एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत

Submitted by मार्गी on 26 June, 2018 - 05:59

११: मंठा- मानवत

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना - सिंदखेडराजा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेडराजा- मेहकर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा

हे लिहिता लिहिता एक महिना झाला, पण अजूनही सर्व डोळ्यांपुढे आहे. योग सायकल यात्रेचा दहावा दिवस, २० मेची पहाट. आज फक्त ५३ किलोमीटर सायकल चालवायची आहे. आता हा प्रवास शेवटच्या टप्प्यात आहे. पण कालचा दिवस मस्त होता! मंठ्यामध्ये मस्त चर्चा झाली आणि अनेक साधक व कार्यकर्त्यांसोबत भेट झाली. आज मानवतला जाणार आहे. रोजच्याप्रमाणेच पहाटे साडेपाचला निघालो. डॉ. चिंचणेजी मला थोडं अंतर सोडायला आले. काल खूपच उखडलेल्या रस्त्यावर सायकल चालवल्यानंतर आज मस्त रस्ता आहे! आपलं मन नेहमी उड्या मारत असतं. अजूनही ह्या प्रवासाचे दोन टप्पे बाकी आहेत, पण मन तर परत पोहचलंसुद्धा. पण तरीही सजग राहून मनाला वर्तमानात आणून आजच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. हा सगळा प्रवासच इतका सुंदर झाला की, त्यातले जे दोन दिवस बाकी आहेत, त्यांचा पूर्ण आनंद घ्यायला हवा.

सायकल चालवताना मी नेहमीच हे बघितलं आहे की, कोणताही ओळखीचा रस्ता जरी असला तरी आपण जेव्हा त्यावर नवी राईड करतो, तेव्हा त्याची मजा वेगळीच असते. जरी आपण एकाच रूटवर सारखी किंवा नेहमी सायकल चालवली, तरीही प्रत्येक राईडची मजा वेगळी असते. त्याचं कारण हेच आहे की, राईड एकसारखी असेल, सायकलही‌ तीच असेल, रूटही तोच असेल, पण आपण तर तेच नसतो- बघणारा तोच नसतो! त्याशिवाय आपलं‌ मन, विचार, भावना त्या तर सतत बदलत असतात. एका विचारवंताने तर म्हंटलं आहे की, कोणीच एका नदीमध्ये दोनदा डुबकी घेऊ शकत नाही. त्याची दोन कारणं आहेत- एक तर नदीचा प्रवाह बदलत असतो; पाणी पुढे जात असतं आणि दुसरी‌गोष्ट म्हणजे आपणही प्रत्येक क्षणी बदलत असतो. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जो माणूस स्वत:सोबत प्रामाणिक असेल, त्याला नेहमीच अनुभव येतो की, मन अनेकदा स्वत:च्याही विरोधात जातं. त्यामुळेच व्यक्तिमत्वामध्ये द्वंद्व तयार होतं. अनेकदा त्यामुळे जास्त तणावही होतो आणि त्यामुळेच आपण आत्महत्या केल्याच्या बातम्या ऐकतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शरीरात- मनात हे जे सगळे बदल होत आहेत, जे अनुभव येत आहेत; ते बघणारा दृष्टा आहे त्याला जाणणं म्हणजे ध्यान आहे. सायकल चालवता चालवता त्या वेळी जे होतं‌ आहे- जो अनुभव येतो आहे, जो विचार मनात येतोय, त्याचा साक्षी होण्याचा प्रयत्न करत पुढे जातोय.


जालनामधील योग केंद्रातील प्रवेशाविषयी माहिती

आज फक्त ५३ किमी सायकल चालवायची आहे आणि रस्ताही मस्त आहे. त्यामुळे फक्त एक ब्रेक घेतला- सेलूमध्ये नाश्ता केला व संस्थेचं पत्रक दिलं. इथून मानवतपर्यंत रस्ता रेल्वे लाईनच्या जवळूनच जातोय. हा माझा नेहमीचा रस्ता आहे. मॉर्निंग वॉक प्रमाणेच मॉर्निंग राईडचा रूट आहे. पण तरीही ह्या प्रवासामध्ये सायकल चालवत असताना वेगळं वाटतंय. एका गावात मला बघून मुलं म्हणाले, कोणी‌ फॉरेनर दिसतोय. मी पुढे गेलो होतो, तरी त्यांना लगेच सांगितलं, नाही, परभणीचाच आहे! त्यांचे हसण्याचे आवाज ऐकू आले. मानवत येण्याच्या आधी रस्ता अचानक खूप सुंदर झाला. अगदी एक्स्प्रेस हायवेप्रमाणे! मी आधी आलो होतो, तेव्हा चांगला पण साधाच रस्ता होता. पण आज अगदीच सुंदर! ह्यालाच जीवन ऐसे नाव! काल मी 'रस्त्यासाठी' तडफडत होतो आणि आज माझ्या समोर अगदीच शानदार रस्ता! चला, आता त्याचा आनंद घेतो! पण मानवत जवळ असल्यामुळेच इतक्या मस्त रस्त्याचा जास्त आनंद घेता आला नाही आणि मानवत आलं!

इथे माझं आजपर्यंतचं सर्वांत मोठं स्वागत झालं! मानवत नाही इतकं स्वागत झालं! रस्त्यावर त्यासाठी सुस्वागतम् लिहिलं होतं. रस्त्यावर पुष्पवृष्टी झाली, लोकांनी हार घातला! अनेक योग साधक भेटले. त्यातील अनेकांनी माझ्या स्वागतासाठी स्वत:च्या खिशातून खर्च केला होता! एक छोटा कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. कहेकर जी ह्यांच्या घरी गेलो. संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी बोलणं झालं. नंतर थोडा आराम, मग काम आणि बोलणं होत राहिलं.


आज ५३ किमी चालवली आणि ५५० किमी पूर्ण झाले

मानवत नाही एवढं स्वागत!
संध्याकाळी मंदीरात चर्चा झाली. इथे निरामय संस्थेचे दोन योग शिक्षक आहेत. त्याशिवाय पतंजली समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इतर मार्गांनी योग करणारेही अनेक साधक आहेत. चर्चेमध्ये काही महिलासुद्धा आहेत. ह्या प्रवासात एक- दोन ठिकाणचा अपवाद वगळता जवळ जवळ सगळीकडे महिलांचाही सहभाग दिसला. चर्चेत प्रत्येकाने आपले अनुभव मांडले. एका साधकांनी तर ह्या चर्चेसाठी त्यांचा प्रवास पुढे ढकलला. योग आयुष्यात कसा आला, कसा सुरू केला आणि आता कसा करत आहेत, हे सर्वांनी सांगितलं. काही जण इथून पुढे योग सुरू करतील. इथल्या काही साधकांनी दिल्लीमध्ये जाऊन योग शिकला आहे. वेगवेगळ्या पद्धतींनी योग करत आहेत आणि आपलं ज्ञान इतरांसोबतही शेअर करत आहेत. आपण जे शिकतो, ते इतरांसोबत शेअर करणंही तितकंच गरजेचं आहे. काही जणांना वाटू शकतं की, आधी आपण परिपूर्ण बनावं आणि त्यानंतरच इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे ते सुद्धा. पण त्याबरोबर हेही खरं की, जर आपण एखादी गोष्ट इतरांसोबत वाटून घेतली तर आपल्याला आणखी मिळत जातं. आपण चांगलं शिकत जातो. त्यामुळे अध्यात्म साधनेत शेअरिंग किंवा मंगल मैत्री महत्त्वाचं मानलं जातं. इथे अनेक विद्यार्थ्यांनाही योग शिकवला जातो. विशेष म्हणजे मुलांच्या योगाची एक सिडीसुद्धा बनवली आहे. उद्या मी परभणीला जाताना वाटत स्वामी मनिषानन्दांच्या आश्रमात चालू असलेला योग वर्गही बघेन. चर्चेमध्ये सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर मी माझे अनुभव सांगितले व आजवरच्या चर्चांबद्दल सांगितलं. आता सायकल प्रवासाचा एक दिवस बाकी आहे. उद्या परभणीला जाईल व निरामय टीमसोबत व तिथल्या योग साधकांसोबत चर्चा करेन.

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढचा भाग: मानवत- परभणी

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults