एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा

Submitted by मार्गी on 19 June, 2018 - 09:37

१०: मेहकर- मंठा

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना - सिंदखेडराजा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेडराजा- मेहकर

आज हे लिहित असताना पावसाळा सुरू झाला आहे. पण योग- सायकल यात्रेच्या नवव्या दिवशी खूप ऊन होतं. १९ मे ची पहाट. आज सुमारे ७० किलोमीटर सायकल चालवायची आहे. आणि आजचा रस्ताही नीट नसणार आहे. त्याची एक झलक काल बघितलीही होती. त्यामुळे हे ७० किलोमीटर कठीण जाणार आहेत. पहाटे निघताना मेहकरमधल्या मंदीराजवळ चालणा-या एका महिला योग वर्गाच्या साधिकांना भेटून पुढे निघालो. आज रस्त्यावर उल्कापाताने बनलेलं जगप्रसिद्ध लोणार सरोवर लागेल. लवकरच सुलतानपूर मागे टाकलं. इथून लोणार फक्त बारा किलोमीटर आहे, पण रस्ता अगदीच खराब. अगदी उखडून टाकलेला दगड- मातीचा रस्ता. नवीन चार का सहा लेनचा रस्ता बनवण्यासाठी सगळाच रस्ता खोदून ठेवला आहे! मध्ये मध्ये क्वचित रस्ता. बाकी फक्त दगडयुक्त माती.

लोणारच्या आधी रस्त्याजवळच्या शेतामध्ये एक कोल्हा दिसला. आधी कुत्राच वाटला, पण काळं तोंड आणि गुच्छासारखी शेपूट! नक्कीच हा पाणी शोधत शेतात- गावाकडे आला असला पाहिजे. त्यानेही मला बघितलं, पण त्याला माणसांना बघण्याची सवय असावी, तो सरळ पुढे गेला. हा मुख्य शहरांना जोडणारा रस्ता नसल्यामुळे वाहतुकही कमी आहे. हळु हळु लोणार जवळ येत गेलं. पण त्याबरोबर हेही कळालं की, आजचा प्रवास अगदी कासवगतीने होणार आहे. लोणार गावानंतर नाश्ता केला व सरोवराकडे निघालो. सरोवर रस्त्याजवळच आहे. लहानपणी एकदा ते बघितलं होतं. आजचा टप्पा बराच मोठा असल्यामुळे रस्त्यापासून थोडं बाजूला जाऊन वरूनच सरोवर बघितलं व निघालो. इथे अभयारण्य असल्यामुळे मोराचा आवाज येतोय.


लोणार सरोवर!!

आत्तापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर झाले आहेत आणि पंचेचाळीस बाकी आहेत. त्यामुळे पंधरा किलोमीटरच्या टप्प्यावरच लक्ष देत पुढे निघालो. आज प्रवासाचा नववा दिवस असल्यामुळे शरीर अगदी सेट आहे आणि सायकल चालवणं सोपं जातंय. जर पहिल्या काही दिवसांमध्ये असा मोठा टप्पा किंवा इतका खराब रस्ता असता, तर कठीण झालं असतं. न थांबता एका किलोमीटरमध्ये सुमारे तेरा किलोमीटर झाले. अर्धा रस्ता पार केला. पण रस्ता पूर्णच बाद आहे. जर फक्त मातीचा कच्चा रस्ता असता, तरी चाललं असतं. पण हा दगडांनी भरलेला खोदलेला रस्ता आहे. इथे सायकलीची काळजी घेत अगदी हळु जावं लागेल. आजचा टप्पा अगदी टेस्ट क्रिकेटच्या इनिंगसारखा आहे! आज मला स्पीड व किलोमीटर बघायचेच नाहीत. फक्त टिकाव धरायचा आहे, सायकल चालवायची आहे. आज फक्त विकेटवर उभं राहायचं आहे. स्ट्राईक रेट आज महत्त्वाचा नाही. आज संयमाने खेळायचं आहे!

