तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे बंगलोरला पहिल्या वर्षी बिल्डिंगमधल्या एकांकडे बघितलं तर एकच दिवसाचा गणपती. गणेश चतुर्थीला सकाळी आणून दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन. नंतर सोसायटीचा सार्वजनिक गणपती आणायला सुरुवात झाली त्याचं विसर्जन तर सोयीनुसार कधीही करतात. Lol साधारण चारपाच दिवस झाले की शनिवार रविवारी.
कर्नाटकात गौरी म्हणजे हरितालिका. आपण ज्यांना गौरी म्हणतो त्या गौरी आणायची पद्धत नाही. तशा प्रकारची सजावट वरमहालक्ष्मीसाठी श्रावणात करतात.

वावे, माझ्या माहेरी ही पद्धत आहे.
हरितालिकेदिवशी गौरी येते आणि दीड दिवसाचा गणपती असतो.
दीड दिवसाचा गणपती महाराष्ट्रातपण बऱ्याच जणांकडे असतो.

गुजराथमध्ये अडीच दिवस, साडेतीन दिवस असेही घरगुती गणपती पाहिले होते.

नवरात्रात नऊ दिवस सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये जत्रेचा माहोल असायचा. शिस्तीत केटरर्स बोलावून खाण्यापिण्याचे स्टॉल्स लावलेले असायचे. लोकं आपापल्या घरी जेवूनखाऊन रात्री आरती आणि मग गरबा करायला जमायचे.
रात्री १ वाजेपर्यंत गरबा, ब्रेकमध्ये खादाडी, आणि मग २-३-४ वाजेपर्यंत दांडिया.
त्या ब्रेकमधल्या खादाडीत सामोसे, वडे, पॅटीस, मिसळपाव, पावभाजी असे रोज वेगवेगळे पदार्थ. भर मध्यरात्री माणसं ते सगळं खायची हे बघून मला कल्चरल शॉक बसला होता.

घरात बसून तिथल्या सगळ्या गोंगाटाचा बेक्कार त्रास होतो, हे लक्षात आल्यावर पुढच्या वर्षी मी खाली जाऊन बसले. पहिल्या दिवशी ब्रेकमध्ये खाण्यापिण्याचा आग्रह झाला. अजिबात सवय नाही, पोट बिघडेल ही कारणं सांगून काही उपयोग झाला नसता. म्हणून मी माझ्या आजीची एक थिअरी ऐकवली- रात्री १२ ते ५ आम्ही काही खात नाही.
तर दुसर्‍या दिवशी त्या 'प्रेमळ' लोकांनी १२ ला पाच मिनिटं असताना ब्रेक घेतला आणि एकाने घाईघाईने मला सामोश्याची प्लेट हातात आणून दिली. मी परत शॉक्ड !! खावा लागला त्यातला एक सामोसा, करणार काय ! Biggrin

याच्या उलट,
एकदा सोसायटीतल्या एक बाई म्हणाल्या - "आम्ही रोज संध्याकाळी सात-साडे सातलाच जेवतो."
त्यावर माझा बाळबोध प्रश्न - "रात्री १०-११ वाजता पुन्हा भूक नाही का लागत?"
"डब्बे भर भर के सूखा नास्ता र्‍हेता हे ना कीचन मा... जिस्को लगे खा ले" (बाकी हिंदीत बोलले तरी बहुतेकदा ते मा चा हात सोडत नाहीत.)
मी शॉक्ड !!

Lol
इकडे हल्ली आम्ही साडेसहालाच जेवतो. आई-बाबा आले तेव्हा समजलं त्यांना त्यावेळी उगाच काही तरी चिवडा लाडू खायची सवय लागली आहे. मी लहान असताना अशा सवयी न्हवत्या त्यांना. त्याकाळी आम्हाला भूक लागली की आता जेवायलाच बसा करुन आई जेवायला वाढायची.
ते इकडे आले की मी 'कुठे सटर फटर खाते आता, जेवायलाच बस' सांगून उट्टं काढायचं ठरवतो, पण म्हणतो जाऊ दे आपलेच आई बाबा आहेत. Wink Proud
आता भारतात जाऊ तेव्हा बघू आमच्या पोरांना कशॉ बसतो का रात्री नऊला जेवायला बसवलं तर.

