मायबोलीवर लिहिलेला गृप (Group) शब्द बरोबर आहे का?

Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22

अ‍ॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.

लोकांचं काय मत आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझा मुद्दा (जर व्याकरणदृष्ट्या चुकीच्या पण "सामान्यजनांत" रूढ शब्दांना त्यावेळेच्या व्याकरणाच्या नियमांत स्थान देण्यात आले असा गृहीत धरून) मला खरंतर कळला नाही. >> हो. त्या एका वाक्यात न कळण्यासारखे काय आहे हे मला न कळल्यामुळे आणखी काय स्पष्ट करू ते मला कळले नाहि Happy

ह्यातून मला काहिही सुचवायचे नाहिये, मला वाटले ते मी सांगितले एव्हढेच. ते बरोबर आहे असा माझा दावा नाही. विचार केल्यावर मला हे एकच स्पष्टीकरण योग्य वाटले एव्हढेच.

>>हो. त्या एका वाक्यात न कळण्यासारखे काय आहे हे मला न कळल्यामुळे आणखी काय स्पष्ट करू ते
>>मला कळले नाहि

ते एक वाक्य तिथे घातले असतेस तर बरे झाले नसते का? फक्त "माझा मुद्दा" असा उल्लेख करून हे सगळं त्यात स्पष्ट असायला पाहिजे हे थोडं जास्तच गृहीत धरल्यासारखं होतं असं वाटत नाही?
बाकी या सगळ्याचा माझ्या पोस्टीशी असलेला संबंध मला अजूनही कळला नाही.

ते एक वाक्य तिथे घातले असतेस तर बरे झाले नसते का? फक्त "माझा मुद्दा" असा उल्लेख करून हे सगळं त्यात स्पष्ट असायला पाहिजे हे थोडं जास्तच गृहीत धरल्यासारखं होतं असं वाटत नाही? >> ????? मी एका ओळीची post केली त्यावर तू reply दिलास त्याचे मी स्पष्टीकरण मागितले भाऊ, त्यात दर वेळी ते मूळचे वाक्य परत लिहायला हवे होते असे मला खरच वाटले नाही.

चर्चेशी सुसंगत एक धागा मी शोधून काढला आहे.

काही दिवसांपुर्वी मराठीच्या नविन शब्दकोषाबद्दल वाचलेले आठवत होते. ती लिंक नाही पण नेटावर शोध घेता बातमी सापडली.

-----------------------------------------------------------------

बारा वर्षांनंतर सुरू झालेल्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या "मराठी शब्दकोशा'चे "अ' ते "औ' या पहिल्या खंडाचे काम पूर्ण झाले असून तो मार्चअखेर उपलब्ध होणार आहे.

आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व शब्दकोशांतील शब्द यात एकत्रित केलेले आहेत.

दुसऱ्या खंडाचे ("क' वर्ग) काम सुरू झाले असून, मार्चअखेर तो पूर्ण होईल. असे एकूण सात व एक पुरवणीखंड अशा एकूण आठ खंडांची निर्मिती करण्यात येणार आहे.

कोकणी, अहिराणी, खानदेशी, माणदेशी, झाडी, डांगी, वऱ्हाडी आदी बोलींतील शब्द, दलित व ग्रामीण साहित्यांतील नवीन शब्द यांचा यात समावेश असणार आहे.

