एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर

Submitted by मार्गी on 18 June, 2018 - 09:35

९: सिंदखेड राजा- मेहकर

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना - सिंदखेडराजा

योग सायकल यात्रेचा आठवा दिवस, १८ मे ची पहाट. पहाटे ठीक साडेपाचला निघालो. आज चक्क थोडा अंधार आहे. उन्हाळ्यात पहाटे ह्या वेळेपर्यंत उजेड झालेला असतो. पण आज काही मिनिटांपर्यंत अंधारच आहे. पहिल्यांदाच असं दिसतं आहे. आणि सिंदखेड राजावरून मेहकरला जाणारा हा हायवे पुणे- नागपूर महामार्गही आहे. त्यामुळे भर वेगात अनेक ट्रॅवल्स बस आणि ट्रक्स जात आहेत. त्यामुळे काही मिनिटांपर्यंत त्यांची थोडी भिती वाटली. जेव्हा अर्धा तासाने हळु हळु उजेड झाला, तेव्हा बरं वाटलं. आजवरच्या योग चर्चा आठवत आहेत. एका ठिकाणी एका साधिकेने म्हंटलं होतं की, माझा मुलगा खूप खोडकर आहे, म्हणून जरा शांत होण्यासाठी मी योगाकडे वळले आणि नंतर माझ्यासोबत तोही योग शिकला! एका ठिकाणी एका योग शिक्षकाने आपल्या खाण्याबद्दल खूप छान सांगितलं होतं. ते म्हणाले होते जर आपल्याला गुलाब जाम आवडत असतील, तर असे खायला पाहिजेत- हळु हळु, पूर्ण जवळून बघत; पूर्ण आनंद घेत घेत. जर आपण असं खाल्लं, तर कमी खाऊनही आपल्याला समाधान मिळतं. अशा प्रकारे ध्यानपूर्वक खाल्लं जाईल आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लंही जाणार नाही.

तसं बघितलं तर आजचा व उद्याचा टप्पा एका अपरिचित भागातला प्रवास आहे. आधी इथे कधीच आलो नाही आहे. त्यामुळे आज सायकल चालवताना थोडं अस्वस्थ वाटतंय. आणि अर्थातच त्याबरोबर उत्कंठा आणि रोमांचही तितकाच आहे. आजचा रस्ता मस्त आहे. चांगला हायवे आहे. आरामात पुढे जाऊन वीस किलोमीटरवर एका गावात नाश्ता घेतला. छोट्या गावातले लोक व विशेषत: मुलांना माझी सायकल व माझं फार आश्चर्य वाटतं! नाश्ता करून पुढे निघालो तेव्हा थोडा चढ लागला. वेग जरा कमी झाला. ह्या रूटचं नियोजन केलं तेव्हा ह्या रस्त्यावर असलेले चढही बघितले होते. आज आणि उद्याच्या रस्त्यावर जास्त चढ नाहीय, किंबहुना अर्ध्या टप्प्यानंतर उतार आहे. त्यामुळे काही अडचण नाही. पण तरीही वेग कमी असल्यामुळे मनात थोड्या शंकाकुशंका आल्याच. वाटलं की, मला पुढे जाताच येत नाहीय. अचानक एका क्षणी वाटलं की, फक्त बावीस किलोमीटर झाले आहेत आणि अडोतीस बाकी आहेत. कधी कधी असं होतं की, आपण छोट्या टारगेटसकडे लक्ष देण्याऐवजी एखादं मोठं उद्दिष्ट समोर ठेवतो- जसं रोज पहाटे तीनला उठेन. आणि नेहमीच इतक्या मोठ्या उद्दिष्टाचं दडपण येतं. त्यामुळे खरं तर अशी फार मोठी उद्दिष्टं ठेवण्याऐवजी छोटीच उद्दिष्ट ठेवावीत- जसे रोज उठतो त्याहून अर्धा तास आधी उठेन व आठवड्यात कमीत कमी चार- पाच दिवस तरी तसा प्रयत्न करेन. अनेकदा बघितलंय- ऑफीसमध्ये मोठी डेडलाईन व टारगेट पूर्ण करताना किंवा कोणत्याही इतर कामामध्ये- मोठ्या टारगेटला समोर ठेवण्यापेक्षा छोटे छोटे टप्पे समोर ठेवणं उपयोगी पडतं. म्हणजे अजून पस्तीस किलोमीटर बाकी आहेत, असा विचार करण्यापेक्षा फक्त पुढच्या पाच किंवा दहा किलोमीटरचा विचार करायचा. त्यामुळे दडपण येत नाही आणि सायकलिंगमधली जी मानसिक क्रिया आहे, जो मेंटल भाग आहे; तो आरामात होतो. असा विचार करत पुढे निघालो. त्याबरोबर सतत थोड्या वेळाने बदलणारी दृश्य! निसर्गाची जादू अशी की, थोड्या वेळाने बदलणा-या दृश्यामुळे आपल्या मनातला प्रवाहही बदलतो.

