मायबोलीवर लिहिलेला गृप (Group) शब्द बरोबर आहे का?

Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22

अ‍ॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.

लोकांचं काय मत आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीच्या गेटटूगेदराला सर्व पुण्यामध्ये जमले होते. तितक्यात चिन्मयाने सांगीतले की त्याला, अमेरिकेहून केदाराचा फोन आला. केदाराने, सकंल्पाची विचारणा केली, आणि त्याला विचारले की, लंडनाहून आलेले मायबोलीकर भेटले का? फोनावर जास्त काही सांगता येणार नाही असे संकल्पाने सांगीतले, तितक्यात पूनमेने फोन घेउन प्रज्ञेची विचारणा केली. प्रज्ञेने इंग्लीशीतून विचारले की पुण्यातल्या पीयमट्या" वेळेवर धावतात का? आजकाल बशीतून कोणी प्रवास करते का? त्यावर पूनम म्हणाली की, आम्ही बशीतून जाण्यापेक्षा कारीतूनच जाणे प्रिफरतो.*
प्रज्ञेने परत केदाराकडे फोन दिला. केदाराने, फोनावर चिन्मयाची विचारणा केली. चिन्मयाने त्याला इंग्लडाहून आणलेल्या स्ट्रॉबेर्‍या संपल्या असेही सांगीतले. आजकाल वेळ नसल्यामूळे तो लॅपटॉपावर जास्त बसत नाही, कारण ऑनलाईनीवर आला की वेळ अस्सा निघून जातो.
केदाराने सांगीतले की तो सचिन तेंडूलकराला, लंडनामध्ये मिटणार आणि क्रिकेटावर गप्पा मारणारं.

" यम लिहायचा मोह टाळला नाही Happy
*प्रिफर करतो असे लिहायचे होते, पण कदाचित प्रिफरतो हे ही चालेल असे वाटते.

------------------------------------------------------------------------------

वरील वाक्य (बहुतांश) हे नियमानुसार व्याकरणात बसतात म्हणून लिहीले आहेत. चर्चा वाचून मला उगीच सुचले म्हणून लिहावे वाटले. कोणालाही व्यक्तिगतरीत्या खिजवायचे वगैरे नाही. (आजकाल असे लिहावे लागते.)
-----------------------------------------------------------------------------
तर बंधो, ही वाक्ये जरी व्याकरणात बसत असतील तरी बोलीभाषेत बोलतो का? नसेल तर का नाही?
बोलत असू तर किती जण असे मराठी बोलत असतील? (साधारण %).
अश्या भाषेत साहित्य लिहीले तर लोक वाचणार का? (कदाचित म्हणूनच सरकारी मराठी हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला असेल.

किंवा हीच योग्य भाषा आहे म्हणून, येणारे लेखन सुधारावे?

(परत एकदा, हे प्रश्न खरे आहेत.)

मला टेबलवर, टीपॉयवर, प्लेनमध्ये, बर्गरमधल्या, कॉन्फरन्समधून या शब्दांमधेच आपुलकी वाटते - टेवलावर, टीपॉयावर, प्लेनामध्ये, बर्गरातल्या, कॉन्फरन्सीतून या शब्दांमध्ये नाही. >>>>> चाफ्या.. मोदक रे.. !

तितक्यात चिन्मयाने सांगीतले की त्याला, अमेरिकेहून केदाराचा फोन आला. >>>>> तनया / विनया सारखं चिन्मया हे ही नाव आहे का??? Happy

केदार, तुझा हेतू काही असो.. मला हा पॅरा वाचून भयंकर हसू आले...
चाफा म्हणतो तसं काही मोजके शब्द (कपात/टेबलावर) एखाद्या प्रकारे रूळलेले असल्यामुळे बाकीचे अनेक शब्दही तसेच चालवा हे म्हणणे अतिरेकी वाटते.. तू लिहिलेल्या पॅरातून ते जास्त जाणवले...

चाफ्या,
अगोदर तू जे 'त्याही पुढे जाऊन अपवाद दाखवलेस', त्यांविषयी :

१. सून - सुनेला हा बदल होतो. त्याप्रमाणे दूर - दूरचे असा बदल होत नाही. यासाठी काही अतिशय सोपे नियम आपण शाळेत शिकलो आहोत. सामान्यरुपातील शेवटच्या अक्षरात इथे बदल होत नाही. म्हणून 'दूरचे'. याउलट 'दुरून' असं लिहिताना शेवटच्या अक्षरात बदल होतो, आणि 'दु' र्‍हस्व होतो.