इकडे हल्ली आम्ही साडेसहालाच जेवतो. >>> हो हा खरा कल्चरल शॉक होता आम्हाला इथे आलो तेव्हा. आमचे इथले एक नातेवाईक आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी जेवायला बोलावताना म्हंटले वीकेण्ड असल्याने उशीरा चालेल सात-साडेसातला. तेव्हा आम्ही नुकतेच भारतातून आलो होतो व तिकडे ९ ला जेवायची सवय होती Happy नंतर आमचीही सवय बदलली.

इथे नेबरहूड्स मधे फिरताना रात्री ८/९ वाजता सुद्धा बहुतांश लोकांची घरे झोपी गेल्यासारखी दिसतात. कोठेही पुढच्या खोल्यांमधे उजेड दिसत नाही. हा ही एक कल्चरल शॉक होता.

हरितालिकेदिवशी गौरी येते
>> ओह! महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच ऐकलं.

दीड दिवसाचा गणपती असतो खूप जणांकडे. हा एक दिवसाचा म्हणजे जी काही पूजा वगैरे करायची ती पहिल्याच दिवशी.

दो बेबी होते तो टमी ढुंगी जैसी दिखती ना!. >>> Rofl Rofl Rofl

दिड दिवसाचे घरचे गणपती>>> आमचा होता दीड दिवसंचा गणपती. आम्ही टिळक पंचांग वापरायचो. दर चार वर्षांनी आमचे सण इतरांपेक्षा वेगळ्या वेळेला यायचे. बाकी सगळे सण आपण घरातच साजरे करतो त्यामुळे प्रश्न आला नाही पण गणपती विसर्जनाला मज्जा यायची. रस्त्यात लोक बरी आहेत ना मंडळी Uhoh अश्या नजरेनी बघायची

दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन दक्षिण कोंकणात गोवा कारवारपर्यंत आदल्या दिवशी म्हणजे तृतीयेच्या संध्याकाळी होते. संध्याकाळी काळोख व्हायच्या आत मूर्ती मखरात किंवा देव्हाऱ्यात स्थानापन्न होते. त्या आधी गौरी महादेवाची स्थापना होते. महादेव म्हणजे शेंडीवाला असोला नारळ. पक्का नारळ. कोवळे शहाळे नव्हे. गौरी स्थापन करण्याची पद्धत वेगळीच आहे . बहुतेक सगळीचकडे एका स्वच्छ कलशात पाणवठ्यावरचे ( नदी, ओहोळ,विहीर)ताजे पाणी घेऊन घरी येतात. त्या कलशात सुंदर रानफुले, विशेषकरून तेरड्याची रोपे, नागकांडी, हळदीचे रोप, असे खोचून त्याची पूजा करतात. ह्या दिवशी गौरीला गर्भवती समजून अळणी जेवण वाढतात. पालेभाजी आवर्जून असते. तसेच ती गरोदर, दोन जीवांची म्हणून जेवणाच्या पानात प्रत्येक पदार्थ दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा वाढतात. ह्या अर्थात सगळ्या लोकसमजुती आहेत पण रंजक आहेत. उत्तर कोंकणात ही पद्धत फारशी नाही.

लांबून दर्शन होत नाही बाप्पांचे. मंडपाला एंट्री एक्झिट असते. ......मंडपांच्या बाहेर त्या मंडळाने आधीच्या वर्षांमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी ठेवल्या असायच्या.
Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2022 - 02:00>>

अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्या अंधेरीतील एसिक नगरचा गणपती हे तर लहानपणी अगदी आवडीचे ठिकाण. कारण दरवर्षी चलचित्र असायचे. एखाद्या पौराणिक कथेवर किंवा सामाजिक विषयावर.

पुण्यात आल्यावर समजलं की देखावे बघायला जायचं तर शेवटच्या तीन चार दिवसात. ...कारण गणपती आला (तो ही आदल्या दिवशी वगैरे आणत नाहीतच... यथावकाश सगळं!) की मग सावकाश काय ते देखावे हळूहळू आकार घेतात.>>>
हे वाचून आत्ता अजून एक जोरदार धक्का बसला! आमच्या मुंबईत गणेश चतुर्थीच्या साधारण महिनाभर आधीच मंडप उभा राहतो आणि त्यात देखाव्याचे काम सुरु होते. अनेकदा मोठ्या मूर्तीच्या आजूबाजूने देखील देखावा असल्याने मूर्ती देखील बरेच आधीच मंडपात आणली जाते!!!

