Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22
अॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.
लोकांचं काय मत आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आर्फीला
आर्फीला अनुमोदन. मी पण ही सूचना ('ग्रूप' पाहिजे, गृप' बरोबर वाटत नाही) मागे एकदा टाकली होती पण ती वाहून गेली
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
लालूला
लालूला पूर्ण अनुमोदन. इंग्रजी उच्चारानुसार ग्रुप असाच शब्द हवा. ग्रूप किंवा गृप नको. कारणे तिने दिलेलीच आहेत.
शरद
नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!
कृपया
कृपया यातिल फरक पहा
कृतान्त = अक्रुर
गृहपाठ = ग्रहगणित
अकार आणि उकार यान्च्या दरम्यानच्या काहीएक उच्चारासाठी कृ गृ इत्यादी वापरले जात असावे
मात्र जेथे अकार किन्वा र्ह्स्व वा दीर्घ उकार अपेक्षित आहे तेथे मात्र क्रूर ग्रह असे वापरले जात असावे
चू. भू. दे. घे.
गृप या शब्दाला पर्यायी मराठी शब्द मिळाल्यास तोच वापरावा असेही वाटते
कम्पू हा शब्द त्यासाठी चपखल बसतो असे वाटते
...;
आपला, लिम्बुटिम्बु
गृप योग्य
गृप योग्य की ग्रूप हे जाणून घेण्यासाठी मी डॉ. सत्त्वशीला सामंत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे -
गृह, नृप या शब्दांचा उच्चार ग्रुह, न्रुप असा होत नाही. 'ऋ' हे अर्धव्यंजन आहे. म्हणजेच तो अर्धस्वर आहे. आपण 'ऋ'चा उच्चार सर्रास 'रु' असा करतो. हे चूक आहे.
आपण 'ग्रह' या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा आपले ओठ सपाट असतात. 'ग्रु' हा उच्चार करतो तेव्हा आपल्या ओठांचा चंबू होतो. मात्र 'गृ'चा उच्चार हा 'ग्र' व 'ग्रु' यांमधील असतो. 'गृ', 'नृ' यांचे उच्चार हे सर्वस्वी वेगळे व स्वतंत्र आहेत.
तेव्हा 'गृप' असं लिहिणं हे चूकच. ते 'ग्रूप' असंच लिहिलं जावं.
मात्र डॉ. सामंत यांच्या मते, "तुमचं संकेतस्थळ मराठी आहे ना? मग इंग्रजी शब्द कशाला? तुम्ही गट, समूह हे शब्द वापरू शकता. ग्रूप हा शब्द काही पेन, टेबल या शब्दांसारखा मराठीत रुळलेला नाही. तेव्हा तो शब्द वापरणं बंधनकारक नाही. आता आपण बरेच इंग्रजी शब्द वापरतो, पण आपण सुशिक्षित आणि फ्याशनेबल आहोत, हे दाखवण्यासाठी आपण तसं बोलतो. तुम्ही मराठी शब्दांचा आग्रह धरायला हवा."
डॉ. अरुणा ढेरे व प्रा. यास्मीन शेख यांनीही वरीलप्रमाणेच मत व्यक्त केले आहे. (लालू यांनी पूर्वीच हे लिहिले होते)
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
उपयुक्त
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
----------------------
एवढंच ना!
>>'ऋ' हे
>>'ऋ' हे अर्धव्यंजन आहे. म्हणजेच तो अर्धस्वर आहे.
चिनूक्साच्या लेटेस्ट पोस्टीतली माहिती योग्य आहे. डॉ. सामंतांनी, अरुणा ढेर्यांनी, यास्मिन शेखांनी नोंदवलेली मतं अॅडमिनांनी जरूर विचारात घ्यावीत.
ऋ आणि लृ हे संस्कृतात (आणि पर्यायानं देवनागरी लिपीत) अर्धस्वर म्हणून वापरले जात. मराठी, कोकणी (आणि हिंदी, बंगाली वगैरे) संस्कृतोद्भव भारतीय भाषांमध्ये आणि तमिळ, कन्नड, तेलुगू वगैरे द्रविडभाषाकुळातल्या भारतीय भाषांमध्ये वैदिक/पौराणिक काळापासून साहित्यिक-सांस्कृतिक देवघेवीतून कृष्ण, ऋषि, ऋग्वेद, धृतराष्ट्र वगैरे नामांच्या रूपानं हे अर्धस्वर वारश्यागत वापरात आहेत. पण बहुतेक भारतीय भाषांमध्ये या अर्धस्वरांचा उच्चार आर्ष संस्कृतातल्याप्रमाणे 'रु/रू' आणि 'र्' यांच्या साधारणतः मधल्या (म्हणजे 'क्रुष्ण' आणि 'क्रष्ण' यांच्या साधारणतः मधल्या) उच्चाराप्रमाणे होत नाही. मराठीत आपण 'ऋ' चा उच्चार सर्रास 'रु' सारखा करतो. हिंदीत 'ऋ'चा उच्चार 'रि'सारखा करतात. देवनागरीत लेखनाकरता 'कृष्ण' असाच शब्द लिहिला तरी त्याचे मराठी उच्चार आणि हिंदी उच्चार त्या-त्या भाषांच्या पिंडानुसार केले जातात.
हे झालं 'ऋ'च्या उच्चाराबद्दल. पण मुळात आधुनिक भारतीय भाषांचा वापर निरखता 'ऋ', 'लृ' हे अर्धस्वर वैदिक, पौराणिक काळापासून चालत आलेल्या शब्दांशिवाय अन्य कुठल्याच शब्दांमध्ये वापरले जात नाहीत. मात्र अलीकडच्या काळात परभाषांमधून उचललेल्या screw driver वगैरे शब्दांच्या देवनागरी लिखाणामध्ये जोडाक्षरांत 'ऋ' न वापरता 'रु' वापरायची प्रवृत्ती जास्त आढळते.
आता Group या शब्दाबद्दल मायबोलीवर शब्द योजण्याबद्दल माझे काही मुद्दे :
१. 'ऋ' च्या आर्ष संस्कृतातल्या उच्चारासारखा Group शब्दातला उच्चार नाही.
२. 'ऋ' चा मराठीतला सर्रास होणारा उच्चार 'रु'सारखा असला आणि त्याआधारे 'ग्रुप/ग्रूप' आणि 'गृप' या दोन्ही लिखाणांचे ध्वनी अन्योन्य वाटले, तरीही नि:संदिग्धतेचा निकष लावायचा झाल्यास 'ग्रूप' हे लिखाण उजवे ठरते.
३. डॉ. सामंतांनी मांडलेला मराठी संकेतस्थळांवरील लिखित मराठीचा मुद्दाही लक्षात घेण्याजोगा वाटतो. 'गट', 'समुदाय' हे आधुनिक मराठीत चालू असलेले शब्द योजायलाही हरकत नाही. याहू ग्रुपाने इंग्लिशीतला रुळलेला ग्रूप हा शब्द वापरला; मग आपण त्या संकल्पनेवर बेतलेले समुदाय मायबोली संकेतस्थळाच्या चौकटीत आखत असू, तर 'आपल्या' शब्दांना झुकतं माप देताना आपण बिचकू नये.
३.अ. बरं, 'ग्रूप' हा शब्द मराठीत रुळलाय असं मानून देवनागरीत लिहून वापरायलाही हरकत नाही. पण तो शब्द आपण मराठी नामांप्रमाणे विकारी समजून विभक्त्या चालवताना योग्य रूपांमध्ये वापरणार, की नाम असूनही मूळ रूप अविकारी ठेवून त्याला विभक्तिप्रत्यय चिकटवण्याचा धेडगुजरीपणा करणार हा प्रश्न उरतोच! जर या प्रश्नाची तार्किक तड लावण्याच्या उद्योगात आपल्याला सध्या पडायचं नसेल, तर तूर्तास 'गट', 'समुदाय' वगैरे मराठी पर्यायांचा मार्ग पत्करावा.
