'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोफखाना,

>> अर्जुनला मिळालेला 'गांडीव' धनुष्य आणि 'अक्षय भाता' हि कोणाची कृपा होती.

ही इंद्राची कृपा होती. त्याकरिता अर्जुन सदेह स्वर्गात गेला होता. वनवासात असतांना अस्त्रप्राप्तीच्या हेतूने त्याने स्वर्गगमन केलं होतं. पहिल्याप्रथम हेच दुष्कर कर्म आहे. इंद्राकडून काही अस्त्रे मिळाल्यावर त्याने निवातकवच नामे राक्षसांचा पाडाव केला. त्यानिमित्त इंद्राने अक्षय्य भाता आणि गांडीव धनुष्य अर्जुनाला कायमचे देऊन टाकले.

आ.न.,
-गा.पै.

माधव,

>> ... बायकोला डावाला लावणारा युधिष्ठीर सदेह स्वर्गात पोहचला?

युधिष्ठीर बायकोला डावाला लावण्याआधी दास झाला होता. दास आणि क्षत्रिय यांच्यात द्यूत होऊ शकत नाही. त्यामुळे पापपुण्याचा हिशोब लावतांना द्रौपदीला पणाला लावणे हे कर्म युधिष्ठिराच्या नावावर दाखल नाही.

नेमकी हीच शंका द्रौपदीने सभेस विचारली होती. यावर भीष्माने उत्तरही दिलं होतं.

आ.न.,
-गा.पै.

अंगठा गळतो वगैरे काही वाचल्याचे आठवत नाही.>>> मी कुठे वाचले आहे की कोणी ही गोष्ट मला सांगीतली आहे हे निश्चित आठवत नाही. आठवले तर माहितीचा सोर्स पोस्ट करेन

युधिष्ठीर बायकोला डावाला लावण्याआधी दास झाला होता. >>> तसे असेल तर इंद्रप्रस्थच्या महाराणीला डावावर लावल्याचे पाप तरी त्या दासाच्या माथी यायला हवे.

मंडळी कादंबरी आणि इतिहास यात गल्लत करू नका. कादंबरीकार स्वतच्या कल्पनाशक्तीने सत्याच्या जवळपास जाणारे वातावरण उभे करून आपल्याला हवेतसे संवाद मांडू शकतो. राधेय, मृत्युंजय, पर्व, या कादंबऱ्या आहेत. त्यावरून महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे मूल्यमापन करू नका. उद्या दुर्यौधन चांगल्याच प्रवृत्तीचा होता पण शकुनीच्या अमलाखाली येऊन त्याने ही कृत्ये केली तर कुणी विश्वास ठेवायचा का नाही....

मुळात महाभारतही जसेच्या तसे आहे हे कशावरून. मूळ काव्यात नंतरही कितीतरी भर पडत गेली आहे. त्या त्या काळच्या लोकांनी आपापली व्हर्जन्स त्यात घुसडली आहेत. त्यामुळे हेच बरोबर आणि तेच बरोबर करायचे असेल तर आपण चुकीच्या फोरमवर आलोय ये लक्षात घ्या.

आणि महाभारताकडे इतिहास म्हणून बघण्यापेक्षा महाकाव्य म्हणून पाहिले तर आपले बरेच प्रश्न मिटतील. कारण प्रत्यक्षात काय घडले आणि कसे घडले हे एक व्यासमुनी सोडले तर कुणालाच खात्रीलायकरित्या माहीती नाही.

त्यामुळे वाद घालायाचाच तर अजुन अनेक मुद्दे आहेत. मला एका प्रश्नाचे अजून उत्तर मिळाले नाही. महायुद्धात दोन्ही बाजूचे मिळून अनेक अक्षोहीणी सैन्य मेले. पांडवांचे राज्य पांडवांना मिळाले पण बाकीच्या राज्यात मग कुणी राज्य केले. त्यांचे तर राजे, राजपुत्र, अधिकारी, सैनिक सगळेच इथल्या युद्धात मारले गेले. त्यांचे पुढे काय झाले. यांची जबाबदारी कुणी पांडवांनी घेतली का त्यांना तसेच वाऱ्यावर सोडून दिले.

