लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला
- ऋ
राजेश्वर ओके आणि कर्रेक्ट !
राजेश्वर ओके
आणि कर्रेक्ट !
ज्याला प्यायची त्याला
ज्याला प्यायची त्याला पिऊद्या, जितकी पाहिजे तितकी पिऊद्या, ज्याला नाही प्यायची त्याला न पिऊद्या.
पण कुणीही कुणावरही कसलीही सक्ती करू नका.
जो जे वांछील तो ते लाहो.
अक्कल प्रत्येकाकडे आहे, ज्याला जेंव्हा, जिथे, जशी, जेवढी वापरावी वाटेल त्याने तशी वापरावी. आपल्याकडे आहे म्हणजे दुसर्याकडे नाही असं नाही.
ऋन्मेष यांनी सर्वांची धुलाई
ऋन्मेष यांनी सर्वांची धुलाई केलीय इथे.
Pages