व्यावहारिक शब्दकोश (मो. दि. भाटवडेकर), अभिनव मराठी शब्दकोश (द. ह. अग्निहोत्री), प्राचीन मराठी शब्दकोश (डॉ. तुळपुळे, फील्डहाऊस), ऐतिहासिक शब्दकोश (य. न. केळकर), शब्दरत्नाकर (वा. गो. आपटे, भावे), मराठी पर्यायी शब्दांचा कोश (प्र. न. जोशी) हे कोश; तसेच मराठी शब्दविलास, दख्खनी भाषा, एकाक्षरी शब्दकोश, शब्दसंस्कृती (हिंदी), झाडी बोली, उत्पत्ती कोश, लोकसाहित्य, सरस्वती कोश, या संदर्भग्रंथांतील ज्या शब्दांचा समावेश जुन्या कोशांत नाही, त्यांचा समावेश कोशाच्या नव्या खंडांत करण्यात येणार आहे. मराठी भाषेतील नवीन शब्दांचा या कोशात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी अलीकडील वीस ते पंचवीस वर्षांतील विविध प्रकारच्या ग्रंथांतून नव्यानेच वापरण्यात आलेल्या शब्दांचा संग्रह करण्याचे योजिले आहे. त्यासाठी त्या- त्या प्रदेश व बोलीतील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेण्यात येत आहे.

सकाळ पुणे, ता. २४ नोव्हे. २००८
------------------------------------------------------------------------------

दुसरी लिंक ही तो खंड प्रकाशीत झाल्याची आहे.

http://beta.esakal.com/2009/03/14214310/pune-marathi-shabdakosh.html

आता मला उत्सुकता आहे, ती कोणते 'व्याकरणाच्या नियमात' न बसणारे शब्द ह्या खंडात घातले आहेत. खंड माझ्याकडे नाही, त्यामुळे मी ह्यासंबंधी भाष्य करणे अनुचित आहे, पण इथेच मी व इतरांनी भाषा लोकाग्राहस्तव बदलन्याचा मुद्यांवर लिहीले होते आणि ह्याच काळात बोली भाषेतील शब्द अधिकृत केले गेले हे कळाले म्हणून लिहीले.

केदारा,
इंग्रजी शब्द व बोलीभाषेतील शब्द यांत काहीच फरक नाही का?
तू ही बातमी इथे देण्याचा उद्देश अजिबातच कळला नाही.

अरे इंग्रजी शब्द व बोलीभाषा ह्यात फरक आहेच की. Happy

बातमी देण्याचा उद्देश - इथेच बोलीभाषा व प्रमान भाषा कशी वेगळी असते, भाषेची तोडफोड होउ नये ह्यावर चर्चा झाली. ह्या बातमीचा 'ग्रूपामध्ये' शी काहीही संबंध नाही पण सुस्वागतम् आणि इतर मराठी शब्दांशी आहे म्हणून दिली.

(तसेही सुस्वागतम् ह्या पहिल्या खंडात नाहीये पण पब्लीक डिमांड मुळे भाषा बदलते हे अधोरेखीत करायचे होते, जे ह्या बातमी मुळे होतेय असे मला वाटते. )

इथे झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने नुकतीच दोन वेधक पुस्तके वाचली गेली. पहिले पुस्तक १९८३ सालचे सुहासिनी लद्दू लिखित 'मराठीच्या प्रमाणभाषेचे स्वरूप'. हा खरे तर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे घेतल्या गेलेल्या याच विषयावरील प्रबंध-स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्राप्त प्रबंध! यात भाषा व भाषेचे शास्त्र, तिचा इतिहास, आजच्या काळातील प्रामाण्याचा प्रश्न, प्रमाणभाषेची वाटचाल, व्याकरणाचे बदल, त्यावरून वेळोवेळी झालेले वाद-विवाद, वर्तमानपत्रांतील भाषिक स्थित्यंतरे, भाषिक दळणवळणाचे प्रथम, मध्य, व उच्च स्तर वगैरे वगैरे अनेक महत्त्वाचे विषय विस्तारपूर्वक मांडले आहेत. आणि नवलाची व आनंदाची गोष्ट म्हणजे यातले अनेक विषय इथल्या चर्चेत सहजपणे येऊन गेल्याचे हे पुस्तक वाचताना मला जाणवले.

