मायबोलीवर लिहिलेला गृप (Group) शब्द बरोबर आहे का?

Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22

अ‍ॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.

लोकांचं काय मत आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा वाहवली हे खरं.

तर लिंगनिश्चिती नंतर. अगोदर इंग्रजी शब्द हे मराठी शब्दांप्रमाणेच चालवले जावेत, हे महत्त्वाचं.

चर्चा संपली की इथे काय होणार आहे देवास ठाऊक :d

बापरे. बरीच चर्चा झालेली आहे. एक नजर टाकणे पुरेसे नाही, परत एकदा वाचावी लागेल.
बाकी चिनुक्स- स्वाती म्हणते तसं मला ही आयु"ष्य" च ऐकू येतं. Happy परत आत्ता लगेच ऐकून पाहिलं.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर वापरले जाणारे मराठी हे अतिशय धेडगुजरी व अशुद्ध असतं. >> हे बरोबर की
"वापरली जाणारी मराठी ( भाषा) ही .. असते " हे बरोबर. ?? >>

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर वापरले जाणारे मराठी (बोलणं) हे अतिशय धेडगुजरी व अशुद्ध असतं.
आणि वापरली जाणारी मराठी ( भाषा) ही .. असते .. त्यामुळे माझ्यामते दोन्हीही आपल्या ठिकाणी बरोबर आहेत...

>>>> 'कानांना योग्य वाटत नाही' यापेक्षा अचाट नि अतर्क्य कारण भाषाशास्त्रासंदर्भात दुसरे नसेल.
<<<< श्रद्धा, हो का? भाषा आणि कानांचा दुरान्वयेही संबंध नाही असे तुला म्हणायचे आहे का? स्वतःच्या बुद्धीला / बैठकीला विरुद्ध असलेले मत पटले नाही म्हणून ते लगेच अ. आणि अ. होत नाही. आणि तसे ते असूही शकेल पण त्या निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी तू काय विचार केला आहेस? मराठी भाषेत हजारो "मराठी" शब्द आहेत. मला फक्त १० असे शब्द दाखव ज्यांचा उच्चार ते लिहिले जातात त्यापेक्षा वेगळा आहे. मग आपण ठरवू कोणते विधान अ. आणि अ. आहे ते.

कानाचा काय संबंध हा तुझ्यासहित काही जणांना पडलेला प्रश्न. भाषा म्हणजे तोंड व कान यांच्या दरम्यान साधल्या जाणार्‍या संवादाचे साधन / दुवा. भाषेचा जन्म इथूनच झाला. बोललेले जेव्हा ऐकू येऊ लागले (केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही) तेव्हा भाषा ही विचाराच्या अभिव्यक्तीचा एक प्रमुख मार्ग ठरली. अनेक दशकांनंतर जेव्हा यात तिसरे अंग म्हणजे डोळा समाविष्ट झाले तेव्हा या अभिव्यक्तीला नवीन मार्ग सापडला. परंतु या तिन्ही अंगांमधे सुसूत्रता असणे केवळ गरजेचे नाही तर आवश्यक आहे. नाहीतर कानांना एक, डोळ्यांना दुसरे आणि बोलताना तिसरेच असा धेडगुजरेपणा व्हायचा.

मला हेसुद्धा जाणून घ्यायला आवडेल की लिपीच्या नियमांचा जन्म कसा झाला असेल असा तुझा कयास आहे? हे नियम एखाद्या बोधीवृक्षाखाली अवतरले नाहीत हे तर नक्कीच. मग हे नियम कसे ठरवले गेले? आपण कसे बोलतो, कसे ऐकतो यावरूनच ते कसे लिहितो हे ठरवले गेले असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. किंबहुना मला त्याशिवाय इतर कुठले कारण अस्तित्वात असेल असे वाटत नाही. (दुसरी काही शक्यता तुझ्या मनात असेल तर जरूर मांडावी.) मग हे कारण पुरेसे तार्किक नाही का? की अजून काही भाषाशास्त्रीय (वा!) दाखला हवा?

आधी लिहिल्याप्रमाणे देवनागरी भाषेचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे जसे लिहितो तसाच उच्चार आपण करतो. मग एखाद्या शब्दाचा उच्चार सगळ्या रुपांमधे दीर्घ असेल तर तो शब्द कुठल्याही स्वरुपात दीर्घच लिहिला गेला पाहिजे. क्रूर आणि क्रूरतेने असेच आपण लिहितो. क्रुरतेने असे नाही. पूर्णत्व / पूर्णत्वास हे आणखी एक उदाहरण. मग खुद्द मराठीत असे अपवाद असताना हे नियम बळजबरी आणि अयोग्य स्वरुपात परक्या शब्दांना लावणे कितपत तार्किक आहे?

(मी दिलेल्या चार उदाहरणांमधे मी मला दीर्घ उच्चार योग्य वाटतात असा उल्लेख केला होता. तुझ्या पोस्टमधे उच्चाराप्रमाणे लिहू नये असे मत आहे. परंतु मुळात कुठला उच्चार योग्य आहे याबद्दल उल्लेख नाही. याचा अर्थ तुलाही दीर्घ उच्चारच योग्य वाटतात असे मी गृहीत धरतो. तसे नसल्यास कृपया स्पष्ट करावे.)

आणि कपमधे चहा ओतला, टेबलवर बसून आम्ही जेवलो ही देखील योग्य रुपे आहेत. कप आणि टेबलची दोन प्रचलित रुपे देऊन इतर लाखो शब्दांच्या अप्रचलित रुपांचा आग्रह धरणे मला अतिरेकी वाटते. (अचाट आणि अतर्क्य नाही वाटत.) याबद्द्ल चिन्मयने नंतर लिहिले आहे की हे धादांत चूक आहे. पण स्वातीने आधीच म्हटल्याप्रमाणे मला पुन्हा एवढेच म्हणायचे आहे की हजारो शब्दांना जेव्हा आपण साच्यात बसवून वापरत नाही तेव्हा काही तुरळक शब्दांचा दाखला देऊन तो नियम सरसकट सर्वमान्य करणे योग्य नाही. कपमधे / कपमध्ये हे धादांत चूक ठरवण्याचा अधिकार मुळात आपल्याला नाही. आणि असला तर तो इतरांना मान्य असावा हे म्हणणे मला मान्य नाही. माफ करा, पण आम्ही कधीच "ट्रेनीतून उतर", "रिक्षीत चढ", किंवा "स्कुलीत पाठव" असल्या शब्दयोजना करत नव्हतो, करत नाही व करणारही नाही.

बाकी, कानांना गोड वाटतं म्हणून मी पेरू खाल्ली असे मी म्हणायला कुठे सांगितले आहे बरं? मी ज्या संदर्भात कानांचा (आणि तदन्वये उच्चाराचा) उल्लेख केला तो संदर्भ परकीय दीर्घ उच्चार असलेले शब्द केवळ नियमांच्या अट्टाहासाने र्‍हस्व करण्याबाबत मांडला होता. कृपया चुकीची उदाहरणे (यात लता-आशाही आल्या!) देऊन हा मुद्दा भरकटवू नये. आणि तुझे याच विषयावरील हे पोस्ट पहा:
"गृप योग्य की ग्रूप हे जाणून घेण्यासाठी मी डॉ. सत्त्वशीला सामंत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे - गृह, नृप या शब्दांचा उच्चार ग्रुह, न्रुप असा होत नाही. 'ऋ' हे अर्धव्यंजन आहे. म्हणजेच तो अर्धस्वर आहे. आपण 'ऋ'चा उच्चार सर्रास 'रु' असा करतो. हे चूक आहे.
आपण 'ग्रह' या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा आपले ओठ सपाट असतात. 'ग्रु' हा उच्चार करतो तेव्हा आपल्या ओठांचा चंबू होतो. मात्र 'गृ'चा उच्चार हा 'ग्र' व 'ग्रु' यांमधील असतो. 'गृ', 'नृ' यांचे उच्चार हे सर्वस्वी वेगळे व स्वतंत्र आहेत.
तेव्हा 'गृप' असं लिहिणं हे चूकच. ते 'ग्रूप' असंच लिहिलं जावं."

हे एकदम योग्य विवेचन आहे. शिवाय इथे "जसा उच्चार (म्हणजेच जसे कानांना ऐकू येते) तसे लेखन" हा योग्य निकष लावला गेला. तर मग अचानक तुला खालील प्रश्न कसा काय पडला?

"'कानांना योग्य वाटत नाही', हे खरंच कारण असू शकतं का?"

त्यानंतरचे हे >>>> " केवळ तुझ्या कानांना योग्य वाटत नाही, हे कारण अजिबातच संयुक्तिक नाही. तसं ते कोणी मान्यही करणार नाही." <<< अर्थात इथे फक्त माझ्या कानांचाच प्रश्न आहे हे मला अजिबातच अभिप्रेत नव्हते हे पुरेसे स्पष्ट आहे असे मी समजत होतो. माझा रोख उच्चारांकडेच (बोलल्यावर कसे ऐकू येते याकडे) होता. मला स्वतःला कसे ऐकायला आवडते याकडे नाही.

<<< इंग्रजी शब्दांची मराठीप्रमाणे रूपं चालवण्यासाठी कुठेही नियम लिहून ठेवलेला नाही. पण ती रूपं तशीच चालवली पाहिजेत, असा संकेत मात्र जरूर आहे. >>>
यातल्या पहिल्या वाक्यातून माझ्या मताला अनुमोदन दिल्याबद्द्ल धन्यवाद! संकेत असतात व ते स्थळ-काळ-वेळेनुसार बदलतात हेही म्हणणे खरेच. आणि म्हणूनच मनाची कवाडे उघडी ठेवून नियमांच्या धाकधपटशात हे संकेत न बसवता आजच्या काळातल्या सर्वमान्य लेखनाचे संकेत जरूर पाळावेत. आणि असे केल्याने वा यामुळे मराठीची हानी होत आहे ही व्यर्थ भिती बाळगण्याचे कारण नाही. त्या भितीसाठी मुळात परकीय शब्दांऐवजी मराठी प्रतिशब्द कसे रुळतील याकडे लक्ष देणे अधिक उपयुक्त ठरेल (श्रद्धाने हे मत मांडले आहेच).

आणि आता सरतेशेवटी -
ही सगळी चर्चा आहे व यात मला कोणावरही वैयक्तिक दोषारोपण करायचे नाही. किमान तसा माझा हेतू नाही. तसे कुठे वाटले असल्यास क्षमस्व. तसेच शक्य तसे, मला पटणारे मी मांडायचा प्रयत्न केला आहे, व न पटणारे नोंदवण्याचा. इथे अजून बरीच चर्चा करता येईलही परंतु मला वाटते की मी माझे मुद्दे पुरेश्या स्पष्टीकरणासहित मांडले आहेत. तेव्हा या विषयावर माझ्याकडून पूर्णविराम!

या संदर्भात जुनी पुस्तकं धुंडाळून पहायचं मनात होतं बरेच दिवस. आज त्या विचाराने परत उचल खाल्ली.

माझ्या "संशोधनाचे" हे फलित :

मौज प्रकाशनाचे न र फाटकांनी लिहिलेले लोकमान्य टिळकांवर लिहिलेले पुस्तक आहे ' लोकमान्य' . पहिली आवृत्ती १९७२ सालची असून माझ्याकडली आवृत्ती १९९९ सालातली आहे . त्यातले काही परस्परविरोधी वाटणारे दाखले
पृष्ठ १६२ " तुम्ही पुष्कळ दिवस प्लेगसंबंधात चांगले काम केले " घरासंबंधात / प्लेगासंबंधात ?
त्याच पानावर शि म पराजंप्यांच्या आठवणीत
"हायकोर्टाच्या पुढच्या बाजूच्या "
पृष्ट १६३ "गार्थ चा झगा बचावला " पार्थाचा / गार्थाचा ?
"कलकत्त्याच्या बॅरिस्टरची व्यवस्था " न्यायाधीशाची / बॅरिस्टराची ?

पृष्ट १६४
"मोल्सवर्थचा हे दोन अनुक्रमे " मोल्सवर्थाचा ?
"पीनल कोडातील "

१६५ - " तो आपल्या सॉलिसिटरला दिला " सॉलिसिटराला दिला
३०७ 'रंगूनहून बरोबर आलेल्या " कोल्हापूराहून ,रंगूनाहून ?

