आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किस्सा खरा असो की काल्पनिक , वाचताना मला तरी मजा आली .

ऋ बाळा कोणी काही म्हणोत तुला पण मला तुझं लिखाण आवडतं रे .

त्यांच्या वडलांनी त्यांना ज्या घरात ठेवले आहे त्याच घरात फ्रिजही ठेवला आहे हे त्यांनीच वरती मराठीत स्पष्टं लिहिले आहे, तुम्ही वाचले नाही का?
>>>>>>
अरे शब्दशा त्याच घरात असे नाही. तर ज्या आईवडीलांच्या घरात मुलाला जागा आहे तिथे त्याच्या फ्रिजला जागा नसणार का अश्या अर्थाने होते ते वाक्य.

किस्सा खरा असो की काल्पनिक , वाचताना मला तरी मजा आली .
>>>>>

मनीमोहोरताई आणि या आशयाचे प्रतिसाद दिलेले सर्व प्रतिसादांचे आभार, धन्यवाद शुक्रीया...
ईतर वादावादीत बरेचदा हे राहून जाते Happy

अरे शब्दशा त्याच घरात असे नाही. तर ज्या आईवडीलांच्या घरात मुलाला जागा आहे तिथे त्याच्या फ्रिजला जागा नसणार का अश्या अर्थाने होते ते वाक्य.
>>> बरं बरं..तुमच्या कुठल्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा हे नेमकं कळंत नाही आणि तुम्ही तो नंतर फिरवणारंच असल्याने अजून गोंधळायला होतंय. तुम्ही कुठे, राहते घर कुठे आणि फ्रिज कुठे जरा नीट समजाऊन सांगा बरं. घाई नाही विचार करून सांगा. आधीच्या धाग्यांवर वेळोवेळी काय थापा मारल्यात तेही एकदा बघून घ्या म्हणजे आधी काही तरी सांगितले असेल आणि आता काही भलतेच बोलाल तर पुन्हा शब्दं फिरवत नव्या थापा माराव्या लागतील.
ह्या लोणकढी थापेत पिझ्झा, आईस्क्रीमचे डिटेल्स दिलेत आणि घराचे एवढे महत्वाचे डिटेल्स दिले नाहीत असं कसं झालं बरं.

आता राहत्या घरी दोन किचन आहेत अशी थाप येईल त्याची वाट बघा.
>>>>
बायदवे, आमच्या राहत्या घरी खरेच दोन किचन आहेत. अर्थात त्यातील एक तुर्तास स्टोअर रूम म्हणून वापरतो. म्हणून फ्रिज तिथे ठेवणार नाही. तरी किचन ओटा आणि बेसिन आहे तिथे. कधीतरी मी ब्रश करत करत त्या भागात गेलो तर पटकन तिथेच चूळ मारून येतो.

ह्या लोणकढी थापेत पिझ्झा, आईस्क्रीमचे डिटेल्स दिलेत आणि घराचे एवढे महत्वाचे डिटेल्स दिले नाहीत असं कसं झालं बरं.
>>>>

कारण अन्न वस्त्र निवारा या आपल्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी पहिला क्रमांक अन्नाचाच.

शिवाय मुंबईत तीन घरे असलेला माणूस उधळ्याच असला पाहिजे असे काही नाही
>>>>>

अगदी योग्य.
यात थोडी आणखी सुधारणा सुचवतो. जो उधळपट्टी न करता पैसे वाचवतो त्याचीच घरे बनतात. अर्थात हे माझ्या आईवडीलांनी केले, घरे त्यांची आहेत. त्यामुळे मी उधळया आहे की काटकसरी याचा घरांच्या संख्येशी काही संबंध नाही.