हा असा रस्ता आहे जिथे कोणतीही गाडीही चालवणं वेदनादायी अनुभव असेल. प्रवाशांसाठी तर असेलच, पण गाडीसाठीसुद्धा! पण माझी सायकल सगळं सहन करते आहे! आजपर्यंत जितके रस्ते बघितले होते, तितक्यामध्ये हा सर्वांत वाईट आहे! हळु हळु जात राहिलो. छोट्या टप्प्यांवर फोकस करत गेलो- ८-१० किलोमीटरनंतर ब्रेक घेईन असं म्हणत जात राहिलो. मध्ये मध्ये अगदी छोटी गावं व छोटे हॉटेल लागत आहेत. एका जागी ऊसाचा रस घेतला. ऊसाचा गठ्ठा आणणा-या छोट्या मुलीला बघून वाईट वाटलं. एक कुटुंब हे हॉटेल चालवतं आहे. त्यामध्ये छोट्यांनाही काम करावं लागतंय. आपल्या समाजाच्या पद्धती आणि आपले विचार! काय करणार! आता बुलढाणा जिल्हा संपून परत जालना जिल्हा सुरू झालाय जो नेहमीच मला विचारतो- जाल ना? पंक्चर न होता जाशील ना आज? आज पंक्चर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे!

हळु जात असल्यामुळे एक फायद मात्र झाला की, तितकं जास्त थकायला झालं नाही. मंठाच्या काही अंतर आधी तिसरा ब्रेक घेतला. आज जास्त वेळ सायकल चालवत असल्यामुळे जास्त ब्रेक्स घ्यावे लागले. मंठा जवळ येत असताना तिथले साधक- श्री. वगदे जींना फोन केला की पाऊण तासाने पोचेन. सायकलवरून उतरून त्यांच्याशी बोलत होतो तितक्यात धुळीचा मोठा लोळ आला- मोठी धुळीची वावटळ आणि सगळं काही एक सेकंदासाठी त्यामध्ये हरवून गेलं! जर मी सायकल चालवत असतो, तर सायकलसह बाजूला फेकलो गेलो असतो! इतका तीव्र लोळ होता. पण तो लगेचच पुढे निघून गेला. माझ्या मागे असलेल्या बाईकस्वाराचा चेहरा बघण्यासारखा झाला होता! मंठा येण्याच्या आधी एक घाट आला. ह्या सायकलीवरचा दुसरा घाट. पण मला तो उतरायचा आहे. ह्या घाटावरून खूप लांबपर्यंतचं दृश्य दिसतंय- वाटूर- परतूरपर्यंतचं क्षेत्र दिसतंय जिथे मी सुरुवातीला गेलो होतो. मंठा जवळ आल्यावरही रस्ता सुधरण्याचं नाव घेत नाहीय. काहीच फरक नाही. शेवटी वाळवंटात जशी हिरवळीची ओढ लागते, तसं झालं. जवळजवळ बारा वाजले आहेत. आजपर्यंतचे सर्व टप्पे अकरापर्यंत पूर्ण केले आहेत. पण आज मोठं अंतर आणि खराब रस्त्यामुळे वेळ लागतोय. असं करताना जेव्हा शानदार पक्का हायवे समोर दिसला, तेव्हा फार मोठा आनंद झाला! आहा! एका अर्थाने जणू घरच आलं, कारण मी इथपर्यंत अनेकदा आलोय आणि इथून पुढचे दोन टप्पे आजच्या तुलनेने छोटेच आहेत!


आज एकूण ७१ किमी चालवली

मग काय, मंठ्यामध्ये श्री. वगदे जींकडे आराम केला आणि दुपारी डॉ. चिंचणे जींकडे गेलो. मंठामध्ये निरामय योग संस्था किंवा जालन्याच्या चैतन्य योग केंद्राचे कोणी योग साधक नाही आहेत, पण इथे आदित्य सेवा संघाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क झाला आहे. जिंतूरवरून परतूरला जाताना त्यांना भेटलोही आहे. त्यामुळे संध्याकाळी आदित्य सेवा संघाचे साधक व अन्य योग साधकांना भेटेन. पण चर्चेच्या आधी संध्याकाळी श्री वगदे जी आणि इतर साधकांसोबत फेरफटका मारता आला. हे सगळे मित्र खूप अनौपचारिक पद्धतीचे असल्यामुळे छान गप्पा झाल्या. कोणतीही औपचारिकता मध्ये न येता त्यांना मनमोकळेपणाने भेटलो. मंदीराजवळच्या टेकडीवर ते दररोज संध्याकाळी तीन- चार किलोमीटर फिरतात. फिरता फिरता त्यांच्या कामाची माहिती मिळाली व पायांनाही‌ मस्त आराम झाला, पाय एकदम हलके झाले! आदित्य सेवा संघ एक अशी कार्यकर्त्यांची टिम आहे, जी अनेक वर्षांपासून नियमित सेवा कार्य करते. विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत, त्यांना सूर्य नमस्कार शिकवणे, अभ्यासाचं साहित्य देणे असं काम करते. त्याशिवाय हे सर्व सदस्य वेगळ्या प्रकारचे योग साधक आहेत. सगळे पहाटे चारला उठतात व नियमित सूर्य नमस्कार आणि अन्य व्यायाम करतात. त्यांच्यासोबत मंदीराजवळ फिरताना अगदी रिफ्रेश वाटलं.