अॅडमिनांनी या बीबीवरील भाषिक मुद्द्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा धरतो.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
फ, तो शब्द
फ,
तो शब्द 'ग्रूप' असा आहे. 'ग्रुप' नव्हे. कोणत्याही शब्दकोषात उच्चार तपासता येईल.
ओके.
ओके. इंग्लिशीतला मूळ उच्चार 'ग्रूप' या लेखनासारखा ऐकू येतो. मी फ्रीडिक्शनरी.कॉमावर ऐकून खातरजमा करून घेतली.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
मला पण
मला पण ग्रूप (दुसरा ऊकार) बरोबर आहे असेच वाटतेय.
पण मराठी शब्द हवा असेल तर गट किंवा समुदाय पेक्षा 'विभाग' कसा वाटतो?
वरचं सगळं
वरचं सगळं वाचून माझं पूर्वीचं मत बदलतो. दीर्घ उकारच बरोबर आहे. 'ग्रूप'
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
चाफ्या, <आण
चाफ्या,
<आणि कपमधे चहा ओतला, टेबलवर बसून आम्ही जेवलो हीच योग्य रुपे आहेत. कप आणि टेबलची दोन कमी प्रचलित रुपे देऊन इतर लाखो शब्दांच्या अप्रचलित रुपांचा आग्रह धरणे मला अतिरेकी वाटते.
<>>
हे धादांत अशुद्ध मराठी आहे. कपात चहा ओतला, टेबलावर बसून जेवलो, असंच बोललं जातं. टेबलवर, कपमधे हे अशुद्ध आहे. कपामध्ये असं हवं.
आणि आज तुला इंग्रजी शब्द मराठीच्या नियमांप्रमाणे चालविणे अयोग्य वाटते आहे. केवळ तुझ्या कानांना योग्य वाटत नाही, हे कारण अजिबातच संयुक्तिक नाही. तसं ते कोणी मान्यही करणार नाही. मग लिंग, वचन. विभक्तीचे नियम तरी का पाळावेत?
>> हे धादांत
>> हे धादांत अशुद्ध मराठी आहे. कपात चहा ओतला, टेबलावर बसून जेवलो, असंच बोललं जातं.
पण मग 'बुथातून फोन केला', 'चेकावर माहिती लिहिली' , 'ट्रेनीत / ट्रेनेत / बसीत / बशीत / बसेत चढलो' असं नाही बोललं जात ना? का? कानाला विचित्र वाटतं म्हणूनच ना?
मुळात परकीय शब्दांची आपल्या भाषेत लिंगनिश्चिती तरी कशी करायची? ती मेल की तो मेल? ते पेन की तो पेन?
अजून एक
अजून एक शंका.
आता मराठीत दोन अकारान्त स्त्रीलिंगी शब्ददेखील सारखे चालतीलच असं नाही.
उदा. जात>> जातीला, डाळ >>डाळीला,
पण, माळ >> माळेला, वेळ >> वेळेला.
मग अशा उसन्या आणलेल्या शब्दांची अगदी लिंगनिश्चिती जरी केली (ही तरी कशी करायची हा स्वाती आंबोळ्यांचा प्रश्न मलाही पडला आहेच.) तरी त्या शब्दाचं कुठलं सामान्यरूप प्रमाण मानावं? का दोन्ही (किंवा होत असतील तर जास्त)?
चाफा यांचा 'कानाला चुकिचं वाटतं' हे विधान मलाही आधी पटलं होतं. पण त्याचं कारण हे शब्द (आणि त्यांची रूपं) पुरेसे रुळले नसल्यामुळेच होय, असं आता वाटतंय. 'टेबल' आणि 'कप' या दोन शब्दांचा दाखला अशासाठी महत्त्वाचा वाटतो की, आता हे शब्द इतके रुळले आहेत की त्यांची 'टेबला' आणि 'कपा' ही सामान्यरूपं आता कानाला खटकत नाहीत. सुरुवातीला ती 'चेका', 'बूथा', 'ग्रुपा' इतकीच खटकलीही असतील कदाचित. शेवटी, आपणच आपल्या भाषेच्या नियमांनुसार शब्द वापरून त्यांची कानांना सवय करवून घेणं योग्य, असं मला आता वाटतंय. नाहीतर मग 'भाषेचे नियम' ठरवणार कसे?