युंही कट जाएगा सफर साथ चलने से
के मंजिल आएगी नजर साथ चलने से!

हळु हळु पुढे जात राहिलो आणि जसे किलोमीटर होत गेले, तसा उत्साह वाढत गेला. तीस किलोमीटर पार झाल्यावर तर खूपच सोपं झालं. कोणत्याही मोठ्या कामाचे सुरुवातीचे टप्पेच कठीण असतात. समजा आज आपल्याला दहा तास एखादं काम करायचं आहे. ज्याला सवय आहे, त्याला काहीच अवघड नाही. पण जर काही गॅपनंतर किंवा नव्याने ते करत असू, तर दहा तास फाsर मोठे वाटतात. अशा वेळेस दहा तासांचा विचारच करायचा नाही. विचार तर फक्त पहिल्या तासाचा करायचा. एक तास झाल्यावर दुस-या तासाचा. असा एक एक टप्पा करत गेलो की अर्धा रस्ता आरामात पार होतो व पुढचा मग आपोआपच पार होतो. हा सुद्धा धारणेचा अभ्यासच आहे- मनाला एकाच विषयावर केंद्रित करून ठेवायचं आणि त्या वेळी बाकी विचार करायचा नाही. विचार करण्याची क्षमता तर असावीच, पण जेव्हा गरज असेल, तेव्हा विचार बंदही करता आले पाहिजेत. असो.

लवकरच सुलतानपूरला पोहचलो. उद्या सुलतानपूरवरूनच लोणारकडे जाईन. इथून मेहकर फक्त अकरा किलोमीटर आहे, पण रस्ता फारच बाद आहे. त्यामुळे थोडा वेळ लागला. पण एकूण आरामातच मेहकरला पोहचलो. काही काही ठिकाणी गेल्यावर अचानक आपलेपणा जाणवतो; तसं मेहकरमध्ये पोहचताना वाटलं की, एखाद्या परिचित ठिकाणीच आलो आहे. रोजच्याप्रमाणेच गेल्यावर थोडा वेळ साधकांसोबत बोललो, नंतर श्री सावजी सरांकडे आराम केला. आजवरच्या अनुभवांबद्दल थोडक्यात बोललो व उद्याच्या रस्त्याची चौकशीही केली.


मेहकरमध्ये साधकांद्वारे स्वागत


आज ५७ किमी

संध्याकाळी चांगली चर्चा झाली. महिलांचा चांगला सहभाग आहे. वेगवेगळ्या पद्धतीने योग करणा-या साधकांनी आपले अनुभव मांडले. एक अंदाजे पंचावन्न- साठ वर्षांच्या ग्रामीण पार्श्वभुमीच्या महिलेने सायटीकासारख्या रोगांवर वैद्यकीय परिभाषेत आपलं मत मांडलं व ते बघून छान वाटलं! प्रत्येक ठिकाणी मी हेच बघितलं की, आरोग्य व योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता बरीच वाढली आहे. लोकांना त्याचं महत्त्व कळालं आहे. आणि त्यांना योगाच्या ज्या पद्धती कळत आहेत, ते त्या शिकतही आहेत. त्यामध्ये पतंजली योगपीठ आणि इतर संस्थांची मोठी भुमिका आहे. योग शिकण्याचे जे टप्पे आहेत- योगाचा परिचय होणे, आसन- प्राणायाम शिकणे, ते नियमित करत राहाणे इ. आता अनेक लोक ह्या टप्प्यांपर्यंत आलेले आहेत. अनेक जण काही ग्रूप्ससोबतही योग करत आहेत. त्यामुळे योग प्रसार तर होतोच आहे. कारण जेव्हा कोणी योग करतो/ करते, तेव्हा ते बघून इतरांनाही प्रेरणा मिळते. आणि जे सातत्याने योग करत राहतात, त्यांना योगाचे मिळणारे लाभ- आरोग्य, ऊर्जा व आनंद तेही इतरांना कळतात व तेही योगाकडे वळतात. आता योग शिकवणा-या संस्थेला हे बघायला पाहिजे की योग साधनेचे पुढचे जे टप्पे आहेत- म्हणजे योग प्रक्रियांविषयी सखोल समज, एक जीवन दृष्टी म्हणून योगाचा जीवनशैलीत अंगीकार आणि ध्यानाची साधना- ह्या दिशेने लोक पुढे गेले पाहिजेत. आणि हेसुद्धा होत आहे.

आता उद्याचा सत्तर किलोमीटरचा टप्पा! एका अर्थाने ह्या प्रवासाचा क्लायमॅक्स, सर्वांत मोठं अंतर आणि कदाचित सगळ्यात कठीण टप्पासुद्धा! कारण उद्याच्या सत्तर किलोमीटरमधला बराच रस्ता खोदून ठेवलेला किंवा कमी दर्जाचा आहे! बघूया कसं होतं!

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढचा भाग: मेहकर- मठा

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults