'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली.
भारतात कदाचित हे ठीक असेल.
पण अमेरिकेत रहाणार्‍यांनो,
असा विचारहि करू नका. काही पायी चालणार्‍या मुलांना पाहून माझ्या मित्राने त्यांना लिफ्ट देऊ का विचारले, वर ते नको म्हणाले तर पुनः या, मला त्रास होणार नाही म्हणत रेंगाळला. दोन दिवसांनी त्याच्या घरी पोलीस! मुलांना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार वगैरे करणारे अनेक लोक असतात म्हणून ही खबरदारी. बिचार्‍या मित्राला १५ दिवस कटकटीला तोंड द्यावे लागले, शेवटी कुठून तरी वशिला लाऊन सुटला. नंतर सुद्धा त्याच्या घरासमोरून पोलिसची गाडी फिरत असे.

त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.>>>
एका राज्याच्या लोभापायी दुर्योधनाच्या पापात त्याला साथ देणारा , द्रौपदीला दुर्योधानासाठी जिंकण्याची भाषा करणारा , तिला भर सभेत वेश्या म्हणणारा आणि वस्त्रहरणाची मजा लुटणारा आणि काय काय नीच कामं करणारा कर्ण केवळ दानशूर होता म्हणून त्याला मनापासून दंडवत प्रणाम करताय का ?

एका राज्याच्या लोभापायी दुर्योधनाच्या पापात त्याला साथ देणारा , द्रौपदीला दुर्योधानासाठी जिंकण्याची भाषा करणारा , तिला भर सभेत वेश्या म्हणणारा आणि वस्त्रहरणाची मजा लुटणारा आणि काय काय नीच कामं करणारा >>> नक्की कशामुळे घडले हे सर्व? निव्वळ कुंतीपायी! तिला मानाचे स्थान आणि त्याच्या माथी कायम उपेक्षाच?

मला वाटत महाभारतातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आपण पूर्णपणे चांगले किव्वा पूर्णपणे वाईट असे म्हणू शकत नाही ..
प्रत्येकात काही गोष्टी अनुकरणीय आहेत तर काही गोष्टी 'असे करू नये' शिकवणाऱ्या आहेत..

वस्त्रहरणाची मजा लुटणारा आणि काय काय नीच कामं करणारा >>>>>
कर्ण हा प्रत्येक लेखकाने आपापल्या विचारानुसार घडवलेला आहे, एका पुस्तकामध्ये असे वाचनात आहे कि द्रौपदि सभेमध्ये मदतीची याचना करत असताना कर्णासमोर येते, कर्ण आपल्या अस्त्रावर मूठ घट्ट करून तयार असतो, द्रौपदिने मदत मागितल्यास सर्व बंधने तोडून मदत करायचे त्याने ठरवलेले असते, परंतु द्रौपदि त्याच्यासमोर न थांबता पुढे निघून जाते..

एका राज्याच्या लोभापायी दुर्योधनाच्या पापात त्याला साथ देणारा >>>> असे तर अगदीच कुठे वाचनात नाही, कर्ण स्वतः दिग्विजयवीर होता, त्याला राज्यच हवे असते तर तो कसेही घेऊ शकला असता, दुर्योधनाच्या काय कोणाच्याही मदतीची त्याला गरज भासली नसती इतका तो पराक्रमी होता. तो केवळ एक कृतज्ञता म्हणून त्याची साथ देत असे, कारण जग त्याला सूतपुत्र म्हणून हिणवत असताना दुर्योधनाने त्याला 'अंग' राज्य प्रदान सन्मान प्राप्त करून दिला होता हि कर्णासाठी मोठी गोष्ट होती...
.
'मुळात चांगला, पण वाईट गोष्टीची साथ देणारा' असे त्याचे साधारणतः रूप आढळते..

