एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

Submitted by मार्गी on 25 May, 2018 - 09:05

२: परभणी- जिंतूर- नेमगिरी

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना

११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे. आजचा टप्पा तसा घरापासून अंगणातलाच आहे. पूर्वी अनेकदा जिंतूर- नेमगिरीकडे आलो आहे. सायकलीवर माझं पहिलं शतक ह्याच रूटवर झालं होतं. त्यामुळे एका अर्थाने आजचा टप्पा साधारणच वाटतो आहे. जिंतूर घरापासून ४५ किमी आहे व तिथे सामान ठेवून जवळच्याच ३ किमीवर असलेल्या नेमगिरी डोंगरावर जाईन.

३ लीटर पाणी सोबत घेऊन जातोय. त्यात इलेक्ट्रॉल टाकलेलं आहे. शिवाय सोबत चिक्की- बिस्कीट ठेवलं आहे व मध्ये मध्ये ते खातोय. अर्धा तास झाल्यानंतर शरीर लयीत आलं आणि आरामात पुढे जाऊ शकतोय. अजून कोवळं ऊन आहे. ह्या वेळी विचार करतोय की कमीत कमी ब्रेक घ्यावेत. रस्त्यावर हॉटेलमध्ये फार पर्याय नसल्यामुळे चहा- बिस्कीटावर भर देईन. खूप वेळेपर्यंत पहिला ब्रेक घ्यावासा वाटला नाही. ३० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर बोरी गावात पहिला ब्रेक घेतला. चहा- बिस्कीट घेतलं व तिथे असलेल्या लोकांना माझ्या प्रवासाविषयी सांगितलं आणि संस्थेची पत्रकंसुद्धा दिली. आता फक्त पंधरा किलोमीटर बाकी‌आहेत. पण आता ऊन वाढतंय व माझ्या शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसत आहेत. कदाचित पहिला ब्रेक घ्यायला उशीर केला, त्यामुळे ऊर्जा स्तर थोडा कमी असावा. पण पुढे जात राहिलो. जिंतूरच्या सहा किलोमीटर आधी चांदज गावात रस्त्यावर असलेल्या काही जणांनी माझा फोटो घेतला. मग कळालं की, ते पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत व इकडच्या गावांमध्ये जल संवर्धनाचं काम करत आहेत. पाणी फाउंडेशनचं काम अनेक गावांमध्ये चांगलं सुरू आहे. त्यांनी माझ्या प्रवासाला व मी त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या. काही पत्रकंही दिली. आता जिंतूर फक्त सहा किलोमीटर.

समोर दिसत असलेल्या टेकड्या बघत जिंतूरला पोहचलो. जिंतूरचे योग- शिक्षक व योग स्वाधक स्वागतासाठी तयार आहेत. काही सायकलिस्टपण आहेत. पण आता पोहचल्यावर मला खूप थकायला झालं आहे. कसबसं त्यांचं स्वागत स्वीकारलं, थोडं बोललो व जिथे आज थांबायचं आहे, तिथे सामान ठेवून नेमगिरीसाठी निघालो. नेमगिरी प्राचीन जैन तीर्थ स्थान आहे. ३ किलोमीटर अंतरावरच आहे. एक योग कार्यकर्ते- मते सर सायकलवर सोबतीला आले. आधीही अनेकदा इथे आलो आहे. इथे एक छोटा एक किलोमीटरचा घाट लागतो. तिथे सायकल चढण्याची अपेक्षा नव्हतीच आणि पायी पायी गेलो. पहिल्यांदा जेव्हा गेअरच्या सायकलीवर आलो होतो, तेव्हाही इथे पायी जावं लागलं होतं. पण पुढे सराव वाढल्यानंतर दुस-या गेअरच्या सायकलीवर आरामात घाट पार केला होता. पण ही एटलस सिंगल गेअरची सायकल असल्यामुळे चढणार नाही. त्यामुळे एक किलोमीटर चालत गेलो व पाय थोडे मोकळे झाले.

