लोकं दारू का पितात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07

लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्‍याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्‍यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अ‍ॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुजा, हा धागा चर्चेसाठी नव्हता काढला. मनात आलेले विचार मांडणारा छोटेखानी लेख म्हणू शकता.
जसे तुम्ही प्रेमात पडलात, त्या भावनेवर तुम्हाला कविता सुचली, तर ती उतरवली कागदावर आणि टाकली मायबोलीवर.. तर अश्यावेळी, या आधी मायबोलीवर कोणी प्रेमावर कविता केली आहे का याचा धागा शोधून त्या खाली प्रतिसादात ती टाकणे, किंवा प्रेम म्हणजे काय असते असा चर्चेचा धागा काढणे, वगैरे अपेक्षित नसते.
शीर्षकात जरी मी प्रश्न विचारल्यासारखे भासत असले तरी त्याचे उत्तर मी स्वताच लेखात दिले आहे.

आता महत्वाचे कारण,

प्रत्यक्षात दारूला विरोध करणारे कितीही लेख नव्याने आले तरी त्याचे मी स्वागतच करेन. जसे दारू विकणारे ती दरवेळी नव्या बाटलीत भरून आणि सेलिब्रेटींना वापरून तिची जाहीरात करतात, तिची मार्केटींग करतात, आणि देशाच्या पिढ्या बरबाद करतात तसेच दारू विरोधातही कधी हलकेफुलके तर कधी चिमटे काढून दारू ही कशी वाईट आहे हे सत्य दाखवणारे लेख येत राहायला हवेत. अन्यथा येणारी पिढी कॉम्प्लॅन, बोर्नविटा आणि हॉरलिक्सच्या नंतर बढते बच्चो के लिये वोडका आणि बीअर असते या समजूतीत वाढेल.

दारू पिण्याला ग्लॅमरस बनवण्यात हिंदी सिनेमाचा मोठा वाटा आहे.
उदा. :२ वर्षापुर्वी रिलीज झालेल्या Queen सिनेमाचे सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. एक homescience शिकणारी so called काकूबाई मुलगी, एकटी पॅरिसला जाते आणि तिथे वेगवेगळे अनुभव घेते. आपलं लग्न मोडलं म्हणून रडतं बसतं नाही. हा मुळ विषय चांगला असला तरी पॅरिसला जाऊन ती काय करते तर दारू पिऊन झिंगते. परदेशात गेल्यावर दारू पिणं एवढं inevitable असतं का?
परदेशात जाऊन इतर अनेक चांगले अनुभव पदरी पडू शकतात.

सोहा, मी क्वीन नाही पाहिला पण मुद्द्याशी सहमत आहे. मुंबै पुणे मुंबै दिव्तीय मध्ये देखील मुक्ता बर्वे मॉडर्न आणि डॅशिण्ग दाखवायला सुरुवातीलाच तिचा लांबलचक दारूचा सीन रचला होता.

चांगला मुद्दा आहे. चित्रपटातील अशी द्रुश्ये आपल्याही नकळत आपल्या मनावर, आपल्याला त्यात काही वावगे वाटू नये अश्या पद्धतीने हॅमरींग करत असतात. आता तुम्ही बोललात म्हणून ते जाणवले.

बरोबर. हिंदी आणि आजकाल मराठी सिनेमातही कोणतीही मुलगी मॉडर्न, तडफदार दाखवायची असेल, तर एक तरी दारू पिण्याचा सीन असतोच. का बरं? दारू न पिताही कोणी मुलगी तडफदार असू शकत नाही का?

बरोबर ऋन्मेष आणि सोहा. समाज कळत नकळत असं ब्रेन वॉशिंग करत असतो.
दारुच्या आकर्षक बाटल्या, ती पिण्यास आकर्षक चषके, बार वरील अुंच आसने हे सगळे या कँपेनचा भाग आहेत.
पिणे खरंच काही और आहे, अेवढ्या आकर्षक बाटल्या, चषके ती ही वेगळ्या प्रकारच्या मद्यांसाठी वेगवेगळी, डौलदार आसने, मद्या चषकात ओतण्याच्या ढबी हे सगळे लोकांना फक्त आकर्षित करण्यासच नव्हे तर अेवढे सगळे करुन मद्य प्राशन करणारे काय मूर्ख आहेत का? तू बिनधास्त पी याची ग्वाही देत असतात.