अवांतर :-
दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन दक्षिण कोंकणात गोवा कारवारपर्यंत आदल्या दिवशी म्हणजे तृतीयेच्या संध्याकाळी होते. संध्याकाळी काळोख व्हायच्या आत मूर्ती मखरात किंवा देव्हाऱ्यात स्थानापन्न होते. त्या आधी गौरी महादेवाची स्थापना होते. महादेव म्हणजे शेंडीवाला असोला नारळ. पक्का नारळ. कोवळे शहाळे नव्हे
यात अजून एक महत्वाचे. तो नारळ झाडावरून काढल्यानंतर जमिनीवर न ठेवता तसाच पूजेस्थळी नेणे आवश्यक असते. इतरत्र ठेवायचाच झाला तर खुर्ची / टेबलवर ठेवावा मात्र जमिनीचा स्पर्श होता कामा नये.

आता कदाचित लोकांना सांस्कृतिक धक्का बसू शकतो :
गणपती, गौरी आणि अनंत हे तीन वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम/सण आहेत.
मुळात गणपती भाद्रपद चतुर्थीच्या एक महिना आधी बसत आणि साधारणतः चतुर्थीला उठत. ( अगदी काहीच जमल नाही तर निदान चतुर्थीला एक दिवस तरी सण करू शकता)
त्यानंतर गौरी चां सण आणि अनन्त चतुर्दशी laa अनंताची पूजा, असे सणाचे मूळ स्वरूप.

गणपती साठी बागेतील (आपल्याच ) माती वापरावी असाही एक प्रवाह आहे.

मुळात हे सण निसर्गाच्या जवळ नेणारे आहेत.
आजच्या सारखे लांब नेणारे/प्रदूषण करणा रे नव्हते.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, धुराचा नाही, आवाजाचा नाही - पण कवणाला सांगावयाचे.

त टी: मुंबईत येवढे मोठे गणपती विसर्जन करताना पाहून "disgusted" वाटलेले आठवले!

पुण्यातले गणपती बुडवत नाहीत आणि तीच मुर्ती पुन्हा वापरतात > पुण्यात पूजनाची मुर्ती वेगळी असते जी विसर्जन करतात
तसेच पुण्यात गौरी गणपती झाले घरातले कीच लोक बाहेर पडतात त्यामूळे देखावे पण उशीरा असावेत असं मला वाटायचे.. गौरी विसर्जनानंतर तोबा गर्दी होत असे रस्त्यावर!

दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन दक्षिण कोंकणात गोवा कारवारपर्यंत आदल्या दिवशी म्हणजे तृतीयेच्या संध्याकाळी होते. >> हे मी पुण्यातही पाहिले आहे.. आद्ल्या दिवशी सुर्य मावळायच्या आत गणपती घरी आणायचा मग चतुर्थीला सकाळी लवकरच पूजा
बाकी गौरी आधीच येणे इथेच वाचले पहिल्यांदा

आमच्याकडे नदीवरून ५ दगड आणायचे व त्यांचे गौर म्हणून पूजन करायचे.. पुर्वीच्या पिढीत घरातली मुलगी वाघाने पळवून नेलेली गोष्टही आजी कडून ऐकलीय

मावळातली लोकंही तेरडा वगैरे वनस्पतींची पूजा गौर म्हणून करतात आणि जावई म्हणून शंकरुबा असतो. हे मी पहिल्यांदाच पाहिलेले तेंव्हा मजा वाटलेली.

एकूणच गणपती गौरी बद्दल बोलताना ते दिवस आठवतात व प्रसन्न वाटते ! आजचा दिवस छान जाणार!