संध्याकाळी डॉ. चिंचणे जींच्या घरी गच्चीत चर्चा रंगली. अनेक योग साधक व त्यांच्याशी संबंधित असलेले कार्यकर्ते आले. महिला कमी होत्या, पण चर्चेत त्यांचा सहभाग चांगला होता. सर्वांनी आपला परिचय सांगितला व योग साधनेविषयी अनुभव सांगितले. इथे एखाद्या ठराविक पद्धतीने योग करणारे असे कोणी नाहीत. पण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने योग करतात व जीवनशैलीत त्याचा अंगीकार करतात- जसं पहाटे उठणं, नियमित शारीरिक व्यायाम इ. एक पतंजली योग पीठाच्या साधिका आजूबाजूच्या गावांमध्ये योगाची शिबिरं घेतात. मी ज्या लोणार रस्त्याने आलो, त्याच्याच जवळ त्यांचं गाव आहे. त्यांचे वडीलही आले आहेत. मुले व युवकांसाठी शारीरिक व्यायाम व खेळाचं महत्त्व ह्यावरही चर्चा झाली. ह्या चर्चेमध्ये विशेष म्हणजे आदित्य सेवा संघाशी संबंधित काही मुलंही आली. ते सूर्य नमस्कार व इतर आसन नियमित करतात. अनेक जण योग न करणारेही आहेत, त्यांना आता योग करण्याची प्रेरणा मिळेल. प्रत्येक ठिकाणच्या चर्चेप्रमाणेच ह्या चर्चेच्या निमित्ताने इतर काही साधकांचाही एकमेकांशी संपर्क झाला. त्याचं एक कारण सायकल हेही आहे. जर मी हाच प्रवास व हाच उपक्रम दुस-या गाडीने केला असता, तर इतके लोक आले नसते, असं आदित्य सेवा संघाच्या श्री खनके जींनी बोलून दाखवलं. ते स्वत: संगीत आणि योग साधना करतात. परभणीतल्या माझ्या कुटुंबियांचे आदरणीय स्नेही असलेले श्री डॉ. गुलाम रसूल- संगीतातले 'मास्टरसाब' ह्यांचे ते शिष्यही होते! परभणी‌चे डॉ. गुलाम रसूल एक अवलिया संगीत साधक होते- माझी आई आणि आजी ह्यांनी त्यांच्याकडे संगीत शिकलं होतं. त्यांना संगीतामध्ये अखिल भारतीय पातळीवर मान्यता होती, गौरवलं जात होतं. आजही डीडी भारतीवर त्यांच्यावरची फिल्म लागते. पण दुर्दैवाने इतका मोठा संगीत साधक इथे होता, हे परभणीतल्या जास्त लोकांना माहितीही नाही. असो.

चर्चेनंतर एक दिव्यांग योग साधकांची भेट झाली. महेशजी दिव्यांग असले तरी प्राणायाम करतात आणि दुकानही चालवतात. ह्या सगळ्यांना भेटताना डॉ. चिंचणे जी आणि श्री. वगदे जी ह्यांचा लोकसंपर्क व अनौपचारिक जोडलेली नाती जाणवत आहेत. कोणत्याही मोठ्या कामाचा पाया हाच असतो- लोकांचं आपापसामध्ये जोडलेलं असणं व संपर्क. मंठामध्ये तो छान आहे असं दिसलं. त्या अर्थाने आजचा दिवस शानदार राहिला. एका प्रकारचा क्लायमॅक्स. चर्चाही मस्त रंगली. आता फक्त दोन टप्पे बाकी आहेत. पण मानसिक दृष्टीने मी मंठामध्ये पोहचलो तेव्हाच घरी पोहचलो आहे!

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढचा भाग: मंठा- मानवत

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

मस्त झालाय हा भाग.

लोणार ते मंठा रस्ता फार म्हणजे फारच खराब झालाय.

सायकल ला फुल्ल पॉईंट्स