आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून ३५० जणांना एडनवरून INS सुमित्रावर सुखरुप आणलं गेलंय. काही म्हणा, "अपना घर तो अपना घर है ... आ अब लौट चले". कुठलेही नागरिक कुठेही जगभर विखुरलेले असले तरी त्यांची मातृभूमी त्यांना संकटकाळी सुखरूप परत आणायला/सहाय्य पुरवायला आटापिटा करतेच. आईच ती!
--------
INS सुमित्रावरचा एक नौदल अधिकारी आमच्या संस्थेतला, ठाण्याचा मुलगा आहे. आत्ताच त्याला व्हॉट्सॅपवर कौतुकाचा मेसेज टाकला. TOI ला त्याचा फोटो पण आलाय Happy

भरत मयेकर,

>> इराणचा अमेरिका व अन्य देशांशी होऊ घातलेला आण्विक करार ही गेल्या आठवड्यातली सगळ्यात महत्त्वाची
>> आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणावी लागेल.

नक्कीच. पण इराणला कधीच अण्वस्त्रे बनवायची नव्हती. इराणने मार्च २०१२ मध्येच पारचीन येथल्या सैनिकी तळाची पाहणी करावयास आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगास अनुमती दिली होती. तेव्हा अमेरिकेने काहीच हालचाल केली नाही. त्यावेळेस पारचीन हा एकमेव विवादास्पद मुद्दा होता.

मात्र आता करार करून नक्की काय अमेरिकेच्या पदरात पडलं आहे?

फेब्रुवारी २०१२ मध्ये इराणने पारचीन येथे आ.अ.आ.स प्रवेश नाकारला होता, मात्र लगेच मार्च २०१२ मध्ये परत प्रवेश देऊ केला होता. संबंधित बातमी : http://www.bbc.co.uk/news/world-middle-east-17269341
पण आयोगाने वा अमेरिकेने काहीच हालचाल केली नाही.

अणुऊर्जा आयोगाच्या इराक चमूचा माजी अध्यक्ष असलेल्या रॉबर्ट केलीच्या मते पारचीन तळापेक्षा मारीवन प्रांताची पाहणी करायला हवी होती. संदर्भ : http://www.lobelog.com/why-hasnt-the-iaea-followed-up-irans-inspection-o... (Robert Kelley वर सर्च मारणे)

त्यानुसार डिसेंबर २०१४ मध्ये मारीवन बघायची अनुमती इराणने दिली, तर आयोगाने परत पारचीन सुविधा बघायचा हट्ट धरला. संबंधित बातमी : http://www.rferl.org/content/iran-iaea-nuclear-program-inspections-mariv...

आता एप्रिल २०१५ मध्ये काहीबाही करार होतो आहे. तर मग आत्तापर्यंत टोलवाटोलवी का चालली होती? अमेरिकेचं उद्दिष्ट काय आहे? हा करार धूळफेक तर नाहीना?

काहीका असेना इराणवरचे निर्बंध उठले तर भारताचा फायदा आहे.

आ.न.,
-गा.पै.

पाश्चिमात्य देश आणि इराण - अणुकरार

मयेकर, गेलं दीड वर्षं चालू असलेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आहेत पण येत्या काही आठवड्यात अमेरिकन काँग्रेसमध्ये इराणबरोबरच्या करारावर मंजुरी मिळवणे ओबामा सरकारला आवश्यक आहे. अमेरिकन काँग्रेस इराणबरोबरच्या कोणत्याही कराराच्या विरोधात आहे. तसंच आतापर्यंत अमेरिकाद्वेष्टे असलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी हे देखिल ह्या कराराच्ं स्वागत करतात की नाही कुणास ठाऊक.

इराण म्हणतंय की निर्बंध मागे घेतल्याशिवाय करारातील मुद्द्यांचे पालन करणार नाही आणि युरोपिय महासंघ म्हणतोय की इराणने न्युक प्रोग्रॅमवरील मर्यादांचे पालन केल्याशिवाय निर्बंध हटवणार नाही.