Sad
माफ करा , द्रौपदिच म्हणायचे होते,
नावात माझा नेहमीच गोंधळ होतो पण हा अगदीच लाजीरवाणा होता. Sad
लक्षात आणून दिल्याबाद्दल धन्यवाद् .. बदल केला आहे..

मला वाटते, त्याला उपेक्षा होणे, अपमानित होणे हे अजिबात सहन झाले नाही, त्यातून दुर्योधनाने सन्मान केला. त्याबद्दल कृतज्ञ रहायचे म्हणून त्याला दुर्योधनाच्या कृत्यात जरी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसेल तरी गप्प बसला.
स्वतःला क्षत्रियांच्या बरोबरीने समजावे, अशी इच्छा. स्वतःच्या अपमानाबद्दल राग. पण मग इतरांचा, विशेषतः अबलांवर अन्याय, त्यांचा अपमान होत असता त्यांना मदत करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य नव्हे काय?
म्हणून -
मला वाटत महाभारतातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आपण पूर्णपणे चांगले किव्वा पूर्णपणे वाईट असे म्हणू शकत नाही ..
याला अनुमोदन.

मला वाटत महाभारतातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आपण पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे म्हणू शकत नाही >> अनुमोदन

कर्णाला बद्दल बोलताना खूपं जण म्हणतात कर्ण चांगला होता. काही जण म्हणतात वाईट होता. मा‍झ्या मते कर्ण हा एक विचार आहे. कर्णाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्यापैकी प्रतिज्ञा मुख्य आहेत. सगळ्या प्रतिज्ञा त्यांनी प्राणाची पर्वा न करता जीवन भर निभावल्या. ही एक जरी चांगली गोष्ट आपण अनुभवली, आत्मसात केली तरी भरपूर काही साध्य होईल.

पण मग इतरांचा, विशेषतः अबलांवर अन्याय, त्यांचा अपमान होत असता त्यांना मदत करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य नव्हे काय? >>> हेच तर त्याचे शल्य आहे. अंगी क्षत्रियाचे गुण असूनही केवळ पिता सारथी आहे म्हणून 'सूतपुत्र' म्हणून त्याला हिणवले गेले. मग केवळ द्युतगृहात त्याच्याकडून क्षत्रियाच्या वागणूकीची का अपेक्षा करायची?

क्षमा करणे हा गुण आहेच. पण त्याचे पात्र 'मनावर विजय मिळवणारे' असे रंगवलेच नाहीये. तेंव्हा ज्या व्यक्तीने काहीही कारण नसताना त्याचा अपमान केला होता त्याची संधी मिळताच त्याने परतफेड केली - ती पण फक्त शाब्दिकच होती.

एका राज्याच्या लोभापायी दुर्योधनाच्या पापात त्याला साथ देणारा , द्रौपदीला दुर्योधानासाठी जिंकण्याची भाषा करणारा , तिला भर सभेत वेश्या म्हणणारा आणि वस्त्रहरणाची मजा लुटणारा आणि काय काय नीच कामं करणारा कर्ण केवळ दानशूर होता म्हणून त्याला मनापासून दंडवत प्रणाम करताय का ?

>>>>>>>>

सलमान खान आठवला..

किंबहुना बरेचदा कर्ण म्हटले की तो वरील सर्व बाबी लक्षात घेता आठवतोच..

वरील बाबी म्हणजे वर्ड टू वर्ड मॅच करू नका, पण दानशूरपणा हा सामाईक गुण आणि इतर अपराध वा गुन्हे, हा फॅक्टर दोघांमध्ये सामाईक आहे.

तसेच लोकजन या दोघांच्या चांगल्या कामाला चांगले आणि वाईट गोष्टींना वाईट म्हणत आलेत.

या दोघांनाही कोणी पुर्ण चांगला किंवा पुर्ण वाईट म्हणत नाही.

असो, सलमान सहज आठवला, त्यावर धागा नेऊ नका ही विनंती, अन्यथा बिल माझ्यावरच फाडाल...