स्वाती, असं
स्वाती,
असं बोललं जात नाही, हे खरं आहे. कारणं वेगवेगळी असू शकतील. पण व्याकरणाच्या दृष्टीने ते चूक आहे हे नक्की. जुनी मासिकं, पुस्तकं चाळली, तर सर्व इंग्रजी शब्द हे मराठीतील नियमांना अनुसरूनच लिहिले जात होते, हे लक्षात येईल. 'मनोरंजन', 'मौज', 'सत्यकथा' या सार्या मासिकांत असे इंग्रजी शब्द आढळतील. 'इंग्लंडास जाऊन आलो', 'ट्रेनीत बसलो' ही वाक्ये चिंविंच्याच पुस्तकांत आहेत.
आपल्या कानांना विचित्र वाटतं कारण आपल्याला ते शब्द ऐकायची सवयच नाही. 'मेज' हा शब्द पूर्वी सर्रास वापरला जात असे. आपण टेबल हा शब्द वापरतो, आणि मराठी शब्दांप्रमाणे चालवतो. टेबलावर, टेबलाखाली, पेनाने, पार्कात अशीच रूपं प्रचलित आहेत.
मग 'मी बशीत चढलो' असं का नाही? तर, मराठीत ' बशी' या शब्दाला वेगळाच अर्थ आहे. 'मी बशीत चढलो' या वाक्याचा अनर्थ टाळावा, म्हणून आपण 'बस' हा शब्द तसाच वापरतो. आणि हे असे अपवाद मराठीतसुद्धा आहेतच. उदा. राजा आणि घोडा हे शब्द. दोन्हीही आकारान्त आहेत. घोड्याला, घोड्यावर अशी रूपं होतात. पण राजा हा शब्द तसा चालवता येणार नाही. कारण राज्याला, राज्यावर या शब्दांचे वेगळेच अर्थ आहेत. म्हणून आपण अपवाद करून राजाने, राजावर, राजाला अशी रूपं वापरतो.
टेबलवर, कपमध्ये ही अशुद्ध रूपं विदर्भात वापरली जातात. कारण वैदर्भीय मराठीवर हिंदी भाषेचा जबरदस्त प्रभाव आहे. 'टेबलपे/टेबलपर' या रुपांचं आपण 'टेबलवर' असं भाषांतर करून टाकतो. 'कपमें' = 'कपमध्ये' असं करतो. 'तू माझी मदत कर' असं जे आधुनिक (पण अशुद्ध) मराठी आहे, त्याचं जनकत्वही हिंदी भाषेकडेच जातं. कारण मूळ वाक्य 'तुम मुझे मदत करो' असं असतं. 'तू माझी मदत कर', हे वाक्य चूक आहे, हेसुद्धा हल्ली कोणाच्या लक्षात येणार नाही.
इंग्रजी शब्दांची मराठीप्रमाणे रूपं चालवण्यासाठी कुठेही नियम लिहून ठेवलेला नाही. पण ती रूपं तशीच चालवली पाहिजेत, असा संकेत मात्र जरूर आहे. आणि हा संकेत निदान काही दशकांपर्यंत पाळला जात असे. सध्या वृत्तपत्रांत, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर वापरले जाणारे मराठी हे अतिशय धेडगुजरी व अशुद्ध असतं. त्यामुळे व्याकरणाकडे लक्ष देतंय कोण? आणि या सध्याच्या प्रचलित मराठी भाषेतील वापराकडे जर आपण संदर्भ म्हणून पाहिले तर येत्या दहा-वीस वर्षांत मराठी भाषा नामशेष होईल, हे नक्की.