भारतासाठी हे निर्बंध हटणे खूप महत्वाचे कारण आधी खरेदी केलेल्या इंधनाचे पैसे चुकते करणे भारताला खूप अडचणीचे पडत होते. हे तांत्रिक कारण आणि अमेरिकेचे दडपण ह्यामुळे भारताची इराणमधून केली जाणारी क्रूडची आयात गेल्या पाच वर्षात १ कोटी ८० लाख टनांनी घटली होती. निर्बंध मागे घेतले गेले की स्वस्तात मुबलक आयात केली जाऊ शकते. एकिकडे आर्थिक निर्बंधांमुळे फटका बसलेल्या इराणला त्यांच्याकडला जवळजवळ ३ कोटी बॅरल्सचा क्रूडचा साठा हळूहळू विकायला काढावा लागेल., पर्यायाने आंतरराष्ट्रिय इंधन बाजारातील भाव घसरतील.

तसेच, ONGC Videsh आणि IOC ह्यांनी जो २००२ साली इराणच्या इंधनसाठ्याचा लिलाव जिंकला होता पण नंतरच्या काळात ती प्रोसिजर थांबली होती, ती मार्गी लागेल.

अश्विनी तै,

भारतीय नागरीकांबरोबरच, भा. नौदलाने पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि श्रीलंकन नागरीकांचीही सुटका केली आहे.

भारतीय नागरीकांबरोबरच, भा. नौदलाने पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि श्रीलंकन नागरीकांचीही सुटका केली आहे.>>>> सलाम !! एकूण १७ देशांच्या नागरिकांना भारतीय नौदलाने सोडवलं आहे. त्यात असुरक्षित येमेनमधून बाहेर पडू इच्छिणारे येमेनचेच ९० नागरिक आहेत. आपले परराष्ट्र राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग हे ह्या मोहिमेची देखरेख करत आहेत. आतापर्यंत येमेन मधून १८००हून अधिक भारतियांना सागरी व हवाईमार्गाने बाहेर काढण्यात आलं आहे.

अजून २०००हून जास्त भारतिय येमेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना.

कॅलिफोर्नियात पाण्याचा वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेतील सर्वाधिक कृषी उत्पादन करणार्‍या कॅलिफोर्नियात पाण्याचा सर्वाधिक वापर शेतीसाठी होत असून चार वर्षाच्या सलग दुष्काळामुळे कृषी क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या १७००० नागरिकांना रोजगार गमवावा लागला आहे आणि या वर्षी जवळपास ३ अब्ज डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता आहे.

१९९० च्या सुमारास माझ्या पाहण्यात "चायनाटाउन" हा अतिशय सुंदर इंग्लिश चित्रपट पाहण्यात आला. जॅक निकल्सन सारख्या तगड्या कलाकाराचा अतिशय सुंदर अभिनय, रॉबर्ट टाउनची सुंदर रित्या गुंफलेली गुंतागुंतीची सस्पेन्स कथा व रोमन पोलिंस्किचे दिग्दर्शन..यामुळे हा चित्रपट माझ्या कायमच्या लक्षात राहीला आहे. वन ऑफ द टॉप १० इंग्लिश सिनेमात मी त्या सिनेमाला गणतो.त्या सिनेमामधले एक कॅरेक्टर हॉलिस मॉरे हे १९१०ते १९३० च्या दरम्यान लॉस अँजेलीस वॉटर ब्युरो चा चिफ अभियंता विलिअम मुलहॉलंड याच्यावर आधारलेले होते. त्या चित्रपटात उल्लेखलेले बारकावे लक्षात यावे म्हणुन मग मी लॉस एंजलीस वॉटर ब्युरोचा इतिहास व या विलिअम मुलहॉलंडचा इतिहास जरा खोलात जाउन अभ्यासला.