२. तत्सम शब्दांचे सामान्यरूप करताना काहीही बदल होत नाहीत. म्हणून 'पूर्णत्व ' पूर्णत्वास'.

मी उल्लेखलेल्या मंडळींची परवानगी घेऊन मग मी तुला त्यांचे दूरध्वनी क्रमांक कळवतो.

शिवाय, इथे विषय मुळात वेगळा असला तरी, मराठी ही संपूर्णपणे संस्कृतोद्भव मुळीच नाही. या भाषेत संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांपेक्षा 'देशी' शब्द कितीतरी पटींनी अधिक आहेत. उदा. घोडा हा शब्द देशी आहे. त्यावरून 'घोटक' हा संस्कृत शब्द तयार झाला. विषयांतराबद्दल क्षमस्व.

बाकी, (हे इथल्या अनेकांसाठी)

आपण उच्चार चुकीचे करतो म्हणून चुकीचेच लिहावे हा अतिशय हास्यास्पद विचार आहे. केत्की, आशिश, आयुश्य असे विचित्र उच्चार आपण करतो, म्हणून तसंच लिहायचं का?

आणि इथे प्रतिवाद करताना व्याकरणाचे नियम अगोदर कोणीच बघत नाहीत का? 'मला असं वाटलं', 'माझ्या मते' याच्या जोडीला काही नियम, विचार यांची जोड आवश्यक असते. आपल्या अगोदर निदान थोडंफार ज्ञान असलेल्या मंडळींनी निश्चित काही अभ्यास केलेला असतो. त्या अभ्यासकांच्या मतांचा विचार अथवा प्रतिवाद करताना किमान काही पटण्याजोगी कारणं देणं, आणि त्यापूर्वी त्यांच्या मतांचा/विचारांचा नीट अभ्यास करणंही अत्यावश्यक ठरतं. मला Quantun Physicsमधील काही कळत/पटत नसेल, तर 'माझ्या मते हे चूक आहे', असं सांगताना ते का चूक आहे हे सांगण्याची जबाबदारीही माझीच असते.

आणि, 'ग्रुपामध्ये' असं लिहिताना जर 'ग्रु' हा उच्चार मला योग्यच वाटत असेल, तर त्याचं काय? सामान्यरूप करतेवेळी र्‍हस्व उच्चार करण्याची जर मला सवय असेल (हे केवळ मराठी शब्दांसाठी), तर इतर असंख्य अशुद्ध व चुकीचे उच्चार करणार्‍यांमुळे माझे उच्चार मी का खराब करून घ्यावेत?

अ‍ॅडमा, च्यायला परत हेतू बद्दल शंका (लिहूनसुद्धा) (उदास बाहूली) Happy

मला तो प्यारा लिहून तोच विरोधाभास दाखवुन द्यायचा होता. बाकी काहीही हेतू न्हवता, चर्चा कितीही केली असती तरी, ती फक्त शब्दांची झाली असती, एखादा प्यारा टाकून, ते वाचायला कसे वाटते हे बघायचे होते.

(मुख्य हेतू शिकणे हाच आहे.)

आडमा,
'रामाने', 'देवाने' या रुपांप्रमाणे 'चिन्मयाने' असे रूप होते. हे १००% व्याकरणाच्या नियमांना धरून आहे.
आपण शाळेत असताना 'देव', 'राम', 'मनस्' इ. नामांची रूपे का पाठ केली होती? प्रत्येक नाम हे त्याचाशी संबंधित नामाप्रमाणे चालवता यावे, हा हेतू त्यामागे असतो. मराठीतील नामेही त्याला अपवाद नाहीत.

<चाफा म्हणतो तसं काही मोजके शब्द (कपात/टेबलावर) एखाद्या प्रकारे रूळलेले असल्यामुळे बाकीचे अनेक शब्दही तसेच चालवा हे म्हणणे अतिरेकी वाटते.. तू लिहिलेल्या पॅरातून ते जास्त जाणवले...<>

म्हणजे मराठी व्याकरणाचे नियम आपल्या सोयीनुसार पाळावेत, असं तुझं म्हणणं आहे का?

चिन्मय, हो ते व्याकरणाच्या नियमानुसार आहे हे माहित आहे... त्याच्यापुढे एक " Happy " होता..

म्हणजे मराठी व्याकरणाचे नियम आपल्या सोयीनुसार पाळावेत, असं तुझं म्हणणं आहे का? >>>> ते नियम नसून संकेत आहे असं कुठेतरी वर सिध्द झालय ना??? (तसं नसेल तर एव्हडी चर्चा वाचून सगळच मुसळ केरात) आणि संकेत हे flexible असतात आणि बर्‍याच ठिकाणी वापरले गेलेले नाहिते हे शोनू ने भरपुर उदाहरणांवरून दाखवलं आहे.. !
माझ्या कुठल्याही पोस्ट मधे व्याकरणाचे "नियम" पाळू नका किंवा ते सोयीनुसार पाळा असं मी म्हंटलेलं नाही...

ग्रूप हा शब्द तत्सम नाही हे कशावरुन रे मग? शिवाय शोधली तर अशी आणखी अनेक उदाहरणे सापडतीलच. 'क्ष'ने दाखवून दिलेला नियम पाहिलाच असशील. मराठी भाषा संस्कृतोद्भव नसेलही पण संस्कृतचा मोठा पगडा तिच्यावर आहे हे तर खरे ना? आणि मी दिलेली कारणे पटण्यासारखीच आहेत. ती ओढूनताणून आणलेली नक्की नाहीत. हे म्हणणे जसे सापेक्ष असू शकेल तसेच "'ग्रुपामध्ये' असं लिहिताना जर 'ग्रु' हा उच्चार मला योग्यच वाटत असेल, तर त्याचं काय?" हाही प्रश्न पूर्णतः सापेक्षच आहे. मला "ग्रुपमध्ये / ग्रुपामध्ये" हे दोन्ही उच्चार साफ चूक वाटतात. इंग्रजीतले असे सगळे शब्द मनात चालवून बघावेत. तेव्हा तुझेच वाक्य मी बदलून असे म्हणेन, की काही तुरळक अशुद्ध व चुकीचे उच्चार करणार्‍यांमुळे पूर्ण समाजाने त्यांचे उच्चार का खराब करून घ्यावेत? आहे ना सापेक्षता? Happy

<<<< आपण उच्चार चुकीचे करतो म्हणून चुकीचेच लिहावे हा अतिशय हास्यास्पद विचार आहे. केत्की, आशिश, आयुश्य असे विचित्र उच्चार आपण करतो, म्हणून तसंच लिहायचं का?
>>>> परत तेच! इथे उच्चारच चुकीचे आहेत तर ते सुधारणे आवश्यक आहे हे मी स्लार्टीला उत्तर देतांना म्हटलेच आहे की!

केदार, Happy

adm,
मी वर लिहिलं आहे की तसा नियम आहे. पुस्तकांच्या लेखकांची नावेही दिली आहेत.
मी श्री. अर्जुनवाडकर व लीला गोविलकर यांच्या पुस्तकांचा संदर्भ दिला होता. त्यांतील नियम मी उद्यापरवा देईनच.

चाफा,
मी जे लिहिलं ते केवळ संस्कृत शब्दांबद्दल होतं. इंग्रजी नव्हे. आणि इंग्रजी भाषेतील शब्दांना हा नियम लागू होत नाही. कारण तो केवळ संस्कृत शब्दांसाठी आहे.

'दूर' या शब्दाबद्दल क्ष यांनी दिलेले कारण चूक आहे.

आणि, 'टेबल, 'कप', 'पेन्सिल', 'सायकल' या शब्दांची रूपे करताना अपवाद करावा, असंही कोणी कुठे लिहून ठेवलेलं नाही.

ही सर्व चर्चा वाचून माझा असा समज होत आहे की मुळात इथे व्याकरणाच्या नियमांचा आदर राखण्याची फारशी इच्छा नाही. नियम काय आहेत, ते अजिबात समजावून घेतलेले नाही. व्याकरणाच्या पुस्तकांतून नियम समजावून घेण्यापेक्षा 'मला काय वाटतं' आणि अमुक एकाने कशी चूक केली, यावरच भर दिला जातो आहे.

अर्थातच, हा बोली भाषेतून उचललेला नियम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळेच सरकारी मराठी आपल्या मराठीपेक्षा काही निराळी आहे, ते "वेगळंच" प्रकरण आहे, ती आपण कितपत ग्राह्य धरायची असे मुद्दे काढणं गैरलागू ठरतं. >> तुझा काहितरी गैरसमज झालाय. सरकारी मराठी असे मी का म्हटलेय ते केदारने स्पष्ट केले आहे बघ. भाषा, नियम नि लोक ह्यातले कोण कोणासाठी असतात ह्यावर बरेच अवलंबून आहे.