जाता जाता, 'अक्षरवार्ता' या सदरासाठी 'ऊर्जेच्या शोधात' हे डॉ. प्रियदर्शिनी कर्वे हे पुस्तक मी आणलं होतं. त्यात 'ग्रूप' हा शब्द सर्वत्र 'ग्रुप' असा लिहिला आहे. ही चूक मी काल राजहंस प्रकाशनाच्या संपादकांच्या लक्षात आणून दिली. संपादकांनी 'ग्रूप' व 'ग्रुपामध्ये' हे बदल करण्याचे मान्य केले आहे. डॉ. आनंद व प्रियदर्शिनी कर्वे यांनीही या बदलास मान्यता दिली आहे.
हे सांगण्याचा उद्देश एकच, 'आपल्या कानांना योग्य वाटत नाही', किंवा 'हल्ली असंच बोलतात' या विधानांना, तुमची भाषा टिकवायची असल्यास काडीचा अर्थ नाही. भाषेचे काही नियम, संकेत हे पाळणं आवश्यकच आहे.
माझ्या
माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीस तू चिनूक्स. सामान्यरूप ठरवायला मुळात लिंगनिश्चिती कशी करायची?
टेबल इंग्रजी आणि मराठी दोन्हींत नपुंसकलिंगी, मग बस/ट्रेन मराठीत स्त्रीलिंगी कशा झाल्या? 'ट्रेनीत बसलो' हे तरी शुद्ध कशावरून? 'ट्रेनात बसलो' का नाही?
लिंगनिश्च
लिंगनिश्चिती कशी करायची हा प्रश्न मलाही पडला होता. तर तसा काहीच नियम नाही. या शब्दांचा वापर कसा करायचा हे संकेतांवर अवलंबून आहे. मुंबई-पुण्याकडे 'ते पेन' असं म्हणतात, नागपूरला 'ती पेन, तो पेन' असं वापरतात.
इंग्रजीतून आयात केलेल्या शब्दांची लिंगनिश्चिती करणारे नियम कुठेही लिहिलेले नाहीत. 'ईमेल' या शब्दाचे लिंग काय? तर हा शब्द नपुंसकलिंगी. कशावरून? तर 'राजहंस', 'मौज', 'मेहता' या तिन्ही प्रकाशनसंस्थांचे साक्षेपी संपादक या शब्दाचे नपुंसकलिंगी रूपच वापरतात. 'ते ईमेल' असा वापर केला जातो. यामागील कारण काय? तर काहीच नाही. हा केवळ एक संकेत आहे. 'त्या ईमेलात मला पुरस्कार मिळाल्याची घोषणा होती, ' हे नाटेकरांच्या आत्मचरित्रातील वाक्य आहे. आपण 'तो ईमेल', 'ती ईमेल' असाही वापर करतोच.
'ट्रेनीत बसलो' कारण ट्रेन स्त्रीलिंगी. 'माळीत', 'रांगीत' असं लिहीत नाहीत कारण या शब्दांचे परत वेगळे अर्थ होतात. म्हणून 'माळेत', 'रांगेत' ही रूपं आपण वापरतो.
आणि संकेत
आणि संकेत हे कोणाच्या तरी (साक्षेपी?) कानांना बरोबर लागण्यावरूनच बनतात?
नाही. इथे
नाही. इथे कानांचा संबंध येतोच कुठे? श्रीपुंच्या कानांना बरं वाटलं, म्हणून मराठीत काही रूपं रूढ झाल्याचं निदान माझ्यातरी ऐकिवात नाही.
रुपांबद्दल नियम नाहीत. लिंगनिश्चितीबद्दलही नाहीत. मात्र इंग्रजीतून आलेले शब्द मराठी शब्दांप्रमाणे चालवावेत, हा संकेत अतिशय कठोरपणे पाळला जात असे, हे नक्की. शिवाय, इंग्रजीतून नवनवीन शब्दांची आयात होतच राहणार. हे सारे शब्द कोणत्यातरी संकेतानुसारच मराठीत वावरतील. 'ईमेल' हा शब्द तर गेल्या दशकात मराठीत आला.
आणि असे नियम तर मराठी शब्दांबाबतही नाहीत. 'ती वेसण' का? 'तो/ते वेसण' का नाही?