हा चित्रपट बघितल्यानंतर काही दिवसातच अमेरिकेत पी बी एस या माझ्या अत्यंत आवडीच्या टीव्ही चॅनलवर याच विलिअम मुलहॉलंडच्या जिवनावर आधारीत एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी माझ्या पाहण्यात आली. त्या डॉक्युमेंटरी मुळे व लॉस एंजलीस वॉटर ब्युरोच्या अभ्यासामधे मला लॉस एंजलेस अ‍ॅक्विड़क्ट कसा बांधला गेला व त्या अ‍ॅक्विडक्टद्वारे सिएरा नेव्हाडा रेंजमधल्या व लॉस एंजलेस पासुन २५० मैल(जवळ जवळ ४०० किलोमिटर) लांब असलेल्या ओवेन्स रिव्हर व्हॅली मधले ओवेन्स रिव्हरचे पाणी या मुलहॉलंडने १९१३ मधे लॉस एंजलीस मधे कसे आणले.. तेही फक्त ग्रॅव्हिटी व अनेक बोगदे वापरुन.. हे कळले व सध्याच्या मॉडर्न डे लॉस एंजलिस शहराचा विकास व आजुबाजुच्या संत्रि, मोसंबी,पिचेस व इतर बागायती शेतीचे मुळ हे म्हणजे हा लॉस एंजलीस अ‍ॅक्विडक्टच हे कळले.

पण आता गेल्या १०० वर्षात.. मुळ लॉस एंजलीस अ‍ॅक्विडक्ट प्रॉजेक्टला विस्तारीत करुनही.. कॅलिफोर्नियाची लोकसंख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की हुव्हर डॅमवरुन व ओवेन्स व्हॅलिमधुन लॉस एंजलीस अ‍ॅक्विडक्टमधुन येणारे पाणीही आता लॉस एंजलीसला कमी पडु लागले आहे.

गेल्या ४-५ वर्षात कॅलिफोर्नियात चालु असलेला सलग दुष्काळ अजुनच त्या पाण्याच्या टंचाइत भर टाकत आहे. सिएरा नेव्हाडा रेंजमधल्या वॉटर एन्कॅचमेंट एरियामधे गेल्या बर्‍याच वर्षात बर्फही कमी व पाउसही कमी पडला.. त्यामुळेही कॅलिफोर्नियात पाण्याची टंचाइ एकदम तिव्र झाली आहे.

असे ऐकिवात आले आहे की राजकारण्यांचा पुढेमागे असा प्रॉजेक्ट राबवायचा मनसुबा आहे की अमेरिकेच्या मिडवेस्ट मधे जमिनीखाली जे पाण्याचे अ‍ॅक्वाफर आहेत.. ज्याने अमेरिकेचा मिडवेस्ट हा अतिशय सुपिक बनलेला आहे.. त्या अ‍ॅक्वाफरचे पाणी कॅलिफोर्नियाला वळवण्यात येणार आहे.ख खो दे जा!

(या विलिअम मुलहॉलंडवर व त्याच्या लॉस एंजलेस अ‍ॅक्वीडक्ट वर एक सुंदरसा लेख लिहायचा विचार आहे. वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहीणार आहे. एवढा मोठा प्रॉजेक्ट यशस्वी करुन लॉस एंजलीसचा कायापालट ज्याने केला व जवळ जवळ २५ वर्षे लॉस एंजलीस वॉटर ब्युरोचा मुख्य अभियंत्याची यशस्वि धुरा ज्याने सांभाळली.. त्याच्या कारकिर्द्रीचा अ‍ॅब्रप्ट शेवट मात्र १९२८ मधे त्यानेच बांधलेल्या सेंट फ्रांसिस डॅमच्या कॅटॅस्ट्रोफिक फेल्युअरने व त्याने झालेल्या ६०० जणांच्या ट्रॅजिक जिवितहानीने झाला.. Sad )

याच्या कारकिर्द्रीचा अ‍ॅब्रप्ट शेवट मात्र १९२८ मधे त्यानेच बांधलेल्या सेंट फ्रांसिस डॅमच्या कॅटॅस्ट्रोफिक फेल्युअरने व त्याने झालेल्या ६०० जणांच्या ट्रॅजिक जिवितहानीने झाला.. >>> ओह! Sad

अश्विनी माफ़ करा विषयांतर होते आहे तरी प्रश्न विचायचा मोह होतो आहे.