अशी वेचून वेचून आपल्या फेवर मधली वाक्यं रिपिट करून तुमच्यावर लागलेला आणि तुमच्या प्रत्येक पोस्टगणिक अधिकाधिक गडग होत जाणारा 'थापाड्या' चा शिक्का पुसला जाणार आहे का?
तुम्ही म्हणालात तसे, शक्य आहे तुम्हाला टेक्निकल काही कळत नाही आणि त्या डिटेल्समध्ये ईंट्रेस्ट नाही पण घर आणि लग्नं कधी होणार त्याचा पत्ता नसतांना फ्रिज का घ्यायचा, घेतला तर एक ऑलरेडी घरात असतांना दुसरा कुठे ठेवायचा, मग लग्न आणि घर चार वर्षांनी झाले तर तेव्हा नवा फ्रिज घेण्याएवजी चार वर्षं जुना का वापरायचा असे अनेक प्रश्नं माझ्यासारख्या कमी डोके असलेल्या बाईला पडतात बुवा.

आजिबात नाही...तो धागा आणि त्यावर तोडलेले तारे मला माहित आहे आणि म्हणूनच त्यांना मगापासून दुसर्‍या किचनची हिंट देत होते, जी त्यांनी आधी घेतली नाही. तसे असते तर तीन घरे आहेत सांगण्याएवजी तिथे दुसर्‍या किचनमध्ये ठेवणार असे सांगितले असते. पण ती जागा किचन म्हणून वापरत नाही हे त्यांनी आधीच म्हंटलेले आहे हेही मला माहित आहे, त्यामुळे आता तिथे बाथरूमच्या बाजूला फ्रिज ठेवणार म्हणत कोलांटी ऊडी मारतात का तेच बघायचे होते.
अजूनही फ्रिज कुठे ठेवणार ते त्यांनी सांगितलेले नाही , त्यांनी एवढ्या ठिकाणी एवढ्या थापा मारून ठेवल्या आहेत की त्याच थापांच्या दलदलीत ते रूतत आहेत. पूर्ण क्रेडिबिलिटीच क्वेश्चनेबल आहे ह्या आयडीची.

मला माहीत नाही ऋन्मेष ह्या काही गोष्टींबाबतच्या आपल्या लिंक्स कशा जुळतात? उदा. आपल्या दोघांना शाखा, सचिन आवडतो, दोघांवरही cheap publicity चा आरोप होतोय, दोघांचे मायबोलीवरील हे आयडी फक्त पंधरा दिवसांच्या अंतरानं तयार झालेले पण आपल्या दोघांनाही माहीतीय हा निव्वळ योगायोग आहे पण तरी काहीजण असं समजायला लागलेत, हे दोघं एकच आहेत!! असो. Lol

>>> ते पोरीचा फोटो एक उदाहरण होते की सोशलसाईटवर काय् करावे आणि काय नाही या संदर्भात आजी कसा सल्ला देऊ शकते.
बाकी जेव्हा मला मुलगी होईल तेव्हा शाहरूखला सुट्टी आणि डोपी म्हणून तिचाच फोटो हे आज लिहून देतो...<<<
मलाही एक आस आहे एका लहानश्या परीची! अर्थात् भविष्य काळात माझ्या आयुष्यात अवतरणार्या माझ्या मुलीची....जशी मी तीला माझ्या लेखणीतून उतरवलंय..बघा↓
http://www.maayboli.com/node/62772

कधीतरी मी ब्रश करत करत त्या भागात गेलो तर
>>
किती एकर वर पसरलेले आहे तुमचे घर? एकाच घराचे सांगीतले तरी चालेल.

भरत छान लिंक दिलीत...
हुप्पाहुय्या, माझी तेथील पोस्ट खास आपल्यासाठी आणि येथील वाचकांसाठी ईथे चिपकवतो. मीच विसरून गेलेलो. मात्र खरे बोलण्याचा हाच फायदा असतो, लक्षात ठेवावे लागत नाही Happy