तुर्तास मी कर्णाबद्दल इतकेच म्हणेन,
एखाद्याच्या वाईट वागण्यामागे काहीतरी कारण असू शकते, असेलच असे नाही. नसूही शकते
पण एखाद्याच्या चांगले वागण्यामागे निव्वळ आणि निव्वळ त्याचा चांगुलपणाच असतो.

म्हणून एखाद्या चांगल्या गोष्टीचे पटकन कौतुक करून मोकळे व्हावे, पण तेच वाईटाला वाईट ठरवायची घाई करू नये Happy

मला वाटत महाभारतातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आपण पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे म्हणू शकत नाही >>. १००%.
मानवी स्वभाव आणि त्यांची अनाकलनियता महाभारतात दिसते.कर्णाला तर जन्मापासून नाकारण्यात आले होते.द्रौपदी, स्वयंवरात मी सूतपुत्राला वरणार नाहीअसे म्हणते.सूतपुत्र म्हणून अंगी शौर्य असूनही ब्रह्मास्त्र मिळवण्याकरिता लबाडी करावी लागणे,एकंदरीत सतत अवहेलना /मानखंडना होत गेली.झळाळून उठते ती त्याची दुर्योधनाविषयी कृतज्ञता.

भागवत,

चांगला धागा आहे. माझी कर्णाच्या क्षात्रगुणांबद्दलची मतं सांगतो.

वस्त्रहरणप्रसंगी द्रौपदीस्वयंवराच्या वेळचा हिशोब चुकवायची नामी संधी कर्णाला चालून आली होती. त्याने जर दुर्योधनाला द्रौपदीस सोडून द्यायला लावलं असतं तर पुढे आयुष्यभर द्रौपदीवर त्याचे उपकार राहिले असते. तसं त्याला बोलूनही दाखवता आलं असतं. पण त्याची बुद्धी फिरली होती.

कर्णाने दुर्योधनाला नेहमी चुकीचा सल्ला दिला आहे. ज्या ठिकाणी पांडव वनवासात होते त्या ठिकाणी घोषयात्रा काढून त्यांना हिणवायची काय गरज होती? तिथे कौरव नेमके चित्ररथ गंधर्वाच्या तावडीत सापडले. तेव्हा कुठे गेला कर्णाचा पराक्रम? मग पांडवांनी चित्ररथ गंधर्वाशी युद्ध करून सोडवल्यावर कौरवांची चांगलीच छीथू झाली. चित्ररथ गंधर्व देखील कौरवांची हलकट वृत्ती पाहून त्यांना शाप देणार होता. पण युधिष्ठिराने त्याला आवरलं.

द्यूत खेळायची कल्पना शकुनीच्या डोक्यात आली आणि तिला कर्णाने आकार दिला. पुढचं महाभारत (अक्षरश:) सगळ्यांना ठाऊक आहे. कर्णाच्या भरवश्यावर दुर्योधन कुरुक्षेत्राचं युद्ध लढायला तयार झाला खरा. पण कर्णाचा युक्तिवाद होता की भीष्म आणि द्रोण आपल्या बाजूला असतांना आपण अजेय आहोत. आता हा युक्तिवाद अत्यंत तकलादू आहे. विराटपर्वात गोहरणाच्या वेळेस या दोघांचा एकट्या अर्जुनाने पराभव केला होता. तेव्हाही कर्णाने काहीच चमक दाखवली नाही.

