आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. >>>>>

येडा बनके पेडा खारेला!! Lol

माझ्या माहीतीप्रमाणे, ऋन्मेष mechanical engineer आहे. (हा उल्लेख त्याच्याच कुठल्यातरी धाग्यावर त्याच्याकडूनच ऐकलेला) तर एका ऐमेनसीत जॉबसाठी पात्र ठरलेल्या आपल्या ऋन्मेषला फ्रिजच्या technical गोष्टी (specifications & liters वैगरे ) माहीत नसाव्यात म्हणजे खुपच होतंय!!

बाकी छान लिहीलंय..एकसे बढक़र एक वाक्यांची रेलचेल आहे..

शेवट झक्कास! (GST)
पुर्वी BST असायचा त्याचा अर्थ लेख संपताना नव्यानं समजला..
'BST - बायको सुखी ठेवा'
शेवटी या GST-BST साठीच तर असतो सगळा अट्टहास!!

राहुल,
सोशलसाईटवर आपला व्यवसाय कधीही उघड करू नये. असे माझी आजी सांगायची. तर मी मॅकेनिकल आहे की ईलेक्ट्रिकल हे गुलदस्त्यातच राहू दे Happy

काहीही थापा मारल्या आहेत, घराचा अजून पत्ता नसतांना म्हणे फ्रिज घेतला. आणि मुंबईतल्या घरामध्ये ठेवला कुठे म्हणे दुसरा डबलडोर फ्रिज?

'BST - बायको सुखी ठेवा'
शेवटी या GST-BST साठीच तर असतो सगळा अट्टहास!!
Submitted by र।हुल on 4 July, 2017 - 08:11

GST-घरवाली सुखी ठेवा.

बरं आजींच्या काळात सोशल साईट होत्या वाटतं!
>>>>>>
आजीचा काळ म्हणजे आजीच्या बालपणाचा किंवा तरुणपणाचा काळ असणे गरजेचे आहे का? आता ज्यांच्या आज्या जिवण्त आहेत त्यांना सोशल साईट आणि त्याचे दुष्परीणाम समजत नाहीत का? उद्या जर मला मुलगी होते आणि मी तिचा जन्म झाल्याझाल्या फेसबूकवर फोटो अपलोड करतो तर तसे न करण्याचा सल्ला माझी आजी मला देऊ शकत नाही का?

मस्त आहे किस्सा....पंचेस भारीच..
( हा किस्सा कल्पनिक आहे असे समजुन वाचला आहे.. .जेव्हा फोटो येइल तेव्हा खरा समजण्यात येइल. Wink )

घराचा अजून पत्ता नसतांना म्हणे फ्रिज घेतला. आणि मुंबईतल्या घरामध्ये ठेवला कुठे म्हणे दुसरा डबलडोर फ्रिज?
>>>>>
मुंबई आणि परीसरात आमची तीन घरे आहेत. फक्त ती वडिलोपार्जित आहेत, माझे स्वत:चे नाही आईवडिलांच्या नावावर आहेत. . तरी माझे वडील मला आपल्या घरात ठेवताहेत तर माझ्या फ्रिजलाही ठेऊ शकतातच Happy

रुन्मेषराव!
तुम्ही आजपर्यंत तुमचा फोटो कधी टाकला नाही येथे मग मुलीचा फोटो काय टाकाल!
असो तुमच्या काल्पनिक विश्वात आम्हालाही रममाण व्हायला आवडतं हो.

रुन्म्याचे धागे म्हणजे घटकेभरचा 'विरंगुळा' !
व्हा फोटो येइल तेव्हा खरा समजण्यात येइल. Wink )>>>>> तो त्याच्या लग्नाचीही अशी काल्पनिक्/खरी गोष्ट लिहली तर तेव्हाही असंच म्हणू बरं का रे ...
असो तुमच्या काल्पनिक विश्वात आम्हालाही रममाण व्हायला आवडतं हो.>>>> सहमत

आरयन मॅन, मध्यण्तरी दोन दिवसासाठी डिपी म्हणून लावलेला. पण कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. बहुधा शाहरूख आणि माझ्या चेहरयातील साम्यामुळे असेल....
असो, ते पोरीचा फोटो एक उदाहरण होते की सोशलसाईटवर काय् करावे आणि काय नाही या संदर्भात आजी कसा सल्ला देऊ शकते.
बाकी जेव्हा मला मुलगी होईल तेव्हा शाहरूखला सुट्टी आणि डोपी म्हणून तिचाच फोटो हे आज लिहून देतो Happy