चिन्मय, नाही! व्याकरणाचे नियम परकीय दीर्घ शब्दांचा र्‍हस्व उच्चार करा असे सांगत नाहीत. बोली भाषेत ते तसे बोलले जात नाहीत. महाराष्ट्र सरकारच्या शालेय क्रमिक पुस्तकांमधून ते तसे नाहीत. मान्यताप्राप्त सिद्धहस्त लेखकांकडून ते पाळले जात नाहीत. पूर्वीच्या काळीही ते काटेकोरपणे पाळले जात नसत. गौरवलेली वृत्तपत्रे व इतर माध्यमे (आकाशवाणी, दूरचित्रवाणी) ते पाळत नाहीत. समाजातील माणसे दैनंदिन जीवनात असे बोलत नाहीत. एवढे सगळे असताना हे नियम अस्तित्वात नाहीत असे म्हणण्याला चांगलाच प्रत्यवाय आहे.

आणि असे असताना हे नवीन नियम थोपवणे भाषेला किती दुर्बोध व अवघड बनवते हे केदारने दिलेल्या छोट्या अन् सोप्या उदाहरणातून दिसतेच. भाषा टिकवायची असेल तर ती अधिक अवघड न बनवता सोपी कशी बनवावी याकडे बघावे. समाज बोलतो ती भाषा. तेव्हा, हे बदल आजच्या मराठीत स्वागतार्ह नाहीत हे माझे पूर्वीपासूनचे मत या चर्चेनंतर अधोरेखित झाले आहे. ज्यांना हे बदल स्वीकारायचे ते स्वीकारतील व ज्यांना नाहीत ते नाहीत. परंतु येणारा (दशक किंवा शतक म्हणू) काळच ठरवेल की भाषा कशी व कोंणत्या स्वरूपात टिकेल व बदलेल. तुकारामांच्या वेळची, शिवाजीराजांच्या काळची भाषा आज अस्तित्वात नाही. त्यामागेही हीच व अशीच कारणे असणार.

एवढे बोलून मी इथून खरेच रजा घेतो. आणि हो, ही चर्चा जिथून सुरु झाली, त्या प्रश्नासंदर्भात मायबोली प्रशासनाने "ग्रूपमध्ये" / "ग्रूपमधले" या अचूक शब्दांची तूर्तास तरी निवड केल्याबद्द्ल त्यांना धन्यवाद देतो. Happy

<व्याकरणाचे नियम परकीय दीर्घ शब्दांचा र्‍हस्व उच्चार करा असे सांगत नाहीत.>

कशावरून? कृपया संदर्भ द्यावा.

नियम नसल्याचा संदर्भ मी कसा देणार? उलट क्ष ने दाखवून दिलेला नियम मी जे म्हणतो तोच आहे! आणि वेगळा कोणता नियम असल्याचा संदर्भ मला दिलास तरी मी माझे उच्चार खराब करणार नाहीच. आणि शिवाय, असलाच असा नियम तर तो सर्वमान्य सोडाच पण मी वर लिहिल्याप्रमाणे कोणीच पाळतांना दिसत नाही. तेव्हा तो नियम नियम न राहता फोल ठरतो. मला खरेच इथे यापुढे लिहायची इच्छा नाही, तेव्हा मला वगळून चर्चा चालू द्यात. Happy

आणि दूरध्वनी क्रमांक कळवण्याची विचारणा करण्याबद्दल खरेच धन्यवाद. मला अगदी मनापासून आवडेल त्यांच्याशी बोलायला. Happy

<नियम नसल्याचा संदर्भ मी कसा देणार? नियम असल्याचा संदर्भ मला दिलास तरी मी माझे उच्चार खराब करणार नाही.<>

Rofl
कहर आहे..
तुझे उच्चार योग्य आहेत, असं वाटत असेल, तर प्रश्नच नाही. पण तुझ्या उच्चारांशी मला घेणंदेणं नाही. मायबोलीवर योग्य प्रयोग केलेच जावेत, एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी मराठीतील झाडून सर्व विद्वानांचे मत विचारात घेतले आहे. माझी चूक असल्यास ती मान्य करण्यात मला काडीचीही लाज वाटत नाही. तेव्हा परकीय भाषेतील शब्दांविषयी जर (माझ्या मताच्या विरोधात जाणारा) नियम आढळल्यास कृपया कळव.

मुळात नियम असल्याचा संदर्भ तू दिलेला नाहीस. तेव्हा मला नसल्याचा निर्वाळा मागणे हेच हास्यास्पद आहे. तुझ्या मताच्या विरोधात जाणारा नियम 'क्ष'ने संस्कृत भाषेच्या संदर्भात दिला आहे. आणि इथे इंग्रजी भाषेत तत्सम शब्द ठरवता येत नाही वगैरेचा मुखवटा नको. कारण तूच इंग्रजी भाषेला मराठीचे नियम लावायला निघाला आहेस! आणि माझ्या उच्चारांशी घेणंदेणं असण्याचा संबंधच येत नाही. पण माझे उच्चार समाजाच्या उच्चारांपेक्षा वेगळे नाहीत याकडे मात्र दुर्लक्ष होतेय का? कहर आहे खरंच! चालू देत तीच तीच व्यर्थ चर्चा!

>>सामान्यरुपातील शेवटच्या अक्षरात इथे बदल होत नाही. म्हणून 'दूरचे'. याउलट 'दुरून' असं लिहिताना शेवटच्या अक्षरात बदल होतो, आणि 'दु' र्‍हस्व होतो.

योग्य मुद्दा. माझे दूर - दूरचे याबद्दलचे मत चूक आहे हे मान्य.

<तुझ्या मताच्या विरोधात जाणारा नियम 'क्ष'ने संस्कृत भाषेच्या संदर्भात दिला आह<>

त्या नियमानुसारही संस्कृत शब्दांची रुपे (र्‍हस्व-दीर्घाचे फरक वगळता) मराठी शब्दांप्रमाणेच चालतात. त्यामुळे इंग्रजी शब्दांना मी तत्सम शब्दांच्या रांगेत बसवलं तरी त्यांची रुपे मराठी शब्दांप्रमाणेच चालायला हवीत.
क्ष यांनी दाखवलेले नियम हे केवळ रुपांतील बदलांसंबंधी आहेत. त्या शब्दांची रुपे तयार होतातच. इंग्रजी शब्दांना काही विशेष सूट मिळालेली नाही.

एवढे सगळे असताना हे नियम अस्तित्वात नाहीत असे म्हणण्याला चांगलाच प्रत्यवाय आहे.
<<<<<<
घ्या. ’आम्हीही’ तेच म्हणतोय की. Lol ’हे नियम नाहीत’ असे म्हणणे हा चांगलाच प्रत्यवाय आहे, हे तूच लिहिलंस हे उत्तम!

आणि असे असताना हे नवीन नियम थोपवणे भाषेला किती दुर्बोध व अवघड बनवते <<<<<<
खरंय. योग्य न नियम न पाळता ’थोपवले’ (थोपवणे - रोखणे, अडथळा आणणे. उदा. निकराने लढून त्याने शत्रुसैन्याचे आक्रमण थोपवले.) तर भाषा अवघड होणारच. Lol

अनवधानाने का होईना, तू योग्य मुद्दे मांडल्याबद्दल तुलाही धन्यवाद. Happy

<<<<< (र्‍हस्व-दीर्घाचे फरक वगळता) >>>>>

हां, मग दरम्यान डॉ. ढेरे व डॉ. सामंत यांना हे सगळे जरूर कळव. कारण त्यांचे खालील मत अत्यंत चुकीचे आहे हे माझे स्पष्ट मत आहे.

संदर्भ : इंग्रजी शब्दांना मराठी प्रत्यय लावल्यावर उच्चार बदलायला हवेत. डॉ. अरुणा ढेरे व डॉ. सत्त्वशीला सामंत यांना विचारून तशी खात्री करून घेतली आहे.

राहता राहिले, <<<< त्यांची रुपे मराठी शब्दांप्रमाणेच चालायला हवी >>>> येणारा काळ ठरवेलच कोणता प्रघात टिकतो ते.

श्रद्धा, बारिक लक्ष आहे हो तुझे! Happy चुका दाखवून दिल्याबद्द्ल धन्यवाद. "प्रत्यवाय नाही" व "गळी उतरवणे" असे शब्दप्रयोग हवे होते इथे! Lol

>>ही वाक्ये जरी व्याकरणात बसत असतील तरी बोलीभाषेत बोलतो का? नसेल तर का नाही?
केदार. आपली ( आणि आपल्या आधीची पिढी दोन्हींची) सद्य स्थितीत अवस्था हीच आहे की इंग्लिश शब्द मराठी भाषेत गोवायचे कसे याचा विचार केलाच गेलेला नाही. इतर उदाहरणे दिली गेली आहेत (स्कॉटिश, ब्रिटीश आणि अमेरिकन) पण ती समांतर नाहीत कारण ती काहिही झाले तरी एकच भाषा आहे. आपणच पुरोगामित्वाच्या काहीशा अतिरेकामुळे याचा विचार करत नाही आणि जे आहे ते तसंच चालू रहावे या मुद्याची तळी भरतो.
तू दिलेल्या परिच्छेदांत मला "विरोधासाठी विरोध" इतपतच मुद्दा दिसतोय. बोलीभाषेत जर मी
"टेबलावर रुमाल ठेवतो",
"कँपातल्या दुकानात जातो",
"कार्डावर खरेदी करतो",
"पेनात रिफील टाकतो",
"पंपावर पेट्रोल भरतो"

तर "इंग्लंडहून आणलेल्या स्ट्रॉबेर्‍या संपल्या" असे का म्हणू शकत नाही?

>>अश्या भाषेत साहित्य लिहीले तर लोक वाचणार का?

साहित्य कसे, कशाबद्दल लिहावे आणि कोणी कुठले वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धेडगुजरी भाषेतले साहित्य वाचायला काहीच वाटत नसेल तर अशा मराठीतले साहित्य वाचायला जड जाईल असे वाटत नाही. आणि इतकी चिंता असेल तर त्यापेक्षा मराठी शब्द वापरा! पण काही शब्दांना नियम लागू आणि काहींना नाही असे त्रिशंकू अवस्थेत राहू नका.

काही नोंदी:
*पी यम? हा यम फक्त विनोदनिर्मितीसाठी असला तर कृपया हा प्रतिसाद दुसरीकडे हलवा. तुमच्या परिच्छेदाचा दाखला देऊन अनेक जण "हे असे होईल" या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहेत. उगीच सुचले आणि लिहावेसे वाटले अशी तळटीप देऊन खाली त्यावर आधारित "खरे" प्रश्न कसे देऊ शकता?
*प्रिफरतो? मराठी समांतर उदाहरण घेतले तर तुम्ही "घेऊन जातो" याला तुमच्या व्याकरणानुसार "घेऊनतो" म्हणता का?
*ऑनलाईनीवर - म्हणजे काय? याचे मूळ इंग्लिश रुप "on online" असे होतेय आणि तो चुकीचा शब्दप्रयोग आहे. योग्य वाक्यरचना "कारण ऑनलाईन आलं की वेळ अस्सा निघून जातो" अशी हवी.

असाम्या, केदारने लिहिल्याप्रमाणे तो परिच्छेद त्याने "उगीचच" लिहिला आहे आणि या चर्चेत ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे "सरकारी मराठीचे नियम कितपत ग्राह्य धरावेत" हा तुझा मुद्दा अजूनही मान्य होण्यासारखा नाही.

'बशीतून' हा प्रयोग का करत नाहीत, याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे.
बाकी क्षा, उत्तम पोस्ट.

माझ्या एकीव अन बोलीव मराठी ज्ञानानुसार, "टेबलवर चहाचा कप ठेवलाय. उरलेला चहा कपात ओत कमी असेल तर. मी तरी असेच बोलते. ते सहज येते म्हणजे. Happy

बाकी काय इथे तज्ञ आहेतच चूक का बरोबर सांगायला. Happy

चूक सुधारली आहे.

हँग ऑन क्ष,
तो प्यारा मी उगीचच लिहीलेला नाही. त्यात एक 'संवाद' मांडलाय. तू दोन-तीन चुका दाखवल्यास त्या मी मान्य करतो, पण बाकी प्यारा हा व्याकरणाला धरुन आहे.

आणि तसे मी कोणाला बोलताना पाहिले नाही. (कदाचित माझे विश्व लिमीटेड आहे). माबोवर मात्र काही जन तसे लिहीत असतात म्हणून प्रश्न विचारले, कारण ते लिहीतात म्हणजे त्यांना माहीती आहे असे वाटले.

खरे" प्रश्न कसे देऊ शकता? >>

चर्चेचा विचार करता असे दिसले की फक्त काही शब्दांवर बोलून (नुस्ते) ही चर्चा, चर्चाच राहील, त्याला संवादाचे स्वरुप दिले तर काय होईल हा विचार त्या पाठीमागे आहे. आणि तसे मी अ‍ॅडमला लिहीले पण आहे. आणि मी इतरही दोन मुद्दे (भाषा लोकांसाठी असते, लोक भाषेसाठी नाही, आणि इंग्रजीचे स्वरूप, २०० वर्षांपुर्वीची भाषा,) हे मांडले आहेत, त्यामूळे मी इथे विरोधासाठी विरोध करतोय असे तुला वाटत असेल तर त्यास माझा नाईलाज आहे मित्रा.

उलट मी आधीही लिहीले की तुमच्या सर्वांकडून शिकायचा प्रयत्न करत आहे, पण चर्चेत प्रश्न विचारले की ते आवडत नाही असेच दिसतेय.

केदार,
भाषा ही लोकांसाठी असते, हे मान्य केलं तरी अनेक वर्षं अनेकांनी केलेला अयोग्य भाषाप्रयोग, केवळ तो बहुसंख्यांनी केला म्हणून योग्य ठरतो का?
'सुस्वागतम्' हा प्रयोग अतिशय अयोग्य आहे. तरी तो सर्वत्र केला जातो. पण म्हणून त्याला अधिकृत दर्जा दिला जावा का? इंग्रजीत 'comprising of' असा प्रयोग अनेकांकडून केला जातो. संख्येचे बळ आहे, म्हणून हा प्रयोग योग्य ठरतो का?
काही नियमांचं पालन आपणच करत नाही, आणि धेडगुजरी भाषा वापरतो. त्याचं समर्थन करता येईल का?

बाकी, मला उद्देशून केलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांची मला जमतील तशी उत्तरं मी दिली आहेत. 'मला वाटतं..' अशी जर सुरुवात असेल, तर माझाही नाईलाज आहे. इथे मी, क्ष, संकल्प, श्रद्धा एवढेच लोक या मुद्द्याच्या बाजूने बोलत आहोत. त्यामुळे माझ्याकडून तुझे काही मुद्दे दुर्लक्षिले गेले, असं होऊ शकतं. म्हणून विचारलं.

मला वाटत अशी सुरुवात मी केलेली नाही. मी ठोस मुद्देच मांडलेच.

सुस्वागतम्' >> का नाही? गोरा, पंडित हे व अनेक शब्द इंग्रजी होतात तर असे अनेक शब्द रुळवून घेतले पाहीजेत. भाषेची समृद्धी हा विषय चाफाने मांडलाच आहे की.
धेडगुजरी भाषेचे समर्थन मी ही करणार नाही, पण मित्रा समाजात जर १०० लोक राहत असतील, आणि ९० लोक सुस्वागतम शब्द वापरत असतील तर तो शब्द धेडगुजरी राहत नाही. ' त्या समाजाची त्या कथीत शब्दा बद्दलची आपूलकी" विचारात घे.

सुस्वागतम् = सु + सु+ आगतम्
दोनदा 'सु' हा प्रत्यय लावणं अतिशय चुकीचं आहे. स्वागतम् हाच योग्य शब्द आहे. संस्कृताचे थोडे ज्ञान व आपुलकी असणारी कोणतीही व्यक्ती हे मान्य करेल. आपण उत्साहाच्या भरात एक जादा 'सु' लावतो, पण हे नियमांच्या विरुद्ध आहे, आणि भाषेशी असे खेळ करण्याचा आपल्याला अधिकार नाही.

चिनुक्सा, अरे तुझे बरोबर आहे. पण मी उरलेल्या ९० व्यक्तींबद्दल बोलतोय, माझ्या-तुझ्या बद्दल नाही.

आणि भाषेचा खेळ म्हणजे काय रे? अगदी मुळात जा पाहू. भाषा बोलली गेली, आणि मग लिहीली गेली. परत एकदा उन्नतीसाठी अशी तोडफोड होत असते. नव्हे, ती व्हावी. तेच जिवंतपणाचे लक्षण आहे. ( हे मात्र माझे मत आणि माझे स्टेटमेंट आहे Happy )

केदारा,
या न्यायाने अनेकजण अशुद्ध बोलतात / लिहितात म्हणून मीही तसंच अशुद्ध बोलावं?
क्षमस्व, पण मला भाषेचा वापर करताना माझी बुद्धीही वापरावी लागते. आणि नियमांची पायमल्ली, भाषेचा अवमान हे मला जमणार नाही.
एका शब्दाला एकच प्रत्यय दोनदा लावणं, आणि ते स्वीकारणं, हे तर केवळ अशक्य आहे.

अगदीच राहवत नाही म्हणून - इंग्रजी भाषेतही असे प्रकार आहेतच. जेव्हा RSVP हा शब्द फ्रेंचमधून जसाच्या तसा घेतला तेव्हा तो वापरताना Please RSVP असा सर्रास वापरला जाऊ लागला. इथे Please जादा लावला जातोय. हे होतेच. केदारला अनुमोदन!

आणि क्ष, इंग्रजी भाषेतले जसेच्या तसे उचललेले शब्द शोधले नाहीस की काय? ही घे काही सुचलेली उदाहरणे à la carte, déjà vu, vis-a-vis (फ्रेंच), bonito, pronto, chipotle (स्पॅनिश), et cetera, bona fide (लॅटिन), Gung-ho, Yin Yang (चायनीज), Sayonara (जॅपनीज), Incognito (इटालियन) आणि इतर असंख्य. हे सगळे शब्द जसेच्या तसे वापरले जातात, अगदी कसेही न बदलता.

शिवाय गुरु व पंडीत यांचे उदाहरण सारखे येतेय. त्यांचे अनेकवचन करताना इंग्रजीत केवळ पुढे "s" लावून Gurus, Pundits असे केले जाते हे खरे पण तसे करताना ना मूळ शब्दाच्या रुपाची मोडतोड होते ना त्याच्या उच्चाराची. आणि नंतर तो शब्द इंग्रजी शब्दांप्रमाणे चालवला जात नाही. म्हणजे जसे Scholar - Scholarly, Teacher - Teacherly तसे Guru - Guruly होत नाही. आणि त्या शब्दाचे लिंग ठरवून त्याचा वेगळ्याच प्रकारे वापर करावा लागणे ही भानगड देखील इंग्रजीत होत नाही. शिवाय इंग्रजी भाषेत सगळ्याच भाषांमधले शब्द असे सरसकट फक्त "s" लावून अनेकवचनी बनत नाहीत. ग्रीक व लॅटिन भाषांमधले शब्द त्या त्या भाषेतलेच अनेकवचनाचे नियम इंग्रजीमधेही पाळतात. उदा. लॅटिन एकवचनी शब्द पुष्कळदा -us मधे संपतात (उदा. alumnus, syllabus वगैरे) व लॅटिनच्या नियमाप्रमाणे अनेकवचनी होतांना -i मधे बदलतात (alumni, syllabi). जे लॅटिन एकवचनी शब्द -um मधे संपतात (curriculum, datum, medium), ते लॅटिनच्याच नियमानुसार इंग्रजीमधेही -a मधे संपून अनेकवचनी होतात (curricula, data, media). ग्रीक -on ने संपणारे एकवचनी शब्द (criterion, phenomenon) ग्रीक भाषेचाच नियम पाळून इंग्रजीमधे -a ने संपून अनेकवचनी (criteria, phenomena) होतात. तेव्हा याबाबत इंग्रजीमधे इंग्रजीचा स्वत:चाच नियम सगळ्या परकीय शब्दांसाठी पाळा असे नाही हे निर्विवाद.

असाम्या, केदारने लिहिल्याप्रमाणे तो परिच्छेद त्याने "उगीचच" लिहिला आहे आणि या चर्चेत ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे "सरकारी मराठीचे नियम कितपत ग्राह्य धरावेत" हा तुझा मुद्दा अजूनही मान्य होण्यासारखा नाही. >> च्यामारी (नोंद : हा पूर्ण आपुलकीने वापरलेला शब्द आहे Happy ) तो पूर्ण परिच्छेद जर इथे मांडलेल्या व्याकरणाच्या नियमानुसार/संकेतानुसार लिहिला आहे, तोच जर उगीचच असेल तर वाद कसला घालताय ते माझ्या डोक्यावरून गेले. Contents बाजूला ठेव एकवेळ पण परिच्छेद तर बघ.

नवीन भाषा शिकताना भाषेचे जे पाच नियम धरतात (phonologic Rules, Morphologic Rules, Syntactic Rules, Semantic Rules, Pragmatic Rules) ते तुला माहित असतीलच. त्यातला मह्त्वाचा नियम phonetics जो भाषेचा form ठरवतो नि भाषा शिकण्यासाठी मह्त्वाचा मानला जातो, हा उच्चारांशी संबंधित आहे. त्याचचा मह्त्वाचा भाग हा कि जेव्हढे उच्चार सहजसोपे तेव्हढी ती भाषा शिकायला सोपी. ह्याबाबत सरकारी मराठी इतके चपखल उदाहरण अजून नसावे. तुला अधिक माहिती नेटवर सहज सापडेल. सरकारी मराठी किती जण वापरतात हे लक्षात घेतलेस तर माझा मुद्दा तुझ्या लक्षात येईल. ह्याउप्पर काहि बोलायची गरज नसावी.

Pages