याच पानावर टिळकांच्या शब्दात
"गाडी पुण्यास बहुतेक राइट टाइमलाच आली असेल " टाइमालाच ?
'स्टीम लॉंचमध्यें घेउन" बोटीमध्ये /लाँचीमध्ये ?

३०८ 'युरोपात इंग्लंडने जर्मनीविरुद्ध लढाई पुकारली " इंग्लंडाने ?

३१९ "चित्रशाळा प्रेसने " प्रेसाने ?

चिं वि जोशी आरसा, काँन्टिनेन्टल प्रकाशन , प्रथमावृत्ति १९५९, माझी आवृत्त्ती २०००

पृष्ठ १००-१०१
"सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या जागा " गव्हर्न्मेंटामधल्या ?
प्रिंसिपॉलच्या खोलीसमोर " प्रिंसिपॉलाच्या ?
"कुठल्या ना कुठल्या ट्रिपला " ( कशी झाली ट्रिप या आधाराने ट्रिपीला )
"डिसेंबरचा तिसरा आठवडा " डिसेबराचा ?
"आपापल्या विषयाचं वाचन हा मात्र एजुकेशनचा " शिक्षणाचा / एजुकेशनाचा ?

या दोन पुस्तकांमधे तरी मला संकेत किंवा नियम दिसून येत नाही Happy

जियो शोनू,
फारच मस्त आणि उपयुक्त पोस्ट. हे ट्रिपाला, कोल्हापुराला, बशीतून, इंग्लंडाने हे देखीला कानाला विचित्रच वाटतात. आणि कानाचा संबंध भाषेची असतो हे माझेही मत आहे. ( चाफ्याच्या पोस्टला देखील बर्‍याच अंशी अनुमोदन).

मी अगदी येथे लिहीनार्‍यांएवढा भाषेतला तज्ञ नसलो तरी, मराठी साहित्य बर्‍यापैकी वाचले आहे. आणि बहुतांशी लेखक कोल्हापुरहून, नांदेडमध्ये असेच लिहीताना वाचले. कोल्हापुराहून वा इंग्लंडाने वा नांदेडामध्ये असे वाचले नाही. पण मायबोलीवर मात्र इंग्लंडाने सारखे शब्द खूप वाचले आहेत. मग नक्की शूद्ध काय? व्याकरणात 'नांदेडामध्ये' हा शब्द बसत असला तरी पुस्तकांत मात्र तो नांदेड मध्ये असाच वाचला आहे.

शेवटी भाषा ही व्यक्तींना असते, भाषेसाठी व्यक्ती नसतात. आणि आपल्या महाराष्ट्रात देखील भाषा बदलते. वैदर्भीय लोक, " मी जाउन राहिली, मी गेली, येउन राहलो" असे शब्द वापरतात. पुण्या-मुंबईचे लोक ह्याला अशूद्ध म्हणतात. म्हणजे नेमके शुद्ध काय? हा प्रश्न उरतोच. उदा द्यायचे झाले तर, "डौल मोराच्या मानेचा" सारखी गाणी शुद्ध मराठीत येणार नाहीत मगं, कारण त्यात येग, लक्षुमी वगैरे शब्द आहेत. (हा थोडा दुसरा मुद्दा मी मांडला आहे, पण तो भाषेच्या चर्चेत लागू होतो.)

केदार
"कानाला विचित्र" हे थोडंसं दुधारी आहे. एखाद्याला येउन राहिली, जाउन राहिली पण विचित्र वाटू शकेल, पण ते चूक नाही. ते ऐकणार्‍याच्या (अ)ज्ञानावर अवलंबून आहे. बोली भाषांचे इतके आविष्कार आहेत अन त्याबद्दल लिहिण्याइतकी माझी गती नाही. एखाद्या वाक्यात ' तुले' अन 'खोतांनु' हे शब्द आले तर एकवेळ ते काहीतरी चुकलंय हे कळेल फारतर किंवा इथे कोणी अशा बोली भाषेत काही गोष्ट/ललित लिहिलं तर थोडं फार कळतं येवढंच ( तरी हुंडाळी धुंडाळी पोरगी मधले सगळे शब्द डॉक्टर सूस च्या बनावट शब्दांसारखे वाटले होतेच )

पण लेखी, पुस्तकी भाषा, ती सुद्धा न र फाटकांच्या पुस्तकातली, चिं वि जोशी , पु ल देशपांडे, अवचट, दुर्गाबाई यांच्या सारख्यांच्या लेखनातली भाषा ( एखाद्या व्यक्तिरेखेच्या तोंडचे संवाद सोडून ) ही मी तरी प्रमाण मानते. यातच मला परस्परविरोधी उदाहरणे आढळली . मग संकेतांचं पालन झालेलंही दिसत नाही अन नियम असेल असं वाटणं तर दूरच.

माझ्या कामाच्या ठिकाणी, मी इथे शिकलेल्या विद्यापीठात 'स्ट्रॉंगली अर्ज' किंवा ' स्ट्राँगली सजेस्ट' असा वाक्प्रचार वरिष्ठ किंवा प्राध्यापक मंडळी वापरतात. तसं फार तर म्हणता येईल. पण त्यात सुद्धा 'ट्रिपीला जाऊया का ?' वगैरेचं काय ?

टेबलवर, कपमध्ये ही रूपं योग्य वाटत असतील, व्याकरणाचे नियम पाळायचे नसतील, काही ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, संपादक, लेखक यांच्या मतांकडे दुर्लक्ष करायचे असेल तर मग बोलणेच खुंटले.
ही सर्व भाषिक मोडतोड फ्रेंच, जपानीत करण्याचा प्रयत्न फ्रेंचभाषिक / जपानीभाषिक होऊही देणार नाहीत, हेही लक्षात ठेवावे.

परकीय भाषांमधून मराठीमध्ये शब्द आयात करण्यापुर्वी त्यांची सोनोग्राफी करावी का? असे करणे प्रचलित कायद्यानुसार बेकायदेशीर तर ठरणार नाही ना? Proud

परकीय भाषेतून आयात झालेल्या शब्दांची लिंगनिश्चिती सापेक्ष आहे असे मान्य केले तर प्रत्येक मनुष्यास स्वतःच्या मताप्रमाणे अश्या शब्दांचे लिंग ठरवण्याचा अधिकार आहे असे मान्य करावे लागेल. (सुदैवाने व्याकरणात तीनच लिंगे अस्तित्वात आहेत. नाहीतर किती गहजब माजला असता.) पण एकदा अश्या शब्दाचे लिंग कोणते हे निश्चित झाले (त्या त्या वाक्यात) की मग मात्र तो शब्द व्याकरणाच्या नियमाप्रमाणेच चालवावा. तिथे अपवाद असु नयेत. आजच्या घडीला मूळ मराठी शब्द चालवतानादेखील काहीवेळा अपवाद दिससात हे स्पष्टिकरण अयोग्य वाटते.

