एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा

Submitted by मार्गी on 15 June, 2018 - 12:16

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना

८: जालना- सिंदखेडराजा

योग सायकल यात्रेचा सातवा दिवस, १७ मे ची सकाळ. आज फक्त ३४ किलोमीटर दूर असलेल्या सिंदखेड राजाला जायचं असल्यामुळे थोडं उशीरा निघालो. निघताना जालन्यातले दोन योग वर्ग बघितले व तिथे नियमित योग करणा-या साधकांना भेटून निघालो. जालन्यातल्या काही साधकांनी मला थोडं पुढे येऊन निरोप दिला. आता हळु हळु ह्या प्रवासाचा शेवट जवळ येतोय. आज सातवा दिवस, इथून नंतर फक्त चार दिवस राहतील. पण आपलं मन किती पळत असतं! आज सातवा दिवस सुरूही झाला नाही तर मन परत पोहचलं! सायकल चालवतानाही मन पळतच राहतं. फार कमी वेळेस, अगदी कसंबसं ते सायकलवर थांबतं आणि फक्त त्या क्षणाला बघू शकतं. स्पीड, टारगेट, वेळेचं गणित इत्यादीवर विचार न करता अगदी जेमतेम ते वर्तमानात थांबतं. पण ह्यालाच तर ध्यान म्हणतात! एका वेळी कोणतीही गोष्ट पूर्ण रूपेण केली, तर ते ध्यान बनतं. मग ते सायकलिंग का असेना. पण हे तितकंच कठीण आहे, कारण आपलं मन फार कॉम्प्लीकेटेड आहे व त्याचे अनेक तुकडे असतात. त्या तुकड्यांना एकत्र आणून अखंड करणे, म्हणजे तर ध्यान! असो.

आज जिथे जातोय, तिथे पूर्वी कधी गेलो नाही आहे. आज बुलढाण्यात जाईन व विदर्भही सुरू होईल! आज विदर्भामध्ये जाऊन रायलो ना मी! हॉटेलात नाश्ता करतानाही भाषा बदललेली दिसते आहे. इथे पहिल्यांदा पोह्याचा नाश्ता केला. हॉटेलवाल्याला माझ्या मोहीमेबद्दल सांगितलं. तीनशेपेक्षा जास्त किलोमीटर झाले आणि असा असा प्रवास करतोय हे सांगितलं. त्याला आश्चर्य वाटलं व त्याने मला शुभेच्छा दिल्या. चटकन काही सुचलं नाही तर शोपेची सॅचेटस मला दिली! त्याची ही कृती खूप नगण्य वाटू शकेल, पण मला छोटी नाही वाटली. छोटा सहभागसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो.

बून्द बून्द मिलने से बनता एक दरिया है|
बून्द बून्द सागर है, वर्ना यह सागर क्या है!

रस्त्यावर सायकलीने जाताना असे अनेक अनुभव येतात. कधी कधी तर रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही धन्यवाद द्यावसं वाटतं. कारण त्यांनी मला अडवलं नाही, जाऊ दिलं! असं म्हणतात ना की कोणत्याही बहाण्याने जर मनामध्ये कृतज्ञता भाव येत असेल, तर त्या भावामध्ये डुबकी घ्यावी! अर्थात् ही गोष्ट त्यांनाच जाणवू शकते ज्यांनी कधी अंधारात कुत्र्यांजवळ सायकल चालवली असेल किंवा कुत्र्यांजवळ रनिंग केलं असेल. असो.

गेल्या सहा दिवसांमध्ये मी अनेक चढाच्या रस्त्यांवर सायकल चालवली आहे. पण अजून कोणताही घाट लागला नाही. पहिल्या दिवशी नेमगिरी घाट नक्की होता, पण तो मी सायकलीवर चढू शकलो नाही. आज तीही उणीव दूर झाली. समोर रस्ता वर चढताना दिसतोय आणि जालना जिल्हा संपता संपता एक छोटा घाट आला. छोटासाच असेल- लांबी जेमतेम एक- दिड किलोमीटर. पण विपरित दिशेने येणारा वारा असल्याने थोडा आणखी कठीण आहे. त्यामुळे सोबत ठेवलेल्या अमृताचे दोन ग्लास घेतले- लिक्विड एनर्जालचे दोन सॅचेट आणि घाटावर सायकल सुरू केली. इतके दिवस सतत सायकल चालवत आल्यामुळेच मी हा घाट चढू शकतोय. नेमगिरीचा घाट बहुतेक पहिलाच दिवस आणि अतिशय जास्त उष्णतेमुळे चढू शकलो नव्हतो. तरीही हा घाट कसाबसा चालण्याच्या स्पीडनेच पार करू शकलो. एटलास सायकलची आणखी एक उपलब्धी! इतर गेअरच्या सायकलीवर हा फारच किरकोळ घाट आहे, पण ह्या सायकलवर कठीण होता.


