आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम ४ ते ५ धागे येऊ द्या... वीकएंड मस्त जाईल, माबोकार धन्यवाद देतील >>> नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईइइइइइइइइइइइइइइइइ ....
थोडा वेळ घ्या हो... जरा आम्हाला पण चार्ज होऊ द्यात Lol

आणि हे काय पार्टी पण झाली इकडे तर..
मी पण विश्वास ठेवलेला...मला पण हवी आईसक्रिम... आम्ही एवढी बाजू घेतो आणि आम्हाला काहिच नाही बाबा Sad Sad Sad
एक चमचा नको मला...

तुमच्यासाठीच आहे हो. विश्वास न ठेवणारयांसाठी ती आईसक्रीमही काल्पनिकच आहे. खाणार तरी कशी.. ते फिरकणारही नाहीत आता.. तुम्ही उघडा डबा

खरचं देताय का पार्टी... Happy
तुम्ही उघडा डबा >>>>> कुठयं डबा Uhoh द्या पटकन कोणी नाही तर, मी चमचा घेऊन बसलिये केव्हाची... Wink
तुम्ही द्याल रात्री ..मग परत Uhoh अस करण्याशिवाय पर्याय नाही रहायचा....

@मेघा माझ्या बारशाच्या घुगर्या (बारशाला वाटणार्‍या साटोर्या) काही मिळणार नाही. ऋ चे आईस्क्रीम गोड मानून घ्या.

250.
ऋ भाऊ सप्तहांत संपला. ना गफ्रेच्या तोंडाला लागलेला पिझ्झाचा धागा आला ना 3 घरांचा.
क्यो तडपाते हो वाचकोको.

संपला का धागा? Happy
ऋ आणि मी बहिण भाऊ Lol लॉजिक आवडलं.
आणि मी ऋ चा नैतर ऋ माझा ड्यु आयडी असं काही लॉजिक लिहिलं नाहीत म्हणुन धन्यवाद. Happy

हो संपला धागा. खरे तर धागा कसला. अनुभव लिहिलेला. लोकांनी शंका विचारल्या. मी समाधान केले. संपला धागा. आता ते तर माझे कौशल्य जे मी त्या शंकांचे समाधान पहिल्याच फटक्यात करणे शक्य असूनही धागा एवढा खेचला Happy

ऋ, एक आवर्जून सांगावसं वाटतं..
आपण छान, चांगलं वर्णनात्मक लिहीता.. पण तरी 'त्याचत्या' अशा इमेज मध्ये अडकून पडले आहात.. वेगळं काहीतरी भारी लिहायचं मनावर घ्या.

ऋ, एक आवर्जून सांगावसं वाटतं..
आपण छान, चांगलं वर्णनात्मक लिहीता.. पण तरी 'त्याचत्या' अशा इमेज मध्ये अडकून पडले आहात.. वेगळं काहीतरी भारी लिहायचं मनावर घ्या.
Submitted by र।हुल on 10 July, 2017 - 21:10

+99999999
काही चांगले लेख वाचा. लिंक देतोय. मी तरी हे असे लेख वाचून माबो जाॅईन केली. हे असे लेख लिहा जे मी (कदाचित आम्ही ) मिस करतोय.
www.maayboli.com/node/60982
http://www.maayboli.com/node/60978

आअ नवीन घरासाठी एसी घेतला
तब्बल २८ टक्के जीएसटी घेतला
लूट आहे ही
ते सुद्धा सामान्य एसी घेतला.. नावच त्याचे जनरल .. स्पेशल घेतला असता तर कल्पनाही करवत नाही.. ५० टक्केच जीएसटी मारला असता Sad

असो, एसी फ्रिज दोन्ही थंड थंड आणि जीएसटी हा समान धागा म्हणून ईथेच तुम्हाला हे सांगावेसे वाटले.

एसी फ्रिज दोन्ही थंड थंड >> मग एसी ऐवजी फ्रिजच घ्यायचा ना. त्यावर १८% GST आहे. हा फ्रिज उघडा ठेवायचा एवढंच.

जीवनावश्यक व दैनंदिन वस्तूंवर ५% व चैनीच्या वस्तूंवर सर्वात जास्त म्हणजे २८% GST आहे.

एसी चैनीची वस्तू आहे व प्रदूषणाचा विचार करता २८% GST योग्यच आहे

ट्रॅक्टरचे पुढचे टायर हे लक्झिरिअस आणि मागील टायर कमी लक्झरिअस असतात, दोघांना वेगळा GST दर लावला जातो .
https://auto.economictimes.indiatimes.com/news/tyres/tractor-tyres-face-...

एसी चैनीची वस्तू आहे >>>>> अस्से सरसकटीस्मरण नाही करू शकत. तुमच्या आजूबाजूची भौगोलिक परीस्थिती वातावरण तापमान हवामान ऊन पाऊस वारा यांचा एकंदरीत विचार करूनच तुम्हाला एसीची किती गरज आहे हे ठरावे.

छान लिहिलेय सगळे वर्णन. मजा आली वाचायला.
>>>
धन्यवाद. मलाही धागा वर आणताना पुन्हा वाचायला मजा आली.
ईतक्या अरबट चरबट प्रतिसादांमध्ये असा एखादा पौष्टीक प्रतिसाद पुन्हा लिहीण्याची उर्नी देऊन जातो याबद्दल मनापासून धन्यवाद Happy

तुमच्या आजूबाजूची भौगोलिक परीस्थिती वातावरण तापमान हवामान ऊन पाऊस वारा यांचा एकंदरीत विचार करूनच तुम्हाला एसीची किती गरज आहे हे ठरावे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 September, 2020 - 22:55

>>>>
https://www.moneycontrol.com/news/business/economy/luxury-or-necessity-d...

एसीचे बहुतांश सुटे भाग हे परदेशातून आयात करावे लागतात.त्यामुळे त्यावरील custom duty मुळे कर वाढतो.

तापमान वाढीचा वेग(ज्याला माणूसच जबाबदार आहे) बघता एसी गरजेची वस्तू बनली आहे खरी.

आशा करूयात की GST council एसी वरील gst कमी करेल.

<< Separate new bb is needed for meaningful discussion >>
+१
GST भरायचा नसेल तर एसी विकत न घेण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध असतो.

Pages