इंग्रजी शब्द मराठी नियमांप्रमाणे चालवण्याबद्दलही थोडाफार उहापोह 'संकेत आणि भाषिक आक्रमणे' या विभागांतर्गत आहे. "कानांना बरे लागत नाहीत" सारख्या प्राध्यापक गुप्त्यांच्या 'सकाळ' १९७९ मधील लेखातील कारणापासून ते 'महाराष्ट्र टाईम्स'च्या अग्रलेखातून केलेल्या 'पारिभाषिक शब्द बनविणारांचे तोंड लोकांकडे वळलेले असावे, मूठभर विद्वानांकडे नसावे' अशा टीकेपर्यंतचे दाखले आहेत. 'उच्चारपरिवर्तनाप्रमाणे लेखनपरिवर्तनास तयार रहावे' या चिपळूणकरांच्या स्पष्ट मार्गदर्शनाप्रमाणेच उच्चारा-उच्चारांमधे फरक असल्यामुळे लेखनासाठी ते निर्णायक मानावेत का असेही युक्तिवाद दाखवले आहेत. सरकारी भाषा, प्रांतीय फरक, ब्राह्मणी भाषा, "प्रतिष्ठितांना" मान्य असलेली "शिष्टसंमत" भाषा, बहुजनसमाजाची भाषा, 'जुने व्याकरण अधिक जुने लेखनविषयक नियम' ते 'नवे व्याकरण अधिक नवे लेखनविषयक नियम' याची ओळख, वगळलेले अनुच्चारित अनुस्वार, मराठी-संस्कृत, मराठी-हिंदी, मराठी-इंग्रजी, परभाषिक शब्दांची आवक वगैरे अनेक मुद्दे फार चांगले मांडले आहेत.

आणि हे पुस्तक २५ वर्षांपूर्वी लिहिले आहे हे लक्षात घेतले तर या मधल्या काळात भाषा त्याहून कितीतरी पटींनी बदलली आहे, व तिने किती नवीन शब्द किती नवीन प्रकारे स्वतःमधे सामावून घेतले आहेत याचा विचार थक्क करून सोडतो. हे पुस्तक पूर्णच वाचण्यासारखे आहे; पण त्यातले काही परिच्छेद इथे देत आहे.

(दोन्ही पुस्तकातल्या खाली दिलेल्या उतार्‍यांमधील आवडलेली वाक्ये ठळक करण्याचा मोह आवरत नव्हता पण मग सगळेच ठळक दिसू लागल्यामुळे प्रयत्नपूर्वक ते टाळले आहे.)

भाषेची परिवर्तनशीलता :
समाजव्यवहाराचे, मानवाच्या हातातले साधन म्हणजे 'भाषा'. हे साधन त्याने कितीही काळजीपूर्वक वापरले तरी परिवर्तनशीलतेच्या निसर्गनियमापासून भाषा दूर राहू शकत नाही. वेदासारख्या अपौरुषेय ग्रंथांच्या उच्चारांबाबत काटेकोर पालन केले असूनही वेदपठणाच्या पद्धतीनुसार ऐतरेय, शाकल, बाष्कल इत्यादी विविध शाखा अस्तित्वात आल्याच. 'ऋषि' हा त्या काळातील एक सर्वसाधारण शब्द आजच्या काळात 'ऋषि, ऋषी, रिषी, रिशी, रुशी, रुषी' वगैरे भिन्न प्रकारांनी उच्चारला जात असलेला आढळून येतो. किंवा 'ध्वजदंड', 'कालपक्ष' हे शब्द असे बदलतात की 'झेंडा' व 'काळोख' या शब्दांचे मूळ अनुक्रमे हेच शब्द आहेत असे सांगितले तर विश्वास बसू नये. मूळातच भाषा ध्वनींनी बनलेली असते; व ध्वनी हे हवेत विरणारे असतात. त्यामुळे एकदा 'बोलला' गेलेला उच्चार दुसर्‍या वेळी जसाच्या तसा उच्चारला गेला की नाही हे तपासून पाहणे शक्य नसते. शिवाय उच्चारणात होणार्‍या थोड्याश्या बदलामुळे भाषिक व्यवहार अशक्य होणार नसला तर माणसाला काटेकोर राहण्याचे कारण पडत नाही. भाषेच्या या विशिष्ट लवचिकपणामुळेच भाषिक परिवर्तन घडत राहते.