<<<<<<<<<<
सही
आम्ही पण दोन घरे, दोन किचनवाले.
आम्ही एका किचन मधील बिल्डरने दिलेला ओटा ट्रॉली वगैरे लावत आमच्या हिशोबाने करून घेतला.
दुसर्‍या किचनमधील ओट्याला फक्त दरवाजे लावत ड्रॉवर बनवला.
त्या नॉनकिचन ओट्याचा वर पाण्याचा माठ, मिक्सर / ज्यूसर ठेवतो, तसेच काही नेहमीच्या वापरातल्या वस्तू वा फळे वगैरे उबवत पडलेले असतात. मूड आला की एखादे फळ ज्यूसरमध्ये टाकायचे आणि रस पिऊनच पुढे जायचे.
मेन किचनमध्ये फ्रिज, ओवन, वॉटर प्युरीफायर वगैरे किचनशी संबंधित गोष्टी आहेत,
तर दुसर्‍यामध्ये वॉशिंगमशीन, गोदरेजचे मोठे कपाट, एक छोटे कपाट, बाथटब, ईत्यादी गोष्टी आहेत, जेणेकरून बेडरूम / बाथरूमवरचा लोड कमी होईल.
आयुष्य खूप सिंपल आहे, ईंटरीयवर जास्त खर्चा करून त्याला कॉम्प्लीकेटेड नाही करायचे. 

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 August, 2015 - 00:50

<तो धागा आणि त्यावर तोडलेले तारे मला माहित आहे आणि म्हणूनच त्यांना मगापासून दुसर्‍या किचनची हिंट देत होते>

हा तुमचा प्रतिसाद अगदी ऋन्मेष स्टाइल आहे. आता त्याच्या मागावर राहता राहता तुम्ही त्याच्यासारखाच विचार करायला शिकलात , ते ठरवून की आपोआप, ते तुम्हालाच माहीत.

असो. चालू द्या.

लोकहो फ्रिज आला..
करून दाखवलं ..
आणि हे शक्य झाले ते फक्त आणि फक्त साहेबांच्या जीएसटी धोरणामुळे..
काल मध्यरात्री जेव्हा सारे जग तंगड्या वर करून झोपले होते, जेव्हा आकाशातल्या अष्टमीच्या चंद्रानेही ढगांची चादर ओढली होती, त्या एका पावसाळी उकडणारया रात्री आमच्या आयुष्यात थंडावा शिडकायला आमचा नवा सोबती आमच्या घरात अवतरत होता Happy

चंद्र तोच असतो हो, तुमचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा आहे त्यावर ठरते की अर्धा चंद्र दिसतोय की अर्ध्या चण्द्राला ग्रहण लागलेय..

असो, फ्रिज आला..
फोटो टाकतो आणि येथील वाद मिटवतो..

त्यानंतर मला माझ्या घराबद्दल लेख लिहायचा आहे. उगाच लोकांचे कन्फ्यूजन नको परत परत..

छान लिहिले आहे Happy

पण येथे ते खरे कि खोटे हा विचार आल्यावर वाटले... कल्पनाविश्वात-आभसी विश्वात एव्हढा रमणारा माणूस प्रत्यक्ष जीवनात किती एकटा असेल Sad

फ्रिजचा फोटो यायच्याआधीच धाग्याने हाफ सेंच्युरी मारलीय म्हणजे आता फोटो नंतर शतक तर नक्कीच झळकणार Wink

फ्रिजबरोबर सेल्फी टाकावी अशी विनंती!
कारण मीही कोणत्याही दुकानात जाऊन घरी फोटो दाखवून ठरवतो असे सांगून फ्रिजचा फोटो टाकू शकतो!

अहो आरयनमॅन, फ्रीज घरी आणल्यावर माठासोबत त्याचा फोटो काढून पाठवतो..
किंवा मी ईथे आधी टाकलेल्या एखाद्या पाककृतीतील फोटोत दिसणारे एखादे भांडे त्या फ्रिजवर ठेवून फोटो टाकतो..
विश्वासावर जग आहे.. कुठेतरी ठेवायलाच हवा..

>> फ्रिजबरोबर सेल्फी टाकावी अशी विनंती!
कारण मीही कोणत्याही दुकानात जाऊन घरी फोटो दाखवून ठरवतो असे सांगून फ्रिजचा फोटो टाकू शकतो!<<
सेल्फी दुकानात काढलेली असली तरी चालवून घेऊ.. Wink

>> फ्रीज घरी आणल्यावर माठासोबत त्याचा फोटो काढून पाठवतो..<<
हि आयडिया भारीय...

Pages