मुकुंद हा प्रॉजेक्ट अव्यवहार्य आहे असे म्हणुन पूर्ण होईपर्यंत त्यावर तेव्हा टीका झाली का?

वाटाघाटींच्या माध्यमातून अमेरिका इराणच्या अणुकार्यक्रमाची कोंडी करत आहे अश्या मुद्द्यावर इराणमधला कट्टर गट वाटाघाटींबद्दल नाराज आहे. ह्यात इराणने आपल्या संवर्धित युरेनियमची क्वांटिटी १० टनाहून ३०० किलोपर्यंत खाली आणायची आहे आणि १९००० सेंट्रिफ्यूजेस ऐवजी ६००० सेंट्रिफ्यूजेस वापरायची आहेत.

त्याचबरोबर अमेरिकेने इराणच्या भुयारी अणुप्रकल्पाला टारगेट करण्यासाठी तयार केलेल्या प्रगत अश्या बंकर बस्टर बॉम्बची चाचणी घेतली आहे. अमेरिकेने हा बॉम्ब इस्रायललाही द्यायची तयारी व्यक्त केली होती. एकिकडे यशस्वी वाटाघाटी आणि एकिकडे ही चाचणी, तसेच तुर्की व पर्शियन गल्फमध्ये तैनात केलेल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांच्या तैनातीत बदल न करण्याचा निर्णय...ह्या गोष्टींमुळेही विरोध आहे.

मुलहॉलंड व त्याच्या अ‍ॅक्वीडक्ट बद्दल लिहीताना खुपच विषयांतर झाले असते म्हणुनच मी वर लिहीले होते की एक वेगळा लेख यावर लिहीन म्हणुन पण युरो तु आता प्रश्न विचारलासच आहे म्हणुन थोडक्यात अजुन त्याबद्दल लिहीतो.

त्या प्रचंड मोठ्या प्रॉजेक्टला आक्षेप घेतले होते पण तो अव्यवर्याह आहे म्हणुन नाही. पहिला आक्षेप ओवेन्स व्हॅली मधल्या मुळच्या शेतकर्‍यांनी घेतला. पण तो आक्षेप प्रॉजेक्ट सुरु होताना किंवा करताना घेतला नव्हता. या मुलहॉलंडने व तत्कालीन लॉस एंजलएस च्या महापौराने मिळुन हा प्रॉजेक्ट सुरु करायच्या आधी संगनमताने ओवेन्स व्हॅलीची शेते तिथल्या शेतकर्यांकडुन १९०३-४ पासुन कवडिमोलाने विकत घ्यायचा सपाटा चालु केला होता. ते करत असताना त्यांनी त्यांच्या अ‍ॅक्विडक्टच्या प्लानची चाहुल ओवेन्स व्हॅलीच्या शेतकर्‍यांना अजिबात लागु दिली नाही. मग १९०७मधे ती सगळी जागा त्यांनी लॉस अँजलिस वॉटर ब्युरोच्या अधिपत्याखाली आणली. जेव्हा १९०७ मधे प्रॉजेक्ट सुरु केला तेव्हा ओवेन्स व्हॅली मधल्या उरलेल्या शेतकर्‍यांना मुलहॉलंडने सांगीतले की ओवेन्स रिव्हरचे थोडेसेच पाणी ते डिव्हर्ट करणार आहेत. पण पुढच्या १० वर्षात ओवेन्स रिव्हरचे बहुतेक सगळेच पाणी सॅन फेर्नांडो व्हॅली व लॉस एंजलीस कडे डिव्हर्ट केले गेले व ओवेन्स रिव्हर व्हॅलीमधल्या शेतकर्‍यांच्या लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे. मग १९२५ पासुन कॅलिफोर्निया वॉटर वॉर सुरु झाले( चायनाटाउन चित्रपटाचे कथानक याच काळातले- १९२५-१९३० दरम्यानचे आहे) व त्या शेतकर्‍यांनी मग अ‍ॅक्विडक्टला सुरुंग वगैरे लावायचे प्रकार सुरु केले.

दुसरा आक्षेप सॅन फेर्नांडो व्हॅलीमधे ज्यांनी कवडिमोलात जागा घेउन ठेवल्या होत्या( अ‍ॅक्विडक्ट मुळे पाणी आल्यावर तिथल्या जागेचे भाव खुप वाढतील या अपेक्षेने) त्यांनी घेतला. कारण १९१३ च्या लॉस अँजलीस सिटी चार्टर प्रमाणे सिटीसाठी या अ‍ॅक्वीडक्टने आणलेले सरप्लस पाणी सिटी च्या बाहेर म्हणजे सॅन फेर्नांडो व्हॅलीला विकता येणार नव्हते. मग त्या सगळ्या इन्व्हेस्टर गबरु श्रिमंत लोकांनी जी जागा सॅन फेर्नांडो व्हॅलीमधे घेउन ठेवली होती त्याला काहीच भाव नसता मिळाला.. मग त्या गबरु श्रिमंत लोकांनी पॉलिटिशिअन लोकांवर दबाव आणुन... काही अपवाद सोडता(उदा. सध्याची बरबँक सिटी.. जी अजुनही ग्रेटर लॉस एंजलीसच्या अधिपत्याच्या बाहेरच आहे).. बहुतेक सर्व सॅन फर्नँडो व्हॅलीच ग्रेटर लॉस एंजलीस म्हणुन लॉस एंजलीसच्या अधिपत्याखाली आणली व अ‍ॅक्विडक्टच्या पाण्यावर डल्ला मारला. ते पाणी मीळाले म्हणुन मग एका दिवसात त्यांच्या जागेच्या किंमती १०० पटीने वाढल्या!

हे असे सगळे अ‍ॅक्विडक्ट्च्या पाण्यामागचे पॉलीटि़क्स असले तरी एक इंजीनिअरींग फिट म्हणुन तो अ‍ॅक्विडकट पॅनामा कॅनालच्या तोडीचाच आहे असे जाणकार समजतात. व त्या अ‍ॅक्विडक्टमुळेच आपण आज जो लॉस एंजलीसचा विकास झालेला बघत आहोत तो होउ शकला हे निश्चित!

आता अ‍ॅक्विडक्टच्या या सगळया अवांतर गोष्टींनंतर मुळ मुद्द्याकडे वळु..

कॅलिफोर्नियाच्या पाणी टंचाइचा भारताने काय बोध घ्यावा? कॅलिफोर्नियाच्या सिएरा नेव्हाडा माउंटन रेंजमधल्या कमी बर्फाचे कारण ग्लोबल वॉर्मिंग असेल तर?

पर्यावरण तज्ञ असे भाकीत वर्तवत आहेत की ग्लोबल वॉर्मींगमुळे हिमालयातले ग्लेशियर्स कायमचे वितळु लागले आहेत व हिमालयातलाही हिमवर्षाव कमी होत चालला आहे. त्यामुळे त्या ग्लेशियर्समधुन व स्नो मेल्टमधुन गंगेला व यमुनेला येणारे पाणी पुढच्या ४०-५० वर्षात कमी कमी होउन गंगेतल्या खोर्‍यात राहणार्‍या ४० कोटी लोकांच्या पाण्याचा प्रश्न भिषण असणार आहे. हे खरे आहे काय? भारतिय पर्यावरण तज्ञांचे यावर काय मत आहे हे कोणाला इथे माहीत आहे काय?