कोणतीही भाषा ही पूर्णपणे नियमांत बांधलेली असूच शकत नाही (अपवाद एस्पेरांतोचा). भाषा कशी वापरावी, याचे काही संकेत असतात. हे संकेत बदलतातही. मात्र सर्वच बदल स्वीकारावेत का, हा प्रश्न उपस्थित होतो. मा. वीणा पाटील, मा. पल्लवी जोशी वापरत असलेली मराठी भाषा खरोखरंच 'मराठी' आहे का?
अशी भेसळ होऊ नये, म्हणून काही पूर्वापार आलेले संकेत पाळणं अत्यावश्यक ठरतं. आणि तशी सवय करून घेणंही इष्ट.
बरं.
बरं. ज्याला मुळातच नियम नाहीत (केवळ संकेतच आहेत) त्याबद्दल काय वाद घालायचा!
पण
>>> 'ईमेल' या शब्दाचे लिंग काय? तर हा शब्द नपुंसकलिंगी. कशावरून? तर 'राजहंस', 'मौज', 'मेहता' या तिन्ही प्रकाशनसंस्थांचे साक्षेपी संपादक या शब्दाचे नपुंसकलिंगी रूपच वापरतात.
आणि
>>> श्रीपुंच्या कानांना बरं वाटलं, म्हणून मराठीत काही रूपं रूढ झाल्याचं निदान माझ्यातरी ऐकिवात नाही.
अशी दोन्ही विधानं (लागोपाठच्या पोस्टींमध्ये) करायची म्हणजे....
मला वाटते
मला वाटते इंग्रजी शब्द जेव्हा आपण मराठीत वापरतो तेव्हा त्याला सर्वसाधारणपणे मराठी भाषेतले लिंग आपण चिकटवतो.
उदा. ही आगगाडी म्हणून ही ट्रेन, हे विमान म्हणून हे प्लेन वगैरे.
------------------------------------
It's good that you can laugh at yourself.
असंच काही
असंच काही नाही GD, 'ती लेखणी', पण 'ते पेन'.. 'ते वळण' पण 'तो टर्न' अशीही उदाहरणं देता येतील.
अर्थात.
अर्थात. 'कानांचा संबंध काय?' हे मी अजूनही विचारेन. 'ईमेल' हा शब्द मराठीत येऊन अजून दोन दशकंही उलटली नसतील. या शब्दाची लिंगनिश्चिती अर्थातच एवढ्यातच कोणीतरी केली असणार. 'तो/ती/ते ईमेल' यांपैकी योग्य रूप मी कोणते समजायचे? तर email या इंग्रजी शब्दासाठी 'it' हे सर्वनाम वापरलं जातं. हा संदर्भ ध्यानात घेऊन 'ते ईमेल' असा वापर होतो. आता लिंगनिश्चितीसाठी हे कारण पुरेसे नाही. म्हणूनच हे सर्व संपादक 'तसा नियम नाही, पण इंग्रजीत असा वापर होतो, म्हणून हा संकेत, पण असा वापर करण्यासाठी हे कारणही नव्हे' असंच उत्तर देतील. यात 'कानांचा' अजिबातच संबंध नाही. राम पटवर्धनांनी उच्चारलेले 'ते ईमेल' श्रीपुंना आवडले आणि त्यांनी मंद स्मित करून त्या वापरास मान्यता दिली, असं खचितच घडलेलं नाही.
शिवाय, नियम हे आपणच ठरवलेले असतात. उद्या माझ्या कानांना गोड वाटतं म्हणून मी 'मी पेरू खाल्ली' असं म्हणेन. मग ते बरोबर समजायचं का? लता-आशाचे आवाज तर मला खूप आवडतात. तरी 'हा बोल मंद हळवासा आयूश्य स्पर्शूनी गेला' असं जेव्हा लता गाते, तेव्हा भाषेच्या मोडतोडीकडे लक्ष जातंच. आशाचा 'ड'ला जवळ असणारा 'ळ'ही खटकतोच. इथे नियम आणि संकेत हे महत्त्वाचे. 'माझ्या कानांना काय चांगलं वाटतं', हे दुय्यम.
