आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातल्या सर्वात महागड्या शहरात तीन तीन घरे असलेला माणुस पार्कींग बोर्डाचे ठिगळ लावुन काटकसर करत जगतो आहे, हे बघुन मी सकाळी खाल्लेल्या २० रुपयांच्या मेदुवड्यांचा पश्चात्ताप होत आहे. Wink Happy

जगातल्या सर्वात महागड्या शहरात तीन तीन घरे असलेला माणुस पार्कींग बोर्डाचे ठिगळ लावुन काटकसर करत जगतो आहे>>>> ही मस्करी असेल तर ठीक आहे.
माझ्या वडिलांचीही ३ घरं आहेत. पण पाउसाचं पाणी हॉलच्या मोठ्या खिडकीतुन आत येउ नये म्हणुन भावाने त्याच्या बँकेतुन आणलेल्या नव्या योजनेचं पोस्टर ग्रिल्वर लावलंय. Happy
मी तर तांदुळाची गोणी जी प्लास्टिकसारखी असते ती मधे फाडुन मोठी करुन ग्रिलच्या एका भागावर जिथुन वाळत घात्लेल्या कपड्यांवर पाणी येतं तिथे लावली आहे. Happy हा पण माझी ऋन्मेषसारखी ३ घरं नाहीत ब्वा मुम्बैत. एकच आहे. Lol

थापाड्या/थापा हे शब्द कोणाच्या आडनावावर जात असल्यास आमचा नागपूरी शब्द घ्या.
फोकनाड = थापाड्या.

आम्ही का क करत नसतो तर आमची मंबईत दोनच घरे असती.
कदाचित हा फ्रिजही आला नसता.
आणि आईसक्रीमपार्टी तर दूरच राहिली असती..

ओह.. माबोकर,
सस्मित यांच्या वडीलांची मुंबईत तिन घरं, ऋ यांच्या वडीलांची मुंबईत तिन घरं...
लक्षात येतंय का काही?
सस्मित+ऋ= बहीणभाऊ...
होऊ शकेल?
तरी म्हणलो सस्मित ऋ साठी धाऊन का येतात... Wink (हलकं घेणे)

वत्सला, प्रतिसादात आले आहेत. एकूण चार फोटो आहेत. अगदी नव्या कोरया चावीचाही आहे. आज रात्री आईसक्रीम येईल.. पण ती वेळेवर आलात तरच मिळेल Happy

अरे लोकहो असे सतरा फ्लेवर नका सांगू.. तुटक्या खिडकीला ठिगळ लाऊन फुटक्या संसाराचा गाडा ओढणारया दक्षिण मुंबईतील एका मध्यमवर्गीय पण संस्कारी कुटुंबातील पार्टी आहे. सर्वात मिळून एकच फ्लेवर खाऊया ...

तुटकी खिडकी + फुटका संसार + दक्षिण मुंबई
काॅम्ब्युनेशन काही जुळत नाही.
खरच असेल तर मला व्हॅनिला पण चालेल.
वाटी चमचा घेऊन बसलोय.

सगळ्यांनी घरून वाट्या घेऊन यायाच्यात आणि रूनमेश च्या दक्षिण मुंबे मधील घराबाहेर एक रांगेत उभा राहायचा... रुन्मेषभाऊ सगळ्यांना वाढतील...

सगळ्यांनी घरून वाट्या घेऊन यायाच्यात आणि रूनमेश च्या दक्षिण मुंबे मधील घराबाहेर एक रांगेत उभा राहायचा... रुन्मेषभाऊ सगळ्यांना वाढतील...
Submitted by च्रप्स on 8 July, 2017 - 21:53
पण घर नंबर 1 2 का 3 ते सांगा ना.

पाथ, अहो तो फॅमिली पॅक आहे, एकट्यालाच पुरेल असा तुमचा कोटा असला तरी एकट्यानेच खायचा नसतो. फॅमिलीने मिळूनच खायचा असतो असा रूल आहे त्याचा..

ज्यांनी ज्यांनी मी फ्रिज घेतलाय यावर विश्वास ठेवलाय तेच खायला येणारेत आईसक्रीम, अशी लोकं मोजून चारच आहेत, तर चिंता नसावी.. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी सुरू व्हा...

धागा नाही कट्टा झालाय... गप्पा चालल्यात...
रुन्मेषभाऊ, नवीन धागा उघडायचा घ्या राव सेरिओसली... पब्लिक डिमांड..
आता हा धागा बोरे झाला भाई

Pages