पण आता फार थकवा वाटतोय. आणि खरं सांगायचं तर ऊष्माघाताची भिती वाटतेय. कसबसं नेमगिरीच्या विशाल मूर्त्यांचं दर्शन घेतलं. येताना थोडा उतार होता आणि नंतर कशीतरी सायकल चालवत मुक्कामाच्या जागी पोहचलो. परभणीतून निरोप देताना काही जण मला एनर्जाल देत होते. पण सामान जास्त आहे, सांगून घेतलं नाही! पण आता मला एनर्जालचाच आधार आहे. योग शिक्षकांनी मला एनर्जाल व इलेक्ट्रॉल आणून दिलं. हळु हळु आराम करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण स्थिती अशी बिकट होती की, आरामही नीट करता येत नाहीय. डिहायड्रेशनची सगळी लक्षणं दिसत आहेत. तेव्हा खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉलयुक्त पाणी पिण्यास सुरुवात केली व कसबसं तीन- चार तासांनंतर थोडं बरं वाटलं. रात्रभर नीट झोप न झाल्यामुळे दुपारी एक तासांची झोप मला अनिवार्य आहे. पण तीसुद्धा मिळाली नाही. त्यामुळे सुमारे दीड तास डोळे बंद करून पडलो. नंतर लॅपटॉपवर माझं ऑफीसचं कामही केलं. दुपारी नळाच्या पाण्याने हात पोळत आहेत. एकदा तर वाटलं माझी ही योजना खरंच जमेल ना? कारण इतकं कठीण असेल तर... पण लवकरच आत्मविश्वास आला, कारण कोणत्याही सायकल प्रवासात पहिला दिवसच सर्वांत कठीण असतो. शरीराला लयीमध्ये यायला वेळ लागतो. शिवाय सायकलीचे टायर्स बदलले आहेत, त्यामुळे ते थोडे जड आहेत. दोन- तीन दिवसांमध्ये तेही थोडे एडजस्ट होतील व सायकल चालवणं थोडं सोपं होईल. संध्याकाळ होईपर्यंत डिहायड्रेशनची लक्षणं थोडी कमी झाली. संपूर्ण दिवसभरात पारवे सर व इतर योग- आधकांनी खूप सहकार्य केलं. त्यामुळे थोडं तरी रिलॅक्स होऊ शकलो.

संध्याकाळी अशाच थकलेल्या व अपुरी झोप झालेल्या स्थितीत जिंतूरच्या योग- प्रेमींसोबत चर्चा केली. अनौपचारिक योग- गप्पा असं स्वरूप. ही चर्चा जिंतूरच्या बोर्डीकर महाविद्यालयाच्या परिसरात झाली. पंचवीस- तीस योग साधक आले. निरामय संस्थेचे पाच योग शिक्षक आहेतच, शिवाय इतरही काही ग्रूप्स होते. पतंजली व आर्ट ऑफ लिव्हिंगशी संबंधित लोकही आहेत. आणि सगळ्यांत मोठा ग्रूप जिंतूरचे योग शिक्षक काकडे सरांचा आहे. ते मोठे पोलिस अधिकारी आहेत, पण अनेक वर्षांपासून योग शिकवतात आणि त्यांची साधना तर चाळीस वर्षांची आहे. अय्यंगार पद्धतीचा योग ते शिकवतात. त्यांचे अनेक विद्यार्थीही आले आहेत. पाच- सहा महिलासुद्धा आहेत. सर्वांनी आपला परिचय दिला व योगाशी असलेला संबंधही सांगितला. जे लोक योग साधक नाहीत किंवा योग प्रशिक्षण घेतलेले नाहीत, तेही योग साधक आहेत, असंच वाटतंय. कारण चर्चेत त्यांची योगातील आवड, आस्था व जागरूकताही समोर आली. सर्वांनी योगाशी संबंधित अनुभव सांगितले. नंतर थोडं माझ्याविषयी बोललो की, मी कसा अनियमित योग साधकापासून नियमित योग साधक बनत आहे, योग- ध्यान व सायकलिंगच्या संदर्भात मला आलेले अनुभव इ. वर थोडं बोललो. चर्चा छान झाली. आणि ह्या मीटिंगमुळे आणखीही काही योग साधक संपर्कात आले. मीटींग चांगली झाली आणि थकवा असूनही मी त्यात चांगला सहभाग घेऊ शकलो. संध्याकाळीही इथे सायकलवरच आलो, त्यामुळे दिवसभरात सुमारे ५५ किमी सायकलिंग झालं.

तिथून परत आल्यावर नऊ वाजले आहेत. अगदी चार घास खाऊन झोपेला शरण गेलो. परत उद्या पहाटे साडेचारला उठायचं आहे, त्यामुळे आज रात्री सहा- सात तास तरी झोप अनिवार्य आहे. जर चांगली झोप झाली नाही, तर उद्याचा माझा प्रवास अडचणीत येईल. अनेक दिवस रोज सायकलिंग करताना चांगला आराम फार मोलाचा. वर्क आउटसोबत वर्क इन (आराम, मनाने रिलॅक्स असणं आणि चांगली झोप, ध्यान) हेही गरजेचं असतं. तरच मी दुस-या दिवशी परत ताजातवाना राहीन. ह्या अपेक्षेने झोपलो आणि आता मस्त झोपही आली!

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढील भाग: जिंतूर- परतूर (६३ किमी)

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

मस्तच!

तुम्ही नेहमी वापरता ती सायकल आणि ह्या मोहिमेत वापरलेल्या सायकलमधे असलेल्या हॅन्डल बार च्या रचनेत फरक आहेत. त्यामुळे काही अडचण/त्रास/सुलभता जाणवली का ?

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ मध्यलोक जी, सवय केली होती, सो विशेष फरक वाटला नाही. सुरुवातीला दोन- तीन दिवसच किंचित त्रास झाला. नंतर अजिबात नाही.