लस्सी, बदाम मिल्क, सोलकढी साठी अशा माहोलची गरज पडत नाही. कारण ते पिताना "मी खरंच पिउ की नको? काही होईल का? इतर कोणी पितंय की नाही? कसं पितंय? किती बेक्कार चव, आणि वास! अेवढा पूर्ण ग्लास प्यायलाच हवा का?" असे प्रश्न, शंका पिणाऱ्यांचा मनाला भेडसावत नसतात.
पण मद्य पिण्यास सुरवात करणाऱ्यांच्या आणि पहिल्या ॲडव्हेंचर नंतर तथाकथित ॲक्वायर्ड टेस्ट डेव्हलप करणाऱ्यांच्या मनात हे प्रश्न आणि शंका भेडसावत असतात. त्यासाठी असा ग्वाही देणारा माहोल आवश्यक असतो. अन्यथा फार कमी लोक नादी लागतील.

(एकदा नादी लागल्यावर अर्थात अशा माहोलची गरज उरत नाही. एखादा स्टूल आणि कळकट ग्लास पण चालतो.)

धाग्याचा विषय एकदम उत्तम आहे. Happy तसा मी टीटोटल आहे. मागे एकदा गोव्याला गेलो असताना मला दारू बद्दल एक गोष्ट कळली ती म्हणजे महागडी दारू हळू चढते आणि आपली देशी नारिंगी मोसबी लगेच, म्हणून रस्त्यावरून झोकंड्या देणारा कधी सुटाबुटात नसतो.

अजुन एक अनुभव म्हणजे, माझा अगदी जवळचा मित्र. आम्ही दुसर्या एका मित्राच्या लग्नाला चाललेलो. ज्याचे लग्न होते त्याने गाडी आणि गाडीत खांब्याची सोय केलेली (म्हणून तरी) दहा पंधरा जण आलेले. मग काय, गाडीत उलट्यांच्या वर्षावाला उधाण आलेले. कोणी गाडीच्या बाहेर तर कुनऊ दुसर्‍याच्या बॅग वर.

खरच एवढी इज्जत गेल्यावर तरी लोक का पितात दारू? [बाय द वे ब्लेण्डेर्स प्राइड चे तीन खम्बे रिचवल्यानंतर माणसाचा मर्कट होणे स्वाभाविक आहे]

'मेरे मन को भाया, मै कुत्ता काट के खाया'

ब्लॅक डॉग पिणार्‍या एकाने मला ती पिण्याचे दिलेले हे कारण!
Wink

डिस्क्लेमरः "दारूडे"गिरीला कोणतेही प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. परंतु, दारूला हात लावला की तो गेलाच कामातून ही जी कन्सेप्ट श्रीमान ऋन्मेष मांडू इच्छिताहेत, त्याला विरोध आहे.

आजही दारू पिणे हा "टॅबू"च आहे. सिगारेट जशी चारचौघात पिता येते. तंबाखू खाता येते, तशी दारू खुलेआम पिणे आजही शिष्टसंमत नाही.

अर्थात, पार्टीत दारू पिणार्‍यांना नांवे ठेवणारे जसे आहेत, तसेच नॉनव्हेज खाणार्‍यांना नांवे ठेवणारेही आहेतच.

*

दारू, किंवा अल्कोहोल अनेक रूपांत पुरातन काळापासून माणसांच्या पिण्यात, खाण्यात आहे. वाईन व ब्रेड, हे 'अन्न' आहे. वाईन, बियर, इ. प्रकारच्या दारवांतून चक्क न्यूट्रिशन वगैरे मिळते म्हणतात. Wink

दारू, अधिकृतपणे, सैन्याचा जोष वाढविण्यासाठी वापरले जाणारे उत्तेजक द्रव्य आहे. मिल्ट्री कँटीनला स्वस्तात मिळते, ती उगंच नाही. चॉकलेट व दारूचे रेशन 'जवानांना' मिळते, तेही उगंच नाही.

अशा इतरही बाबी आहेत. अल्कोहोल इन मॉडरेशन इज ऑल्सो सपोज्ड टु बी गुड.

*

इतर अनेक अ‍ॅडिक्शन-फॉर्मिंग न्यूरोट्रॉपिक एजंट्स प्रमाणे दारू सुरुवातीला मेंदू उत्तेजित करते, व त्यानंतर डिप्रेस. या सर्व प्रवासात मेंदूला जी गम्मत मिळते, त्यासाठी ती पुन्हा प्यावीशी वाटते. कुठे थांबायचं ते तुमच्या हातात हवं. रविवारी थोडाफार हँगोव्हर आला, तरीही नेक्स्ट शनिवारी थोडी घेऊन रिलॅक्स होण्यात गम्मत असते.