नियम. संकेत, उच्चार यांच्याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो. 'श' आणि 'ष' यांतील फरक, किंवा 'फ'चा उच्चारही हल्ली आपण धड करत नाही. फ्रेंच, जपानी या भाषांनी मात्र आपलं विद्रुपीकरण अजिबातच होऊ दिलेलं नाही.
स्वाती हो,
स्वाती हो, तेही खरंच. अशी उदाहरणेही अनेक आहेत. पण सर्वसाधारणपणे असे होत असावे असे वाटते.
------------------------------------
It's good that you can laugh at yourself.
अरे, तू ते
अरे, तू ते 'कानाला बरोबर वाटणं' अगदी शब्दश: घेतो आहेस. (आणि बहुधा तुलाही ते माहीत आहे. :P)
'संकेत' म्हटलं की त्यातली सापेक्षता अध्याहृत होत नाही का? जो संकेत नागपुरात रूढ आहे, तो पुण्यात नाही याचं उदाहरण तूच दिलंस ना?
शिवाय email 'it' आहे म्हणून 'ते', यालाही फारसा अर्थ नाही ना? मग ट्रेन पण it च असते की इंग्रजीत!
(जाता जाता, लता 'ष' चा उच्चार 'ष' असाच करते - अगदी कटाक्षाने. तिने म्हटलेलं 'आयुष्य स्पर्शुनी गेला' हे (माझ्या कानांना :P) अगदी तंतोतंत 'आयुष्य स्पर्शुनी गेला' असंच ऐकू येतं. (तू कुठली आवृत्ती ऐकली आहेस?))
<शिवाय email 'it'
<शिवाय email 'it' आहे म्हणून 'ते', यालाही फारसा अर्थ नाही ना? मग ट्रेन पण it च असते की इंग्रजीत!
<>
तेच तर सांगितलं, की हे कारण पुरेसं नाही. पण मग लिंगनिश्चिती कशी करणार? म्हणून हे असे संकेत वापरातून ठरले असतील. नियम नाहीत हे मी अगोदरच सांगितलं.
शिवाय सापेक्षता आहेच. पण मग हेच 'संकेत' का? या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. अर्थात हे केवळ शब्दांच्या लिगनिश्चितीबाबत.
शब्दांची रूपं तयार करताना मात्र 'मराठी' भाषेत प्रदेशवार बदल होत नाहीत, होऊ नयेत. हिंदी अथवा इंग्रजीच्या प्रभावाने बदललेली रूपं वेगळी.
आणि मी तरी 'कान' हे अगदी शब्दशः घेतलं. कारण हा मुद्दा आला तो 'इंग्लिशीतून', 'ग्रुपामध्ये' हे शब्द 'कानांना पटत नाही' यावरून. त्यामुळे तुलाही तसंच काही म्हणायचं आहे, असं मला वाटलं.
दूरचित्रव
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर वापरले जाणारे मराठी हे अतिशय धेडगुजरी व अशुद्ध असतं. >> हे बरोबर की
"वापरली जाणारी मराठी ( भाषा) ही .. असते " हे बरोबर. ??
विदृप की विद्रूप ?
विद्रूप. 'त
विद्रूप.
'ते मराठी' असा प्रयोग मी अनेक ठिकाणी ऐकला आहे, आणि तसा तो मी करतो. हे बरोबर की चूक, हे मी विचारून सांगतो.
चिनूक्स तस
चिनूक्स
तसा प्रयोग मी पण ऐकला आहे अन मला तो नेहेमी खटकतो. म्हणून प्रश्न.
कुणाला विचारतोस असल्या शंका ? नशिबवान आहेस की असे प्रश्न विचारावेत अशी माणसं तुझ्या ओळखीची आहेत .
डॉ.
डॉ. सत्त्वशीला सामंत, अरुणा ढेरे किंवा सुजाता देशमुख यांना विचारतो
चर्चा खूप
चर्चा खूप वहावलेली दिसत्ये. पण मला सध्या वाचायला आणि लिहायला वेळ नाही. सवडीने येतोच.
शिवाय कानांचा संबंध काय हा प्रश्न अनेक जणांना पडलेला दिसतोय. त्याबद्द्लही बोलूच.
Pages