नक्की रे मी वाट बघेन!
बहुधा शाहरूख आणि माझ्या चेहरयातील साम्यामुळे असेल....तस नाही ओ रुन्मेषराव, नव्हता टाकला तुम्ही. नाहीतर गावभर (मायबोलीभर) चर्चा झाली असती.
तुमच्या काल्पनिक विश्वात तुम्ही शाहरुखसारखे दिसतात, तुम्हाला गफ्रे आहे हे आम्ही करतो एन्जॉय. ते मी वरही लिहिलंय. पण प्लिज लवकर मानसिक उपचार घ्या. सत्य व काल्पनिक जगाचा फरक न कळण्याआधी. नाहीतर तुम्हाला व तुमच्या घरच्यांना खूप त्रास होऊ शकतो.
माझ्या एक क्लासमेटचा अनुभव सांगतो. आजूबाजूच्या त्याच्या सर्व मित्राना गफ्रे असलेली पाहून त्यालाही गफ्रे हवी असं वाटायला लागलं. पण कुणी मुलगी त्याला हो म्हटली नाही. पण हा बहाद्दर मी काही कमी नाही म्हणून त्याने एक काल्पनिक गफ्रे तयार केली. मित्र दिसले की मुद्दाम फोन कानाला लावून बोल, रोमँटिक रिंगटोनच अलार्म सेट करून ठेव आणि वाजला की गफ्रे चा फोन आला असं सांग असे उद्योग केले. पण नन्तर तो इतका वाहवत गेला की त्याला ती गफ्रे वास्तवात वाटायला लागली. शेवटी उपचार करावे लागले. पण आता तो ठीक आहे. प्लेसमेंटही चांगली मिळाली.
त्यामुळे कळकळीचा सल्ला!

मुंबई आणि परीसरात आमची तीन घरे आहेत. फक्त ती वडिलोपार्जित आहेत, माझे स्वत:चे नाही आईवडिलांच्या नावावर आहेत. . तरी माझे वडील मला आपल्या घरात ठेवताहेत तर माझ्या फ्रिजलाही ठेऊ शकतातच >>> मुंबईत तीन घरे असलेला माणूस २००० रुपडे वाचवण्यासाठी कारण नसतांना २५-३० हजाराचा फ्रिजच घेतो Lol
बरं घेतला तर घेतला आणि म्हणे घरात ठेवला, अहो प्रत्येक घरात एकंच किचन असते आणि तिथे फ्रिज ठेवायला एकंच जागा असते ? फ्रिज कुठे ठेवला विचारले तेव्हा बेडरूममध्ये की लिविंगरूम मध्ये असे विचारायचे होते.
आता ही थाप पचवण्यासाठी ... आमच्या घराला दोन किचन आहेत अशी अजून एक थाप मारा आणि ती लोकांच्या गळी ऊतरवण्यासाठी अजून काही तरी पादरं लॉजिक लिहा. बरीच मजल मारायची आहे ह्या धाग्याला अजून.

@ हुप्पाहुय्या

त्यांने लिहिलेय की त्याची तीन वडिलोपार्जित घरे मुंबईत आहेत म्हणून. आता या तीनपैकी एकाद्या घरात आधीपासून नसेल फ्रिज, तिथे ठेवला असेल आता घेतलेला फ्रिज. शिवाय मुंबईत तीन घरे असलेला माणूस उधळ्याच असला पाहिजे असे काही नाही, तेंव्हा रुपये दोन हजार वाचविण्यासाठी त्यांने घेतला असेल २५-३० हजाराचा फ्रिज.

त्यांच्या वडलांनी त्यांना ज्या घरात ठेवले आहे त्याच घरात फ्रिजही ठेवला आहे हे त्यांनीच वरती मराठीत स्पष्टं लिहिले आहे, तुम्ही वाचले नाही का?

शिवाय मुंबईत तीन घरे असलेला माणूस उधळ्याच असला पाहिजे असे काही नाही, तेंव्हा रुपये दोन हजार वाचविण्यासाठी त्यांने घेतला असेल २५-३० हजाराचा फ्रिज. >> त्यांनी संगितले आणि तुम्म्ही ऐकले.... वरती त्यांचे खोटे ऊघडे पाडल्यावर त्यांनी ३ घरांची मारलेली ही थाप हेही तुमच्या लक्षात आले नाही.. कमाल आहे.
आता राहत्या घरी दोन किचन आहेत अशी थाप येईल त्याची वाट बघा.
अर्थात त्यांचा खोटेपणा कितीही उघडा पाडून त्यांना तोंडघशी पाडले तरी त्याने काही फरक पडत नाही.. प्रतिसादांची संख्या वाढल्याशी मतलब.

Pages