दारूला हात लावला रे लावला की तो दारूड्याच झाला असेही नसते.

ऑकेजनल अल्कोहोलिक्स, सोशल ड्रिंकर्स, रेग्युलर मॉडरेट ड्रिंकर्स, बिंज ड्रंकार्ड्स, विनोज, अ‍ॅडिक्ट्स असे अनेक प्रकार दारू पिणार्‍यांत आढळतात. अधिक माहितीसाठी गूगल आहेच.

*

शेवटी,

जोपर्यंत कुणी मनुष्य इतरांना नुकसान पोहोचवत नाही, तोपर्यंत त्याच्या पर्सनल स्पेसमधे त्याला काय खायचे, प्यायचे आहे, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. नन ऑफ युअर बिझिनेस.

मी तळलेली झुरळे चाखून पाहिली. मला चव घाणच वाटली. तळलेलं झुरळ खाल्लेला एक चिनी माणूस विचित्र चाळे करत होता. लोक झुरळे का खातात?? झुरळ खाणे कित्ती घाणै नै?

अगेन, नन ऑफ "माय" बिझिनेस.

>> ती म्हणजे महागडी दारू हळू चढते आणि आपली देशी नारिंगी मोसबी लगेच, <<

महागड्या दारुत अल्कहोलचं प्रमाण कमी अस्तं आणि महागडी दारु पिणारे टाइट होण्यासाठी पित नाहित... Proud

{जोपर्यंत कुणी मनुष्य इतरांना नुकसान पोहोचवत नाही, तोपर्यंत त्याच्या पर्सनल स्पेसमधे त्याला काय खायचे, प्यायचे आहे, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. नन ऑफ युअर बिझिनेस.}
ज्जे बात. सहमत!

जोपर्यंत कुणी मनुष्य इतरांना नुकसान पोहोचवत नाही, तोपर्यंत त्याच्या पर्सनल स्पेसमधे त्याला काय खायचे, प्यायचे आहे, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. नन ऑफ युअर बिझिनेस.

>>>>>

मला ट्रेनमध्ये, हॉटेलमध्ये, बसस्टॉपवर, गार्डनमध्ये कुठल्याही सार्वजनिक जागेत तोंडाला दारूचा वास मारत असलेली व्यक्ती शेजारी आली की त्रास होतो.

दारू पिणारा माणूस असंबद्ध बडबडू लागला की मला ईरीटेट होते.

एखाद्या बेवड्याने जवळपास उलटी केली की मळमळायला लागते. मला नॉनवेज आवडते, पण ते खाऊन कोणी उलटी केली की तो वास सहन होत नाही.

रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्याने एकटे जाताना किंवा एखाद्या मैत्रीणीबरोबर चालताना समोरून मद्यपान केलेल्यांचा ग्रूप आला तर मला त्यांनी काहीही न करताही असुरक्षित वाटते. हा माझ्या कमजोर मनाचा दोष असू शकतो. पण मला असे वाटते की आपण सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणात शैतान लपलेला असतो जो दुष्कृत्ये करायची इच्छा राखून असतो. पण वाईट कृत्ये करायला जी हिंमत लागते ती सर्वांनाच जुटवता येत नाही. दारूच्या अंमलाखाली ती जुटवता येते.

जुटवता येते.>> हे असलं मराठी वाचून काही लोकांना त्रास होत असेल.
तुझे लेख वाचून तर होतच असेल. पण तरी तू लिहायचा थांबतोस का? तुला थांबवणे बेकायदा आहे तसच कोणी काय (नियमात बसून) करावं हे ठरवणं ही. नियम बदलणं कायदेशीर आहे मात्र.

दारू, अधिकृतपणे, सैन्याचा जोष वाढविण्यासाठी वापरले जाणारे उत्तेजक द्रव्य आहे. मिल्ट्री कँटीनला स्वस्तात मिळते, ती उगंच नाही. चॉकलेट व दारूचे रेशन 'जवानांना' मिळते, तेही उगंच नाही.

>>>>

या उत्तेजक द्रव्याचा लाभ पोलिसांना का देत नाहीत?
उलट माझ्या माहितीनुसार ऑन ड्यूटी ऑफिसरने मद्यपान केले असल्यास गुन्हा समजला जातो.

1) डिस्क्लेमरः "दारूडे"गिरीला कोणतेही प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.

2),दारू, किंवा अल्कोहोल अनेक रूपांत पुरातन काळापासून माणसांच्या पिण्यात, खाण्यात आहे. वाईन व ब्रेड, हे 'अन्न' आहे. वाईन, बियर, इ. प्रकारच्या दारवांतून चक्क न्यूट्रिशन वगैरे मिळते म्हणतात.

>>>>>

जर तुम्ही तुमच्याच मुद्दा क्रमांक (2) वर ठाम असाल आणि जर तो तुम्हाला स्वताला पटला असेल, तर मग (1) मध्ये डिस्क्लेमर टाकत असा बचावात्मक पवित्रा का घेत आहात Happy

जुटवता येते.>> हे असलं मराठी वाचून काही लोकांना त्रास होत असेल
>>>>

कर्रेक्ट करा. पर्यायी मराठी शब्द सुचवा. मी लगेच दुरुस्त करून तो वापरायला सुरुवात करेन. हेच पिणारे करू शकतात का?

मी ऋन्मेष मायबोलीकर आज ईथे या धाग्यावर वचन देतो की मायबोलीवरील सारे जण आजपासून मद्याचा कायमचा त्याग करणार असतील तर मी माझे धागे लिखाण या जन्मात पुन्हा कधीही करणार नाही. बघूया कोणते व्यसन सोडणे सोपे आहे आणि कोणते कठीण. जर मायबोली दारूमुक्त होत असेल तर शप्पथ घेऊन सांगतो, ही फार छोटी किंमत आहे !

जूटवता येते -> एकवटता येते.
बाकी कंडीशन्ड, दुसऱ्यावर आरोप करणारे, ह्याने हे केलं तर मी ते करीन म्हणणारे यावर मराठीत गर्जेल तो पडेल काय म्हणतात.

मी ऋन्मेष मायबोलीकर आज ईथे या धाग्यावर वचन देतो की मायबोलीवरील सारे जण आजपासून मद्याचा कायमचा त्याग करणार असतील तर मी माझे धागे लिखाण या जन्मात पुन्हा कधीही करणार नाही. बघूया कोणते व्यसन सोडणे सोपे आहे आणि कोणते कठीण. जर मायबोली दारूमुक्त होत असेल तर शप्पथ घेऊन सांगतो, ही फार छोटी किंमत आहे ! >> मी हायझेनबर्ग अल्बूकर्कीकर सर्व मायबोलीकरांच्या वतीने वचन देतो की मायबोलीकरांनी ह्या क्षणापासून कायमस्वरूपी मैद्याचा त्याग केला आहे आणि त्यास ते चुकूनही स्पर्श करणार नाहीत.
Now its time to keep your word Runmesh... Wink

1) पार्टीत दारू पिणार्‍यांना नांवे ठेवणारे जसे आहेत, तसेच नॉनव्हेज खाणार्‍यांना नांवे ठेवणारेही आहेतच.

2) दारूला हात लावला रे लावला की तो दारूड्याच झाला असेही नसते.

>>>>>>>

मी नॉनवेज खाणारा आहे. मला कोणी अट्टल मांसाहारी म्ह्टले की त्याचे काही वावगे वाटत नाही. तसेच जे मोजकाच मांसाहार करतात त्यांना 'मांसाला हात लावला रे लावला की मांसाहारी झाला असेही नसते' असे समर्थन करायची गरज भासत नाही.
मद्यपानासोबत मांसाहाराचे उदाहरण कसे चूक हे आणखी मुद्दे घेऊनही दाखवता येईल, पण धाग्याचा तो हेतू नाही.

मी हायझेनबर्ग अल्बूकर्कीकर सर्व मायबोलीकरांच्या वतीने वचन देतो की मायबोलीकरांनी ह्या क्षणापासून कायमस्वरूपी मैद्याचा त्याग केला आहे आणि त्यास ते चुकूनही स्पर्श करणार नाहीत.>>

हायझेनबर्ग, मैद्याचा नाही, मद्याचा त्याग करायचा आहे.
Wink

एका प्रश्नाला ५ उत्तरं लिहून कन्फूजन वाढवण्याचा श्री रुन्मेस यांचा प्रयत्न 'निंदनीय' आहे Wink

तर प्रत्युत्तरे :

१.
>>
मला ट्रेनमध्ये, हॉटेलमध्ये, बसस्टॉपवर, गार्डनमध्ये कुठल्याही सार्वजनिक जागेत तोंडाला दारूचा वास मारत असलेली व्यक्ती शेजारी आली की त्रास होतो.

दारू पिणारा माणूस असंबद्ध बडबडू लागला की मला ईरीटेट होते.

एखाद्या बेवड्याने जवळपास उलटी केली की मळमळायला लागते. मला नॉनवेज आवडते, पण ते खाऊन कोणी उलटी केली की तो वास सहन होत नाही.

रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्याने एकटे जाताना किंवा एखाद्या मैत्रीणीबरोबर चालताना समोरून मद्यपान केलेल्यांचा ग्रूप आला तर मला त्यांनी काहीही न करताही असुरक्षित वाटते. हा माझ्या कमजोर मनाचा दोष असू शकतो. पण मला असे वाटते की आपण सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणात शैतान लपलेला असतो जो दुष्कृत्ये करायची इच्छा राखून असतो. पण वाईट कृत्ये करायला जी हिंमत लागते ती सर्वांनाच जुटवता येत नाही. दारूच्या अंमलाखाली ती जुटवता येते.
<<
असंबद्ध बडबडीसारखे धागे मला इरिटेट होतात. सिगारेटचा वास सहन होत नाही.
एसटी लागली म्हणून कुणी उलटी केली तर तुम्हाला आनंद होतो का?
रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्याने एकटे किंवा मैत्रीणीसोबत कशाला जावे लागते?
इ.

तात्पर्य, तुम्हाला भीती वाटते म्हणून मी काय कारावे व काय करू नये, हे ठरत नाही. किंवा मला भीती वाटते, वा इरिटेट होते, म्हणून तुम्ही धागे काढणे बंद करावे असेही नसते.

नॉनव्हेज खातो म्हणून तुमचा पराकोटीचा तिटकारा करणार्‍या झुंडींशी तुमची गाठ अजून तरी पडलेली दिसत नाहिये. तुमचा दारू द्वेष हा तितक्याच पराकोटीचा व मद्यपान करणार्‍या सर्वच लोकांना "दारूडा" या एकाच माळेत गुंफून शिव्या घालण्याच्या कॅटॅगरीतला आहे.

.-.-.-.

२.

>> या उत्तेजक द्रव्याचा लाभ पोलिसांना का देत नाहीत?
उलट माझ्या माहितीनुसार ऑन ड्यूटी ऑफिसरने मद्यपान केले असल्यास गुन्हा समजला जातो. <<

युद्ध करणारे सैन्य व पोलीस, यातला फरक समजतो का? फरक नसेल तर पोलीस व सैन्य असे दोन प्रकार का आहेत?

-.-.-

३.
"डिस्क्लेमर" बद्दल :

दारू पिणे, व दारूडा असणे यातला फरक समजवून घ्या. थोडंफार गूगल वापरून अल्कोहोलबद्दल ज्ञान घ्या.

-.-.-
४.
मद्यपानासोबत मांसाहाराचे उदाहरण कसे चूक हे आणखी मुद्दे घेऊनही दाखवता येईल, पण धाग्याचा तो हेतू नाही.
<<
नुसते चूक नाही तद्दन बावळटपणाचे आहे, तरीही ते घेऊन तुम्हाला मांसाहार विरोधकांची आठवण करून द्यायचा हेतू होता. मी अमुक खातो म्हणून यांना कटकट करायचा अधिकार कुणी दिला? त्याचप्रमाणे जर कुणी दारू पितो, तर तुम्हाला कटकट करायचा अधिकार कुणी दिला?

जेव्हा एकादी गोष्ट व्यसनाच्या लेवलला पोहोचते तेव्हा, अर्थात 'दारुडेगिरी'ला आळा घातलाच पाहिजे, पण तशी व्यसने अनेक प्रकारची असतात. अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्सचे व्यसनही स्वत:स व इतरांस त्रासदायक ठरूच शकते. दारू न पिता अ‍ॅक्सिडेंट्स होतच नाहीत का?

उगंच "दारू पिऊ नको" या उपदेशाला थोडेफार मॉरल अधिष्ठान आहे, म्हणून मिळाला चान्स की दे दारूबंदीचे भाषण असे सुरू झाले, की लोक दुसरी बाजू सांगणारच. चिडचिड कशाला करायला हवी?