ते खरे असेल तर भारतातले पॉलिटिशिअन्स व तज्ञ यावर काही उपाय शोधत आहेत का?

मुकुंद , खूपच माहितीपूर्ण लिहित आहात . धन्यवाद .

भारताने हिमालयासंदर्भातल्या वातावरण बदल / भूकंप ( भूभौतिकशास्त्र ) इ . संशोधनामध्ये खूपच गुंतवणूक केली आहे . त्यादिशेने बरेच संशोधन भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत.

http://www.bangaloremirror.com/bangalore/others/Ganga-basin-under-threat...

तुम्ही म्हणताहात त्याप्रमाणे हिमालयाचा बर्फ वितळून ४० - ५० वर्षांनी भीषण परिस्थिती उद्भवेलच परंतु त्याही आधीची काही वर्षे सातत्याने उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणावर बर्फ वितळल्यामुळे उत्तरेतील अनेक नद्यांना प्रचंड पूर येत राहतील आणि त्यामुळे होणारे नुकसानही प्रचंड असेल .

कॅलिफोर्नियाच्या पाणी टंचाइचा भारताने काय बोध घ्यावा? >>> कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या भानगडीत पडू नये :डोमा:.....just joking.

गेले कित्येक वर्षं ग्लोबल वॉर्मिन्ग ह्या फिनॉमिनॉन बद्दल जगात अवेअरनेस आणायचे, उपाय योजायचे चालू आहे. क्लायमेट चेंज कॉन्फरन्सेस पण चालू असतात. IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) चे रिपोर्ट्स येत असतात. पण दुर्दैवाने औद्योगीकरण/ विकास आणि पर्यावरण र्‍हास हे हातात हात घालून येत असल्यासारखं चित्र आहे. राहत्या जागांच्या अपुरेपणामुळे डोंगरच्या डोंगर सपाट केले जातायत आणि टॉवर्स उभे राहतायत. झाडं तर सरकारने कुठेतरी कोपर्‍यात बागा राखून किंवा हायवेच्या दुतर्फा राखली तरच राखली जातायत. ग्रीन हाऊस इफेक्ट तर आपल्या रोजच्या राहणीमानाशी निगडीत होतो आहे (प्रचंड वाढलेला एअर कंडिशनर्सचा वापर वगैरे).

मुकुंद Happy

कॅलिफोर्नियाच्या पाणी टंचाइचा भारताने काय बोध घ्यावा? >>> कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या भानगडीत पडू नये डोळा मारा.....just joking. >> Lol

जरा वेगळीच बातमी : भारताच्या हरिकाला महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक मिळाले .

ह्यातही महत्वाची आणि जराशी चिंतेची बाब म्हणजे फिडेला ( जागतिक बुद्धिबळ संघटना ) अनेक वर्षानुवर्षे चालत असल्येया प्रतिष्ठेच्या जगातील स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुरेसे प्रायोजक मिळत नाहीयेत . त्यामुळे सगळे वेळापत्रक कोलमडून जात आहे. केवळ रशियाचे बुद्धिबळप्रेम आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा ह्यामुळे ह्या स्पर्धा अजूनतरी होत आहेत .
परंतु वेळापत्रकाच्या गोंधळामुळे अनेक प्रमुख खेळाडूंना अश्या स्पर्धांना मुकावे लागले आहे .

मुकंद

मधे कोकणातिल पाणी मराठ्वाड्याकडे वळवता येईल काय यावर चर्चा ऐकली होती. आर्थात यावर बरिच मतभिन्नता आहे. तसेत भारतातिल नदी जोड प्रकल्पा बद्द्ल बरेच वाद होत असतात. हे आठवुन मी तो प्रश्न विचारला होता.

भारताची लोकसंख्या घनता इतकी जास्त आहे की त्यामुळे कदाचित यात बर्‍याच अडचणी उद्भवु शकत असतिल.

दोन्ही बाजुनी टोकाची मते असणारी तज्ञ मंडळी आहेत.

एक गंभीर विषय आहे ...

ग्लोबल वार्मिंगमुळे हळू हळू मॉन्सून कमी होत जाऊन बंद होणार आहे असे वैज्ञानिक भाकीत आहे. असे असेल तर भयंकर आहे. जगात मॉन्सून हा अत्यंत नियमित पावसाचा प्रकार आहे व त्याला सुपीक भागाची जोड मिळाल्याने व उत्तम हवामानामुळे वैदिक काळापासून हे उपखंड शेतीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून तर एक्स्ट्रीम क्लायमेट्मधले लोक येथे येऊन सेटल झाले आणि इथली लोकसंख्याप्रचंड वाढून घनताही खूप आहे. मॉन्सूनच बंद झाला तर इथे वाळवंटाखेरेज काही राहणार नाही व प्रचंड प्रमाणात उपासमारीने मानवसंहार होण्याची भीती आहे. आताच मॉन्सून अनियमितता दाखवीत आहे...

मान्सुन बंद होईल यापेक्षा मान्सून बदलेल. हे योग्य ठरेल कारण मान्सून हे आपल्या भौगोलिक परिस्थितीवर देखील अवलंबून आहे. आपली भौगोलिक परिस्थिती येत्या ५०० वर्षात तरी बदलणार नाही (अचानक प्रचंड मोठा भुकंप वगैरे आल्यास ती वेळ वेगळी असेल) त्यामुळे अनियमितता मात्र होउ शकेल

मॉन्सूनच बंद झाला तर इथे वाळवंटाखेरेज काही राहणार नाही व प्रचंड प्रमाणात उपासमारीने मानवसंहार होण्याची भीती आहे.>>>>> केविन कार्टरचे सुदानमधल्या दुष्काळावर भाष्य करणारे पुलित्झर प्राईझ विजेते हे छायाचित्र कधीच विसरु शकत नाहिये मी. भारतात एवढी वेळ नक्कीच येऊ दिली जाणार नाही अशी आशा आहे.
sudan famine.jpg

पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांना येमेनमधील संघर्षात पाकिस्तानी सैन्य उतरवण्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानी संसदेत चांगलेच कोंडीत पकडण्यात आले. पाकिस्तानात अंतर्गत संघर्ष धुमसत असताना सैनिकांना सौदीच्या मदतीसाठी पाठवण्याचे कारणच काय अशी विचारणा होत आहे. हा संघर्ष आखातापुरता मर्यादित असून त्या दलदलीत पाकिस्तानने उतरु नये, सौदीच्या राजघराण्याने आदेश दिले म्हणून पाकिस्तानने कोठेही लष्कर पाठवू नये, हा येमेन मधील छोट्या गटांमधील संघर्ष असून पाकिस्तानला ह्याच्याशी काही कर्तव्य नाही, येमेनमधील संघर्षामागे मोठे कारस्थान आहे, सौदीमध्ये लष्कर पाठवणे पाकिस्तानच्या हिताचे नाही....अशी विविध मते, सुचना विविध नेत्यांनी दर्शवल्या आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी सीमा भागातून दहशतवाद्यांचा लोंढा इराणमध्ये घुसखोरी करत असताना त्यांना अडवणार्‍या इराणच्या सीमासुरक्षादलाच्या जवानांनी कारवाई केली. त्यात ८ जवान ठार झाले. गेल्यावर्षीतर 'जैश-उल-अदल' ह्या दहशतवादी गटाने सीमारेषेवर तैनात असलेल्या ५ इराणी जवानांचे अपहरणही केले होते. त्या सीमेवरही घुसखोरी आणि प्रतिकार चालूच असतो. इराण सरकारने पाकिस्तानवर दबाव टाकत सीमाभागातील दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्याचे आवाहन केले होते. अ‍ॅज यूज्वल, पाकिस्तानने सीमाभागात दहशतवादीच नसल्याचे आणि इराणी जवान आपल्या हद्दीत आणले गेले नसल्याचे जाहिर केले होते. पण दोन महिन्यांनी दहशतवाद्यांनी ४ सैनिकांची सुटका केल्यावर पाकिस्तान तोंडघशी पडला. अजून १ सैनिक बेपत्ता आहेच.