जपानी आणि फ्रेंच लोक असे करणार नाहीत पण कदाचित जर्मन किंवा माओरी लोक करु देतील. तेव्हा जपानी लोक अशी मोडतोड करुन देत नाहीत म्हणुन आपणदेखील करायची नाही हा युक्तिवाद अतार्कीक आहे. (माझ्या माहितीप्रमाणे जर्मन आणि कोरियन लिप्या ह्या गेल्या काही शतकांमध्येच पुनर्रचित करुन उच्चाराप्रमाणे लिखाण ह्या पद्धतीमध्ये आणलेल्या आहेत. ही माहिती चुकीची असल्यास तसे निदर्शनास आणावे.)

टण्या,

लिंगनिश्चिती हा मुद्दा नंतरचा. परभाषिक शब्द हे मराठी शब्दांप्रमाणे चालवावेत, हे तर तुला मान्य आहे ना?
आणि मराठी शब्दांतील अपवाद हे स्पष्टीकरण नव्हे. ती रूपे वेगळी का आहेत (आर्फीचे पोस्ट) याचे ते उत्तर आहे. 'बशीत चढलो' हा वापर का होत नाही. याचे ते उत्तर आहे.
शिवाय इथे उच्चारांचाही संबंध बादरायणी आहे. एकदा परभाषी शब्द मराठीत आले, की त्यांना मराठीचेच नियम लावले गेले पाहिजेत, असा झाडून समस्त भाषातज्ज्ञांनी निर्वाळा दिला असता, 'उच्चार योग्य वाटत नाहीत', हे अस्थानी ठरतं.
जपानी, फ्रेंच या भाषा मी गेली अनेक वर्षं शिकतो आहे. त्या भाषेतील व्याकरणाचे नियम, संकेत यांचं पालन कसोशीने केले जाते. पण म्हणूनच आज या दोन्ही भाषा जिवंत, रसरशीत आहेत. तिच अपेक्षा मी इथेही व्यक्त करतो.

सुरुवातीपासूनच 'इंग्रजी शब्द मराठी शब्दांप्रमाणे चालवावेत की नाही' हा मुद्दा आहे. लिंगनिश्चिती दुय्यम आहे. तसे काहीच नियम नाहीत, हेही मी स्पष्ट केलेच आहे.

चाफा, स्वाती, शोनू, केदार,फ, श्रद्धा,

श्री. अशोक केळकर, डॉ. स्वाती कर्वे, प्रा. यास्मीन शेख, डॉ. सत्त्वशीला सामंत, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. रा. चिं ढेरे, डॉ. पुंडे या मराठीतील जाणकार व्यक्तींना मी या सर्व चर्चेचा गोषवारा सांगितला. त्यांच्या मते -

१. इंग्रजीतून जेव्हा मराठीत शब्द आयात केले जातात, तेव्हा ते मराठीतील नियमांनुसारच चालवले गेले पाहिजेत.
२. 'सून- सुनेला' या नियमानुसार दीर्घ उच्चार र्‍हस्व करावेत. अपवाद, विशेषनामे. (मात्र, 'मौज' प्रकाशनाच्या पुस्तकांत हा नियम पाळला जात नाही. 'गाडगिळांना' असा प्रयोग ते करतात. )
३. विभक्ती प्रत्यय जोडताना इंग्रजी शब्दांची रूपे ही मराठी रुपांप्रमाणेच चालवावीत.
४. इंग्रजी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांची लिंगनिश्चिती करण्यासाठी नियम नाहीत. तसेच ते मराठी शब्दांसाठीही नाहीत. संकेतानुसार ठरलेल्या लिंगांचा वापर केला जातो.
या नियमांचे पालन करताना उच्चारांचा संबंध कुठे व कसा येतो, हे मला व वर उल्लेखलेल्या जाणकारांना कळलेले नाही.
या सर्व जाणकारांच्या मते 'कपमधे', 'टेबलवर' ही रुपे अशुद्धच आहेत. शिवाय हल्ली सर्रास वापरला जाणारा 'मधे' हा प्रत्ययही चूक. 'मध्ये' हाच प्रत्यय वापरला जावा.

अर्थात, या मंडळींच्या मतांना किती किंमत द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. हीच मते मी अगोदरही मांडलेली आहेत. वरील मंडळींशी संपर्क साधून मी खातरजमा करून घेतली आहे.

मात्र अशुद्ध रुपं हीच शुद्ध असं समजून जर भाषा वापरायची असेल, तर काहीच इलाज नाही.
मुळात, भाषा अथवा विज्ञानासंबंधी चर्चा करताना 'मला योग्य वाटत नाही', किंवा ' तशी सवय नाही' ही कारणं असूच शकत नाहीत. मग 'जणगनमण', 'तण मण धण' हे एखाद्याला योग्य वाटले म्हणून त्या भाषेला शुद्ध म्हणायचे का?

श्री. अशोक केळकर यांनी मला काही पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत. पुढील आठवड्यात साहित्य संघात अथवा भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिरातून ती मिळवून मी अचूक संदर्भ देऊ शकेन.

जाता जाता, लताच्या उच्चारांविषयी. तो उच्चार चूक आहे, हे खुद्द हृदयनाथ मंगेशकर व ग्रेस यांनी 'जणू अंगी राघवशेला' या कार्यक्रमात सांगितले आहे.

आणि, ही चर्चा 'इंग्रजी शब्द मराठीप्रमाणे चालवावेत का?' यासंदर्भात आहे. लिंगनिश्चितीचा व उच्चारांचा संबंध नाही.