>>
मी नॉनवेज खाणारा आहे. मला कोणी अट्टल मांसाहारी म्ह्टले की त्याचे काही वावगे वाटत नाही. तसेच जे मोजकाच मांसाहार करतात त्यांना 'मांसाला हात लावला रे लावला की मांसाहारी झाला असेही नसते' असे समर्थन करायची गरज भासत नाही.
<<

या भाषणात मांसाहाराऐवजी मद्यपान लिहा अन वाचा.

मी तुमच्या मांसाहाराची निंदा करणारे धागे पाडलेत का? तुम्ही काय कसे खाता, तो तुमचा प्रश्न आहे. तेव्हा माझे दारू पिणे जस्टिफाय करण्यासाठी मी लेख लिहित नाहिये. तर माझ्या दारू पिण्याबद्दल तुम्ही जे घालून पाडून लिहित आहात, ते लिहिण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही, हे तुमच्या ध्यानात यावे, यासाठी हे टंकतो आहे.

आता याला उत्तरं लिहायची असतील तर एकाच ठिकाणी लिहा. वेगवेगळे तुकडे लिहू नका. Wink

चि. रुन्मेष

अापण दारु प्यायलात का? साॅरी चाखलीत का?
दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

हायझेनबर्ग, मैद्याचा नाही, मद्याचा त्याग करायचा आहे.

>>>>>>

त्यांनी ते मुद्दाम मैद्याचा लिहिले आहे. कारण सारे मायबोलीकर मद्याचा त्याग करतील याचा त्यांना विश्वास नाही.

काही लोकं आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा मद्याचा सहारा घेतात, त्यांना कल्पना होती की सर्वांनी दारू सोडायचा संकल्प केला की त्यात अपयशच येणार म्हणून त्यांनी मैद्याचा सहारा घेतला.

असो, दारूच्या समर्थनार्थ काही पोस्ट या धाग्यावर येऊ लागल्याने रोचक मुद्दे येत आहेत. एखादी काळी गोष्ट जेव्हा तर्क आणि तत्वज्ञानाच्या कसोट्या लावत आणि सोबत अशास्त्रीय कारणांची जोड देत पांढरी आहे हे दाखवायचा प्रयत्न केला जातो तेव्हा हे होतेच. अश्यावेळी मग बरेचदा सेफ गेम केला जातो. ती गोष्ट करड्या रंगाची आहे आणि जगातील प्रत्येक गोष्टीला एक ग्रे शेड असतेच असा युक्तीवाद करण्यात येतो. ईथेही अशीच मजा चालू आहे Happy

आता याला उत्तरं लिहायची असतील तर एकाच ठिकाणी लिहा. वेगवेगळे तुकडे लिहू नका. 
>>>>.>>>

रात्रीच्या वेळी मोबाईलवरून मैत्रीणीशी चॅट करता करता अध्येमध्ये येथील पोस्ट लिहित होतो त्यामुळे एकेक मुद्दा घेत होतो आणि ईतक्या अंतराळाने पोस्ट येत होत्या. गैरसोयीबद्दल क्षमस्व. बाकी चांगले मुद्दे एकत्र संकलित झाले पाहिजे या मताचा मी देखील आहे Happy

आपल्या आताच्या पोस्टला मात्र आता ऑफिसात पोहोचत असल्याने त्वरीत उत्तर देता येणार नाही. पण अर्थात, देणार जरूर Happy

अकलेचा कांदा -

डिस्क्लेमरः "दारूडे"गिरीला कोणतेही प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. परंतु, दारूला हात लावला की तो गेलाच कामातून ही जी कन्सेप्ट श्रीमान ऋन्मेष मांडू इच्छिताहेत, त्याला विरोध आहे. धाग्यातला कुठला मजकूर वाचून तुम्हाला असा बोध झाला?

तुम्हाला ऋन्मेष्चे धागे नकोत तर टाळता नक्की ये तील त्याचे नाव त्याच्या सगळ्या धाग्यांसमोर लिहिलेले असते. त्याचे धागे उघडून बघायची गरज नाहीये.
पण दारूडे टाळता येत नाहीत. त्यांनी तशी पाटी लावलेली नसते कपाळावर...

दारूड्यांनी पिऊन झिंगून गटारात पडले तर सर्टनली नन ऑफ माय बिझनेस पण दारुडे गाड्या चालवतात... इतरांच्या अंगावर चढवतात... सार्वजनिक आणि खासगी स्थावर जंगम मालमत्तेला आणि त्याहून भीषण म्हणजे निष्पाप जिवांना हानी पोहोचवतात. यात इतरेजन नाहक आणि हकनाक बळी जातात

त्यावेळी दारू चांगली माणसेच वाईट
कुठे थांबायचे ते कळले नाही
संयम कसा साधावा हे शिक म्हणाव माझ्याकडून
यासारख्या वाक्यांचे काय करावे....
लोणचे घालावे का फर्मेंट व्हायला ठेवावे...