युक्रेनमधील संघर्ष थोडा थंडावला असला तरी अमेरिका व नाटोकडून पुर्व युरोपीय देशांमध्ये सतत लष्करी हालचाली सुरु आहेत. पोलंडने रशियाच्या कॅलिनिग्राड या भागातील सीमेवर ६ ऑब्झर्वेशन टॉवर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ७५% खर्च युरोपीय महासंघ उचलणार आहे.

पोलंड, लाटविया व लिथुआनिया ह्या देशांनी आपल्या नागरिकांना रशियाच्या आक्रमणाविरोधात प्रशिक्षण देण्याची तयारी केली आहे. पोलंडच्या संरक्षण मंत्र्यांनी १८ ते ५० वर्षे वयोगटातील विद्यार्थी व नागरिकांना लष्करी स्वरुपाच्या सरावाचे आवाहन केले आहे.

अश्विनी, चांगला धागा! Happy

मुकूंद पोस्ट मस्त आहेत! मला इतकी माहिती नव्हती, लॉस एंजिलीसमध्ये राहूनही! Happy

बातमी येमेन ची:-

माहितीचा स्त्रोतः Times of Oman

Two Air India flights with evacuated Indians from Yemen will be landing in Salalah on Tuesday on their way to Delhi and Mumbai, the spokesperson of the Indian ministry of external affairs has tweeted.
On Monday, India evacuated over 1,000 (574 from Sana'a by air and 479 from Al Hodeida by sea) executing a sophisticated air-sea operation showcasing its maritime power.
Until now, India has evacuated over 3,500 of its nationals and 225 citizens of at least 26 countries in a rare gesture.
Countries that have sought India's assistance in evacuating its nationals from the war-ravaged country, includes, USA, France, Germany, Sweden, Singapore, Malaysia, Ireland, Nepal, Sri Lanka, Bangladesh, Iraq among others. While Pakistan has not sought help for the evacuation of its nationals, India during the operation also rescued Pakistani nationals.
With nearly 3,300 of its nationals out of Yemen, India was looking at wrapping up the evacuation operation in a couple of days.

मित Happy

जगाच्या कानाकोपर्‍यात धुमसणार्‍या, प्रत्यक्षात चालू असलेल्या संघर्षात स्वार्थावर मात करणारी माणुसकी हाच एकमेव आशेचा किरण असणार आहे. जगभरात आतापर्यंत किती रेफ्युजी झाले असतील कुणास ठाऊक? कितीतरी जणांच्या आयुष्याची उलथापालथ झाली असेल. कित्येकांच्या मनावर कायमचे ओरखाडे असतील. कित्येकांनी कायमचे धडे घेतले असतील. कित्येकांनी त्यातूनही पुन्हा फिनिक्सप्रमाणे झेप घेतली असेल.

जगाच्या कानाकोपर्‍यात धुमसणार्‍या, प्रत्यक्षात चालू असलेल्या संघर्षात स्वार्थावर मात करणारी माणुसकी हाच एकमेव आशेचा किरण असणार आहे. जगभरात आतापर्यंत किती रेफ्युजी झाले असतील कुणास ठाऊक? कितीतरी जणांच्या आयुष्याची उलथापालथ झाली असेल. कित्येकांच्या मनावर कायमचे ओरखाडे असतील. कित्येकांनी कायमचे धडे घेतले असतील. कित्येकांनी त्यातूनही पुन्हा फिनिक्सप्रमाणे झेप घेतली असेल. >>> +१००

Pages