छोटा घाट

आता सिंदखेड राजा येईल. माता जीजाबाईंचं मातृतीर्थ! महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एका अपूर्व व्यक्तिमत्वाचा विलक्षण वारसा! सिंदखेड राजाच्या आधी जिजाऊ सृष्टी लागली. इथे असलेलं म्युझियम बाहेरूनच बघून निघालो. जिजा ह्या शब्दाचा एक अर्थ म्हणजे- सोबती! एका अर्थाने मराठा आणि भारताच्या इतिहासातील त्या काळाच्या त्याच ख-या सूत्रधार आणि संगिनी आणि अर्थातच त्या इतिहासाच्या जन्मदात्री! योगाचा एक अर्थ शक्ती हाही आहे आणि म्हणून जेव्हा हा रूट ठरवला, तेव्हा हे स्मारकसुद्धा बघायचं ठरवलं. सिंदखेड राजामध्ये पोहचल्यावर पहिले त्या स्मारकाचं दर्शन घेतलं. राजवाड्याजवळच श्री मेहेत्रेंनी मला रिसीव केलं. आज त्यांच्यासोबत असेन. श्री मेहेत्रे सिंदखेड राजामधले एक अष्टपैलू कार्यकर्ते आहेत. अनेक विषयांवर त्यांची संस्था सेवा कार्य करते. त्याशिवाय ते सेंद्रिय शेती, वृक्षारोपण, पर्यावरण अशा विषयांवरही काम करतात. अण्णा हजारेंनी त्यांना पुरस्कार दिला आहे (योगायोगाने माझ्या बायकोला- आशालाही अण्णा हजारेंनी एक पुरस्कार दिला आहे). तसंच ते पतंजली योग पीठाचेही कार्यकर्ते आहेत व त्यांना श्री रामदेवजींचाही सत्संग मिळालेला आहे! अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी भेट झाली.


प्राचीन वारसा!

सिंदखेड़ राजाच्या साधकांद्वारे स्वागत!


एक छोटा घाट

आज फक्त ३४ किमी

आज ज्यांच्याकडे थांबलो त्या श्री. चौधरींची एक नातेवाईक सायकलिस्ट आहे. त्यांनी २०० किलोमीटर सायकलिंग एका दिवसात केली आहे. त्या प्रकारच्या सायकलिंगला बीआरएम म्हणतात. त्यांच्याशीही बोलणं झालं. संध्याकाळी चर्चा बरीच उशीरा सुरू झाली. इथे जालन्याच्या चैतन्य योग केंद्राचे फक्त मेहेत्रेजीच आहेत. ते चैतन्य योग केंद्राचे सध्याचे विद्यार्थी आहेत. त्यांना जालन्याच्या योग केंद्राविषयी माहिती कशी मिळाली, हीसुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. एकदा ते परभणी आकाशवाणी केंद्रावर एक योग- कार्यक्रम ऐकत होते. तो निरामय संस्थेचा कार्यक्रम होता व त्यात संस्थेचा नंबरही सांगण्यात आला. त्या नंबरवर श्री मेहेत्रेजींनी फोन केला, कारण त्यांना योग शिक्षकाचा कोर्स करायचा होता. तेव्हा परभणीच्या निरामयच्या लोकांनि त्यांना जालन्याच्या चैतन्य योग केंद्राविषयी माहिती दिली आणि मग त्यांनी तो कोर्स जॉईन केला. जवळच्या एका गावातले चैतन्य योग केंद्राचे एक विद्यार्थीही मीटिंगसाठी आले. त्याव्यतिरिक्त चर्चेमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आणि पतंजलि योग पीठाचे साधकच जास्त संख्येमध्ये आहेत.

आजपर्यंतच्या चर्चांसारखीच ही चर्चा झाली. पण कदाचित आज मी थोडा थकलो असल्यामुळे ह्या वेळी चर्चेमध्ये जास्त सहभाग घेऊ शकलो नाही. आणि अशा प्रकारे चर्चा करणं; तसं संभाषण हे माझं कौशल्य अजून पक्कं नाही, ही जाणीवही झाली. आणि काही प्रमाणात चर्चेची गुणवत्ता सर्व सहभागी व्यक्तींवरही अवलंबून असते. माझं काम तर ते सांगतात ते ऐकणं आणि चालू असलेल्या कामाला समजून घेणं आहे. इथे मुख्यत: पतंजली व आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम चालतं. एक तालुक्याचं गाव असूनही इथल्या लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. कारण इथेही अशी गत आहे की, लोक कारने जिममध्ये जातात व जिममधली सायकल चालवतात! पेंडुलम जसं परत वळतं तसे लोक आता परत सायकलीकडे वळत आहेत. चर्चा साधारण झाली. आज पहिल्यांदाच चर्चेत एकाही महिलेचा सहभाग नव्हता. पण इथे चालू असलेलं काम चांगलं वाटलं. मेहेत्रेजी शाळेत शिक्षक आहेत, पण अनेक प्रकारे सामाजिक काम करतात. दुर्मिळ प्रकारच्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांना भेटून छान वाटलं.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढचा भाग: सिंदखेडराजा- मेहकर

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच...
पुढिल प्रवासासाठी आणि आयुष्यासाठी खुप शुभेच्छा!!! Happy