'अति तेथे माती' किंवा 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे सगळ्याच बाबतीत लागू असले तरी दारू 'अति' झाल्याने होणारे गंभीर दुष्परिणाम हे फक्त पिणार्‍यापुरते मर्यादित रहात नाहीत आणि 'अति' हे खूप सापेक्ष असल्याने किती म्हणजे अति अशी सरसकट व्याख्या करता येत नसल्याने तसेच दारू जराशी अति झाली तरी त्यावेळी प्यायलेला माणूस आपली सारासार बुद्धी गमावून बसत असल्यामुळे दारू 'वाईट'.

म्हणून ऋनम्याने नाही म्हटले तरी मी म्हणतो दारूला हात लावला की तो गेलाच कामातून

जगात ४ प्रकारचे लोक असतात.

१. दारू पितात, पिऊ घालतात
२. दारू पितात, पिऊ घालत नाहीत
३. दारू पित नाहीत, पिऊ घालतात
४. दारू पित नाहीत, पिऊ घालत नाहीत

चौथा प्रकार सर्वात चांगला
नाहीच तर दुसर्‍या प्रकारात असण्याचा प्रयत्न करावा.
पहिला प्रकारही बरा म्हणावा असा तिसरा प्रकार... ह्या प्रकारचे कधीही असू नये !

दारू, किंवा अल्कोहोल अनेक रूपांत पुरातन काळापासून माणसांच्या पिण्यात, खाण्यात आहे.
पुरातन काळापासून आहे हा निकष नेहमी ते चांगलेच आहे असे दर्शवतो का? जे पुरातन काळापासून आहे ते चांगले की वाईट हे परखून पहाणे चांगल्या गोष्टी ठेवणे, वाईट गोष्टी सोडून देणे हे शहाणपणाचे लक्षण आहे की पुरातन काळापासून आहे म्हणुन आम्ही करणारच हे शहाणपणाचे लक्षण आहे? पुरातन काळापसून असलेल्या कित्येक गोष्टी, प्रथा आपण सोडल्याच आहेत ना!

वाईन व ब्रेड, हे 'अन्न' आहे. वाईन, बियर, इ. प्रकारच्या दारवांतून चक्क न्यूट्रिशन वगैरे मिळते म्हणतात.
दारु पिणारे न्यूट्रीशन मिळावे म्हणुन ती पितात का? तुम्हीच पुढे 'म्हणतात' असे लिहिले आहे, म्हणजे नक्की नाही. अर्थात न्युट्रिशन मिळते हे दारु पिण्याचे कारण नव्हेच. अन्यथा रोज नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासोबत का घेत नाही? लहान मुलांना, शाळेतील जेवणात वाईन आणि ब्रेड, बियर द्यायला सुचवाल का?
जे काही न्य़ुट्रीशन दारुतून मिळते अगदी शंभर टक्के तेवढेच न्य़ुट्रिशन्स देणारे पेय उपलब्ध करुन दिले. फक्त त्यात अल्कोहोलची मात्रा शून्य आहे. तर लोक दारु पिणे सोडून असे पेय पिणे सुरु करतील का?

दारू, अधिकृतपणे, सैन्याचा जोष वाढविण्यासाठी वापरले जाणारे उत्तेजक द्रव्य आहे. मिल्ट्री कँटीनला स्वस्तात मिळते, ती उगंच नाही. चॉकलेट व दारूचे रेशन 'जवानांना' मिळते, तेही उगंच नाही.
फक्त उगाच नाही असे लिहु नका. नक्की काय फायदा होतो हे सविस्तर लिहा.
आणि हे फक्त सैन्यापुरते मर्यादित का? पोलीसांना का नाही? जिम्स मध्ये व्यायाम सुरु करण्यापूर्वी का नाही? उद्या ऑफिसमध्ये खूप जास्त काम आहे, सकाळी येताना दोन पेग मारुन या असे का कोणी सांगत नाही?
’पोलिसांना का नाही” म्हटल्यावर युद्ध करणारे सैनिक आणि पोलीस यातिल फरक समजून घ्या असं तुम्ही म्हणालात. दारु पिउन बेफाम गाडी चालवणारे, रस्त्यात झोकांड्या देत चालणारे, भांडणारे, बायको पोरांना हाणणारे हे सगळे युद्ध करणारे सैनिक असतात का?