भर मध्यरात्री माणसं ते सगळं खायची हे बघून मला कल्चरल शॉक बसला होता. >> +१

"डब्बे भर भर के सूखा नास्ता र्‍हेता हे ना कीचन मा... जिस्को लगे खा ले" >> हे गुजराथी लोकांचे तोंड सारखे चालूच असते.. खाण्यासाठी नाहीतर बोलण्यासाठी

मागे दिल्लीला जाताना आमच्या डब्यात एक गुजराथी ग्रुप आलेला, गाडी हलल्याबरोबर डबे निघाले त्यांचे बाहेर ते दिल्ली येई पर्यंत सतत काहीना काही खात होते. Lol

गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवायचा शौक अजून आला नाही धाग्यावर...
एकीकडे मोदक तर दुसरीकडे चिकन मोमोज Happy
आपल्या कल्चरमध्ये विविधताच फार... जेवढे जास्त जग फिरू तेवढे शॉक ॲबसॉर्ब करायची क्षमता वाढत असेल..

मध्यप्रदेशात गणपती बसवतात पण पुढील दहा दिवस आरती वगैरे काहीही म्हणत नाहीत. दहाव्या दिवशी विसर्जन. सार्वजनीक गणपती असेल तर आरती म्हटली जाते.
मी लहानपणआ पासून पाहीलय की देवाला अगरबत्ती लावली की तीला फूंकर मारून विझवत नाही. पण ईथे (मध्यप्रदेशात) ब्राम्हणच फूंकर मारून अगरबत्ती विझवायचा.

गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवायचा शौक अजून आला नाही धाग्यावर...<<<शौक का म्हटलय? टर उडवताय का? का? प्रत्येकाचे आपापल्या प्रमाणे देव अन त्यांचे नैवैद्य. त्यात शौक कुठून आला? Angry
उद्या उठून मोदकांनाही शौक म्हणावं मग

एवढे शॉक्स वाचून आता मी इतका निर्ढावलो आहे की कदाचित विजेच्या तारांचाही शॉक बसणार नाही. (सांस्कृतिक कार्यक्रमात वापरलेल्या विजेच्या तारा समजा, म्हणजे 'कल्चरल' शॉक म्हणता येईल.)

अमेरिकेत नविन असताना पहिल्यांदा एका छोट्या कोर्सकरीता कम्युनिटी कॉलेजमध्ये नाव नोंदवलं. पहिल्या दिवशी वर्गात गेले. शिक्षकांनी शिकवण्यास सुरुवात केली. वर्ग चालू असताना मी आजू-बाजूला नजर फिरवली तर काही विद्यार्थी चक्क काहीतरी खात होते, बाजूला सोडा कॅन! (कोक!) मी सर्द. किती हा उद्धटपणा, आता यांना नक्की वर्गाबाहेर काढणार - असं वाटत असताना - ते गुरुजी निर्विकारपणे शिकवत राहिले. धक्का नं.१
त्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले तर उभं न रहाता बसूनच उत्तरं देत होते सगळेजण!! धक्का नं.२
सर्वात कहर धक्का बसला ते, गुरूजींना चक्क नावाने (प्रथम नावाने!) हाक मारली - एका विद्यार्थ्याने! जसा काही तो गुरुजी याचा लंगोटीयारच!

थोडे व्यस्त असल्यामुळे उशिरा लिहीत आहे.मागे मनीमोहोर यांची पोस्ट वाचली खूप मनाला लागले.किती स्वतावर नियम लावून बायका जगायच्या?खूपच बंधने होती त्यांच्यावर.मी ज्या गावात (निमशहरी)वाढले तिथले मी समोर पाहिलेले आहे ते म्हणजे वाड्यातच भावकीतील चार पाच आजी/आत्या काकू बघितल्या आहेत त्यातील एक माहेरवाशीन आत्या होत्या त्या एक म्हणजे एकच भाकरी खायच्या शिल्लक राहील म्हणून मग वरती चतकोर/अर्धी खायच्या.जेवण साधे आणी मापात असायचे.बाकीच्या होत्या त्या आपल्या सारखेच जेवण घ्यायच्या.बंधन फक्त हिरवी साडी ,हिरव्या बांगड्या आणी सौभाग्य अलंकार नाही घालायचे.बाकी बोरमाळ,टिक्का पाटल्या,बिलवर,अंगठी घालत होत्या.बाकी सगळ्या रंगाच्या साड्या/लुगडेच नेसायच्या.काहीजणी सुनांना दाबातपण ठेवायच्या,समोरच्याकाकी जिला आम्ही वहिनी म्हणायचो वडील म्हणायचे म्हनून त्या खूप भांडखोर होत्या दररोज मोठ्या सुनेला बोलायच्या.सगळीकडे मुक्त संचार असायचा त्यांचा.शेवटी मात्र स्वभाव थोडा मायाळू झाला होता.या सगळ्याजणी आपल्या लाडक्या नातवाची बाजू घेऊन भांडायला यायच्या गल्लीत.कधी लहान भावाचे भांडण घरी यायचे मग आई भावाची बाजू घ्यायची पणमग आईलाच बोलायच्या मोठ्यांशी भांडते म्हणून.मग आई म्हणायची आमच्या मुलांना आजी नाही मग कोण बोलनार.बाकी एकदा आई आणी भाऊ मामाच्या गावी गेल्यावर एक गल्लीतील काकू त्यांच्या मुलाला (माझ्या भावाचा मित्रच)घेऊन आल्या भांडायला तुझ्या भावाने माझ्या मुलाला गटारीत ढकलून दिले म्हणून मग मीच मोर्चा सांभाळला तो गावी गेलाय खोटे का सांगता म्हणून?बाकी तेंव्हा ती गटार खूप फ़ेमस होती लाईट गेली की मुले ज्याच्यावर राग आहे त्याला गटारीत ढकलून द्यायची.वरती मोठा (देवीचे छोटे देऊळ आणी समोर) कट्टा होता अजुनही आहे.तिथेच सगळी चिल्लीपिल्ली खेळायची.बाकी प्रतिसाद खूपच मोठा झाला पण आठवत गेलं आणी मी लिहीत गेले.

५:३० ते ७ या वेळेत जेवण कॉमन आहे इथे. मला उलट भारतात मुल रात्री ११ वाजेपर्यंत जागी असतात हे बघून ही मुल लवकर उठणार कशी असा प्रश्न पडलेला. आम्ही लहानपणी रात्री ८:३०ला जेवायचो पण १० वाजता झोपुन साधारण ७:३०ला उठायचो. शाळा १० ला असायची. आता भारतात मुलांच्या शाळा लवकर सुरु होतात. मुल ७ लाच बाहेर पडतात. मग ११ पर्यंत कस जागतात अस वाटल ? इथली पद्धत मुलांच्या द्रुष्टीने चांगली वाटते. पण भारतात नोकरी करणार्‍या लोकांना हे शक्य नाही हे ही कळते.
तसच इथे लोकांना ऑफिसात लवकर कामाला यायची सवय आहे. आपल्याकडे बरेच वेळा ९ ही वेळ काम सुरु करण्यासाठी दिसते अजुनही. इथे बहुंताश लोक ८ ला हजर असतात. काही लोक ६ लाच काम सुरु करतात.

शौक का म्हटलय? टर उडवताय का? का? प्रत्येकाचे आपापल्या प्रमाणे देव अन त्यांचे नैवैद्य. त्यात शौक कुठून आला?
>>>>>>

मी आमच्याकडेच ज्या प्रथा पाळल्या जातात त्यांची टर का उडवेन Happy
त्यातही प्रत्येक काका-मामांकडे गावागावानुसार फरक आहे. कुठे बिनधास्त मटणाचा नैवेद्य दाखवतात तर कुठे मध्ये पडदा ठेवतात. आमचेच दोन गणपती आहेत. एक गावाला एक मुंबईत. गावाला मटणाचा नैवेद्य असतो. तिथे गेले तर आम्हीही तो खातो. तेच मुंबईत शेजार्‍यांना झेपणार नाही म्हणून टाळतो. पण तेच गौरी विसर्जनाला गणपती जाताच त्याच रात्री चिकन मटणाचा बेत ठेवतो.
तो शौक टायपो नव्हता की सोईस्कर केलेला नव्हता. जेव्हा मी हे पहिल्यांदा लहानपणी गावी पाहिलेले, आमच्याच घरच्या गणपतीला, तेव्हा मलाही शॉक बसलेला. कारण मुंबैतल्या गणपतीला हे पाहिले नव्हते. तेव्हा आईने समजावलेले की ज्या आपल्या आवडी (शौक) आणि खाद्यसंस्कृती असतात त्याच आपल्या धार्मिक प्रथांमध्ये येतात. आमच्या गावी देवाच्या जत्रेत बोकड कापून त्याच नैवेद्य वाटला जातो. मुंबईत स्थायिक झालेल्या आमच्या गावकर्‍यांनी हे ईथेही सुरू केलेले. आवड आपली आपली. समुद्रकिनारी राहणार्‍यांचे अन्न प्रामुख्याने मासे असतील तर त्यांनी त्यांच्या सणांच्या खाद्यसंस्कृतीत त्यांचा समावेश केला तर त्यात गैर काही नाही. कोणी याला काही म्हटले तर का भावना दुखावून घ्याव्यात Happy