भाषा हे माणसाच्या हातातील साधन आहे, साधनाचा वापर ज्या साध्यासाठी करायचा ते साध्य प्राप्त करुन घेण्यासाठी साधनाचा वापर काळजीपूर्वक न करता काम होणे जेव्हा शक्य असते तेव्हा साधनाच्या वापरात ढिलाई आपोआप येते. याचा परिणाम भाषेच्या जीवनावर खोलवर उठलेला दिसून येतो. आजची काही लहान मुले 'फ' चा उच्चार घर्षक स्वरुपाचा करताना आढळून येत आहेत, तर कित्येक प्रौढांच्या तोंडी 'फ' चे उच्चारण स्पष्ट आहे. या दोन प्रकारच्या उच्चारणामुळे 'फार' व 'फूल' यांसारख्या शब्दांच्या वापरात अर्थग्रहणाच्या दृष्टीने गोंधळ आढळून येत नाही. परिणामतः 'फ' चा स्पष्ट उच्चार करणारी पिढी अस्तंगत झाल्यावर 'फ' चे उच्चारण सरसकट घर्षक अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारताही येत नाही. अशा प्रकारचे उच्चारातले किंवा इतरही अनेक परिणाम भाषेच्या लवचिकपणामुळे दूरगामी होताना दिसतात. हे परिवर्तन इतके संथ व न कळत होते की या परिवर्तनाची जाणीव बर्‍याच कालपर्यंत होऊही शकत नाही.

भाषा सर्वस्वी एकत्रित करुन व्याकरणे लिहिणे शक्य नसल्याने व व्याकरणातील नियम वाचून भाषा वापरली जात नसल्याने कोणत्याही भाषिकाला आपल्या भाषेतील प्रत्यय योजना भाषेत वरचेवर वापरात येणार्‍या प्रत्यययुक्त शब्दांवरुनच समजत असते. कोणता अर्थ अभिप्रेत असता कोणत्या शब्दांचा कसा समास करावा हे बहुशः अनुभवानेच समजत असते. भाषेच्या या मोडणी-जोडणीसंबंधीच्या ज्ञानाचा वापर करून जेथे आवश्यकता असेल तेथे भाषेत पूर्वी वापरात नसलेले, नवीन नवीन शब्द भाषेच्या वापरात उतरवता येतात.

संकेत आणि भाषिक आक्रमणे :
भाषेचा मुख्य गाभा जितका शब्दांचा असतो तितकाच ते शब्द जोडले जाऊन वाक्यात वापरले जाण्याच्या प्रक्रियेचा असतो. शब्दसंग्रह, व्याकरण व उच्चारण यांनी बोली भाषा बनत असते, तशीच विशिष्ट शब्दसंग्रह, विशिष्ट व्याकरण, विशिष्ट उच्चारण-पद्धतीसाठी वापरली जाणारी विशिष्ट लेखनपद्धती यांच्या योगाने प्रमाणभाषा बनत असते. या सर्वच गोष्टी 'संकेतां'च्या आधारावर उभ्या असतात. आणि प्रमाणभाषेतील संकेत शिष्टमान्यतेने दुजोरा दिलेले असतात. हे सर्व लक्षात घेतल्यावर मराठी भाषेवरील संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषांच्या आक्रमणाचा विचार संकेतांच्या दृष्टीतून करणे आवश्यक ठरते. संकेतभेदांमुळे शब्दभेद येतात व काळजीपूर्वक शब्दयोजना करावयाची नसेल तर त्या शब्दभेदांसाठी सर्वसाधारणपणे वापरात असलेला, अधिक परिचयात असलेला शब्द वापरला जातो.

मराठी भाषेवर इतर भाषांची आक्रमणे होत आहेत किंवा झाली आहेत असे म्हणताना आक्रमणाची व्याख्या करणे आवश्यक आहे; तसेच अस्स्ल मराठी अशा शब्दप्रयोगाची मर्यादाही स्पष्ट ओळखली पाहिजे.

ज्ञानेश्वरीच्या अनेक अभ्यासकांनी ज्ञानेश्वरीतील मराठीतर शब्दांची उपस्थिती दाखवून दिली आहे. रामदास, तुकारामांच्या मराठीत यावनी शब्दांचा भरणा आढळतो. आजच्याच नव्हे, तर जुन्या मुंबईच्या मराठीत इंग्रजी शब्दांचा भरणा असल्याचे उल्लेख आढळतात. मराठीत आलेल्या, येऊ पाहत असलेल्या कोणत्या शब्दांना मान्यता द्यावयाची, कोणते शब्द पर्यायी किंवा वैकल्पिक म्हणून मान्य करावयाचे, कोणत्या शब्दांना आता मराठी समजावयाचे याचा 'काळा'च्या संदर्भात, शब्दांच्या अर्थांच्या विशिष्ट संकेतांच्या संदर्भात व भाषेच्या सोयीगैरसोयीच्या संदर्भात विचार करून काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविली पाहिजेत.

'बस' या इंग्रजी शब्दाचे अनेकवचन 'बशी' किंवा 'बसा' व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे 'डिश'चे 'डिशा' व्हायला पाहिजे. परंतु तसे वापरले जात नाही. बसेस, डिशेस, ग्लासेस किंवा ग्लासं ही अनेकवचने प्रमाण मानली जातात कारण बस किंवा डिश शब्द अजून मराठीत पुरेसा रुळलेला नसतो, शिवाय बसा किंवा बशी शब्दाने मराठीत दुसरे काही संकेत आधीच अस्तित्वात असतात. त्यामुळे 'बस' हा इंग्रजी शब्द त्याच्या अनेकवचनांसह मराठीत शिरतो, आणि आपल्यासारख्या आणखी चारदोन शब्दांमुळे एस हा अनेकवचनाचा प्रत्यय मराठीत आणू पाहतो.

बेमुर्वतखोर, बेकिंमत, बेईमान शब्दांतून मराठीत आलेला 'बे' हा उपसर्ग बेताल, बेभान सारख्या शब्दांतून "काढून टाकणे" एका विशिष्ट कालावधीनंतर शक्य नसते. भाषेत परभाषेचे आक्रमण नको असेल तर ते होण्यापूर्वीच टाळणे बरे. झालेले असल्यास वेळीच काढून टाकलेले बरे, व रुळले गेले असल्यास विशिष्ट निकषांनी सरळपणे स्वीकारलेले बरे ठरते.

.........................................................................................................

दुसरे पुस्तक मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांचे 'भाषाविवेक'. पुस्तकाचे प्रकाशन बारा वर्षांपूर्वीचे आहे. यात एक संपूर्ण प्रकरणच व्याकरणावर आहे. व त्याचे शीर्षक आहे 'व्याकरणाचे मठ्ठ माहात्म्य'. भाषेसाठी व्याकरण की व्याकरणासाठी भाषा हा सारासार विचार लक्षात घेऊन हे वाचले तेव्हा बरेचसे पटले. शिवाय हे वाचताना कुठेही 'व्याकरण अजिबात पाळले नाही तरी चालेल' असा विचार मला जाणवला नाही. उलट 'जुने व्याकरण तेच योग्य व अपरिवर्तनीय' या विचाराला मात्र कडाडून विरोध दिसला. तर ते प्रकरण खाली देत आहे.