अल्कोहोल इन मॉडरेशन इज ऑल्सो सपोज्ड टु बी गुड.
नक्की कसे? काय फायदे होतात? आणि असे फायदे आहेत, यासाठीच लोक दारु पितात का? हे फायदे त्या पेयांतील नक्की अल्कोहोल या घटकामुळेच होतात का? अल्कोहोल हे एक अ‍ॅडिक्टीव्ह ड्र्ग आहे हे माहित असताना त्याचा अंश असलेलीच पेयेच अशा फायद्यासाठी घेणे उचित की त्याचा अंश नसलेली?

दारूला हात लावला रे लावला की तो दारूड्याच झाला असेही नसते.
अर्थात लगेच होत नाही. दारुची सवय लावायला खूप हार्डवर्क करावं लागतं. सुरवातीला शरीर, मेंदु नको म्हणत असतात, तरी पुढे घेतलीच की शरीर ते पेय उलट बाहेर फेकते. "ही चव गोड मानून घे, हा वास मस्त मानून घे" असं मेंदुला ट्रेनिंग द्याव लागतं थोडं थोडं करत. मग ग्रॅज्युअली इनटेक कसा वाढत जातो वगैरे वरिल एका पोस्टमध्ये थोडक्यात लिहिलेले आहे. दारुडा होण्याचे पोटेन्शिअल हे दारुला हात लावणार्‍यांमध्येच असते, हात न लावणार्‍यांमध्ये नव्हे. त्यामुळे लोक हात न लावलेला बरा असंच म्हणणार ना.

ऑकेजनल अल्कोहोलिक्स, सोशल ड्रिंकर्स, रेग्युलर मॉडरेट ड्रिंकर्स, बिंज ड्रंकार्ड्स, विनोज, अ‍ॅडिक्ट्स असे अनेक प्रकार दारू पिणार्‍यांत आढळतात.
या मद्याच्या व्यसनाच्या स्टेजेस आहेत.

थोडक्यात वरील सगळी मद्य पिण्याची कारणे नसून एक्स्क्युजेस आहेत.

जोपर्यंत कुणी मनुष्य इतरांना नुकसान पोहोचवत नाही, तोपर्यंत त्याच्या पर्सनल स्पेसमधे त्याला काय खायचे, प्यायचे आहे, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. नन ऑफ युअर बिझिनेस.
इतरांना (यात पिणार्‍या व्यक्तीचे घरचेपण आले) नुकसान झाले नसते तर लोकांनी दारुला नावे ठेवली नसती, दारुबंदीची मागणी केली नसती, दारु व्यसन मुक्ती केंद्रे काढली नसती.
जो पर्यंत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कोणी मद्य घेत असेल तर कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि त्याला कोणी जाब विचारणारही नाही.
पण अल्कोहोल या ड्रगच्या व्यसनावर लोकांनी खुलेपणाने चर्चाही करु नये असाही कोणी अट्टाहास का बरे करावा?

ऋन्मेषने जी काही उत्तरे तुम्हाला दिलीत ती सर्वच मला मान्य आहेत असे नाही.
पण ऋन्मेषच्या धाग्यांबद्दल: त्याबद्द्ल ही लोक बोलतातच की.
आणि हर्पेन यांनी लिहिल्याप्रमाणे धाग्यापुढे धाग्याकर्त्याचे नाव असते. आपण तो धागा वाचणे टाळु शकतो.
रस्त्यातून जाताना अनेक बार लागतात. आपण पाट्या वाचतो, पुढे जातो. हां, मी जर रस्त्यात लागणार्‍या प्रत्येक बारमध्ये जाऊन तिथे आत मध्ये किती वास येतोय, तो बघा काय बरळतोय! अशा तक्रारी जर सुरु केल्या तर मग चूक माझीच असेल ना.
या उपरही जर त्याच्या धाग्याचा अथवा इतर कुणाच्या धाग्याचा मायबोली समुहात खरच त्रास होतच असेल तर त्यावर चर्चा करायला हरकत नक्कीच नसावी, तक्रार करायलाही हरकत नसावी.
तसेच या दारु विषयाबद्दल आहे. त्यावर चर्चा करण्यास हरकत नसावी.

Pages