श्रद्धा, हो का? भाषा आणि कानांचा दुरान्वयेही संबंध नाही असे तुला म्हणायचे आहे का? स्वतःच्या बुद्धीला / बैठकीला विरुद्ध असलेले मत पटले नाही म्हणून ते लगेच अ. आणि अ. होत नाही.<<<<<<<<<<

मी ते 'माझ्या' बुद्धीला पटत नाही म्हणून केलेले विधान नाही. भाषेच्या वापराला 'कानांना योग्य न वाटणे' अशाप्रकारचा निकष लावला गेलेला पाहून केलेले विधान आहे. कारण इथे माझे/तुझे किंवा कुणाचेही मत यापेक्षा व्याकरणविचार महत्त्वाचा आहे. (बरं आता यावर 'व्याकरणविचार का म्हणून इतका श्रेष्ठ मानायचा?' असेही कुणी म्हणेल, तर त्यावर त्या व्यक्तीला माझा साष्टांग नमस्कार.)

कप आणि टेबल सोडले तरी अजून बरेच शब्द आहेत. 'कोकणात जाताना बोटीतून आम्ही गेलो' यातला बोट हा शब्द मूळ इंग्लिश आहे, याचाही विसर पडण्याइतपत तो मराठीत त्याच्या विकारी रुपांसकट रुळलेला आहे. 'पेन्सिलीला टोक केले', 'रबरी पिशवीत हवा भरली', 'रबराचे मळे' वगैरे असंख्य उदाहरणे देता येतील. त्यामुळे कप/टेबल हे दोनच जास्त प्रचलित व्याकरणानुसार चालवले जाणारे शब्द आहेत, हा मुद्दा निकाली निघतो.

तुझ्या वरच्या संपूर्ण पोस्टात कुठेही व्याकरणाचा कुठलाही नियम किंवा कुणी मराठी भाषातज्ज्ञाने सुचवलेला संकेत (जसे की 'नवीन शब्द भाषेत रुळवताना त्याचे रूप ऐकण्यास सुसह्य असावे.' वगैरे) उद्धृत केलेला दिसत नाही. याबद्दल कुणा व्याकरणतज्ज्ञाशी तू चर्चा केलेली असल्यास त्यातले मुद्दे जरूर जाणून घ्यायला आवडेल.

लिंगनिश्चितीबद्दल:
गजानन देसायांनी लिहिल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे समांतर वस्तूचे लिंग आरोपले जाते. यात बोलीनुसार काही तफावती असू शकतात. पण एकदा लिंगनिश्चिती केल्यावर त्याची प्रत्येक विभक्तीनुसार योग्य ती रुपे वापरणे इष्ट. मराठीतही अशी उदाहरणे आहेत की. जे लोक 'ती लसूण' म्हणतात, ते 'लसणीची चटणी' असे रूप वापरतात; जे लोक 'तो लसूण' म्हणतात, ते 'लसणाची चटणी' म्हणतात.
बाकी मुळातली चर्चा 'ग्रूप' या अगोदरच पुल्लिंगी म्हणून लिंग निश्चित झालेल्या शब्दाबद्दल चालू होती. 'ग्रुपाचे लिंग योग्य नाही' असा मुद्दा असल्यास किंवा/व इतर शब्दांच्या लिंगनिश्चितीबद्दल चर्चा करण्यासाठी एखादा नवीन बा फ सुरू करणे योग्य.

पुस्तकांतल्या विसंगत्यांविषयी:
दोन लेखकांच्या व्याकरणविषयक जाणिवांमध्ये फरक असू शकतो. सध्या वाचत असलेल्या 'पर्व' या सौ. उमा कुलकर्ण्यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकात तर एकाच पानावर एकाच शब्दाची 'व्याकरणानुसार योग्य' आणि 'व्याकरणानुसार अयोग्य' अशी दोन्ही रुपे आहेत.

पर्व: पान नं. २८०

उग्रसेनाच्या बायकोची दासी 'चित्रा' हिला सात्यकी भेटायला जातो तेव्हाच्या प्रसंगात;

"चित्राचं घर कुठलं?" असे व्याकरणदृष्ट्या अयोग्य रूप

आणि याच पानावर पुढे

"डाव्या हाताच्या बोटातली सोन्याची अंगठी चित्रेच्या हातात देत" असे व्याकरणदृष्ट्या योग्य रूप अशी दोन्ही उदाहरणे आढळतात.
(याला 'मुद्रितशोधनात राहून गेलेल्या चुका' वगैरे कारणे असू शकतात.)

त्यामुळे असे लेखन मूलाधार मानण्याऐवजी व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शब्द वापरले जावेत, हे योग्य आहे.

कुठल्याही भाषेत इतर अनेक भाषांतून शब्द येऊन मिसळतात. खुद्द मराठीनेही फारसी, संस्कृत भाषांमधून बरेच शब्द घेतले आहेत. आणि त्या शब्दांना मराठीचे व्याकरणनियम लावून वापरात आणले आहे. प्राथमिक उदाहरण द्यायचे झाले तर 'देव' या अकारान्त पुल्लिंगी संस्कृत शब्दाचे मराठीत येताना अनेकवचन संस्कृताप्रमाणे 'देवा:' होत नाही. आणि आधी दिलेल्या उदाहरणानुसार इंग्लिशीत नव्याने दाखल झालेल्या 'पंडित', 'गुरु' या शब्दांना इंग्लिशीने आपले व्याकरणनियम लावूनच ताफ्यात दाखल करून घेतलेले दिसते. यावरून आपापल्या भाषेच्या नियमांप्रमाणे शब्द चालवणे (मग तो कुठल्याही भाषेतून का आलेला असेना), ही प्रचलित रीत आहे, हे मान्य करण्यास हरकत नाही.

व्याकरणाचे नियम माहीत नसताना या चुका होणे शक्य आहे, तशा त्या माझ्याकडूनही झाल्या आहेत, पण नियम कळल्यावरही ते अमान्य करणे, व्याकरणाचा अभ्यास केलेल्या लोकांची योग्य मतेही डावलणे, असे चालू राहणार असेल तर 'देव मायबोलीचं भलं करो' असे म्हणावेसे वाटते.

ही चर्चा 'इंग्रजी शब्द मराठीप्रमाणे चालवावेत का?' यासंदर्भात आहे. लिंगनिश्चितीचा व उच्चारांचा संबंध नाही. >>>>>>

सॉरी.. पण जरा बेसिक प्रश्ण.. ! एखाद्या शब्दाचे लिंग निश्चित झाल्याशिवाय तो चालणार कसा???
e.g. ते टेबल आणि ती बस ह्यांचे विभक्ती प्रत्यय वेगवेगळे असतात ना? मग ते चालवण्यासाठी "ते" किंवा "ती" हे ठरवायला नको का?