व्याकरणाचे मठ्ठ माहात्म्य

भाषेच्या अंतरंगात प्रवेश करताना व्याकरणाच्या उंबरठ्याशीच जबर ठेच लागावी, अशी शिक्षणपद्धतीची योजनाच असावी. मराठी किंवा संस्कृतच्याच नव्हे; इंग्रजीच्याही. इंग्लंडमधील सर्वसाधारण माध्यमिक शाळांना ग्रॅमर स्कूल म्हणतात. पूर्वी तिथे मुख्यतः शिकायचे लॅटिन व ग्रीक. म्हणजे त्यांचे व्याकरण. खरे तर व्याकरणाचा अभ्यास हे साधन, साहित्याचा (आणि त्यातल्या विचारांचा) अभ्यास हे उद्दिष्ट; याऐवजी व्याकरण हेच उद्दिष्ट, साहित्य त्यासाठी 'धड्यां'सारखे, या उफराटेपणाचा फारफार वर्षांपूर्वी एका इंग्रज लेखकाने निषेध केला. त्या विद्यासंसारात व्याकरणाकडे भूमिका होती ती खलपुरूषाची किंवा बागुलबुवाची. आपल्याकडे तर ती अधिकच कर्दनकाळ. त्याच्या धसक्याने नको तो 'भाषाविषय' (हे तेव्हाचे नाव) असे कोवळ्या वयात व्हायचे. साहित्याविषयी त्या संसारातच सावत्रभाव होता. 'यद्यपि बहुनाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम्' (फार शिकला नाहीस तरी चालेल, पण व्याकरण घोक) असे संस्कृत सुभाषित आहे. कसले साहित्य नि काय! संस्कृतीचाच मार्ग व्याकरणाच्या काट्याकुट्यांतून तुडवायचा. निदान पायांना प्रशिक्षण; डोक्याचे सोडा!

मृतभाषेचे विधी व नियम यांच्या कडक चौकटीत जिवंत भाषेला ठोकून बसवायचे हा दुरुद्योग पूर्वजपूजेत पाश्चात्यांहून कुठल्याकुठे वरचढ असलेल्या भारतीयांना फारच प्रिय. त्यांना व्याकरणही सनातन व अपरिवर्तनीय. भाषा लवचिक असते. काळाच्या प्रवाहात जीवनाच्या अन्य अंगांप्रमाणे तीही बदलते; आर्यांप्रमाणे आलेले संस्कृतही त्या प्राचीन काळात बदलत गेले. पुढे त्याच्यावर अभिजाततेचा मुकुट चढला; त्याचे दैवत होऊन बसले. आणि ते बसलेच! त्याची प्रगती खुंटली, सामाजिक चलनाला त्याची साथ राहिली नाही. प्रत्येक प्राचीन भाषेचे ते भागधेय असते. त्याचे दु:ख नको. पण आपल्याला जे प्राचीन ते रंगवासजवायचे असते! त्यावरून आठवण झाली, पाऊणशे वर्षांपूर्वी शोध लागलेल्या तुतानखामेन या साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तच्या सम्राटाच्या थडग्याची. एका पिरॅमिडच्या आत ते होते : भव्य व डोळे दिपवणारे : प्राचीन कलाकारागिरीपुढे लवावे असे. मात्र संस्कृत व्याकरणाचे त्याच्याशी सुचवलेले साम्य फार ताणू नये. परमार्थेन न गृह्यतां वच:!

मराठीचे रूप व त्याचे व्याकरण गेल्या सातआठशे वर्षांत बदलत आले. नसते बदलले तरच नवल. आजच्या शालेय व्याकरणात ते जुने नीट बसणार नाही. कालपरवाची सत्यकथा. प्राथमिक शाळेतल्या एका चुणचुणीत विद्यार्थ्याची. त्याच्या पाठ्यपुस्तकात ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या होत्या. त्याने शिक्षिकेला सांगितले, "बाई, ज्ञानेश्वरांना व्याकरण येत नव्हते." शेक्स्पिअरचेही व्याकरण आज संशयास्पद वाटते; कुठे जाणूनबुजून धुडकावलेले.