एकंदरीत एक योद्धा म्हणून कर्ण अर्जुनाच्या जवळपासही फिरकू शकत नव्हता. नाही म्हणायला त्याच्या नावावर राजसूय दिग्विजयाची एकहाती कामगिरी मात्र आहे. युधिष्ठिराने जसा इंद्रप्रस्थमध्ये राजसूय केला तसाच यज्ञ दुर्योधनाने द्यूताद्वारे पांडवांचं राज्य हाती लागल्यावर केला. आपली वट दाखवावी म्हणून. त्याने खंडणी गोळा करायच्या कामावर कर्णाला लावलं. युधिष्ठिराच्या वेळेस भीम पश्चिमेला, नकुल दक्षिणेला, सहदेव पूर्वेला आणि अर्जुन उत्तरेला जाऊन दिग्विजय प्राप्त करून आले होते. कर्णाने हे सारे एकट्याने पार पाडले. फक्त अर्जुन लांबवर थेट उत्तरसमुद्रापर्यंत गेला होता तेव्हढा दूर कर्ण गेला नाही. ही एकमेव कामगिरी सोडली तर कर्णाचं कर्तृत्व कुठेच झळाळून उठलेलं दिसंत नाही.

असं असलं तरी एक दाता म्हणून त्याची कीर्ती अक्षुण्ण आहे.

आ.न.,
-गा.पै.

रुन्मेश प्लीज जिकडे तिकडे बॉलीवूड आणून आपल्या अकलेचे तारे दाखवू नयेत. Sad

कर्ण हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे, अगदी त्याला तानं असताना सोडणार्या कुंतीचा द्वेष द्वेष वाटला होता, महाभारत पाहताना लहानपणी.
कालच रात्री मुलाला कर्णाची गोष्ट सांगितली, कारण सोनीवर सुर्यपुत्र कर्ण सुरू होत आहे, Happy Happy तर थोडी माहिती दिली.

गामा, मला वाटत जसे कर्णाबद्दलचे कच्चे दुवे तुम्ही दाखविले त्याच्प्रमाणे कमी अधिक प्रमाणात पांडवांमधे सुद्धा होते. फक्त त्यांना ठळकपणे समोर न मांडता पांडवांची दुखरी बाजू उदा. पांडू/पंडू राजाचा शाप, कुंती ने एकटीने केलेला सांभाळ, पिताहिन पोरं हेच ठळकपणे सर्व कथांमधे सांगितल्या गेलेल आहे..

या उलउ, भीमाने नेहमी कौरवांना हिणवणे, मी तर अर्जुन सुद्धा त्यात सामील होता हे वाचलयं .. तसेच धर्माची द्युत खेळण्याची आवड हे सर्व अगदी सर्वच साहित्यात झाकोळल गेलेल आहे .

अंतिम निकाल सर्व काही ठरवतो हे मान्य. जसे यात पांडव जिंकतात आणि कौरवांचा पराभव होतो पण म्हणुन इकडले पुर्णच वाईट आणि तिकडले पुर्णच चांगले अस नै न म्हणता येणार ..

राहता राहिला कर्णाने दुर्योधनाला साथ द्यायचा प्रश्न तर जागोजागी अवहेलना झाल्यावर दुर्योधनाने जेव्हा त्याला अंगराज पद बहाल केले त्याचक्षणी त्याने त्याच्या आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कामात साथ देण्याचा पण केला असणार तर त्यात वावगं काहिच नै ना.. तो त्यान निभावला हे हि नसे थोडके. जागोजागी जेव्हा त्याला ते काम वाईट आहे हे माहिती असुनसुद्धा . त्यात त्यानं त्याच मित्रप्रेम दाखवलयं कारण ज्यावेळी तो सर्वांसमोर हिणवला गेला होता त्याक्षणी दुर्योधनान त्याला साथ दिली होती .

महाभारत हे महाकाव्य म्हणजे देव दानव असलं मला स्वतःला तरी कधीच वाटत नै.. यात बस मानवी मनाचे, स्वभावाचे विविध कंगोरे दाखवले आहेत .. आणि त्यातही संपुर्णपणे राजकारण खेळलेल आहे अस मला तरी वाटतं.. जी पार्टी जिंकलीय तिचा जन्मापासुनचा काळ, जडणघडण, मित्र, शत्रु, हितचिंतक सर्वकाही ..
बाकी याची रचना वादातीत हे निश्चितच Happy

गामा चुभुदेघे Happy

हजार लोकांशी याच्या वर हजार वेळा चर्चा करून काही उपयोग झालेला नाही .

