लोकं दारू का पितात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07

लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्‍याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्‍यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अ‍ॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकं दारू का पितात? .. मरायला
अगदी बरोबर. फक्त हळू हळू मरायला. पण इथे कुणाला घाई आहे?

लोकं दारू का पितात? .. मरायला>>>अगदी अगदी.... शिर्षक वाचले तेव्हा मनात हेच उत्तर आले होते.

चांगली इंग्लिश दारु पिणारे झोकांड्या खात फिरत नाहीत ऋन्मेष,तुम्हाला अपेक्षीत लोक जे आहेत ते देशी ,संत्रा वगैरे पितात व गटारात पडतात.प्रत्येक गोष्टीत कॅटेगरायझेशन असते ,तसे दारुतही आहे.सरसकट सगळ्यांना एकाच मापात तोलू नका.

गुड जॉब ऋन्मेष

गम इस कदर मिला की घबरा के पी गये
खुशी थोड़ीसी मिली तो मिला के पी गये
युं तो ना थी बचपन से पीने की आदत
शराब को तनहा देखा तो तरस खा के पी गये

कोणतीच् गोष्ट सरसकट चांगलीच किंवा वाईटच असते असे नाही न.फक्त.. लोकांनी दारू प्यावि दारुने लोकांना प्यायला सुरुवात केली की काय होते याचे उदाहरण तूच वर दिले आहेस.आणि एक महत्वाचे म्हणजे लोकांना कुठे थाम्बावे हेच कळत नाही
अजुन एक म्हणजे यात गरीब किंवा श्रीमंत असा फरक नसून फरक वृत्तिचा आहे असे मला वाटते

गरीब लोकं दारू पिऊन झोकांड्या खात फिरतात, गटारात पडतात आणि श्रीमंत लोकं आलिशान इंपोर्टेड गाड्यांमधून गरीब लोकांना चिरडतात.

चांगली इंग्लिश दारू पिणारे झोकांड्या खात फिरत नाहीत ????? बरं. मग मी मोठ्या मोठ्या हॉटेल, बार, ऑफिस च्या पार्ट्या झाल्या नंतर जे लोक पाह्यले ते बहुतेक आतमध्ये जाऊन देशी पित असावेत.

दारू कोणतीही असो, कोणीही प्यायलेली असो, ती मर्यादेच्या बाहेर गेली की उपद्रव देणारच.

खरी समस्या ही आहे कि लोकांना कुठं थांबायचं हेच कळत नाही. पण यात गरीब आणि श्रीमंत, देशी आणि विदेशी कुठून आलं?

दारु थेट मेंदूवर परिणाम करते हे तर आहेच पण आपल्याकडे अत्यंत चुकिच्या पद्धतीने दारु पितात.
उपाशी पोटी, तेलकट तळलेले पदार्थ खात लागलेली तहान शमवण्यासाठी दारु पिणे घातकच.

आधी जेवण जेवून, मग पब मधे जाऊन दारु पिणे व नंतर घरी येऊन हलके जेवून मग ब्लॅक कॉफि पिणे, त्यातल्या त्यात बरे.

हल्ली दारु पिणे पुरुषार्थाचे लक्षण झालेय हे हि खरे... एखादा तरुण मुलगा जर दारुचा तिरस्कार करत असेल तर चांगली गोष्ट आहे.

>>> चांगली इंग्लिश दारु पिणारे झोकांड्या खात फिरत नाहीत ऋन्मेष,तुम्हाला अपेक्षीत लोक जे आहेत ते देशी ,संत्रा वगैरे पितात व गटारात पडतात.प्रत्येक गोष्टीत कॅटेगरायझेशन असते ,तसे दारुतही आहे.सरसकट सगळ्यांना एकाच मापात तोलू नका. <<<<<
माणसाने बनविलेल्या, माणूस पित असलेल्या दारूत क्याटेगरायझेशन अस्ते, हे तुम्हाला मान्य आहे, तर मग "माणसांमध्येही क्याटेगरायझेशन" असू शकते हे देखिल मान्य असेलच ना? Wink

माणसाने बनविलेल्या, माणूस पित असलेल्या दारूत
क्याटेगरायझेशन अस्ते, हे तुम्हाला मान्य आहे, तर मग
"माणसांमध्येही क्याटेगरायझेशन" असू शकते हे देखिल मान्य
असेलच ना?>>>>>>>>>> लिंब्या ,तुला जातीय आधारावर कॅटेगराझेशन म्हणायचे आहे ते मला माहित आहे ,पण मला ते मान्य नाही .मला मानववंशशास्त्रानुसार भेद मान्य आहेत.
उदा. युरोपिय वंश व आफ्रीकन वंश हे दोन्ही सर्वनिकषानुसार समान आहेत असे कुणी म्हणाले तर मला ते मान्य नाही.फरक आहेच,शरीर ,बुद्धी,ईतर गुणधर्मात.तरी पण होमो सेपियन्स या व्याख्येनुसार प्रत्येकाला मानव म्हणुन किमान समान अधिकार देणे रास्त आहे असे मला वाटते.माझे कॅटेगरायझेशन शास्त्रीय आधारावर आहे तर तुझे धार्मिक आधारावर आहे,धर्माला विज्ञानानुसार शुन्य मान्यता असल्याने तुझ्या जातीय रोखाला मी अनुमोदन देऊ शकत नाही.

चांगली इंग्लिश दारु पिणारे झोकांड्या खात फिरत नाहीत ऋन्मेष,तुम्हाला अपेक्षीत लोक जे आहेत ते देशी ,संत्रा वगैरे पितात व गटारात पडतात.प्रत्येक गोष्टीत कॅटेगरायझेशन असते ,तसे दारुतही आहे.सरसकट सगळ्यांना एकाच मापात तोलू नका. >>> हो ना ! सामान्य माणसं नारिंगी पितात , पांढर्पेशा वर्ग दारू पित नाही " ड्रिन्क्स घेतात" .

दारू कोणतीही असो, कोणीही प्यायलेली असो, ती मर्यादेच्या बाहेर गेली की उपद्रव देणारच.
खरी समस्या ही आहे कि लोकांना कुठं थांबायचं हेच कळत नाही. पण यात गरीब आणि श्रीमंत, देशी आणि विदेशी कुठून आलं?>>> + १०००००

संत्री , नारिन्गी पिउन घरात मुला- बायकोला मारझोड करणारी लोक ही फक्त गरिब वस्तीत असतात , झोपडपट्यांमध्ये रहातात असा समज होता माझा. पण विदेशी सरबतं पिउन बायकोला गुरासारखं मारणारे नवरे उच्च मध्यमवर्गिय गटातही फार जवळून पाहिलेत Sad .


तू मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात दारुबंदी करायला सांग हं ?
मी अनुमोदनाचे पत्र तयार करतो Happy

सूरा #### चा नाद फार पुरातन काळापासून आहे म्हणे या देशात.

खरं तर हा प्रश्न मी माझ्या बऱ्याच मित्रांना विचारला आहे कारण मी दारू पीत नाही ,,,,,,,, पण त्यांच्यामते दारू पिल्याने एक झिंग चढते , मेंदू फारसा विचारात पडत नाही ,, एक वेगळाच आनंद मिळत असतो ,,,,,,, एका मित्राच्या अनुभवानुसार त्याला जन्नत प्राप्त होतो दारू पिल्याने .........
बरीच उत्तरे आहेत मित्रांकडून आलेली ...... पण अजून ही या प्रश्नाचे मनाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही ......

डिमांड अँड सप्लाय ही संकल्पना माहित असेलच ऋन्मेष.

ज्या गोष्टींचे उत्पादन केले जाते त्या गोष्टी विकल्या गेल्या पाहिजेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे बनवणारे बनवतात, ज्यांना सोसते ते पितात.

दारू सोडा, माणसाने अगदी जेवणातला कुठलाही पदार्थदेखील अतिसेवन केला तरी त्याने नुकसान होते. त्यामुळे दारूवर वेगळा आणि खास आक्षेप घेण्याचे कारण काही समजले नाही.

दारूला प्रतिष्ठा मिळालेल्या दिवसात तू दारू का पितात म्हणून विचार करतोयस.

सिंजी, Happy दारू पिऊन माकडचेष्टा करणे हा झोपडपट्टी ते बंगला, सगळ्यांचाच समान हक्क आहे, निसर्गाने त्यात कमीजास्त केलेलं नाही. मग ती हातभट्टीची असो किंवा विदेशी. दारू पिऊन गडाबडा लोळणे, ओकणे, जोरजोरात भांडणे, मारामारी करणे, खून करणे ही लक्षणे देशी आणि विदेशी पिणार्या दोघांमयेही समान असतात.

लिंबू, तूमचा निषेध.

दारू पिण्याची सवय कींवा इतर सवयी..यामागे सायकॉलॉजीकल आणि बायॉलॉजीकल कारण आहेत. दारु म्हणजे इथेनॉल- हे लिवर मध्ये विघटीत होते आणि त्यापासून acetaldehyde आणि बरेच मेटाबोलाइट्स तयार होतात. जे CNS सेंट्रल नर्व्हस सीस्टीम ला डिप्रेस करते. त्याच्यामुळे सर्व सेन्स, मेंदू जरा शांत होतात. पुढे पुढे जशी त्याची सवय लागेल तशी dependency वाढत जाते. मग दारू सोडली की withdrawal सिंप्टम्स जाणवतात

खुशखबर खुशखबर खुशखबर

आमच्या येथे प्रथमच २ अॉगस्ट २०१६ रोजी गट्टारी निमित्त नाईटचे ओपन दारू पिण्याचे सामने आयोजित केले आहे तरी इच्छूक मद्यपान करणाऱ्यानी या सोन्यासारख्या संधीचा मन भरून आनंद घ्यावा...........

प्रवेश फी १०.००० रू फक्त

प्रथम क्रमांक .१.००.०००रू
द्वितीय क्रमांक .५०.०००रू

अटी.

१ ) जास्त गोंगाट केल्यास बाद
२ ) बाटली पंच फोडणार
३ ) एकदा बसल्यावर रिंगनातून उठु नये.
४ ) ओकल्यावर पंच हाथ लावनार नाही ती हमी बेवड्यानी घ्यावी..
५ )प्रत्येक गटात ५ खेळाडू घेतले जातील.....
6)जास्त चाकणा खाणारयांना बाद केले जाईल.
7) कडक पेग मारणारयांना दुसरया दिवसाची भर पगारी रजा मंजूर होईल.
8)आपले सर्व पेग स्वता बनवून मारले तर तो एक अस्सल बेवड़ा म्हणून त्याला एक स्काॅच खंबा देऊन गौरविण्यात येईल.

ठिकाण : नंतर सांगु नाहीतर आधीच येऊन बसाल...

>>> लिंबू, तूमचा निषेध. <<<< मी काय केल? Uhoh
अन निषेध कर्ताय, तो ओला कर्ताय की कोरडा? Proud
(अक्षरे इटॅलिक्स मधे नाहीत म्हणजे बहुतेक कोरडाच निषेध करीत असाल.... Wink )

लोक दारू का पितात?
ती न पिल्याने होणारा त्रास, तात्पुरता का होईना, थांबवण्यासाठी.

अल्कोहोल हे ड्रग आहे.
सुरवातीला ते inhibitions दूर करते. याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असतात. inhibitions दूर होण्याचा परिणाम जेव्हा माफक असतो (मर्यादित घेतली आहे उदा. २० ते ३० मिली व्हिस्की) तेव्हा भीड चेपते, हलके वाटते आणि माणुस मोकळेपणाने बोलू लागतो.
चांगलेय ना?
पण दारुचा हाच परिणाम घातक आहे. हाच परिणाम आहे जो व्यसन लावायला उद्युक्त करतो. व्यसन लावायला कारणीभूत दुसरा फॅक्टर आहे दारुची भयानक चव आणि वास. उलटं बोलतोय असं वाटतंय ना? नाही.
पहिल्यांदा जेव्हा हा inhibitions दूर होण्याचा परिणाम माणुस अनुभवतो, त्यानंतर त्याला हा अनुभव परत घेण्याची इच्छा होते. त्याच बरोबर 'आपल्याला सवय तर लागणार नाही ना?' ही भीती मनात डोकावते. दारुची चव आणि वास छान असते तर तो लगेच सावध झाला असता आणि व्यसनाच्या भीतीने बहुतेकांनी नाद सोडला असता. पण अशी भयानक चव आणि वास, याची सवय आपल्याला लागणारच नाही, आपण हवी तेव्हा सोडू शकतो, अशी त्याची खात्रीच असते. म्हणुन अजून जरा मजा करुन पाहू मग थांबू असे म्हणुन तो घेउन पहातो.

कुठल्याही ड्रगच्या प्रमाणे शरिराला त्याची सवय होते. थोडीशी दारु आता inhibitions दूर करत नाही. त्यासाठी त्याला आधी पेक्षा जास्त घ्यावी लागते. इथे काही जण धोका ओळखतात. आणि इथे थांबतात. पूर्ण. अथवा क्वचित कधी घेतात. पण दारु पिणार्‍यांमध्ये थोडी दारु घेउन ती न चढणे ही कौतुकाची बाब मानली जाते. 'साल्याचा काय कोटा आहे राव! अर्धा खंबा मारतो तरीही न डळमळता गाडी चालवतो!" असा इतर कुणाबद्दल आदर व्यक्त करताना त्याने ऐकले असते. त्यामुळे हा नवशिक्या, अनुभवी लोकांच्या प्रोत्साहनास पात्र ठरतो. आणि व्यसनाच्या दिशेने त्याची यशस्वी वाटचाल सुरु होते. मध्येच जास्त झाली, चढली, हँग ओव्हर आला तर अनुभवी लोक मदतीला असतातच: अशी नाही तशी प्यायची, रिकाम्या पोटी पिउ नये, सोबत असे स्नॅक्स खायचे वगैरे, वैगैरे.

आता तो ६० ते ९० मिली वगैरे घेउ लागतो. एवढी दारु ही हलके withdrawal symptoms निर्माण करण्यास पुरेशी आहे. अल्कोहोलची रक्तातील पातळी बरीच खाली आली की ती आता एक अस्वस्थता निर्माण करते. रात्री परत घेतली की ही अस्वस्थता त्या रात्री पुरती दूर होते.

आणि ड्रग आपले कार्य करतच असते. पूर्वी सारखी मजा यायला आता त्याला अजून जास्त घ्यावी लागते. रक्तातील अल्कोहोलची पातळी बरीच कमी झाल्यावर निर्माण होणारी अस्वस्थता पण वाढत जाते. मग ती स्टेज येते, की पिल्यावर ती मजा आता येतच नाही, पण रक्तातून अल्कोहोलची पातळी उतरली की होणारी अस्वस्थता आणि इतर withdrawal symptoms मात्र खूपच वाढलेले असतात, त्याचा त्याला चांगलाच त्रास होऊ लागतो.

आता तो दारु पिण्यात मजा आहे म्हणुन पीत नाही. (ती त्याला आता मिळतच नाही.)
तर ती न पिल्याने होणारा त्रास, अस्वस्थता, अगतीकता दूर करण्यास पिउ लागतो.

मला तर अजुन एक प्रश्न पडतो की लोक ती धुर सोडाणारी नि बाकीच्यांच्या नाक़ात जबरदस्तीने धुर घसवणारी नळकंडी (सिगारेट) का बरे पित/ओढ़त असावेत

मानवजी, छान कडक पोस्ट!

अदिती, हो. ते धूराचे नळकांडे तर अनाकलनीय व्यसन आहे. हट्टाने लावून घेतल्यासारखे. फक्त त्या अंमलाखाली आपण अपघात घडवून आपला वा कोणाचा जीव घेत नाही हेच काय ते समाधान.

नंद्या,
अगदी बरोबर. फक्त हळू हळू मरायला. पण इथे कुणाला घाई आहे?
>>>>>>>>>>
खरंय.. आमच्या बिल्डींगमधील मुलाचीच अशी एक गोष्ट आहे. वयाने माझ्यापेक्षा मोठा बराच. बॉडी एकेकाळी अशी होती की व्यायामशाळेतून बॉडीबिल्डींगच्या स्पर्धांमध्ये उतरायचा. बिल्डींगमध्ये तसेच त्याच्या कॉलेजला भाई वगैरे म्हणून ओळखला जायचा. दारू प्यायला लागला, पण सो कॉलड व्यसन म्हणता येऊ नये. कदाचित पितही असेल मजबूत पण बॉडीवर त्याचा काही परीणाम होत नव्हता. पण एकेदिवशी सारे चित्र पलटले. दारूच्या हलकाश्या अंमलाखाली ट्रेनच्या दारावर उभा होता. कधी हात सटकला समजलेच नाही. शुद्ध आली तेव्हा दोन्ही पाय गमावून बसला होता. त्यानंतर कृत्रिम पाय लावून काठीच्या आधारे कसाबसा चालतो. वडिलोपार्जित दुकान चालवतो. एकेकाळी आठवड्याला दाढी करावे तसे गर्लफ्रेंड बदलायचा, हल्ली त्या मुली मैत्रीणी बनून येतात आणि सहानुभुती देऊन जातात. आपल्या मुलाचे लग्न कसे होणार म्हणत आई रोज याच्या त्याच्या घरी जाऊन रडत असते. कधीकधी मित्रांमध्ये तो सुद्धा धाय मोकलून रडतो. बघवत नाही तेव्हा त्याच्याकडे. कारण त्याचे जुने दिवस ना तो विसरलाय ना आम्ही विसरलोय.. खरंय तुमचे.. हळूहळू मरतोय

ऋ.. शाब्बास!! चांगला धागा.

दारू कोणतीही असो, कोणीही प्यायलेली असो, ती मर्यादेच्या बाहेर गेली की उपद्रव देणारच.

खरी समस्या ही आहे कि लोकांना कुठं थांबायचं हेच कळत नाही. पण यात गरीब आणि श्रीमंत, देशी आणि विदेशी कुठून आलं?>> +१

मानव.. चांगली पोस्ट.

Pages