गेल्या शतकाच्या प्रथमार्धातील मराठीचे चालचलन आणि आजच्या मराठीचे, यांत अंतर आहे. या चाळीस-पन्नास वर्षांत तर ते फार बदलले आहे. विष्णुशास्त्रीनिर्मित संस्कृत-इंग्रजी जोड-खोड्यातून अनेकांच्या लेखनाने मोकळीक करून घेतली आहे. पद्यप्रांतात मर्ढेकर-सुर्वे आणि गद्यप्रांतात नेमाडे, भाऊ पाध्ये, दलित लेखक, इत्यादींच्या धडाक्यामुळे.

शिक्षणक्रमात मराठीला, नाराजीने का होईना, स्थान दिले गेले तेव्हा तिच्या व्याकरणाची पुस्तके तयार केली गेली ती संस्कृतच्या ढाच्यातून, आणि कुठे इंग्रजीबरहुकूम. संस्कृतमधून विभक्ती स्वीकारल्या मराठीने त्यांच्याशी किती जुळवून घ्यावे यावर पुढे वाद झाले. द्वितीयेचे प्रत्यय स, ते - स, ला, ना, ते, असे आम्ही घोकले. 'ते' गळला. बोलण्यातून 'स' केव्हाच बाद झाला, पण एरव्ही आधुनिक असलेल्या अनेकांच्या लेखनात तो दिसतो.

अगोदर भाषा; मग तिची व्यवस्था सोयीसाठी आखून देणारे व्याकरण. आपले उलटे. अगोदर व्याकरण, त्यामागून फरफटत भाषा, असा हाडेलहप्पी प्रकार.

इंग्रजीत या शतकात, व्याकरणाच्या हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठले. परिणामी त्या भाषेचा खुला विकास होत राहिला. विशेषत: दुसर्‍या महायुद्धानंतर इंग्रजीने जे रूप घेतले, किंवा रूपे घेतली, ती शतकापूर्वीच्या भाषापंडितांच्या दु:स्वप्नांतही आली नसतील. आज त्यांचे वंशज शिल्लक असतील, त्यांच्या पंतोजीदृष्टीला आपली भाषा चंचल, चवचाल, झाल्याचे दु:ख वाटत असणार.

आपल्या मनातले स्वच्छपणे सांगता आले, तर तिथे व्याकरणाचे काम नाही - इति जॉर्ज ऑरवेल. आपल्याकडे व्याकरणाचे केवढे कर्मकांड - इंग्रजी शिकतानाही. इंग्रजीचा शिक्षक झाल्यावरही काही काळ मी त्याच्या व्याकरणाच्या वाटेला शक्यतो जात नसे. ऑटो येस्पर्सन या डेनिश लेखकाची त्या व्याकरणावरील पुस्तकांनी मला त्याची गोडी लागली, आणि ती वाढत गेली. पॅर्टिजचा पूर्वी उल्लेख केलाच आहे. त्याचे English, a Course for Human Beings आणि दुसर्‍या एका लेखकाचे Grammar Without Tears अशा पुस्तकांची विनोदी वाटणारी नावेच अर्थपूर्ण आहेत. व्याकरण आणि विनोद? 'अब्रह्मण्यम्!' - असे आपले व्याकरणकार किंचाळतील. पण मराठी भाषेत अशी युती झाल्यास भाषेचे कल्याण होईल - आणि शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचेही.

व्याकरणाचे कार्य वर्तमानकालीन भाषेची व्यवस्था समजून सांगणे हे; तिच्याविषयी यावच्चन्द्र दिवाकरौ चालणारे आदेश देणे हे नव्हे, हे अशोक केळकर, कृ. श्री. अर्जुनवाडकर, यांसारख्या आधुनिक वृत्तीच्या विद्वानांनी आणखी नेटाने सांगावे!

चाफा, 'भाषेची परिवर्तनशीलता' आणि 'संकेत आणि भाषिक आक्रमण' यातले विवेचन फार छान आहे.

'व्याकरणाचे मठ्ठ माहात्म्य' हा या पानावरील अतिस्फोटक पदार्थ वाटतोय!