कर्ण , भीष्म , द्रोण अन दुर्योधन या सगळ्याना चुकीच्या पद्धतीने मारून जो धर्माचा विजय झाला तोच खरा Happy

कर्ण किंवा कौरव काही फार चांगले होते अस नाही पण पांडवांच्या चुकाहे तितक्याच मोठ्या आहेत .

पण त्यांच्या बाजूने 'देव' असल्यामुळे विषय संपतो Happy

मला असे वाटते की रामायण, महाभारत वा तत्सम कोणत्याही साहित्यावर आधारित कादंबरी ही ज्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी कल्पून लिहिली गेली आहे, त्या व्यक्तीरेखेला ती-ती कादंबरी उचलून धरते.

गोनिदांचे महाभारत वाचताना समस्त कौरव मंडळींचा कर्णासहित राग येत रहातो. याउलट शिवाजी सावंत लिखित मॄत्युंजय वाचताना, कर्णाच्या व्यक्तिरेखेचे बारीक-सारीक कंगोरे समजून घेताना समस्त पांडवांसहित कधी कधी श्रीकॄष्णाचाही राग येतो.

मॄत्युंजय हे कर्णालाच केंद्रस्थानी ठेवून लिहिले असल्यामुळे त्याच्या जीवनातील काही प्रसंग इतके उठावदार लिहिले गेले आहेत ज्यांचा इतर महाभारतात ओझरता उल्लेख आढळतो.
१. कर्णाचे मनोमन श्रीकॄष्णास आदर देणे
२.इंद्रास केलेले कवच-कुंडलांचे दान
३. श्रीकृष्ण- कर्ण भेट
४. कुंती-कर्ण भेट
५. कर्णाचे मृत्युशय्येवरील दान
हे ते ठळक प्रसंग

रामायण हे महाकाव्य म्हणजे वाईट वृत्ती विरुद्ध सत्प्रवॄत्ती यांचे द्वंद्व तर महाभारत म्हणजे 'व्यक्ती तितक्या प्रवॄत्ती' या नुसार माणसे कशी असतात व विविध प्रसंगी कशी वागू शकतात याचा उहापोह.

टीना +१
आशिका +१

रामायण हे महाकाव्य म्हणजे वाईट वृत्ती विरुद्ध सत्प्रवॄत्ती यांचे द्वंद्व तर महाभारत म्हणजे 'व्यक्ती तितक्या प्रवॄत्ती' या नुसार माणसे कशी असतात व विविध प्रसंगी कशी वागू शकतात याचा उहापोह. >> +१ त्यामुळेच महाभारताच्या व्यक्तीरेखा आपल्या मनाला भिडतात आणि आपण त्या जवळून अनुभवू शकतो.

टीना,

>> त्याचक्षणी त्याने त्याच्या आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कामात साथ देण्याचा पण केला असणार तर त्यात वावगं
>> काहिच नै ना.. तो त्यान निभावला हे हि नसे थोडके.

प्रतिज्ञापूर्तीबद्दल त्याचं कौतुक आहेच. Happy मात्र जर तो स्वत:स दुर्योधनाचा मित्र म्हणवतो तर बदसल्ला देण्याची जबाबदारी त्याच्यावर येतेच ना? त्यात कपटाने द्यूत खेळायला लावणे, वनवासातल्या पांडवांची मुद्दाम खोड काढणे (एकदा दुर्वास ऋषींना त्यांच्याकडे पाठवलं आणि दुसऱ्यांदा घोषयात्रा काढली), अशा अनेक आगळीकींचा समावेश आहे. कफल्लक आणि वनोवनी भटकणाऱ्या पांडवांना खिजवण्यात कसला आलाय पुरुषार्थ?

