नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप, अनेक आयडींच्या एककल्ली हेकट टीकेला न जुमानता संतुलित समिक्षा लिहित आहात त्याबद्दल खासच कौतुक.
खरेतर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतुन अनेक कलाकार पुढे आले पाहिजेत, त्यात दुमत नाहीच.
पण म्हणुन त्यांच्या फक्त चांगल्या किंवा फक्त वाईट बाजूबद्दलच बोलले / लिहिले जावे हे चुकीचे आहे.

दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत.
>>>
एक्झॅक्टली असेच काहीसे काल मी या नवकलाकारांना निवडण्याच्या मुद्द्याबद्दल म्हणालेलो. कोर्या पाटीवर व्यक्तीरेखा रेखाटता येते, प्रेक्षकांच्या डोक्यात काही प्रतिमा नसतात..

शेवटाबद्दल तर एवढे ऐकल्याने आताच डोक्याचा भुगा होऊ लागलाय .. कोणीही चुकूनही कधीही इथे किंवा आणखी कुठे फोडू नका रे.. आम्ही आमच्या सवडीने बघू..

परीक्षण आवडले .. आता डोक्यात हे ठेवून चित्रपट बघता येईल.. नक्कीच एंजॉय केला जाईल ..

पण माझे स्वताचे एक वैयक्तिक मत असे आहे की नुसता संवेद्नशील एके संवेदनशील सिनेमा बनवला तर तो कमी लोकांपर्यंत पोहोचतो आणि मग तो मारलेला दगड कुठे पडलाच नाही तर व्यर्थ ठरतो..
त्यापेक्षा कमर्शिअल सिनेमा बनवून तो जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मग शेवटाला एकच दगड मारला तर तो जास्त परीणामकारक ठरावा !

'शाहरुख मयूर खान' अशी एक जाहिरात असायची पूर्वी. लोकांना त्यात काही गैर वाटलं नव्हतं.
>>>
हे उदाहरण गंडलेय रसप
शाहरूखने ती जाहीरात स्वत: केलेली, म्हणजे त्याची स्वत:ची या नामकरणाला परवानगी होती.
इथे तसे नाहीये.

बाकी माझा काही आक्षेप नाही यावर Happy

"नागराज मंजुळे सारखा तळागाळातला दिग्दर्शक वरती येतो ,नवीन चेहरे घेतो आणि उत्तम चित्रपट देतो,प्रस्थापितांना यामुळे धक्का बसतो,व त्यांची उबळ काढायला कुणीतरी परिक्षण लिहीतो" - बास करा यार हे सेल्फ पिटी. नाही आवडला सिनेमा, आणी तसं म्हटलं तर स्वीकारायला शिका.

आजवरचे या चित्रपटाचे सर्व रिव्ह्यूज प्रामाणिकपणे लिहिलेले वाटले .. याने एक होते. बघणार्‍याच्या मनाची पाटी कोरी होते. हा असे म्हणतोय, आणि तो तसे म्हणतोय .. ठिक आहे. नेमके मला काय वाटतेय ते बघूनच ठरवू.. असे वाटू लागते.

सनव
सचिन वर कुणी टीका केली की थेट ब्राह्मणद्वेषाचे आरोप होतात याबद्दल तुम्हाला काही म्हणायचेय का ?
नागराज मंजुळेवर टीका झाली किंवा कौतुक झाले म्हणून तो सिनेमातली त्याची गोष्ट सांगण्याची त्याची शैली बदलणार नाही. कुणी तो माझा थेट लंगोटीयार आहे असं दाखवून कुणाला खिजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नागराज फटकारल्याशिवाय राहणार नाही.

आणि कुणा एकाचा कमेण्टवरून सनव यांनी दिलेल्या प्रतिसादासारखे आदळआपट करणारे कर्कश्श सूर लागले म्हणून तो डिस्टर्ब होणार नाही. सनव यांना जे हवं ते त्यांना एका प्रतिसादात सापडलं. इतर प्रतिसादांशी, त्यांच्या जातीधर्माशी , त्यांच्या निर्मळतेशी त्यांना काही एक घेणं देणं नव्हतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

रसप,

छान लिहिलेत, सगळीकडे त्याच आशयाचं लिहून येतंय!

बाकी,

अरे पिक्चर पिच्चर म्हणून बघा की ... सामाजिक सुधारणेचा प्रकल्प आहे का तो?
उगा आपलं काय ते सगळीकडे तेच तेच

Biggrin

बाकी, आय हेट लव्ह स्टोरीज त्यामुळे, हा पिच्चर पहाणार नव्हतोच अन नाहीच!
आम्हाला प्रतीक्षा सिव्हील वॉरची अन अपोकोलिप्सची Proud

सैराट अजून पाहिला नाही
पण बिपिन चंद्र, गंगाधर गाडगीळ आणि मुकुंद टाकसाळे एका ओळीत आणि गंगाधर गाडगीळ लेखन सुमार?
जोरदार डिसलाईक!!

सिनेमाची कथा फोडण्याबद्दलची ती पोस्ट आता सापडत नाहीये. न्यूज फीडमधे खूप खाली गेली. कुणाला सापडल्यास लिंक द्या. आशय साधारणपणे असा होता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

मित्रांनो
झुक्याने जी सुविधा बहाल केलीये त्यामुळे अनेकांच्या सिनेमा परीक्षणाच्या अंगाला मुलभूत घुमारे फुटू लागलेले आहेत. हाऊसफुल्ल सिनेमाला पण या लोकांना फर्स्ट डे फर्स्ट शो च्या तिकिटा मिळतात. एकदा सिनेमा पाहून आले की मग यांना दम नसतो. यांचं इंटरनॅशनल समीक्षण तीन चार दिवसांनी पडलं तर राज्यावर आक्रीत कोसळेल. त्यामुळं ते त्याच दिवशी दुपारी बारा पर्यंत आलेलं देखील असतं.

या महाभागांनी काढलेले फोटो आजपर्यंत गुलदस्त्यात राहीलेले असतात. उजेड कुठून यावा, फ्रेम मधे ऑब्जेक्ट कुठे असावा , सावल्यांचा खेळ कसा असावा हे त्यांच्या प्रोफाईलवरच्या फोटुतून दिसलेलं असतं. पण समीक्षण लिहायला बसले की कॅमेरा जमिनीशी ३० अंशाचा की ४५ अंशाचा कोन करून अमूक इतक्या मीटरवरून खाली येतो हे असं काही लिहीतात की कोन मोजायचे डब्बं डुब्बं थेटरात लावून बसलेत.

संगीताबद्दल तर असं काही लिहीतील की हातामंदी हात आलं की या गाण्याच्या दुस-या कडव्यातल्या धृपदानंतर तीन सेकंदांनी जी ढोलकीवर थाप पडलीये ती अंमळ कर्कश्शच झालीय. नायिकेच्या चेह-यावर ज्या वेगाने भाव बदलायला हवे होते त्या वेगाने ते बदलत नाहीत. थोडा वेग कमी पडतो. तिच्या आज्जीच्या चेह-यावरच्या सुरकुत्यामधील सूक्ष्म थरथर आश्वासक वाटते. इथे दिग्दर्शक दिसतो (च्यायला कान्स मधे पण इतक्या बारकाईने सुर्कुत्या बघत नसतील ).

मग असं लिव्हलं की कुणाची काय टाप विरोध करायची. एकदा असं सर्वज्ञ परीक्षणाच्या मोडमधे शिरलं की समोर येईल त्याला आडवे करता येतं. मग त्याच थाटात ही मंडळी सिनेमाचा शेवट सांगायला मागेपुढे बघत नाहीत. प्रेक्षकांना काय कळतं ? आम्ही लिहीलेलं वाचा मग सिनेमा जरा डोक्यात तरी घुसेल .

-------------------------

यातल्या फुल्या काढून टाकलेल्या आहेत (त्यांच्या जागा लक्षात नाहीत आणि तसंही जमलं नसतं द्यायला). जेव्हढं लक्षात राहीलं त्यावरून लिहीलंय. त्यामुळे जरा सपक झालीय पोस्ट. बाकी भावना उतरल्या असाव्यात असं वाटतंय.

सिनेमाचा शेवट सांगून रसभंग करणा-या एक दोघांना प्रेमाने सांगूनही पाहीलेलं होतं. पण जी उर्मट दुरुत्तरे मिळाली होती त्यावरून अशा उत्तरांचीच मात्रा त्यांना चालत असावी असे वाटू लागलेय.

Kamrshial nakkich waatala naahi..
Time pass n time pass 2 sarkhya kamarshial prem kahanya aani yaat jameen aasamaan ch antar aahe.
Shewat dokyatun jatach nahi.. baghun aalyawar khup wel picturech gholat aahe dokyat..
Kadachit mi gaawatch waadhale mothi zaale mhanun khup relate zaal saar..
Itar picture madhe gaawatal dakhawal jaanar watavaran aani sairat madhe dakhawalel khup wegal aahe..
Doghe nawe hero heroin mast..
Will wait for manjules next film

परिक्षण सकारात्मक नसणार'च'हे माहीत होतच.."'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो" या वाक्या पर्यंत आलो अन थांबलो.
चित्रपट बघितल्यावर बाकिचे वाचावे म्हणतो...

आपला प्रेक्षक अद्यापही "पिठातला"च आहे. मल्टीप्लेक्स संस्कृतीत वाढल्यामुळे सगळ्याच कलाकृती "हाऊसफूल" सारख्याच "टाईमपास" असतात असा त्याचा समज झालेला आहे. सैराटच्या पुर्वार्धात प्रेक्षकांची ती गरज पुर्णसुद्धा होते. पण दिग्दर्शक नागराज आहे, हेच प्रेक्षक विसरुन गेलेले असतात. त्यामुळे पडद्यावर एखाद्या गंभीर सीनवरसुद्धा प्रेक्षक हसतच राहतो.

शहरी लोकांना जातियतेचे चटके बसत नाहीत, त्यामुळे जवखेडा, सोनई, कोल्हापुरसारख्या क्रुर घटनांचा थांगपत्तासुद्धा नसतो.

आधी वाटतं राहत , नागराजने मसाला चित्रपटाशी गट्टी केली कि काय ! पण त्याला जे सांगायचं आहे ते तो सांगतोच, तेही शेवटच्या पाच मिनिटांमध्ये. आतापर्यत जो प्रेक्षक हसत खिदळत असतो, तोच पिक्चर संपल्यावर शांतपणे बाहेर पडतो. शेवटी थिएटरच्या आसमंतात "आई, गं" हाच शब्द घुमत राहतो.

सैराटमय सतीश कुडतरकर---

नकारात्मक परीक्षक रसप ,,कालच रात्री हा चित्रपट पाहिला..अजुन सैराट ची झिंग उतरली नाहीये.
चित्रपटाचा शेवट अजुन ही डोळ्यांसमोर आला की सरक्कन अंगावर काटा येतोय. Sad
आणी क्षणभरासाठी हातातल काम थांबून ,, शेवटी लोकांच्या मनातुन ,डोक्यातुन "जात" जात नाही हे कळुन चुकतय.

सस्मित | 2 May, 2016 - 11:18 नवीन
घरातल्या ११ ते १५ वयोगटाला बघायचा आहे. गाणी भलतीच आवडलीयेत. पिच्चर पण बघायचा आहे. न्यावं का?

>>

नाही.

घरातल्या ११ ते १५ वयोगटाला बघायचा आहे. गाणी भलतीच आवडलीयेत. पिच्चर पण बघायचा आहे. न्यावं का? <<< सस्मित, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. मी असे सुचवीन की आधी तुम्ही पाहा. आणि मग त्यांना दाखवावा की नको हा निर्णय घ्या. ते हा सिनेमा कोणत्या दृष्टीने पाहतील हे तुम्हीच जास्त चांगल्या प्रकारे ओळखता.

गजानन, टीनेजर प्रेम बिम दाखवलंय म्हणून दाखवायचा नाहीये असं काही नाही. अस असेल तर मला घरचा टीव्हीच बंद करावा लागेल.
फक्त काही दृश्य जी मोठ्या माण्सांनाही परीणामकारक वाटु शकतील तशी असतील तर त्यामुळे त्यांच्या मनाला अस्वस्थ वाटु नये एवढंच. नैतर झिंगाट गाणी, क्युट हिरो हिरवीणींची प्रेम स्टोरी बघायला जायचे आणि असं काही बघुन घाबरायचे किंवा थोड्या काळापुरती का होइना रुखरुख लागायची.

नायिकेचे वय वर्षे पंधरा (१५) फक्त. इयत्ता नववी.

http://www.loksatta.com/manoranjan-news/sairat-fame-rinku-rajguru-got-81...

http://www.loksatta.com/manoranjan-news/nagraj-manjule-marathi-movie-sai...

या वयात आपल्या देशात लग्न आणि बुलेट चालविणे या दोन्हीला कायद्यानुसार परवानगी नाही.

या वयात आपल्या देशात लग्न आणि बुलेट चालविणे या दोन्हीला कायद्यानुसार परवानगी नाही <<< बिपिन चंद्र साहेब चित्रपट पाहून अथवा त्यात जे दाखवले त्यावर बोला.
४९ चा अमिर खानला २६ वर्षाचा कॉलेजकुमार म्हणून दाखवात आणि ते त्याला सुट देखील होते
मग १५ वर्षाच्या आर्चिला १९ चे का दाखवू शकत नाही ?

खरेतर कमी वयात वाहने चालविणार्या सर्वांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

Pages