आशुचँप, युध्दात जो जिंकतो त्याला हरलेल्या सर्वांवर अधिपत्य मिळते. पांडवांना त्यांच्या राज्यासोबत हेही मिळाले. ते त्यांनी स्वत:कडे ठेवले असेल किंवा त्यांना मदत केलेल्या मित्र राजांच्या वंशजांना दिले असेल. पांडव स्वर्गात गेल्यावरही हस्तिनापुराचे काय झाले ते तरी कुठे माहितेयं? त्यांच्या वंशजांनीच चालविले असणार.

३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो. त्यानंतर अर्जुन पुत्र परीक्षित राज्य करतो. त्या नंतर जनमेजय राज्य करतो.

कौरव-पंडवांच्या त्या महायुद्धात त्यात नाना देशीचे नाना राजे त्यांच्या सैन्यासह सहभागी होऊन सर्व मृत्युमुखी पडले. अपरिमित जीवहानि होऊन आर्यांची संस्कृती नष्टप्राय झाली. पुढे युद्धातून पळून गेल्यामुळे जिवंत राहिलेले सैनिक, स्त्रिया आणि वृद्ध आपापल्या आकलनाप्रमाणे अनेक गोष्टी सांगू लागले. या युद्धाबद्दल विविध प्रकारच्या कथा प्रसृत झाल्या. त्यातले खरे - खोटे कुणालाच कळेनासे झाले. कुणी पांडव सुष्ट आणि कौरव दुष्ट असे सांगू लागले, तर कुणी त्याउलट बोलू लागले.

महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांना याबद्दल बरीच माहिती होती, कारण त्यांचा स्वत:चा सुद्धा यापैकी काही घटनांमधे सहभाग होता. त्यांनी ठरवले, की या सगळ्या कथांचे संकलन करावे, आणि खरोखर काय घडले, हे जाणून काव्यरूपात शब्दबद्ध करावे. व्यासांनी यापूर्वी वेदांचे संकलन केलेले असून त्यांच्या आश्रमात त्यांचे अनेक हुशार शिष्य होते. त्या सर्वांच्या मदतीने हे कार्य अंगावर घेऊन त्यांनी ‘जय’ नामक महाकाव्य रचले, आणि त्याची संथा आपल्या शिष्यांना दिली.

पुढे अर्जुनाचा नातू परिक्षित, याचा मुलगा राजा जनमेजय याने नाग जमातीच्या लोकांचा नायनाट करण्याचे सत्र आरंभले. त्या प्रसंगी व्यास-शिष्य वैशंपायन याने व्यासांचे ते काव्य गाऊन दाखवले, शिवाय आश्रमात संग्रहित, पण व्यासांनी त्यांच्या काव्यात समाविष्ट न केलेल्या अनेक कथा देखील सांगितल्या. जनमेजयाला आपल्या पूर्वजांविषयी अभिमान वाटावा, अश्या स्वरूपात हे सर्व सांगितले गेले. पुढे नैमिषारण्यात सौती याने पुन्हा आणखी अनेक उपकथांची भर टाकून हे महाकाव्य आणखी विस्तृत स्वरूपात सांगितले.

… परंतु या सर्वात मुळात आर्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर संहार खरोखर कुणी, कसा आणि का घडवून आणला, आर्यांच्या कोणत्या दुर्गुणांमुळे त्यांच्यावर हे संकट ओढवले, हे मात्र सांगितलेच गेले नाही

असा उल्लेख मला मिसळपाव वर सापडला

तिथले समांतर महाभारत किंवा विद्रोही महाभारत वाचण्यासारखे आहे.

