण मला आज संध्याकाळी यायला जमणार नाही, हर्षदासोबत शॉप्पिंगला जायचंय. तिच्या भावाचं लग्न आहे. एरवी आम्ही प्लॅन बदलला असता. पण आमचं आधीच ठरलं होतं. तिला ऐन वेळी मी धोका देऊ शकत नाही. माझ्यासाठी ती थांबलीय. आपण बघू कधी जमतंय ते."
तिचा असा रिप्लाय वाचून आदित्यचा हिरमोड झाला. काय करावे त्याला समजेना. इतक्यात श्रुतीचा मेसेज आला.
"आता वेळ आहे का? कॉफीशॉप विसर, घरीच गप्पा मारू. मी नाश्ता आणि कॉफी बनवते. चालेल का? माझी संध्याकाळी जाण्याची वेळ होईल तेव्हा मी जाईन. तोपर्यंत माझा दुसरा काहीच प्लॅन नाहीये."
आदित्यचं आता आनंदाने नाचायचं बाकी राहिलं होतं. पुन्हा पुन्हा त्याने तो मेसेज वाचला. तिचाच मेसेज आहे ना ह्याची खात्री करून घेतली. त्याचा विश्वासच बसत नव्हता की श्रुतीने पुढाकार घेतलाय. त्याचं स्वप्न आता साकार होणार होतं. क्षणाचा विलंब न करता त्याने "ओके. डन. आलोच १५-२० मिनिटात आवरून." असा रिप्लाय दिला. त्यावर श्रुतीचा हसणारा आणि थम्स अप वाला smiley रिप्लाय म्हणून आला. पटापट स्नान करून छानसा टी शर्ट घालून आदित्य घरातल्या घरात ‘डेट’वर जायला निघाला. स्वतःच्याच रूम मधून हॉलमध्ये जाताना त्याला धडधडत होतं. पण ह्या भावना त्याने चेहेऱ्यावर दिसू दिल्या नाहीत. अगदी सहजपणे तो सोफ्यावर जाऊन बसला.
श्रुतीने गरमागरम कांदेपोहे केले होते. सुनंदा मावशीने पोहे डिशमध्ये वाढून घेतले. तिघेजण नाश्ता करायला बसले. "आई पण आहे इथे, आता काय गप्पा मारणार." असे मनात म्हणणाऱ्या आदित्यला नाराजी लपवता आली नाही. ते सुनंदा मावशीने अचूक टिपले.
सुनंदा मावशी: "बरं का वेद, मी आज कोथरूडला जाणार आहे. आज आम्ही कॉलेजमधल्या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटणार आहोत. तुला सुट्टी आहे ना आज, पण बघ ना आमचा अचानक प्लॅन ठरला. तुला फारसा वेळ देता येणार नाही मला. पण मी संध्याकाळी लवकर परत येईन. रागावू नकोस हा राजा"
आदित्य: "आई तू बिनधास्त जा. मी घरी निवांत राहतो." नाराजीची जागा आता आनंदाने घेतली. ते बघून सुनंदा मावशी म्हणाली,
सुनंदा मावशी: "हो बेटा, मला वाटलं तू नेहमीसारखा रागावशील. पण माझ्या लक्षातच आलं नाही की आज तू एकटा नाहीस. श्रुती आहे ना! चालू दे तुमचं काय असेल ते.
आदित्य: "आई......"
सुनंदा मावशी: "अरे म्हणजे गप्पा मारा. तू नुसता त्रास देत असतोस तिला. चांगला वाग"
आदित्य: "आई मी लहान आहे का आता?"
सुनंदा मावशी: "गम्मत केली रे. पोहे छान झालेत गं श्रुती. चला मी निघते, मला उशीर होतोय"
श्रुती: "मावशी कॉफी पिऊन जा, थोडंच खाल्लंय तू."
सुनंदा मावशी: "तिकडे होईल गं खाणं पिणं. तशी मी नाश्ता करणारच नव्हते. पण तू केलेस म्हणून खाल्लं. आता वाटतंय बरं झालं खाल्लं ते. चला बाय मुलांनो."

आज जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी म्हणून की काय सुनंदा मावशी रिक्षाने कोथरूडला गेली. एरवी घरात २ गाड्या असताना रिक्षाने जाण्याची तिला कधी वेळ आली नव्हती. पण आजचा दिवस जणू नातं जपण्याचा होता. तिकडे मावशी मैत्रिणीबरोबर जुनी नाती अनुभवणार होती, पुन्हा तरुण उत्साही अशी कॉलेजगर्ल होणार होती आणि इकडे घरी आदित्य आणि श्रुती आपलं हरवलेलं नातं शोधून ते जोपासण्याची धडपड करणार होते.
सगळा योगायोग अगदी प्लॅन केल्यासारखा जुळून आला होता. आईला बाय करून आदित्य घरात शिरला.
आदित्य: “तिकडे बागेत बसुया का? मी स्पीकर घेऊन येतो”
श्रुती: “नको, घरातच बसू, इकडे काय वाईट आहे?”
आदित्य: “जशी आज्ञा मॅडम.”
श्रुती: “आलेच मी कॉफी घेऊन”
आदित्य: “मला पण हवीये”
श्रुती: “अरे हो, घेऊन म्हणजे मग मध्ये ओतून आणते. काय तू पण शब्दात पकडतोस मला.“
असे म्हणून श्रुती किचनमध्ये गेली. पाठोपाठ आदित्यही गेला.
“हे घे तुझ्यासाठी, आज कॉफी ह्यात पी.”
असं म्हणून आदित्यने तिच्यासाठी आणलेला नवीन कॉफी मग तिच्यासमोर धरला.
प्रेमातलं पहिलं गिफ्ट स्वीकारत श्रुती मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सज्ज झाली होती!!

(क्रमशः )
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या आधीचा पार्ट पण खुप छान होता. आता पर्यन्तची गोष्ट पण खुप आवड्ली. खुप छान. १० वा भाग लवकर येउ दे प्लिज. खुप वाट पहायला लावता तुम्ही.

छान...

खूप वाट पहायला लावलीस...रोज माबो बघते नवीन भाग आला का म्हणून खूपच उतूस्तुकता वाढवलीस...पटकन नवीन भाग टाका... हाही भाग छान आहे

सुन्दर ....
आधि second भाग च वाचला.
१ ला भाग हि सुन्दर लिहिलाय , just वाचला .

धन्यवाद शिउ , शाली, प्रकृत, सचिन भावे , abhijat Happy
पुढचा भाग कधी येइल हे माझे मलाच माहित नाही Happy
वेळ मिळाला की लगेच लिहुन पोस्ट करते Happy