भीष्म आणि द्रोणांच्या भरवश्यावर दुर्योधनास अंतिम युद्ध लढायचा सल्ला एकीकडे द्यायचा आणि दुसरीकडे भीष्म सेनापती असेपर्यंत स्वत: हाती शस्त्र धरणार नाही असा हट्ट धरून बसायचं. याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा. Uhoh

कर्णावर जन्मत: खूप अन्याय झालाय हे मान्य. पण त्याला या अन्यायाची परतफेड करायची संधी वस्त्रहरणाच्या प्रसंगी चालून आली होती. ती त्याने दवडली. वस्त्रहरण हा द्रौपदीप्रमाणे कर्णाच्याही आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आहे याकडे कुणाचंच लक्ष गेलेलं दिसंत नाही. त्या अर्थी कर्ण दुर्दैवी आहे.

या दुर्दैवाबद्दल मला सहानुभूतीही आहे. पण शेवटी जेव्हा पराक्रम आणि वर्तनाची चिकित्सा होते तेव्हा कर्णाचं पारडं बरंच हलकं होतं. Sad

आ.न.,
-गा.पै.

आशू २९

महाभारत ही देखील एक कथा च आहे Happy

वा काही सत्य असले तरी जे महाभारत आपण वाचतो अभ्यासतो त्यापेक्षा कैक पटीने वेगळे असण्याचीच शक्यता जास्त आहे.

जर त्यातील पात्रांना आपण रुपक म्हणून पाहिले तर आजच्या काळातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये ती व्यक्तीमत्वे शोधण्याचा मोह सहज होऊ शकतो.

मृत्यंजय वाचताना नकळत आपल्या मनात कर्णाबाबत सहानुभूती आणि आपुलकी तयार होते ते लेखकाचे यश म्हणावे लागेल.पण म्हणून मृत्युंजय वाचल्यानंतर कर्णाशी अर्जुनाशी तुलना करणे, पांडवांनी कायम राजकारण करुन कुटीने कर्णाला किंवा कौरवांना पराभूत केले असा समज करुन घेणे बालिशपणाचे लक्षण आहे.
इथे राजकारण प्रत्येकानेच केले, शेवटी त्यांनी एकमेकांना शत्रू मानले होते ,शत्रुपुढे कसली तत्व आणि कसले चूकीचे मार्ग , ध्येय गाठण्यासाठी जो तो स्वैर वागला. तुम्हाला कधी अभिमन्युला मारताना कर्ण चूकीचा वाटेल तर कधी जुगारात (द्यूत) पत्नीला लावणारे पांडव निर्लज्ज वाटतील. एकूण महाभारतात असे काही आहे म्हणून तर ते वाचण्याची आवड निर्माण होते ,अन्यथा पांडव आणि देव चांगले आणि कौरव वाईट अशी पाणचट कथा कोणी वाचली असती का .......

बाकी चालू द्या तुमचे पुराण Happy

एकंदरीत एक योद्धा म्हणून कर्ण अर्जुनाच्या जवळपासही फिरकू शकत नव्हता. >> अत्यंत चुकीची माहीती!
धनुर्धारी म्हणून कर्ण हा अर्जुनापेक्षाही कांकणभर सरस होता!

टीना +१
आशिका +१

कर्ण हा एक विचार आहे >> हे पटलं. तसंही महाभारतात पूर्णपणे काळी किंवा पांढरी व्यक्तीचित्रे रंगवली नाहीत त्यामुळेच ती जवळची वाटतात.

कर्ण आणि अर्जुन यांच्यापलीकडे एकलव्य होता.. पण...

द्रोणाचार्यांनी आपला लाडका शिष्य अर्जुनासाठी त्याचा गेम केला, आणि शेवटी अंतिम युद्धात स्वतःच अर्जुनाविरुद्ध लढले.

रंतु द्रौपदि त्याच्यासमोर न थांबता पुढे निघून जाते..>>>
३ r d क्लास इंडिअन mentality . वाईट गोष्ट घडली कि ओढून ताणून ती स्त्री च्या माथी मारायची . कर्ण द्रोपदी च्या मदत मागण्याची वाट का बघत होता ?
हे सगळं होत असताना तो स्वताहून पुढे आला नाही ह्यातूनच द्रोपदी ने अंदाज लावला असेल ह्याला काही मदत करायची इच्छा नाही . उलट ह्याच्याकडे मदत मागितली तर हा स्वयंवरच्या वेळेला झालेल्या अपमानाचा बदला पुरेपूर घेणार . आणि झालही तेच . कर्ना ने स्वयंवर जिंकायचं आणि तिने लग्न दुर्योधनाशी करायचं . हा नीचपणा दिसत नाही का . म्हणे द्रोपदी जबाबदार होती . कैच्या काई
असे तर अगदीच कुठे वाचनात नाही, कर्ण स्वतः दिग्विजयवीर होता, त्याला राज्यच हवे असते तर तो कसेही घेऊ शकला असता>>>:D
तसं असतं तर त्याच्यावरची जबाबदारी वाढते . एवढा दिग्विजयवीर होता तर माझ्यावर अन्याय झाला अन्याय झाला म्हणून का किरकिर करत होता . अंग देशाचा राजा बनव्ल्यावारच तो दुर्योधनाच्या बाजूने झाला न . कर्णाने स्वताच्या बळावर दिग्विजय केलेला ऐकण्यात नाही . त्याच्यावर सूतपुत्र म्हणून सगळ्या जगानेच अन्याय केला होता . मग उत्त फक्त पांडवांबरोबर का काढायचं ? दुर्योधन त्यांचा शत्रू होता म्हणून ना

गामा , गोष्ट जर बदसल्ला द्यायचीच आहे आणि ह्याची करणी त्याची करणी ठरवायची आहे तर एकट्या कर्णालाच कशाला, संपुर्ण महाभारतालाच कोर्टात आणाव लागेल .. मी म्हणतेय कि कुणा एकाला धारेवर कस धरावं . तस तर मग ते घडवून आणणारा देव दोषी कि त्यानं उगा सर्व घडवून आणण्याच्या नादात एकेकाला सफर केलं ..

राहता राहिले पांडव चांगले म्हणायचा प्रश्न तर त्यांचा जो करुण अंत झाला तो तर सर्वश्रुतच आहे ना ..

कपटाने द्युत खेळायला लावने हा शकुनीचा सल्ला होता .. कर्णाचा नव्हता. आणि त्यातल्या द्रोपदी च्या मानहानीचा प्रसंग आहे सारीका३३३ तर राग कर्णाचा करण्यापूर्वी धर्माचा करा ज्याला स्वतःची बायको म्हणजे द्युतात लावण्याची वस्तु वाटली ..

या संपुर्ण महाभारताला जी कारण ठरली तिचे स्वतःचे वागणे किती संयत होते ते पन विचारात घ्या नं ..

घरी आलेल्या पाहुण्याचा कसा मानपमान करावा हे तिलापन कळायला हव होत .. आता कर्ण जर साधा सुतपुत्र आहे तर तो माणसासारखा वागला यात त्याचा दोष कसा काढावा .. मला कर्ण हे पात्र आवडत अगदि पांडव आणि कौरवांबरोबरच पण म्हणून धर्मानं द्रौपदीला द्युतात लावली हे सोडून कर्णान तिला सर्वांपासुन वाचवता वाचवता धुत्कारली आणि तिचा अपमान केला ह्याचाच डंका पिटल्या जातो हे पटत नाही म्हणून त्याची बाजू ..

समोरच्याला मोठा करण्याच्या नादात एखाद्याची बाजू लक्षातच घेतली जात नै आहे हे दिसत नै आहे का इथं ?

Pages