ही लिंक पहा
http://www.misalpav.com/node/26554

मंडळी कादंबरी आणि इतिहास यात गल्लत करू नका. कादंबरीकार स्वतच्या कल्पनाशक्तीने सत्याच्या जवळपास जाणारे वातावरण उभे करून आपल्याला हवेतसे संवाद मांडू शकतो. >>> पटले ..
इतर माहिती सुद्धा छानच दिली सगळ्यांनी .. Happy

सुमुक्ता,

>> तसे असेल तर इंद्रप्रस्थच्या महाराणीला डावावर लावल्याचे पाप तरी त्या दासाच्या माथी यायला हवे.

अहो पण दास आणि क्षत्रिय यांच्यात द्यूत संमत नाही ना. मग महाराणीस डावावर लावणे कसे शक्य आहे?

आ.न.,
-गा.पै.

महाभारताकडे इतिहास म्हणून बघण्यापेक्षा महाकाव्य म्हणून पाहिले तर आपले बरेच प्रश्न मिटतील>> हेच तर मी म्हणत होतो.

दास आणि क्षत्रिय यांच्यात द्यूत संमत नाही ना. >>> मग ज्याक्षणी युधिष्टीर दास झाला त्याक्षणापासुन द्यूत थांबविले गेले हवे होते.

अहो पण दास आणि क्षत्रिय यांच्यात द्यूत संमत नाही ना. मग महाराणीस डावावर लावणे कसे शक्य आहे? >> मग तेव्हाच विरोध व्हायला हवा होती ना उपस्थित ज्येष्ठांकडून!

मग ज्याक्षणी युधिष्टीर दास झाला त्याक्षणापासुन द्यूत थांबविले गेले हवे होते.
>>>
फक्त अपाँईटमेंट लेटर हातात पडले असेल जॉईंनिंग नाही.

dreamgirl,

>> मग तेव्हाच विरोध व्हायला हवा होती ना उपस्थित ज्येष्ठांकडून!

सगळ्यांनाच पांडव दास झाल्याचा जबर धक्का बसला होता. कोणाचीही मनं थाऱ्यावर नव्हती. एक द्रौपदी आणि विकर्ण सोडल्यास.

आ.न.,
-गा.पै.

इवण्या,

>> तिथे आपण कुठल्या सिंहासनावर बसले होते महाराज ?

तूच ओळख पाहू. अक्कल असेल तर तुझं तुलाच कळेल. अक्कल नसेल तर कुणाचे काय डायलॉग होते ते आधी तपासून पाहायला शीक. मग तुला कळेल मी काय बोललो ते.

आ.न.,
-गा.पै.

गाम्या तुझ्या सारखी टिनपाट अक्कल नाही रे खरचं
कस काय जमत रे तुला एकदम धक्का वगैरे बसला थार्यावर नव्हती वगैरे आम्हाला वाटले बसला होतास कौरंवांच्या कोपर्यात Wink

इवण्या,

>> आम्हाला वाटले बसला होतास कौरंवांच्या कोपर्यात डोळा मारा

तुमच्या मताप्रमाणे जग चालत नसतं हा धडा तुम्हाला मिळाला. हेही नसे थोडके. प्रगती आहे.

आ.न.,
-गा.पै.

गाम्या चिरकूटगिरी किती करावी काही लिमीट ठेव.

बाकी महाभारत हे श्रीकृष्ण आणि शकूनी यांच्यातच झाले होते दोन कुटनिती डोक्यांमधे खेळलेले होते

मला महाभारत रामायणापेक्षा जास्त जवळचं वाटतं, पटतं नेहमीच. कारण त्यातली माणसं खरी आहेत. चुका करणारी, त्यातून शिकणारी, धडपडणारी. रामायण अगदिच आदर्शवादी आहे जे झेपत नाही आणि पटत तर त्याहूनही नाही. सीतेला अग्निपरिक्षा द्यायला लावणारा राम कधीच जवळचा वाटत नाही, सतत आदर्शाचं ओझं डोक्यावर बाळगणारा वाटतो याउलट द्रौपदीला सखी मानून तिचं रक्षण करणारा कृष्ण जास्त खरा वाटतो.

अगदी कृष्णही महाभारतात मानवी भावभावनांचा साज लेवून येतो. रथचक्र उद्धरू दे म्हणणार्‍या कर्णावर निशाणा साध असं अर्जुनाला तो सांगतो तेंव्हा चीड येते त्याच्यातल्या राजकारण्याची. सगळं माहित असूनही तटस्थ पहात राहतो तेंव्हाही.

कर्णाबद्दल वाचल्यावर नेहमीच आत काहितरी तुटत राहतं, जर कुंतीचा निर्णय वेगळा असता तर कर्णाचे आयुष्य किती वेगळे असते हे जाणवत राहातं. असामान्य असूनही एक सामान्य माणूस जसा नियतीचे घाव सोसत असेल तसे कर्ण सोसतो म्हणूनच कदाचित तो अधिक जवळचा वाटतो इतर पांडवांपेक्षा. तो चुका करतो पण त्याची फळंही भोगतो, अर्जुनासारखं सतत रडत आणि पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा अट्टाहास नाही करत तो. कर्ण आणि अर्जुन ही तुलना सतत होत रहाते मनात महाभारत वाचताना. अर्जुनाला संधी जास्त मिळाली, त्याला साथ देणारी माणसं होती, खुद्द कृष्ण त्याच्या बाजूने होता. पण नशीब आणि माणसं दोन्हीचीही तितकीशी साथ नसताना कर्ण लक्षात राहतो, मनात रेंगाळत राहतो यातच काय ते आलं.

गामाभौ,
आपल्या पोस्टी वाचल्यावर बऱ्याच गोष्टी नवनवीन वाटत होत्या. मी ऐकलेल्या वाचलेल्याहून बरच वेगळ काही काही होत त्यात. मला या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. आपल्याला माहिती असलेले महाभारताचे काही स्त्रोत सांगू शकाल का (कादंबऱ्या वगेरे).. मला जे महाभारत कळाल आहे ते राधेय, मृत्युंजय अशा इतर वेगवेगळ्या पुस्तकांमधून कळालेलं आहे. मूळ अस महाभारत म्हणून मी काही वाचलेलं नाही ..

***********
मला वाटते सगळ्यांनी आपापले माहित असलेले स्त्रोत इथे टाकावेत. जेणेकरून ज्यांना इच्छा आहे त्यांना विविध अंगांनी वाचन करता येईल.
महाभारत हि मालिका हा एक कॉमन स्त्रोत आहे असे मला वाटते.. Happy

हजारो ख्वाईशे ऐसी : पोस्ट फारच आवडली. रामायणाच्या भागाबद्दल काहीच बोलायचं नाहीये पण बाकी पोस्टला अग्दी अगदी Happy

हजारो ख्वाईशे ऐसी >>+१
कर्णाबद्दल वाचल्यावर नेहमीच आत काहितरी तुटत राहतं>>+१
असामान्य असूनही एक सामान्य माणूस जसा नियतीचे घाव सोसत असेल तसे कर्ण सोसतो म्हणूनच कदाचित तो अधिक जवळचा वाटतो इतर पांडवांपेक्षा.>>+१
पण नशीब आणि माणसं दोन्हीचीही तितकीशी साथ नसताना कर्ण लक्षात राहतो, मनात रेंगाळत राहतो यातच काय ते आलं.>>+१

अर्जुनासारखं सतत रडत आणि पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा अट्टाहास नाही करत तो > हे वाक्य कितीही वेळा वाचले तरी जमत नाही . अर्जुन रडत कधी होता ? पॉलिटिकली करेक्ट कधी राहण्याचा प्रयत्न केला ?
थोडे संदर्भ दिल्यास आभार

Pages