ठरवायला हवंच.. पण आधी ते शब्द तसे चालावेत हे मान्य व्हायला हवं.. लिंगनिश्चितीसंदर्भात ही चर्चा माझ्या मते भरकटतेच आहे. आणि लिंगनिश्चितीचे नियमच नाहीत, केवळ संकेत आहेत. त्यावर काय काथ्याकूट करणार?

>> कानांना योग्य वाटत नाही
हे विधान करण्याआधी एखादा शब्दप्रयोग "कानांना योग्य का वाटतो" याचा विचार करणे योग्य ठरेल. तुम्ही एखादी भाषा शिकता ते साधारणत: दोन मार्गांनी १. ऐकून आणि २. वाचून/शिकून. यांत, अर्थातच, दोन्हींचे एकत्रीकरणही होते. म्हणजे तुम्ही प्रथम ती भाषा ऐकता आणि मग त्याच्या नियमांचा अभ्यास करता किंवा त्याउलट पद्धतीने, कुणी त्या भाषेचा अभ्यास सुरू करेल आणि त्यानंतर किंवा बरोबरीनेच त्या भाषेच्या नियमांचे, व्याकरणाचे मार्गदर्शन त्या व्यक्तीला मिळेल.
सर्वसाधारणपणे आपण आपली मातृभाषा पहिल्या पद्धतीने शिकतो. आसपासच्या सर्व व्यक्ती भाषेच्या नियमांचे, व्याकरणाचे ज्या पद्धतीने पालन करीत असतील त्याच निकषांवर आपण आपल्या शब्दांची, वाक्यांची घडण ठेवतो.
एखादं लहान मूल जेव्हा "चिमण्या उडून गेल्या" म्हणतं तेव्हा त्याला चिमण्या हे चिमणीचे अनेकवचन आहे हे कुणी व्याकरणाचे नियम सांगून शिकवत नसतं तर स्वतः ते नियम पाळून त्या व्यक्ती त्या मुलीचे/मुलाचे "कान तयार" करत असतात. जर घरात किंवा आपल्यावर भाषेचे संस्कार जिथे होतात त्या वातावरणातच व्याकरणाचे नियम पाळले जात नसतील किंवा ते नियम त्या बोलीभाषेत वेगळे असतील तर त्यांत गैर काहीही नाही पण ते व्याकरणदृष्ट्या योग्यच आहे असा अट्टाहास धरणं माझ्या मते चुकीचं आहे.

उदाहरणार्थ: एखादी स्त्री जेव्हा "मी बाजारात जातें" असे वाक्य म्हणते तेव्हा "जाणे" या क्रियापदाचा "जाते" असा कर्तरी प्रयोग व्याकरणदृष्टया योग्य आहे. पण कोल्हापूर भागांत स्त्रिया सर्रासपणे "मी बाजारात जातो" असा प्रयोग करतात. हे व्याकरणदृष्ट्या अयोग्य असूनदेखील जर अशा स्त्रीला "मी जातें" असा शब्दप्रयोग योग्य आहे असं सांगितलं तरी तिच्या "कानाला" ते योग्य वाटणार नाहीच. कारण त्यांच्या भाषेवर मुळात व्याकरणदृष्ट्या संस्कार चुकीचा आहे. यांत ती भाषा चुकीची आहे असे म्हणण्याचा हेतू नाही पण मराठी भाषेच्या प्रचलित व्याकरणाच्या नियमांत ते बसत नाही. आता यांच भागातल्या अलिकडच्या काळांतल्या मुली/स्त्रिया भाषेचे योग्य रुप वापरताना दिसतांत. त्या "मी बाजारात जातें" असेंच म्हणतील आणि त्याला कारण भाषेचे कालपरत्वे बदललेले ऐकीव संस्कार हेच आहे.

तेव्हा कानाला योग्य वाटणे हा मुद्दा देशकालसापेक्ष आहे आणि त्यामुळेच असा निकष नवीन शब्दांचे व्याकरण ठरविताना लागू होऊ शकत नाही हा मुद्दा ध्यानात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

>>माफ करा, पण आम्ही कधीच "रिक्षीत चढ" असल्या शब्दयोजना करत नव्हतो, करत नाही व करणारही नाही.<<
(हे आम्ही कोण बुवा?! जे कोणी असोत, ते असो.)
"रिक्षीत चढ" असल्या शब्दयोजना कोणीच करणार नाही Lol .. कारण, '(ती) रिक्षा' या आकारान्त स्त्रीलिंगी नामाचं सप्तमी एकवचन 'रिक्षेत' असं होईल. समजा, कोणी आकारान्त पुल्लिंगात रिक्षा हे नाम चालवलं, तर 'रिक्ष्यात' असं होईल. Happy

अ‍डमा, तू मांडलेल्या मुद्द्यासाठी : तुझ्या पोस्टीच्या वरच्याच पोस्टीत असलेला
>>>>>>>>>>
बाकी मुळातली चर्चा 'ग्रूप' या अगोदरच पुल्लिंगी म्हणून लिंग निश्चित झालेल्या शब्दाबद्दल चालू होती. 'ग्रुपाचे लिंग योग्य नाही' असा मुद्दा असल्यास किंवा/व इतर शब्दांच्या लिंगनिश्चितीबद्दल चर्चा करण्यासाठी एखादा नवीन बा फ सुरू करणे योग्य.
<<<<<
हा मुद्दा वाचला नाहीस का?

>>>श्री. अशोक केळकर, डॉ. स्वाती कर्वे, प्रा. यास्मीन शेख, डॉ. सत्त्वशीला सामंत, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. रा. चिं ढेरे, डॉ. पुंडे या मराठीतील जाणकार व्यक्तींना मी या सर्व चर्चेचा गोषवारा सांगितला. त्यांच्या मते -<<<
चिनूक्सा या तुझ्या संपूर्ण पोस्टीबद्दल आणि क्षा, तुमच्या योग्य आणि नेमक्या पोस्टीबद्दल : भले शाब्बास!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

बरं, माझ्या अल्पमतीनुसार, मला इतकं समजलं की मी 'ते' पेन असं म्हणत असेन, तर पेन या शब्दाला येणारे सर्व प्रत्यय मी नपुसकलिंगी वापरावेत, 'तो' पेन म्हणत असेन, तर पुल्लिंगी. म्हणजे माझ्यापुरतं मी कोणा परभाषिय शब्दाला 'तो, 'ते' किंवा 'ती' केलं, तर किमान त्याच्याशी प्रामाणिक राहून पुढचे विभक्तीप्रत्यय तरी त्याप्रमाणे वापरावेत. बरोबर ना? Happy

(टण्यानेही थोडेबहुत वर हेच लिहीले आहे- परकीय भाषेतून आयात झालेल्या शब्दांची लिंगनिश्चिती सापेक्ष आहे असे मान्य केले तर प्रत्येक मनुष्यास स्वतःच्या मताप्रमाणे अश्या शब्दांचे लिंग ठरवण्याचा अधिकार आहे असे मान्य करावे लागेल. (सुदैवाने व्याकरणात तीनच लिंगे अस्तित्वात आहेत. नाहीतर किती गहजब माजला असता.) पण एकदा अश्या शब्दाचे लिंग कोणते हे निश्चित झाले (त्या त्या वाक्यात) की मग मात्र तो शब्द व्याकरणाच्या नियमाप्रमाणेच चालवावा. तिथे अपवाद असु नयेत.)

चिनूक्स, फ, मस्त चर्चा! थोडक्यात, शब्दाचं लिन्ग ठरवण्याचे जरी निश्चित नियम नसले तरी जे लिंग आपण ठरवतो त्याप्रमाणे शब्द चालायला हवेत हे मला तरी पटलं. लक्षात ठेवेन अन इतरांनाही सांगेन आता. Happy
ही चर्चा वेगळ्या ठिकाणी हलवायला हवी.

अरुणा ढेरे यांच्या पुस्तकातच कोल्हापूरच्या, पॅरिसहून, ग्वाल्हेरला असे शब्द छापलेले आहेत. ( माणूस आणि माती, नवचैतन्य प्रकाशन , प्रथमावृत्ती २००४ )

दुर्गा भागवतांच्या पैस मधे सेंट थॉमस कॅथीड्रल च्या दारी, ऑर्गनच्या संगीताचे असे शब्द आहेत ( ख्रिस्त संगत, मौज प्रकाशन ).

गोविंद तळवलकरांच्या अभिजात मधे अनेक इंग्रजी शब्द जसेच्या तसे लिहून त्यांना प्रत्यय लावलेले आहेत.

मं वि राजाध्यक्ष भाषाविवेक मधे
कोल्हापूरच्या दक्षिणेला व आग्नेयीला ( ५९ ) असं आहे. ( इथे आग्नेयेला हवं होतं का )
एलफिंस्टनच्या उंटाची ( ३७ )
टाइम्स चे राजकारण ( २४) असे उल्लेख आहेत .

टिळकांच्या प्रसिद्ध अग्रलेखात देखील "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?" असेच होते ना ?

चिनूक्सने वर ज्यांचे दाखले दिलेत त्यातील कोणाचीही पुस्तके माझ्याकडे नाहीत. कोणाकडे असतील तर त्यात शोधून पहाता येईल का ?

व्याकरणाचे नियम पाळायचे नसतील, काही ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, संपादक, लेखक यांच्या मतांकडे दुर्लक्ष करायचे असेल तर मग बोलणेच खुंटले >> त्यातल्या किती जणांनी स्वतःच्या लेखनात त्या मतांचा आदर केला आहे याला काहीच महत्व नाही का ?

चिनूक्स,
>>>या सर्व जाणकारांच्या मते 'कपमधे', 'टेबलवर' ही रुपे अशुद्धच आहेत. शिवाय हल्ली सर्रास वापरला जाणारा 'मधे' हा प्रत्ययही चूक. 'मध्ये' हाच प्रत्यय वापरला जावा.

'मधे' ऐवजी 'मध्ये' असावं हे पटलं. पण 'कपमध्ये चहा ओतला' ऐवजी 'कपात चहा ओतला' हे बरोबर आहे असं म्हणालास. पण 'टेबलवर पुस्तकं ठेवली' ऐवजी काय बरोबर? ह्यावर मागच्या पानांवर चर्चा झालीये पण आता ते परत वाचून काढायचा कंटाळा आलाय म्हणून पुन्हा एकदा बहुतेक त्याच संदर्भात प्रश्न विचारतेय.

<चिनूक्सने वर ज्यांचे दाखले दिलेत त्यातील कोणाचीही पुस्तके माझ्याकडे नाहीत. कोणाकडे असतील तर त्यात शोधून पहाता येईल का ?
<>>
शोनू,
तुला योग्य ते नंबर पाठवतो, ही खात्री तूही करून घेऊ शकतेस.

'टेबलावर/मध्ये/चा' इ. ही रुपे शुद्ध आहेत.

अर्र, चिनूक्स, त्यांच्या मतांविषयी शंका नाही रे. त्यांनी तुला सांगितलेलं तू इथे जसं च्या तसं कळवशील याची पण खात्री आहे. पण हे सर्व लेखक, संपादक, टीकाकार वगैरे स्वतःच्या लेखनात हे नियम कितपत पाळतात याची शंका आहे. अरुणा ढेरे, गोविंद तळवलकर , मं वि राजाध्यक्ष, दुर्गा भागवत यांच्या लेखनात मला तरी अनेक जागी या नियमांचं उल्लंघन दिसलंय म्हणून हा प्रपंच.

अर्थात माझ्या या शंकेचा विपर्यास असाही करता येतो की अमूक तमूक थोर लेखक किंवा लेखिका सिगरेट ओढत, जुगार खेळत म्हणुन मी पण ते करणे क्षम्य आहे

श्री. अर्जुनवाडकर व लीला गोविलकर यांनी लिहिलेल्या व्याकरणविषयक पुस्तकांत परभाषेतून आलेल्या शब्दांविषयीचे नियम सांगितले आहेत, असं मला डॉ. वि.भा. देशपांडे यांनी सांगितलं आहे. 'व्यवहारात आपण हे नियम पाळत नाही, पण ते चूक आहे', असं अर्थातच त्यांचं मत आहे. ही दोन्ही पुस्तकं मला त्यांच्याकडून मंगळवारी मिळतील.
हे नियम कुठेही लिहिलेले नाहीत, असा माझा समज होता. पण आता या पुस्तकांत नक्की काय नियम आहेत, ते बघता येईल.

चिनूक्सचे (विविध साहित्यिकांचे) आणि फ चे आणी क्ष चे पोस्ट आवडले. Happy

बर आता 'चिनूक्सचे' आणि 'चिनूक्साचे' देखील बरोबर आहेत असे वाटते. पण शुद्ध फक्त 'चिनूक्साचे' होइल. मग ह्यावेळी काय करायचे? काही साहित्यीक चिनूक्सचे वापरु शकतात.

मग 'जणगनमण', 'तण मण धण' हे एखाद्याला योग्य वाटले म्हणून त्या भाषेला शुद्ध म्हणायचे का? >> चिनूक्सा हे उदा. सदर चर्चेसाठी योग्य नाही. कारण शब्द तेच नाहीत. Happy

कानाला विचित्र" हे थोडंसं दुधारी आहे. एखाद्याला येउन राहिली, जाउन राहिली पण विचित्र वाटू शकेल, पण ते चूक नाही >> मला तेच तर म्हणायचे आहे. विदर्भात जर लोक जाउन राहिली म्हणतात, तर त्या समुदायासाठी ते बरोबर आहे, आणि त्यांची भाषा म्हणून ते स्विकारले जावे. Happy (भाषेची तोडफोड स्विकारली जावी असे माझेही मत आहे. २०० वर्षांपुर्वीची मराठी वेगळी होती, आजची वेगळी आहे. ही तोडफोड आपणही स्विकारलेली आहे. ( ज्ञानेश्वरांच्या वेळी तर ती अजुन वेगळी होती.) (टण्याचा मुद्दा विचार करण्यासारखा ह्यामूळेच आहे.)

पण हे सर्व लेखक, संपादक, टीकाकार वगैरे स्वतःच्या लेखनात हे नियम कितपत पाळतात याची शंका आहे. >> मलाही तसेच वाटते. लिखाणाच्या वेळेस एक शब्द कसा चालवला, तसाच प्रत्येकवेळी तो चालेल असे वाटत नाही. वर तू उदाहरण दिले आहेत.

श्रद्धा, निदान मी तरी कानांचा मुद्दा अश्यासाठी हो म्हणालो, की बरेचदा ऐकून सवय असतेच. आणि म्हणूनच मी ते 'डौल मोराच्या' चे गाणे लिहीले. मग ते बर्‍याच साहित्यींकाच्या दृष्टीने अशुद्ध भाषेच्या नमुना होतो. पण परत माझा मुद्दा हाच आहे की, तीच भाषा ही जनमान्य आहे, आणि इथेच टण्याचे जर्मनचे उदा. लागू होते, त्यांनी तोडफोड मान्य करुन जर्मन सुधारली. दुसरे उदा की इंग्लीश ही भाषा देखील इंग्लडसाठी वेगळी आणि अमेरिकेसाठी वेगळी आहे. ती वेगळी का ह्याचा विचार केला तर परत माझा मूळ मुद्दा लागू होईल असे वाटते.

तर पेन या शब्दाला येणारे सर्व प्रत्यय मी नपुसकलिंगी वापरावेत, 'तो' पेन म्हणत असेन, तर पुल्लिंगी >> नेमकी चर्चा ह्याचवर चालू आहे. की 'ते' म्हणावं की 'तो'. म्हणजे लिंगनिश्चीती. पण ही करणार कोण? तर त्या त्या वेळेस ज्यांनी प्रथम वापरले ते लेखक. मग त्यांचेच प्रमान वापरणे किती योग्य?
'इ मेल आली' असे लोक सर्रास वापरतात पण मी व माझ्यासहित बरेच लोक ' इ मेल आलं" अस नपुसकलिंगी वापरतात. आणि मराठी पुस्तकांत मी दोन्ही ' न आणि स्त्री' असे वाचले आहे. त्यामूळे सामान्य वाचक व (सामान्य लेखक) ह्यांचा साठी हा प्रश्न उरतोच. जो निदान आत्तातरी आपण सोडवू शकत नाही. कारण त्यासाठी भाषासुधारकमंडळाने पुढाकार घ्यायला हवा. (असे मंडळ आहे, पण एकमत नाही. त्यांना माबोवर पाचारन करावे काय?) Happy

<नेमकी चर्चा ह्याचवर चालू आहे. की 'ते' म्हणावं की 'तो'. म्हणजे लिंगनिश्चीत<>

नाही केदार. मूळ मुद्दा आहे तो परभाषेतून आलेल्या शब्दांना मराठीतील प्रत्यय लावावेत की नाही, हा.
'ग्रूपमध्ये' / 'ग्रुपामध्ये' यांपैकी कोणता शब्द योग्य हा वादाचा मुद्दा आहे.
हे प्रत्यय लावायचे असल्यास ते कसे लावावेत यासाठी लिंगनिश्चिती आवश्यक ठरते. पण इथे इंग्रही शब्द मराठी शब्दांप्रमाणे चालवावेत, हेच अनेकांना मान्य नाही.

डॉ. लिला गोविलकर यांच्या मते, फारसी, अरबी,इंग्रजी, इत्यादी परक्या भाषांतून आलेल्या शब्दांबद्दल कोणताही निश्चित नियम सांगता येत नाही. कचेरी(स्त्री),हपिस(नपु.)
काही शब्द दोन-तीन लिंगीही आढळतात कार्ड (पु.,स्त्री., नपु.)

जो शब्द एका भाषेत पुल्लिंगी आहे, तो दुस-या भाषेत स्त्रीलिंगी किंवा याच्या उलट असे का, याचे उत्तर मिळू शकत नाही. एखाद्या विशिष्ट शब्दामध्ये कठोरता जाणवली असेल, म्हणून तो शब्द त्या भाषेत पुल्लिंगी व दुस-या एखाद्या भाषेमध्ये त्या विशिष्ट शब्दात मृदुता जाणवली असेल म्हणून त्या भाषेत तो शब्द स्त्रीलिंगी समजला जात असेल.

संदर्भ : मराठीचे व्याकरण: डॉ. लिला गोविलकर

Pages