चाफ्या,

तू वर उद्धृत केलेले मुद्दे येऊन गेलेच आहेत. इंग्रजी शब्दांबद्दलचा नियम अजिबात जूना नाही. तो कायमच राहिला आहे. त्यामुळे 'जुने व्याकरण' या मुद्द्याला अजिबात अर्थ राहत नाही.
बाकी, 'बस' या शब्दाबद्दल मी अगोदरच तीनदा लिहिलं आहे. परत तेच इथे देण्यामागचं प्रयोजन कळलं नाही. Happy

>> तू वर उद्धृत केलेले मुद्दे येऊन गेलेच आहेत.
हो, पण आता ते 'मान्यवरांचे'/'जाणकारांचे' म्हणून आलेत.

(
>> 'बस' या शब्दाबद्दल मी अगोदरच तीनदा लिहिलं आहे. परत तेच इथे देण्यामागचं प्रयोजन कळलं नाही.
बस चं बशीत का होत नाही हे (तीनदा) लिहिलंस पण 'बसीत'/'बसेत' का होत नाही हे (एकदाही) लिहिलं नाहीस. Happy
)

<<<<'बस' या शब्दाबद्दल मी अगोदरच तीनदा लिहिलं आहे. परत तेच इथे देण्यामागचं प्रयोजन कळलं नाही.
>>>> इथले प्रयोजन या विषयाशी संबंधित मला आवडलेल्या पुस्तकांतील काही निवडक उतारे देण्याचे आहे. 'बस' या शब्दाबरोबरच डिश व ग्लास या शब्दांचे देखील उदाहरण इथे दिलेले आहे. आणि 'बसेस, डिशेस, ग्लासेस किंवा ग्लासं ही अनेकवचने प्रमाण मानली जातात' हे वाक्य चर्चेत महत्त्वाचे आहे. त्यापुढे दिलेल्या 'बे' या उसन्या उपसर्गाच्या उदाहरणाने ठराविक कालावधीनंतर बोलीभाषेत रूळलेले शब्द लेखी भाषेत सामावून घेणे कसे इष्ट ठरते हे जे सांगितले आहे ते देखील संदर्भाला धरून महत्त्वाचे वाटले म्हणून इथे दिले.

इथे हे उतारे देण्याचे प्रयोजन मला ते आवडले, पटले व इतरांनी ते वाचावेत (शक्य झाल्यास पूर्ण पुस्तकेही) असे वाटले हे आहे.

>>>> तू वर उद्धृत केलेले मुद्दे येऊन गेलेच आहेत.
<<<< अर्थातच. तसे मीही म्हटलेच आहे. पण काही मुद्दे जसे 'कानांना बरे वाटत नाही' आधी घाईघाईत अ. व अ. ठरवले गेले व तसे ते नाहीत; हे व असे प्रश्न मान्यवरांकडून/जाणकारांकडून पूर्वीही विचारले गेले आहेत किंवा उच्चार व लेखन यांतील संबंध परका नाही हा विचार नवीन नाही यासारखे 'विद्वानांचे मत' पुढे आणावेसे वाटले.

गजानन, अतिस्फोटक वाटले तरी अतिरंजित नाही हे महत्त्वाचे आहे. Wink

>>बस चं बशीत का होत नाही हे (तीनदा) लिहिलंस पण 'बसीत'/'बसेत' का होत नाही हे (एकदाही
>>लिहिलं ..

"कूस" चं कुशीत होतं की कुसीत होतं?

'नस' चं नसेत होतं की नशीत होतं?

लस चं लसीकरण होतं का? का लशीकरण?

Lol
माझ्या माहितीत (शहरी / सुविद्य इ.इ.) लसीकरणच होतं.

Happy ह्म्म्म Happy
बरं, र्‍हायलं.. नाही आम्ही शहरी सुविद्य इ. इ. .. Happy

'म्हैस'चं 'म्हशी' होतं मात्र!!! Proud शहरी गावठी सगळ्यांत! Happy

Pages