वर्ग चालू असताना मी आजू-बाजूला नजर फिरवली तर काही विद्यार्थी चक्क काहीतरी खात होते, >>> किती छान!
आम्हाला महाविद्यालयात असे एक सर भौतिकशास्त्र शिकवायला होते. कितीही उशिर झाला तरी तासिकेला या, तास चालू असताना डब्बा खाल्ला तरी चालेल असे सांगायचे. त्यांना(त्यांच्यामागे) आम्ही नावाने बोलायचो. देखणे आणि तरूण होते.
कॅलिफॅार्नियात कुठल्यातरी विद्यापीठात PhD fellowship मिळाली म्हणून सोडून गेले. त्याउलट २-३ म्हातारे मास्तर असे होते कि तास सुरू झाला कि गडाचे दरवाजे बंद केल्यासारखे दार लावून घ्यायचे ते तास संपल्यावरच उघडायचे. दार वाजवले तर उघडणार नाही असे आधीच सांगून ठेवले होते.

इथली गणपतीबद्दल चर्चा वाचून एक शॉक आठवला.
माझा मानस भाऊ 18-20 वर्षांपूर्वी विलासपुरला स्थायिक झाला. इथे असताना त्यांच्या आणि आमच्या घरी एकत्र बाप्पा येत असत. दोघांची मूर्तीही सेम आहेत. गणपती घरी आले की आमच्याकडे वातावरण अगदी चैतन्यमय असे जणू कुणी आवडता पाहुणा आला आहे. आमच्याकडे घरात गणपती असताना आम्ही दरवाजे लावत नाही, रात्री सगळे झोपत नाही. बाप्पाला एकटे कधीच ठेवत नाही
सतत कुणीतरी त्याच्या सोबत असतोच.
अशा वातावरणात वाढलेला माझा तो भाऊ जेव्हा विलासपूरला गेला तेव्हा त्याने पाहिले की तिथे लोक गणपती भाजी घेऊन यावी तसा पिशवीत घाऊन आणतात. हे बघून त्याला एव्हढा धक्का बसला की तो तिथे रस्त्यात बसून रडू लागला. त्याच्या बायकोने त्याची समजूत घालून घरी नेले व आम्हाला फोन लावला. दादा फोनवर ते सांगून खूप रडत होता आणि इकडे आम्हीपण.

हा एक दिवसाचा म्हणजे जी काही पूजा वगैरे करायची ती पहिल्याच दिवशी. >>> कर्नाटकात काही जणांकडेतर त्याच दिवशी संध्याकाळी विसर्जित करतात, नालासोपारा इथे रहात असताना एक कुलकर्णी आडनावाचे पण कर्नाटकातले, त्यांच्याकडे ही पद्धत होती.

आम्ही टिळक पंचांग वापरायचो. >>> आमचंही पुर्वी होतं हे पंचांग, आम्ही लहान असताना. अजुनही एका आतेकडे आहे हे आणि गणपती एका आतेभावाकडे अजुनही त्याप्रमाणेच येतो.

विलासपूरला गेला तेव्हा त्याने पाहिले की तिथे लोक गणपती भाजी घेऊन यावी तसा पिशवीत घाऊन आणतात. >>> Uhoh मग का आणतात.. मलाही प्रश्न पडला. कदाचित घरी आपण देव्हाऱ्यातली मुर्ती जशी आणतो काही गाजावाजा न करता, बॉक्समध्ये पॅक करून तसे आणत असावेत. मग प्रतिष्ठापणा करताना विधी करत असावेत..

Pages